चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

Submitted by किल्ली on 10 December, 2018 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचे
बेसन १ मोठा चमचा
जीरे चिमूटभर
ओवा चिमूटभर
तीळ चुटकीभर
चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून
बटर अमूल ची अर्धी वडी
चीझ क्युब २-३ किसून
मोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
कोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
तेल
पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे बनवावे ह्याचा चवीवरून अंदाज घेऊन आज थोड्या व्हेरिएशन सह घरी स्वतः प्रयत्न केला. मस्त जमलाय (मला तरी आवडला :फिदी:). जुन्या मायबोलीवर पराठे पाकृ चा संग्रह बघून आले. चीझचं व्हेरिएशन दिसलं नाही. आधीच असा धागा असेल तर कृपया रेफरन्स द्या.
- कणकेत तिखट/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून, मीठ, हळद, ओवा , जीरे, तीळ, बेसन घालून मिक्स करावे
- आता वरील मिश्रणात कांदा(पात घेणार असाल तर चिरलेली कान्दा पात), कोथिम्बीर घालून हलक्या हाताने कोरडेच मिक्स करून घ्यावे
- मिश्रणात किसलेले चीझ घालावे, हाताला तेल लावुन कणिक मळण्यास घ्यावी. चीझ मुळे पीठ चिकट होते.
- बेताने पाणी घालत मऊसूत कणिक मळून घ्यावी
- अर्धा तास झाकुन ठेवावी
- नेहमीप्रमाणे पराठे लाटून तापलेल्या तव्यावर बटर लावुन भाजुन घ्यावेत
- भाजताना बटर न लावता गरम पराठा ताटात घेतल्यावर त्यावर बटर घालू शकता. असे केल्यास भाजताना तेलाची बोटे लावुन पराठे उलटसुलट भाजुन घ्यावेत

प्रकाशचित्रे:
भिजवलेला कणकेचा गोळा:
parathe1.jpeg
कच्चा लाटलेला पराठा:
parathe2.jpeg
तयार पराठा बटरी बटरी :
parathe3.jpeg
हापिसात न्यायचा डब्बा, पराठे विथ टमाटे लोणचं:
parathe4.jpeg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

अजुन चांगल्या चवीसाठी स्टफ करून पराठे बनवु शकता.
तसे करताना सारण म्हणून किसलेला कान्दा, चीझ, किन्चीत मिरेपुड, थोडीशी कोथिम्बीर असे घ्यावे
आज सोमवार उर्फ मंडे असल्यामुळे मी एव्हढे धाडस केले नाही

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sahi

मस्त प्रकार. पातीच्या कांद्याचे पराठे हा प्रकार नवीनच वाचला.
आई चीज पराठा (कुठल्याही प्रकारचा मसाला असेल तर) जरा वेगळ्या पद्धतीनं करते. सगळा चवीचा मालमसाला पिठांत घालायचा आणि पीठ नेहेमीप्रमाणे मळून तयार ठेवायचं. आता, पराठा लाटतांना किसलेल्या चीज चा लहान बॉल घेऊन स्ट्फ पराठे बनवायचे. पराठ्यांच्या आत चीज वितळतं आणि आवरणं खरपूस होतं Happy

मस्त!
योकू यांच्या पध्दतीने करतात घरी. मधे चिज स्टफ करायचे. असे चिज स्टफ केलेले राईस बॉलही मस्त लागतात. शिळ्या भाताचे हमखास करतो.

मस्त!
मी आलू पराठे करताना सारणात चीज किंवा पनीर पण घालते. कांदापात छान लागेल.

आजी/सासू मोड : चीज, क्रीम घातल्या चांगलं न लागायला काय झालें.... आॅफ मोड ... करून बघण्यात येईल थोडे मिक्स हर्ब्ज घालून...

इंटरेस्टिंग!

स्टफ्ड पराठ्यांपेक्षा मला असे एकदाच-काय-ते-सगळं-घालून-पीठ-मळा-आणि-लाटा पराठे आवडतात.
हे करून बघणार, नक्की!

चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?
रेस्पी चांगली आहे. कांदापातीचे करुन बघणार. मी स्ट्फ पराठे करते.

छान.

मस्त पाककृती आहे.
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे? >>>> हो ना. मला वाटतं की बाकी मालमसाला पीठ मळताना घालून फक्त ग्रेटेड चीझ लाटताना स्टफ केलं तर जास्त सेफ राहील आणि वर कोणी लिहिलं त्याप्रमाणे पराठे खुसखुशीत होऊन लेअर्स पण येतील.

चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?>> नाही.. बटर, तेल असतचं भाजताना
आणि हो , भसाभसा चीझ घालायचं नाही

मी एवढ्या प्रमाणाला ३-४ अमूल चे क्युब्स घातले होते, नाही चिकटले पराठे... चव पण आली होती..
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?>>> ही शक्यता घडली नाही, कोणी करून पाहिलं तर सान्गा.. जास्त चीझ घातल्यावर असं होतं का ते..

जास्त चीज घातल्यावर असं होतं असं नाही तर चीजचा वितळणे आणि चिकटपण हा गुणधर्म आहे त्यामुळे ते होते.
मी चीज पराठा किंवा आलू पराठ्यात चीज घालुन स्टफ पराठे करते. पण कधी लाटताना पराठा थोडा जरी फाटला असेल तर चीज बाहेर येते
आणि चिकटते.
हे चिकटत नाहीत ते बरंय की मग.

धन्यवाद मानव पृथ्वीकर , राजसी, भरत, योकु, शाली, वावे, मन्जुताई, वेडोबा, ललिता-प्रीति , सस्मित, जागु, मीरा Happy
सगळा चवीचा मालमसाला पिठांत घालायचा आणि पीठ नेहेमीप्रमाणे मळून तयार ठेवायचं. आता, पराठा लाटतांना किसलेल्या चीज चा लहान बॉल घेऊन स्ट्फ पराठे बनवायचे. पराठ्यांच्या आत चीज वितळतं आणि आवरणं खरपूस होतं>>> ही कृती छान आहे, करून बघेन..
पण मला स्ट्फ करणे हा खटाटोप वाटतो... म्हणून वीक्डेला नव्हे तर वीकान्ताला करून बघेन Happy
असे चिज स्टफ केलेले राईस बॉलही मस्त लागतात. शिळ्या भाताचे हमखास करतो.>>> कृती द्या प्लीझ
स्टफ्ड पराठ्यांपेक्षा मला असे एकदाच-काय-ते-सगळं-घालून-पीठ-मळा-आणि-लाटा पराठे आवडतात.>>> मला पण
किसल्यावर ते केवढंतरी वाटतं.>>> बारिक किसणी वापरली होती.. चहासाठी आलं किसतो ती

छान पाकृ.

पण कांदयाचा वास आवडत नसल्याने नाही करणार.

पिठात असेच सगळे मिसळुन आम्ही मेथीचे पराठे करतो. अन चिज किंवा बटर घालायचे असेल तर पिठाच्या गोळ्यात लाटण्यापुर्वीच भरुन हलक्या हाताने लाटायचे अन तुप लावुन शेकायचे. अप्रतीम चव येते.

धन्यवाद VB Happy
पिठात असेच सगळे मिसळुन आम्ही मेथीचे पराठे करतो>>> हो तेही छान होतात, त्यात चीझ बटर इ घालत नाही मी, थोडेसे तुप्/तेल लावुन भाजते फक्त.. घरातील एका नाकं मुरडणार्‍या व्यक्तीच्या पोटात मुळा जावा म्हणून असेच मुळ्याचे पराठे करून पाहायचे आहेत..

मुळ्याचे होतात ना छान! पिठातच मुळा किसून घालायचा किंवा वेळ असेल तर मुळ्याचा कीस परतून तिखट मीठ मसाला घालून त्यात पनीर चुरा करून घालायचं आणि ते सारण भरून पराठे करायचे.