क्र क्रोएशियाचा!

Submitted by अनिंद्य on 17 December, 2018 - 06:23

काही महिन्यांपूर्वी पिताश्रींनी हसत-हसवत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत. आप्त-मित्र-परिवार आणि त्यांचे प्रियपात्र विद्यार्थी जमले. दृष्ट लागेल असा समारंभ झाला. साखरतुला, सत्कार, ७५ दिव्यांनी ओवाळणी-औक्षण, देणग्या, केक, शॅम्पेन, पार्टी सगळे सगळे झाले. आनंदलेला दिवस मजेत निघून गेला आणि रात्री उशिरा सत्कारमूर्ती म्हणाले - "मला हवे ते गिफ्ट मिळाले नाहीच अजून!"

मी चकित. किंचित ओशाळलेपणाने विचारले - "ते काय?"

"अरे, मला क्रोएशियाला जायचे आहे, तुझ्यासोबत, लवकरात लवकर."

मी तर काय, कलियुगातील श्रावणबाळच. मनात विचार केला - एवढे जग फिरलो आपण, पण हे राहिलेच आहे. कामातून जास्त दिवस सुट्टी शक्य नव्हती, पण धावता दौरा करता येण्याजोगा होता. मग व्हिसा-तिकिटे वगैरेचा यथासांग गोंधळ घालून झाला आणि निघण्याच्या रात्री व्हिसा हातात मिळण्याचा परम रोमांचक अनुभव घेतला. मनात त्याचा फार राग न धरता बसलो विमानात आणि झेपावलो क्रोएशियाच्या दिशेने.

HBO चॅनलच्या प्रसिद्ध 'गेम ऑफ थ्रोन्स' ह्या दीर्घमालिकेने क्रोएशियाला खऱ्या अर्थी ग्लॅमर प्राप्त करून दिले. २०११ साली त्यांनी मालिकेचे काही भाग क्रोएशियात चित्रित केले आणि ह्या प्रचंड लोकप्रिय मालिकेमुळे हा पिटुकला शांत निवांत देश आधी अमेरिकन पर्यटकांच्या नकाशावर आला. आता गेल्या काही वर्षांत भरपूर आंतरराष्ट्रीय प्रवासी इथे येऊ लागले आहेत. ४४ लाख लोकसंख्या असलेल्या देशात गेल्या वर्षी आलेल्या पर्यटकांची संख्या सुमारे १५ लाख होती! त्यामुळे पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय म्हणून आकाराला आला आहे. क्रोएशियाचे नाव गाजवणारी ताजी घटना म्हणजे २०१८च्या फिफा फुटबॉल कपमध्ये ह्या खेळवेड्या देशाची चमकदार कामगिरी. त्यामुळेही ह्या देशाबद्दल सर्वत्र कुतूहल निर्माण झाले आहे.

आजच्या क्रोएशियाच्या जन्माची कहाणी रक्तरंजित नसली, तरी बऱ्याच कटकटी होऊन मिळालेल्या स्वातंत्र्याची नक्कीच आहे. म्हणतात ना, “कोई आजादी नही है जिसमे गिरफ्तारी न हो” सोव्हिएत युगाचा अंत, दोन्ही जर्मनीचे एकीकरण अशा दणकेबाज ऐतिहासिक घटना घडत असताना १९९० ते १९९२ सालांदरम्यान 'युगोस्लाव्हिया' नावाच्या भलामोठ्या मध्य युरोपीय देशात यादवी माजली. अनेक भवती-न भवती होऊन हा देश क्रोएशिया, मॅसिडोनिया, बोस्निया-हर्जेगोविना, मॉंटेनेग्रो, सर्बिया (आणि सर्बियाच्या पोटात वोजवोदीना आणि कोसोवो) अशा अनेक तुकड्यांत विभागला गेला. सत्कारमूर्ती (समू) आणि श्रावणबाळ (श्राबा) दोहोंना हा चक्षुर्वैसत्यम/टीव्हीर्वैसत्यम इतिहास माहीत होताच. समूंना त्याधीचे मार्शल टिटो आणि त्यांच्या काळातील घडामोडी आठवत होत्या, तर श्राबाला नोबेल विजेते लेखक ईवो अँड्रिक, शिंडलर्स लिस्ट आणि ग्लॅडिटर यासारखे प्रसिद्ध चित्रपट निर्माते ब्रान्को लस्टिक वगैरे क्रोएशिअन (क्रोट) लोक आठवले. समूंना क्रीडाक्षेत्राची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांना क्रोएशियाचे ऑलिम्पिक सुवर्णपदक घेणारे सर्व पंधरा खेळाडू आणि फीफा वर्ल्डकप फुटबॉल टीमचे सर्व खेळाडू त्यांच्या त्यांच्या खेळवैशिष्ट्यासकट माहीत होते. प्रवासात रक्तवारुणीच्या साक्षीने ह्या सर्व गोष्टींची उजळणी आणि चर्चा करण्यात आली. त्यातच समू आणि क्रोएशिया दोन्हींचा वाढदिवस एकाच आठवड्यात आहे, असे नवनीतही प्राप्त जाहले. चिअर्स!

ह्या देशात पर्यटन म्हणजे समुद्रकाठी वसलेली अतीव सुंदर ऐतिहासिक शहरे, देशभर असलेली राष्ट्रीय अभयारण्ये आणि राखीव जंगले आणि राजधानीचे शहर झेग्रेब. शहराची श्रीमंती फक्त पैशांनी आणि गगनचुंबी इमारतींनी न मोजता तेथिल रहिवाशांना मिळणाऱ्या जीवनमानावर मोजावी असा विचार असलेली माणसे देशात मुबलक होती. त्यामुळे देश गरीब असला, तरी बहुतेक शहरे टुमदार आहेत. गेल्या दोन दशकात प्रचंड वाढली असूनही बकाल नाहीत. हाताशी वेळ कमी, म्हणून समुद्रकाठी पुढच्या वेळी जाण्याचे ठरले आणि पहिला मुक्काम पडला झेग्रेब शहरात.

IMG_9607.jpg

पुरातन काळापासून झेग्रेब शहराचे दोन भाग आहेत - कॅपटॉल आणि ग्रादेक. दोन्ही नावे तिथल्या पर्वतांची आहेत. पैकी कॅपटॉल कायम चर्चच्या ताब्यात असलेला उच्चभ्रू भाग आणि ग्रादेक अन्य सर्वांसाठी अशी पारंपरिक विभागणी. मधून वाहणारी सावा नदी. इतिहासात मंगोल आणि तुर्क आक्रमकांचे अनेक हल्ले पचवून दिमाखाने परत उभे राहिलेले टुमदार शहर. ह्या शहराचे जुने नाव 'अग्रम' - भारतीय कानांना परिचयाचे वाटावे असे. रोमन राजवट, ऑस्ट्रो-हंगेरियन राजेशाही, नाझी सत्ता आणि पुढे युगोस्लाव्ह सत्ता असे बदल घडत शेवटी १९९१ साली स्वतंत्र क्रोएशियाची राजधानी म्हणून मानाचे स्थान मिळालेले झेग्रेब शहर आता विस्तारले आहे. युरोपातील शहरांपेक्षा बरीच जास्त - म्हणजे सुमारे ८ लाख लोकसंख्या असूनही मुख्य शहराचा जुना भाग पायी फिरून बघता येईल असा आहे. ह्या भागात पूर्णपणे वाहनबंदी करून पायपीट सुसह्य होईल याकडे लक्ष देण्यात आलेले आहे.

शहराच्या विस्तारित भागाला 'नवी झेग्रेब' असे मराठमोळे नाव आहे. शहराच्या मध्यभागी चटकन लक्ष वेधून घेणारा थांबा म्हणजे झेग्रेबमध्ये सर्वांचे स्वागत करणारे दामिर मातौसिक ह्या प्रसिद्ध क्रोएशियन शिल्पकाराने घडवलेले सुमारे २५ फूट X २५ फुटाचे शिल्प. हे शिल्प म्हणजे जुन्या झेग्रेब शहराचे रेखीव ‘मिनिएचर’ आहे.

44844665414_fb8eb22a86_k.jpg

सर्व इमारती, रस्ते, नद्या आणि कालवे, उद्याने असे बारकावे ओतीव शिल्पात दाखवणारा हा नकाशा वापरून आरामात जुने शहर फिरता येईल.

31697096488_cf080d71b8_k.jpg

जगभरातील भाषांमध्ये 'नमस्ते' लिहिलेला दिशादर्शक गोल हे शिल्पाचे अनोखे वैशिष्ट्य.

सगळ्या शहराला ओपन आर्ट गॅलरी म्हणता येईल इतपत संख्येने अनेक शिल्पे जागोजागी उभारली आहेत. त्यातील काही ऐतिहासिक, तर काही 'चक्रम' श्रेणीत मोडणारी आहेत.

43752160760_4b45af3e42_k.jpg

कोणत्याही जुन्या युरोपियन शहरात असतील तसे गढ्या, शेकडो वर्षे जुनी चर्चेस, ऐतिहासिक इमारती, सरकारी कार्यालये, म्युझियम वगैरेंनी यांनी अपर झेग्रेब ठासून भरले आहे, त्याची एक फेरी झाली.

IMG_9588.jpg

पैकी ह्या सेंट मेरी चर्चच्या छताचे चित्र क्रोएशियाच्या राजचिन्हात आणि ध्वजात वापरले आहे.

लोअर झेग्रेब भागाचे सुंदर वैशिष्ट्य म्हणजे ८ मोठाल्या बागांनी नटलेला 'ग्रीन हॉर्स शू'चा भाग. मिलान लेनुझी ह्या शहर-रचनाकाराने १८८० साली सुचवलेले हे डिझाईन म्हणजे आजच्या झेग्रेबला मिळालेली अपूर्व देणगीच म्हणावी लागेल. दोनच वर्षांत ते अमलात आणल्याचे श्रेय तत्कालीन राज्यकर्त्यांना. बागांच्या मधोमध सगळ्याच युरोपियन शहरात असतात तसल्या ऑपेरा हाऊस, कोर्ट, राजवाडे, संग्रहालये, कलादालने, विद्यापीठे इत्यादी राजेशाही इमारती. एक क्षण व्हिएन्नात फिरतोय असा भास व्हावा इतपत हॅब्सबर्ग राजेशाहीची खास खूण असलेल्या पिवळ्या-पांढऱ्या रंगसंगती असलेल्या इमारती दिसतात. ह्या भागाला जवळच असलेले ४५ एकराचे भव्य मॅक्सिमीर उद्यान आणि १५ एकरावर वसवलेले बॉटॅनिकल उद्यान दोन्ही शहरवासीयांची विरंगुळ्याचे ठिकाणे आहेत. शेकडो प्रकारचे वृक्ष-वेली-फुले, अनेक तळी, पक्ष्यांचे आणि फूलपाखरांचे थवे असे सुंदर वातावरण भर शहरात असते. उद्यान स्थापनेचे वर्ष १७९४! त्याला खेटून मॅक्सिमीर फुटबॉल मैदान, क्रोएशियाचे हृदय!

शहराला परिक्रमा करून झाली. पण समूंना यूरोपातील आद्य रोपवेने अपर झेग्रेब ते लोअर झेग्रेब हा प्रवास करायचा होता. एवढा मोठा प्रवास ते एकटे कसे करतील हा विचार श्राबाला स्वस्थ बसू देईना. तब्बल ६६ मीटर सलग प्रवास म्हणजे अगदी थकायला झाले Happy १८९०पासून सुरू असलेल्या ह्या सेवेला आता क्रोएशिया सरकारने 'राष्ट्रीय सांस्कृतिक आणि तांत्रिक स्मारक' घोषित केले आहे.

43752165750_6f8d9284a0_k.jpg

'जा मसणात' असे कोणी झेग्रेबवासी म्हणाला तर पटकन हो म्हणायचे हे योग्य. कारणच तसे आहे. तीन लाख लोकांना 'पुरून' उरलेले ह्या शहराचे 'मिरोगोज' स्मशान म्हणजे एक मोठी आर्ट गॅलरीच म्हणावी. अत्यंत शांत, सुंदर रमणीय जागा.

44655659345_d61ec7a186_k.jpg

१८७६ सालापासून शहरवासीयांना अविरत सेवा देत असलेले, जागेपणी किंवा चिरनिद्रेसाठी सर्वधर्मीय, सर्ववंशीय लोकांना समान स्थान देणारे, कलापूर्ण आणि मुख्य म्हणजे वृक्षवेलींनी नटलेले मिरोगोज समू आणि श्राबा दोघांना फार पसंत पडले.

45519307212_c2cf00daa8_k.jpg

इंग्रजी-हिंदी-उर्दू-मराठी साहित्यात चिरनिद्रा - मृत्युसंगीत / requims इत्यादींवर समू भरभरून बोलले, पण आनंदी सुरात. श्राबाचे कान-मन तृप्त झाले.

श्राबाला खुणावत असलेल्या गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या. त्याला स्थानिक 'सुगंधी' वारुणीची चव चाखायची होती, 'मूझेज सुवरेमेने उमजेतनोस्टी' अशा विचित्र नावाचे तेवढ्याच विचित्र कलाकृतींनी भरलेले कलादालन बघायचे होते, विभक्त झालेल्या जोडप्यांच्यी कथा सांगणारे 'मुझियम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप' बघायचे होते, जमलेच तर जुन्या व्हिन्टेज कारमधून एक फेरी मारायची होती, स्तृक्ली असे विचित्र नाव असलेली शाकाहारी डिश चाखून बघायची होती. एक जीव आणि कित्ती कामे. पैकी काही त्याने केली, काही 'विशलिस्ट' नामक गोंडस कपाटात ढकलून दिली.

31697259738_ea8b7d0c55_k-1.jpg31697282468_69322dbeda_k.jpg

दुसरा मुक्काम पडला तो प्लिटवाईस नॅशनल पार्क या अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात. हे ठिकाण हेच ह्या देशात येण्याचा मुख्य उद्देश होते. झेग्रेबहून ह्या राष्ट्रीय उद्यानापर्यंत जाण्याचा रस्ता मनोहारी होता. चोहीकडे राखीव जंगलाचा भाग असल्यामुळे मोकळी हवा आणि निरभ्र आकाश आणि सगळीकडे हिरव्या निळ्या रंगाची उधळण.

30628587657_fff87aca4d_k.jpg

स्फटिकासामान नितळ पाण्याचे शेकडो धबधबे आणि त्यांनी तयार झालेले अनेक रंगीत (हो रंगीतच) जलाशय हे ह्या निसर्गनिर्मित उद्यानाचे वैशिष्ट्य. सर्वात मोठ्या ‘लेक कोझॅक’मधून बोट घेऊन राष्ट्रीय उद्यानात प्रवेश केला की दुसऱ्या जगात आल्याचा भास होतो.

31697184878_a5a7880136_k.jpg

तब्बल ३०० चौरस मैल भागात वाहन नाही, गडबड-गोंधळ नाही. ऋतूंप्रमाणे रंग बदलणारे सहा भव्य जलाशय आणि उद्यानातील मुख्य सौंदर्यस्थळातून पायी चालण्यासाठी केलेली १२ किलोमीटरची लाकडी मार्गिका. सगळ्या मार्गिकेला योग्य ठिकाणी कठडे आहेत. कोठेही कचरा, प्लास्टिक असे विद्रुपीकरण नाही. त्याबद्दल ह्या गरीब देशाच्या जनतेचे आणि सरकारचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

31697178208_d0df610d76_k.jpg

काही मीटर खोलवर तळ्यांचा तळ दिसावा इतके नितळ स्वच्छ पाणी सगळीकडे. इथे डोळ्यांचे पारणे वगैरे फेडून झाले.

प्लिटवाईसच्या सौंदर्याचा यथोचित सन्मान म्हणून हे स्थळ युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून गौरवले आहे. दोन दिवस इथे राहिले तरी पूर्ण उद्यान आणि सगळे ६ जलाशय फिरून होणे शक्य नाही, त्यासाठी आठवडा हवा.

31697188868_8bf6e5c83a_k.jpg

श्राबानी काढलेले फोटो आणि त्याचे शब्द अर्थातच ह्या अनुपम स्थानाचे वर्णन करण्यास अपुरे आहेत. गूगलदेवतेस शरण गेल्यास डझनावारी चित्रफिती ह्या सौंदर्याची एक झलक दाखवू शकतील. पण प्रत्यक्ष अनुभव हाच खरा आनंद यावर समू आणि श्राबा यांचे (पुन्हा एकदा) एकमत झाले.

त्यात बाहेरचे तापमान खाली आलेले असले, तरी क्रोएशियाची शान असलेल्या 'ओझूस्को' बिअरची चव घेणे भाग होते. प्रतिसेकंद १० बाटल्या असा खप आहे म्हणे ह्या बिअरचा. खप वाढवण्यासाठी थोडा आपलाही हातभार लागावा, अशा प्रामाणिक इच्छेने ते शुभकार्य हिरिरीने पार पाडण्यात आले.

45569660871_7fa685930e_k.jpg

स्थानिक रेस्तराँ मालकीण ‘मिया’च्या आयुष्यात 'भारतीय जिभेला चालू शकेल असे शाकाहारी जेवण' हा विषय कधी आला नसावा. पण प्रयत्न सोडले नाही तर पोटापुरते मिळू शकते हे सत्य आहेच. तिने धापा टाकत जे काही बनवले ते खाल्ले.

30628584347_dc542fc522_k.jpg

निघतांना ती माउली म्हणते कशी - "फर्स्ट टाइम इन माय लाइफ आय फेल्ट दॅट माय किचन इज अ‍ॅक्चुअली अ लॅबोरेटरी." चलता है !

इथल्या रम्य वातावरणात दोन दिवस कसे उडून गेले कळले नाही.

ह्या छोट्या दौऱ्यात खास लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे गाइड म्हणून काम करणाऱ्या स्थानिक क्रोट व्यक्तींची चतुरस्रता. इतिहास, भूगोल माहीत असणे अपेक्षित आहे, पण भाषा, विज्ञान, स्थानिक प्रथा परंपरा, खानपान, सण, देशाचे कवी-लेखक-संशोधक-समाजसुधारक-खेळाडू-शिल्पकार-चित्रकार-सिनेमा आणि ऑपेरा कलाकार ह्या सगळ्यांची नावे आणि त्यांचे काम याबद्दल भरघोस माहिती असलेले गाइड फारसे भेटत नाहीत. स्थानिक लोकांना बोलते करण्याचे कसब आणि ही कसलेली गाइड मंडळी ह्यामुळे समू आणि श्राबा दोघांसाठी त्यांच्याशी झालेल्या चर्चा फारच आनंददायक ठरल्या. त्यातून वेचलेली काही मौक्तिके :-

• बहुसंख्य भारतीयांसारखेच जवळपास प्रत्येक क्रोट व्यक्तीला किमान ३ भाषा अवगत असतात, गाइड म्हणून काम करणाऱ्यांना तर ६ सुद्धा !

• ह्या देशातील दर दुसरा बुवा ‘लुका’ किंवा ‘निकोल’, तर बाई ‘निकोला’ किंवा ‘मिया’. फिरून फिरून हीच नावे. एका लुकाला हाक दिली तर किमान पाच ओ येतात.

• गोरान इव्हानसेविक, मारिन सिलिक, मारिओ अँसिक, एवो कार्लोविक या क्रोएशियाच्या टेनिसपटूंनी गाजवलेल्या स्पर्धांबद्दल सांगायलाच हवे का?

• क्रोएशियायाने जगाला काही खास भेटी दिल्या आहेत. पैकी एक म्हणजे 'नेक टाय'. बहुतेक ठिकाणी पुरुषांनी फॉर्मल कपडे घालायचे असतील तर टाय अनिवार्य ठरतो. पांढरा आणि लाल रंग विशेष वापरलेले, हातांनी विणलेले रेशमी टाय हा क्रोएशिया भेटीचे सर्वात सुंदर 'सुवेनियर' आहे. अपर झेग्रेबचे ‘क्रवाता’ हे पुरातन दुकान टायच्या इतिहासाचे एक म्युझियमच म्हणा ना. दर वर्षी १८ ऑक्टोबर 'नॅशनल टाय डे' म्हणून साजरा होतो.

44844708614_f6d308d5c3_k.jpg

• मोजून ४११८८ वायनरी ह्या देशात उगाच नाहीत. उत्तमोत्तम वाइन बनवणे हा अनेक पिढ्यांचा उद्योग आहे. त्यातील काही वाइन्स अंगचाच सुवास असणाऱ्या आहेत, त्या विशेष.

• प्रत्येक व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्स एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत आणि त्या बदलता येत नाही हा शोध लावून त्याचा वापर करणारा क्रोएशिया हा जगातील पहिला प्रदेश. इव्हान व्हुसेटिक ह्याच्या नावे ते श्रेय आहे.

• पाण्यातल्या पाण्यात मारा करू शकणारे 'टॉरपॅडो' मिसाइल सर्वप्रथम निर्माण करणारा हा देश तांत्रिकदृष्ट्या बराच पुढारलेला आहे.

• मदिरापान देशातल्या नागरिकांना अत्यंत आवडणारे काम आहे. ठार बेवडे नसले तरी जगात दरडोई सर्वाधिक मदिरा सेवन करणाऱ्या देशांमध्ये क्रोएशिअन क्रोट लोकांचा नंबर चौथा आहे.

• बॉलपेन प्रथम बनवणाऱ्या क्रोट माणसाचे नाव 'पेन'कला असावे, हा गमतीशीर योगायोग. थरमॉस फ्लास्क, विजेरी, रोप वे अशा काही जगभर वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे जनकत्व क्रोएशियाकडे आहे.

• देशाचे सुमारे १०% क्षेत्रफळ 'राखीव जंगल / बांधकामविरहित क्षेत्र' आहे. सीमेलगतच्या अन्य देशांनीही असेच केल्यामुळे एकूण नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचे पोषण उच्च दर्जाचे आहे.

• देशात १९१०पासून ट्राम व्यवस्था आहे, पूर्व युरोपातील सर्वात जुनी म्हणता येईल अशी. वेळोवेळी त्यात योग्य ते तांत्रिक बदल अर्थातच झालेले आहेत.

• 'फक्त तुला म्हणून सांगतो/सांगते, कोणालाही अजिबात सांगू नकोस' अशी सुरुवात करून गावभरच्या भानगडी एकमेकांना रंगवून सांगणे क्रोट लोकांना फार आवडते. तीच तऱ्हा 'मला बोलायला अजिबात वेळ नाही' अशी सुरुवात करून तासनतास फोनवर गप्पा मारणाऱ्यांची.

• आपल्या गोव्यात पणजीजवळच्या एका छोट्या गावाचे क्रोट जनतेला फार अप्रूप. तिथे म्हणे सुमारे २०००० क्रोट कोणे एके काळी राहत होते. गोव्यातले चर्च आणि डेब्रोनवीक शहरातील चर्च एकाच नकाशावरून उभारले म्हणे. ह्या गोवन गावाचे नाव ते Gandaulim गंडोलीम सांगतात. आता तपासले पाहिजे.

क्रोएशियाचा छोटेखानी दौरा संपला. पुढे समुद्राकाठची वेगळी सहल करण्याचा प्रस्ताव बिनविरोध स्वीकृत करण्यात आला. परतीच्या प्रवासात समू प्रसन्नवदने बोलते झाले - "पुढच्या वाढदिवसाच्या आधी रशियाचा दौरा ठरव. माझ्यातर्फे तुला रिटर्न गिफ्ट"

आधीच सांगितले तुम्हाला, मी तर काय कलियुगातील श्रावणबाळच!

* * *
('मिसळपाव - दिवाळी अंक २०१८' मध्ये पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुसखुशीत लेखनशैली.

खूप मजा आली लेख वाचताना.

श्राबा चे खूप कौतुक. Happy

व्वा मस्तच, फारशी माहिती नव्हती क्रोएशिया ची . समूचें खास कौतुक या वयात ही फिरायची आवड आहे म्हणून , अशीच तब्येत चांगली राहू दे शुभेच्छा तुम्हाला ....

फारच छान लिहिलं आहे. 'मस्ट व्हिजिट'च्या यादीत टाकायला हवा हा देश. श्राब आणि समू यांचा संवाद 'वरचा क्लास'. Happy खूप शुभेच्छा अजून खूप फिरण्याकरता!

छाने वर्णन व फोटो. बीअर, टाय, म्युझीअम ची नोंद केली आहे. आता मेक माय ट्रिप व ट्रिप अ‍ॅड्वायझार ची ट्रिप करते. एकंदर निवांत जागा दिसते. क्रोएशिआतच एका समुद्र किनारी गाणार्‍या पायर्‍या आहेत ना? त्या ऐकायच्या आहेत.

गेम ऑफ थ्रोन्स चा कोणता भाग इथे चित्रित केला आहे?

@ अमा,

बरोबर, फार निवांत आहे देश, अगदी लाईफ इन स्लो मोशन !

बीअर, टाय, म्युझीअम च्या लिस्ट मध्ये त्यांच्या स्थानिक वाईन आणि लिक्युअर जोडायला विसरू नका - फार नाविन्यपूर्ण चवी आहेत.

समुद्र किनारी गाणार्‍या पायर्‍या आहेत ना - ............येस्स, पण वेळेअभावी समुद्रकिनारी गेलो नाही Sad

..... गेम ऑफ थ्रोन्स चा कोणता भाग इथे चित्रित केला आहे?..........

- सुरवातीचे भाग - सिझन २, ३, ४ मधले काही सीन ड्यूब्रोनविक, झाडार वगैरे समुद्रकाठच्या भागात चित्रित केले आहेत.

@ किल्ली ,

आभार !

प्रचिंबद्दल सांगायचे तर योग्य कॅमेरा न्यायला विसरल्यामुळे (!) सर्व चित्रे माझ्या सहा वर्षे जुन्या आयफोनने घेतलेली आहेत. चांगली वाटल्यास त्याचे श्रेय क्रोएशियाच्या सौंदर्याला आहे.

सुरवातीचे भाग - सिझन २, ३, ४ मधले काही सीन ड्यूब्रोनविक, झाडार वगैरे समुद्रकाठच्या भागात चित्रित केले आहेत.> अरे वा. स्पेसिफिक टूर असतील तर बघाव्या जी ओटी वाल्या. लिक्युअर्स म्हणजे आमचा प्रांतच.

@ मनिम्याऊ
@ sonalisl
@ निरु
@ स्वाती_आंबोळे
@ हर्पेन

आभार !
@ पुरंदरे शशांक

... श्राबा चे खूप कौतुक. Happy ......

विशेष आभार _/\_

अनिंद्य

@ वेडोबा,
..... अशीच तब्येत चांगली राहू दे शुभेच्छा तुम्हाला .... तुमच्या तोंडी केक पडो. (साखर कोण खातं आता Happy )

@ विजिगीषु,
....श्राबा आणि समू यांचा संवाद 'वरचा क्लास'...... माझ्या बोअर आयुष्यातले ते एक टॉनिक आहे Happy

@ बाबा कामदेव,
.... सुदैवी आहात दोघेही..... खरे आहे, नॉक ऑन द वूड !

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

झकास!
माझ्या बकेट-लिस्टमध्ये हा देश आहेच.

@ अमा,

.....स्पेसिफिक टूर असतील तर बघाव्या जीओटी वाल्या.....

होय अश्या क्यूरेटेड टूर्स आहेत आणि त्या विशेषतः अमेरिकन पर्यटकांमध्ये खूप लोकप्रियही आहेत.

@ सिम्बा,
आभार !
कपाट काय मोठे घेता येईल Happy

@ ललिता-प्रीति,

तुम्हाला क्रोएशिया भेटीचा योग लवकर येवो ही सदीच्छा !

फार गोड लेख आणि छायाचित्रे आहेत
पुढच्या वेळी स्ट्रुक्ली का लाय ते शाकाहारी खाल्लं तर रेसिपी आणा हां ☺️☺️

लेखात लिहिल्याप्रमाणे आज १८ ऑक्टोबर हा क्रोएशियात Necktie day म्हणून साजरा होत आहे.

नेकटाय चे जनकत्व या देशाकडे असल्याने देशातले नागरिक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात उत्सवात भाग घेतात.

जनकत्वाचा नुसता क्लेम नाही, सज्जड पुरावा म्हणून ड्युब्रोवनिक गावातल्या किल्ल्यातले क्रोएशिअन कवी इव्हान गुंडुलिक याचे टाय घातलेले चित्र दाखवतात, रंगवण्याचे साल = १६२२, टाय घातलेल्या माणसाचे जगातील सर्वात जुने चित्र !!