सिम्बा - पूर्ण मसालेदार थाळी! (फक्त चित्रपटाच्या चर्चेसाठी)

Submitted by अज्ञातवासी on 30 December, 2018 - 08:14

एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथला कॅप्टन आपलं मनापासून स्वागत करतो, आणि तिथली थाळी सजेस्ट करतो. आपण ती थाळी मागवतो.
आणि पहिल्या घासाबरोबर आपल्याला ती थाळी कुठंतरी खाल्यासारखी वाटते. तीच चव, तेच पदार्थ, लहेजा मात्र बदललेला. ही थाळी जुन्या थाळीपेक्षाही चांगली वाटते पण...
...सिग्नेचर डिश मात्र जुनीच चांगली होती असं वाटत.
सिम्बा ही अशीच एक थाळी आहे, जिला बघितल्यावर टेम्परची क्षणाक्षणाला आठवण येते. नाही, चित्रपट फ्रेम टू फ्रेम कॉपी नाही. पण मूळ रेसिपी मात्र... कॉपी...
मात्र ह्या कोपीचं मराठीकरण करताना रोहित शेट्टीने कुठलीही कसर सोडलेली नाही, उलट सिम्बा टेम्परपेक्षा खूप सुंदर वाटतो. कलरफुल, अस्सल मराठी मातीतला वाटतो.
तर चित्रपटाची कथा मी सांगणार नाही, कारण कथा एका वाक्यात संपते, एका भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्याच मतपरिवर्तन होऊन दुष्टांच निर्दालन! चित्रपटाची पटकथाही सरळसोट आहे, पण ज्याने संवाद लिहिलेत, त्याला दाद द्यावीशी वाटते. मसाला ऍक्शन चित्रपटात एकवेळ कथा नसेल तर चालेल, पण दमदार ऍक्शन बरोबर जबरदस्त संवाद हवेच असतात, आणि हे संवाद जमून गेलेत. अक्षरशः ओठावर रुळतात.
मुजिक, पुन्हा मी म्हणेन, बॉलीवूडने ऑप्शनला टाकलेला विषय. कुठलंही गाणं आवडत नाही, ओठावर रुळत नाही, पण गाण्यांचं चित्रीकरण सुंदर झालंय. चित्रीकरण... कोरिओग्राफी नाही. रणवीरचा वापरच करून घेता आला नाही. पार्श्वसंगीतही गरज नसताना ढनाना वाजत राहतं. मिका सिंगने तर आँख मारेची वाट लावलीय...
सिनेमॅटोग्राफी मी म्हणेन भडक पण सुंदर. आपल्या मसाला जॉनरला जागणारी, काही फ्रेमस खूप सुंदर वाटतात. ओव्हरऑल नाईस वर्क...
आता वळूयात दिग्दर्शनाकडे. रोहित शेट्टीला जे दाखवायचं होतं, तो ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरतो. चित्रपटातील प्रत्येक संवाद, प्रत्येक घटना, प्रेक्षकांच्या मनावर ठसते, आणि कुठेही तुटलेपणा जाणवत नाही, फक्त पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जोडताना थोडी मेहनत घ्यायला हवी होती, असं वाटतं.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या कर्माने आणि स्पेशल मेंशन असं बोलेन. सर्व सहकलाकार मग तो सौरभ असो, सिद्धार्थ असो, की आशुतोष राणा असुदेत. सगळे अक्षरशः तो रोल जिवंत करतात, आणि प्रत्येकाला आपला पार्ट व्यवस्थित साकारायला मिळेल, याची रोहित शेट्टी व्यवस्थित काळजी घेतो. नेहा महाजनही सुंदर दिसते.
सोनू सूद, हा माणूस व्हिलन बनून जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा आपली छाप सोडतो. इथे सोनू रियल व्हिलन वाटतो, आणि रणवीरच्या स्टारडमसमोर उठूनही दिसतो.
सारा अली खान! हिचा पडदयावर वावर दुसऱ्याच चित्रपटात इतका सहज असेल, हअसं कधीच वाटलं नव्हतं. ती पडद्यावर खूप सुंदर दिसते. तिची संवादफेकही छान आहे. आणि अभिनयही सुरेख....
रणवीर सिंग... याविषयी लिहिताना मला मिक्स फिलिंग आहेत. एकतर देहबोली आणि एनर्जी मध्ये रणबीर खूपच प्रॉमिसिंग वाटतो. संवादफेक करतांना त्याची बॉडी लँग्वेज संवादातील सगळं काही सांगून जाते...
...पण राजा, असं मराठी कुणी नाही बोलत रे. कानाला खटकतं. उच्चारांवर मेहनतीची गरज होती, आणि भाषेवरही.
आणि स्पेशल मेंशन, वैदेही...
ही या चित्रपटात इतकी सुंदर दिसते, की साराऐवजी हिला घेतलं असतं तर चाललं असत. ही फ्रेममधून गेली, तर का गेली, असा प्रश्न पडतो, इतकी ती सुंदर दिसते. आणि अभिनयही छान केलाय...
पण...
हा पण आहे तुलनेचा. परीक्षण करतांना शक्यतोवर एका चित्रपटाची तुलना दुसऱ्याशी करू नये, पण रिमेकमध्ये ही तुलना अपरिहार्य होते, आणि इथे रणवीर कमी पडतो... कारण...
NTR Jr...
टेम्पर मध्ये NTR ची देहबोली प्रचंड आक्रमक आहे. कुठलाही मुलाहिजा न बाळगता भ्रष्टाचार करणारा, आणि एका घटनेनं हादरून कर्तव्यदक्ष होणारा इन्स्पेक्टर यात
कुठेही खोटेपणा जाणवत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये तो रियल वाटतो, इव्हन ग्रे शेडमध्ये सुद्धा...
...आणि हीच सिग्नेचर डिश टेम्पर मध्ये उजवी आहे. तरीही सिम्बा इज कम्प्लेट पॅकेज, आणि सम्पूर्णपणे टेम्पर पेक्षा उजवा आहे.
...सगळंच चांगलं असेल, तर माणूस नव्याच्या शोधात निघणार नाही, बरोबर ना?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात काय आवडलं तर मराठी कलाकारांना मिळालेला मोठा वाव , रणवीरचं काम चांगलं आहे , पण पैसे फिटले ते अजय देवगणच्या एंट्रीवर .

जाऊदे त्यानिमित्ताने तरी रानडे किंवा कुलकर्णी लोकांना सिनेमात वेगळे करियर करायला मिळतेय.नाहीतर बिचारे बँक मध्येच असतात सिनेमात पण.>>>> हो ना, धमाल सिनेमा मध्ये इन्स्पेक्टरच आडनाव 'कुलकर्णी' होतं, तो एनकाऊन्टर करणारा पोलीस, ते आठवलं

जेमतेम अर्धा तास बघू शकलो हा सिनेमा आणि बंद केला. एक चित्रपट (ह्यात कथा, दिग्दर्शन वगैरे सगळं आलं) आणि करमणूक म्हणून बघायचे झाल्यास दर्जा शून्य. नॉनसेन्स कॉमेडी किंवा डोक्याला ताप नाही टाईप सिनेमा म्हणून जो काही पाचकळ पणा गेली काही वर्ष सुरु झालाय त्याला काहीच दर्जा नाही. फँटसी किंवा अतिरंजित विनोद एकवेळ चालतो पण कथेच्या नावाखाली काहीही खरडायचं आणि त्याला सिनेमा म्हणायचं हे डोक्यात गेलं.

नवीन Submitted by चौकट राजा on 9 January, 2019 - 21:09 >>

पुर्ण सहमत. मला तर अजिबात आवडला नाही सिनेमा, पैसे वेळ सर्वच वाया गेलं.
पण सिनेमा रणवीर च्या जोरावरच चालतोय बहुधा जो काही चालतोय तो.

Pages