ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

Submitted by संजय भावे on 5 November, 2018 - 04:54

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

.

सकाळी सात वाजता उठून आवरल्यावर बेल बॉय च्या हातात सामान सोपवून सात पन्नासला खाली येऊन चहा पिण्यासाठी इनहाउस रेस्टॉरंट मध्ये शिरलो. पाचेक मिनिटांत खालिद ब्रेड घेऊन येईलच तेव्हा ब्रेकफास्ट करूनच निघा असे हमादाने सुचवले पण साडेआठची बस असल्याने तिथेच बसून नाश्ता करणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्याने तो पार्सल देण्याची तयारी दर्शवली.

आठ वाजता मोहम्मद आणि खालिद एकाचवेळी हॉटेलवर पोचले. हमादाने पार्सल दिलेला ब्रेकफास्ट बॉक्स घेउन आम्ही ‘गो बस’ च्या ऑफिसला जायला निघालो. दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो आणि सामान बसच्या साईड डिकी मध्ये ठेऊन मोहम्मदचा निरोप घेतला आणि माझ्या सीट वर येऊन बसलो.

बस छान होती, लांब लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने सीटस आरामदायक होत्या आणि विमानातल्या सारखीच छोट्या स्क्रीन्सवर मनोरंजनाची आणि छोटेखानी टॉयलेटची सोय होती. सर्व प्रवासी आपापल्या सीटस वर स्थानापन्न झाल्यावर आठ पस्तीसला आमचा हूरघाडाच्या दिशेने ३०१ कि.मी.चा प्रवास सुरु झाला.

.

.

लुक्झोर मधून बाहेर पडल्यावर २५-३० कि.मी. पर्यंतचा प्रवास डाव्या बाजूला कालवा आणि हिरव्यागार शेतांच्या सोबतीने झाल्यावर पुढचा हूरघाडा पर्यंतचा सगळा प्रवास रखरखीत वाळवंट आणि उघडे बोडके डोंगर बघत बघत झाला.
.

.

.

.

.

.

.

सुमारे दोनशे कि.मी. अंतर कापल्यावर साडे अकराला एका हॉटेलवर बस थांबली. मला पार्सल दिलेला नाश्ता मी खाऊन झाला होता म्हणून केवळ चहा पिऊन परत जागेवर येऊन बसलो. बाकीची प्रवासी मंडळी चहा-नाश्ता करून परत आल्यावर बारा वाजता पुढचा प्रवास सुरु झाला.

एक वाजता हूरघाडाची हद्द सुरु होते त्याठिकाणी पोलीस चेक-पोस्टवर तपासणीसाठी बस थांबली. डिकी मध्ये ठेवलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची तपासणी पूर्ण होऊन, तिथून निघण्यासाठी लागलेला जवळपास पाउण तासाचा वेळ मात्र बाहेरच्या कडक उन्हात खाली उतरून परिसर न्याहाळणे जिकीरीचे असल्याने, बस मधेच बसून राहायला लागल्याने फारच कंटाळवाणा गेला.

अखेर दोन वाजून दहा मिनिटांनी हूरघाडा ह्या तांबड्या समुद्राच्या (Red Sea) किनाऱ्यावर असलेल्या शहरातील गो बसच्या टर्मिनल वर पोचलो.

तिथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या फोर सिझन्स ह्या हॉटेलपर्यंत पोचवण्यासाठी टॅक्सीवाले अवाच्या सव्वा भाडे सांगत होते, हॉटेलवर फोन करून विचारले तर तिथल्या व्यक्तीने २० पाउंडस पेक्षा जास्ती भाडे देऊ नका असे सांगितले. शेवटी हो-नाही करत थॉमस नावाचा एक वयस्कर टॅक्सीवाला ३० पाउंडस मध्ये येण्यास तयार झाला पण त्याला ईतर टॅक्सीवाल्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

मला हॉटेलवर सोडून निघताना थॉमसने त्याचा फोन नंबर दिला आणि इथे स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या अशा पर्यटकांना लुबाडणाऱ्या वागणुकीने आमच्या शहराचे नाव खराब होत असल्याची हळहळ व्यक्त करून, कुठेही फिरायचे झाल्यास मला फोन करा मी वाजवी भाड्यात तुम्हाला फिरवून आणीन असे सांगितले.

रिसेप्शन काउंटर वर पोचलो तर तिथे कोणीच नव्हते. मुस्तफा नावाच्या पँट्रिची व्यवस्था बघणाऱ्या तरुणाने तत्परता दाखवून घरी जेवायला गेलेल्या मालक / व्यवस्थापक मोहम्मदला फोन करून माझ्या आगमनाची वर्दी दिली. त्यांच्यात अरेबिक मध्ये काय संभाषण झाले मला कळले नाही, पण मोहम्मद येईपर्यंत माझा खोळंबा न करता त्याने पहिल्या मजल्यावरची तीन बेड्स असलेली एक मोठी रूम मला देऊन फॉर्म वगैरे भरण्याची प्रक्रिया मोहम्मद आल्यावर पूर्ण करा असे सांगितले.

तीस पस्तीस वर्षे जुनी इमारत असलेल्या ह्या हॉटेल मधली ही रूम चांगली मोठी होती. फ्रीज, टी.व्ही., ए.सी. अशा सर्व सुविधा होत्या पण भिंतींचा रंग जुना झाल्याने ती थोडी डल वाटत होती. अर्थात माझे हुरघाडाला येण्याचे प्रयोजन फक्त रेड सी मध्ये डायव्हिंग अथवा स्नोर्केलींग करणे एवढेच होते आणि केवळ दोन रात्री झोपण्या पुरताच तिचा वापर करायचा असल्याने विशेष फरक पडत नव्हता, पण जे पर्यटक फिरायला आणि आराम करायला म्हणून चार दिवस ते आठवडाभरा साठी येतात त्यांना कदाचित ही रूम आवडली नसती.

फ्रेश झाल्यावर कडकडून भूक लागली असल्याने काहीतरी खाण्यासाठी परत खाली उतरलो. ह्या हॉटेलमध्ये पण फक्त सकाळी ब्रेकफास्ट आणि दिवसभर चहा, कॉफी आणि शीत पेयेच मिळत असल्याने रस्ता ओलांडून समोर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये आलो. मेनू कार्ड वर बरेच बीफचे पदार्थ दिसत असल्याने थाई फूड सेक्शन मध्ये दिसलेल्या एग नुडल्स ची ऑर्डर दिली. चवीला गोडसर लागणारा तो पदार्थ खाऊन भूक शांत झाल्यावर परत हॉटेलवर आलो.

त्यावेळी मालक मोहम्मद आला होता. फॉर्म वगैरे भरून झाल्यावर मग त्याच्याकडे डायव्हिंग आणि स्नोर्केलींगच्या टूर विषयी चौकशी केली असता त्याने दिवसभर चालणाऱ्या त्या टूर मध्ये समाविष्ट असलेली ठिकाणे, लागणारा वेळ, किंमत अशी इत्यंभूत माहिती दिली.

सकाळी आठ वाजता पिक-अप, नंतर यॉटने जीफ्टून आयलंडला (Giftun Island) भेट, त्यानंतर प्रवाळाची बेटे (Coral Reef) असलेल्या तीन ठिकाणी स्नोर्केलींग करून संध्याकाळी पाच वाजता हॉटेलवर परत असा दुपारचे जेवण समाविष्ट असलेला हा कार्यक्रम चांगला वाटल्याने मी ती टूर बुक केली आणि साडे तीनला रूमवर परतलो.

अर्धा-पाउण तास झोप काढून झाल्यावर टी.व्ही. वर सुरु असलेल चार्ली चॅप्लिनचा ‘द ग्रेट डीक्टेटर’ बघून साडे सहाला समुद्र किनाऱ्यावर भटकंती करायला बाहेर पडलो.

हुरघाडाचा संपूर्ण किनारा हॉटेल्स आणि रिसोर्ट्सनी व्यापलेला असल्याने जवळपास सगळे बीच हे प्रायव्हेट बीच आहेत. दोन हॉटेल्सच्या मधून मधून दिसणारा समुद्र बघत बघत एक चांगलीच लांब फेरी मारून मी परत माझ्या हॉटेलजवळ आलो.

.

.

साडे सात वाजले होते एवढ्या लवकर जेवण्याची इच्छा नसल्याने मग शहराच्या मध्यवर्ती भागात थोडावेळ भटकंती केली आणि मग साडेआठला माझ्या हॉटेल जवळच असलेल्या सनसेट कॅफे मध्ये मिडीयम पिझ्झा खाल्ल्यावर एक कॅपुचीनो पिऊन रूमवर आलो.

सकाळच्या टूरवर जाताना बरोबर न्यायचे सामान छोट्या सॅक मध्ये भरून झाल्यावर बायकोशी व्हॉट्सॲप वर गप्पा सुरु झाल्या. तिची कॉन्फरंस आज संपल्याने स्कॉटलंड मधला तिचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्या दुपारी तिची परतीची फ्लाईट असल्याने ती माझ्या दोन दिवस आधीच घरी पोचणार होती.

माझी उद्याची टूर संध्याकाळी पाच वाजता संपणार होती आणि परवा म्हणजे ११ मार्चला मी हुरघाडाहून कैरोला जायला निघणार होतो. परंतु ‘गो बस’ ची हुरघाडा ते कैरो सर्व्हिस असून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत त्यांच्या बस असल्याचे समजले होते. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमात थोडा बदल केला आणि माझा फोन बंद असल्याने मी करू शकत नसलेले बसचे ऑनलाईन तिकीट बुक करण्याचे काम सौभाग्यवतींचे इंटरनॅशनल रोमिंग ॲक्टिव्ह असल्याने मग तिच्याकडून करून घेतले.

रात्री १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सातला कैरोला पोचणाऱ्या बसचे तिकीट तिने बुक केले आणि सॉफ्ट कॉपी मला ईमेल वर पाठवली. त्यानंतर माय हॉटेल कैरोच्या मेहमूदला फोन करून माझ्या परवा तिथे पोचण्याच्या बदललेल्या वेळेची माहिती त्याला दिली आणि अकराच्या सुमारास सकाळी सातचा अलार्म लाऊन झोपलो.

.

*****

.

सात चाळीसला तयार होऊन नाश्ता करण्यासाठी खाली उतरलो. मुस्तफाने आणून दिलेला ठराविक कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट खाऊन संपायच्या आतच पिक-अप साठी ड्रायव्हर आल्याची सूचना द्यायला मोहम्मद तिथे आला. नाश्ता झाल्यावर बाहेर पडून व्हॅन मध्ये येऊन बसलो.

पुढच्या एका हॉटेलमधून जर्मन माय लेक आणि आमची वाट बघत थांबलेला जिमी नावाचा गाईड आणि प्रोफेशनल फोटोग्राफर मोहम्मद अशा चार जणांना घेऊन पाच-सात मिनिटांत दोन कि.मी. वर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यॉट ऑपरेटरच्या ऑफिस वर आम्ही पोचलो.

ऑफिसमध्ये स्नोर्केलींग साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मापाच्या फिन्स आणि मास्कच्या ढिगाऱ्यातून आपापल्या मापाच्या वस्तू निवडण्यात दहा मिनिटे गेल्यावर थोड्या खोल समुद्रात उभ्या असणाऱ्या यॉट पर्यंत नेणाऱ्या मोटरबोटीत आम्ही बसलो.

.

.

योगायोगाने माझ्या हॉटेलचेच फोर सिझन हे नाव असलेली ती यॉट मस्त होती. आमच्या आधी तिच्यावर चौदा पर्यटक स्वार झाल्याचे तिथे पोचल्यावर समजले. त्यातला मोहम्मद नावाचा अलेक्झांड्रीयाहून आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरशी माझी गट्टी जमली. आणखीन चार पर्यटक आम्हाला येऊन मिळाल्यावर नउ वाजता जीफ्टून आयलंडला जाण्यासाठीचा आमचा दीड तासाचा प्रवास सुरु झाला.

नावालाच तांबडा समुद्र असलेल्या ह्या समुद्राच्या पाण्याच्या निळ्या, हिरव्या, मोरपिशी अशा विविध छटा बघत यॉटच्या वरती घिरट्या घालत आमचा पाठलाग करणाऱ्या सीगल पक्षांच्या सोबतीने प्रवास झकास चालू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बोटीतून प्रवास करताना मला होणारा मळमळण्याचा त्रास ह्यावेळी बिलकुल जाणवत नव्हता.

.

.

यॉटच्या वर उडणारे सीगल पक्षी.

.

.

.

.

जीफ्टून आयलंड

.

जीफ्टून आयलंड जवळ आल्यावर पुन्हा मोटरबोटीने आम्हाला बेटावर पोचवण्यात आले. सुंदर निळ्याशार समुद्रातले हे बेट फारच विलोभनीय दिसत होते. इथला किनारा पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जात असल्याने आमचे बरेच सहप्रवासी तासभर समुद्रात डुंबत होते. मी आणि मोहम्मदने पाण्यात न उतरता बेटावरच एक फेरफटका मारून झाल्यावर, किनाऱ्यावरच्या वाळूवर बसून सहप्रवाशांना डुंबताना बघण्यात छान वेळ गेला.

जवळपास दोन तास जीफ्टून आयलंडवर व्यतीत केल्यावर साडे बाराला आम्ही यॉटवर परतलो. जिमीने सगळ्यांना कोका कोला प्यायला दिला. अर्धा तास प्रवास केल्यावर एके ठिकाणी स्नोर्केलींग साठी यॉटचा नांगर टाकण्यात आला. काचे सारखे स्वच्छ निळे पाणी बघुनच आज तरी पाण्याखाली आपल्या सभोवती पोहणारे मासे आणि ईतर जलचर बघायला मिळतील याची खात्री पटली. या आधी देवबाग-तारकर्ली आणि मालवण ह्या दोन्ही ठिकाणी केलेल्या स्नोर्केलींग मध्ये गढूळ पाण्यामुळे अक्षरशः पाण्याखालचे काहीही दिसले नव्हते.

अंगावर लाईफ जॅकेट, चेहऱ्यावर मास्क आणि पायात फिन्स चढवून जय्यत तयारीनिशी यॉटची स्टीलची शिडी धरून पाण्यात उतरलो.

.

.

यॉटवर आपटून परत येणाऱ्या लाटांमुळे सारखे गटांगळ्या खायला होत होते. माझी अडचण लक्षात आल्यावर जवळच पोहत बाकीच्यांना मार्गदर्शन करणारा गाईड जिमी माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून यॉटपासून थोडं दूर खोल पाण्यात घेऊन गेला. श्वास घेण्यासाठी मास्कला जोडलेले नळकांडे तोंडात घट्ट धरून डोके पाण्याखाली नेले, आणि खाली दिसणारी लांबच लांब अंतरावर पसरलेली रंगीबेरंगी प्रवाळाची बेटे, सभोवती झुंडीने पोहणारे शेकडो लहान आणि मध्यम आकाराचे मासे, असे दृश्य बघून हरखूनच गेलो. एक दोन कासवेही दिसली.

सोनी एकस्पिरीया Z3 ह्या वॉटरप्रुफ फोनने यॉटच्या शिडीला धरून पाण्याखाली काढलेले काही फोटो.

.

.

.

.

अर्धा तास चाललेल्या ह्या सत्रातला बराचसा वेळ पाण्याच्या वर आणि अधून मधून बुडी मारण्यात घालवल्यावर परत यॉटवर आलो. वॉशरूम मध्ये जाऊन अंग कोरडे करून आल्यावर सुद्धा, सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीने कुडकुडायला होत होतं. पाण्यात न उतरलेल्या मंडळींचे जेवण चालू होतं. गरमा गरम बटाट्याची रस्सा भाजी आणि खुबुस खाल्ल्यावर जरा शरीरात उब निर्माण झाली. भात मात्र कणीचा असल्याने मी नाही घेतला.

सगळ्यात शेवटी पाण्याबाहेर आलेल्या मंडळींचे जेवण संपायच्या आतच आम्ही दुसऱ्या स्नोर्केलींग पॉईंटवर पोचलो. सुरवातीला परत भिजल्यावर थंडीने कुडकुडायला होईल म्हणून मी उतरायचे टाळत होतो, पण मोहम्मद आणि जीमिच्या आग्रहाखातर उतरलो.

इथे पाणी जास्त खोल होते त्यामुळे माझ्यासारख्या जेमतेम पोहता येणाऱ्याचा फार वेळ टिकाव लागणे मुश्कील असल्याने १०-१५ मिनिटांतच पाण्याबाहेर येणारा मी एकटाच नव्हतो. माझ्या आधी हौशीने पाण्यात उतरलेली बरचशी मंडळी माझ्या आधीच यॉटवर परत आलेली होती. पुन्हा एकदा अंग कोरडे करून कपडे बदलले. आता थंडी एवढी वाजत होती कि फोटो सुद्धा काढता येत नव्हता, अक्षरशः हुडहुडी भरली होती. कान आणि डोके झाकून सन डेकवर येऊन बसल्यावर थोड्या वेळानी कुडकुडणे बंद झाले.

तिसऱ्या स्नोर्केलींग पॉईंटवर मात्र खोली ३० मीटर्स पेक्षा अधिक असल्याने फक्त पट्टीच्या पोह्णाऱ्यांनी समुद्रात थेट उड्याच मारल्या. त्यात मोहम्मदचाही समावेश होता.

.

.

मोहम्मद.

.

पाण्यात उतरलेली मंडळी परत आल्यावर सगळ्यांना चहा आणि ओरिओ बिस्किट्स देण्यात आली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

खोल पाण्यातल्या यॉट पासून मोटरबोटीने किनाऱ्यावर उतरलो तेव्हा सव्वा पाच झाले होते. माझ्या हॉटेलच्या दिशेला ज्यांची हॉटेल्स होती असे मी धरून ५ पर्यटक जमल्यावर मला हॉटेलवर ड्रॉप करेपर्यंत पावणे सहा वाजले.

रात्री एक वाजता कैरोला जाण्यासाठी बस असल्याने प्रवासात झोप होईल नाही होईल ह्याची शाश्वती नसल्याने साडे नउ पर्यंत झोप काढल्यावर काल रात्रीच्याच कॅफे मध्ये जाऊन मिडीयम पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड खाल्ले आणि २ डाळिंबाच्या ज्युसचे कॅन्स पार्सल घेऊन रूमवर परतलो.

बाल्कनीत वाळत घातलेले आजचे समुद्रात ओले झालेले कपडे सुकल्यावर काढून आणून पुढचे २ दिवस लागणारे कपडे आणि वस्तू वेगळ्या करून सामानाची बांधाबांध केली. बस टर्मिनल फार लांब नसल्याने बारा-सव्वाबाराला निघून चालण्यासारखं होतं. तो पर्यंत वेळ घालवण्यासाठी टी.व्ही. लावला, पण काहीच बघण्यालायक नसल्याने शेवटी बस टर्मिनलवर टाईमपास करू असा विचार करून पावणे बाराला खाली उतरलो. चेक आउट केल्यावर हॉटेलच्याच कर्मचाऱ्याने २० पाउंडस भाड्यात ठरवलेल्या टॅक्सीने टर्मिनलवर गो बसच्या ऑफिसमध्ये पोचलो. ऑनलाईन बुकिंगचा मेल दाखवून काउंटर वरच्या व्यक्ती कडून छापील तिकीट घेऊन प्रशस्त वेटिंग हॉल मध्ये येऊन बसलो.

बारा पाच झाले होते, बस सुटायची वेळ व्हायला अजून जवळपास १ तास होता. LED स्क्रीन्स वर चालू असलेल्या कार्टून फिल्म्स बघत असताना बारा चाळीसला गो बस चा कर्मचारी एक वाजताच्या कैरोला जाणाऱ्या बसच्या प्रवाशांना बोलवायला आला.

मागच्या बाजूला असणाऱ्या भव्य प्रांगणात उभ्या असलेल्या बसच्या डिकीत सामान ठेवल्यावर आत येऊन स्थानपन्न झालो. एक वाजून दहा मिनिटांनी बस सुटली आणि हुरघाडा ते कैरो ह्या ४६० कि.मी. अंतराच्या प्रवासाला सुरुवात झाली.

पहाटे चार वाजता हायवे वरच्या जफराना हाउस नावाच्या फूड कोर्टवर चहा-पाण्यासाठी बस थांबली.

.

.

.

पंधरा वीस मिनिटांनी फूड कोर्टवरून निघाल्यावर मात्र अधे मधे कुठेही न थांबता सकाळी सहा पंचावान्नला तेहरीर चौकातल्या फ्लायओव्हर खाली असलेल्या गो बस टर्मिनलवर पोचलो. बस मधून बाहेर पडताच पुन्हा अप्पर ईजिप्त आणि लोअर ईजिप्तच्या तापमानातला फरक जाणवला. कैरोची हवा चांगलीच थंड होती.

बस टर्मिनलपासून माझं हॉटेल अगदीच जवळ असल्याने सामान घेऊन चालत चालत रस्ता ओलांडून माय हॉटेलवर आलो. परवा रात्री फोन करून आधीच कळवले असल्याने मेहमूदने रूम तयार ठेवली होती. सामान रुममध्ये ठेवल्यावर कॉमन रुममध्ये बसून चहा पीत आमच्या गप्पा चालू असताना आणखीन एक व्यक्ती तिथे हजर झाली.

ती व्यक्ती म्हणजे कालच इटलीहून आलेला, मेहमूद आणि अहमदचा तिसरा भागीदार आणि ह्या हॉटेलचा मूळ मालक सईद हनाफी होता. ईजिप्शियन आणि इटालियन असे दुहेरी नागरिकत्व असलेला आणि कुटुंबासह कायमस्वरूपी इटलीमध्ये वास्तव्य करणारा सईद वरचेवर ईजिप्तला येऊन जाऊन असतो, त्याच्या अनुपस्थितीत मेहमूद आणि अहमद हॉटेलची व्यवस्था सांभाळतात. हसतमुख, वागण्या बोलण्यात कुठलाही गर्व किंवा स्वतःबद्दलचा अहंगंड नसलेला आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या सईदचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते.

आठ वाजता मानलने तिघांसाठी नाश्ता आणून दिला. नाश्ता झाल्यावर अजून एक चहा पिऊन मेहमूद आणि सईदचा निरोप घेऊन मी रात्रभर जागरण झाल्याने झोपण्यासाठी रूमवर आलो. गेल्या अकरा दिवसांत शुगर क्युब्सच्या जागी आलेली थोडी जाडसर साखर एवढाच काय तो बदल सोडला तर इथल्या व्यवस्थेत दुसरा काही बदल झालेला आढळला नाही.

.

*****

.

चार वाजता रूमची डोअर बेल वाजली. उठून दरवाजा उघडला तर अहमद त्यांच्यासाठी पार्सलची ऑर्डर देताना माझ्यासाठी पण काही खायला मागवायचंय का ते विचारायला आला होता. ईजिप्त मधल्या वास्तव्यात पहिल्या रात्री खाल्ल्यावर आवडल्या मुळे पुढे जवळपास रोजच माझ्या आहारातला महत्वाचा घटक ठरलेले १ फलाफेल सँडविच आणि १ फ्राईड पोटॅटो सँडविच माझ्यासाठी मागवायला सांगितले.

मस्त झोप झाल्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा शीण निघून गेला होता. पार्सल येण्यासाठी २०-२५ मिनिटे तरी लागणार होती. तेवढ्या वेळात अंघोळ वागैरे उरकल्यावर तयारी करून बाहेर पडलो. कॉमन रुममध्ये अहमद, सईद, रिसेप्शनीस्ट मे आणि मानल ह्यांच्यात हॉटेलच्या दैनंदिन कामकाजातल्या समस्यांविषयी चर्चा चालू होती. पाचेक मिनिटांत सँडविचेसचे पार्सल घेऊन डीलेव्हरी बॉय आला.

कॉमन रुमच्या आतल्या भागात असलेल्या मोठ्या डायनिंग टेबलवर सगळ्यांनी एकत्र बसून, मी दुपारचे जेवण म्हणून आणि बाकीच्यांनी संध्याकाळचा नाश्ता म्हणून ती सँडविचेसचे खाल्ली.

.

मी, अहमद आणि सईद.

.

आज माझा ईजिप्त मधला शेवटचा दिवस असल्याने काही सोव्हेनियर्स वगैरे घ्यायची होती. अशा वस्तुंच एक दुकान हॉटेलच्याच बिल्डींग मध्ये तळमजल्यावर होतं आणि तिथे वस्तूंच्या किमती वाजवी असल्याचे अहमदनी सांगितले असल्याने किरकोळ खरेदी करण्यासाठी खाली उतरलो.

काही खास ईजिप्शियन स्टाईलची कि-चेन्स, पेन्स आणि अंगठ्या खरेदी करून मग थोडा वेळ नाईलच्या किनाऱ्यावर भटकून तिथल्या एका बेंचवर जाऊन बसलो. अंधार पडल्यावर तिथून उठून तेहरीर चौकात एक फेरी मारली आणि साडे आठ वाजता मॅक डोनाल्डस मध्ये थोडीशी पोटपूजा करून हॉटेलवर परत आलो.

उद्या संध्याकाळी चार पंचावन्नची परतीची फ्लाईट असल्याने समानाचं फायनल पॅकींग करायला सकाळी वेळ मिळणार होता, त्यामुळे बाकी काही न करता दहा वाजता सरळ झोपून गेलो.

सकाळी सहा वाजता वाजणाऱ्या चर्चच्या घंटेने झोप चाळवली गेली होती पण तिकडे दुर्लक्ष करून आज चांगलं साडे आठ वाजेपर्यंत झोपण्यात यश आले.

ब्रश करून बाहेर पडलो आणि कॉमन रुममध्ये बसून चहा-नाश्ता आणि पुन्हा चहा झाल्यावर मेहमूदला सांगून मला एअरपोर्टला जाण्यासाठी कार बुक करून घेतली आणि तयारी करण्यासाठी रुममध्ये परतलो. पॅकींगचं तसं काही विशेष काम नव्हतं पण पॉवरबँक वगैरे सारख्या वस्तू ज्या कार्गो मध्ये टाकण्यास प्रतिबंध असल्याने त्या वेगळ्या करून काही सामान इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून कार्गो आणि केबिन लगेजच्या वेगवेगळ्या अशा बॅग्ज भरून तयार केल्या. मग अंघोळ वगैरे झाल्यावर तयारी करून साडे अकरा वाजता सामाना सहित कॉमनरूम मध्ये आलो.

निघायला अजून एक तास बाकी होता. तेवढा वेळ सईद आणि मेह्मुद्शी बोलण्यात कसा गेला समजलेच नाही. साडेबारा वाजता माझ्या अलेक्झांड्रीया टूर साठी आलेला मोहम्मदच आज मला एअरपोर्टवर सोडण्यासाठी हजर झाल्यावर सईद, मेहमूद, मे आणि मानलचा निरोप घेऊन आम्ही खाली उतरलो.

अपेक्षेप्रमाणे रस्त्यात भरपूर ट्राफिक लागल्याने एअरपोर्टला पोहोचे पर्यंत पावणे दोन वाजले. त्यानंतर सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार पार पाडून भरपूर लांब असलेल्या बोर्डिंग गेट पाशी पोचलो.

.

.

फ्लाईट वेळेवर होती. सव्वा चार वाजता बोर्डिंग सुरु झाले आणि नियोजित वेळेवर म्हणजे चार पंचावान्नला विमानाने कैरोहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.

लांबवर दिसणारा १९३ कि.मी लांबीच्या सुएझ कालवा विमानच्या खिडकीतून बघताना फार विलोभनीय वाटत होता. येताना सारखेच जातानाही विमानात दिलेले खाद्यपदार्थ दर्जेदार होते. इन-फ्लाईट एन्टरटेनमेंट ठीकठाक होती. पाच तास वीस मिनिटांचा असलेला हवाई प्रवास वेळेतील फरकामुळे मध्यरात्री पावणेदोन वाजता विमानाचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग झाल्यावर संपुष्टात आला. त्यानंतर बाहेर पडून ओला बुक करून पहाटे सव्वाचारला घरी पोहोचलो.

लहानपणापासून आकर्षित करणाऱ्या ह्या देशातली, बघण्यासाठी नक्की केलेली सर्व ठिकाणे जमिनीवरून, आकाशातून आणि पाण्याखालून पाहता आल्याचे अलौकिक समाधान, अनेक नवीन मित्र-मैत्रिणी, माहिती आणि अनुभव अशी ह्या ईजिप्त भेटीची फलप्राप्ती आहे.

पावलो पावली भेटलेल्या सुस्वभावी आणि मैत्रीपूर्ण लोकांमुळे कुठलाही कटू प्रसंग न घडता केवळ चांगल्या आणि चांगल्याच आठवणींमुळे माझ्यासाठी हि सोलोट्रीप कायम अविस्मरणीय रहाणार आहे.

.

*****

.

टीप: वाचकांपैकी कुणाला ईजिप्तला जाण्याची इच्छा असेल आणि कुठलीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या माझ्या Email Id वर नि:संकोचपणे संपर्क करू शकता.
email

.

(पुनःप्रकाशित)

समाप्त

संजय भावे

.

आधीचे भाग:
.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks for details information of your tour. very well described.