नोबेल संशोधन (९) : HIV चा शोध

Submitted by कुमार१ on 1 April, 2019 - 00:59

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ९
(भाग ८: https://www.maayboli.com/node/69416)
*******

या लेखमालेत कालानुक्रमे पुढे जात आपण २१व्या शतकात पोचलो आहोत. या लेखात २००८ च्या पुरस्काराची माहिती घेऊ. हा पुरस्कार २ वेगळ्या संशोधनांसाठी विभागून दिला गेला. ही दोन्ही संशोधने विषाणूंच्या शोधांसाठी झाली होती. ते विषाणू आहेत HIV आणि HPV. या लेखात आपण फक्त HIV या बहुचर्चित विषाणूच्या शोधाचा आढावा घेणार आहोत. या संदर्भातले नोबेल हे खालील दोघांत विभागून दिले गेले.

विजेते संशोधक : Françoise Barré-Sinoussi आणि Luc Montagnier
देश : दोघेही फ्रान्स
संशोधकांचा पेशा : विषाणूशास्त्र
संशोधन विषय : HIV चा शोध

या विषाणूचे पूर्ण नाव Human Immunodeficiency Virus ( HIV) असे आहे. त्याच्या संसर्गाने जो गंभीर आजार होतो त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात, हे प्राथमिक ज्ञान एव्हाना बहुतेकांना आहे. गेल्या ३७ वर्षांत या आजाराने सामाजिक आरोग्यविश्व अक्षरशः ढवळून काढले आहे. सुरवातीचे त्याचे भयंकर स्वरूप बघता त्याबद्दलची जनजागृती करणे आवश्यकच होते आणि ती अनेक माध्यमांतून करण्यात आलेली आहे. एड्सचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकविश्वाच्या जोडीने अनेक समाजसेवी संस्थाही मोलाचे योगदान देत आहेत. HIVचा शोध आणि एड्सची कारणमीमांसा हा वैद्यकीय संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. त्यासाठी दिले गेलेले नोबेल हे यथोचित आहे. या सगळ्याचा आढावा या लेखात घेत आहे.

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात संसर्गजन्य आजारांनी समाजात थैमान घातले होते. हे आजार विविध जिवाणू व विषाणूंमुळे होतात. त्यामुळे तत्कालीन संशोधनाचा भर त्या आजारांवरील उपचारांवर केंद्रित होता. त्यातून निर्माण झालेल्या जंतूविरोधक औषधांनी ते आजार बऱ्यापैकी नियंत्रणात आणले. १९७०चे दशक संपताना बरेच संसर्गजन्य आजार आटोक्यात आले होते. प्रगत देशांत तर असा समज झाला होता की असे आजार हे जवळपास दुर्मिळ झालेले आहेत आणि इथून पुढे आपण सूक्ष्मजंतूंची फारशी काळजी करण्याचे कारण नाही ! पण या समजाला एक फार मोठा धक्का लवकरच बसणार होता.

सन १९८१मध्ये अमेरिकेत काही रुग्णालयांत एका विशिष्ट प्रकारचे रुग्ण एकगठ्ठा आढळले. ते समलिंगी पुरुष होते आणि त्यापैकी बहुतेक जण इंजेक्शनद्वारा अमली पदार्थ नियमित घेत असत. त्यांना एका दुर्मिळ प्रकारच्या न्यूमोनियाने ग्रासले होते. एरवी हा आजार आपली प्रतिकारशक्ती प्रचंड ढासळली असताना होतो. त्यामुळे असे रुग्ण हे डॉक्टरांच्या कुतुहलाचे विषय ठरले. त्यानंतर काही काळाने काही समलिंगी पुरुषांना त्वचेचा एक दुर्मिळ कर्करोग (sarcoma) झालेला आढळला.

_kaposis_sarcoma.jpg

यथावकाश या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांचा आजार दीर्घकालीन असल्याचे दिसू लागले तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वेगाने ढासळत असे.त्यतून त्यांना अनेक जंतुसंसर्ग होत. त्यामुळे या आजाराची दखल आरोग्यसेवेतील सर्वोच्च केंद्राकडून घेतली गेली आणि या रुग्णांच्या देखभालीसाठी विशेष वैद्यकीय पथके स्थापन झाली. सुरवातीस या आजाराला "Gay-related Immune Deficiency" (GRID) असे नाव दिले गेले. अन्य एक नाव देखील पुढे आले आणि ते होते “4 H आजार”. त्यातील एक H हा होमोसेक्शुअलसाठी तर दुसरा H हेरोईन-व्यसनाचा निदर्शक होता.

आता संशोधकांचे प्रथम लक्ष्य होते ते म्हणजे या गूढ आजाराचे कारण शोधून काढणे. सुरवातीस काहींनी फंगस वा विशिष्ट रसायने ही या आजाराची कारणे असावीत असे मत मांडले. तर काहींनी हा ‘ऑटोइम्यून’ आजार असावा जो रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश करतो, असा तर्क केला.

मग १९८२मध्ये पॅरीसमधील एका रुग्णालयात यावर झटून काम सुरु झाले. त्यात Luc यांचा पुढाकार होता. हा आजार बहुधा एका विषाणूमुळे होत असावा असा काही संशोधकांचा अंदाज होता. मग Luc, Françoise आणि अन्य काही विषाणूतज्ञांचा चमू यासाठी कामास लागला. त्यांनी संबंधित रुग्णांच्या कसून तपासण्या चालू केल्या. या रुग्णांच्या ‘लिम्फ ग्रंथी’ वाढलेल्या होत्या. त्यांची सूक्ष्म तपासणी केल्यावर त्यात एक खास विषाणू आढळला आणि त्याला LAV असे नाव तात्पुरते दिले गेले (L= lymph). आता हा विषाणू आणि त्या रुग्णांचा खंगवणारा आजार यांचा कार्यकारणभाव लवकरच सिद्ध झाला. मग असेही लक्षात आले की हा आजार फक्त समलिंगी लोकांपुरता मर्यादित नाही. म्हणून सखोल विचारांती जुलै १९८२मध्ये त्याचे अधिकृत नाव ‘एड्स’ असे ठरवण्यात आले. नंतर संबंधित विषाणूवर अधिक संशोधन झाले आणि त्याची १-२ नामांतरे होत अखेर HIV या नावावर १९८६मध्ये शिक्कामोर्तब झाले.

हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. तो रक्तातील लिम्फोसाईट्स या पेशींवर हल्ला करतो. परिणामी आपल्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते. हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.

संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात एड्सच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले गेले. ज्या व्यक्तीस HIVचा संसर्ग झाला आहे तिच्याद्वारा विषाणूचे संक्रमण अन्य व्यक्तीत होऊ शकते. मात्र त्यासाठी बाधित व्यक्तीच्या शरीरातील खालीलपैकी कशाचा तरी थेट संपर्क दुसऱ्या व्यक्तीस व्हावा लागतो:

१. रक्त : यात दूषित रक्तसंक्रमण किंवा इंजेक्शनची सुई वा सिरींज शेअर करणे हे प्रकार येतात.
२. वीर्य आणि गुदद्वारातील अथवा योनीतील द्रव : हे सर्व असुरक्षित संभोगातून येते.

३. मुलास जन्म देताना किंवा स्तनदा मातेचे दूध तिच्या बाळास पाजतानाचा संपर्क.
४. चुंबनातून या विषाणूचा प्रसार होतो का हा औत्सुक्याचा विषय आहे. संबंधित दोन्ही व्यक्तींनी उघड्या तोंडाने चुंबन घेतल्यास आणि त्यातील एकाला संसर्ग झालेला असल्यास, आणि दोघांच्याही तोंडात जखमा असल्यास हा प्रसार होऊ शकतो. म्हणजे पहिल्याच्या रक्तातून लाळेत व पुढे दुसऱ्याच्या लाळेतून रक्तात असा तो प्रसार होईल. अशा प्रकारे रोगप्रसार झाल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत.).

मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.

वैद्यकाच्या इतिहासात एड्स प्रथम आढळल्याची अधिकृत नोंद १९८१मध्ये अमेरिकेत झाली आहे. पण, त्याचा पूर्वव्यापी (retrospective) शोध घेता असे वाटते की असा पहिला रुग्ण १९६६ मध्येच नॉर्वेत आढळला असावा.

आता थोडे प्रस्तुत संशोधकांबद्दल. Francoise या विदुषी फ्रान्सच्या रहिवासी. सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या. त्यामुळे त्यांना स्वस्तात आणि लवकरात लवकर पूर्ण होणारे शिक्षण घ्यावे लागले. पुढे अगदी अपघातानेच त्या पॅरीसमधील प्रतिष्ठित पाश्चर संस्थेत एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाल्या. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७५मध्ये स्वतःची पीएचडी पूर्ण केली आणि तनमन अर्पून विषाणूशास्त्रातील संशोधनास वाहून घेतले. हा पुरस्कार हे त्याचेच फलित.

Luc M हेदेखील फ्रान्सचे रहिवासी. त्यांनी विज्ञान व वैद्यकशास्त्र अशा दोन्ही शाखांतील शिक्षण घेतले आहे. या संशोधनादरम्यान ते पाश्चर संस्थेत ज्येष्ठ वैज्ञानिक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने अथक परिश्रम करून हा शोध लावण्यात यश मिळवले. पुढे १९९३मध्ये त्यांनी एड्सच्या संशोधन व प्रतिबंधासाठी जागतिक संस्था स्थापन केली आहे. या कार्याबद्दल ते अनेक मानसन्मानांचे मानकरी आहेत.

या बहुमूल्य मूलभूत संशोधनानंतर HIV व एड्सच्या संदर्भात वैद्यकात अफाट संशोधन झाले. संबंधित रोगनिदान रक्तचाचण्या विकसित झाल्या. त्या अधिकाधिक सोप्या होत गेल्या. त्यांचे निष्कर्ष त्वरीत मिळू लागले.

hiv_test.jpg

पुढच्या टप्प्यात रोगोपचारासाठी विविध विषाणूविरोधी औषधांचे शोध लागले. आजच्या घडीला अशी अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे. मात्र समाजमनात त्याकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दिसून येतो. त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे आणि ते आपण सर्वांनी मिळूनच करायचे आहे. भविष्यात नवनवीन प्रभावी औषधांनी HIVचे समूळ उच्चाटनही कदाचित होऊ शकेल. पण, त्याचबरोबर समाजमनातील ‘विषाणू’ही नष्ट व्हायला हवा.

‘HIV आणि एड्स’ हा खरोखर एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. त्याची सखोल माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. या विषाणूचा मूलभूत शोध आणि संबंधित संशोधकांचे योगदान एवढीच या लेखाची व्याप्ती आहे. २००८च्या या नोबेलविजेत्या द्वयीस अभिवादन करून हा लेख पुरा करतो.
*************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेस्ट करून मग 3 महिन्यासाठी दोघांना क्लोज मोनिटरिंग खाली ठेऊन, खरे तर खोलीत बंद ठेऊन, 3 महिन्यानंतर परत टेस्ट करायची ती नेगेटीव्ह आली तर संक्रमण झाले नाही आहे असे म्हणता येईल (ते पण छातीठोकपणे नाही)
Submitted by सिम्बा on 3 April, 2019 - 16:05

इथे वेगवेगळ्या असा शब्द टाका.

३. आता हा कालावधी किती असतो? याचे एकच एक उत्तर नाही. आपण रुग्णावर कितव्या पातळीची (generation) चाचणी करतो त्यावर तो ठरतो.
४. समजा ही 4G पातळी आहे. तर याने चौथ्या आठवड्यापर्यंत ९५% रुग्ण +ve दिसतील. तर तिसऱ्या महिना अखेरीस ९९% रुग्ण पक्के +ve दिसतील.
Submitted by कुमार१ on 1 April, 2019 - 20:07 >>>>>

धन्यवाद कुमार१. माझ्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच पण बाकी प्रश्नोत्तरांतूनही बर्‍याच बाबी कळल्या. ४-५ दिवस न आल्याने, पोच द्यायला उशीर झाला आहे, माफ करा.
याविषयी एक शेवटचा त्रास देते --

म्हणजे माणसाच्या शरीरातील व्हायरल लोड वरून त्याची अ-बाधित / बाधित पण विंडो पिरीअड / वाहक / एडस रोगी अशी वर्गवारी होईल. तपासणी पद्धत जितकी प्रगत वापरू तितका कमी व्हायरल लोडचा माणूसही लौकर (३ महिने न थांबता) कळून येईल? यालाच तुम्ही चाळणीचे generation म्हणताय ना?

माझ्या जुन्या प्रश्नात मला असे विचारायचे होते की -- केलेल्या चाचणीवरून व्हायरल लोडचा आकडा / तीव्रता कळतो का म्हणजे एडस रोगी होण्याच्या टप्प्यापासून तो माणूस किती दूर / जवळ आहे हे कळते का ? की फक्त व्हायरस आहे / नाही हे कळते, तेही त्या चाचणी प्रकारात पकडले गेले तर ?

मग एका रक्ताच्या नमुन्यावर वेगवेगळ्या generationच्या चाचण्या करतात का? उदा ----
१. generation १, generation २ या चाचण्या आता वापरात नाहीत, कालबाह्य झाल्या असे समजू
२. generation ३ चाचणीत रक्त नमुना अ-बाधित ठरला. तर तसा रिपोर्ट देऊन -- विंडोची शक्यता लक्षात घेउन -- काही काळाने पुन्हा चाचणी करायचा सल्ला देतात?
३. की त्याच रक्त नमुन्यावर, तेव्हाच generation ४, generation ५ चाचणी (ज्यात कमी व्हायरल लोडही पकडला जाईल) करून बघून बाधित / अ-बाधित अशी खात्री करून घेतात?

यात जुन्या चाचणी पद्धती वापरून (ज्याला खर्च कमी, ---> लॅबची गुंतवणूक कमी + लोकही कमी खर्चात तपासणी म्हणून खूष ---> परिणामी धंदा चांगला -- असे बिझनेस मॉडेल) चुकीचे एचआयव्ही निगेटीव्ह रिपोर्ट दिले जाण्याचीही शक्यता आहे ना?
म्हणजे माणूस बाधित आहे पण कमी क्षमतेच्या चाचणीमुळे कळून आले नाही म्हणून एचआयव्ही निगेटीव्ह ठरला.....

मग लॅबने कुठल्या generationच्या पद्धती वापराच्या याचे काही कायदेशीर निकष असतात?
की डॉक्टर लिहून देतात एचआयव्ही चाचणी -- xxxx या पद्धतीने करून घ्या
की असे काहीच नसते, आपण खात्री करायची कुठली लॅब काय पद्धत वापरते म्हणून किती अचूक / कमी विश्वासार्ह?

@ कारवी

१. तपासणी पद्धत जितकी प्रगत वापरू तितका कमी व्हायरल लोडचा माणूसही लौकर (३ महिने न थांबता) कळून येईल? यालाच तुम्ही चाळणीचे generation म्हणताय ना? >>>>
बरोबर.

२. केलेल्या चाचणीवरून व्हायरल लोडचा आकडा / तीव्रता कळतो का म्हणजे एडस रोगी होण्याच्या टप्प्यापासून तो माणूस किती दूर / जवळ आहे हे कळते का ? >>>

होय, शिरेतील रक्तावरून व्हायरल लोडचा आकडा मोजण्याची एक विशेष पद्धत आहे. पण, ती प्रथम निदानासाठी वापरत नाहीत. निदान हे नेहमीच्याच चाचण्यान्नी केले जाते.पुढे त्या रुग्णाची अधोगती किती होत आहे ते पाहण्यासाठी या चाचणीचा वापर केला जातो. साधारणपणे असे म्हणतात की जेवढा ‘लोड’ जास्त तेवढ्या लवकर एड्स होण्याची शक्यता जास्त. तसेच पक्क्या एड्स रुग्णात जर हा लोड वाढताच राहिला, तर मृत्यू लवकर होऊ शकतो.

३. यात जुन्या चाचणी पद्धती वापरून (ज्याला खर्च कमी असे बिझनेस मॉडेल) चुकीचे एचआयव्ही निगेटीव्ह रिपोर्ट दिले जाण्याचीही शक्यता आहे ना? >>

होय. त्यामुळे अत्याधुनिक ‘G’ च्याच चाचण्या वापरल्या जाव्यात. अप्रगत देशात काही ठिकाणी खर्चाची तडजोड / स्थानिक अनुपलब्धता म्हणून जुन्या वापरल्या जात असल्यास ते अयोग्य आहे.

त्यामुळे अत्याधुनिक ‘G’ च्याच चाचण्या वापरल्या जाव्यात.
म्हणजे नेमक्या कोणत्या.
मग एका रक्ताच्या नमुन्यावर वेगवेगळ्या generationच्या चाचण्या करतात का? उदा ----
१. generation १, generation २ या चाचण्या आता वापरात नाहीत, कालबाह्य झाल्या असे समजू
२. generation ३ चाचणीत रक्त नमुना अ-बाधित ठरला. तर तसा रिपोर्ट देऊन -- विंडोची शक्यता लक्षात घेउन -- काही काळाने पुन्हा चाचणी करायचा सल्ला देतात?
३. की त्याच रक्त नमुन्यावर, तेव्हाच generation ४, generation ५ चाचणी (ज्यात कमी व्हायरल लोडही पकडला जाईल) करून बघून बाधित / अ-बाधित अशी खात्री करून घेतात?
यावरही कृपया प्रकाश टाकावा.

सरकारी रुग्णालयात नाव व रिपोर्ट गुप्त ठेवला जाईल असे सांगून चाचणी करा असे आवाहन करण्यात येते तर तिकडे या अत्याधुनिक चाचण्या केल्या जातात काय किंवा कसे?

शशिराम,
तुमच्या नव्या प्रश्नांची वास्तव उत्तरे देण्यासाठी या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या तज्ञाची गरज आहे.
क्षमस्व.

धन्यवाद कुमार१, इतक्या आस्थेने, सविस्तर माहिती देता तुम्ही... त्यामुळे विचार करायला अणि प्रश्न विचारायला प्रोत्साहन मिळते.

hiv वरती अजून सुध्दा रामबाण उपाय नाही माणूस हरला आहे .
cancer वर अजून सुध्दा रामबाण उपाय नाही माणूस हरला आहे .
मधुमेह वर अजून सुध्दा रामबाण उपाय नाही माणूस हरला आहे .
heart attack वर अजून सुध्दा रामबाण उपाय नाही माणूस हरला आहे .
कमी वयात केस पांढरे होणे आणि टक्कल पडणे ह्या वर रामबाण उपाय नाही .
माणूस हरला आहे .
रक्त निर्मिती न होणे ह्या वर रामबाण उपाय नाही .
माणूस हरला आहे.
दात नवीन उगवणे आणि हलणारी फिट कारणे रामबाण उपाय नाही माणूस हरला आहे.
खूप मोठी यादी आहे.
आपण फक्त हगवण , मलेरिया , सर्दी , आणि ताप हेच फक्त बरे करू शकतो हे satyach आहे .
बाकी कोणताच आजार बरे करू शकत नाही

@राजेश
मला तुमचे विनोदी प्रतिसाद खूप आवडतात, हे आज सांगू इच्छितो. लिहीत राहा.

उपाशी बोका दुसऱ्या ची मस्करी कारणे खूप सोपे आहे .
मी वर्णन केलेले सर्व रोग मला आहेत असे समजा आणि भारत च नाही पूर्ण जगतील 1 डॉक्टर सुचवा तो मला सर्व आजारातून 2 महिन्यात बरा करेल पूर्ण आयुष्य साठी .
तुमच्या कडे असा डॉक्टर असेल तर तुम्हाला मस्करी करायचा पूर्ण अधिकार आहे

डॉ गंगाखेडकर : अभिनंदन !

आईकडून मुलात संक्रमित होणाऱ्या एड्स आजाराच्या बहुमूल्य संशोधनाबद्दल डॉ रमण गंगाखेडकर यांना आज पद्मश्री जाहीर झाली आहे.
हार्दिक अभिनंदन !

रक्तदान केल्यावर जे ब्लड मिळते , ते पाच रोगासाठी टेस्ट करतात

Hiv
HBV
HCV
Malaria
Syphilis

ह्या यादीत प्रत्येक देशात अजून काही रोग असू शकतात

ह्या पाचही टेस्ट निगेटिव्ह असल्याचे स्टिकर त्या बेगवर लावतात, जर ह्यातला कुठला रोग मिळाला तर ते रक्त रिजेक्त होते, ब्लड बँकेत अशा निगेटिव्ह स्टिकर असलेल्याच बेग मिळतात, रक्त चढवनयापूर्वीही डॉकटर लेबल तपासून बघतात व ते स्टिकर काढून केसपेपरवर चिकटवून ठेवतात , त्यावर पेशमतचे नाव , ब्लड ग्रुप व पाच रोग निगेटिव्ह असा शिक्का असतो

एच आय व्ही झाला की हळूहळू रक्तातील सी डी 4 पेशी कमी होत जातात, सीडी 4 पेशी 250 च्या खाली गेल्या की पूर्वी औषध चालू करत होते, मग हळूहळू हे लिमिट 350 , 500 केले , आज ट्रीट ऑल पॉलिसी आहे, म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह की औषध लगेच सुरू. ( लगेच म्हणजे सीडी 4 , रुटीन ब्लड टेस्ट , एक्स रे , थुंकी तपासणी टीबीसाठी झाले की , ह्याला 2-5 दिवस जातात)

गर्भवती माताकडून मुलाला जाण्याचे प्रमाण पूर्वी 30 % होते , आता ते आलमोस्ट 0-1 % वगैरे आले आहे , मातेला एच आय व्ही उपचार च्या गोळ्या ए एन सी परिअड मध्येच सुरू केल्या की मूल निगेटिव्ह होऊ शकते.
--------
सीडी4 चेक अप दर 6 महिन्याने करतात , औषध चालू केले की पूर्वी कमी असेल तर हळूहळू 400 च्यावर जाऊन स्थिरावते,

मेट्रोपोलिस च्या मदतीने सध्या सर्व सरकारी उपचार केंद्रात व्हायरल लोड तपासणीही फ्री होते , तो वर्षातून एकदा करतात , जो मनुष्य व्यवस्थित औषध घेतो , त्याचा व्हायरल लोड नगण्य म्हणजे यु डी किंवा टी एन डी येतो ( म्हणजे undetected किंवा target not detected ), व्हायरल लोड यु डी असेल तर अशा व्यक्तीकडून इतरांना रोग प्रसार होण्याची शक्यताही नगण्य असते. अशा पेशंटला एकदम 3 महिन्याचे औषध मिळू शकते म्हणजे त्याला वारंवार यायची गरज नाही. अशा रुग्णास महिन्या महिन्याला घरीच कुरियरने औषधे मिळणार , फक्त सहा महिन्याने एकदा हॉस्पिटलला चेकपला जायचे , अशीही एक योजना सुरू होणार होती , पण अजून ती सुरू नाही.
त्यामुळे जे गंभीर रुग्ण आहेत , ते तपासायला जास्त वेळ देणे शक्य होईल.

व्हायरल लोड 1000 च्या वर असेल तर ते फेल्युअर ऑफ ट्रीटमेंट समजतात व ही लाईन फेल झाली , मग पुढची लाईन सुरू करावी लागते, सध्या 3 लाईन उपलब्ध आहेत, पहिल्या लाईनवरच 15 -25 वर्षे तरी जगावे असे आम्ही सांगतो , म्हणजे भविष्यात पुढच्या लाईन वापरता येतात , पहिल्या दोन लाईन कुठेही मिळतात , थर्ड लाईन मात्र फक्त जेजे मध्येच आहे. पूर्ण महाराष्ट्राचे रुग्ण तिथे जातात.

एच आय व्ही ची ट्रीटमेंट म्हजे 3 ड्रगचे कॉम्बिनेशन असते, कधी तीनही मिळून एकच गोळी असेल किंवा उपलब्धतेनुसार एकाची 1 व दुसऱ्या दोन चे 1 असे उपलब्ध असू शकते , एप्रिल 2020 नंतर एक नवीन कॉम्बिनेशन यायचे चान्सेस आहेत , ज्यात नवीन ड्रग डोल्युटाग्राविर उपलब्ध व्ह्यायची शक्यता आहे.

आता ते आलमोस्ट 0-1 % वगैरे आले आहे >>>>

खूपच चांगले झाले.
सविस्तर नव्या घडामोडींच्या माहितीसाठी धन्यवाद !


गीता रामजी : आदरांजली

जगातील ख्यातनाम विषाणूशास्त्रज्ञ असलेल्या गीता रामजी यांचे नुकतेच कोविद-१९ मुळे निधन झाले.
जोहान्सबर्ग येथे ऑरम इन्स्टिटय़ूट ही सेवाभावी संस्था एड्स व क्षयरोगावर संशोधन करीत आहे. त्याच्या त्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी होत्या.

एचआयव्ही प्रतिबंधाच्या अनेक साधनांच्या चाचण्या करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

वरील चर्चेत ‘बर्लिन रुग्ण’ म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते टी. आर. ब्राऊन यांचे नुकतेच वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या एड्ससाठी त्यांच्यावर २००७मध्ये विशेष मूळ पेशींचे प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर ते पूर्णपणे लक्षणमुक्त होते. एड्सचा पहिला ‘बरा’ झालेला रुग्ण अशी त्यांची नोंद झालेली आहे.

मात्र नंतर त्यांचा कर्करोग बळावला आणि त्यामुळे निधन झाले.

एचआयव्ही विरोधी लस तयार करण्याचे काम आव्हानात्मक असून गेली २० वर्षे त्याचे प्रयत्न चालू आहेत.

सध्या कोविड लसनिर्मितीच्या निमित्ताने ‘एम-आरएनए’ तंत्रज्ञानाचा बराच बोलबाला झाला. फायझर व मॉडरनाच्या लसी या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

आता हेच तंत्रज्ञान वापरून एचआयव्ही विरोधी लस तयार केली जाणार आहे. एड्स संबंधी एक संशोधन संस्था आणि मॉडरना यांच्या सहकार्याने ही लस विकसित केलेली आहे.
त्याचे पहिल्या टप्प्यातील शास्त्रीय प्रयोग आशादायक आहेत.

स्तुत्य उपक्रम

कोलकाता येथे डॉ. कल्लोल घोष यांनी 2018 मध्ये एचआयव्हीग्रस्त तरुणांना बरोबर घेऊन एक ‘पॉझिटिव्ह कॅफे’ (उपाहारगृह) चालू केला. यात काम करणारे ७ जण एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे. नुकतेच या कॅफेने मोठ्या जागेत स्थलांतर केले.

पूर्णपणे एचआयव्हीग्रस्त तरुग्णांकडून चालवला जाणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला कॅफे असल्याचा डॉ. घोष यांनी दावा केला आहे.
https://www.ndtv.com/india-news/difficult-battle-kolkatas-positive-cafe-...

स्वस्तात टॅटू काढून घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांना एचआयव्हीची लागण
https://www.loksatta.com/desh-videsh/14-people-test-positive-for-hiv-aft...
ही बातमी अन्यत्र आली आहे त्यात बाधितांचा आकडा कमी दिसतोय.

एचआयव्हीचा प्रसार याप्रकारे होण्याची शक्यता बरीच कमी असते पण ती असतेच
https://www.cdc.gov/hiv/basics/hiv-transmission/ways-people-get-hiv.html

Pages