झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायझेनबर्ग तेव्हा मी त्या चर्चेत नसेन, नाहीतर माझा हात नक्की वर राहिला असता आज.
मी वर जे लिहिलंय ते कळकळीने, किंबहुना तुम्ही कुठंही लिहीत असला तर मला लिंक द्या, कारण तुमचं लेखन मला मनापासून आवडत. तुमच्या सगळ्या कथा मला आवडतात.
असो.या जमलं तर दुस्तरचा पुढचा भाग लिहा कधीतरी. बघू तरी दे आम्हाला, शेवटी खोलीत पुन्हा धान्याच्या राशी पडल्या, की खोलीच उरली नाही...

Submitted by अज्ञातवासी on 24 December, 2018 - 21:39

∆∆∆∆∆∆∆∆∆

अज्ञातवासी, शीर्षकातून (फक्त चित्रपटाच्या चर्चेसाठी) हे वगळता येईल का? तुम्ही स्वत:च पुन्हा पुन्हा हा नियम मोडत आहात. मी पुन्हा चर्चा चित्रपटाकडे नेतोय तर तुम्ही माझाही स्त्युत्य प्रयत्न हाणून पाडत आहात. जाणूनबुझून चित्रपटाबद्दल नकारात्मकच प्रतिसाद येतील हे बघणे आणि कोणी चांगल्या गोष्टी दाखवताच धागा स्थलांतरीत करणे वा स्वताच भरकाटवणे याचा मी ऋन्मेष एक शाहरूखचा चाहता म्हणून निषेध करतो.

ऋन्मेश, पोस्ट उद्धृत करायला हरकत नाही पण तुमचा नि माझा शाहरूख वेगळाच आहे हो. आता यावर परत पोस्ट टाका, हरकत नाही.

पण तुमचा नि माझा शाहरूख वेगळाच आहे
>>>

येस्स नक्कीच!
मी मागेही एकदा म्हटलेले. शाहरूख हा एका हत्तीसारखा आहे आणि प्रेक्षक त्या चार आंधळ्यासारखे.. ज्यांना त्याचे जे रूप दिसते तसा ते शाहरूख बघतात Happy

त्या माणसाकडून शिकण्यासारखे बरेच आहे. एकीकडे जग त्याच्या सो कॉलड फ्लॉप चित्रपटाच्या पोवाड्यात रममाण असेल दुसरीकडे तो नव्या उमेदीने तितक्याच ताकदीने पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागला असेल...

पण तुमचा नि माझा शाहरूख वेगळाच आहे
>>>

येस्स नक्कीच!
मी मागेही एकदा म्हटलेले. शाहरूख हा एका हत्तीसारखा आहे आणि प्रेक्षक त्या चार आंधळ्यासारखे.. ज्यांना त्याचे जे रूप दिसते तसा ते शाहरूख बघतात Happy

त्या माणसाकडून शिकण्यासारखे बरेच आहे. एकीकडे जग त्याच्या सो कॉलड फ्लॉप चित्रपटाच्या पोवाड्यात रममाण असेल दुसरीकडे तो नव्या उमेदीने तितक्याच ताकदीने पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागला असेल...

मी शाहरुखची खूप मोठी फॅन आहे. न चुकता त्याचे सिनेमे बघते. पण ZERO बघून बाहेर आल्यावर माझी कंमेंट होती शाहरुखने आता pause घ्यावा आणि नंतर दुसरी इंनिंग सुरु करावी. अमिताभच्या शेवटच्या काळात त्याने अकेला, मर्द, असे काही फुटकळ सिनेमे केले होते. तस झालाय शाहरुखच मागील २ वर्षात. म्हणूनच त्यानेही अमिताभप्रमाणे विचारपूर्वक दुसरी इनिंग सुरु करावी
झिरोमध्ये शाहरुखने काही मेहनतीचं केलेली नाही. काही वेगळं करावं त्याने ह्या रोलमध्ये अशी अपेक्षा होती. पण साफ निराशा झाली. तसाही अनुष्काला जास्त स्क्रीन स्पेस दिलाय. तिने अजिबात acting केली नाही फक्त ओठ वाकडे करून मोठाले डायलॉग्ज म्हटले. तिच्या आवाजाने इरीटेट होऊन डोकं दुखायला लागलं, कटरिनाबद्दल तर बोलायलाच नको.
दुर्दैवाने शाहरुख संपला असं म्हणायची वेळ येण्याआधी त्याने सावरून घ्यायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे

झिरो चौथा दिवस.
फक्त ९ कोटींची कमाई. टोटल कलेक्शन ६७ कोटी रुपये. बजेट २०० कोटी, मार्केटिंग १०० कोटींच्या आसपास. चित्रपट भारतात १०० कोटी गाठतो का नाही, यावर पैजा लागतायेत.
ठग्स पेक्षाही झिरोची अवस्था वाईट झालीये.

तसाही अनुष्काला जास्त स्क्रीन स्पेस दिलाय. तिने अजिबात acting केली नाही फक्त ओठ वाकडे करून मोठाले डायलॉग्ज म्हटले. +१

तुमच कितीही शाहरूखवर प्रेम असलं तरी हवा बदलेल, चर्चा सुरू झाली वगैरे निव्वळ स्वप्नरंजन आहे. झीरो वाईट पडला. माझ्या कॉलेजच्या स्टुडंट्स मध्ये सिंबाची चर्चा आहे.

हा 'दिल तो पागल है' 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' वालाच शाहरुख आहे, फक्त 'झिप' केलेला.

"एकीकडे जग त्याच्या सो कॉलड फ्लॉप चित्रपटाच्या पोवाड्यात रममाण असेल दुसरीकडे तो नव्या उमेदीने तितक्याच ताकदीने पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागला असेल..."
पण हे तर आम्ही देव आनंदकडून आधिच शिकलोय.
फरक इतकाच की देव आनंद त्याच्या स्टुडिओ मधून मिळालेले पैसे उधळायचा आणि हा.... असो

Thugs ला मार्केटिंग चा फायदा झाला होता. कतरीना ची गाणी चित्रपट आधी प्रदर्शित केली नाहीत, बरेच लोक कतरीना ला बघायला गेले.
कतरीना ची कंबर सोडून ठग्स मध्ये आणखी काहीच चांगले नव्हते.
Zero ठग्स पेक्षा चांगला आहे पण योग्य मार्केटिंग नाही, फर्स्ट डे खूप महत्त्वाचा असतो, तिथेच फसला.

झिरो नक्कीच ठग आणि रेस ३ पेक्षा उजवा आहे. पण आकडे वेगळं बोलताय.
मेबी सलमान आणि आमिरच स्टारडम शाहरुखपेक्षा मोठा झालंय Wink

मायबोलीवर आज पहिल्यांदा इमेज टाकल्याचा आनंद वेगळाच आहे.
वरील तिन्ही ग्राफ बघितले असल्यास लगेच समजतं, कौन कितने पाणी मे है!
आता कुणी म्हणेल यात ठग का नाही? कारण ऐकून अचंबा वाटेल, पण भारताच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अजून ठगचे शो चालू आहेत, त्यामुळे अजूनही रनिंग स्टेटस दाखवतोय..

कालच बघितला. भव्यदिव्य बिग बजेट मल्टिस्टार असा अत्यंत बकवास चित्रपट. अक्षरशः अत्याचार आहे हा चित्रपट पाहणे म्हणजे. बाकी लिहिण्यासारखे काऽऽऽऽऽहीही नाही त्या बाबत. माझी उत्तरे...

झिरो बघून मला काय मिळालं?
- झोपेचं खोबरं झालं

आनंद?
- चित्रपट संपल्यानंतर झाला

मी भावनिक झालो?
- What? Biggrin

माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला?
- हो उमटला. चांगला धडा मिळाला कि पुन्हा असले जाहिराती करून हाईप केलेले चित्रपट चुकुनही पहायचे नाहीत.

तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला.
- No way

>> एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं
>> Submitted by अमा on 24 December, 2018 - 09:06

अगदी अगदी. त्यापेक्षा कमल हसन ने तब्बल तीस वर्षापूर्वी केलेला बुटका "अप्पू राजा" कितीतरी पटीने सरस आहे. इथे VFX च्या नावाखाली पाट्या टाकायला सुद्धा नीट जमलेले नाही.

पिच्चर वन टाईम वोच आहे. लोक खूप निगेटिव्ह होतायत शाखा बद्धल. कित्येक लोक न बघता सुद्धा निगेटिव्ह पब्लिसिटी करत आहेत.
मला ठीक वाटला चित्रपट.

बजेट २०० कोटी, मार्केटिंग १०० कोटींच्या आसपास.
>>>

हे आकडे गंडलेले आहेत.
खरे आकडे असे बाहेर येत नाहीत. धंदा आहे हा.

हायझेनबर्ग, मी केला होता प्रयत्न पण शेवटी चिखल-कुस्ती न्याय लक्षात घेऊन मी माघार घेतली. पुर्वीच्या अनेक धाग्यांवर मी जाहीरपणे लिहीलेले सापडेल. अर्थात नंतर अनुभवातून शिकलो की त्याकडे दुर्लक्ष हाच एकमेव उपाय आहे.

अर्थात नंतर अनुभवातून शिकलो की त्याकडे दुर्लक्ष हाच एकमेव उपाय आहे.>>>> +१
कितीही उचकवायचा प्रयत्न झाला तरी. मीसुद्धा हेच करतोय! पण हायझेनबर्गसुदधा यात सहभागी होतायेत हे बघून राहवलं नाही.

पिच्चर वन टाईम वोच आहे. लोक खूप निगेटिव्ह होतायत शाखा बद्धल. कित्येक लोक न बघता सुद्धा निगेटिव्ह पब्लिसिटी करत आहेत.
मला ठीक वाटला चित्रपट.>>>>>+१
ट्विटर वर तर लोक इतकं निगेटिव्ह बोलतायेत, की झिरो फेक रिव्हयू ही बातमी झालीये. खरंच चित्रपटाच्या काही जमेच्या बाजू आहेत, जे मी परीक्षणात लिहिलंय.
पण ज्या शाह रुख वर अवॉर्ड आणि क्रिटिक्स विकत घेण्याचा नेहमी आरोप होत आलाय, त्या शाह रुख वर आज फेक रिव्ह्यूवर स्पष्टीकरण देण्याची वेळ यावी, याला काळाचा महिमा म्हणावं की काय?
आणि याला शाह रुख जबाबदार आहे, तितकेच त्याचे सो कॉल्ड अंधभक्त फॅनही, ज्यांना प्रत्येक गोष्टीत शाहरुख आणायचा असतोच. मग समोरचा कितीही महत्वाच्या विषयावर चर्चा करू दे, गाडी शाहरुखकडे वळतेच, आणि मग दुखावलेले लोक असं वागतात.
असो शाहरुखच्या एका फेक फॅनपायी कित्येक लोकांना शाहरुख आवडेनासा झालाय, हे आपण इथे बघितलेच आहे.

शाहरुखच्या एका फेक फॅनपायी कित्येक लोकांना शाहरुख आवडेनासा झालाय, हे आपण इथे बघितलेच आहे.+1111111111 >>> +१११११११११११११

शाहरुखच्या एका फेक फॅनपायी कित्येक लोकांना शाहरुख आवडेनासा झालाय, हे आपण इथे बघितलेच आहे.

नवीन Submitted by अज्ञातवासी on 25 December, 2018 - 13:00
>>>>

कोण आहे हा?
मला याचा बंदोबस्त करावाच लागेल Happy

पण ज्या शाह रुख वर अवॉर्ड आणि क्रिटिक्स विकत घेण्याचा नेहमी आरोप होत आलाय

√√√√√

तो एक्चुअली फिल्मफेअर एवार्ड सेट करतो असे मलाही वाटते.
पण यात काही गैर नाही असेही माझे मत आहे

Pages