पिठलं - ज्वारीच्या पिठाचं

Submitted by योकु on 21 November, 2018 - 08:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठलं सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. अगदी पटकन होणारा तरीही अतिशय चविष्ट आणि रुचकर. इथेच इकड्च्या तिकडच्या धागांवर ज्वारीच्या पिठाच्या पिठल्याची रेसीपी मिळाली होती; एक-दोनवेळा केलंही होतं पण वेगळी अशी पाकृ काही नव्हती. आज मी पुन्हा केलं हे सो कृती देतोय. अर्थातच आपापल्या चवीनुसार व्यंजनं कमी, जास्त अथवा वगळणे, अ‍ॅड करणे इ प्रकार करून बरेच व्हेरीएशन्स करता येतील.
तर साहित्य -
- दोन मध्यम कांदे
- ४/५ हिरव्या मिरच्या
- ७/८ कढीपत्यांची पानं
- हळद, तेल, मीठ, मोहोरी
- लहान वाटीभर ज्वारीचं पीठ
- लागेल तसं पाणी
- जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

- एका कढईत, पॅनमध्ये तेल तापवून त्यात मध्यम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. कांदा जरा सोनेरी लालसर होऊ द्यावा
- यात आता मीठ, हळद घालून काही सेकंद अजून परतावं म्हणजे हळदीचा कचवट वास निवेल.
- आता यात ज्वारीच पीठ पसरून घालावं आणि मिनिट भर परतून घ्यावं.
- यात आता थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि नंतर जरा अजून पाणी घालून पिठल्याची कन्सिस्टन्सी येऊ द्यावी. एक दणदणीत वाफ आली की पिठलं तयार आहे. वरून बारीक चिरलेल्या हिरव्यागार कोथिंबीरीनं सजवावं.

मस्त पिवळ्या-हिरव्या रंगाच सुपरटेस्टी पिठलं गरमागरम भात, चपाती, भाकरी यांसोबत खावं. चव अजून खुलवण्याकरता तेलाची थोडं जिरं आणि पावचमचा तिखट पोळवून चरचरीत लाल फोडणी (यात हवा तर लसूणही घालता येइल) वरून अवश्य घ्यावी.
सोबत शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी, कांदा, मुळा आणि हो, तळलेली किंवा भाजलेली हिरवी फटाकडी मिरची असेल तर बहार एकदम. Happy

फोटो आहे, टाकतो जरावेळानं. मारकं द्या गप.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन लोकांना होईल बहुतेक; पण नॉर्मली पिठलं जास्तच लागतं हा अनुभव आहे
अधिक टिपा: 

- नक्की करून पाहा हा प्रकार. चण्याच्या डाळीच्या पिठल्याचा गुठळ्या होण्याचा प्रकार इथे अजिबातच होत नाही. (कारण ज्वारीचं पीठ मुळातच चिकट नसतं) सो माझ्यासारख्या बिगरीवाल्यांना एकदम स्मूथ पिठलं जमायला लागलंय. (मला गुठळ्यांचं पिठलही आवडतं म्हणा Wink )
- फोडणीत पीठ घातल्यावर कोरडं राहाता कामा नये, सो त्या प्रमाणात तेल; कांद्याचा ओलसरपणा साधायचा आहे. नंतर पाणी वगेरे घातल्यावर गाठी मोडणे एकदमच सोपं होतं.

माहितीचा स्रोत: 
सीमा (माबो आयडी)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. लोखंडी कढईत आणखीन बेष्ट लागेल. Wink
तुझी पालेभाजीला ज्वारीचं पीठ लावायची आयडिया आवडली आहे आणि आता नियमित करण्यात येते. हे ही करुन बघते तोवर फोटो येऊ देणे.

मस्त!
ज्वारीच्या पिठाची उकडही भारी होते - तुझ्या याच रेसिपीत फोडणीत जिरं, लसणीच्या पाकळ्या आणि शिजवायला आंबट ताक अ‍ॅड केलं की झालं. Happy

मारकं द्या गप.>>>> ९.५/१०

लोखंडी कढई सणसणीत तापली नसल्याने १/२ मार्क कापण्यात आला आहे.

याला ज्वारीच्या पिठाचा उपमा असं म्हणतात वाटतं.. ही रेसिपी इथेच कुठेतरी वाचलेली स्मरते... ते नुसतंच खायचं असतं.. मी घरी करुन सर्वांना खायला घातलं होतं..!

मुछे हो तो नथ्थूलाल जैसी आणि पिठलं खावं तर फक्त बेसनाचं Happy
कधी वाटी दीड वाटी ज्वारीचं पीठ जून होऊन जातं, ज्याच्या भाकरी होत नाहीत, अशा वेळेस मात्र पीठ सोडून देण्यापेक्षा हे पिठलं कम उपमा करून पाहण्यात येईल.

हे काय सणसणीत तापलेली लोखंडी नाही??? ३ मार्क कटाप
बाकी रेसिपी छान दिसतेय. करून पाहण्यात आणि खाण्यात येईल

मुछे हो तो नथ्थूलाल जैसी आणि पिठलं खावं तर फक्त बेसनाचं Happy >>>>>> १००% सहमत

- नक्की करून पाहा हा प्रकार. चण्याच्या डाळीच्या पिठल्याचा गुठळ्या होण्याचा प्रकार इथे अजिबातच होत नाही. >>>>>>> लोखंडी कढईत खमंग लसणाची फोडणीत पाणी घालून पीठ पेरून केलेलंतेथोड्याश्या गुठळ्यावालं हे आॅथेन्टीक पिठलं बाकी सब ......
(कारण ज्वारीचं पीठ मुळातच चिकट नसतं) सो माझ्यासारख्या बिगरीवाल्यांना एकदम स्मूथ पिठलं जमायला लागलंय.>>>>>> पाण्यात पिठ कालवा अन फोडणीला घालून सतत हलवा हाकानाका जमलंच समजा
हे प्रकरण उकडपेंडी व उकड मधलं वाटतंय

पहिल्यांदाच ऐकलं.
ज्वारीच्या पीठाचं पिठलं? मग खायचं कशाशी? बेसनाच्या भाकरीशी? Light 1

मुछे हो तो नथ्थूलाल जैसी आणि पिठलं खावं तर फक्त बेसनाचं >>> कुळथाचं पण मस्त होतं. मी बेसन, कुळीथ दोन्ही पिठलंप्रेमी.

लहानपणी आई-आजीच्या हातचे आणि लग्नानंतर सासुबाईंच्या हातचे ज्वारीचे पिठले खाल्लेले आहे.पण आता स्वत: बनवून खाईन व तुम्हालाही खायला बोलावेन आता------

खाण्यासाठी.
तुम्ही facepack म्हणूनसुद्धा वापरून बघू शकता.

खाण्यासाठी.
तुम्ही facepack म्हणूनसुद्धा वापरून बघू शकता. Rofl

पण मुळात का करायचं ज्वारीच्या पीठाचं पिठलं...? Happy>>>
बर्‍याच जणांना बेसनच पीठ प्रकृतीला मानवत नाही. ज्वारीच पीठले पचायला त्यामानाने हलके. म्हणुन. Happy
दुसरं , चव. वेगळ्या चवीसाठी. भाजणीच्या चकल्या, तांदळाच्या चकल्या इत्यादी का करतो आपण ? तसेच आहे हे . Happy

- नक्की करून पाहा हा प्रकार. चण्याच्या डाळीच्या पिठल्याचा गुठळ्या होण्याचा प्रकार इथे अजिबातच होत नाही. >>>>>>> लोखंडी कढईत खमंग लसणाची फोडणीत पाणी घालून पीठ पेरून केलेलंतेथोड्याश्या गुठळ्यावालं हे आॅथेन्टीक पिठलं बाकी सब ......
(कारण ज्वारीचं पीठ मुळातच चिकट नसतं) सो माझ्यासारख्या बिगरीवाल्यांना एकदम स्मूथ पिठलं जमायला लागलंय.>>>>>> पाण्यात पिठ कालवा अन फोडणीला घालून सतत हलवा हाकानाका जमलंच समजा
हे प्रकरण उकडपेंडी व उकड मधलं वाटतंय>>>

नाही. हे पीठल्यासारखच लागत. उकडपेंडी/उकडीसारख अज्जिब्बात नाही. Happy
पाण्यात पीठ कालवून पीठल करण हा पीठल्याचा घोर अपमान आहे. Happy किडिंग. पण खरच अज्जिब्बात तस पीठल चांगल लागत नाही अस मला वाटत. Happy

सीमा Happy
मला सुद्धा ते पाण्यात पीठ कालवून केलेलं पिठलं अजिबात आवडत नाही. चवीत फरक पडतोच त्याने...

हे पीठलं काल करून बघितलं .
अजिबात पीठुळ चव लागली नाही . मस्त झालेलं . ज्वारीच आहे हे कोणाला कळलं नाही आणि मी मुद्दामून कोणाला सांगितलं नाही .
परत करेन तेन्व्हा लसूण फोडणीतच टाकेन आणि उक्ळी काढताना आमसूल टाकेन .

डोंगर भागावर ,पाड्यावर राहणारे लोक हे पिठलं खातात नेहमी. नाचणीची भाकरी, कांदा , भात आणि हे पिठलं. अर्थात ते लोकं डाळीचं पीठ परवडत नसेल म्हणून करत असतील.