गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

Submitted by कुमार१ on 8 April, 2018 - 21:51

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

आजाराचा इतिहास:
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई. तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.

संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.

कारणमीमांसा:
गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अ‍ॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अ‍ॅसिड तयार होते. तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.

इथे युरिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अ‍ॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.

जीवनशैलीशी संबंध :
१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते.

गाऊट आणि अनुषंगिक आजार :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अ‍ॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.

ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.

१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात

२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.

गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.

दीर्घकालीन गाऊट
:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे खडे (tophi) साठतात.

chr gout.jpg
अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.

रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.
२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अ‍ॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.
३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.
२. दीर्घकालीन उपचारात युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अ‍ॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अ‍ॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.

पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.

३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.

तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

जाता जाता .....

युरिक अ‍ॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अ‍ॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.

मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अ‍ॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:

१. युरिक अ‍ॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.
२. युरिक अ‍ॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अ‍ॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.
...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अ‍ॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
***************************************************************************************************
(लेख व प्रतिसादातील चित्रे : जालावरुन साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही होलिअर दॅन दाउ प्रवृत्तीचे लोक्स माहीत आहेत जे आधी रेड मीट दारू ह्या लाइफस्टाइलचे भक्त होते पण गाउटने इंगा दाखवल्यावर एकदम शाकाहाराचे गुणगान गाउ लागले आहेत.>>>
आपले होलियर दॅन दाऊ अजेंडे खपवायला दुसर्‍यांचे धागे हायजॅक करू नये. >>>>>>

+६९
शाकाहारी असुन गाउट झालेले दोघे पहाण्यात आहेत. वर मॅक्स यांनी स्वतःचे उदाहरण दिले आहेच. उगाच प्रक्षोभक भाषा वापरुन खाण्याचे चोचले न करणार्‍या माबोकरांना चिथवण्याबद्दल अमा यांचा निषेध.

डॉ. कुमार, माहितीबद्दल आभारी आहे.
@ कुमार१, आमवात (RA) यावरही एक लेख येऊ द्या. >>> +११
तुमच्या लेखनाने आमचे प्रबोधन होते.

माहितीपूर्ण लेख.
साध्या, सोप्या भाषेत छान समजावून सांगता तुम्ही _/\_

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार!

माझ्या पहिल्या आरोग्य लेखमालेत हिमोग्लोबिन, बिलीरुबीन, युरिआ, इ. ८ पदार्थांवर लेख होते. तेव्हा युरिक A हा विषय मी घेतला नव्हता. तेव्हा मी याबाबतीत संभ्रमात होतो. अनिमिया, कावीळ, मूत्रपिंडविकार, इ. आजार खूप आढळतात. त्याप्रमाणात ‘गाऊट’ कमी आढळतो. तेव्हा तो लोकांना परिचित नसेल असे वाटून मी तो टाळला होता.

पण या धाग्यातील चर्चेने माझा तो समाज सपशेल खोटा ठरवला आहे ! इथे सहभागींना तो चांगलाच माहित असल्याचे दिसले. काहींच्या स्वानुभव-कथनाने चर्चेत रंगत आली. एकूणच चयापचय बिघाडाचे आजार सर्वत्र वाढताहेत. ‘गाऊट’ त्यापैकीच एक. त्याचे विवेचन तुम्हाला आवडले आणि उपयुक्त वाटले याचे समाधान आहे.

गाउटची माहिती अतिशय सांगोपांग, अभ्यासपूर्ण व कष्टाने सादर केली आहे. निश्चितपणे उपयुक्त आहे. तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. मधुमेहासारखा हा रोग असाध्य आहे अशी अनेक जणांची समजूत आहे. याबद्दल काय सांगू शकाल ?

ललिता व डॉ रवी, आभार !
@ डॉ रवी,
हा रोग असाध्य आहे अशी अनेक जणांची समजूत आहे. याबद्दल काय सांगू शकाल ? >>>>>

याचे उतर लेखातील खालील मजकूरात आले आहे:
आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

सर्व वाचकांचे आभार !

गाऊटचे उपचार : Rheumatology

गाऊट हा एक प्रकारचा संधिवात आहे हे आपण जाणतो. दीर्घकालीन गाऊटमध्ये हे दुखणे एका सांध्यापुरते मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर सुद्धा परिणाम करते. गाऊटच्या रुग्णांसाठी सल्ला देणारे परंपरागत डॉ हे अस्थिरोगतज्ञ (orthopedic surgeons) आहेत. परंतु वैद्यकातील नवीन प्रगतीनुसार आता हा आजार एका नव्या प्रकारच्या डॉ.नी हाताळायचा आहे.
या नव्या शाखेला Rheumatology म्हणतात आणि त्यातील तज्ञ हा D.M. (Rheumatology) शिकलेला असतो. सध्या भारतात या तज्ञांची संख्या कमी आहे आणि ते जास्त करून महानगरांत दिसतील. पण भविष्यात त्यांची वाढ होईल. याची दखल संबंधित रुग्णांनी घ्यावी.
आता हा बदल कशासाठी, ते सांगतो. अस्थिरोगतज्ञ हा मुळात surgeon असतो. जेव्हा संधिवात हा एखाद-दुसऱ्या सांध्यापुरताच मर्यादित असतो आणि त्याचा अन्य इंद्रियांवर परिणाम झालेला नसतो, असे रुग्ण हे अस्थिरोगतज्ञाने हाताळायचे असतात. याउलट गाऊट सारखे आजार की ज्यात शरीराचे अनेक अवयव व्याधीग्रस्त होतात, ते Rheumatologist च्या अभ्यासात येतात. हा डॉ मुळात ‘फिजिशियन’ असतो. या नव्या अतिविशिष्ट तज्ञांचा लाभ संबंधित रुग्णांनी जरूर घ्यावा.

@ कुमार१,

कष्टी करणाऱ्या अश्या नवीन आजारांबद्दल वाचले की - 'दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है' असं फीलिंग येतं Happy

लेखामुळे गाऊट, Rheumatology आणि Rheumatologist यांच्याबद्दल नव्यानेच कळले,

आभार !

- अनिंद्य

लेख आणि त्या वरची चर्चा ऐकून मला दूरदर्शन वर पूर्वी चालायचा तो आरोग्य संपदा कार्यक्रम आठवला. त्याच्यामध्ये बरेच आजार डॉक्टर समजावून सांगायचे आणि नंतर वाचकांच्या प्रश्नांवर उत्तरेही द्यायचे...

ही लेखमाला फारच उपयुक्त आहे. आजाराबद्दल मराठीमध्ये समजेल अश्या भाषेत माहिती मिळते..

फारच चांगली माहिती दिलीत. धन्यवाद. विशेषकरून युरिक अ‍ॅसिड (जे लघवीवाटे शरीराबाहेर जाते) कशामुळे बनते ते माहिती नव्हते ते या लेखामुळे कळले. पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी असेल तर हे युरिक अ‍ॅसिड बाहेर जाण्याचे पण प्रमाण कमी राहील आणि अर्थातच कालांतराने शरीरातले त्याचे प्रमाण वाढेल अशी माझी समजूत आहे ती योग्य आहे का? (तसे असेल तर आजाराच्या कारणमीमांसेत इतर अनेक जी कारणे दिलेली आहेत त्याबरोबर "पाणी कमी पिणे" हे सुद्धा एक कारण होऊ शकते)

अतुल, आभार.
आजाराच्या कारणमीमांसेत इतर अनेक जी कारणे दिलेली आहेत त्याबरोबर "पाणी कमी पिणे" हे सुद्धा एक कारण होऊ शकते >>>>>
नाही, "पाणी कमी पिणे" हे 'कारण' नाही म्हणता येणार. त्या रुग्णासाठी ते पथ्य जरूर आहे.

ह्या गाऊट वर घरगुती उपाय म्हणून दूधी चा रस घेऊन त्यात भाजलेल्या ओव्याची व मीरीची पूड टाकुन पिणे हा उपचार सांगीतला आहे. आता हा उपाय फेसबुक वर Homemade Solutions - घरगुती नुस्खे या नावाने आहे. कुणाला पहायचे तर पहावे. हा प्रयोग मी सगळ्यांना करायला
सांगत नाहीये फक्त माहिती दिलीय. कृपया गैरसमज नसावा.

नेहमी प्रमाणे उत्तम लेख.

माझे युरिक ऍसिड वाढल्याचे महिन्यापूर्वीच निदर्शनास आले.
माझे रेग्युलर डॉक्टर होते ते गल्फ मध्ये गेले.
तेव्हा साधारण वर्षानुभरापूर्वी डॉक्टर बदलले. आधीच्या डॉक्टरांनी उक्चरक्तचापाकरता lorastan हे औषध दिले होते, यांनी त्यात बदल जरून losar-H हे औषध दिले.
आता या डॉक्टरांनीच पायांचे तळवे / पायाचे अंगठे दुखणे या अलीकडील तक्रारीवरून युरिक ऍसिड आणि अन्य काही रक्तघटक तपासायला सांगितले, युरिक ऍसिड ९.८ आले. त्यापूर्वी युरिक ऍसिड हे अडीच / तीन वर्षांपूर्वी तपासले होते ते नॉर्मल रेंज मध्ये होते.

आता Fabuxostat औषध सुरू करुन, losar-H चे परत losar monotherapy केली आहे. मला hyperkalemia आधीही नव्हता, आताही नाहीय. त्यामुळे losartan monotherapy अद्याप तरी चालू ठेऊ शकतील. दोन महिन्यांनी परत टेस्ट करायला सांगितले आहे electrolytes आणि युरिक ऍसिड. कदाचित मला fabuxostat कायम घ्यावे लागणार नाही, बघूया आता काय रिझल्ट्स येतात आणि डॉक्टर काय सांगतात.
Diuretic औषधे हे सुद्धा युरिक ऍसिड वाढीचे एक कारण असू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

कदाचित मला febuxostat कायम घ्यावे लागणार नाही >>>>>
तसे झाल्यास बरे होइल. अलिकडे या गोळीच्या side effects वरून अमेरिकेत वाद सुरु आहे असे वाचनात आले.

@ मानव व साद,

Febuxostat बद्दल ताजी घडामोड:

या औषधाने हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो असे दिसले आहे. म्हणून ते वापरावे का नाही यावरील वाद अद्याप चालू आहे. ज्या मोजक्या रुग्णांना Allopurinol या प्रस्थापित औषधाने गुण येत नाही व त्याचा त्रास होतो त्यांच्याच बाबतीत या नव्या औषधाचा वापर करावा, असे सध्याचे मत आहे. अजून संशोधनाची गरज आहे.

धन्यवाद डॉक्टर.
मला ती गोळी सूट झाली नाही, बंद केली.
केवळ तो Hydrochlorothiazide भाग बंद केल्याने, व आहारबदलाने माझे युरिक ऍसिड कमी होत आहे, पण अजून ४.५ चा आकडा गाठायचाय.

मध्ये आंब्याच्या सिजनमध्ये दोन ओळखीच्या लोकांचे अनुभव ऐकले. त्यांना आंबे खाल्ल्यावर पायाच्या सांध्याला सूज आली.
गाऊट व आंब्याचा काही संबंध असतो का?

साद,
गाऊट व आंब्याचा काही संबंध असतो का? >>>

तसा सिद्ध झालेला नाही. हापूस आंब्यात फ्रुक्टोज भरपूर असते. काही लोकांत उच्च- फ्रुक्टोज आहाराने युरीक अ‍ॅसिड वाढू शकते.
पण आंबा आणि गाऊट यांचा कार्यकारणभाव शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.

Apple cider vinegar घेतल्याने युरीक अॅसिड वाढू शकते का?
वजन कमी करण्यासाठी ACV चा वापर करायला घेतला होता सासर्यांनी...पण आता गाऊटचा त्रास होतोय. काही संबंध आहे का त्याच्याशी?

चिन्मयी,

** अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग >>>>
त्याला एक साधारण तब्बेतीस चांगले पेय म्हणता येईल. आजारांमध्ये उपयुक्त किती याबद्दल बरेच दावे केलेले असतात. काहींत त्याने युरिक पातळी स्थिर ठेवली जाते, असेही म्हटलेले असते.
पण, प्रत्यक्ष हजारो रुग्णांवर त्याचे शास्त्रीय प्रयोग ’ झालेले नसतात.
त्यामुळे वैद्यकीय मत देता येत नाही.

आज माझं गाऊट क्लब मध्ये पदार्पण. Sad

झुंबा, रनिंग, योग्य आहार, पर्फेक्ट वजन, मेन्सेस रेग्युलर, तरीही का माहीत नाही. ड्रिंक्स 3-4 महिन्यातून आणि मॉडरेट, नॉन व्हेज महिन्यातून फार तर एकदा. ही आयडियल लाइफस्टाइल नाही का? Sad

कोपरात प्रचंड वेदना होत होत्या. मला वाटलं की प्लॅनक्स किंवा push ups करताना हात दुखावला असेल म्हणून एक दिवस घरगुती उपचारात काढला, पण असहनीय वेदना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ortho ला दाखवलं त्यांनी बघितल्या क्षणी गाऊट सांगून औषधं दिली. पथ्यं सांगितली नाहीत किंवा लिपिड प्रोफाइल व्यतिरिक्त अजून काही टेस्टस करायला सांगितल्या नाहीत. आता फक्त वेदना कमी होण्याची वाट पहायची. असे अटॅक नेहमी येणार असतील तरच्या भीतीने डिप्रेस झाले आहे

मीरा,
आज माझं गाऊट क्लब मध्ये पदार्पण.>>>

अरेरे, सहानुभूती आहे इतकेच म्हणतो.
पुढेमागे डॉ. युरिक अ‍ॅसिड पातळी करायला सांगतील असे वाटते.

या लेखात पथ्यपाणी दिलेच आहे. त्यांच्या सल्ल्याने करून बघा. औषधे नियमित घ्या.
अनुवंशिकता तपासता येईल.
आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा !

Pages