‘ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता

Submitted by कुमार१ on 10 January, 2019 - 04:47

जीवनसत्त्वे लेखमाला : भाग ३
( भाग २ :https://www.maayboli.com/node/68592)
*****************

या लेखात आपण ‘ड’ जीवनसत्वाचा (Cholecalciferol) विचार करणार आहोत. हाडांच्या बळकटीसाठी ते अगदी आवश्यक. ते आपल्या शरीरातही तयार होते, ही त्याची अजून एक ओळख. त्याचे उत्पादन, कार्य आणि त्याच्या अभावाने होणारे आजार यांचे विवेचन पुढे येईल. हाडांच्या दुबळेपणाव्यतिरिक्त इतर काही गंभीर आजारांचा प्रतिबंध ‘ड’ करू शकते का, हा गेल्या २० वर्षांत खूप चार्विचर्वण झालेला विषय आहे. त्याचाही आढावा शेवटी घेईन.

शरीरातील उत्पादन:
आपल्या त्वचेमध्ये काही प्रमाणात कोलेस्टेरॉल असते. जेव्हा उघड्या त्वचेवर सूर्यकिरण पडतात तेव्हा त्यातील ‘नीलातीत’ (UV-B) किरणांची या कोलेस्टेरॉलवर प्रक्रिया होते. त्यातून ‘ड’ तयार होते. ते रक्तात शोषले गेल्यावर पुढे यकृत व नंतर मूत्रपिंडात पाठवले जाते. तिथे त्यावर अधिक प्रक्रिया होऊन परिपक्व ‘ड’ (active D) तयार होते.

जर ‘ड’ इतक्या सहज शरीरात तयार होते तर मग आपल्याला आहारात त्याची काळजी करायची गरज नाही, असे वाटेल. पण, हा मामला इतका सोपा नाही. ते त्वचेत तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. ते असे आहेत:

* त्वचेचा रंग: जगभरातील लोकांच्या त्वचेच्या रंगात पांढराफटक पासून ते अगदी पूर्ण काळा अशा अनेक छटा दिसतात. त्वचेमध्ये जेवढे melanin रंगद्रव्य जास्त, तेवढा तिचा रंग अधिक काळा होतो. हे रंगद्रव्य ‘ड’ च्या उत्पादनात अडथळा आणते. त्यामुळे ‘ड’ कृष्णवर्णीयांमध्ये कमी प्रमाणात तयार होते.

* वय: वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया मंदावत जाते. त्यामुळे वृद्धांमध्ये ‘ड’ कमी तयार होते.

* हवामान: हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक होते. त्यामुळे उन्हाळा संपताना सर्वात जास्त ‘ड’ त्वचेत तयार झालेले असते.

* पोशाख आणि व्यवसाय: ‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन ३० - ४० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते.

यासंदर्भात पांढरपेशे आणि श्रमजीवींची तुलना रोचक आहे. पांढरपेशे या वेळांत बरेचसे शरीर कपड्यांनी झाकून कामाच्या खोल्यांमध्ये बसून असतात. त्यात जर तिथल्या खिडक्या पूर्ण बंद केल्या असतील, तर काचेतून येणारे सूर्यकिरण उपयुक्त नसतात. त्यात भर म्हणून जर खोलीच्या आतून पूर्ण पडदे लावलेले असतील तर मग थेट प्रकाशाचा संपर्कच तुटतो. याउलट एखादा बांधकाम मजूर या वेळांत बऱ्यापैकी उघड्या अंगाने उन्हात घाम गाळतो. अर्थातच त्याच्या त्वचेत ‘ड’ भरपूर तयार होते.
या विवेचनातून लक्षात येईल की वृद्धाश्रमात जखडलेले लोक आणि परदानशीन स्त्रियांत ‘ड’ चा अभाव अधिक दिसतो.

वरील सर्व घटकांचा विचार करता हे लक्षात येते की शरीरात तयार होणारे ‘ड’ आपल्याला पुरेसे नसते. त्यामुळे काही प्रमाणात ते आहारातून घ्यावे लागते.

आहार आणि ‘ड’ ची उपलब्धता:
images.jpeg

ते मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांत आढळते. तेलयुक्त मासे (salmon, mackerel), बटर आणि चीज हे त्याचे मुख्य स्त्रोत. तरीही या नैसर्गिक पदार्थांत जेवढे ‘ड’ असते ते आपल्या गरजेपेक्षा कमीच असते. म्हणून प्रगत देशांत दूध व इतर काही खाद्यांमध्ये कृत्रिम ‘ड’ घालून त्यांचे पोषणमूल्य वाढवलेले असते.

शरीरातील कार्य:
परिपक्व ‘ड’ (active D) हे पेशींत एखाद्या हॉर्मोनप्रमाणे काम करते. लहान आतडे, हाडे आणि मूत्रपिंड अशा तीन ठिकाणी त्याचे काम चालते. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे आहारातील कॅल्शियम आतड्यांमध्ये व्यवस्थित शोषून घेणे. आपल्या रक्तातील कॅल्शियमची पातळी स्थिर ठेवण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

ड’चा अभाव आणि आजार :

हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात.
मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात:

* डोक्याचा खूप मोठा आकार
* बरगड्या व पाठीचा कणा वाकणे
* मोठे पोट
* पाय धनुष्यकृती आकारात वाकणे
* मूल वेळेत चालायला न लागणे
* दात योग्य वेळेवर न येणे

वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते. त्यांची हाडे ठिसूळ झाल्याने अस्थिभंग सहज होण्याचा धोका असतो.

ड’ ची शरीरातील स्थिती आणि आजार-प्रतिबंध :

‘ड’ आणि हाडांचे आरोग्य याचा थेट संबंध आहे हे निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त त्याचा इतर काही आजारांशी संबंध आहे का, हे एक कोडे आहे. गेली २० वर्षे यावर विपुल संशोधन झालेले आहे. त्यामध्ये मुख्यतः दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले होते:
१. हे आजार ‘ड’ च्या अभावाने होऊ शकतात का?, आणि

२.या आजारांमध्ये मुख्य उपचाराबरोबर ‘ड’ चा मोठा डोस देणे उपयुक्त असते का?

या दोन्ही प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. आता या आजारांची यादी सादर करतो:

* मधुमेह (प्रकार-२)
* Metabolic syndrome : यात स्थूलता, उच्च कोलेस्टेरॉल व इतर मेद इ. चा समावेश आहे.
* हृदयविकार
* श्वसनदाह (respiratory infections) आणि दमा
*काही कर्करोग : यात फुफ्फुस. आणि मोठ्या आतड्यांच्या कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे.

* नैराश्य
* पुरुष वंध्यत्व
* Psoriasis हा त्वचाविकार, आणि
* Multiple sclerosis हा मज्जासंस्था-विकार.

वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.

वरील आजारांपैकी सर्वात जास्त संशोधन हे मधुमेहावर झालेले आहे. संशोधनाची प्रमुख उद्दिष्ट्ये अशी आहेत:

१. ‘ड’ च्या अभावाने मधुमेह(प्र-२) होण्याचा धोका अधिक असतो का?
२.मधुमेहाच्या पूर्वावस्थेत जर ‘ड’ चे मोठे डोस दिले तर मधुमेह-प्रतिबंध होऊ शकतो का?

३.या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपात (आहार, सूर्यप्रकाश) घेतलेले चांगले की औषध स्वरूपात?

सद्यस्थितीत तरी या प्रश्नांची ठोस उत्तरे आपल्याजवळ नाहीत. जगभरात अनेक वंशांच्या लोकांवर हे संशोधन चालू आहे. त्यातील एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष खूप आशादायक असतो तर अन्य एखाद्याचा निराशाजनक. पुन्हा हे निष्कर्ष बऱ्याचदा वांशिकतेशी निगडीत असल्याचेही दिसते. त्यामुळे ‘ड’ आणि मधुमेह-प्रतिबंध यावर आज तरी सार्वत्रिक विधान करता येत नाही.

दोन मुद्दे मात्र स्वीकारार्ह आहेत.
१. आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये ‘ड’ मदत करते आणि पेशींमध्ये इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होण्यातही त्याचा वाटा असतो.
२. तसेच आजार प्रतिबंधासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपातूनच मिळालेले अधिक चांगले, असे म्हणता येईल.

‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी मोजण्याचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते.
हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणी चाचणी म्हणून नको.

समारोप:
आपल्या त्वचेवर पडणाऱ्या पुरेशा सूर्यप्रकाशातून ‘ड’ तयार होते. अर्थात ते अपुरे असल्याने ते काही प्रमाणात आहारातूनही घ्यावे लागते. म्हणूनच ते जीवनसत्व ठरते. ते शरीरात काम करताना एखाद्या हॉर्मोन प्रमाणे वागते. रक्तातील कॅलशियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे त्याचे महत्वाचे काम. लहान मुले आणि वृद्धांमध्ये त्याची कमतरता बऱ्यापैकी आढळते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. त्या व्यतिरिक्त इतर काही आजारांशी ‘ड’ चा संबंध आहे का, यावर बरेच संशोधन होत आहे. अद्याप तरी त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. तेव्हा खरी गरज नसताना उगाचच ‘ड’ ची रक्तपातळी मोजणे अथवा त्याचे मोठे डोस औषधरुपात देणे हे हितावह नाही.
वैज्ञानिकांनी 'Sunshine Vitamin’ असे गौरवलेले हे ‘ड’ आज एक कुतूहलाचा विषय झाले आहे खरे.
**********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा!
अगदी कालच FT3, FT4, TSH, B12, D3 चे रिपोर्ट मिळाले. बाकी सगळे रेंजमधे आहे पण D3 10.9 ng/ml आलं. म्हणून मग डॉक्टरने Nano D3 लिक्विड आठवड्यातून एकदा असे चार आठवडे घ्यायला सांगितल आहे.

आणि आज हा लेख वाचला.

आता काय करायचे?ं

गच्चीत बैठक ठोकून उन्हात वाचन करा.>>>>>+ १ आणि....
त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा ठेवा !
... यावर एक रोचक संशोधन आहे. जरा वेळाने लिहितो.
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

वाचतेय.

ऑफिसात annual टेस्ट झाली तेव्हा झाडून सगळ्यांच D व्हिटॅमिन लो दाखवलं होतं .

डॉक्टर , तुम्ही म्हणताय की << सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन ३० - ४० मिनिटे पडणे आवश्यक असते.>>>>
पण मुंबईत इतकं कडक ऊन असतं की चटके बसतात , घामाघूम होतो माणूस . Uhoh

विषयांतर होऊ शकतं, पण कोवळ्या उन्हातून मिळणाऱ्या ड जीवनसत्वामुळे डोक्यावरच्या केसांच्या वाढीला मदत मिळते का?

एका अभ्यासात सहभागींचे २ गट केले होते. पहिल्यात डॉक्टर व नर्सेस तर दुसऱ्यात सैनिक होते. त्यांचे ठराविक काळ निरीक्षण केल्यावर त्यांच्या रक्तातील ‘ड’ची पातळी मोजली.

सैनिकांची पातळी पहिल्या गटापेक्षा कित्येक पट जास्त होती.
यातून ऊन अंगावर पडण्याची वेळ आणि प्रमाण यांचे महत्व लक्षात येते.

नमस्कार, अतिशय उपयुक्त माहिती . आपण लिहिलेले लेख मी नियमित वाचते. तुम्ही आरोग्य विषयक माहिती फार छान समजावून सांगता. विटॅमिन डी विषयी एक प्रश्न आहे, जर विटॅमिन डी लो असेल तर थायराॅइड होऊ शकतो का ? किंवा थायराॅइड होण्याचे एक कारण विटॅमिन डी ची कमतरता हे असू शकते का?

नेहमीप्रमाणेच मस्त लेख. १० ते ३चे ऊन त्वचेवर हवे ही माहिती महत्वाची आहे. कोवळे ऊन असे पूर्वापार सांगायचे.

धन्यवाद, पु भा प्र

चैतन्य, काही कल्पना नाही.
अनघा,
जर विटॅमिन डी लो असेल तर थायराॅइड होऊ शकतो का ? >>>>
नाही. थायराॅइड आजारांचे प्रमुख कारण auto immunity हे आहे.

> गच्चीत बैठक ठोकून उन्हात वाचन करा.
आणि....
त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा ठेवा ! >
हां हेच करते. धन्यवाद मानव आणि कुमार१ _/\_

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार!
@ साद,
Psoriasis व जीवनसत्त्वे याबाबत काही गैरसमज आहेत. नवे संशोधन असे आहे:
१. या रुग्णांना मुख्य उपचाराबरोबर आहारातील खालील बदल उपयुक्त ठरतील.
२. कमी उष्मांकाच्या आहाराची जोरदार शिफारस.

३. काही रुग्णांसाठी ‘ग्लुटेन-मुक्त’ आहाराची चाचणी (३ महिने) शिफारस
४. माशांचे तेल खाणे उपयोगी नाही.

५. या रुग्णांना ‘ड’ किंवा ‘ब-१२’ ही जीवनसत्वे देण्याची शिफारस अजिबात केलेली नाही.

रोज उन्हात बसल्याने त्वचा काळी पडते म्हणजेच रंगद्रव्य वरच्या थरात येते व अतिनील किरणांना अटकाव करते. ज्यामुळे ड जीवनसत्व कमी तयार होते. यासाठी कोवळ्या उन्हात एकाड दिवस बसणे गरजेचे आहे. दुपारच्या उन्हात फायदा होऊ शकतो पण त्यासाठी कमी तीव्रतेचे सनक्रिम लावावे.
३० मिनीटीचे सन एक्स्पोजर हा ॲवरेज टाईम झाला पणन्कुणाला १० किंवा ५० मिनिटेही लागू शकतात. रक्ताच्या तपासणीतून ते लक्षात येईल. धन्यवाद.

के तु +१
ऊन पडण्याची शास्त्रीय वेळ आणि त्वचेची सहनशीलता यांचा समतोल साधावा.
हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. जरा वेळाने सविस्तर लिहितो

ड ची त्वचानिर्मिती व सूर्यप्रकाश हा तसा रोचक विषय आहे. निर्मितीच्या मर्यादा लेखात स्पष्ट केल्या आहेत. त्यात अजून एका मुद्द्याची भर घालतो.

नीलातीत किरण त्वचेवर पडणे ही झाली थिअरी. पण यातील वास्तव काय ते बघा.

१९५० नंतर जागतिक हवेचे प्रदूषण वाढत गेले. जेवढे हे प्रदूषण जास्त तेवढ्या प्रमाणात नीलातीत किरणांना पृथ्वीवर पोचायला अडथळा होतो !

१९७० - ८० च्या दशकातच यावर जोरदार चर्चा चालू झाली. ‘ड’ चा अभाव हा हवा प्रदूषणातून उदभवलेला पहिला कुपोषण-आजार ,अशी नोंद तेव्हाच्या वैद्यकीय पुस्तकांत झाली होती.
……
आज २०१९ मध्ये ही परिस्थिती किती ढासळली असेल याची कल्पनाच केलेली बरी !

म्हणूनच..…
ड चे आहारातील महत्व वाढलेले आहे.

आज सकाळी ११.२० ते दुपारी १२ उन्हात हात-पाय उघडे टाकून बसलो तर काळी झाली कि त्वचा लगेच

फोटोचा वरचा भाग बघा; तुमच्या स्क्रीनचा ब्राईटनेस थोडा वाढवावा लागतील कदाचीत.

ठीक आहे. म्हणजे ऊन पडण्याचा काळ २० मिनिटे ठेवावा. पाश्चिमात्य गौरवर्णीयांसाठी तेवढीच शिफारस आहे. एकूण हा विषय घोळदार आहे खरा.

मासे सर्व लोक खाणार नाहीत.
म्हणून खाद्यान्न ड ने संपन्न करणे हे गरजेचे वाटते.

हम्म खरंच घोळदार आहे.
फक्त हिवाळ्यात, फक्त विकांताला सकाळी ९.४५ ते १०.१५ असा अर्धातासच उन्हात बसून बघतो.
बास झालं तेवढंच Wink

त्वचेमधील घर्मग्रंथी (sebaceous gland) स्त्रवल्या तर म्हणायचं फायदा झाला . कोरडेपणा असतो आनुवांशिक काहीजणांना, अश्यांनी थोडे तेल किंवा मॉईश्चराईझर लावुन ऊन्हात बसावे. एकंदर वन साईज फिट फॉर ऑल असं नाहीए हे प्रकरणं.

च्रप्स, नाही.
मेदात विरघळणारी A, D, E, K ही जीवनसत्वे यकृतात वा मेदात साठवली जातात. म्हणून गरज नसताना त्याच्या गोळ्या दीर्घकाळ खाल्ल्यास नक्की दुष्परिणाम होतात.

Pages