करायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन.........

Submitted by किल्ली on 28 November, 2018 - 09:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- गाजरे २
- फ्लॉवरचे तुरे ३-४
- फ्रेंच बीन्स / फरसबीच्या शेंगा ५-६ , मी मिळाल्या नसल्यामुळे घेतल्या नाहीत
- ढोबळी मिरची २-३
- बटाटा १ , आवडत असल्यास, मी घेत नाही
- टमाटे २-३
- मटारचे दाणे छोटी अर्धी वाटी
- कांदे ४-५
- कोथिंबीर बारीक चिरून
- लाल तिखट चवीनुसार
- मीठ चवीनुसार
- धण्याची पूड चिमूटभर
- हळद चिमूटभर
- तेल फोडणीसाठी
- बटर
- आलं, लसूण ठेचुन / किंवा पेस्ट
- जिरे
- कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जिरेपुड
- सुके खोबरे उभे चिरुन, २-३ तुकडे
- खडा मसाला (तमालपत्र, काळीमिरी, लाल सुक्या काश्मिरी मिरच्या, चक्रीफुल, अजुन काय अस्तं ते गोड लाकुड तेही घ्यावं आवडत असेल तर)

क्रमवार पाककृती: 

तो : "अरे वा, आज पावभाजी करणार वाटतं"
ती: "नाही हो, व्हेज कोल्हापुरी करणार आहे"
तो : "पण भाज्या तर पावभाजीसाठी लागणार्‍या आणायला लावल्यास तू मला "
ती: "मी भाज्यांबरोबर पाव आणवलेत का तुमच्याकडून?"
तो : "नाही.
ती: "मग ही पावभाजी नाही"
तो: "मग काय मिक्स व्हेज का?"
ती: खास जळजळीत कटाक्ष
एखाद्या उत्साही रविवारी घरी रेस्टोरंट श्टाईल भाजी खाण्याची हुक्की आली असताना असा सुखसंवाद करून ही भाजी करावयास घ्यावी.

मघासचा कटाक्ष आणि त्यामागची भावना डोक्यात असतानाच भाज्या चिरुन घ्याव्यात. ढोबळी मिरची, कान्दे , फ्लोवरचे तुरे थोडेसे जाडसर पाकळ्यांप्रमणे दिसतील असे चिरुन घ्यावेत. बाकीची सगळी भाजी मध्यम बारिक चिरावी. गाजरच्या उभ्या फोडी कराव्यात.

ग्रेव्ही:
१. एका कढईत फोडणीसाठी तेल तापवुन घ्यावे. त्यात जिरे टाकावेत. जिरे लालसर झाले की आलं - लसूण पेस्ट घालावी. ती जराशी परतुन, चिरलेला कान्दा घालावा.
२. हे सगळं लालसर-सोनेरी होइपर्यन्त परतुन झालं की टमाट्यान्च्या फोडी घालाव्यात.
३. ह्यात सुके खोबरे व बारिक चिरलेल्या गाजराच्या फोडी टाकाव्यात. उभ्या चिरलेल्या फोडी आताच नाही.
४. जरा परतुन प्रेमळपणे झाकण ठेवून एक वाफ काढावी
५. वाफ आल्यानन्तर थोडंसं मीठ, हळद घालून चांगलं मिक्स करावं . झाकण ठेवुन ५ मिनीटांनी आच बन्द करावी.
६. हे मिश्रण जरा थंड झालं की मिक्सरमधून बारिक वाटून घ्यावं.
वरील मिश्रण थंड होईपर्यन्त रिकामे बसू नये. अजून बरीचशी कामं शिल्लक आहेत असे पुटपुटत खालील कृती करावी.
६. अ. आपल्याला सर्व भाज्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात एक एक करून सर्व भाज्या किंचित तळून घ्याव्यात. असे केल्यामुळे भाज्यांचा रंग कायम राहतो आणि त्या थोड्या कुरकुरीत होतात. थोडक्यात काय तर, मऊ मऊ बटरी ग्रेव्ही मध्ये crunchy भाज्या असं काहीतरी साध्य करावयाचं आहे

फायनल मिक्सिन्गः
७. एका मोठ्या कढईत थोडेसे तेल व बटर तापवुन घ्यावे. त्यात वरील सर्व खडा मसाला घालून परतुन घ्यावे. मसाल्याला तेल सुटेपर्यन्त खमन्ग परतले पाहिजे.
८. ह्यात आता जाडसर पाकळ्यांप्रमाणे चिरलेला कान्दा, थोडीशी आलं लसूण पेस्ट घालून परतुन घ्यावे
९. बेससाठी तयार केलेले गाजर/टोमॅटो वाटण घालावे. ते जरासे परतून त्यावर किन्चित प्रमाणात धणेपूड, जिरेपूड, कान्दा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ घालुन हलवून घ्यावे. हे सर्व तुमच्या चवीनुसार कमी जास्त करता येईल .
९. आता आधीच शॅलो फ्राय करून ठेवलेल्या भाज्या घालाव्यात. मिश्रण व्यवस्थित हलवुन कढईवर प्रेमळपणे झाकण ठेवावे.
१०. दणदणीत वाफ आल्यानन्तर थोडीशी बारिक चिरलेली कोथिम्बीर पेरलीत की तुमची व्हेज कोल्हापुरी तयार आहे.

प्रकाशचित्रे:
ही तयारी (ह्या फोटोत उभे चिरलेले गाजराचे काप शोधू नये):
vktay.jpg

कढईतली व्हेज कोल्हापुरी: (भाजी लाल्बुन्द रन्गाच्या तिसर्‍या शेड मधली आहे हे मान्य करावे.)
vkk.jpg

या जेवायला:
vk.jpg

भाजी करण्याच्या उत्साहात (खरे तर एकीकडे गप्पा सुरु होत्या) ह्यावेळेस फोटोझ खास आले नाहीत, स्टेप बाय स्टेप घ्यायचे राहुन गेले.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

- ग्रेव्हीसाठी टोमॅटो प्युरी बेस म्हणून वापरतात. टोमॅटो प्युरी बनवताना त्यात गाजरे, खोबरे घालणे हे माझे व्हर्जन आहे. असे केल्याने केवळ टोमॅटोची टिपिकल आंबट चव न येता वेगळी व गोडूस चव येते. शिवाय टेक्श्चर छान येते. रंग ही लाल येतो. ह्या भाजीला तो लालबुंद रंग असेल तर बहार येते.
- लालबुंद रंग येण्यासाठी काश्मिरी तिखटाची पूड वापरावी. अथवा लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यात भिजवून मग फोडणीत टाकाव्यात.
- झणझणीतपणासाठी वाटणात तिखट हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता.
- तळून झालेल्या भाज्यांवर थोडीशी जिरेपूड, गरम मसाला भुरभुरवुन मुरवत (marination साठी)ठेवावे.
- फ्रोझन वापरणार असाल तर मटारचे दाणे शॅलो फ्राय करू नयेत. थेट वापरावेत.
- शेवटच्या ग्रेव्हीत भाज्या ऍड करण्याच्या स्टेपमध्ये पॅन टॉस करून भाज्या मिक्स केल्या जातात. हे जमत असेल तर नक्कीच करा

माहितीचा स्रोत: 
तुनळी वरचा संजीव कपूरचा व्हीडीओ आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त रेसिपी, डिटेल लिहिल्यामुळे छान वाटली, करून बघेन.
सुक्या मिरच्यांमुळे लाल रंग येईल का, त्या नुसत्या टाकायच्या आहेत ना कि पेस्ट करुन?

९. आता आधीच शॅलो फ्राय करून ठेवलेल्या भाज्या घालाव्यात. मिश्रण व्यवस्थित हलवुन कढईवर प्रेमळपणे झाकण ठेवावे.>>> या पायरीवर जास्त वेळ झाकण ठेवल्यास भाज्यांचा हिरवा रंग फिका पडू शकतो.

>>> या पायरीवर जास्त वेळ झाकण ठेवल्यास
झाकण पायरीवर नाही, कढईवर ठेवायचं आहे. Proud Light 1

छान आहे रेसिपी. Happy

गोड लाकूड म्हणजे दालचिनी का? मग नाव घ्या की. उखाण्यात घ्या हवंतर. Proud

मजा आली पाकृ वाचून, आता फोटोच्या प्रतीक्षेत.

पण व्हेज कोल्हापुरीत गाजराची गोडूस चव म्हणजे फाऊळ नाही का होणार?

जरा खटाटोप आहे पण फायनल यिल्ड टेस्टी असेल. तळून खरपूस भाज्या ग्रेव्हीत काय वैट लागणारेत. करून पाहीन नक्कीच.
टोमॅटो वाटणात गाजर नाई वापरेल मी पण रंगाकरता एक तुकडा बीट घालेन. जरा मसालेदार ग्रेव्ही मस्त होईल ही. सात्विकपणाचा तवंग काजू पेस्ट, क्रीम नी आणवता येईल लाडात असाल तर...

सात्विकपणाचा तवंग काजू पेस्ट, क्रीम नी आणवता येईल लाडात असाल तर..+१११ हो सन्जीव भाऊंनी काजू पेस्ट वापरली आहे
गाजराची गोडूस चव म्हणजे फाऊळ नाही का होणार?>> नाय होणार..गाजर थोडंस वापराय्चं आहे, हलवा नाय कराय्चा Proud
सुक्या मिरच्यांमुळे लाल रंग येईल का, त्या नुसत्या टाकायच्या आहेत ना कि पेस्ट करुन>>> पेस्ट करुन टाकावी, पण मी न भिजवता तशीच वापरली आहे.. आम्च्या इथे लाल तिखट होममेड आहे..एक्दम जहाल.. त्यामुळे गरज नाय पडली

छान आहे रेसिपी. खोबरे मायनस केले, आणि काजू, क्रीम वगैरे सात्त्विक पदार्थ अ‍ॅड केले की व्हेज जयपुरी होईल का?

सात्त्विक पदार्थ अ‍ॅड केले की व्हेज जयपुरी>> व्हेज पुणेरी Light 1 Proud Lol
गोड लाकूड म्हणजे दालचिनी का?>>> हा ते नाव एकदम आठवत नव्हतं
मग नाव घ्या की. उखाण्यात घ्या हवंतर>>> :इश्श, आम्ही नाही जा: हाहा: Proud

धन्यवाद योकु, maitreyee ,स्वाती_आंबोळे ,मानव पृथ्वीकर ,वेडोबा , sonalisl Happy

झाकण पायरीवर नाही, कढईवर ठेवायचं आहे... Lol
कोल्हापुरी नावाच्या भाजीत सात्त्विकपणा..... Lol

स्मृतीचित्रे मस्त!
वाढलेल्या ताटाचा फोटो काढायच्या आधी फोभाचे १-२ बकाणे भरलेले दिसतात Proud

१४ प्रतिसाद बघून इथे. रेशिपी डीटेलात वाचली नाय ... पण सविस्तर हाय पण बाशावाणी नाय ...

स्वाती, Happy
नंद्या, उखाणा भारी
एकीकडे गप्पा सुरु होत्या की तिकडे बाशावर पोश्टी टाकीत होतीस Happy अडीचशे पोश्टी पैकी शेकडा पोस्टी तुझ्याच हायेत ग पोरी Happy :दिवे:

फुस: स्टीकर कसे काढावे ह्यावरच्या पोस्टी वाच ग बयो

अरे वा मस्त, खुसखुशित लिखाणासह सुंदर रेसिपी. फोटोही छान.

मी पूर्वी व्हेज कोल्हापुरी करायचे पण ते पाकीट मिळते ना ते वापरायचे, त्यावर कशी करायची ते लिहिलेलं असते. टेस्टी होते तीपण.

रेसिपी छान वाटते आहे. मध्यंतरी मी केली होती व्हेज कोल्हापुरी पण कशी ते आता आठवत नाहीये.

छान व सोपी रेसीपी. गाजर साले काढून लाम्बट क्युब्ज्स किंवा काय आकार होईल तो. मध्ये चिरले तर छान दिसेल. मटार नाहीत का? ते ही छान लागतील. कढईतला फोटो काढायच्या आधी कडेने निपटून घ्यायला हवे व चमचा पण साफ करून ठेवायचा.

स्टिकर काढण्या बद्दल अनुमोदन.

बरोबर पुदिना पराठा मस्त लागेल.

मस्त भाजी! कोल्हापुरी रंगेल नाही तरी तिखटपणात रगेल असेल! हाटेलवाले काही तरी रंग वापरतात!

फुस: स्टीकर कसे काढावे ह्यावरच्या पोस्टी वाच ग बयो>>> ताट दोन सेकंद मंद गॅसवर धरा लगेच स्टीकर निघते! 'फुस'

हो ना...फोटो द्यायचाच तर मग तो नीट द्यावा..... किंवा कढईतली भाजी एका स्वच्छ काचेच्या अथवा सिरॅमिक बोल मधे काढून मग फोटो काढावा!....................

लिहीलयं चांगले पण मला ही व्हेज कोल्हापुरी न वाटता मिक्स व्हेज वाटतेय.

बहुतेक हॉटेलवाले सुद्धा लाल रंग टाकुन, एक सुक्की मिरची सजावटीला वर ठेवुन मिक्ष्स व्हेज, कोल्हापुरीच्या नावाने चिकटवतात. अस्सल कोल्हापुरी ज्यांनी खाल्लीये त्यांनाच त्याची चव कळते

कोल्हापुरी म्हणजे झणझणीतपणा.. पण कढईतल्या भाजीचा रंगच सांगतोय.. तिखटपणा कमीय.. अन लसुण जास्त वापरलाय अस वाटतं.. बाकी लिहिण्यातली व्हेज कोल्हापुरी भारी वाटतेय Happy

लिहीलयं चांगले पण मला ही व्हेज कोल्हापुरी न वाटता मिक्स व्हेज वाटतेय. +१
ती वेळोवेळी "प्रेमळपणे झाकण ठेवणे" स्टेप मी मिस्टर बिन स्टाइल मधे इमॅजिन केली Wink

मस्त.

Pages