चाफा बोलेना

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी हे आज वाचले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=389...

"चाफा बोलेना" मधील चाफा म्हणजे ज्ञानदेव असा काहिसा निष्कर्श ह्यात आलेला आहे. खरा अर्थ मला माहित नाही किंवा ह्याविषयी मी फारसे वाचलेलेही नाही, पण ज्या ग्रुहितकावर हा निष्कर्श आलेला आहे ते अचूक वाटले नाहि. कोणाला ह्याबद्दल अधिक? माहिती आहे का ?

प्रकार: 

माझ्या ऐकिव माहीतीनुसार चाफा बोलेना हे एक शृंगारिक गाणं आहे.
ज्ञानदेवांचा काही संबंध आहे हे आज वाचलं, पण मला ही अर्थ फारसा रुचला नाही.

मला हा अर्थ खुप भावला. या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता.
मला वाटते यातील "जन विषयाचे कीडे, त्याची धाव बाह्याकडे, आपण करु शुद्ध रसपान रे" ही फार महत्वाची ओळ आहे.

ही कविता शृंगारिक नाही तर अध्यात्मिक आहे.>>तुला अधिक माहिती आहे का रे ? मी वाचलेले त्याप्रमाणे platonic आहे.

मलाही ही कविता platanoic love बद्दल(च) आहे असे वाटते. ह्या लेखात फ़क्त काही कडव्यांचा जी अध्यात्मा च्या द्रुष्टीने अर्थ लावण्यास सोयीची आहे, तेव्हढ्याच कडव्यांचा विचार केला आहे. कडवी १ ते ६ चा काही विचार मांडला नाहीये. अर्थात तसेही platonic love आणि अध्यात्म ह्यांचा सबंध लावणे फ़ारसे अवघड नाही अणि तेव्हढेच त्या लेखात केलेले आहे.

कडवी १ ते ६ चा काही विचार मांडला नाहीये
--------------------------------------
(लेखामधले हे वाचलेत का?)
साक्षात सृष्टीचं येणं आणि या चाफ्याचा राग काढणं! म्हणूनच पहिल्या सहा कडव्यांत सृष्टीच सृष्टीतील अनेक प्रियकर-प्रेयसींच्या जोडय़ांची उदाहरणे देऊन तू मात्र माझी साथसंगत सोडलीस, असे म्हणते. आजवर तर मीच तुझ्या प्रेमात आहे, तुझी अनेक रूपं आजवर मी पाहिली, अनुभवली म्हणूनच प्रेमातील द्वैत आणि प्रेमातील श्रेष्ठता सुचवत सृष्टी ज्ञानेश्वरमय होऊन जाते.
हा आंबा, ही मैना, हे केतकीचे बन, त्यात दरवळणारा गंध, नागासवे गळणारे देहभान, रानावनात हुंदडत, पशूंच्यासह फिरणारी, कडेकपाऱ्यातून, दऱ्याखोऱ्यांतून वाहत नेणारा शुभ्र पाण्याचा झरा, त्याचं नदीत होणारं एकरूप, आकाशात कडाडणारी वीज, कलिकेच्या अंगाशी झोंबणारा, धाबडधिंगा घालणारा मदमस्त वारा.. हे सगळं, सगळं काय? अर्थातच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभुतांचंच रूप. म्हणजेच जीवाशिवाच्या मीलनाच्या कितीतरी रूपांचं दर्शन जणू सृष्टीनं ज्ञानदेवांना- या अबोल चाफ्याला घडवलं.या पहिल्या सहा कडव्यांतून हे दर्शन दिल्यानंतर...
----------------------------------------
असो.

<<ही कविता शृंगारिक नाही तर अध्यात्मिक आहे>>
अश्या अनेक कविता आहेत, विशेषतः कै. श्री. भा. रा. तांबे यांच्या.
अगदी नववधू प्रिया मी बावरते याला पण आध्यत्मिक अर्थ आहे असे मला ज्ञानप्रबोधिनीच्या एका भटजींनी सांगितले होते. त्यांच्या मते, नुकतेच पृथ्वीवरचे जगणे संपवून दुसर्‍या लोकात प्रवेश करणार्‍या आत्म्याचे ते गाणे आहे.

तर कुठल्या गाण्यात काय अर्थ अहे हे वयोमानानुसार सुद्धा ठरते. तरुणपणी, सगळ्यात कसे प्रेम, शृंगारच दिसतो. मला म्हातार्‍याला 'मल्मली तारुण्य माझे' पण आध्यात्मिक वाटते.

दासबोध वाचताना कुणाकडून तरी मी या कवितेचे रसग्रहण ऐकले होते जे पुर्णतः अध्यात्मिक होते. शाळेत असताना ही कविता मला चाफ्याच्या झाडाला उद्देशून म्हंटली आहे असे वाटायचे. त्यात अलंकार शिकताना हे कळले की ही कविता अतिशयोक्तिचे उदाहरण आहे (की चेतनगुणोक्तीचे?????)

नववधू प्रिया, समईच्या शुभ्र कळ्या ह्याही कविता अध्यात्मिक आहेत. अर्थ लावला तसाही लागू शकतो. कुणाला शृंगारिकही वाटू शकतात.

मला तरी 'मलमली तारुण्य माझे' ही कविता/गाणे अध्यात्मिक वाटले नाही Happy कदाचित म्हातारपणात वाटेल तसे Happy

मनस्मी तो अर्थ वाचला म्हणुनच तर बळेच संबंध आणलाय असे म्हणतोय. मूळात पंचमहाभूते हा स्रुष्टिचा एक भाग आहे पण समग्र सृष्टी म्हणजे फक्त पंचमहाभूते होत नाहीत त्यामूळे त्या सहा कडव्यांमधले references चपखल बसलेले वाटत नाहित.

"साक्षात सृष्टीचं येणं आणि या चाफ्याचा राग काढणं! म्हणूनच पहिल्या सहा कडव्यांत सृष्टीच सृष्टीतील अनेक प्रियकर-प्रेयसींच्या जोडय़ांची उदाहरणे देऊन तू मात्र माझी साथसंगत सोडलीस, असे म्हणते." >> ज्ञानेश्वरांच्या जीवनाची जि काहि माहिती आहे मला त्यात सृष्टीचा स्पष्ट थेट संबंध त्यांच्या जडणघडणीत कुठे आल्याचे आठवत नाहि. हा context गळल्यामुळे ही सहा कडवी, ज्यात सृष्टी त्यांना प्रियकर-प्रेयसींच्या जोड्यांची आठवण करून देतेय हि फारसे पटत नाही.

अर्थत त्यामुळे पुढच्या कडव्यांचा डोलारा नीट जमला असे वाटले नाही.

=============
अगदी नववधू प्रिया मी बावरते याला पण आध्यत्मिक अर्थ आहे असे मला ज्ञानप्रबोधिनीच्या एका भटजींनी सांगितले होते. त्यांच्या मते, नुकतेच पृथ्वीवरचे जगणे संपवून दुसर्‍या लोकात प्रवेश करणार्‍या आत्म्याचे ते गाणे आहे.>>मला हाच अर्थ माहित आहे. तांब्यांनी अगदी शेवटच्या दिवसात हि कविता लिहिली होती हा संदर्भ लक्षात घेतला कि अर्थ अधिक जमतो.

अगदी नववधू प्रिया मी बावरते याला पण आध्यत्मिक अर्थ आहे असे मला ज्ञानप्रबोधिनीच्या एका भटजींनी सांगितले होते. त्यांच्या मते, नुकतेच पृथ्वीवरचे जगणे संपवून दुसर्‍या लोकात प्रवेश करणार्‍या आत्म्याचे ते गाणे आहे.>>मला हाच अर्थ माहित आहे. तांब्यांनी अगदी शेवटच्या दिवसात हि कविता लिहिली होती हा संदर्भ लक्षात घेतला कि अर्थ अधिक जमतो.>> अगदी बरोबर... मीही हाच अर्थ वाचला आहे.

चाफा ही कविता आम्हाला अभ्यासाला असताना त्याखालची तळटीप या कवितेचा गाभा सुस्पष्ट करणारी होती. ती अर्थातच कवीला अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार आणि या काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगणारी होती.
चाफा हे एक रूपक काव्य आहे. यातील चाफा म्हणजे प्रियकर. ही कथा राजा उदयन आणि त्याची प्रेयसी रत्नावली यांच्यातील आहे. उद्यानात विहार करताना उदयन गप्प गप्प आहे. त्याला बोलते करण्याचा प्रयत्न रत्नावली करते आहे आणि त्यातून तिच्या मनातल्या भावना उमटत आहेत.
चाफा बोलेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, यात प्रेयसीने आपल्या प्रियकराला चाफा संबोधले आहे. उदयनाने गंभीरपणा सोडून प्रेमालापाला प्रतिसाद द्यावा म्हणून ती विनवणी करत आहे. प्रारंभी ती उदयनाला खुलवण्यासाठी आपण काय काय केले ते सूचित करत आहे.
गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून गं
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान गं

अनेक प्रकारे समजाउनही उदयन गप्पच आहे. तो आपल्या अनुनयाला थिल्लरपणा समजतोय, की लोकलाजेस्तव संकोचतोय, या विचारात पडलेली रत्नावली त्याला अखेर प्रेमाचा खरा अर्थ समजाऊन सांगते. आणि शेवटच्या कडव्यातील याच ओळींनी या वरवर साध्या वाटणार्‍या काव्याला एक जबरदस्त उंची गाठून दिली आहे. रत्नावली म्हणते,
हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे कीडे, त्यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे

(उदात्त प्रेमाचे हे विश्व आपल्याला ज्या प्रभूने दिले आहे त्याच्या इच्छेनुसार आपण असीम प्रेम करूया आणि लोक काय म्हणतील असे जर तुला वाटत असेल तर त्यांचा विचार करू नकोस कारण असे लोक हे विषय वासनेत बुडालेले किडे असतात आणि त्यांची धाव शारीरिक आकर्षणाच्या पलिकडे जात नाही. आपण असे किडे नाही आहोत तर फुलांमधील मकरंद टिपणारे रसिक आहोत म्हणून ये आपण प्रेमाचा तो शुद्ध रस चाखू या.)

चाफा ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या कवितांमधली एक आहे. Happy

ताम्ब्यान्चे ते गाणे नववधू प्रिया हे नसून
मधु मागसी माझ्या सख्या परी हे आहे.
विचार करा
ढळला ले ढळला दिन सखया----------लागले नेत्र हे पैल तिरी

योगेश प्रभूणेंनी दिलेले स्पष्टीकरण पटण्याजोगे आणि तार्किक दृष्ट्या अधिक योग्य आहे.
धन्यवाद.

असाम्या,
ही कविता मला केळिचे सुकले बाग, मधु मागसी माझ्या सख्या ह्या पठडितील वाटते.

हा जो चाफा आहे तो दुसरा तिसरा कोणि नसुन कवि स्वतः (त्याची काव्य प्रतिभा) ह्या अर्थि असावा असे वाटते.
ह्याला आधार म्हणजे शेवटची ओळः कोण मी- चाफा! कोठे दोघेजण?. द्वैत नाही केवळ अद्वैत उरत हे पटते पण ते अद्वैत मला प्रतिभा आणि कवी पुन्हा जुळुन एकसंध झाल्याने आले आहे असे वाटते. त्या अनुशंगाने ह्या मिलनाच्या पुन्हा एकजीव होण्याची प्रक्रिया ह्या ओळित मला दिसते:

‘दिठी दीठ’ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून
अंगी रोमांच आले थरथरून - ११
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून

कविचा बॅड पॅच चालु असताना हरवलेल्या, कोमेजलेल्या प्रतिभेचे इतके सुरेख वर्णन क्वचित वाचायला मिळावे.
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

तर ह्या प्रतिभेच्या बरोबर घालवले अनमोल क्षण कवी असे आठवत रहातो. ह्यात व्यक्त झालेला माहोल हा कविच्या एकंदरीत विचार्सरणिशी काव्यविषयाशी मिळणारा आहे असे वाटते:

गेले ‘अंब्याच्या’ वनी, म्हटली मैनसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून - १

गेले केतकीच्या बनी, गंध दर्वळला वनी
नागासवे गळाले देहभान - २

आले माळ सारा हिंडून, हुंबर पशूंसवे घालून
कोलाहलाने गलबले रान - ३

कडा धिप्पाड वेढी, घाली उडय़ांवर उडी
नदी गर्जून करी विहरण - ४

मेघ धरू धावे, वीज चटकन लवे
गडगडाट करी दारुण - ५

लागून कळिकेच्या अंगा,
वायू घाली धांगडधिंगा
विसरुनी जगाचे जगपण - ६

आणि ह्या स्वप्रतिभेबरोबर केलेल्या विहाराच्या खुणा स्रुष्टि सांगत असताना असे मुखस्थंबपण पदरी आलेले
मुळी आवडेना! रे आवडेना!! - ७ असेही असहाय/रागाने म्हणतो.

म्हणुन मग त्या प्रतिभेला (सख्याला) आवाहन करत/अमिश दाखवत कवी म्हणतो,

चल ये रे ये रे गडय़ा,नाचूं उडूं घालूं फुगडय़ा
खेळू झिम्मा झिम्- पोरी झिम्- पोरी झिम्! ८

हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करूं आपण दोघेजण - ९

जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्य़ाकडे
आपण करूं शुद्ध रसपान - १०

हा मला पोचलेला अर्थ. अर्थात कवीला काय अपेक्षीत आहे हे केवळ तोच (कधी कधी) सांगू शकतो Happy

हे प्रतिभेचे (?) काहीकाळ दुरावणे माझ्या कडुन असे व्यक्त झाले : नीळा पक्षी

अरे इथे सदानंद रेग्यांची कविता कशी नाही आली अजून.
'बीं'चा चाफा- एक मुलाखत

परवा अरभाटाने आठवण काढली म्हणून टाकली होती पुपुवर. 'मूळ असतं ते सोप्पच असतं' Happy

असाम्या- तू मला 'सन्माननीय रैना, तू यापुढे इथे लिहू नकोस' असे म्हणशील, म्हणुन टाकु का ते विचारतेय. Proud Light 1

कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांच्या ‘चाफा बोलेना’ या प्रसिद्ध कवितेचे आध्यात्मिकदृष्ट्या केलेले रसग्रहण !

कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’
कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांचे ‘चाफा बोलेना’, हे काव्य पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते केवळ एक गीत नसून एका उन्नत साधकाने त्याच्या अध्यात्ममार्गावरील प्रवासाचे केलेले सुंदर रूपकात्मक वर्णन आहे. ‘रंग-रूपाने म्हणजे बाह्यांगाने आकर्षक नसलेले चाफ्याचे फूल त्याच्या मोहक गंधाने सर्वांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे साधनापथावर मार्गस्थ असतांना मनुष्याचे बाह्य रंग-रूप, बाह्य सुख महत्त्वाचे नसून त्याला आत्मानुभूतीचा मिळणारा आंतरिक आनंद फार श्रेष्ठ आहे’, हे या रूपकातून कवीने पुष्कळ सुंदर पद्धतीने सांगितले आहे. या प्रसिद्ध काव्याचे केलेले रसग्रहण म्हणजे आत्मानुभवाशी जवळीक साधण्यासाठी एका साधकाने केलेल्या त्याच्या अध्यात्मप्रवासाचे वर्णन आहे.

१. ‘ही कविता शुद्ध ‘अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’चे प्रतिपादन करणारी आहे.
१ अ. सोनचाफा हे ‘आत्मानुभवाचे, म्हणजेच आध्यात्मिक पातळीवर जीव-शिव यांच्या ऐक्याचे’ प्रतीक असणे : ‘कवितेत चाफा म्हणजे सोनचाफा आहे. अन्य फुलांप्रमाणे याला फारसा आकर्षक आकार वा रंग नसतो, असतो तो अत्यंत मादक सुगंध ! म्हणजे याचं सुख हे बाह्य स्थूल दृश्यात नसून अंतरंगीचा सुगंध असते. बाकीची फुलं दूर अंतरावर असली, तर त्यांचा वास येत नाही; परंतु चाफा कितीही लपवला, तरी याचा सुवास लपत नाही. अन्य फुलं सुकल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो; परंतु चाफ्याचं तसं नसतं.

असा हा चाफा इथे कवीने ‘आत्मानुभवाचे, आध्यात्मिक पातळीवर जीव-शिव यांच्या ऐक्याचे’ प्रतीक म्हणून वापरला आहे.

१ आ. चाफा म्हणजे स्वतःला आतून येणारा अनुभव ! ‘चाफा फुलेना’ म्हणजे प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाही.

काव्यपंक्ती आणि त्यांचा भावार्थ

श्रीमती अनुपमा देशमुख
१. काव्यपंक्ती
चाफा बोलेना, चाफा चालेना ।
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।। धृ.।।

१ अ. भावार्थ

१ अ १. ‘साधकाने अनेक वर्षे साधना करूनही त्याला आत्मसुखाचा अनुभव येत नाही’, यासाठी त्याने मनोमन व्यक्त केलेली खंत !

१. ‘चाफा’ म्हणजे ‘स्वतःला आतून येणारा अनुभव.’ चाफा खंत करत नसून ‘काही केल्या चाफा फुलत नाही’, याची खंत वाटत आहे. चाफा फुलेना, म्हणजे ‘प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाही.’

२. इथे अध्यात्ममार्गावरील एका साधकाच्या मनातील तळमळ व्यक्त होत आहे. ‘चाफा, खंत करी काही केल्या फुलेना’, म्हणजे साधनेचे प्रयत्न करूनही पुष्कळ काळ लोटला, तरी साधनेचे फळ मिळत नाही, म्हणजेच त्या आत्मसुखाचा अनुभव येत नाही. ‘करी’ म्हणजे ‘कर्मेंद्रियांच्या द्वारे काहीही केले, तरी चाफा फुलत नाही’, म्हणजे आत्मसुखाचा अनुभव येत नाही.

२. काव्यपंक्ती
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी ।
आम्ही गळ्यांत गळे मिळवुन रे ।

२ अ. भावार्थ

२ अ १. प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड आणि तिची क्षणभंगुरता अन् निष्फळता

१. या पंक्तींमधून प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड सांगितली आहे. साहित्यामध्ये (वाङ्मयामध्ये) आंबा, आम्रवृक्ष, आम्रमंजरी (आंब्याच्या झाडाला आलेला मोहर) यांचा वापर नेहमी काम-पुरुषार्थाशी जोडून करण्यात येतो. ‘संतानप्राप्ती’ ही वैवाहिक जीवनाची सफलता मानली जाते. ‘मातृत्व’ ही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता मानली जाते. त्यामुळे ‘आम्ही प्रपंचात म्हणजे आंब्याच्या वनात गेलो. कोकिळ-मैना यांच्यासमवेत गाणी म्हटली. एकमेकांच्या गळ्यांत गळे घातले. याचा अर्थ भावनात्मक स्तरावर कौटुंबिक जीवनाची सर्व सुखे धुंडाळून पाहिली’; पण ‘चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !’

२. सर्व प्रापंचिक सुखे क्षणिक ठरली. त्यात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे प्रपंचात कितीही क्षणिक सुखे लाभली, तरी ती सुखे सार्वकालिक परिपूर्ण अशा आत्मानुभवाच्या पासंगालाही उभी राहू शकली नाहीत; म्हणून कवी आत्मानुभूती न झाल्याची खंत व्यक्त करत आहे.

३. काव्यपंक्ती
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी ।
नागासवे गळाले देहभान रे ।

३ अ. भावार्थ

३ अ १. योगमार्गाची साधना करतांना जागृत झालेल्या आत्मशक्ती कुंडलिनीला केतकीच्या बनाला वेटोळे घातलेल्या नागिणीचे दिलेले हे रूपक आहे आणि ही आत्मानुभवाची अवस्थाही सार्वकालिक नसल्याची खंतही आहे !

१. हा भाग आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचा संकेत दर्शवतो.

२. या कडव्यातील रूपक फारच विलक्षण आहे. केवड्याची रचनाच जगावेगळी असते. बाहेरून काटेरी, मधोमध सरळसोट उभा दांडा आणि त्याच्या टोकाला श्रेष्ठ सुगंधाने परिपूर्ण असलेले सोनेरी कणीस ! केवड्याच्या भोवती नागांचा वावर असतो.

३. इथे साधकाने केलेला योगमार्गाच्या साधनेचा प्रयत्न सुचवला आहे. येथे केतकीचे बन, म्हणजे साधकाने योगमार्गाने केलेली साधना आहे. केतकीचे काटे योगमार्गाचा खडतरपणा सुचवतात.

आंब्याच्या वनातले सुख इतरांच्या समवेत उपभोगले होते (‘म्हटली मैनासवे गाणी’); मात्र येथे केतकीच्या सुगंधाचे रसपान ‘गंध दरवळला मनी’, म्हणजे केवळ स्वतःच्या अंतरंगात केले आहे.

४. हे योगमार्गाचेच वर्णन असल्याचा आणखी एक संकेत कवीने दिला आहे. ‘नागासवे गळाले देहभान’, म्हणजे ‘योगाद्वारे जागृत केली जाणारी आत्मशक्ती कुंडलिनी !’ कुंडलिनीला नागिणीची उपमा, तर योगशास्त्रानेच दिली आहे. ध्यानाचा अभ्यास करतांना कुंडलिनी जागृत होऊन देहभान गळाले आणि ध्यानाच्या त्या अवधीमध्ये विलक्षण आत्मिक अनुभव आला. तरीही हा अनुभव ध्यानाच्या तेवढ्या वेळेपुरताच मर्यादित राहिला. सार्वकालिक (सतत) आत्मानुभवाचा आनंद तिथेही मिळाला नाही.

४. काव्यपंक्ती
चल ये रे, ये रे गड्या, नाचु उडु घालु फुगड्या ।
खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम् ।।

४ अ. भावार्थ

४ अ १. ‘साधनेचे सर्व प्रयत्न लहान मुलांचे ‘पोरखेळ’ ठरले !

इथे ‘नाचु उडु घालु फुगड्या…. खेळू झिम्मा, झिम् पोरी झिम्…’, या शब्दांच्याद्वारे जणू कवीने सुचवले आहे की, ‘वरील सर्व प्रयत्न शेवटी झिम्मा-फुगड्यांप्रमाणे ‘पोरखेळ’ ठरले. त्यातून थोड्या वेळाकरता मनोरंजन झाले, इतकेच!

५. काव्यपंक्ती
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण ।
उणे करू आपण दोघे जण ।

५ अ. भावार्थ

५ अ १. ‘जीव आणि ईश्वर या दोघांखेरीज इतर विश्वाच्या प्रचीतीचा नाश करणे, हे अद्वैताचे लक्षण !

१. ‘या पंक्तींमध्ये ‘वेदांत तत्त्वज्ञाना’चे स्पष्ट प्रतिपादन आहे.

आ. येथे ‘आम्ही दोघे’ हे रूपक फार वेगळ्या अर्थाने आहे. जीव म्हणजे ‘शरिरात जाणवणारे चैतन्य’ आणि ईश्वर म्हणजे ‘चराचर सृष्टीतील व्यापक चैतन्य !’ हे वरकरणी वेगळे वाटले, तरी एकाच चैतन्याची ही २ रूपे आहेत. आता या दोघांना विश्वाचे अंगण ‘आंदण’ मिळाले आहे. ईश्वराने विश्वाचे संचालन करावे आणि जिवाने (साधकाने) जगाशी व्यवहार करावा.

म्हणजे जिवाने करायचा व्यवहार हा ‘कर्तव्य आणि उत्तरदायित्व’ अशा प्रकारचे लादलेले ओझे नसून ‘मनसोक्त उपभोगण्यासाठी मिळालेले आंदण’; म्हणून त्याने जगाकडे पहावे’, यासाठीच कवीने जगाच्या रूपात मिळालेल्या आंदणाला ‘उणे करण्याची’ शब्दयोजना केली आहे. येथे जीव ईश्वराला उद्देशून म्हणतो, ‘आपण दोघे मिळून आपल्या दोघांच्या अस्तित्वाच्या व्यतिरिक्त जाणवणार्‍या या जगाच्या प्रचीतीचा नाश करू या, निरास करूया !’’

६. काव्यपंक्ती
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे ।
आपण करू शुद्ध रसपान रे ।

६ अ. भावार्थ

६ अ १. ‘शुद्ध रसपान करूया’, म्हणजे ‘एकरूपतेचा’ अनुभव घेऊया !

‘हेसुद्धा साधकाचे ईश्वराला उद्देशूनचे शब्द आहेत. बाकीचं जग लौकिक व्यवहारात लडबडले आहे. त्याला तसंच राहू दे. तू आणि मी एक होऊन आपल्या दृष्टीतून या जगाच्या ‘आत्मभिन्न प्रतीती’चा नाश करूया !

(‘आत्मभिन्न प्रकृती’ म्हणजे ‘ईश्वर आणि मी वेगळे आहोत’ या भिन्नतेच्या द्वैताची सर्वसामान्यांना जाणवणारी प्रतीती म्हणजेच अनुभव. तो नष्ट करून आपण आत्मानुभवाचे, अद्वैताच्या आनंदाचे रसपान करूया.’- संकलक)

७. काव्यपंक्ती
चाफा फुले आला फुलून,
तेजी दिशा गेल्या आटून,
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे ।

७ अ. भावार्थ

७ अ १. मी आणि माझा आत्मानुभव यांत भेद न उरता आत्मस्वरूपाचा बोध होणे आणि अचानक ती घटना घडली ! चाफा फुलला ऽ ऽ !!!

जीव-शिवाच्या एकात्मस्वरूपाचा त्याला बोध झाला. त्या तेजामध्ये दिशा आणि काळ ही दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमाणे विरून गेली ! हा एकरूपतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की, तिथे ‘कोण मी चाफा ?’ म्हणजे ‘मी आणि माझा आत्मानुभव’ यांत भेद राहिला नाही.

‘कोठे दोघे जण रे ?’, याचा अर्थ ‘मी म्हणजे, सीमित अस्तित्व असलेला जीव’ आणि ‘व्यापक अस्तित्व असलेला, ईश्वर’ हाही भेद उरला नाही.’

ही कविता म्हणजे ‘एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत’ इतकंच म्हणता येईल.’

Copy paste comment

राधानिशा
पूर्वीच्या कवितांना गूढार्थ असायचा आणि त्याकडे बहुतांशी वाचक मंडळी अध्यात्माच्या दृष्टीनेच बघत. कारण कविता ही संत परेपरेतून आली असल्याने अध्यात्मिक रूपकांची रेलचैल त्यात होती. तुम्ही या अंगाने खूपच सुंदर निरूपण केले आहे.
पण कवी ना घ देशपांडे यांनी कवीला अभिप्रेत तोच अर्थ वाचकाला लागेल असे नाही, ज्याला कविता जशी अनुभवता आली त्याच्यासाठी तो अर्थ असे सांगितले आहे. या मताला नंतरही अनेकांनी पुष्टी दिली आप्रत

मधुघट या कवितेचे निरूपण सुद्धा अध्यात्मिक अंगाने झाले होते (अपवाद वगळता). मात्र कवीने मधू म्हणजे कवीची प्रतिभा असे उत्तर दिले होते. तात्पर्य कवीला ओळखणारे आजूबाजूचे लोकच त्याच्या मन की बात जाणून त्या अचूक अर्थाने विश्लेषण करू शकतात, ज्याची इतरांसाठी आवश्यकता नाही.

चाफा बोलेना या कवितेचे अन्य अनेक अर्थ एका चर्चेच्या धाग्यावर दहा बारा वर्षांपूर्वी वाचले होते. सापडले तर लिंक देईन.