प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 12 January, 2019 - 10:52

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

———————————————————

सकाळी उठले तेंव्हा पाऊस नव्हता पण ढग होते. परत मनावर मळभ दाटायला लागलं... सगळं नीट होईल ना? तिथे काही झालं तर काय करायचं... तिथे म्हणजे पाण्याखाली... मला जर नीट श्वास घ्यायला जमलंच
नाही तर? कारण swimming टॅंक आणि समुद्र या दोन्हीत जमीन अस्मानाचं अंतर होतं.
Discover scuba diving मध्ये तुम्हाला एका ठराविक खोलीपर्यंतच खाली जाता येतं. ती खोली आहे १२ मीटर. त्यापेक्षा खोल समुद्रात जायला ओपन वॉटर certification लागतं. त्यामुळे मी १२ मीटर खोलीपर्यंत जाणाऱ्या २ डाईव्ज मारणार होते. पहिली डाईव, त्यानंतर लंच आणि मग थोड्या वेळाने दुसरी डाईव. विचारातच ब्रेकफास्ट करायला गेले. व्यवस्थित नाश्ता करून पिकअप ची वाट बघत थांबले. साधारणतः १० मिनिट उशीर होईल असं सांगून २० मिनिटांनी पिकअप बस अली.

बसमध्ये बसताना थोडी धाकधूक होतीच, सहप्रवासी कसे असतील, कोणी भारतीय असेल का? तो प्रश्न पुढच्याच मिनिटाला सुटला. एक आंध्रमधलं कुटुंब आधीच होतं बसमध्ये. वडील आणि दोन ८वी-९वी च्या वयाच्या मुली. ते मूळचे आंध्रचे असले तरी सध्या कुवेत मध्ये वास्तव्यास होते. मग आमच्या गप्पा रंगल्या. त्यांचीही ही पहिलीच डाइव होती. मग मनात आलं, जर या शाळेतल्या पोरी आल्यात तर आपण तर नक्कीच घाबरायला नाही पाहिजे. मग १-१ करत बस भरत गेली. आम्ही १२ जण होतो. तब्बल पाऊणएक तासाने आम्ही चालाॅंग बे ला पोहोचलो. तिथे आम्हाला आमचे diving instructors भेटले. मी बसमधून उतरले तर एक बऱ्यापैकी दाढी राखलेला माणूस पुढे आला आणि म्हणाला,
“Hi I’m Ash, your diving instructor.”
“So tell me how are you feeling today?”
मी म्हटलं” slightly nervous”
तो म्हणाला” Good.. nervous is good”

मग चालाॅंग बे वरून आम्ही बोटीने राचा याई बेटाला जायला निघालो. आम्ही ३० जण होतो. आणि प्रत्येक १-२ माणसांमागे एक instructor.
बोट सुरु झाली आणि कळलं कि हा प्रवास वाटतोय तितका सोप्पा नाही. मोठ्या लाटा उसळत होत्या, समुद्र काही म्हणावा तितका शांत नव्हता. त्यामुळे आमची बोट म्हणजे रोलर कोस्टर राईड झाली होती. निम्म्या डायवर्सना तर त्या प्रवासाच्या पहिल्या १० मिनिटातच मळमळायला लागलं होतं. नशिबाने मला प्रवासाचा आणि कुठल्याही प्रवासाच्या साधनांचा जसं बोट, बस, विमान तसा काही त्रास होत नाही, त्यामुळे मी बाहेर समुद्राकडे बघत बसले होते. मग अॅश आला, त्याने काही फॉर्म्स भरून घेतले, ज्यात मला scuba diving मध्ये येणाऱ्या अडचणी आणि धोक्यांची कल्पना आहे हे सांगितलं होतं आणि स्कुबा साठी मी physically fit आहे असं declaration होतं. मग सहप्रवासी आणि माझ्या instructor बरोबर बोलत बसले. हया अॅशचं नाव आशिष. तो भारतीयच निघाला. मूळचा मुंबई चा. Computer engineer. मग मी म्हटलं “अरे वा! Engineers can do anything.कारण मी computer engineer आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे.”
गेली ३ वर्षे तो फुकेत मध्ये डायविंग instructor म्हणून काम करतोय. मोठा भाऊ लंडन ला, आईवडील भारतात. ५ वर्ष finance मध्ये नोकरी करून त्याने ती सोडून दिली आणि डायविंग ची आपली आवड जपायला हे काम सुरु केलं.
आयुष्यात किती जणांना अशी संधी मिळत असेल? कित्येकदा गरज तर काहीवेळा नाईलाज म्हणून नावडत्या नोकऱ्या वर्षानुवर्षे करणारी माणसे असतात. शेवटी सगळंच निर्णयावर अवलंबून नसतं. काहींच्या बाबतीत मात्र तो निर्णय घेणं सोपं असतं. घरातल्यांचं बॅकिंग असेल तर तुम्ही मनाजोगत्या प्रोफेशनमध्ये आनंदी राहू शकता. किमान एकदा प्रयत्न तरी करू शकता.

आमची रोलर कोस्टर राईड काही संपायचं नाव घेत नव्हती. ईन्स्ट्रक्टर्सनी आपापल्या डाइवर्सना sea sickness च्या गोळ्या सरसकट घ्यायला लावल्या. कारण खरंच त्रास व्हायला लागला होता काही जणांना. उगाच त्या त्रासामुळे डाईवचा आनंद कमी नको व्हायला. त्यामुळे सगळ्यांनी निमूटपणे त्या घेतल्याही.

अखेर दीड तासाने आम्ही राचा याई ला पोहोचलो. बोट थांबल्यावर आम्हाला ईन्स्ट्रक्टर्सनी काही बेसिक सूचना दिल्या जसं की पाण्याखाली असताना वापरायच्या खुणा. हाताचा अंगठा वर म्हणजे अप, खाली म्हणजे डाउन.
हात लाटेसारखा हलवला तर जरा हळू, शिस्तीने घे.
आपण वा! असं म्हणताना जसं अंगठा आणि तर्जनी एकमेकांना मिळवून बाकीची बोटे उभी ठेवतो तसं करणे म्हणजे ओके.
हाताचा फक्त पंजा आडवा ठेवून हलवणे म्हणजे नाॅट ओके.
मानेवर आडवा हात फिरवणे म्हणजे मला श्वास घेता येत नाहीये.
या आणि अशा आणखी काही खुणा मी शिकले. यात सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या ईन्स्ट्रक्टरने सांगितली ती ही कि तू पाण्याखाली जितकी रिलॅक्स राहशील तितका तुला श्वास नीट घेता येईल आणि श्वास नीट घेता आला कि निम्म्यापेक्षा जास्त लढाई जिंकल्यासारखं आहे.

मग आम्ही सगळे पाण्यात उतरायच्या तयारीला लागलो. मी वेटसूट घातला. पण oxygen cylinder पाठीला लावल्यावर मला जाणवलं कि याचं वजन कालच्या training cylinder पेक्षा खूप जास्त आहे. कारण हा पूर्ण भरलेला सिलेंडर होता, कालचा training चा असल्याने पूर्ण भरलेला नव्हता.
सगळा सरंजाम चढवल्यावर आशिषने मला सांगितलं एअर रेग्युलेटर तोंडात धरून जरा वेळ श्वास घेत राहा, तुला comfortable वाटेल. मग पाण्यात उतरायची वेळ आली. मी मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हणून घेतलं.
स्कुबा डायविंग साठी पाण्यात उडी मारताना, तुम्हाला मास्क आणि रेग्युलेटर उडीच्या जोराने पाण्यात पडल्यावर अचानक निघू नयेत, म्हणून हाताच्या पंजाने धरावे लागतात. ते इतकं मजेशीर दिसत होतं की बास. पण तसं करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि एक दोन जणांनी उडी मारल्यानंतर माझा नंबर आला. मी रेग्युलेटर ने २-३ खोल श्वास घेतले. इंस्ट्रक्टरने विचारलं Are you ready? OK?
मी हाताने खूण केली ओके. आणि मी पाण्यात झेपावले.

पुढच्या दोन सेकंदात मी पाण्याखाली होते पण अगदी ४-५ सेकंदच. BCD(Buoyancy Control Device)मुळे मी पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर आले. आमच्या बोटीला एक भलामोठा दोरखंड बांधला होता आणि त्याला काही फ्लोट्स् बांधले होते. त्यांना धरून बोटीपासून थोडंसं दूर पोहत जायचं होतं, खरंतर तरंगत. मग तिथे पाण्याखाली पण थोड्या उथळ पाण्यात गेल्यावर इंस्ट्रक्टरने पुन्हा माझ्या स्कुबाच्या ३ आवश्यक कौशल्यांची उजळणी घेतली.
पहिलं मला बरोबर जमलं, तोंडातून निघालेला regulator शोधणं. पण दुसरं म्हणजेच तो रेग्युलेटर पुन्हा तोंडात बसवून श्वास घेणं, हे करताना मात्र माझी त्रेधा उडाली. पाणी तोंडात गेलं आणि तिथून घशात! श्वास अडकला...
एक सेकंद मला काही सुचेना. हाच तो क्षण आहे कि काय ज्याची मला भीती वाटत होती? आता खरंच श्वास नाही घेता आला तर? आपण आपलं आयुष्य किती गृहीत धरतो ना? म्हणजे रात्री झोपलो कि सकाळी उठूच, सगळं नीट होईलच?! काही वेळा सगळं चांगलं होईल हि अाशाच सगळं तारून नेते. मी श्वास घेण्यासाठी धडपडत होते. तोंडात गेलेलं समुद्राचं खारट पाणी ते आणखी अवघड करत होतं. पण मग पुढच्याच क्षणाला मी ठरवलं,
नाही!
इतक्या दूर येऊन हार मानायची नाही!
अजून प्रयत्न करायचा, जमेलच!
आणि मी श्वास घेतला!!
त्या धडपडीनंतर घेतलेला तो श्वास कसा होता काय सांगू.. शब्दात सांगणं अवघड आहे. कोणीतरी वर आपल्यावर खूप खुश आहे म्हणून सगळं छान होतंय असं वाटलं मला. मग थोडे दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात केली कारण आता खाली खोल पाण्यात जायचं होतं. बोटीला बांधलेला दोर अजूनही माझ्या हातातच होता. इंस्ट्रक्टरने तो सोड अशी खूण केली. आणि मी एक खोल श्वास घेऊन तो दोर सोडला. Then I was on my own! आता हातात पकडता येईल असा कुठलाही दोर नव्हता. पाण्याच्या पृष्ठभागावर लगेच येता येणार नव्हतं. मी खोल पाण्यात निघाले होते....

पाण्यात बरंच खाली आल्यावर आम्ही आमची buoyancy बघितली आणि neutral buoyant झालो. आता आम्ही खुणांनी बोलत होतो. इंस्ट्रक्टरने मला सांगितलं आडवी हो आणि आजूबाजुला पहा. मी तसं केलं आणि I was amused. मी पाण्याखाली पण पाण्यातच तरंगत होते. माझे सह डायवर्स आजूबाजूला होते. माझं स्कुबा डायविंग चं स्वप्न माझ्याकडे बघत हात पसरून उभं होतं आणि मी माझ्या स्वप्नाला कवेत घेण्यासाठी झेपावले.

मी आता पोहत पोहत पुढे निघाले होते. एक चिमुकला निळा मासा अचानक माझ्या दिशेने पोहत आला. मी गडबडले कारण ते त्याचं घर होतं. मी तिथे पाहुणी होते, मी त्याला जागा करून द्यायला हवी होती, त्यामुळे मी बाजूला झाले आणि त्याला त्याच्या दिशेने जाऊ दिलं. अचानक खाली समुद्रतळाकडे बघताना मला एक तारा मासा दिसला. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पहिला स्टारफिश. किती छान दिसत होता तो त्या समुद्रतळावर. पाणी सुंदर आकाशी निळं होतं. आता छोटी छोटी प्रवाळांची बेटं दिसायला लागली होती. आम्ही आणखी पुढे गेलो तशी ती मोठी होत गेली. त्यांच्याभोवती इवले इवले मासे गोल पोहत होते. एका बेटाजवळ आकाशी निळ्या माशांचा एक थवा पोहत होता. त्याच्या जवळून हात फिरवला तर ते सगळे गर्रकन वळले आणि दुसऱ्या दिशेने पोहायला लागले. किती सुंदर होतं ते जग.

Aquarium मध्ये पोहणारे मासे मला कधीच शांत वाटत नाहीत. Somehow मला असं वाटतं कि त्यांना कळलंय कि आपण कैदेत आहोत. पण इथे माझ्या समोर संथ पण एका लयीत पोहणारे ते मासे बघून मनाला खरंच शांत वाटत होत. आनंददायी होतं त्यांना बघणं.
सहज एक विचार मनात आला. जीवसृष्टी पाण्यातच का निर्माण झाली असेल याचं उत्तर समोर होतं.

जर तुम्हाला पाण्यात श्वास घेता येत असेल तर त्या जागेसारखी दुसरी जागा माझ्यासाठी पृथ्वीतलावर नव्हती. तुम्हाला ऐकू येणारी एकच गोष्ट,
तुमचा श्वास.
बस्स. कसलाही गोंधळ नाही, गोंगाट नाही.
नीरव शांतता. बाळ आईच्या पोटात असतानाही गर्भजलात तरंगत असतं. खरंच आपल्या असण्यात किती महत्वाची भूमिका आहे पाण्याची.

माझ्या समोरून एक लहानग्या माशांचा मोठा थवा आला आणि माझ्या भोवती फिरू लागला. मी शांत होते... रिलॅक्स्ड... आनंदी... कुठलाही आवाज कानांना स्पर्श करत नव्हता. कुठलाही तणाव उरला नव्हता.
मी संथ गतीने त्या माशांबरोबर तरंगत होते.
आणि मला ते जाणवलं जे माझ्यापुरतं सत्य होतं.
मी कोणीतरी आहे. I’m alive.
मी शांत आहे, स्वत:त परिपूर्ण आहे.
एक जीव म्हणून.
आणि ती शांतता मनात झिरपत गेली...
इंस्ट्रक्टरने मला खुणेने सांगितलं कि ४० मिनिटे संपत आली आहेत. आपण पाण्याच्या पृष्ठभागावर जायला हवं. मग जसं ट्रेनिंगमध्ये शिकवलं होतं तसं अगदी सावकाश आम्ही पाण्याच्या वर आलो. तिथून आमच्या बोटीकडे पोहत आलो. बोटीवर असलेल्या दुसऱ्या इंस्ट्रक्टरने मला वर यायला मदत केली. आणि मास्क काढून मी एक मनमोकळा फुफ्फुसभरून श्वास घेतला. पुढची कितीतरी मिनिटे माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हसू होतं.... स्वत:ला गवसल्याचं...

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलं आहे
मी आयुष्यात कधी करू शकेन असे वाटत नाही
अनेक शार्कपट पाहिले असल्याने समुद्रात गेलो की कुठूनही शार्क घेऊन चावेल असेच वाटत राहते

वा, छान लिहिलेत दोन्ही भाग. तुम्हाला आवडले डायविंग याबद्दल अभिनंदन. खरच, श्वास घेता आला तर समुद्रात फिरण्यासारखे सूख नाही. 12 मीटर खोलीवरही खूप छान समुद्री जीवन दिसते. माझा एक मित्र म्हणतो, डायविंग हे मेडीटेशन आहे. शांतपणे समुद्रात भटकत राहायचं. फक्त समुद्र शांत पाहिजे त्यावेळी Wink

आशुचॅम्प,
Ocean Ramsey चे व्हिडीओ पहा बरं!
चित्रपट पाहून मते बनवायची असतील तर भारतात सगळे मोठमोठ्या हवेलीत राहतात नी 10-15 दिवस लग्नसमारंभ करत बसतात असे वाटत असेल ना बॉलिवूड चित्रपट बघून? Wink

याने काही मत बदलते का ते पहा. आणि हो, सगळीकडे नसतात हे शार्क हे ही लक्षात ठेवा.

https://youtu.be/d_UJv3zWyxQ

https://youtu.be/UVuHuifQL8Q

मत नाही हो, मी डिस्कव्हरी अनिमल प्लॅनेट पण बघतो
आणि शार्क पासून माणसाला असणाऱ्या धोक्यांपेक्षा शर्कला मानवपासून जास्त धोका आहे माहितीय
तरी शार्क म्हणलं की धडधड होते हे खरेच

खूप सुंदर लिहिलंय! आवडले लिखाण आणि असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करायचे कौशल्यही वाखाणण्याजोगे.

>>>>आवडले लिखाण आणि असा विलक्षण अनुभव शब्दबद्ध करायचे कौशल्यही वाखाणण्याजोगे.>>>> धन्यवाद हर्पेन Happy