वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ९
(भाग ८: https://www.maayboli.com/node/69416)
*******
या लेखमालेत कालानुक्रमे पुढे जात आपण २१व्या शतकात पोचलो आहोत. या लेखात २००८ च्या पुरस्काराची माहिती घेऊ. हा पुरस्कार २ वेगळ्या संशोधनांसाठी विभागून दिला गेला. ही दोन्ही संशोधने विषाणूंच्या शोधांसाठी झाली होती. ते विषाणू आहेत HIV आणि HPV. या लेखात आपण फक्त HIV या बहुचर्चित विषाणूच्या शोधाचा आढावा घेणार आहोत. या संदर्भातले नोबेल हे खालील दोघांत विभागून दिले गेले.
विजेते संशोधक : Françoise Barré-Sinoussi आणि Luc Montagnier
देश : दोघेही फ्रान्स
संशोधकांचा पेशा : विषाणूशास्त्र
संशोधन विषय : HIV चा शोध
या विषाणूचे पूर्ण नाव Human Immunodeficiency Virus ( HIV) असे आहे. त्याच्या संसर्गाने जो गंभीर आजार होतो त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात, हे प्राथमिक ज्ञान एव्हाना बहुतेकांना आहे. गेल्या ३७ वर्षांत या आजाराने सामाजिक आरोग्यविश्व अक्षरशः ढवळून काढले आहे. सुरवातीचे त्याचे भयंकर स्वरूप बघता त्याबद्दलची जनजागृती करणे आवश्यकच होते आणि ती अनेक माध्यमांतून करण्यात आलेली आहे. एड्सचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकविश्वाच्या जोडीने अनेक समाजसेवी संस्थाही मोलाचे योगदान देत आहेत. HIVचा शोध आणि एड्सची कारणमीमांसा हा वैद्यकीय संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. त्यासाठी दिले गेलेले नोबेल हे यथोचित आहे. या सगळ्याचा आढावा या लेखात घेत आहे.
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात संसर्गजन्य आजारांनी समाजात थैमान घातले होते. हे आजार विविध जिवाणू व विषाणूंमुळे होतात. त्यामुळे तत्कालीन संशोधनाचा भर त्या आजारांवरील उपचारांवर केंद्रित होता. त्यातून निर्माण झालेल्या जंतूविरोधक औषधांनी ते आजार बऱ्यापैकी नियंत्रणात आणले. १९७०चे दशक संपताना बरेच संसर्गजन्य आजार आटोक्यात आले होते. प्रगत देशांत तर असा समज झाला होता की असे आजार हे जवळपास दुर्मिळ झालेले आहेत आणि इथून पुढे आपण सूक्ष्मजंतूंची फारशी काळजी करण्याचे कारण नाही ! पण या समजाला एक फार मोठा धक्का लवकरच बसणार होता.
सन १९८१मध्ये अमेरिकेत काही रुग्णालयांत एका विशिष्ट प्रकारचे रुग्ण एकगठ्ठा आढळले. ते समलिंगी पुरुष होते आणि त्यापैकी बहुतेक जण इंजेक्शनद्वारा अमली पदार्थ नियमित घेत असत. त्यांना एका दुर्मिळ प्रकारच्या न्यूमोनियाने ग्रासले होते. एरवी हा आजार आपली प्रतिकारशक्ती प्रचंड ढासळली असताना होतो. त्यामुळे असे रुग्ण हे डॉक्टरांच्या कुतुहलाचे विषय ठरले. त्यानंतर काही काळाने काही समलिंगी पुरुषांना त्वचेचा एक दुर्मिळ कर्करोग (sarcoma) झालेला आढळला.
यथावकाश या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांचा आजार दीर्घकालीन असल्याचे दिसू लागले तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वेगाने ढासळत असे.त्यतून त्यांना अनेक जंतुसंसर्ग होत. त्यामुळे या आजाराची दखल आरोग्यसेवेतील सर्वोच्च केंद्राकडून घेतली गेली आणि या रुग्णांच्या देखभालीसाठी विशेष वैद्यकीय पथके स्थापन झाली. सुरवातीस या आजाराला "Gay-related Immune Deficiency" (GRID) असे नाव दिले गेले. अन्य एक नाव देखील पुढे आले आणि ते होते “4 H आजार”. त्यातील एक H हा होमोसेक्शुअलसाठी तर दुसरा H हेरोईन-व्यसनाचा निदर्शक होता.
आता संशोधकांचे प्रथम लक्ष्य होते ते म्हणजे या गूढ आजाराचे कारण शोधून काढणे. सुरवातीस काहींनी फंगस वा विशिष्ट रसायने ही या आजाराची कारणे असावीत असे मत मांडले. तर काहींनी हा ‘ऑटोइम्यून’ आजार असावा जो रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश करतो, असा तर्क केला.
मग १९८२मध्ये पॅरीसमधील एका रुग्णालयात यावर झटून काम सुरु झाले. त्यात Luc यांचा पुढाकार होता. हा आजार बहुधा एका विषाणूमुळे होत असावा असा काही संशोधकांचा अंदाज होता. मग Luc, Françoise आणि अन्य काही विषाणूतज्ञांचा चमू यासाठी कामास लागला. त्यांनी संबंधित रुग्णांच्या कसून तपासण्या चालू केल्या. या रुग्णांच्या ‘लिम्फ ग्रंथी’ वाढलेल्या होत्या. त्यांची सूक्ष्म तपासणी केल्यावर त्यात एक खास विषाणू आढळला आणि त्याला LAV असे नाव तात्पुरते दिले गेले (L= lymph). आता हा विषाणू आणि त्या रुग्णांचा खंगवणारा आजार यांचा कार्यकारणभाव लवकरच सिद्ध झाला. मग असेही लक्षात आले की हा आजार फक्त समलिंगी लोकांपुरता मर्यादित नाही. म्हणून सखोल विचारांती जुलै १९८२मध्ये त्याचे अधिकृत नाव ‘एड्स’ असे ठरवण्यात आले. नंतर संबंधित विषाणूवर अधिक संशोधन झाले आणि त्याची १-२ नामांतरे होत अखेर HIV या नावावर १९८६मध्ये शिक्कामोर्तब झाले.
हा विषाणू ‘रेट्रोव्हायरस’ या विशिष्ट गटात मोडतो आणि त्याचे २ मुख्य प्रकार असतात. तो रक्तातील लिम्फोसाईट्स या पेशींवर हल्ला करतो. परिणामी आपल्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते. हा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एड्स ‘आजार’ होतोच असे नाही; हे शरीरातील विषाणूंच्या एकूण संख्येवर (viral load) अवलंबून असते. ती विशिष्ट संख्या ओलांडल्यावर मात्र आजार होतो.
संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात एड्सच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले गेले. ज्या व्यक्तीस HIVचा संसर्ग झाला आहे तिच्याद्वारा विषाणूचे संक्रमण अन्य व्यक्तीत होऊ शकते. मात्र त्यासाठी बाधित व्यक्तीच्या शरीरातील खालीलपैकी कशाचा तरी थेट संपर्क दुसऱ्या व्यक्तीस व्हावा लागतो:
१. रक्त : यात दूषित रक्तसंक्रमण किंवा इंजेक्शनची सुई वा सिरींज शेअर करणे हे प्रकार येतात.
२. वीर्य आणि गुदद्वारातील अथवा योनीतील द्रव : हे सर्व असुरक्षित संभोगातून येते.
३. मुलास जन्म देताना किंवा स्तनदा मातेचे दूध तिच्या बाळास पाजतानाचा संपर्क.
४. चुंबनातून या विषाणूचा प्रसार होतो का हा औत्सुक्याचा विषय आहे. संबंधित दोन्ही व्यक्तींनी उघड्या तोंडाने चुंबन घेतल्यास आणि त्यातील एकाला संसर्ग झालेला असल्यास, आणि दोघांच्याही तोंडात जखमा असल्यास हा प्रसार होऊ शकतो. म्हणजे पहिल्याच्या रक्तातून लाळेत व पुढे दुसऱ्याच्या लाळेतून रक्तात असा तो प्रसार होईल. अशा प्रकारे रोगप्रसार झाल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत.).
मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.
वैद्यकाच्या इतिहासात एड्स प्रथम आढळल्याची अधिकृत नोंद १९८१मध्ये अमेरिकेत झाली आहे. पण, त्याचा पूर्वव्यापी (retrospective) शोध घेता असे वाटते की असा पहिला रुग्ण १९६६ मध्येच नॉर्वेत आढळला असावा.
आता थोडे प्रस्तुत संशोधकांबद्दल. Francoise या विदुषी फ्रान्सच्या रहिवासी. सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या. त्यामुळे त्यांना स्वस्तात आणि लवकरात लवकर पूर्ण होणारे शिक्षण घ्यावे लागले. पुढे अगदी अपघातानेच त्या पॅरीसमधील प्रतिष्ठित पाश्चर संस्थेत एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाल्या. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९७५मध्ये स्वतःची पीएचडी पूर्ण केली आणि तनमन अर्पून विषाणूशास्त्रातील संशोधनास वाहून घेतले. हा पुरस्कार हे त्याचेच फलित.
Luc M हेदेखील फ्रान्सचे रहिवासी. त्यांनी विज्ञान व वैद्यकशास्त्र अशा दोन्ही शाखांतील शिक्षण घेतले आहे. या संशोधनादरम्यान ते पाश्चर संस्थेत ज्येष्ठ वैज्ञानिक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने अथक परिश्रम करून हा शोध लावण्यात यश मिळवले. पुढे १९९३मध्ये त्यांनी एड्सच्या संशोधन व प्रतिबंधासाठी जागतिक संस्था स्थापन केली आहे. या कार्याबद्दल ते अनेक मानसन्मानांचे मानकरी आहेत.
या बहुमूल्य मूलभूत संशोधनानंतर HIV व एड्सच्या संदर्भात वैद्यकात अफाट संशोधन झाले. संबंधित रोगनिदान रक्तचाचण्या विकसित झाल्या. त्या अधिकाधिक सोप्या होत गेल्या. त्यांचे निष्कर्ष त्वरीत मिळू लागले.
पुढच्या टप्प्यात रोगोपचारासाठी विविध विषाणूविरोधी औषधांचे शोध लागले. आजच्या घडीला अशी अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे. मात्र समाजमनात त्याकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दिसून येतो. त्याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे आणि ते आपण सर्वांनी मिळूनच करायचे आहे. भविष्यात नवनवीन प्रभावी औषधांनी HIVचे समूळ उच्चाटनही कदाचित होऊ शकेल. पण, त्याचबरोबर समाजमनातील ‘विषाणू’ही नष्ट व्हायला हवा.
‘HIV आणि एड्स’ हा खरोखर एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. त्याची सखोल माहिती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. या विषाणूचा मूलभूत शोध आणि संबंधित संशोधकांचे योगदान एवढीच या लेखाची व्याप्ती आहे. २००८च्या या नोबेलविजेत्या द्वयीस अभिवादन करून हा लेख पुरा करतो.
*************************************************
1 डिसेंबर :जागतिक एड्स दिन
1 डिसेंबर :जागतिक एड्स दिन
यंदाची जागतिक मध्यवर्ती कल्पना
Equalize
ही आहे. म्हणजेच सर्व एचआयव्हीग्रस्तांना रोगनिदान आणि उपचारांच्या सेवा उपलब्ध होण्याबाबत समानता आली पाहिजे.
https://www.who.int/campaigns/world-aids-day/2022
Isaac Asimov आणि एड्स
Isaac Asimov आणि एड्स
प्रसिद्ध विज्ञानलेखक Asimov यांची आज(2 जानेवारी) जयंती आहे. त्यानिमित्ताने ही कटू आठवण.
त्यांची 1983 मध्ये हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली. त्या दरम्यान त्यांना जे रक्त संक्रमण देण्यात आले त्यातून त्यांना एड्स झाला. परंतु तेव्हा डॉक्टरांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट जाहीर होऊ दिली नाही. पुढे 1992मध्ये त्यांचे एड्समुळे निधन झाले.
मृत्यूपूर्वी त्यांनी डॉक्टरांपाशी अशी इच्छा व्यक्त केली होती, की त्यांच्या मृत्यूचे खरे कारण जगासमोर उघड व्हावे. परंतु तत्कालीन सामाजिक विचार करता डॉक्टरांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यांचे निधन हृदय व मूत्रपिंडविकाराने झाल्याचे जाहीर केले गेले.
पण पुढे दहा वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूचे कारण एड्स असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगजाहीर केले.
..
जगभरात कालांतराने रक्तसंक्रमणापूर्वी त्या रक्ताची एड्स चाचणी करण्याचे बंधनकारक केले गेले.
ओह.खूप दुर्दैवी आहे हे.
ओह.खूप दुर्दैवी आहे हे.
>>>>>>जगभरात कालांतराने
>>>>>>जगभरात कालांतराने रक्तसंक्रमणापूर्वी त्या रक्ताची एड्स चाचणी करण्याचे बंधनकारक केले गेले.
तत्पूर्वी चाचणी होत नव्हती हे किती भयंकर आहे. कारण एडस आला १९८४ मध्ये. मला आठवतय रॉक हडसन या अभिनेत्याला झाल्याची बातमी होती.
रॉक हडसन >>> +1
रॉक हडसन >>> +1
अगदी चांगले आठवतंय !
त्याने स्वतः ती बातमी जगजाहीर केल्याचे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले होते.
१९८६-८७ दरम्यान आमच्या विद्यापीठातील एमडीच्या बहुतेक सर्व विषयांच्या परीक्षांत एड्स या विषयावर निबंधलेखनाचा प्रश्न विचारला होता.
मी १९९७ मध्ये प्रेग्नंट होते
मी १९९७ मध्ये प्रेग्नंट होते तेव्हा इतर रक्त चाचण्याम्बरोबर एड्स टेस्ट पण करुन घेतली होती. पहिलीच व उशीराची गर्भ धारणा, काही इशू असल्यास मुलावर परीणा म व्हाय्ला नको व तत्काळ उपाय योजना करता यावी म्हणून. घरी बरीच बोलणी खाल्ली. पण मी ठाम होते.
तुमची कृती चांगली होती.
तुमची कृती चांगली होती.
आता तर गरोदरपणात ती चाळणी चाचणी सक्तीची आहे - दोनदा. अगदी सुरुवातीस आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये
>>>घरी बरीच बोलणी खाल्ली. पण
>>>घरी बरीच बोलणी खाल्ली. पण मी ठाम होते.
उत्तम निर्णय अमा. खरच काळापुढे.
रक्त संक्रमणातून एचआयव्ही
रक्त संक्रमणातून एचआयव्ही बाधा झाल्याची अल्प उदाहरणे भारतात अलीकडेही अधूनमधून ऐकू येतात :
१. २०१९ : https://timesofindia.indiatimes.com/india/blood-transfusions-infected-13...
२. २०२३ : https://timesofindia.indiatimes.com/india/man-dies-of-hiv-after-blood-tr...
..
सिकलसेल आणि थॅलसिमियाच्या रुग्णांना तर वारंवार रक्तसंक्रमण घ्यावे लागल्यामुळे त्यांना असा धोका अधिकच संभावतो.
मागच्या वर्षी उत्तर भारतात अशा 14 मुलांना बाधा झाल्याची बातमी होती. अर्थात तिच्या खरेखोटेपणा बाबत प्रचंड गदारोळ झाला
एक महत्त्वाची संकल्पना U =
एक महत्त्वाची संकल्पना U = U
एड्स झालेली व्यक्ती जर नियमित उपचार घेत राहिली आणि कालांतराने तिच्या रक्तावरील HIV Viral Load ही चाचणी निगेटिव आली आणि ती सातत्याने निगेटिव्हच राहिली, तर अशा व्यक्तीकडून त्याच्या लैंगिक जोडीदाराला एचआयव्हीचे संक्रमण होत नाही. म्हणजेच अशा जोडीच्या लैंगिक संबंधादरम्यान एड्सच्या कारणास्तव निरोध वापरण्याची गरज नसते.
यालाच वैद्यकात
undetectable = untransmittable
असे म्हटले जाते.
https://www.hiv.gov/hiv-basics/staying-in-hiv-care/hiv-treatment/viral-s...
या विषयावरील एक सुंदर हिंदी लघुपट इथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=W51wcCRyxIM
त्याचे निर्माता डॉ. संजय पुजारी असून लेखन डॉ. विवेक बेळे यांनी केलेले आहे.
सुंदर लघुपट ! जरूर पहा. . .
undetectable आहे पण cured
undetectable आहे पण cured नाही म्हणजे काय? औषधांमुळे विषाणू कह्यात आलाय पण ती नाही घेतली तर पुन्हा बळावेल असं का?
**नाही घेतली तर पुन्हा बळावेल
**नाही घेतली तर पुन्हा बळावेल असं का?>>>
होय, तसेच.
........
AIDS वरील उपचारांमध्ये झालेली लक्षणीय प्रगती पाहता काही डॉक्टरांच्या मते आता 'AIDS' ही संज्ञा कालविपर्यस्त आहे.
त्याऐवजी "advanced HIV" हा शब्दप्रयोग वापरावा असे त्यांनी सुचवले आहे.
या मुद्द्यावर अभ्यासकांमध्ये विचारविनिमय चालू आहे.
being cured and being in long
being cured and being in long-term remission are entirely different situations.
आजच्या घटकेला HIV वर खात्रीचा उपाय नाही. जगात आत्तापर्यन्त फक्त ३ केसेस झाल्या आहेत आणि त्यातही १००% खात्रीलायक उपाय मिळाला असे सध्यातरी म्हणता येणार नाही. "treatment as prevention" (TasP) strategy वापरली जात आहे.
फिल्म बघितली. त्यात HIV ची तुलना कॅन्सरबरोबर केली आहे, हे हास्यास्पद आहे. नशीब की HIV ची तुलना टाइप-१ डायबिटीसबरोबर केली नाही. ज्या रोगामुळे जीव जाऊ शकतो अश्या परिस्थितीत, फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे जाणून बुजून कुणी निर्णय घेत असेल तर ती व्यक्ती खरंच धाडसी (किंवा महामूर्ख) म्हणावी लागेल.
फिल्म बघितली. त्यात HIV ची
फिल्म बघितली. त्यात HIV ची तुलना कॅन्सरबरोबर केली आहे,
>>>
ती पटली नाही आणि त्याची आवश्यकता नव्हती. Undetectable परिस्थितीत लैंगिक जोडीदाराला रोगाचे संक्रमण होणार नाही हा वैद्यकीय मुद्दा सांगणे पुरेसे आहे.
“एड्स पूर्णपणे बरा (cure)
“एड्स पूर्णपणे बरा (cure) होईल का”, हा सतत सलणारा आणि अजून तरी अनुत्तरीत प्रश्न आहे. विविध रासायनिक औषधांनी ते अजून तरी शक्य झालेले नाही.
परंतु आता वैज्ञानिकांनी CRISPER या जनुकीय संपादन तंत्राचा वापर करून शरीरपेशीमधला एच आय व्ही पूर्णपणे नष्ट होईल का, या दृष्टीने प्रयोग चालू केलेले आहेत. अशा एका संशोधनाचे सादरीकरण युरोपीय परिषदेत होणार आहे :
https://www.bbc.com/news/health-68609297
अर्थात ही फक्त संशोधनाची सुरुवात आहे. येत्या काही वर्षांमध्ये त्याची प्रगती समजेल.
या आजारावरील उपचारांमध्ये
या आजारावरील उपचारांमध्ये प्रगती होत आहे. अलीकडे काही रुग्णांना मूळ पेशींचे उपचार दिले गेले. अशा प्रकारे एक रुग्ण या उपचारानंतर सहा वर्षे ‘विषाणूमुक्त’ राहिला आहे. असे Remission मिळालेला हा जगातील सातवा रुग्ण ठरतो.
या रुग्णाचे नामकरण ‘The next Berlin patient’ असे केले आहे ( मूळ Berlin patient चा उल्लेख पान 3 वर आलेला आहे) .
https://www.nature.com/articles/d41586-024-02463-w
नैनिताल मधील ही विचित्र घटना.
नैनिताल मधील ही विचित्र घटना.
17 वर्षाच्या एका मुलीला हेरॉईनचे व्यसन आहे. त्यासाठी लागणारे पैसे ती पुरुषांकडून घेत होती आणि त्यांच्याशी लैंगिक संबंधही ठेवत होती. अशा प्रकारे तिने 19 पुरुषांमध्ये एचआयव्हीचा प्रसार केलेला आहे
https://www.hindustantimes.com/india-news/over-19-youths-test-hiv-positi...
१ डिसेंबर : जागतिक एड्स
१ डिसेंबर : जागतिक एड्स जागृती दिन
जागतिक सद्यस्थिती
जागतिक लक्ष्य : सन 2030 पर्यंत एड्स निर्मूलन
https://www.unaids.org/en/resources/presscentre/pressreleaseandstatement...
एचआयव्ही प्रतिबंधात्मक
एचआयव्ही प्रतिबंधात्मक इंजेक्शनला अमेरिकी औषध प्रशासनाची मान्यता
Lenacapavir या औषधाचे इंजेक्शन इच्छुकांनी वर्षातून दोनदा घ्यायचे आहे. मात्र प्रत्येक इंजेक्शन घेण्याच्या वेळीस त्या व्यक्तीची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आलेली असली पाहिजे.
https://www.gilead.com/news/news-details/2025/yeztugo-lenacapavir-is-now...
एड्सवर प्रभावी उपचार आता
एड्सवर प्रभावी उपचार आता उपलब्ध झाल्याने जगभरातील अशा रुग्णांचे भवितव्य उजळले आहे. भारतात देखील 1990 च्या तुलनेत आजची परिस्थिती समाधानकारक आहे. एकेकाळी एड्स झाला म्हणजे मृत्यू लवकर होणारच अशी परिस्थिती होती. परंतु आता अनेक HIV-positive रुग्ण चांगले जीवन जगत असून त्यांचे HIV-negative जोडीदारांशी विवाह देखील होत आहेत. अशा विवाहातून उपजलेली संतती निरोगी असल्याचे देखील आढळते.
या संदर्भातील एका इंग्लिश लेखाचे शीर्षक असे मार्मिक आहे :
From death certificate to marriage certificate: Journey of HIV-positive Indians
https://www.indiatoday.in/sunday-special/story/journey-of-hiv-positive-i...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/explained/lenacapavir-drug-effective-in-prevent...
बरोबर
* lenacapavir
बरोबर
ते औषध या आजाराच्या उपचार आणि प्रतिबंध अशा दोन्हींसाठी उपयुक्त आहे
Pages