‘ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता

Submitted by कुमार१ on 10 January, 2019 - 04:47

जीवनसत्त्वे लेखमाला : भाग ३
( भाग २ :https://www.maayboli.com/node/68592)
*****************

या लेखात आपण ‘ड’ जीवनसत्वाचा (Cholecalciferol) विचार करणार आहोत. हाडांच्या बळकटीसाठी ते अगदी आवश्यक. ते आपल्या शरीरातही तयार होते, ही त्याची अजून एक ओळख. त्याचे उत्पादन, कार्य आणि त्याच्या अभावाने होणारे आजार यांचे विवेचन पुढे येईल. हाडांच्या दुबळेपणाव्यतिरिक्त इतर काही गंभीर आजारांचा प्रतिबंध ‘ड’ करू शकते का, हा गेल्या २० वर्षांत खूप चार्विचर्वण झालेला विषय आहे. त्याचाही आढावा शेवटी घेईन.

शरीरातील उत्पादन:
आपल्या त्वचेमध्ये काही प्रमाणात कोलेस्टेरॉल असते. जेव्हा उघड्या त्वचेवर सूर्यकिरण पडतात तेव्हा त्यातील ‘नीलातीत’ (UV-B) किरणांची या कोलेस्टेरॉलवर प्रक्रिया होते. त्यातून ‘ड’ तयार होते. ते रक्तात शोषले गेल्यावर पुढे यकृत व नंतर मूत्रपिंडात पाठवले जाते. तिथे त्यावर अधिक प्रक्रिया होऊन परिपक्व ‘ड’ (active D) तयार होते.

जर ‘ड’ इतक्या सहज शरीरात तयार होते तर मग आपल्याला आहारात त्याची काळजी करायची गरज नाही, असे वाटेल. पण, हा मामला इतका सोपा नाही. ते त्वचेत तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. ते असे आहेत:

* त्वचेचा रंग: जगभरातील लोकांच्या त्वचेच्या रंगात पांढराफटक पासून ते अगदी पूर्ण काळा अशा अनेक छटा दिसतात. त्वचेमध्ये जेवढे melanin रंगद्रव्य जास्त, तेवढा तिचा रंग अधिक काळा होतो. हे रंगद्रव्य ‘ड’ च्या उत्पादनात अडथळा आणते. त्यामुळे ‘ड’ कृष्णवर्णीयांमध्ये कमी प्रमाणात तयार होते.

* वय: वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया मंदावत जाते. त्यामुळे वृद्धांमध्ये ‘ड’ कमी तयार होते.

* हवामान: हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक होते. त्यामुळे उन्हाळा संपताना सर्वात जास्त ‘ड’ त्वचेत तयार झालेले असते.

* पोशाख आणि व्यवसाय: ‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन ३० - ४० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते.

यासंदर्भात पांढरपेशे आणि श्रमजीवींची तुलना रोचक आहे. पांढरपेशे या वेळांत बरेचसे शरीर कपड्यांनी झाकून कामाच्या खोल्यांमध्ये बसून असतात. त्यात जर तिथल्या खिडक्या पूर्ण बंद केल्या असतील, तर काचेतून येणारे सूर्यकिरण उपयुक्त नसतात. त्यात भर म्हणून जर खोलीच्या आतून पूर्ण पडदे लावलेले असतील तर मग थेट प्रकाशाचा संपर्कच तुटतो. याउलट एखादा बांधकाम मजूर या वेळांत बऱ्यापैकी उघड्या अंगाने उन्हात घाम गाळतो. अर्थातच त्याच्या त्वचेत ‘ड’ भरपूर तयार होते.
या विवेचनातून लक्षात येईल की वृद्धाश्रमात जखडलेले लोक आणि परदानशीन स्त्रियांत ‘ड’ चा अभाव अधिक दिसतो.

वरील सर्व घटकांचा विचार करता हे लक्षात येते की शरीरात तयार होणारे ‘ड’ आपल्याला पुरेसे नसते. त्यामुळे काही प्रमाणात ते आहारातून घ्यावे लागते.

आहार आणि ‘ड’ ची उपलब्धता:
images.jpeg

ते मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांत आढळते. तेलयुक्त मासे (salmon, mackerel), बटर आणि चीज हे त्याचे मुख्य स्त्रोत. तरीही या नैसर्गिक पदार्थांत जेवढे ‘ड’ असते ते आपल्या गरजेपेक्षा कमीच असते. म्हणून प्रगत देशांत दूध व इतर काही खाद्यांमध्ये कृत्रिम ‘ड’ घालून त्यांचे पोषणमूल्य वाढवलेले असते.

शरीरातील कार्य:
परिपक्व ‘ड’ (active D) हे पेशींत एखाद्या हॉर्मोनप्रमाणे काम करते. लहान आतडे, हाडे आणि मूत्रपिंड अशा तीन ठिकाणी त्याचे काम चालते. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे आहारातील कॅल्शियम आतड्यांमध्ये व्यवस्थित शोषून घेणे. आपल्या रक्तातील कॅल्शियमची पातळी स्थिर ठेवण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

ड’चा अभाव आणि आजार :

हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात.
मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात:

* डोक्याचा खूप मोठा आकार
* बरगड्या व पाठीचा कणा वाकणे
* मोठे पोट
* पाय धनुष्यकृती आकारात वाकणे
* मूल वेळेत चालायला न लागणे
* दात योग्य वेळेवर न येणे

वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते. त्यांची हाडे ठिसूळ झाल्याने अस्थिभंग सहज होण्याचा धोका असतो.

ड’ ची शरीरातील स्थिती आणि आजार-प्रतिबंध :

‘ड’ आणि हाडांचे आरोग्य याचा थेट संबंध आहे हे निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त त्याचा इतर काही आजारांशी संबंध आहे का, हे एक कोडे आहे. गेली २० वर्षे यावर विपुल संशोधन झालेले आहे. त्यामध्ये मुख्यतः दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले होते:
१. हे आजार ‘ड’ च्या अभावाने होऊ शकतात का?, आणि

२.या आजारांमध्ये मुख्य उपचाराबरोबर ‘ड’ चा मोठा डोस देणे उपयुक्त असते का?

या दोन्ही प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. आता या आजारांची यादी सादर करतो:

* मधुमेह (प्रकार-२)
* Metabolic syndrome : यात स्थूलता, उच्च कोलेस्टेरॉल व इतर मेद इ. चा समावेश आहे.
* हृदयविकार
* श्वसनदाह (respiratory infections) आणि दमा
*काही कर्करोग : यात फुफ्फुस. आणि मोठ्या आतड्यांच्या कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे.

* नैराश्य
* पुरुष वंध्यत्व
* Psoriasis हा त्वचाविकार, आणि
* Multiple sclerosis हा मज्जासंस्था-विकार.

वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.

वरील आजारांपैकी सर्वात जास्त संशोधन हे मधुमेहावर झालेले आहे. संशोधनाची प्रमुख उद्दिष्ट्ये अशी आहेत:

१. ‘ड’ च्या अभावाने मधुमेह(प्र-२) होण्याचा धोका अधिक असतो का?
२.मधुमेहाच्या पूर्वावस्थेत जर ‘ड’ चे मोठे डोस दिले तर मधुमेह-प्रतिबंध होऊ शकतो का?

३.या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपात (आहार, सूर्यप्रकाश) घेतलेले चांगले की औषध स्वरूपात?

सद्यस्थितीत तरी या प्रश्नांची ठोस उत्तरे आपल्याजवळ नाहीत. जगभरात अनेक वंशांच्या लोकांवर हे संशोधन चालू आहे. त्यातील एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष खूप आशादायक असतो तर अन्य एखाद्याचा निराशाजनक. पुन्हा हे निष्कर्ष बऱ्याचदा वांशिकतेशी निगडीत असल्याचेही दिसते. त्यामुळे ‘ड’ आणि मधुमेह-प्रतिबंध यावर आज तरी सार्वत्रिक विधान करता येत नाही.

दोन मुद्दे मात्र स्वीकारार्ह आहेत.
१. आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये ‘ड’ मदत करते आणि पेशींमध्ये इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होण्यातही त्याचा वाटा असतो.
२. तसेच आजार प्रतिबंधासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपातूनच मिळालेले अधिक चांगले, असे म्हणता येईल.

‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी मोजण्याचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते.
हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणी चाचणी म्हणून नको.

समारोप:
आपल्या त्वचेवर पडणाऱ्या पुरेशा सूर्यप्रकाशातून ‘ड’ तयार होते. अर्थात ते अपुरे असल्याने ते काही प्रमाणात आहारातूनही घ्यावे लागते. म्हणूनच ते जीवनसत्व ठरते. ते शरीरात काम करताना एखाद्या हॉर्मोन प्रमाणे वागते. रक्तातील कॅलशियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे त्याचे महत्वाचे काम. लहान मुले आणि वृद्धांमध्ये त्याची कमतरता बऱ्यापैकी आढळते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. त्या व्यतिरिक्त इतर काही आजारांशी ‘ड’ चा संबंध आहे का, यावर बरेच संशोधन होत आहे. अद्याप तरी त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. तेव्हा खरी गरज नसताना उगाचच ‘ड’ ची रक्तपातळी मोजणे अथवा त्याचे मोठे डोस औषधरुपात देणे हे हितावह नाही.
वैज्ञानिकांनी 'Sunshine Vitamin’ असे गौरवलेले हे ‘ड’ आज एक कुतूहलाचा विषय झाले आहे खरे.
**********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९५० नंतर जागतिक हवेचे प्रदूषण वाढत गेले. जेवढे हे प्रदूषण जास्त तेवढ्या प्रमाणात नीलातीत किरणांना पृथ्वीवर पोचायला अडथळा होतो !>>>>>

आमच्या ऑफिसात सुद्धा डी जीवनसत्वाची कमतरता असलेले बहुसंख्य आहेत. आमचा विस्तीर्ण कॅम्पस आहे व लोक दुपारी बाहेर हिरवळीवर फिरत असतात तरीही.. मागे मी चेकअपला गेले होते तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की आता उन्हात व्हिटामिन ड बनत नाही.

आमच्या इथे तर हवेत कायम करडा पडदा टांगलेला दिसतो. घरात कुठल्याही वस्तूवर फडका मारला तरी तासाभरात धूळ बसलेली दिसते. आत आपल्या फुफ्फुसांचे काय झालेय हे आपण चेक करत नाही पण जीवनसत्वे चेक केली जातात व बाहेरून घेता तरी येतात.

देवकी,
जीवनसत्वाची अल्पता असल्यास कोणती लक्षणे असतात?>≥>> थोडे थांबा, यापुढचा लेख 'इ' वर आहे. तिथे सविस्तर येईल.
साधना, सहमत, आभार.

@ कुमार१,

उत्तम लेखमाला, वाचतो आहे.

आताच सगळे लेख वाचले. छान मालिका. प्रतिसादांमधूनही बर्‍याच गोष्टींची माहिती मिळाली.
धन्यवाद.

माझ्या सासर्‍यांना डॉक ने सांगितलेले की, ड जीवन्सत्वाचा अभाव मधुमेह आणि थाय्रॉइड वर परीणाम करतो आणि हा डॉक अगदी खात्रीने सांगत होता. गोष्ट जुनी आहे. आणि तेव्हा सासरे अमेरीकेत होते उपचारासाठी गेलेले.

कारण त्यांचे ड जीवन्सत्व पुरुषांच्या मानाने २० होते. आम्ही त्या डॉकनुसार , ड चे गोळ्या दिल्या पण त्यांचा थकवा दूर झाला हा फरक आठवतोय, बाकी काय ते आता आठवत नाही. दुसरे म्हणने, त्याच डॉकने सांगितलेले की, तुम्ही लोकं( भारतीय वंशाची लोकं जी बहुधा काळी असतात,) त्यांच्यात ड कमीच शोषले जाते. आणि, तुम्ही सकाळी ९ पर्यंतच‘च’ उन्ह तुमच्या देशातल खा , कारण तेच उप्योगी आहे ठिकाणानुसार.
एकदमच गोंधळ उडतो अशी मिक्स माहीती वा सल्ले वाचले की.
.

डॉ. कुमार, तुमचे काय म्हणणं आहे? काय नातं असेल थायरॉइइड , मधुमेह वगैरे?

@ झंपी,
डॉ. कुमार, तुमचे काय म्हणणं आहे? काय नातं असेल थायरॉइइड , मधुमेह वगैरे? >>>

लेखातील काही मजकूर पुन्हा अधोरेखित करतो:

वरील सर्व आजार (यात मधुमेह, थायरॉइड विकार इत्यादी आले) आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
.....
म्हणून, या आजारांत 'ड' हे उपचार होत नाही.

मी जे वाचलंय त्यावरून वेगवेगळी जीवनसत्वे एकत्रित येऊन कामे करतात. त्यातले एखादे नसेल तर बाकीच्या जीवनसत्त्वांच्या कामात अडथळा येतो. इतर जीवनसत्वे नियमित घेतली आणि त्यातले एखादे नसले तर आरोग्य बिघडू शकते.

त्यामुळे कायम सर्व जीवनसत्वे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

तुम्ही सकाळी ९ पर्यंतच‘च’ उन्ह तुमच्या देशातल खा , कारण तेच उप्योगी आहे ठिकाणानुसार.
एकदमच गोंधळ उडतो अशी मिक्स माहीती वा सल्ले वाचले की.
>>

खरंय ! गोंधळ हा फक्त सामान्यजनांचाच नाही तर डॉ चाही उडेल, अशी उलटसुलट माहिती प्रसिद्ध होते आहे. कुठल्याही एका संशोधनाचा निष्कर्ष जगातील सर्वांना लागू होत नाहीये.

तेव्हा या घोळदार विषयावर माझी मते अशी आहेत:
१. उन्हामुळे त्वचेत ‘ड’ तयार होण्यावर फारसे विसंबता येत नाही.
२. म्हणजे आहाराला महत्व आले. मासे खाणाऱ्यानी बांगडा आणि तत्सम जरूर खावेत.

३. शाकाहारींसाठी “संपन्न” खाद्यान्ने महत्वाची. आता अ व ड ने संपन्न केलेली खाद्यतेले भारतातही मिळत आहेत.
४. म्हातारपणी गरज व डॉ च्या सल्ल्यानुसार ड च्या गोळ्या, पावडर, इ. घ्यावे.

माझे ड जीवनसत्व ६-७ वर्षांपूर्वी योगायोगाने मोजल्या गेले. (इतर हव्या असलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांपेक्षा पॅकेज स्वस्त होते म्हणून ते केले त्यात ही चाचणी होती). त्यात ड ची कमतरता नव्हे तर अपूर्णता आली (२१. ३० च्या वर उत्तम म्हणे). मग जेवणा आधी/नंतर ऑफिसच्या टेरेसवर ऊन खाणे सुरू केले. वर्षभराने परत मोजले ३६ की ३८आले.
त्यांनतर केव्हातरी एकदा डॉकच्या सांगण्यावरून मोजले तेव्हाही चांगलेच होते, अजून जास्त. (मध्यंतरी टेट्रापॅक दूधही वापरले ड युक्त).

आता लेख-चर्चा वाचू परत मोजावे विचार येतोय पण महाग आहे टेस्ट. ऊन खातच असतो, कशाला उगाच मोजावी, काही सिम्पटॉम्स दिसले तर बघू असे वाटते.

कशाला उगाच मोजावी, काही सिम्पटॉम्स दिसले तर बघू असे वाटते>>>>
+ १०००००००
हाच दृष्टीकोन पाहिजे !

> (इतर हव्या असलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांपेक्षा पॅकेज स्वस्त होते म्हणून ते केले त्यात ही चाचणी होती). > RAD Diagnosis पिंपळे सौदागरच्या खत्रुड रिसेप्शनिस्टने "पॅकेज घ्या म्हणजे तेवढ्याच पैशात तुमच्या इतरही टेस्ट केल्या जातील" हे सांगितलंच नाही Angry

> त्यात ड ची कमतरता नव्हे तर अपूर्णता आली (२१. ३० च्या वर उत्तम म्हणे). > आमच्या रिपोर्टमध्ये रेफरन्स रेंज अशी लिहिली आहे:
Deficient < 20
Insufficient 20-29
Sufficient 30-100
Potential toxicity >100

> आता लेख-चर्चा वाचू परत मोजावे विचार येतोय पण महाग आहे टेस्ट. ऊन खातच असतो, कशाला उगाच मोजावी, काही सिम्पटॉम्स दिसले तर बघू असे वाटते. > महाग आहे टेस्ट, उगाच करून घेऊ नका. पण जास्त ऊनपण खाऊ नका Lol

छान लेख , नेहेमीप्रमाणेच.
१ उन्हात बसणे, दूध घेणे इ. उपायाचा उपयोग ठराविक वयातच होतो की सर्व वयात?
२ भारतात शाकाहारींसाठी आहारात अजुन काय काय घेता येईल ‘ड’ जीवनसत्व मिळवण्यासाठी ?

रावी,
१. उन्हात बसण्याचा उपयोग लहान वयात जास्त, पुढे कमी होत जाणार.

२. भारतात शाकाहारींसाठी :
* “संपन्न” खाद्यतेले
* चीज
* अंड्याचा बलक (बर्याच शाकाहारींना हे चालू शकते).

एमी, गो फॉर गोळविलकर.
व्हिजन गॅलरीया च्या 2 टोकांना 2 भाऊ.
टेस्ट पण बऱ्याच ऍक्युरेट असतात.

व्हिटॅमिन ड च्या टेस्ट मध्ये प्रमाण 2 आले आहे. लॅबनेच फोन करून चौकशी केली की दुसरी काही औषधे चालू आहेत का वगैरे. कारण सामान्यतः इतके कमी प्रमाण दिसत नाही म्हणून टेस्ट results incorrect आलेत का अशी त्यांना शंका आली.

पायाची हाडे आणि स्नायू खूप जास्त दुखतात. तसेच बरगड्याही सतत दुखत असतात. पायऱ्या चढता येत नाही आणि चालताना ही खूप त्रास आहे. संधीवाताच्या टेस्टस निगेटीव्ह आहेत. Xray मध्ये ही तसा काही प्रॉब्लेम दिसत नाही म्हणाले डॉक्टर. व्हिटॅमिन ड चे सपप्लिमेंट्स सांगितले आहेत.
पण तेच कारण आहे की आणखी काही असू शकेल याचे कन्फर्म निदान अजून नाही.

स्पार्कल,
योग्य ते निदान होऊन लवकर आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

ब्रेस्ट कॅन्सर च्या ५०% पेशंट मध्ये पहिले डी व्हिटामिन डेफिशिअन्सी आढळते असे वाचनात आले. हाडांमध्ये मेटास्टाइज झाला की पण हाडे कमकुवत होतात. त्याची सुरुवात ही कॅल्शिअम व डी व्हिटामिन डेफि शिअन्सी मधून झालेली असते पण ते तेव्हा लक्षात येत नाही.

मागे एकदा ऑफिसमध्ये फुल्ल बॉडी चेक अप केले होते तेव्हा डॉक्टरांनी SUN D गोळ्या लिहून दिल्या कारण शरीरात D व्हिटॅमिन कमी आहे असे सांगितले पण या गोळ्या खायला सुरुवात केल्यावर (डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ) काही दिवसाने शरीरावर उबाळू उठायला सुरुवात झाली एक उठले कि ते बरे व्हायला आठवडा लागायचा आणि मग दुसऱ्या ठिकाणी उगवायचे शेवटी गोळ्या बंद केल्यावर हा सिलसिला बंद झाला। माझ्यात D व्हिटॅमिन जास्त झाले का????

अजनबी ,
ड जीवनसत्व जर गरज नसताना मोठ्या प्रमाणात अनेक महिने घेतले गेले तर त्याचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. ते मुख्यत्वे शरीरातील कॅल्शिअमचे साठे वाढल्याने होतात.

प्रमुख लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता, हाडे व पाठ दुखणे, खूप तहान लागणे आणि खूप लघवी होणे ही महत्त्वाची आहेत. त्वचेच्या बाबतीत खाज येणे हे एक लक्षण असू शकते.
परंतु तुम्ही म्हणता तसे उबाळू हे माझ्या तरी पाहण्यात किंवा वाचण्यात नाहीत.

कुमार साहेब तुम्ही म्हणता तसेच असेल परंतु मला खरोखर असा अनुभव आलाय मला बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात नाहीय बहुदा उष्णतेने आले असतील पण मी गोळ्या फक्त एकच महिना घेतल्या होत्या पूर्ण कोर्से नाही केल।

व्हिटॅमिन ड च्या टेस्ट मध्ये प्रमाण 2 आले आहे. लॅबनेच फोन करून चौकशी केली की दुसरी काही औषधे चालू आहेत का वगैरे. कारण सामान्यतः इतके कमी प्रमाण दिसत नाही म्हणून टेस्ट results incorrect आलेत का अशी त्यांना शंका आली.

पायाची हाडे आणि स्नायू खूप जास्त दुखतात. तसेच बरगड्याही सतत दुखत असतात. पायऱ्या चढता येत नाही आणि चालताना ही खूप त्रास आहे. संधीवाताच्या टेस्टस निगेटीव्ह आहेत. Xray मध्ये ही तसा काही प्रॉब्लेम दिसत नाही म्हणाले डॉक्टर. व्हिटॅमिन ड चे सपप्लिमेंट्स सांगितले आहेत.
पण तेच कारण आहे की आणखी काही असू शकेल याचे कन्फर्म निदान अजून नाही.

Submitted by Sparkle on 1 June, 2021 - 12:17 >>>>>>>>
Vitamin B ची कमतरता होती. त्यामुळे हा त्रास होत होता.
B आणि D suppliment नी आता खूप सुधारणा झाली आहे. चालणे, पायर्‍या चढणे उतरणे पूर्ण नाॅरमल झाले आहे. Maintenance साठी suppliment घेत रहायला सांगितले आहे.
B चेतासंस्थेसाठी फार गरजेचे आहे.

Pages