सिम्बा - पूर्ण मसालेदार थाळी! (फक्त चित्रपटाच्या चर्चेसाठी)

Submitted by अज्ञातवासी on 30 December, 2018 - 08:14

एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथला कॅप्टन आपलं मनापासून स्वागत करतो, आणि तिथली थाळी सजेस्ट करतो. आपण ती थाळी मागवतो.
आणि पहिल्या घासाबरोबर आपल्याला ती थाळी कुठंतरी खाल्यासारखी वाटते. तीच चव, तेच पदार्थ, लहेजा मात्र बदललेला. ही थाळी जुन्या थाळीपेक्षाही चांगली वाटते पण...
...सिग्नेचर डिश मात्र जुनीच चांगली होती असं वाटत.
सिम्बा ही अशीच एक थाळी आहे, जिला बघितल्यावर टेम्परची क्षणाक्षणाला आठवण येते. नाही, चित्रपट फ्रेम टू फ्रेम कॉपी नाही. पण मूळ रेसिपी मात्र... कॉपी...
मात्र ह्या कोपीचं मराठीकरण करताना रोहित शेट्टीने कुठलीही कसर सोडलेली नाही, उलट सिम्बा टेम्परपेक्षा खूप सुंदर वाटतो. कलरफुल, अस्सल मराठी मातीतला वाटतो.
तर चित्रपटाची कथा मी सांगणार नाही, कारण कथा एका वाक्यात संपते, एका भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्याच मतपरिवर्तन होऊन दुष्टांच निर्दालन! चित्रपटाची पटकथाही सरळसोट आहे, पण ज्याने संवाद लिहिलेत, त्याला दाद द्यावीशी वाटते. मसाला ऍक्शन चित्रपटात एकवेळ कथा नसेल तर चालेल, पण दमदार ऍक्शन बरोबर जबरदस्त संवाद हवेच असतात, आणि हे संवाद जमून गेलेत. अक्षरशः ओठावर रुळतात.
मुजिक, पुन्हा मी म्हणेन, बॉलीवूडने ऑप्शनला टाकलेला विषय. कुठलंही गाणं आवडत नाही, ओठावर रुळत नाही, पण गाण्यांचं चित्रीकरण सुंदर झालंय. चित्रीकरण... कोरिओग्राफी नाही. रणवीरचा वापरच करून घेता आला नाही. पार्श्वसंगीतही गरज नसताना ढनाना वाजत राहतं. मिका सिंगने तर आँख मारेची वाट लावलीय...
सिनेमॅटोग्राफी मी म्हणेन भडक पण सुंदर. आपल्या मसाला जॉनरला जागणारी, काही फ्रेमस खूप सुंदर वाटतात. ओव्हरऑल नाईस वर्क...
आता वळूयात दिग्दर्शनाकडे. रोहित शेट्टीला जे दाखवायचं होतं, तो ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरतो. चित्रपटातील प्रत्येक संवाद, प्रत्येक घटना, प्रेक्षकांच्या मनावर ठसते, आणि कुठेही तुटलेपणा जाणवत नाही, फक्त पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जोडताना थोडी मेहनत घ्यायला हवी होती, असं वाटतं.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या कर्माने आणि स्पेशल मेंशन असं बोलेन. सर्व सहकलाकार मग तो सौरभ असो, सिद्धार्थ असो, की आशुतोष राणा असुदेत. सगळे अक्षरशः तो रोल जिवंत करतात, आणि प्रत्येकाला आपला पार्ट व्यवस्थित साकारायला मिळेल, याची रोहित शेट्टी व्यवस्थित काळजी घेतो. नेहा महाजनही सुंदर दिसते.
सोनू सूद, हा माणूस व्हिलन बनून जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा आपली छाप सोडतो. इथे सोनू रियल व्हिलन वाटतो, आणि रणवीरच्या स्टारडमसमोर उठूनही दिसतो.
सारा अली खान! हिचा पडदयावर वावर दुसऱ्याच चित्रपटात इतका सहज असेल, हअसं कधीच वाटलं नव्हतं. ती पडद्यावर खूप सुंदर दिसते. तिची संवादफेकही छान आहे. आणि अभिनयही सुरेख....
रणवीर सिंग... याविषयी लिहिताना मला मिक्स फिलिंग आहेत. एकतर देहबोली आणि एनर्जी मध्ये रणबीर खूपच प्रॉमिसिंग वाटतो. संवादफेक करतांना त्याची बॉडी लँग्वेज संवादातील सगळं काही सांगून जाते...
...पण राजा, असं मराठी कुणी नाही बोलत रे. कानाला खटकतं. उच्चारांवर मेहनतीची गरज होती, आणि भाषेवरही.
आणि स्पेशल मेंशन, वैदेही...
ही या चित्रपटात इतकी सुंदर दिसते, की साराऐवजी हिला घेतलं असतं तर चाललं असत. ही फ्रेममधून गेली, तर का गेली, असा प्रश्न पडतो, इतकी ती सुंदर दिसते. आणि अभिनयही छान केलाय...
पण...
हा पण आहे तुलनेचा. परीक्षण करतांना शक्यतोवर एका चित्रपटाची तुलना दुसऱ्याशी करू नये, पण रिमेकमध्ये ही तुलना अपरिहार्य होते, आणि इथे रणवीर कमी पडतो... कारण...
NTR Jr...
टेम्पर मध्ये NTR ची देहबोली प्रचंड आक्रमक आहे. कुठलाही मुलाहिजा न बाळगता भ्रष्टाचार करणारा, आणि एका घटनेनं हादरून कर्तव्यदक्ष होणारा इन्स्पेक्टर यात
कुठेही खोटेपणा जाणवत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये तो रियल वाटतो, इव्हन ग्रे शेडमध्ये सुद्धा...
...आणि हीच सिग्नेचर डिश टेम्पर मध्ये उजवी आहे. तरीही सिम्बा इज कम्प्लेट पॅकेज, आणि सम्पूर्णपणे टेम्पर पेक्षा उजवा आहे.
...सगळंच चांगलं असेल, तर माणूस नव्याच्या शोधात निघणार नाही, बरोबर ना?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारा अली खान!
>>
ही सैफ अली खानची कोणी आहे का?

सिंबाचे सोकॉलड चटपटीत संवाद ऐकलेत. याबाबतीत बॉलीवूड दाक्षिणात्य सिनेमांकडे जातोय. दर्जा वेगाने घसरतोय. पण त्यापेक्षा चिंतेची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना तेच दर्जेदार वाटू लागलेय

सिंबाचे सोकॉलड चटपटीत संवाद ऐकलेत. याबाबतीत बॉलीवूड दाक्षिणात्य सिनेमांकडे जातोय. दर्जा वेगाने घसरतोय. पण त्यापेक्षा चिंतेची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना तेच दर्जेदार वाटू लागलेय>>+११११११११११११११११११११११११
प्रचंड अनुमोदन. थिल्लर करमणुकीचे कौतूक करायचे आणि नवनवे प्रयोग करून प्रेक्षकांना सकस करमणूक देण्याचे धाडस दाखवणार्‍या दर्जेदार सिनेमांचे वाभाडे काढायचे.. अतिशय दुर्दैवी आहे हे.

सिंबाचे ट्रेलर बघून आणि कथाबीज ऐकून रावडी राठोडची शंका आलेली. परीक्षण वाचून खात्री पटली. सो बेसिकल्ली ईटस नॉट माय टाईप. पण तरी रावडी चारपाच तुकड्यात बघितला गेलेला. सिंबाबाबत तसे होण्याची शक्यता कमी. कारण तेव्हा मी हातात वेळ असला काहीही बघायचो. आता आपल्या अभिरुचीनुसारच चित्रपट बघतो.

बाकी माझ्या आवडीनिवडीपलीकडे तटस्थ विचार करता रणबीर सिंगमध्ये कुछ बात तो है. त्याच्या चित्रपटांबद्दल चर्चा करायला मजा येते. तो गरीबांचा सुपर्रस्टार आहे. त्याच्यासाठी ही भुमिकाही साजेशी वाटतेय. त्याने आपल्यापरीने न्याय दिला असावा या मसालापटाला.

छान लिहीलंय परीक्षण.
चित्रपटगृहात जाउन बघण्याइतका खास वाटत नाहीय. टीव्हीवर आला की बघेन.

सारा अली खान!
>>
ही सैफ अली खानची कोणी आहे का?
>>मुलगी

चांगले लिहले आहे.
'आता वळूयात ...कडे' हा तुमचा आवडता प्रकार आहे वाटतं Proud

चांगला लिहिलंय.
टेम्पर माहित नाही. पण मला सिंबा - सिंघम, रावडी राठोड, दबंग चं मिक्चर वाटलाय.
आणि टवाळा आवडे विनोद उक्तीनुसार आवडला आहे. Happy
असे टवाळ सिनेमे त्या त्या वेळेपुरते एन्जॉय करता येतात मला. Happy

कालच पाहीला Happy

स्पेशल मेंशन, वैदेही...
ही या चित्रपटात इतकी सुंदर दिसते, की साराऐवजी हिला घेतलं असतं तर चाललं असत. ही फ्रेममधून गेली, तर का गेली, असा प्रश्न पडतो, इतकी ती सुंदर दिसते. आणि अभिनयही छान केलाय... >> हेच वाटले अगदी Happy

रणवीर एकदम एनर्जेटीक आहे आणि सिनेमात तसाच वावरलाय. मस्त वाटला.
त्याचे मराठी एवढे काही वाईट नाहीये. त्याच्यावरुन त्याने नजर हलू दिली नाहीये हे खरे!
संवाद आवडले. दोन्ही जुनी गाणी आवदली हे विशेष Happy

बाकी अब्बा, डब्बा, जब्बा चा इतका सुंदर उपयोग आधी कुणीच केलेला नाही. आख्खे थिएटर कित्ती वेळ हसत होते Lol

सारा मस्तच! स्टार किड म्हणून तिच्याबद्दल जरा साशंक होते. पण सुरेख दिसली पण आहे आणि अभिनय पण छान केलाय. तिला पहातांना तरुणपणची अमृता सिंग आठवते. ड्रेस छान आहेत तिचे!

देवी आली काय अंगात >> +११ Lol
बिचारा इतक्या रोम्यांटिक मूडमधे असतो आनि एकदम असा फोन.....

'आज फिर फीशकरीत फीश विसरली....असेल बघ नीट....खाने का डिब्बा है..समुदंर थोडी है।" Lol

बूट उतारके आओ....मग जे होतं....मला आधी आश्चर्य वाटल, इतक्या सुमडीत बूट कसे काढले ह्याने? Happy

संवाद इतके चटपटीत आहेत की एकावर हसून होईपर्यात दुसरा षटकार लागतो. Lol

टेम्पर मध्ये NTR ची देहबोली प्रचंड आक्रमक आहे. कुठलाही मुलाहिजा न बाळगता भ्रष्टाचार करणारा, आणि एका घटनेनं हादरून कर्तव्यदक्ष होणारा इन्स्पेक्टर यात
कुठेही खोटेपणा जाणवत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये तो रियल वाटतो, इव्हन ग्रे शेडमध्ये सुद्धा...>> अगदी बरोबर.

चांगले लिहले आहे.
'आता वळूयात ...कडे' हा तुमचा आवडता प्रकार आहे वाटतं >>>> धन्यवाद. तसं काही नाही, फ्लो मध्ये लिहल जातं

@विनिता धन्यवाद!

@ सस्मित आणि विनिता - देवी आली का अंगात हे ऐकून मी उडालोच होतो खुर्चीतुन. तो अब्बा डब्बा जब्बा चा सिन मी मिस केला. नेमका कधी होता तो सिन?

९६ क धन्यवाद

श्रद्धा आणि मेघा, तुम्हाला थँक्स नाही म्हणणार, तुमचा प्रतिसाद माझा हक्काचा आहे Wink

बूट उतारके वाला ईशान चा बाबा.
पिक्चर ला गंभीर वळण देणाऱ्या मुलीचे बाबा पण कोणत्यातरी प्रसिद्ध सिरीयल मध्ये/पिक्चर मध्ये पाहिले आहेत.आता आठवत नाही.
सीडी टेम्पर करणारा वृद्ध कॉन्स्टेबल किशोर नांदलस्कर होते का?

सीडी टेम्पर करणारा वृद्ध कॉन्स्टेबल किशोर नांदलस्कर होते का?>>>हो, तेच आहेत.
एक क्राइम पँट्रोलवर दिसणारे पोलीस ह्या पिक्चरमध्ये बघून मस्त वाटले.

टेम्पर मध्ये NTR ची देहबोली प्रचंड आक्रमक आहे. कुठलाही मुलाहिजा न बाळगता भ्रष्टाचार करणारा, आणि एका घटनेनं हादरून कर्तव्यदक्ष होणारा इन्स्पेक्टर यात
कुठेही खोटेपणा जाणवत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये तो रियल वाटतो, इव्हन ग्रे शेडमध्ये सुद्धा >> टेंपर पाहिलेला आहे त्यामुळे हा काय जावून बघणार नाही.

अज्ञातवासी, सिम्बाच्या थाळीत मसाल्याचा आस्वाद घेताना मीठ कमी पडलेलं तुम्हाला दिसलं नसावं बहुतेक. सिनेमात सगळी पात्रं हात चालवत असली की प्रेक्षकाने डोकं चालवू नये, असं फक्त रोहित शेट्टीला नाही, मलाही वाटतं . पण तरीही काही गोष्टी जामच डोक्यात गेल्या.

स्पॉयलर अलर्ट -

इंटरव्हलनंतरच्या भागात बलात्कारासारख्या गंभीर गोष्टीचा वापर करून पब्लिकच्या भावनांना हात घालायचा प्रयत्न केलाय, तो अगदी केविलवाणा वाटतो. अत्याचारासारख्या ज्वलंत विषयावर दर एक वाक्याआड मसालेदार संवाद प्रत्येक पात्राच्या तोंडात घुसवून शेट्टीने अक्षरशः विचका केलाय त्याचा. बझारमे नंगा करके मारना चाहिये, औजार काट देना चाहिये टाईपचे डायलॉग ऐकून ही फिल्म रोहित शेट्टीच्या ऐवजी कांती शाहने डायरेक्ट केली कि काय असं वाटून राहतं.

सगळ्यात वरताण म्हणजे तो फेक एन्काऊंटरचा सीन. त्या सीनपूर्वी सगळ्या बायका दुर्गेच्या आवेशात बलात्काऱ्यांना काय शिक्षा केली पाहिजे, यावर तावातावाने चर्चा करत असतात. मग आपला हिरोने, सिम्बाने काय करावे? त्यांना थेट बलात्काऱ्यांचा एन्काऊंटर करायची ऑफर देऊन तो आधीच पेटलेल्या आगीत अख्खा तेलाचा डबा उपडी करतो. आता माझ्यासारख्या एखाद्या पामर प्रेक्षकाला वाटेल, पडद्यावरच्या दुर्गा त्वेषाने हातात बंदूक, पट्टा, चपला, काय हाती सापडेल ते घेऊन चौकीकडे कूच करतील.....
पण नाही. त्या जातात किचनमध्ये. मला वाटलं चला, आतून किमान लाटणी, उलाथणी, परातणी नाहीतर अगदीच गेलाबाजार मिरचीपूड घेऊन रणरागिणी बाहेर येतील. पण हायरे माझ्या कर्मा, त्या घेऊन येतात डबे. पिठाचे नाही, जेवणाचे.

अन या चंडिका हातातल्या डब्यासरशी चौकीत येऊन काय करतात ? तर बाकी पोलीस आरोपींच्या मर्दानगीवर करत असलेल्या तद्दन फालतू कंमेंट्सवर फिदीफिदी हसत राहतात, बस्स. हे पाहिल्यासरशी माझ्या मस्तकातली शीर ताडताड उडायला लागली, पण लगेच ऍक्शन सुरु झाल्यामुळे कसंबसं स्वतःला आवरलं. अरे प्रसंगांचं गांभीर्य काय, तुम्ही करताय काय ?

असल्या छपरी, सडकछाप संवादामुळे एका चांगल्या कथेचं पार खोबरं करून टाकलंय शेट्टीनं. नको तिथे भरपूर मसाला आणि पाहिजे तिथे पांचटपणा करून दुसऱ्या भागात प्रेक्षकांचं अपचन कसं होईल याची पुरेपूर काळजी रोहितने घेतली आहे.

त्यातल्या त्यात ऍक्शनचा तडका मधेमधे मारल्यामुळे सिनेमा निदान डोळे उघडे ठेऊन बघता तरी येतो. वर सिंघमभाऊंची एन्ट्री म्हणजे चेरी ऑन द केक ! बाकी सगळा अडाण्यांचा खेळ.

च्यकच्यक Sad

चित्रपटाबद्दल इतरत्र काहीही वाचलं नाही. पण इथे माबोवरचेच धागे, प्रतिसाद, वैदेही म्हणजे हिरोची बहीण, मध्यंतरापाशी होणारी गंभीर घटना वगैरे वाचून काय माहित का पण मलादेखील गुंडा आणि खंबा कर दिया वगैरे डायलॉगच आठवला होता. तो चित्रपट मी पाहिला नाही फक्त काही सीन पाहिलेत युट्युबवर (डोक्यावर हात मारून घेणारी भावली)

===
https://m.rediff.com/movies/review/simmba-review-little-to-roar-about/20... ही एक ऋण समीक्षा सापडली.

विलभ, काय खटकतंय हे कळत नव्हतं.त्यावर तुम्ही नेमकं बोट ठेवलंत.
वैदेही चं पात्र पडद्यावर पाहिल्या पाहिल्या कळलं की पुढे हा कंटेक्स्ट येणार आहे.सिनेमा लाईट आणि हिरो ला सुपर हिरो करायच्या नादात मूळ विषयाच्या गांभिर्याचा विचका झालाय.
पण आपण असं समजुया की तो संदेश सर्वांपर्यंत पोहचायला हे आवश्यक होतं.तो थोडा पोहचेल असं समजुया.(तसेही पिक्चर समाजाला संदेश द्यायला बनत नाहीत मला माहिती आहे.आणि तरीही पिक्चर मधून चांगला संदेश जास्त प्रिचिंग न करता दिला गेला तर आवडतो.)

विलभ, सगळं खरंय, पण परीक्षण लिहिताना स्पोयलर द्यायचे नाही म्हणून लिहिलं नाही.
दुसरी गोष्ट, हा चित्रपट काही वास्तववादी वगैरे नाहीये. त्याच्या ट्रेलवरूनच हे कळत होतं. इट्स मसाला जॉनर, आणि इथे भडकपणा दाखवलाच जातो, त्याशिवाय चित्रपट इफेक्ट देत नाही.
हे चित्रपट बघताना प्रेक्षाकांच्या अपेक्षा ठराविक साच्यात असतात. जास्त मारधाड हवी, चुरचुरीत डायलॉग हवेत, रंजित चित्रण हवं! हाच मसाला एनकाउंटरचा सिन देतो, मुळात चित्रपटाला वळण देणारा हाच सिन...
हा चित्रपट कुठलाही सामाजिक प्रश्न वगैरे सोडवण्याचा दावा करत नाही. फक्त मनोरंजनासाठी हा बनलाय. आणि जर वास्तववादी वगैरे करायचा झाला ना, तर कोर्टाचे सिन कोर्ट मध्ये घेतले, तसे घेता येतील. बघेल कुणी असा चित्रपट?
हा प्रेक्षक ठराविक सच्यातला आहे. त्याला दोन क्षण मनोरंजन हवं असतं. त्याला कळतंय, सगळं खोटंय, पण दोन क्षण तो आभासी विश्वात रमतो, आणि बाहेर पडल्यावर आहेच, वास्तववादी जीवन!

मी अनु आणि ऑर्किड, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
धनी टेम्पर बघितला असेल तर नो निड!
अॅमी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

खळखळून हसलो किंवा दाद दिली गेली असे दोनच प्रसंग आठवतात.
पहिला - सिम्बाचं तु ही रे च्या चालीत 'मोहीले' गाणं..
दुसरा - सिंघम ची एंट्री !
बाकी विलभ यांच्या प्रतिक्रियेशी सहमत..
सिनेमाभर सिम्बा खोटा खोटाच वाटत राहतो. त्याची डायलॉग बाजी कोणाच्या तरी स्टाइल मधे बोलायचा अट्टाहास केल्यासारखी (चिडवल्यासारखी) नाटकीच वाटत राहते.

अनु आणि मित
>>>>>पण राजा, असं मराठी कुणी नाही बोलत रे. कानाला खटकतं. उच्चारांवर मेहनतीची गरज होती, आणि भाषेवरही.
हे लिहिलं आहेच.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

taran adarsh

@taran_adarsh
#Simmba sets the BO on fire....Has a fantastic weekend... Growth on Day 3 [vis-à-vis Day 2]: 33.13%... Should record solid numbers today [31 Dec] and tomorrow [1 Jan]… Fri 20.72 cr, Sat 23.33 cr, Sun 31.06 cr. Total: ₹ 75.11 cr. India biz

वेलडन सिम्बा! आता डिस्ट्रिब्युटर सुखाने नववर्ष साजरं करतील!

बझारमे नंगा करके मारना चाहिये, औजार काट देना चाहिये टाईपचे डायलॉग ऐकून ही फिल्म रोहित शेट्टीच्या ऐवजी कांती शाहने डायरेक्ट केली कि काय असं वाटून राहतं. >>>>>>> असहमत. मला हे डायलॉग कुठेही मसालेदार किव्वा भडक वाटले नाही. जनरली कुठल्याही सेन्सिटिव्ह माणसाची रेपिस्ट विरोधात अशीच मते असतात/ असावीत खर्या आयुष्यात.

Currently, the film stands at Rs. 96.35 crore and as you read this, Rs. 100 crore would already have been crossed.

( सौजन्य: बॉलिवुडहन्गामा)

इकडे झिरो १०० करोड करण्यासाठी तडफडतोय. तिकडे सिम्बाने हे पाच दिवसात करुन दाखवल सुद्दा. वेल डन!

@सुलू_८२>>>>>> हे वर्ल्डवाईड कलेक्शन आहे, की चार दिवसांचं भारतीय कलेक्शन?
असो. झिरो १०० करोड करू शकणार नाही हे कन्फर्म झालंय आता. इतकाही वाईट नव्हता.

Pages