ठाकरे - दैवताचं दैवतीकरण (ठाकरे चित्रपट परीक्षण)

Submitted by अज्ञातवासी on 27 January, 2019 - 05:58

बायोपिक साधारणतः दोन प्रकारचे असतात.
१. सगळं खरं तेच दाखवणाऱ्या (ज्या भारतात अजूनही बनत नाहीत.)
२. खरं तेच चांगलं, किंवा चांगलं तेच खरं दाखवणाऱ्या (ज्या भारतात बनतात.)

ठाकरे हे बायोपिक दुसऱ्या प्रकारात मोडते. खरं पाहता, जर एखाद्या त्रयस्थ माणसाने हा बायोपिक बनवला असता, तर बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तित्व अजून ठसठशीत मांडता आलं असतं, पण...
...अभिजित पानसे, आणि मुख्य म्हणजे संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांची मांडणी केलीये, ते पाहता, 'पहा आणि फुले वहा' असा प्रकार संपूर्ण चित्रपटभर दिसतो. जे बाळासाहेब आपल्याला नेहमी पेपरमध्ये, सभेमध्ये आणि मुलाखतीत दिसलेत, तेच कायम चित्रपटभर दिसतात. ठोस असं काहीच चित्रपटात लागत नाही.
...आणि अजून एक डोकं उठवणारी गोष्ट या चित्रपटात आहे.
तरीही इट्स वन टाइम वॉच, कारण ज्या घटना हा चित्रपट समोर आणतो, त्या आजपर्यंत कधीही पडद्यावर आल्या नाहीत.
कथेचा विचार करता चित्रपट हा बाळासाहेबांचा अर्धवट जीवनपट आहे, ज्याची सुरुवातच बाळासाहेबांच्या बाबरी मस्जिदच्या सुनावणीच्या दृश्याने होते. कथेत मार्मिकच्या स्थापनेपासून, सेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा समावेश केलाय. पुढील कथा शक्यतो पुढच्या भागात येईल, कारण टू बी कॉन्टिन्यू अशी घोषणा होते.
पटकथा बघायला गेली, तर हो - चांगली मांडणी आहे, वेगवान हाताळणी आहे, पण काहीकाही संवाद बऱ्याचदा रिपीट होतात, आणि मग कंटाळवाण वाटतं. चित्रपटाची लांबी ओके आहे, पण क्लायमॅक्स कंटाळवाणा होतो. कथेत असे काही फ्लॉ आहेत, ते बघतांना एखाद्याने सूज्ञपणे विचार केल्यास, याचा प्रेक्षकांवर निगेटिव्ह इम्पॅक्टही होऊ शकतो, पण दिगदर्शकाने सगळं सकारात्मक दाखवतांना, याचा विचार केला नसावा. मार्मिकचा प्रवास छान दाखवलाय, टिपिकल फिल्मी प्रसंग आहेतच, पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून चालून जातं. श्रीकांत ठाकरे, दत्ताजी साळवी, यांचा बाळासाहेबांबरोबर असलेला सहभाग चित्रपट चांगल्यारीतीने दाखवतो, पण बाळासाहेब म्हणजे फक्त मुंबई, असं चित्रपट बघतांना जाणवतं. मुंबई उपनगरांमध्ये, ठाण्यामध्ये सेनेची वाढ चित्रपटात दाखवली नाहीये, तसेच आनंद दिघे यांचा चित्रपटात उल्लेखही नाही. कम्युनिस्ट पार्टी, जॉर्ज फर्नांडिस आणि वसंतराव नाईक यांचे सेनेशी असलेले संबंध पडदयावर बघताना आणि 'वसंतसेना' अशी उपाधी मिळालेल्या सेनेमुळे नंतर मुंबईत ढासळत गेलेली काँग्रेस बघता, काळाने उगवलेला सूड वाटतो.
चित्रीकरण खरंच सुंदर झालंय, होय, काही बाबी जरूर खटकतात, पण तरीही त्या चित्रपटाच्या रसग्रहणात बाधा आणत नाहीत. कालखंडानुसार चित्रपटाचे रंग बदलत जातात, ही एक खरंच सुखद धक्का देणारी गोष्ट होती.
म्युजिक... बॅकग्राउंड म्युजिक बरं झालंय. अजूनही माझ्या डोक्यात सेक्रेड गेम्सच्या बॅकग्राउंड म्युजिकने जी रुंजी घातलीये, त्यामुळे हेही फिकच वाटत. स्टील ओके.
दिग्दर्शनात अभिजित पानसे, कुठेही कमी पडत नाही. अभिजित पानसेनी प्रत्येक फ्रेम सुंदर दिसेल अशी व्यवस्था केलीये, चित्रपटाचा फ्लो व्यवस्थित ठेवलाय. प्रत्येक सहकलाकाराला व्यवस्थित स्कोप देताना, फोकस बाळासाहेबांवर राहील, याची काळजी घेतलीये.
कथेत आणि दिगदर्शनात काही घटना खरोखर विरोधाभासी जाणवतात. काही बाबतीत तर बाळासाहेबांनी खरंच असं केलं असेल का? असा प्रश्न पडतो. चित्रपटात जावेद मियादाद, इंदिरा गांधी, दिलीप वेनगसरकर, जॉर्ज फर्नांडिस, दादा कोंडके ही पात्रे फक्त बाळासाहेबांचं दैवतीकरण करण्यासाठी येतात. बाळासाहेबांवर हल्ला झाल्यावर 'खून नही, टोमॅटो सॉस है' हे वाक्य तर इतकं भिकार आणि थिल्लर वाटतं, की बाबारे हे बाळासाहेब ठाकरे आहेत, साऊथच्या फिल्मचे हिरो नाहीत, असं सांगावसं वाटत.
अभिनयाच्या बाबतीत मी नेहमीप्रमाणे उतरत्या क्रमाने बोलेन. मनोहर जोशी, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांची भूमिका ज्या कलाकारांनी केलीये, त्यानी काम चोख बजावलंय. संजय नार्वेकरही कृष्णा देसाईंच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. प्रबोधनकार ठाकरेंच्या भूमिकेत ज्या कलाकाराला कास्ट केलंय, त्यासाठी मी कास्टिंग डिरेक्टरला दण्डवत घालतो. प्रबोधनकार ठाकरे एक गरिब बिचारा म्हातारा दिसतात, कणखर नाही. राऊतांना साधं हेही कळू नये?
अमृता राव पुन्हा सुंदर दिसलीये. मागच्या वर्षी दिया मिर्झा आणि यावर्षी अमृता राव माझ्यासाठी एक छान सरप्राईज होतं. तिने मीनाताई ठाकरेंची भूमिका चोख बजावलीये...
...आणि अजून एक डोकं उठवणारी गोष्ट या चित्रपटात आहे.
...ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत!
मी या रोलमध्ये कुणालाही इमॅजीन केलं असतं, अगदी कुणालाही! रणवीर सिंग, रणवीर कपूर, संजय दत्त, शाहरुख खान किंवा उमेश कामत आणि प्रसाद ओक सुदधा! पण नवाजुद्दीन, पुन्हा एकदा कास्टिंग डिरेक्टर ला त्रिवार दण्डवत. ना जुळणारा चेहरा, ना नीट मेकप, जोकरसारखं दिसणार डुप्लिकेट चिकटवलेलं नाक, नवाजुद्दीन कुठेही, कुठेही, बाळासाहेब शोभत नाही. त्याची भाषा कुठेही मराठी माणसाच्या लहेजा असलेली वाटत नाही. तोच तोच एकसुरीपणा चित्रपटभर जाणवत राहतो. बाळासाहेब फक्त रागात भाषणं ठोकत नसत, या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते, पण नवाजुद्दीन कुठल्याही क्षणी उठून 'सारे मराठी भाईयोका बदला लेगा ये ठाकरे' असं म्हणतो की काय? असं वाटत राहतं!
असो, येणाऱ्या निवडणुकीसाठी ठाकरे हे अजून एक पुष्प चित्रपटमालिकेत गुंफल गेलंय!
...पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

totally agree
Perfect review...
Happy

Title अगदी समर्पक दिलयं...
नेहमीप्रमाणे मस्तच लिहिलयं तू..
आणि माझा फेवरेट लेखक/परिक्षकअसताना
मला लिहायची काय गरज Happy

किती थोडक्यात आटपलंय. लिहा की जरा तब्बेतीनं.
इथे काय कथा बिधा फुटायची शक्यता नाही. त्यामुळे स्पॉयलर्सची भीती नाही.

किती थोडक्यात आटपलंय. लिहा की जरा तब्बेतीनं.
इथे काय कथा बिधा फुटायची शक्यता नाही. त्यामुळे स्पॉयलर्सची भीती नाही.-- +111
प्रत्येक कलाकाराने कोणती भूमिका केली आणि ती तुला कशी वाटली .ते लिहिलंय अस वाटतयं Sad ..
लिही की जरा अजून... सॉरी

मेघे सॉरी कशाला?
भरत आणि मेघा, परीक्षण राजकीय होऊ नये, याचा प्रयत्न करताना एडिटल जातं, त्यामुळे शॉर्ट होतं. झिरो, सिम्बचं परीक्षण लिहिताना ती भीती नसते.
तरीही एडितलेला काही पार्ट परीक्षणात टाकला आहे!

@जव्हेरगंज>>
वेलकम बॅक!
तुम्ही लिहा की काहीतरी!

आनंद दिघे >> फक्त त्यांच्या सारखी दिसणारी एक व्यक्तिरेखा काही क्षणांसाठी पडद्यावर दिसते. तितकंच दाखवलंय. बरोबर ना?

@DShraddha>>>
म्हणून तुला सांगत होतो, परीक्षण लिही असं. कारण हे मी मिस केलं!!!

चांगलं परिक्षण.
संजयनी सिनेमा काढलाय म्हणजे दूसरी अपेक्षाच नव्हती. प्रचंड बालिश चित्रपट.
चिवसेनेला संजनचं ग्रहण लागलंय. या साहेबांना कंटाळून एकदिवस मोठ्ठा पेंग्वीनच चिवसेना सोडून जाणार.

>>नवाजुद्दीन कुठेही, कुठेही, बाळासाहेब शोभत नाही. <<
हा पॉइंट ट्रेलरच्या धाग्याचर एका प्रश्नाच्या रुपात आला होता. तुम्ही हिंदी वर्जन पाहिलं कि मराठी? नवाजुद्दिन बोलण्यात मार खातो, आणि बाळासाहेबांचा आवाजातली धार तर त्याच्या आवाक्या बाहेरची आहे. मराठी वर्जनमध्ये खेडकर नंतर डब केलेला आवाज बाळासाहेबांच्या जवळपास जाणारा आहे. बाय्दवे, नवाजुद्दिनच्या अगोदर इर्फान खानचा विचार चाललेला असं वाचनात आलं. तसं झालं असतं तर इर्फान पेक्षा नवाजुद्दिन परवडला असं म्हणायची वेळ आली असती...

राज मी हिंदी बघितला!
बादवे इरफान खान हा माझा आवडता अभिनेता आहे!
मराठी ट्रेलर बघितला, चेतन सशीथल यांच्या आवाजाने जादू केलीये!!

अजून पाहिला नाही हा चित्रपट पण परीक्षण आवडलं. नेमकेपणाने लिहिलं आहे. वाचल्यानंतर कसे चित्रण असेल याची मी कल्पना करू शकतो.
तुमचे परीक्षण + आजवर पाहिलेली बायोपिक्स = हा चित्रपट ५०% बघितल्यासारखे वाटत आहे.
उरलेला ५०% थेटरात जाऊन बघतो Happy

बादवे, बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटातील आवाजाबाबत हे मत यापूर्वी पण एका परीक्षणात वाचले होते. यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फक्त आवाज असलेला एक मराठी चित्रपट मागच्या (का त्याच्या मागच्या) वर्षी येऊन गेला होता (आता पट्कन त्याचे नाव आठवत नाहीये) त्यातला आवाज बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाला फार जवळ जातो. त्यामुळे या चित्रपटात ठाकरेंच्या आवाजासाठी तोच आवाज वापरायला हवा होता असे वाटते.

अतुल पाटील धन्यवाद!
श्रद्धा बिंगो
आणि वर ज्या चेतन सशीथल यांचा उल्लेख आलाय, त्यांनीच बाळकडूला आवाज दिलाय, आणि चित्रपटाच्या मराठी वर्जनला सुद्धा, असं ट्रेलरवरून दिसतय

>> चेतन सशीथल>> बर्‍याच एक्टर्स साठी डबींग करतात ते..

खरंच भन्नाट माणूस आहे हा. थोडे विषयांतर. पण खऱ्या अर्थाने "आवाजाचा इंजिनियर" Happy हा व्हिडीओ बघा:
https://youtu.be/Ysx8uvqKjWE?t=51m24s

छान लिहीले आहे.

नवाज ने लकबी कदाचित हुबेहूब पकडल्या असतीलही, पण तो छाप पाडत नाही. आवाजालाही धार वाटत नाही. १९९५ मधे "विधानसभेवर भगवा फडकला" म्हणत तोपर्यंत हा चित्रपट आहे, म्हणजे भाग-२ असेल नंतर. एक दत्ताजी साळवी, व थोडेफार मनोहर जोशी सोडले इतर नेतेही फारसे उठून दिसत नाहीत. राज आणि उद्धव या पहिल्या भागात जवळजवळ नाहीतच.

ज्यांनी "लालबाग परळ' सारखी पुस्तके वाचली आहेत, ६०/७०/८० च्या दशकांतील शिवसेनेशी संबंधित घटना ज्यांना माहीत आहेत, त्यांना ते संदर्भ वेळोवेळी लगेच लागतील. पण इतरांना समोर नुसती घटनांची जंत्री सादर केल्यासारखे वाटेल.

वरती अज्ञातवासी यांनी लिहील्याप्रमाणे बदलता काळ रंगांमधून दाखवला आहे. पण एक सतत जाणवते. राम गोपाल वर्मा ने 'सत्या' मधे जशी मुंबई दाखवली तशी मुंबई यात "दिसत" नाही. अनेकदा सेट्स वाटतात.

मला मुळात हा चित्रपट मराठीतून आहे हेच माहीत नव्हते. मी हिंदीतून पाहिला. या भागातील घटनांचा, सेनेच्या घोषणांचा मुख्य भाग मराठीचा आग्रह वगैरे असल्याने ते सगळे (चाळींमधे लावलेले फलकही) जेव्हा हिंदीत दिसतात, तेव्हा तो इफेक्टच येत नाही. मराठीतून बघायला मिळाला परत तर बघेन, बहुधा नेफिवर.

बाळासाहेबांवर सरकार हा सिनेमा येऊन गेला होता २००५ मध्ये .त्यामध्ये बरच वास्तव दाखवलं होतं व बाळासाहेबांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर पिक्चर रिलिज झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांसारखा वाटतो चित्रपटात. ट्रेलर बघितला आहे फक्त.

@फारएन्ड- धन्यवाद. मुंबईच्या चित्रणाविषयी सहमत, पण परीक्षण जास्तच निगेटिव्ह झालं असतं, म्हणून तो मुद्दा जाणीवपूर्वक टाळला Wink

@केशवतुलसी
नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांसारखा वाटतो चित्रपटात. ट्रेलर बघितला आहे फक्त.>>>तुमच्या मताचा आदर आहेच, पण माझ्यासाठी 'अजिबात नाही'

अहो निगेटिव पाँझिटिव चा इतका विचार का करावा? लिहा की बिनधास्त 'तुमचं' परीक्षण. इतरही काही ठिकाणी तुम्ही 'राजकीय झालं असतं', 'राजकीय लिहिलं नाही म्हणून छोटं झालं' इ. वाचलं. वाचकांचा किंवा संपादकांचा अनुनय करायला तुम्ही वर्तमानपत्री परीक्षक थोडेच आहात. आपल्या भुमिका, अपेक्षा आणि मतांसकट बिनधास्त लिहा. काहीच पटलं नाही तरी 'प्रामाणिक लिहिलंय' इतकं तरी लोक म्हणतील. Happy

@साजिरा प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद-
मी जे लिहिलंय, ते प्रामाणिकच आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, माझी राजकीय मते आहेत, पण चित्रपट ही एक संपूर्णपणे कला आहे असं मी मानतो (अर्थात आजकाल तो बनवणारे देखील हे मानत नाही ही गोष्ट वेगळी Wink
त्यामुळे मला शक्यतोवर माझी राजकीय मते, परीक्षणात डोकावलेली नाही आवडत. कलेसाठी कला, हेच सूत्र मी मानतो, आणि कलेच्या अनुषंगाने स्वतःशी प्रामाणिक परिक्षण मी मांडलंय असं वाटतं.
आता निगेटिव्ह पॉजितीव्ह म्हणाल, कधीकधी संतुलीतपणा राखण्याकरता, काही छोट्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. उदा. सेटचा मुद्दा माझ्याही लक्षात आला, पण तो माझ्यासाठी दुर्लक्षन्यासारखा होता, म्हणून सगळं निगेटिव्ह होतंय, असं वाटताच मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्याला चांगला म्हणून खोटारडेपणा केला नाही Happy
यावर मी माझी टोलेरेन्स लेवल जास्त असेल, अशी मल्लिनाथीही करू शकेल...
Wink

आम्ही तर कार्यालयिन अर्धा दिवस सुट्टी घेवुन शुक्रवारी संध्याकाळी पहायला गेलो. पन पुर्ण भ्रमनिरास झाला सर्वांचाच.चित्रपट न वाटता एखादी शॉर्ट फिल्म बघतोय अस वाटतं. सलगता अशी जाणवली नाही. हे माझे व्यक्तिगत मत आहे. ज्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण नाही करत त्या मुळे पुढील भाग आला तर परिक्षण वाचुन ठरवणार जायचं की नाही.

Pages