मला काहीच आठवत नाहीये भाग २ - 'जमदग्नी!'

Submitted by अज्ञातवासी on 22 December, 2018 - 10:52

भाग १
https://www.maayboli.com/node/68392

सर्वकाही आठवण्याचा शाप भयंकर असतो, न आठवण्याचा सुद्धा...आणि ठरवून न आठवण्याचा सुद्धा... श्वेतला सर्वकाही आठवत होत. श्वेताला काहीही स्मृती नव्हती. आणि महाश्वेताने गतकाळातील काहीही न आठवण्यास स्वतःला प्रवृत्त केले होते. पण तो कालसेतू या तिघांना बांधत होता.... आणि एके दिवशी....'

"मने, ते पुस्तक ठेव आणि मला मदत कर बरे. सदानकदा काय त्या गूढकथा वाचत असतेस."

मने...मालतीबाई...सॉरी सॉरी... आई... आईने मला हे नाव दिल होत.

"बाबानी तुला लाडावून ठेवलय महिनाभरात. कायम खिडकीत काही ना काही वाचत असते. ते येतीलच आता दुकानातून. मस्तपैकी वरणाला फोडणी दे. मी पोळ्या घेते करायला आणि आज श्रीखंडही बनवूयात. तुला आवडते म्हणून काजूची उसळ बनवलीये." 

मला तोंडाला पाणी सुटलं...

"आणि बाळा सारखं वाचू नये, मेंदूवर ताण पडतो... आधीच तुझी अवस्था अशी. आताशा कुठे रुळतेय, गाडी रुळावर येतेय..."

गाडीच नाव ऐकताच मी भेदरले. मला आठवलं.. तो बोगदा आला आणि मी डोळे गच्चं मिटून घेतले...

माझी भेदरलेली अवस्था बघून आईनेच मला धीर दिला. 

"असं काय करतेस? चल विसर आता सगळं..."

मी विसरलेच आहे ना सगळं?  मी हताशपणे म्हणाले.

"अगं वेडी असं चालेल का? चल बाबाना फोन कर. आले नाहीत अजून."

मी बाबांना फोन लावला. 

"आई, रस्त्यात आहे म्हणतायेत."

"म्हणजे हा निघालाच नाहीये अजून. किती मेलं ते दुकानात काम करायचं. सकाळी लवकर जाऊन कामे आटपून लवकर घरी ये म्हटलं तर तेही नको. सकाळी पूजेलाच इतका वेळ लावतो, तर कामे कशी होणार?"

"बस ग आई, किती बोलतेस."

"हा... बोलली लाडाची लेक. दोघांनी अशी युती करून ठेवलीये ना..."

"मग... आहेच आमची युती अभेद्य..." असं म्हणत बाबा आत आले.

"अगंबाई! तू खरं बोललास आज, रस्त्यात आहे म्हणून?" आई म्हणाली. 

"मी नेहमी खरंच बोलतो." 

"पुरे..."

"मीही म्हणतो पुरे... लेकीसमोर आपला प्रेमालाप नको."

मला हसूच आवरेना. हे इतके शांतपणे भांडूच कसे शकतात?

रात्री मी मस्तपैकी पोटभर जेवले. मी झोपायला निघणार, तेव्हाच बाबांनी विषय काढला. 

"उद्या नवीन तज्ञ येतायेत. तुला नक्की दाखवूयात."

मी फक्त मान हलवली. 

दुसऱ्या दिवशी मी एका क्लिनिकमध्ये होते. काय नाव बरं क्लीनिकचं? काही आठवत नाहीये.

ती क्लिनिकची इमारत खूप जुनी होती. भव्य. मी अशी इमारत पूर्वी कधीही नव्हती बघितली. 

मध्ये जाताच एका नर्सने आईचं स्वागत केलं. 

"मालूताई, कशी आहेस? अग मने, सुंदर दिसतेस आज तू. टवटवीत मस्त."

माझी स्तुती ऐकून मला खूप छान वाटलं. 

बाबा तोपर्यंत मेडिकलवाल्याशी काही चर्चा करत होते. इथे सगळेच सगळ्यांना ओळखतात... किती मस्त...

तेवढ्यात आतून बेल वाजली. मी आणि आई आत गेलो.

हे डॉक्टर म्हणजे, एक नमुनाच होते. साधारण साडेचार फूट उंची. लांब मिशा, लांब केस. गोरा रंग, गोल चेहरा आणि खट्याळ हसू. 

मला बघताच भुवया उडवत ते म्हणाले.

"काय चाललंय?" 

मी थबकले, आणि कुतूहलाने त्यांच्याकडे बघू लागले...

थोड्याफार हवापाण्याच्या गप्पा झाल्या. डॉक्टर मस्त गप्पा मारत होते.  

"तुला काही आठवतय? काही अशी आठवण, दवाखान्याच्या आत जागी होण्याआधी?"

"हो." 

"गुड. काय आहे बेटा ती."

"मला ना, रेल्वेतून जाताना बोगदा दिसतो, आणि त्या काळोखात मी डोळे घट्ट मिटून घेतले."

"'व्हेरी गुड. मग पुढे?"

"नाही आठवत."

"थोडासा आठव... नक्की आठवेन..."

"नाही ना आठवत."

"ठीक आहे. चल या आरामखुर्चीवर बस."

मी बसले.

"आता ते फिरणारे वर्तुळ दिसतायेत बघ आरशात, त्यापैकी लाल वर्तुळावर लक्ष ठेव. फक्त लाल."

मी तसच केलं... पाच मिनिटे गेली असतील, मला हलकं वाटू लागलं. एकदम कापूस. मी उडतेय असं मला वाटत होतं, पण...

...अचानक तो बोगदा आला, आणि मी घट्ट डोळे मिटून घेतले....

"...जागी हो...जागी हो... मने..."

आई मला थपडा मारत होती. डॉक्टर कावरेबावरे झाले होते.

मी जागी झाले... घटघट पाणी पिलं...

...आणि आम्ही तिन्ही तिथून बाहेर पडलो.

जुन्या अस्तित्वाच्या काही खुणा नव्हत्या. मला तर आठवतच नव्हत,की...

...मला काहीच आठवत नाहीये...

बाबांनी माझ्यासाठी एक चांगली नोकरी शोधली. तिसरीपर्यंतच्या मुलांना शिकवायची...किती मस्त होती ती मुले... शाळेतले शिक्षकही छान होते. काही तरुण शिक्षक तर माझ्या इतके पुढे पुढे करत की मलाच लाजल्यासारखं होई...

मला लळा लागला होता मुलांचा. त्यात एका मुलीने तर मला तिच्यावाचून एक क्षण करमणार नाही, अशी माझी अवस्था करून ठेवली होती...

एकदा ती माझ्याजवळ आली, आणि माझा ड्रेस ओढला.

मी विचारलं, काय झालं?

तिने मला कान तिच्याजवळ नेण्याची खूण केली.

मी तसंच केलं.

"समजून प्रेम कर लोकांवर. इथे स्त्रीचा घास घ्यायला गिधाडे टपलीत. तुझ्याभोवतीही घिरट्या घालताना दिसतायेत मला... "

मी हसून अक्षरशः पडले...

आयुषी नाव तिचं... गोलमटोल, दोन वेण्या आणि मोठा चष्मा...

आयुषी म्हणजे आजी होती आजी! मोठ्या माणसाला लाजवेल असं तीच बोलणं आणि वागणं.

एकदा मी म्हटलं, पाण्याला जीवन असेही म्हणतात.

तर ही कशी म्हणते... जीवन म्हणजे अळवावरच पाणी!

तिचे बाबा एका मोठ्या कंपनीत कामाला होते. आई गृहिणी. तिच्या बाबाना नाटकाची आणि आईला वाचनाची खूप आवड होती असं म्हणायचे. 

असेच एक नाटकवेडे होते बाबा... आई बाबा आणि मी दर शनिवारी नाटक बघायला जात असू. अशीच बाबांनी त्यादिवशी घोषणा केली.
मालती, जमदग्नीच नाटक आलंय... शनिवारी जायचंय...
बाबा अक्षरशः लहान बाळासारखे उड्या मारत होते!
आणि माझ्या अंगावर न जाणे का, सरसरून काटा आला होता!!!
'जमदग्नी!!'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय भाग... उस्तुकता वाढत आहे.. डॉक्टर कडे हिप्नोटाईझ केल्या नंतर काय झालं ..मालतीबाई का नाही सांगितले तिला काही

व्हांगली चालु आहे कथा.

<<<<"हे बघ, या मास्तरांना मी बऱ्याच मुलींबरोबर पाहिलंय. तुझ्यासारखी सुंदर बायको हवी म्हणून तुझ्याशी लग्न करतील ते, पण त्यांचंही तुझ्यावर खरंच प्रेम आहे का हे चेक करून घे. या संसाराच्या महासागरात नावेचे दोन्ही वल्हे... ">>>>>> हे असं काही किंवा अशा अर्थाचं एवढ्यातच वाचल्यासरखं वाटलं.

<<<<"हे बघ, या मास्तरांना मी बऱ्याच मुलींबरोबर पाहिलंय. तुझ्यासारखी सुंदर बायको हवी म्हणून तुझ्याशी लग्न करतील ते, पण त्यांचंही तुझ्यावर खरंच प्रेम आहे का हे चेक करून घे. या संसाराच्या महासागरात नावेचे दोन्ही वल्हे... ">>>>>> हे असं काही किंवा अशा अर्थाचं एवढ्यातच वाचल्यासरखं वाटलं.
>>>>>
अर्निकाच्या लेखात.
बाकी क था चांगली सुरू आहे. येऊ देत अजून

अर्निकाच्या लेखात.
बाकी क था चांगली सुरू आहे. येऊ देत अजून>>>
थँक्स. मलाही हे वाक्य लिहिताना मी कुठंतरी वाचलंय असं सारख वाटत होतं. पुन्हा जाऊन तो लेख वाचला. त्यांनी अशक्य सुंदर लिहिलंय...

अच्छा मालतीबाईचा नवराच होते का 'तिसरा' मनुष्य.>>> लास्ट एपिसोड का मेरावाला गेस बराबर था ।
----------

हे अर्निका लेख म्हणजे काय ?

बदल करण्यासाठी नव्हतं लिहिलं मी. असो.>>>
नाही हो ते कळलं मला, पण मला ते वाक्य तिथे खूप आवडल आणि तिथे ते परफेक्ट बसतंय.
इथे थोड युनिक वाटावं म्हणून मी बदललं.
कॉपीराईट क्लेमची भीती वाटते ती वेगळीच Wink
तुम्हा दोन्हीना खूप धन्यवाद, ती पूर्ण लेखमालिका पुन्हा वाचली. खूप आवडली.

OMG मेघा इज बॅक!!!!
आनंदाने उड्या मारणारा बाहुला अशी ईमोजी कशी टाकायची?