बायोपिक साधारणतः दोन प्रकारचे असतात.
१. सगळं खरं तेच दाखवणाऱ्या (ज्या भारतात अजूनही बनत नाहीत.)
२. खरं तेच चांगलं, किंवा चांगलं तेच खरं दाखवणाऱ्या (ज्या भारतात बनतात.)
ठाकरे हे बायोपिक दुसऱ्या प्रकारात मोडते. खरं पाहता, जर एखाद्या त्रयस्थ माणसाने हा बायोपिक बनवला असता, तर बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तित्व अजून ठसठशीत मांडता आलं असतं, पण...
...अभिजित पानसे, आणि मुख्य म्हणजे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांची मांडणी केलीये, ते पाहता, 'पहा आणि फुले वहा' असा प्रकार संपूर्ण चित्रपटभर दिसतो. जे बाळासाहेब आपल्याला नेहमी पेपरमध्ये, सभेमध्ये आणि मुलाखतीत दिसलेत, तेच कायम चित्रपटभर दिसतात. ठोस असं काहीच चित्रपटात लागत नाही.
...आणि अजून एक डोकं उठवणारी गोष्ट या चित्रपटात आहे.
तरीही इट्स वन टाइम वॉच, कारण ज्या घटना हा चित्रपट समोर आणतो, त्या आजपर्यंत कधीही पडद्यावर आल्या नाहीत.
कथेचा विचार करता चित्रपट हा बाळासाहेबांचा अर्धवट जीवनपट आहे, ज्याची सुरुवातच बाळासाहेबांच्या बाबरी मस्जिदच्या सुनावणीच्या दृश्याने होते. कथेत मार्मिकच्या स्थापनेपासून, सेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा समावेश केलाय. पुढील कथा शक्यतो पुढच्या भागात येईल, कारण टू बी कॉन्टिन्यू अशी घोषणा होते.
पटकथा बघायला गेली, तर हो - चांगली मांडणी आहे, वेगवान हाताळणी आहे, पण काहीकाही संवाद बऱ्याचदा रिपीट होतात, आणि मग कंटाळवाण वाटतं. चित्रपटाची लांबी ओके आहे, पण क्लायमॅक्स कंटाळवाणा होतो. कथेत असे काही फ्लॉ आहेत, ते बघतांना एखाद्याने सूज्ञपणे विचार केल्यास, याचा प्रेक्षकांवर निगेटिव्ह इम्पॅक्टही होऊ शकतो, पण दिगदर्शकाने सगळं सकारात्मक दाखवतांना, याचा विचार केला नसावा. मार्मिकचा प्रवास छान दाखवलाय, टिपिकल फिल्मी प्रसंग आहेतच, पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून चालून जातं. श्रीकांत ठाकरे, दत्ताजी साळवी, यांचा बाळासाहेबांबरोबर असलेला सहभाग चित्रपट चांगल्यारीतीने दाखवतो, पण बाळासाहेब म्हणजे फक्त मुंबई, असं चित्रपट बघतांना जाणवतं. मुंबई उपनगरांमध्ये, ठाण्यामध्ये सेनेची वाढ चित्रपटात दाखवली नाहीये, तसेच आनंद दिघे यांचा चित्रपटात उल्लेखही नाही. कम्युनिस्ट पार्टी, जॉर्ज फर्नांडिस आणि वसंतराव नाईक यांचे सेनेशी असलेले संबंध पडदयावर बघताना आणि 'वसंतसेना' अशी उपाधी मिळालेल्या सेनेमुळे नंतर मुंबईत ढासळत गेलेली काँग्रेस बघता, काळाने उगवलेला सूड वाटतो.
चित्रीकरण खरंच सुंदर झालंय, होय, काही बाबी जरूर खटकतात, पण तरीही त्या चित्रपटाच्या रसग्रहणात बाधा आणत नाहीत. कालखंडानुसार चित्रपटाचे रंग बदलत जातात, ही एक खरंच सुखद धक्का देणारी गोष्ट होती.
म्युजिक... बॅकग्राउंड म्युजिक बरं झालंय. अजूनही माझ्या डोक्यात सेक्रेड गेम्सच्या बॅकग्राउंड म्युजिकने जी रुंजी घातलीये, त्यामुळे हेही फिकच वाटत. स्टील ओके.
दिग्दर्शनात अभिजित पानसे, कुठेही कमी पडत नाही. अभिजित पानसेनी प्रत्येक फ्रेम सुंदर दिसेल अशी व्यवस्था केलीये, चित्रपटाचा फ्लो व्यवस्थित ठेवलाय. प्रत्येक सहकलाकाराला व्यवस्थित स्कोप देताना, फोकस बाळासाहेबांवर राहील, याची काळजी घेतलीये.
कथेत आणि दिगदर्शनात काही घटना खरोखर विरोधाभासी जाणवतात. काही बाबतीत तर बाळासाहेबांनी खरंच असं केलं असेल का? असा प्रश्न पडतो. चित्रपटात जावेद मियादाद, इंदिरा गांधी, दिलीप वेनगसरकर, जॉर्ज फर्नांडिस, दादा कोंडके ही पात्रे फक्त बाळासाहेबांचं दैवतीकरण करण्यासाठी येतात. बाळासाहेबांवर हल्ला झाल्यावर 'खून नही, टोमॅटो सॉस है' हे वाक्य तर इतकं भिकार आणि थिल्लर वाटतं, की बाबारे हे बाळासाहेब ठाकरे आहेत, साऊथच्या फिल्मचे हिरो नाहीत, असं सांगावसं वाटत.
अभिनयाच्या बाबतीत मी नेहमीप्रमाणे उतरत्या क्रमाने बोलेन. मनोहर जोशी, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांची भूमिका ज्या कलाकारांनी केलीये, त्यानी काम चोख बजावलंय. संजय नार्वेकरही कृष्णा देसाईंच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. प्रबोधनकार ठाकरेंच्या भूमिकेत ज्या कलाकाराला कास्ट केलंय, त्यासाठी मी कास्टिंग डिरेक्टरला दण्डवत घालतो. प्रबोधनकार ठाकरे एक गरिब बिचारा म्हातारा दिसतात, कणखर नाही. राऊतांना साधं हेही कळू नये?
अमृता राव पुन्हा सुंदर दिसलीये. मागच्या वर्षी दिया मिर्झा आणि यावर्षी अमृता राव माझ्यासाठी एक छान सरप्राईज होतं. तिने मीनाताई ठाकरेंची भूमिका चोख बजावलीये...
...आणि अजून एक डोकं उठवणारी गोष्ट या चित्रपटात आहे.
...ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत!
मी या रोलमध्ये कुणालाही इमॅजीन केलं असतं, अगदी कुणालाही! रणवीर सिंग, रणवीर कपूर, संजय दत्त, शाहरुख खान किंवा उमेश कामत आणि प्रसाद ओक सुदधा! पण नवाजुद्दीन, पुन्हा एकदा कास्टिंग डिरेक्टर ला त्रिवार दण्डवत. ना जुळणारा चेहरा, ना नीट मेकप, जोकरसारखं दिसणार डुप्लिकेट चिकटवलेलं नाक, नवाजुद्दीन कुठेही, कुठेही, बाळासाहेब शोभत नाही. त्याची भाषा कुठेही मराठी माणसाच्या लहेजा असलेली वाटत नाही. तोच तोच एकसुरीपणा चित्रपटभर जाणवत राहतो. बाळासाहेब फक्त रागात भाषणं ठोकत नसत, या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते, पण नवाजुद्दीन कुठल्याही क्षणी उठून 'सारे मराठी भाईयोका बदला लेगा ये ठाकरे' असं म्हणतो की काय? असं वाटत राहतं!
असो, येणाऱ्या निवडणुकीसाठी ठाकरे हे अजून एक पुष्प चित्रपटमालिकेत गुंफल गेलंय!
...पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!!
सलगता अशी जाणवली नाही. हे
सलगता अशी जाणवली नाही. हे माझे व्यक्तिगत मत आहे.>>>>
प्रवीण शक्यतोवर खूप मोठा कालखंड, अनेक घटना + चित्रपटाचा वेग बघता असं जाणवू शकत
@च्रप्स>>>
कालच एका फ्रेंडबरोबर अशी चर्चा चालू असताना मी जेव्हा असं म्हणलो, तेव्हा तिची रियाक्षण बिग नो अशी होती.
पण कमीत कमी शाहरुखला डुप्लिकेट नाक लावायची गरज पडली नसती.
सो यु ऍग्री विथ मी !
सो यु ऍग्री विथ मी !
बादवे तिची रियाक्षण बिग नो होती की बिग नोस?
बिग नो!
बिग नो!
मला शक्यतोवर माझी राजकीय मते,
मला शक्यतोवर माझी राजकीय मते, परीक्षणात डोकावलेली नाही आवडत
हे एकदम बरोबर करताय अज्ञातवासी. एकदा राजकीय मतं इतर रिव्यू मध्ये डोकावायला लागली की मग प्रतिसादकांची खरी मतं राजकीय प्रतिक्रियांच्या गलबल्यात हरवून जातात.
आम्ही हा रविवारी बघणार होतो.पण अपत्याच्या परिक्षेमुळे दिर जाऊंना तिकीट दिले.त्यांना आवडला, पण डॉक्युमेंटरी वाटला म्हणाले.शिवाय नवाझ ने मेहनत भरपूर घेतली असली तरी तो ठाकरे वाटत नाहीये अश्या प्रतिक्रिया आल्या.
कलीग ला विचारले तो कळवळून नका बघू म्हणाला.(त्याने आणि बायकोने 250 च्या तिकिटांमध्ये पाहिला), कथा म्हणून चांगला आहे.पण फक्त आणि फक्त चांगलं, जे मुखपत्रात छापून येतं तेच लोकांना दाखवलं आहे.नवं काही नाही.काही ठिकाणी तटस्थपणे थोडे नकारात्मक मुद्दे समोर यावे ते नाही.
आणि तरीही मला बघायचा आहे.ठाकरे ना मी कधी पाहिलं नाही.अगदी नक्कलही पाहणं हा चांगला अनुभव असेल.
हा चित्रपट हिंदीत बनवलाय, तर
हा चित्रपट हिंदीत बनवलाय, तर शिवसेनेचं मुंबईतल्या युपी-बिहारी लोकांविरुद्धच्या तोडफोडमारधाड आंदोलनाचं चित्रण कसं केलंय याबद्दल उत्सुकता आहे.
तसंच जागतिकीकरणानंतर जन्मलेल्या, नोकरी शिक्षणासाठी थेट परदेशाचा विचार करू शकणार्या पिढीला स्थानिकांना प्राधान्य, उठाव लुंगी बजाओ पुंगी टाइप घोषणा कशा वाटतात, त्यांचं चित्रण कसं केलंय आणि ते कसं वाटतंय हेही जाणून घ्यायला आवडेल.
हा चित्रपट बायोपिक आहे. साहित्य आणि कला या समाजाचा आरसा असतात , इतिहासाच्या पाउलखुणा त्यातून दिसाव्या अशी अपेक्षा असते.
तसं ते या कलाकृतीच्या बाबतीत होतंय का?
रसग्रहणासाठी दोन मुद्दे
१. जे सांगायचंय ते सांगण्यात चित्रपट यशस्वी ठरलाय का?
२. त्या काळाचं प्रतिबिंब पडतंय का? संजू/शूटआउट या चित्रपटांत त्या त्या व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण केल्याचा आरोप झालाय. तसं एखाद्या नेत्याचं बायोपिक करताना त्यातल्या शुभ्र छटाच निवडल्यात का? करड्या/काळ्या छटांवर रंगसफेदी केलीय का , याचा विचार व्हायलाच हवा.
नपेक्षा तो प्रचारकी सिनेमा आहे, असं प्रमाणपत्र दिलं जावं.
तुमचं परीक्षण खूप किंवा निव्वळ टेक्निकल झालंय. त्या पलीकडे लिहायची तुमची कुवत आहे, म्हणून सांगतोय. एकदा खोल पाण्यात उतरा. काठावर बसून तळवे भिजवण्यावर संतुष्ट राहू नका.
@mi_anu धन्यवाद!
@mi_anu धन्यवाद!
@भरत.
भरत मला खरंच कधीकधी तुमच्या संयमी लेखणीच प्रचंड कौतुक आणि आदर वाटतो, मग तुमचं मत विरोधी का असेना. पण कधीकधी तुम्ही जेव्हा एकदम टोकाची, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी भूमिका घेतात ना, तेव्हा आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी
'ठाकरे हे बायोपिक दुसऱ्या प्रकारात मोडते. खरं पाहता, जर एखाद्या त्रयस्थ माणसाने हा बायोपिक बनवला असता, तर बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तित्व अजून ठसठशीत मांडता आलं असतं, पण...
...अभिजित पानसे, आणि मुख्य म्हणजे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांची मांडणी केलीये, ते पाहता, 'पहा आणि फुले वहा' असा प्रकार संपूर्ण चित्रपटभर दिसतो. जे बाळासाहेब आपल्याला नेहमी पेपरमध्ये, सभेमध्ये आणि मुलाखतीत दिसलेत, तेच कायम चित्रपटभर दिसतात. ठोस असं काहीच चित्रपटात लागत नाही.'
इथेच देऊन टाकलं होतं.
तुम्हाला ज्या प्रमाणपत्राची अपेक्षा आहे, ते मी देणार नाही. कारण लगेच इथे दोन्ही बाजू तलवारी घेऊन तेच तेच मुद्दे उगाळत बसतील. परीक्षण राहून जाईलच बाजूला, आणि अगदी खरं सांगू? मला कंटाळा आलाय तेच तेच अनेक धाग्यांवर वाचण्याचा. म्हणून भरत, सॉरी.
आणि इथे खोल पाणी नाहीये, दलदल आहे, आणि दलदलीत उतरून चिखलफेक करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही...
अगेन सॉरी!!!
माझा प्रतिसाद तुम्हांल टोकाचा
माझा प्रतिसाद तुम्हांल टोकाचा किंवा अफेन्सिव्ह का वाटला ते मला कळत नाही.
त्यात दोन मुद्दे आहेत. एक - परीक्षण फार टेक्निक्ल आहे.
दोन- ज्याचं उत्तर तुम्ही आता दिलंत. त्यातला तुम्ही quote केलेला भाग मान्य आहेच. पण ते मी जनरल लिहिलंय,
चिखल दलदलीच्या अनुषंगाने - मी एखादा लेख लिहिला आणि त्यावरच्या प्रतिसादांत मला ज्यांबद्दल लिहायचं नाही, असे मुद्दे आले, तर मी त्यांना उत्तर देत बसणार नाही. पण असं काही होण्याच्या भीतीने मी मला जे सांगायचंय ते सांगायचं राहणार नाही.
अर्थात हे माझं झालं. तुमचंही तसंच असायल हवं. हा आग्रह नाही.
त्यामुळे मला शक्यतोवर माझी
त्यामुळे मला शक्यतोवर माझी राजकीय मते, परीक्षणात डोकावलेली नाही आवडत.
==पण तुम्हाला न्यूट्रल लिहायला जमत नाहीये. उरीचं परीक्षण वाचूनही ते जाणवलं. सो तुम्ही अजून जास्त स्पष्ट लिहू शकता.
<पण तुम्हाला न्यूट्रल लिहायला
<पण तुम्हाला न्यूट्रल लिहायला जमत नाहीये. उरीचं परीक्षण वाचूनही ते जाणवलं>
अर्र, हा अन्याय आहे.
@भरत
@भरत
माझा प्रतिसाद तुम्हांल टोकाचा किंवा अफेन्सिव्ह का वाटला ते मला कळत नाही.>>>>>
असं काहीही मला वाटलेलं नाहीये हो... मी फक्त जरा मन की बात केली. जनरल!
अर्थात हे माझं झालं. तुमचंही तसंच असायल हवं. हा आग्रह नाही.>>>>>
हा खास भरतीय टच असलेला प्रतिसाद! यासाठीच 'भरत मला खरंच कधीकधी तुमच्या संयमी लेखणीच प्रचंड कौतुक आणि आदर वाटतो, मग तुमचं मत विरोधी का असेना' हे डिस्कलेमर आधीच टाकलंय मी
@सनव
@सनव
त्यामुळे मला शक्यतोवर माझी राजकीय मते, परीक्षणात डोकावलेली नाही आवडत.
>>>>> म्हणूनच मी बिलकुल ऐवजी शक्यतोवर शब्द वापरलाय. उरीच परीक्षण करताना मी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेचं नाव घेतलेलं नाही. पण आजकाल प्रधानसेवक, त्यांचे ढीगभर मंत्री यांचा स्टँड बघता, ते परीक्षण काळाच्या कसोटीवर खरं उतरलं याचा आनंद जास्त आहे.
जे विषय माझ्या देशावर परिणाम करू शकतात, यांविषयी मी माझा कल दाखवू शकतो. पण कमीत कमी संतुलितरित्या तरी!
असो, युवर पॉईंट इज नोटेड!
छान लिहलंय.
छान लिहलंय.
चित्रपटाच्या चर्चेपेक्षा
चित्रपटाच्या चर्चेपेक्षा धागाकर्त्याने दिलेल्या उत्तरांनीच जागा जास्त व्यापते आहे
विठ्ठलराव!
विठ्ठलराव!
लोक प्रश्न मला विचारतायेत, अभिप्राय माझ्या लेखनावर येतायेत, त्यावर प्रतिसाद मी देतोय, धागा मी काढलाय, मायबोली अडमीन चालवतायेत, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये, मी व्यापलेल्या जागेसाठी त्यांना भाडं आकारायचं नाहीये, मी तुमच्या स्वमालकीच्या कुठल्याही वस्तू किंवा वास्तूवरची जागा व्यापत नाहीये...
...मग विनाकारण नाक खुपसणारे तुम्ही कोण?
मग विनाकारण नाक खुपसणारे
मग विनाकारण नाक खुपसणारे तुम्ही कोण?>>
Very well said..
चेतन सशीथल>> बर्याच एक्टर्स
चेतन सशीथल>> बर्याच एक्टर्स साठी डबींग करतात ते..
खरंच भन्नाट माणूस आहे हा. थोडे विषयांतर. पण खऱ्या अर्थाने "आवाजाचा इंजिनियर" Happy हा व्हिडीओ बघा:
https://youtu.be/Ysx8uvqKjWE?t=51m24s >>>>>>>>
हयान्नी Avengers Infinity War च्या हिन्दी डबिन्गमध्ये थेनॉसला आवाज दिलाय:
https://www.youtube.com/watch?v=QZj9iWfGJug&t=15s
https://www.youtube.com/watch?v=lr5bfdgddkY&t=21s
https://www.youtube.com/watch?v=B0lxuPB4_cQ
ठाकरे ना मी कधी पाहिलं नाही
ठाकरे ना मी कधी पाहिलं नाही.अगदी नक्कलही पाहणं हा चांगला अनुभव असेल.
Submitted by mi_anu on 29 January, 2019 - 09:14>>>>>> मी आणी मैत्रिणींनी बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहीले होते, अगदी पहिल्या रांगेत बसुन. त्यांची सभा होती, आणी आम्ही सार्या जणी संध्याकाळच्या ६ वाजताच्या सभेसाठी १ तास आधी म्हणजे साधारण ४:३० ते ५ च्या दरम्यानच जागा पकडुन बसलो होतो. तो काळच भारावलेला होता. जाम धमाल आली होती त्या सभेत.
मी सिनेमा नाही पाहीला, पण का कोण जाणे नवाज पर्फेक्ट वाटला बाळासाहेबांच्या भूमिकेकरता. म्हणजे निदान दिसण्यात तरी. अर्थात हे माझे वै. मत. आता सिनेमा बघीतल्यावर कळेल.
संजय दत्त,>>>>>> मला जाम हसू आले हा ठाकरेंच्या भूमिकेत कसा दिसेल ही कल्पना केल्यावर.
राज ठाकरेंनाच ही भूमिका
राज ठाकरेंनाच ही भूमिका करायला द्यायची होती. तरूणपणची आदित्यला.
राज ठाकरेंनाच ही भूमिका
राज ठाकरेंनाच ही भूमिका करायला द्यायची होती. >>>>> अगदी. मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला असता.
(महत्वाची सूचना:कोणत्याही
(महत्वाची सूचना:कोणत्याही विचारसारणी च्या प्रभावाखाली सदर लेखन नाही
एक कलाकृती म्हणून या चित्रपटाविषयी व्यक्त होण्याचा हा एक प्रयत्न आहे )
ठाकरे : एक व्यक्ती एक कलाकृती
बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर biopic घडवणं हे तर शिवधनुष्यच. निर्माता संजयजी रारुत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी ते पेलण्याचा समर्थ प्रयत्न केलाय हे नक्की.
‘व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असा या चित्रपटाच्या पटकथेचा आलेख आहे.यात नक्की दाखवायचं काय आणि टाळायचं काय याचा चतुराईनं विचार झालेला दिसतोय.
बाळासाहेबांचा सुरुवातीचा काल,आलेले अनुभव,शिव सेनेची स्थापना,यशापयशाची वाटचाल,राष्ट्रीय घडामोडींवरील त्यांचा प्रभाव ते पहिल्यांदा राज्याची सत्ता स्थापना असा कालखंड या चित्रपटात दिसतो.
मध्यंतरापर्यंतचा चित्रपट black& white आणि नंतरचा रंगीत हा तांत्रिक बदल काळ दर्शवणारा आहे. तो खूपच परिणामकारक झालाय.नवाजुद्दिन सिद्द्दीकी केवळ बिनतोड.बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्याने लाजवाब साकारलेत.या भूमिकेला चेतन सशिताल यांचा लाभलेला आवाज तर केवळ केवळ अफलातून. मासाहेबांची भूमिका अमृता राव ने चांगली निभावलिय.पण तिच्या भूमिकेचं मराठी डबिंग फारच सदोष आहे.
बाळासाहेबांचे पत्र येते तेव्हाचा प्रसंग,समुद्र किनाऱ्यावरील प्रसंग चांगले जमलेत.
संवाद हा या चित्रपटाचा हुकूमी एक्का आहे. ‘ ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंगच या देशात अस्तित्वात राहणार नाही ‘, ‘वेळ आली तर मी हि मुंबई बंद करू शकतो’ हा जॉर्ज फर्नांडीस यांच्या बरोबरचा संवाद इ.शरद पवार जे बोलतायत त्याच्या बरोबर उलट त्याचा अर्थ घ्यायचा या आशयाचा हि एक संवाद बाळासाहेबांच्या तोंडी आहे.
‘ माणसाचं कर्तुत्व त्याच्या छातीच्या मापावरून समजत नाही’ असं ‘आगामी काळ’ डोळ्यासमोर ठेऊन घुसडलेलं एक वाक्य हि त्यात ऐकायला मिळालं.
कोणतीही भीडभाड नं ठेवता मांडलेली बाळासाहेबांची रोखठोक मते हि ह्या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू आहे.प्रसंगांची आखणी हि तशीच आहे.प्रसंगी ते अंगावर येतात.पण उत्तम रीतीने वठलेत. सुरुवातीच्या काही काही आंदोलनांसाठी केलेला व्यंगचित्रांचा उपयोग चपखल बसला आहे.
अनेक बारीक बारीक गोष्टींचा विचार झालाय.त्यांची हातात उलटं घड्याळ घालयाची शैली,श्रीकांतजी ठाकरे एका प्रसंगात शोधिसी मानवा गाणं तयार करतायत, एयर इंडियाचं आंदोलन संपवून परत निघताना वर हात जोडून दिसणारा ‘महाराजा’ इ.
दादा कोंडके यांचा सीन अपेक्षेप्रमाणेच रंगलाय.बाळासाहेबांच्या वेळोवेळी संपर्कात आलेली माणसं विविध प्रसंगांत दिसतात.जॉर्ज फर्नांडीस,मनोहर जोशी,प्रमोद नवलकर,सुभाष देसाई दत्ताजी साळवी,वामनराव महाडिक,शरद पवार इत्यादी.
भुजबळ कुठेही दिसत नाहीत. राणे कदाचित एखाद दोन प्रसंगात दिसतात.थापा सुद्धा एका प्रसंगात दिसले. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असे समीकरण सर्वश्रुत असताना आनंद दिघे यांच्या उल्लेखाची अनुपस्थिती जाणवली.मी देशभक्त मुस्लिमांच्या विरोधात मुळीच नाही असं वाक्य असताना तिथे साबीरभाईंचा उल्लेख अपेक्षित होता.पण तो नाहीये.
प्रबोधनकारांची भूमिका अव्वल झालीय. यशवंतराव चव्हाण,इंदिरा गांधी चांगले जमलेत. वसंतराव नाईकांच्या भूमिकेतले प्रफुल्ल सामंत मला सुधाकरराव नाईक अधिक वाटले.प्रमोद महाजन तर अजिबातच वाटलेले नाहीत.
काही सीन्स मला विसंगत वाटले.वानखेडे ची खेळपट्टी हि तर १९९१ मध्ये उखडण्यात आली होती मग तो प्रसंग मियांदाद च्या भेटी नंतर कसा, तसेच बाबरी मशीदीवर चढताना सुरुवातीला ‘अर्ध्या विजारीतला ‘ तरुण दिसतो तो वरती कुठेच दिसत नाही इ.
तत्कालीन काळ खूपच चांगल्या पद्धतीनं उभा केलाय.हिंसात्मक दृश्ये चित्रपटात वेळोवेळी येतात.याबद्दल अनेकांची नाराजीही आहे.पण त्याला काहीही पर्याय नाही.जे जसं घडलं तस दाखवायचे असेल तर हे अपरिहार्यच आहे.
पण त्या काळात शिवसेना ही सामान्य माणसासाठी आधाराचं आशा स्थान होती हे दाखवणारे आणखीन काही प्रसंग आवश्यक होते
पार्श्वसंगीत प्रभावी आहे.एकच गाणं आहे तेही शेवटी श्रेय नामावली च्या वेळेस येतं. ते का टाकलंय हाही प्रश्नच पडतो.
बाळासाहेब झाडांना पाणी घालत असताना झेंडूच्या फुलांचा वाढत जाणारा भगवा रंग हा सीन मास्टर पीस आहे.दिग्दर्शकाची ‘जीत’च आहे ती.
आत्ताच्या पिढीला तत्कालीन बाळासाहेबांचं यथार्थ दर्शन घडवण्यात चित्रपट यशस्वी झालाय हे मात्र नक्की.
संपूर्ण चित्रपटात उद्धव आणि राज थेट शेवटीच दिसतात.
१९९५ च्या शपथ विधीच्या समारोहाशी येऊन थांबतो.
पण संपतो तो To Be Continued…. हि अक्षरे घेऊनच.
Pages