ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

Submitted by संजय भावे on 1 November, 2018 - 02:57

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

.

पहाटे पावणे पाचला उठून तयारी झाल्यावर पाच पंचवीसला मी खाली उतरून रिसेप्शन हॉल मध्ये येऊन बसलो. बरोब्बर ठरलेल्या वेळेवर किंवा ५-१० मिनिटे आधीच पिकअप साठी येण्याच्या परंपरेचे पालन करत साडेपाचला एक्सलंट एअर बलून कंपनीचा प्रतिनिधी वईल अहमद आणि ड्रायव्हर हजर झाले.

पुढच्या दोन हॉटेल्स मधून तीन चीनी तरुण आणि एक मुळचे भारतीय पण नोकरीच्या निमित्ताने दक्षिण सुदान मध्ये वास्तव्यास असलेले पंजाबी दांपत्य अशा आणखीन पाच पर्यटकांना पिकअप केल्यावर पाच पंचावान्नला आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मोटरबोटिंच्या धक्क्यावर पोचलो.

कुकीज, स्लाईस केक आणि कॉफी असा अल्पोपहार बोटीत करून झाल्यावर सूर्योदय होत असताना आम्ही पश्चिम किनाऱ्यावर उतरलो.

किनाऱ्यापासून फ्लाईंग पॉईंट पर्यंत दुसऱ्या व्हॅनने पोचल्यावर कॅप्टन ‘अदेल अब्देल’ यांनी एकंदरीत प्रवासाचे स्वरूप, अंदाजे लागणारा वेळ आणि सुरक्षेसंबंधी उपायांची माहिती दिली. त्यानंतर काहीवेळाने लुक्झोर एअरपोर्टच्या नियंत्रण कक्षाकडून वायरलेस संचावर उड्डाणासाठी परवानगी मिळाली आणि आमच्या बलूनने अलगदपणे जमिनीशी फारकत घेतली.

पुरातत्व खात्याशी संबंधित संस्थेने मे १९८२ मध्ये कॅलिफोर्निया मधील एका कंपनीकडून व्हॅली ऑफ द किंग्स, व्हॅली ऑफ क्वीन्स तसेच परिसरातील ईतर प्राचीन मंदिरे आणि वास्तूंचे सर्वेक्षण, छायाचित्रण आणि अद्ययावत नकाशा तयार करण्याच्या उद्देशाने दोन बलून्स भाड्याने घेऊन पहिल्यांदा लुक्झोर वेस्ट बँक वर उड्डाण केले होते. ह्या कामात चांगले यश मिळाल्याने संस्थेने त्यातला एक बलून विकत घेऊन त्याच्या मदतीने काही अदृश्य झालेली ठिकाणेही शोधून काढली. अशाप्रकारे एका विशिष्ठ हेतूने ह्या ठिकाणी सुरु झालेल्या बलून फ्लाईटस, पुढच्या काळात अनेक बलून कंपन्यांनी प्रवासी सेवा देण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत.

मंद वेगात सुरु असलेला हवाई प्रवास चांगल्या हवामानामुळे आल्हाददायक वाटत होता. एका बाजूला थोडी लांबवर दिसणारी नाईल नदी, तिच्या किनाऱ्याला लागून दिसणारी हिरवीगार शेतं आणि शेतकऱ्यांची घरे तर दुसऱ्या बाजूला वाळवंट, टेकड्या आणि डोंगर. मध्ये दिसणारे हाबू टेम्पल, प्राचीन वर्कमन्स व्हिलेज चे अवशेष, हॅतशेपस्युत टेम्पल, फ्रेंच पुरातत्व संशोधकांची वसाहत, अमेनहोटेप III चा राजवाडा आणि मंदिर व तुतअंखअमुन च्या मंदिराचे भग्नावशेष तसेच डोंगरात लांबवर दिसणारी व्हॅली ऑफ द क्वीन्स, जमिनीवरून ट्रक मधून आमचा पाठलाग करणारा बलून कंपनीचा ग्राउंड स्टाफ आणि आमची व्हॅन अशा सगळ्या गोष्टी ५०० ते ६०० मीटर्सच्या उंचीवरून बघायला मस्त वाटत होते.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

हॅतशेपस्युत टेम्पल.

.

हाबू टेम्पल.

.

.

.

.

व्हॅली ऑफ द क्वीन्स.

.

.

.

.

.

(बलून कंपनीच्या व्हीडीओग्राफरने चित्रित केलेला २२ मिनिटांचा आणि मी चित्रित केलेले काही व्हीडीओज एकत्रित करून त्यांचा एक आठ मिनिटे आणि चाळीस सेकंदांचा संक्षिप्त व्हीडीओची लिंक खाली देत आहे.)

https://youtu.be/vPwx5FG56mc

कधीच संपू नये असे वाटणारा हा प्रवास सुमारे पन्नास मिनिटांनी संपुष्टात आला आणि बलूनची बास्केट जमिनीवर टेकली. इतकावेळ आमच्या सहित उंच आकाशात दिमाखात भ्रमण करणारा तो महाकाय बलून त्यातली हवा काढण्यात आल्यावर मलूल होऊन खाली कोसळताना बघणे मात्र नक्कीच सुखावह नव्हते.

बलून कंपनीचा ग्राउंड स्टाफ बलूनची घडी करून तो ट्रक मध्ये चढवण्यात गुंतलेला असताना पावणे आठ वाजता आम्ही व्हॅन मध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघालो. मला वेस्ट बँक वरची पुढची टूर करायची असल्याने कुठे उतरवायचे ह्याची सूचना हुसेनने वईल अहमदला फोन करून दिली होती, त्याप्रमाणे मला पश्चिम किनाऱ्यावरच्या ‘कॉलोसी ऑफ मेमनोन’ (Colossi of Memnon) च्या समोर सोडून बाकीची मंडळी निघून गेली.

‘कॉलोसी ऑफ मेमनोन’ म्हणजे ई.स.पूर्व चौदाव्या शतकात ह्याठिकाणी बांधलेल्या परंतु आता फक्त अवशेष रुपात उरलेल्या अमेनहोटेप III च्या मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेर स्थापन केलेले, १८ मीटर्स (६० फुट) उंचीचे आणि प्रत्येकी ७०० टन वजनाचे, सिंहासनावर बसलेल्या अमेनहोटेप III चे बरीच पडझड झालेले दोन अवाढव्य दगडी पुतळे. उत्खननात सापडलेले पुतळ्यांचे उर्वरित भाग त्यांना पुन्हा जोडण्याचे काम सुरु आहे. वेस्ट बँक वरच्या साईट सीईंग मधला पहिला थांबा असलेल्या ह्या ठिकाणी इमाद आणि ईतर मंडळी साडेआठ वाजता पोहोचे पर्यंत हे दोन भव्य पुतळे बघण्यात वेळ छान गेला.

.

.

पावणे नऊ वाजता तिथून निघून पाच-सात मिनिटांत जवळच असलेल्या हाबू टेम्पलला आम्ही पोचलो. कैरोहून आलेले ३ ईजिप्शियन युवक, २ स्पॅनिश बहिणी, एक कोरीयन विद्यार्थी, एक आर्जेन्टिनाचा, एक जपानचा आणि मी असे चार एकटे प्रवासी, गाईड इमाद आणि ड्रायव्हर रहीम असा एकूण ११ जणांचा ग्रुप होता. इमादने तिकीट खिडकीवर जाऊन आमची प्रत्येकी ६० पाउंडस ची तिकिटे आणली आणि आम्ही सुरक्षा तपासणी पार पाडून मंदिरात प्रवेश केला.
.


.

प्राचीन काळी अमुन देवाचे प्रकट स्थान मानले जाणारे आणि ‘मेदिनेत हाबू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या स्थानावर हॅतशेपस्युत आणि थुतमोस III ह्या आधीच्या फॅरोहनी बांधलेल्या अमुनच्या मंदिर परिसरात ई.स.पूर्व बाराव्या शतकात विसाव्या राजवंशातला दुसरा फॅरोह रॅमसेस III ह्याने अबू सिंबेल येथील रॅमसेस II च्या मंदिरावरून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्मारक म्हणून बांधलेले हे मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. भूमध्य समुद्रातून बोटींनी येऊन राज्यावर हल्ला करणाऱ्या समुद्री लोकांशी (Sea People) झालेल्या युद्धात विजय मिळवल्यावर त्या युद्धात रथावर आरूढ होऊन लढतानाची प्रसंग चित्रे आणि त्या युद्धाचे वर्णन बाह्य भिंतींवर कोरलेले आहे. तसेच अंतर्भागातील भिंती, खांबांवर आणि छतावर अत्यंत सुंदर रंगीत शिल्पे आहेत.
हाबू टेम्पलची काही छायाचित्रे:
.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.

हे भव्य मंदिर पाहून आम्ही पावणे दहा वाजता इथून सात कि.मी. अंतरावर असलेली व्हॅली ऑफ द किंग्स बघण्यासाठी निघालो.

मृत्यू पश्चात ममी तयार करून मृतदेहाचे जतन करण्यासाठी अति प्राचीन काळी मृताचा अनंतकालीन निवारा म्हणून मस्तबा बांधले जात होते. त्यानंतर ई.स.पु. २७ व्या शतकात मस्तबा पेक्षा आकाराने भव्य आणि सुरक्षित म्हणून पिरॅमिडस बांधायला सुरुवात झाली.

मस्तबा आणि पिरॅमिड दोन्ही पद्धतीत शवपेट्या आणि मृताला अर्पण केलेल्या वस्तू भूमिगत खोल्यांमध्ये ठेवल्या जात असल्या तरी वरचे जमिनीवरील बांधकाम दृश्य स्वरुपात असे. त्यामुळे त्यांना खिंडार पाडून किंवा भुयार खणून आतला ऐवज लुटण्याच्या अनेक घटना त्याकाळी सुद्धा घडत होत्या.

अशा लुटमारीच्या प्रकारांना आळा घालून मृताचा अनंतकालीन निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी पुढच्या काळात म्हणजे ई.स.पु. सोळाव्या ते अकराव्या व्या शतकात, अठरा, एकोणीस आणि विसाव्या राजवंशातील फॅरोह आणि त्यांच्या परिवारा साठी आजच्या लुक्झोर पण त्याकाळी थीब्ज नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजधानीच्या शहरात नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पर्वत रांगांमध्ये खडकात भूमिगत टोंब खोदण्यास सुरुवात झाली. राजांसाठी असलेली दफनभूमी ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ तर राण्यांसाठी असलेली दफनभूमी ‘व्हॅली ऑफ द क्वीन्स’ म्हणून ओळखली जाते.

दहाच्या सुमारास व्हॅली ऑफ द किंग्सच्या पर्यटक केंद्रात पोचलो. ह्या पर्यटक केंद्राचा भव्य असा वातानुकुलीत हॉल फार छान आहे. प्रवेश केल्यावर समोरच जपानने भेट दिलेले व्हॅली ऑफ द किंग्सचे काचेचे मॉडेल प्रेक्षणीय आहे. तसेच भिंतींवर फ्रेम करून लावलेले अनेक जुने फोटो माहितीदायक आहेत.

.


व्हॅली ऑफ द किंग्सचे काचेचे मॉडेल

.

आम्ही हॉलचे निरीक्षण करत असताना इमादने आमची तीन टोंब बघण्यासाठी असलेली प्रत्येकी १६० पाउंडसची आणि आत जाण्यासाठी तेथे असलेल्या दोन डब्यांच्या छोट्या ट्राम ची प्रत्येकी ५ पाउंडस किमतीची तिकिटे काढून आणली.
.


.


.


.

व्हॅली ऑफ द किंग्स मध्ये आतापर्यंत एकूण ६२ लहान-मोठे टोंब सापडले असून त्याना KV 1 ते KV 62 असे क्रमांक दिले आहेत. त्यापैकी ३८ टोंब हे कुठल्या फॅरोहचे अथवा त्याच्या परिवारातील व्यक्तींचे आहेत ह्याची ओळख पटली आहे तर अजूनही बऱ्याचशा टोंबची ओळख पटलेली नाहीये. काही एकच खोली असलेले अगदीच लहान आकाराचे टोंब देखील आहेत पण त्यांना क्रमांक दिले नाहीयेत, ते A, B, C वगैरे अक्षरांनी ओळखले जातात.
व्हॅली ऑफ द किंग्स मधील टोंब चा नकाशा:
.


.

ओळख पटलेल्या टोंब मध्ये इतिहासात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या हॅतशेपस्युत, अमेनहोटेप III, थुतमोस III सेटी I, रॅमसेस II, रॅमसेस III सारख्या पराक्रमी आणि कर्तबगार फॅरोहचे तसेच वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी सिंहासनावर बसवण्यात आलेल्या आणि १९ व्या वर्षी अकाली निधन पावलेल्या अल्पायुषी बाल फॅरोह ‘तुतअंखअमुन’ आणि त्याच्या मृत्यू नंतर स्वतः फॅरोह झालेला त्याचा प्रमुख सल्लागार ‘आय’ (Ay) ह्यांचे टोंब आहेत.

ईजिप्तचे नाव निघाले कि सर्वात पहिले पिरॅमिडस, स्फिंक्स, नाईल नदी आणि तुतअंखअमुन (ज्याचा उच्चार तुतंखअमुन / तुतनखामून / तुतनखमून / तुतनखामेन आणि आणखीही काही वेगळ्या प्रकारे केला जातो.) ह्या गोष्टी आठवतात. परंतु तुतअंखअमुन हे नाव जगप्रसिद्ध झाले ते १९२२ साली हॉवर्ड कार्टर नावाच्या इंग्रज पुरातत्व शास्त्रज्ञाने त्याच्या न लुटल्या गेलेल्या टोंबचा शोध लावल्या नंतर, पुढची १० वर्षे त्यात सापडत गेलेल्या अतिशय मूल्यवान वस्तूंमुळे. आता त्याच्या टोंब मध्ये त्याची जीर्ण अवस्थेतली ममी सोडून बाकी काही ठेवलं नाहीये. एकूण ५३९८ वस्तू त्याच्या टोंब (KV 62) मध्ये सापडल्या ज्यात त्याचा ११ किलो सोन्याचा ममी मास्क, सोन्याचे आवरण चढवलेली त्याच्या ममी ची पेटी, खेळणी, मुर्त्या, पुतळे, वाद्ये, लाकडी पेटारे, खुर्च्या, सिंहासन, वाईन, भांडी, कपडे, पादत्राणे, हत्यारे आणि शाही दागिने, अशा अनेक गोष्टींचा समावेश असून त्यातल्या काही सध्याच्या कैरो मधल्या ईजिप्शियन म्युझियम मध्ये बघायला मिळतात तर उर्वरित वस्तू २०१८ अखेरपर्यंत सुरु होणाऱ्या गिझा मधील नवीन ग्रँड ईजिप्शियन म्युझियम (GEM) मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

याठिकाणी ६२ बघण्यायोग्य टोंब असले तरी ते सगळे रोज बघण्यासाठी खुले नसतात, रोटेशन पद्धतीने काही खुले तर काही बंद ठेवले जातात. साधारण एन्ट्री तिकिटावर त्या दिवशी खुल्या असलेल्या टोंब पैकी कुठलेही तीन टोंब बघता येतात अपवाद ‘सेटी I’, ‘रॅमसेस VI’, ‘तुतअंखअमुन’ आणि ‘आय’ ह्यांचे टोंब. ते बघण्यासाठी भरमसाठ किमतीची वेगळी तिकिटे काढावी लागतात. तुतअंखअमुनचा टोंब बघण्यासाठी तर १००० पाउंडसचे तिकीट होते. पण ह्याचा अर्थ असा नाही कि हे टोंब फारच सुंदर किंवा त्यातल्या वस्तू खूप मूल्यवान आहेत म्हणून त्यांची प्रवेश फी वेगळी आहे, तर त्या टोंबची अवस्था विशेष चांगली नसल्याने त्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या नियंत्रित करून पर्यटक आणि टोंब दोघांच्या सुरक्षेसाठी योजलेला तो एक उपाय आहे. शक्यतो पुरातत्व शास्त्रज्ञ, त्या शाखेचे विद्यार्थी आणि अपवादाने एखाद दुसरा पर्यटक त्याठिकाणी जातात.

आकाराने लहान मोठे असले तरी जवळपास सर्व टोंबची रचना सारखीच आहे. खाली उतरत जाणारा जिना, त्यापुढे दोन्ही बाजूला काही खोल्या असलेली एक सरळ किंवा डाव्या उजव्या बाजूला वळलेल्या अनेक लांब उताराच्या मार्गिका, मध्ये मध्ये अनेक खोल खंदक, अर्पण केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी खोल्या आणि सर्वात शेवटच्या खोलीत ममी ठेवण्यासाठी दगडी शवपेटी. काही टोंब मधल्या सर्व मार्गिका, खोल्यांच्या भिंती आणि छतावर सुंदर रंगीत कोरीव काम आणि देवी-देवांची चित्रे रंगवली आहेत तर काहींच्या फक्त शेवटच्या शवपेटी असलेल्या खोल्याच सुशोभित केल्या आहेत.

KV 5 हा रॅमसेस II च्या मुलांच्या दफनासाठी खोदलेला टोंब इथला सर्वात मोठा टोंब आहे. अनेक मार्गिका आणि १३० खोल्या आत्तापर्यंत आढळून आल्या आहेत पण त्यांची संख्या अजून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते.

गाईडना टोंबच्या आत प्रवेश नसल्याने इमादने आम्हाला कुठले कुठले टोंब बघता येतील याविषयी माहिती दिली आणि बघून झाल्यावर पुन्हा पर्यटक केंद्रात एकत्र भेटण्याची सूचना देऊन तो निघून गेला.

त्यादिवशी आम्हाला रॅमसेस II चा १३ वा मुलगा फॅरोह मेरेनटाह (Merenptah) चा KV 8, रॅमसेस IX चा KV 6 आणि अद्ज्ञात व्यक्तीचा KV 56 हा छोटा टोंब बघता आला. तिघांतल्या KV 8 टोंबची अबू सिंबेलला भेटलेल्या ‘कॉस्वे’ कडून नंतर मिळवलेली काही छायाचित्रे खाली देत आहे. सगळ्या टोंब मध्ये फोटोग्राफी निषिद्ध आहे, साध्यावेशातले सुरक्षा रक्षक फोन किंवा कॅमेरा हातात दिसला कि लगेच तो आत ठेवायला सांगतात परंतु त्याने कशीतरी ती काढण्यात यश मिळवले होते.

.


.


दगडी शवपेटी आणि तिचे आतले झाकण.

.


शवपेटीचे बाहेरचे झाकण. ह्याच्या खाली आरसा लावला आहे . आतल्या झाकणावर जशी वरच्या बाजूला फॅरोह ची आकृती कोरली आहे अगदी तशीच ह्या झाकणाच्या आत ती खोलगट आकारात कोरली आहे जेणेकरून दोन्ही झाकणे एकात एक घट्ट बसतील.

.


.


.


भिंती , छत आणि मार्गिकेची सजावट

.

तिन्ही टोंब बघून बाराच्या सुमारास सगळे ग्रुप मेम्बर्स पर्यटक केंद्राच्या हॉल मध्ये जमल्यावर त्या छोट्या ट्रामने आम्ही हॅतशेपस्युत टेम्पलला जायला निघालो. तिथे पोचल्यावर इमाद आमची प्रत्येकी ८० पाउंडस किमतीची तिकिटे घेऊन आला.
.


.


.

प्राचीन ईजिप्तच्या पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने आणि सुशासनाने इतिहासात स्वतःचा ठसा उमटवणारी अठराव्या राजवंशातली महिला फॅरोह हॅतशेपस्युत हिने ई.स.पूर्व १४७३ ते १४५८ ह्या तिच्या शासन काळात स्वतःचे स्मारक म्हणून हे मंदिर बांधले. लांबून हे मंदिर बघताना ते डोंगरात कोरल्या सारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते कोरलेले नसून बांधलेले आहे. हॅतशेपस्युत अमुन देवाची उपासना करतानाची अनेक भित्तीशिल्पे या मंदिरात होती.

हॅतशेपस्युतच्या मृत्युनंतर फॅरोह झालेला तिचा सावत्र मुलगा थुतमोस III ह्याने तिच्याविषयी असलेल्या पराकोटीच्या द्वेषातून हॅतशेपस्युतचे नाव इतिहासातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याचा फटका ह्या मंदिरालाही बसला. तिच्या मुर्त्या, कर्तुश आणि शिल्पांची त्याने विटंबना केली. त्याच्या मनातला हॅतशेपस्युत बद्दलचा द्वेष सोडला तर इतिहासात त्याचीही एक पराक्रमी आणि कर्तबगार फॅरोह म्हणूनच नोंद झाली आहे.

पुढच्या काळात फॅरोह आखेनातेन (Akhenaten) म्हणजे तुतअंखअमुन चे पिता ह्यांनी एकेश्वरवादी भूमिका स्विकारून ‘अतेन’ सोडून ईतर कुठल्याही देवांची उपासना करण्यावर बंदी आणली. ह्या मंदिरात अमुन देवाची शिल्पे असल्याने त्यांच्या आदेशाने त्या शिल्पांची नासधूस केली गेली. (तुतअंखअमुन फॅरोह झाल्यावर त्याने सल्लागार ‘आय’ (Ay) च्या सल्ल्याने हि बंदी उठवली आणि प्रजेत वाढलेला असंतोष दूर केला. तसेच त्याचे मुळचे नाव तुतअंखअतेन होते त्यातील ‘अतेन’ देवाचे नाव काढून ‘अमुन’ देवाचे नाव जोडले आणि ते बदलून तुतअंखअमुन असे केले.)

ई.स. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर मग रोमन लोकांनी उरलेल्या शिल्पांची विटंबना करून ह्या मंदिराचा चर्च म्हणून वापर करायला सुरुवात केली होती.
हॅतशेपस्युतच्या मंदिराचे काही फोटोज:

.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.

तीन वेळा मानवी अत्याचारांचा सामना केलेले हे दुमजली मंदिर १८९१ सालापासून सतत उत्खनन आणि रिस्टोरेशनचे काम सुरु असल्याने आज जवळपास सगळेच नव्याने बांधले गेले आहे.
.

रिस्टोरेशन होण्या पूर्वीचा मंदिराचा फोटो.

.


.

एक वाजता हे मंदिर बघून ट्रामने समोरच्या पार्किंग लॉट मध्ये आल्यावर व्हॅन मध्ये बसून आम्ही पुढचे ठिकाण अलाबस्टर फॅक्टरीला भेट देण्यासाठी निघालो.
.


.

संगमरवरा सारखा दिसणारा आणि तीन रंगात मिळणाऱ्या अलाबस्टर दगडापासून हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा कारखाना आणि त्यांची विक्री करणारे शोरूम असे त्या फॅक्टरीचे स्वरूप होते.

आत गेल्यावर मस्त थंडगार करकाडे पेय देऊन आमचे स्वागत केले गेले. इतकावेळ कडक उन्हात फिरल्यावर ते स्वादिष्ट पेय प्यायल्यावर जीवाला शांती लाभली.
अगदी बोटभर उंचीच्या अलाबस्टर दगडापासून बनवलेल्या मूर्तींपासून दीड-दोन फुटांच्या लँप शेड पर्यंत शेकडो सुंदर पण प्रचंड महाग वस्तू तेथे विक्रीसाठी ठेवल्या होत्या. आमच्या ग्रुपमधील कोणीही काहीही खरेदी न करता तिथून बाहेर पडलो आणि दोन वाजता पूर्व किनाऱ्यावर जाण्यासाठी असलेल्या बोटींच्या धक्क्या जवळच्या क्रोकोडाईल रेस्टॉरंट मध्ये दुपारचे जेवण करण्यासाठी आलो. ईजिप्शियन युवकांना लगेच कैरोला जाण्यासाठी निघायचे असल्याने ते तिघे जेवणासाठी न थांबता मोटरबोटीत बसून निघून गेले.

ईस्टर जवळ आल्यावर इथले बरेच ख्रिस्चन लोकं काही दिवस शाकाहार करतात म्हणून ह्या रेस्टॉरंट मध्ये त्यादिवशी बटाट्याची रस्सा भाजी आणि खुबुस असा शाकाहारी मेनू उपलब्ध होता. अर्थात इमाद ख्रिस्चन असल्याने त्यानेच हि माहिती मला दिल्यावर मग आम्ही दोघांनी तेच पदार्थ मागवून खाल्ले आणि बाकीच्या मंडळींनी बुफे लंचचा आस्वाद घेतला.

जेवण झाल्यावर बाहेर पडल्यावर सगळ्यांचा आळीपाळीने ग्रुप फोटो काढण्याचा कार्यक्रम पार पडला. दोन मोहम्मद आणि एक अहमद असे तिघे ईजिप्शियन, दर १५-२० मिनिटांनी दोन सिगरेट पेटवून त्यातली एक ‘जेड’ ला देणारी ‘क्लारा’ ह्या दोघी स्पॅनिश बहिणी, बॉब मार्ले चा भक्त म्हणता येईल एवढा निस्सीम चाहता जपानी ‘ईचीरो’, शांत मितभाषी कोरीयन ‘जुम’, दिसायला साधासुधा पण खूप बडबड्या अर्जेन्टिनाचा ‘थॉमस’. ग्रुप मध्ये सगळी अशी उत्साही मंडळी असल्याने आजची वेस्ट बँक वरची टूर खूप छान झाली होती.

.


मी, जेड, क्लारा, गाईड इमाद, ड्रायव्हर रहीम, आणि जुम पाठीमागे मागे हात उंचावलेला ईचीरो आणि त्याच्या शेजारी थॉमस

.

चालत सगळे जण समोरच्या धक्क्यावर आलो आणि बोटीत बसून पूर्व किनाऱ्यावर पोचलो. तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्हॅन मधून सव्वा तीनला मला माझ्या हॉटेलवर सोडून बाकीची मंडळी ईस्ट बँक वरची टूर करण्यासाठी निघून गेली.

रूमवर आल्यावर उद्या हुरघाडाला प्रस्थान करायचं असल्याने पहिले सामानाची आवरा आवर करायला घेतली. दोन्ही बॅग्ज भरून तयार केल्यावर लोळत पडलो असताना साडे चारच्या आसपास झोप लागली. साडेपाचला जाग आली ती मोहम्मदचा फोन आल्याने. कशी झाली टूर वगैरे चौकशी झाल्यावर तो सहा वाजता हॉटेलवर येत असल्याचे त्याने सांगितले.

आज उन्हात फारच भटकंती झाल्याने परत आंघोळ करून तयारी केली आणि सहा वाजता मोहम्मद हॉटेलवर पोचल्याचे सांगणारा त्याचा फोन आल्यावर खाली उतरलो.
आता एक महत्वाचे काम उरकायचे होते. उद्या सकाळी हुरघाडाला जाण्यासाठी ‘गो बस’ चे तिकीट बुक करायचे होते. ऑनलाईन बुक करण्याचा प्रयत्न केला होता पण माझा भारतातला फोन नंबर इथे बंद होता त्यामुळे बँकेचा OTP येत नसल्याने ते शक्य झाले नाही. लुक्झोर स्टेशन जवळ असलेल्या ‘गो बस’ च्या ऑफिस मध्ये मोहम्मद मला घेऊन गेला आणि मी सकाळी साडे-आठच्या बसचे तिकीट काढले.

आता काहीच काम नसल्याने एके ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही चालत मार्केट मध्ये थोडावेळ फिरलो. साडेसात पर्यंत उगाच इकडे तिकडे भटकून वेळ घालवल्यावर रात्रीच्या जेवणासाठी गुगलवर शोधून ठेवलेल्या ‘टेस्ट ऑफ इंडिया & अरेबिया’ नावाच्या भारतीय जेवण मिळणाऱ्या रेस्टॉरंटच्या दिशेने आम्ही निघालो.

‘रसेल’ नावाच्या ब्रिटीश नागरिकाच्या मालकीचे, छान सजावट केलेले हे रेस्टॉरंट काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या अकाली मृत्युनंतर आता बिशो नावाचा व्यवस्थापक आणि अहमद नावाचा शेफ मिळून चालवत होते. ‘सक्कारा’ नावाची ईजिप्शियन बीअर ऑर्डर करून ती आरामात बसून संपवल्यावर पनीर टिक्का मसाला, बटर नान, दाल तडका आणि जीरा राईस हे पदार्थ थोडे मसालेदार बनवण्याची खास सूचना शेफ अहमदला दिली. जेवण अप्रतिम बनले होते, अहमदने दाल तडका मध्ये हिरव्या मिरच्या सढळ हस्ते वापरल्या होत्या. दोनच घास खाल्ल्यावर मोहम्मदच्या नाका-डोळ्यात पाणी आले. तुम्ही भारतीय लोकं कसे काय एवढे तिखट खाता, आम्ही अरब जर असं जेवण चार दिवस जेवलो तर मरून जाऊ वगैरे त्याची बडबड चालू होती. अखेर हाय हुय करीत त्याचे जेवण संपल्यावर आईस्क्रिम खाऊन आम्ही तिथून निघालो तेव्हा नऊ वाजत आले होते.

सव्वा नऊला मला हॉटेलवर सोडल्यावर सकाळी आठला मला ‘गो बस’च्या ऑफिसवर सोडण्यासाठी येतो असे सांगून मोहम्मद माझा निरोप घेऊन घरी निघून गेला.
रूमवर आल्यावर थोडावेळ बायकोशी व्हॉट्सॲप वर गप्पा मारून दिवसभरातले निवडक फोटो वगैरे पाठवून झाल्यावर साडे दहा च्या सुमारास झोपलो.
(पुनःप्रकाशित)

क्रमश:

संजय भावे

आधीचे भाग:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा: विलक्षण आहे हे सगळे. सिंग इज किंग या चित्रपटातले जी कर दा भाई जी करदा हे गाणे ह्या महिला फारोहाच्या देवळापुढे चित्रित झाल्याचे दिसतेय

@ बाबा कामदेव
होय काही दृश्ये ह्या देवळापुढे आणि बहुतांश भाग कर्नाक मंदिरात चित्रित झाला आहे त्या गाण्याचा.