म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ चिडकू, देवकी, शाली --- सगळ्यांचे बरोबर आहे. संदर्भ वेगवेगळे.
पुंबा -- बरोबर, पाणि हवे हात अर्थाने विशेषण रूपात वापरताना. पाणी = प्यायचे पाणी.
खाली लिहीलेले नेटवरून घेतलेय. मूळ ग्रंथांचा माझा अभ्यास नाही.

मराठी शब्द्कोशात कोदंड म्हणजे धनुष्य दिले आहे.
धनुर्धारी राम म्हणून कोदंडपाणि (ज्याचे मुख्य शस्त्र धनुष्य, जसे गदाधारी भीम, चक्रपाणि विष्णु) .
हात या अर्थाने पाणी शब्द वापरला की णि र्‍हस्व.
चिडकूंचा ९ गाठींचा उल्लेखही बरोबर. अग्निपुराणानुसार ९ गाठी असलेल्या बांबूपासून बनलेले धनुष्य = कोदंड

पिनाक -- शंकराच्या धनुष्याचे नाव म्हणून पिनाकपाणि. पिनाकिन् पण बरोबर आहे.
धनुर्धारी साठी धन्विन् ( Warrior with bow / armed with a bow) शब्द पण आहे.
जेनेरिकली, राम, विष्णु, शंकर, अर्जुन सगळे धन्विन् झाले.
पिनाकिन् = पिनाक नावाचे धनुष्य धारण करणारा = शंकर.
शार्ङगपाणि = शार्ङग नावाचे धनुष्य धारण करणारा = विष्णु

पिनाक म्हनजे मोर नाही सापडले.
कदाचित ते कोडे / सुभाषित प्रकारात असावे देवकी.
ज्याच्यात शब्द तेच पण संदर्भ बदलला की अर्थ बदलतो. संदर्भ आठवतोय का?
मोरावर एक संस्कृत निबंध सापडला. त्यात त्याला नीळकंठ म्हटलेय. नीळकंठ = शंकर पण. तसे काही पिनाकचे झाले असावे.

उंटावरचा शहाणा.
एकदा एका माणसाची म्हैस तहान लागली म्हणून वाड्यात शिरली. पुर्वी मोठ्या रांजणात पाणी साठवले जायचे. म्हशीने रांजणात डोकं घातलं, तिचं डोकं अडकुन बसलं. आता ते बाहेर कसे काढायचे कुणाला काही सुचेना.
तिकडून एक माणूस उंटावर बसून जात होता. त्याला विचारले तर तो म्हणाला सांगतो कसे काढायचे. मी उंटावरून उतरणार नाही अगोदर हे दार पाडा मग मला आत येता येईल. दार पाडले आत आला. म्हणाला म्हशीची मान कापा. मान कापली तरी डोकं अडकलेले होते. मग म्हणाला आता रांजण फोडा व डोके बाहेर काढा.

शारंगपाणी असेच लिहिले आहे.>>>>>> ते शारंगपाणि असेच हवे.पण भाववाचक नाम असल्यामुळे तुम्ही कसंही लिहू शकता.अशा प्रकारचा व्याकरणात बदल करण्यात आला आहे.जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मलाही हा प्रश्न पडला होता.गिरीश ऐवजी माझा कलीग गिरीष लिहायचा.त्यावर विचारले असता त्याने वरचेच उत्तर दिले होते.

कारवी धन्यवाद!

बारा भोकाचा पाना - सायकल दुरुस्तीसाठी वापरात येणारा एकमेव पाना - ( वापर रावसाहेब दानवे, जालना भागात) हरकाम्या किंवा multitasking

आम्ही सर्व भावंडे व दोन्ही मावशांची मुले दहा-बारा जण दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी संपूर्ण सुट्टी घालवत असू. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याच्या झाडाखाली सूरपारंब्या खेळत असताना माझं मावसभावाशी भांडण झाले. मी रडत घरी गेलो पाठोपाठ सगळे आले.
आमची आजी जी खूप मायाळू पण करारी होती. तिने भांडणाचे कारण जाणून घेतल्यानंतर म्हणालीपाव्हण्याला पाव्हण्याचा राग घरच्याला दोहींचा राग.
मी एकदम शरमून गेलो. परत उनाडपणा केला नाही.

साळुंके साहेब एकेकाळी मला हा पाना घ्यायची खूप इच्छा होती. आमच्या वेळेला सायकलच्या कुलुपासाठी मास्टर चावी मिळायची. चावी हरवली तरी कोणाकडून घेऊन कुलुप उघडता येत असे.

मलाही पाणि हेच योग्य वाटते आहे. गुगलने संभ्रमात टाकले.
कारवी तुम्ही म्हणता तेही पटते आहे. कोदंड म्हणजे धनुष्याला समानार्थी शब्द असावा. ते धनुष्याचे नाव नसेलही कदाचीत.

शशिरामजी सायकल साठी पूर्वी असा पाना होता. आता माहीत नाही. पण मला माझ्या मोटारसायकल किंवा कार पान्यात असा मल्टीपर्पज पाना मिळाला होता. सायकलला मास्टर की असायची हे मात्र खरे आहे.

@ शाली
मी टेपरेकॉर्डर घेण्याआधी अनुपजलोटाची भजनसंध्या कॅसेट घेतली होती . मास्टर की वाल्यांचेही असेच काही असावे. Happy

पाणि = हात हा तत्सम शब्द आहे त्यामुळे नुसता लिहिताना पाणि असाच लिहायला पाहिजे असं मला वाटतं. पाणिग्रहण लिहितानाही णि र्‍हस्वच. पण शेवटचं अक्षर दीर्घ या नियमानुसार कदाचित कोदंडपाणी, शारंगपाणी हे बरोबर असतील.
पिनाक म्हणजे धनुष्य आणि पिनाक म्हणजे मोर हे दोन्ही अर्थ मीही ऐकलेले आहेत.

पिनाक-फणि-बालेन्दु-भस्म-मन्दाकिनी-युता | प-वर्ग-रचिता मूर्तिः अपवर्ग प्रदास्तु नः || - असा एक शिवाबद्दल श्लोक आहे. त्यात 'प-वर्ग', म्हणजे प-फ-ब-भ-म असलेल्या गोष्टी, धारण करणारा शिव आम्हाला मुक्ती देवो असं गमतीने म्हटलंय. त्यात सुरुवातीला 'पिनाक' शब्द आला आहे (पुढचे फणी, बालेन्दु (चंद्र), भस्म, मन्दाकिनी (गंगा) असे आहेत). पिनाकचा सर्वमान्य अर्थ धनुष्य असला तरी काहींनी त्याचा अनुवाद 'त्रिशूळ' असाही केलेला आढळतो. बहुधा जुन्या शिवाचे रूप धनुर्धारी असावे. नंतर कुठल्यातरी पुराणाच्या निर्मितीनंतर त्रिशूलधारी शिवाची लोकांना भुरळ पडून पिनाकधारी शिव मागे पडला असावा. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

नाही हो शशिराम, जरा नविन माहिती मिळते आहे.
तुमचे सुरेख प्रतिसाद येऊद्यात अजुन. तेही वाचतो आहे.

रिकर्व्ह धनुष्याचे जोड आडवे उसाच्या कांड्यासारखे नसून लाकडाच्या, लिगामेंट्स च्या पातळ पट्ट्या सरस वापरून एकवार एक चिटकवून बनवतात. रामानंद सागर छाप धनुष्याचे एका बाणामध्ये २ तुकडे होतात.

https://www.youtube.com/watch?v=FteNNOEkZ28

हे फारच अवांतर आहे. असो. इथेच थांबतो.

बाकी पुराणे,धनुर्वेद व इतर साहित्याचा काळ मागे पुढे असल्याने कोदंड ह्याचा प्रवास धनुष्याचा प्रकार ते धनुष्याचे नाव असा होणे शक्य आहे किंवा त्याच्या उलटही होणे शक्य आहे. विशेषनामाचे सर्वनाम होण्याची असंख्य उदाहरणे आहेत. रंग या शब्दाचा मूळ अर्थ लाल आहे किंवा मासा आणि झाड ह्याचा मूळ अर्थ सामन मासा आणि एक कुठलेतरी झाड आहे. पण नंतर तेच सर्वनाम बनले. कोदंडाचा कोंबडी कि अंडे खेळ खेळावा लागेल केंव्हातरी. सध्या इतकेच.

देवकी, वावे -- पिनाक-मोराचा संदर्भ आठवला तर सांगा नंतर. का म्हटले असेल असे कुतूहल आहे.

@ चिडकू -- ती लिन्क काढलीत तर बरं होईल, बाकी माहिती असू दे.

तुम्ही हा श्लोक म्हणत होतात का चिडकू?
त्रिपर्व पञ्चपर्व च/वा सप्तपर्व प्रकीर्तितम् / तथा पुनः।
नवपर्व च कोदण्डं चतुर्धा /सर्वदा शुभकारकम् ।।

पिनाकचा सर्वमान्य अर्थ धनुष्य असला तरी काहींनी त्याचा अनुवाद 'त्रिशूळ' असाही केलेला आढळतो. >>>>>
@शंतनु, मी जाणकार नाही तरी लिहीतेय.
संस्कृत-हिंदी शब्दकोशात पिनाक = शिवाचे धनुष्य, त्रिशूळ, साधे धनुष्य, लाठी/छडी, धूलीकणांचा वर्षाव असे अनेक अर्थ आहेत. त्या शब्दाचा वाक्यातील / ग्रंथातील संदर्भ विचारात घेऊन अर्थ लावायला लागेल. आणि हे सगळे अर्थ कुठून आले ते मुळातून बघावे लागेल.

दुष्काळात तेरावा महिना व घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं एकाच अर्थाच्या म्हणी वाटतात. आपल्याकडे चारा कमी त्यात व्याहीबुवांनी घोडं सांभाळायला पाठवले असावे असे वाटते.

शालीजी, तुम्ही जिथे जिथे पाणी हे सफिक्स वापरले आहे तिथे तिथे पाणि असे हवे. पाणि म्हणजे हात.
चक्रपाणि, शारंगपाणि, कोदंडपाणि असे हवे.

>>>
हेच लिहायला आलो होतो . पाणिग्रहण म्हणजे (वधूचा )हात हातात घेणे म्हनजेच विवाह.

तुंबडी लावताना मी स्वत: पाहिले आहे. चिलमीसारखीच वस्तू असते. >> तुंबडी म्हणजे जळवा नव्हेत काय ?

मी पाहिलेलं की तो माणूस तोंडाने तुंबडीतील हवा खेचत होता.‌ खूप लहान असताना पाहिले आहे. वर आणखी सविस्तर वर्णन आले आहे.

कळीचा नारद असणे. -
प्रत्येक गावात एखादा तरी कळीचा नारद असतोच असतो. भांडणं लावून मजा बघत बसणं यांचं आवडते काम.
एकदा नारदमुनी पृथ्वीतलावर आले व एका वाण्याच्या दुकानात गेले. हळूच गुळात बोट घालून ते बोट खांबावर ओढले. लगेच तिथं माशी आली. माशीला खायला पाल जोरात धावली पण ति खाली पडली. पाल पाहताच मांजरीने झेप घेतली पण तिची उडी चुकली ती डायरेक्ट दाराबाहेर. मांजरीला पाहून शेजारच्यांचे कुत्रे जोरात गुरगुरत धावले. शेजारच्या कुत्र्याचा आवाज ऐकून वाण्याचं कुत्रे धावले. दोन्ही कुत्र्यांचं जोरात भांडण सुरू झालं. कुत्रे आवरण्यासाठी दोन्ही मालकिणी बाहेर आल्या एकमेकांच्या कुत्र्यांना दोष देत जोरात भांडायला लागल्या. बायकांना आवरायला नवरे बाहेर आले. शब्दाने शब्द वाढत जाऊन धराधरी झाली.
नारदमुनी दूर झाडाखाली बसून गंमत पाहत होते.

तुंबडी म्हणजे जळवा नव्हेत काय ? >>> नाही. तुंबडी म्हणजे शोषनलीका किंवा तत्सम रचना. तिचा वापर सहसा जळवेसारखा दूषीत / विषारी रक्त खेचून घ्यायला करत (ऐकीव माहिती).

'तुंबडी भरणे' मधली तुंबडी म्हणजे भोपळ्या (किंवा तत्सम फळा) पासून बनवलेला वाडगा.

रिकामा....... भिंतीला तुंबडी लावी आणि स्वत:ची तुंबडी भरणे वेगवेगळे आहेत. एक म्हण आहे तर दुसरा वाक्प्रचार आहे असे माझे मत आहे.

Pages