मला काहीच आठवत नाहीये!

Submitted by अज्ञातवासी on 17 December, 2018 - 04:43

"डॉकटर, मला काही आठवत नाहीये."
"शांत पडून रहा."
"मी येथे कशी आले."
"शांत राहा."
"माझं डोकं खूप दुखतंय..."
डॉकटर न बोलता निघून गेले.
मी विचार करून थकलेय. मला काहीच का आठवत नाहीये?
आठवलं! त्या ट्रेनने बोगद्यात प्रवेश केला, आणि मी डोळे गच्चं मिटून घेतले... आणि?
नाही आठवत... आई ग!
मी तशीच पडून राहिले... तेवढ्यात मालतीबाई मध्ये आल्या.
किती सुंदर आहेत यांचे केस. हसतातही किती गोड... माझी आई असती तर अशीच दिसली असती...
पण मला आई नाहीये आठवत. मला बाबा आठवत नाहीये... कुणीच कस आठवत नाहीये.
माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला जायचंय... पण कुठे?
मालतीबाई जवळ आल्या. आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या...
"रडू नकोस बाळा. आपल्याला लवकर सगळं आठवायचय, हो ना? मग रडून कसं चालेल?"
"माझं रडूच थांबत नाहीये."
"चल, उठशील? आपण बागेत चक्कर मारून येऊ."
मी उठले. मालतीबाईंनीच मला कपड्याचे जोड दिले होते,हॉस्पिटलचे कपडे बदलून मी ते घातले.
"तू हॉस्पिटलच्या कपड्यात अजिबात चांगली दिसत नाहीस." मालतीबाई हसून म्हणाल्या.
मला ना, कधीकधी यांना बिलगून रडावसं वाटत.
"आता काहीतरी महत्वाचं बोलायचंय मला... बोलायचं?" त्या म्हणाल्या.
मला त्या दुसरीकडे कुठे तर नाही पाठवत ना? विचारानेच मला रडायला आलं...
"पुन्हा रडतेय? बघ असं रडायचं नाही. आता मी जे बोलतेय ते शांत चित्ताने ऐक. ऐकशील?"
मी मान डोलावली.
"तुझं वय आताशा २७-२८ असेन. असेन ना? गेल्या महिनाभरापासून तू हॉस्पिटलला राहतेय. आता हॉस्पिटलच्या नियमानुसार तुला दुसरीकडे कुठे शिफ्ट व्हावं लागेल."
माझं रडू आवरेनाच.
"रडू नकोस. या शहरात खूप चांगले आधाराश्रम आहेत. तिथे तुला नियमित उपचारही मिळतील, आणि तू स्वावलंबीही होशील. पण.."
"मला नाही जायचंय कुठे." मी ओरडले.
:आणि मलाही तुला नाहीये पाठवायचं. मालतीबाई रोखून म्हणाल्या..."
"मग?"
"स्पष्ट बोलते. मला मुलबाळ नाहीये. आणि आता मुलबाळ दत्तक घेण्याचं वयही नाही राहिलंय माझं. एखाद्या लहान बाळाला वाढवताना मी म्हातारी होईन. आणि आमचं वय आणि मतेही जुळणार नाही. तू आलीस, तुझ्याबरोबर राहताना मला माझी मुलगी दिसायला लागली. मी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोललेय. पोलिसांशीही. तुला वाटत असेल तर तुही माझं रेकॉर्ड बघ. तुला आठवलं सगळं, तुझे आईबाबा सापडले, तर जा तू त्यांच्याकडे. तोपर्यंत राहा माझ्याजवळ. राहशील? मी थोडी कडक स्वभावाची आहे. पण लगेच विरघळतेही. आणि हो, तुला कामही करावं लागेल बरं. मी नाही आवरणार आपल्या तिघांचं"
"मी कधी येऊ?" मी विचारले.
मला जवळ घेत मालतीबाई म्हणाल्या... "नुसती गोड आहेस."
मला घर सापडलं होत. नवीन घर.
पण माझं जून घर होत कुठे...?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नाही आवरणार आपल्या तिघांचं

>>

तिघांचं??

तिसरा/री कोण?

सुरुवात तर छान झालीये. पुढचे भाग लवकर येउद्यात.

तिघांचं??
तिसरा/री कोण?>>> मालती बाई + त्यांचे मिस्टर + कथा नायिका = ३ असेल

------
मस्त सुरुवात,
पुढील भाग लवकर येवू देत.

1. मालती बाई च आई असतील तिच्या........

किंवा

2। ती चुकून मालती बाई। चा च ट्रेन मध्ये धक्का लागून पडली असेल.

मस्त सुरुवात,
पुढील भाग लवकर येवू देत.

मस्त सुरुवात,
पुढील भाग लवकर येवू देत.

मस्त सुरुवात
पण शेवट जरा अटोपल्यासारखा वाटला मला

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. हा भाग अक्षरशः मी एकटाकी लिहिलाय. मी काय लिहीत होतो मलाच कळलं नाही. सहज एक आयडिया मनात आली आणि लिहून टाकलं
थँक्स. सर्वांना कथा आवडली हे ऐकून आनंद झाला.
जमल्यास आजच पुढचा भाग पोस्ट करेन.

हा भाग अक्षरशः मी एकटाकी लिहिलाय. मी काय लिहीत होतो मलाच कळलं नाही. सहज एक आयडिया मनात आली आणि लिहून टाकलं>>> भारीच
बादवे, तुम्हीच Ironman आहात का

हो किल्ली मीच ironman. मायबोलीवर नवीन असताना तो आयडी घेतला, पण नंतर इथल्या सदस्यांची वेधक नावे वाचून शेवटी माझाही आय डी मायबोलीतच बदलून घेतला. फक्त नाव बदललंय, बाकी सर्व ironman ने केलेलं लिखाण तुम्ही वाचू शकता.

अनपेक्षित सुखद धक्का किल्ली, धन्यवाद!

छोटासाच झालाय हा भाग पण रोचक सुरवात. पुभाप्र.

> मालती बाई + त्यांचे मिस्टर + कथा नायिका = ३ असेल > किंवा नायिका गरोदर असेल.

छोटासाच झालाय हा भाग पण रोचक सुरवात. पुभाप्र.

> मालती बाई + त्यांचे मिस्टर + कथा नायिका = ३ असेल > किंवा नायिका गरोदर असेल. >>>+१

मस्तच अाहे. पण तिला काहीच नाही अाठवत तर, त्या मालती बाई अाहेत. ह्या नावाचं उल्लेख कसा झाला.

मस्तच अाहे. पण तिला काहीच नाही अाठवत तर, त्या मालती बाई अाहेत. ह्या नावाचं उल्लेख कसा झाला.<<<<<<
कारण गेले काही दिवस ती त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आपली काळजी घेणाऱ्या परिचरिकेच नाव कळेलच.