कृष्ण घालितो लोळण (ग्रीस ६)

Submitted by Arnika on 2 November, 2018 - 10:13

“मंदीच्या काळात सबंध घराला जग दाखवायला बाहेर घेऊन जाणं परवडत नाही, पण जगभरातून माणसं आमच्याकडे येणार असतील तर आम्ही त्यांचा पाहुणचार आनंदाने करू”. दीमित्रा म्हणाली होती.

मुलांना जग दाखवायची ही पद्धत कमाल आहे की नाही? इथल्या बऱ्याच घरांमध्ये उन्हाळाच्या दिवसांत मुलांना सांभाळायला कोणीतरी लागतं, कारण आई-बाबांच्या उद्योगधंद्याची चांदी त्याच दिवसांत व्हायची असते आणि त्यांना कामातून डोकं वर काढायचीही उसंत नसते. तसंच आमच्याही घरी मी दीमित्राच्या दोन वर्षांच्या मुलाला सांभाळते आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीला कुठे काही मदत लागली तर करते. सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंतचं हे यशोदापण, त्यात शिकल्या-शिकवलेल्या गोष्टी आणि आमच्या कृष्णामुळे भेटलेली बाकी लहान मुलं म्हणजे माझ्यासाठी सिक्यामधला खजिना आहे! एकूण एक किस्से सांगून मला तो अनुभव 2D करायचा नाहीये. शिवाय अमीलिया एअरहार्ट म्हणाली होती तसं “Please let the world not see our private joys or disagreements” हे आमच्या-आमच्यातलं नजरेने दिलेलं वचनही मोडायचं नाहीये. पण या दोघांमुळे माझा मैत्रीवर नव्याने विश्वास बसला त्याची आठवण म्हणून काही गोष्टी न विसरता सांगायच्या आहेत.

या बहीण-भावंडांची नावं ख्रिश्चन नाहीयेत; ग्रीक पुराणातली अनवट नावं आहेत. आपल्याकडे हल्लीच्या लहान मुलांची नावं द्रौपदी आणि गंधर्व असली तर कसं आश्चर्य वाटेल, तसं या दोघांच्या नावाचं ग्रीक लोकांनाही वाटतं. ताईचं नाव आरियाद्नी आणि बाळाचं नाव यासोनास.

मी आल्या दिवशी ओळख करून घ्यायला गेले तेव्हा आरियाद्नीने माझ्याकडे नुसतं वळूनही पाहिलं नाही. नाव विचारलं तरी ती आकाशाकडे बघत राहिली. मी असं करायचे तेव्हा मला फार प्रश्न विचारलेले नको असायचे म्हणून मीही तिला उगाच “ए तू कितवीत आहेस गं?” असलं काहीतरी विचारायला गेले नाही. दोन-तीन दिवस तिचा वावर बघून मला एवढं समजलं की फार कष्टाने तिच्याशी मैत्री करायला नको. तिला जितकं झेपतंय, आवडतंय तितकंच बोलू द्यावं आणि जे काही अडेल तिथे मदतीला असावं. कसा कोण जाणे, पण कदाचित यामुळे तिचा विश्वास बसत गेला माझ्यावर. हळुहळू मला तिला शाळेत सोडायची परवानगी मिळाली. दुपारच्या वेळी माझ्या वेण्या घालायची परवानगी तिने स्वतःला दिली. आज तिला दर जेवणावर माझ्याकडून एक गोष्ट हवी असते. गोष्टीत रस असतो म्हणून आणि मी कठीण शब्दापाशी अडखळले की तिला हसू येतं म्हणूनही! मी तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ थांबावं म्हणून ती हजार तुकड्यांचं पझल, माझे केस एकेक करून मोजायचा खेळ, माझ्या चपला लपवणं असल्या युक्त्या करत असते. लहानपणी मीही मामा लवकर जाऊ नये म्हणून त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवायचे. त्याची परतफेड मी ग्रीसमध्ये करत्ये म्हणायचं!

थोड्या दिवसांनी मी निघणार हे आठवलं की आरियाद्नी आता माझ्या कमरेभोवती हात घालून उभी राहाते. परवा दीमित्रा मला सांगत होती की “जर्मनीत तुझ्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. जर्मनीतही जाऊ शकतेस तू”. झालं! आरियाद्नी जी काही फिसकटली की बास! अर्निकाला आपलं घर सोडून जायची आयडिया तू देऊच कशी शकतेस म्हणून तिने आईपाशी दुपारभर धुसफूस केली. मग म्हणाली, “अर्निका, तू माझ्या शाळेत इंग्लिश शिकवायला ये. तुला ते नोकरी देतील कारण तुझं वजन साधारण आमच्या इंग्लिशच्या सरांइतकंच आहे”. कोण म्हणालं प्रमोशन फक्त ऑफिसमध्ये होतं?

यासोनास आणि मी मात्र भेटल्या दिवसापासून ‘आय लव्ह यू’ होतो. मला पाहिल्यावर पहिल्या दहा मिनिटांत तो माझ्याकडे आला काय, माझ्याशी खेळला काय, आणि मी झोपायला दुसऱ्या खोलीत जाताना थयथयाट केला काय! तो पहिल्यांदा एकट्याने जिना चढून आला तो माझ्या खोलीत मला सकाळी उठवायला आला. ओट्यापाशी उभा राहून भाज्या धुण्यापासून वाफ जिरेपर्यंत पहिला स्वयंपाक त्याने माझ्याबरोबर केला. कधी फार चिडचिड झाली, लागलं, रडू-रडू झालं की त्याला कोणी नको असतं तेव्हाही ‘नोन्ना’ हवी असते (नोन्ना म्हणजे गॉडमदर). त्याचे आई-बाबा आजुबाजूला असतानाही त्याच्या जेवणा-खाणाच्या वेळा, झोप, खेळ हे सगळं माझ्या मनाप्रमाणे करायची मुभा मला असते. काळ्या केसांची मुलगी आणि तिला चिकटलेलं सोनेरी केसांचं बाळ बघून एका म्हातारीने मला विचारलं, “तुझा नवरा नक्की किती गोरा आहे म्हणायचा?”.

सहवासाने हळुहळू वाढत जाणारी मैत्री आणि बघताक्षणी पक्की झालेली मैत्री या दोन्ही खऱ्या असू शकतात; प्रेम दाखवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते; आणि दोन्ही प्रकारची मैत्री विश्वास ठेवण्यालायक असते हे आरियाद्नी आणि यासोनासमुळे मला नव्याने समजतंय...

मी त्या दोघांची कितीही कौतुकं सांगितली तरी ती बाकी ताया, आत्या, मावश्या, माम्या आणि (अंमळ धाडस करून मी म्हणेन की) एखाद्या आईसारखीच वाटतील. किस्से वेगवेगळे असले तरी तो बंध एकच आहे. मूल समोर आल्यावर त्याची काळजी घ्यावीशी वाटणं हे कोणी तिसऱ्याने सांगितल्यामुळे नसतं; हवी ती बटणं निसर्गच आपल्या आतून चालू करत असावा. हे मला माझ्या भाचरांबरोबर असताना दरवेळी जाणवायचं. गेल्या दोन महिन्यांत तर खात्रीच पटल्ये. मुलांच्या संगोपनाबद्दल दहा जणांनी दहा गोष्टी सांगितल्या तरी शेवटी ‘तुझा तू वाढवी राजा’ या इन्स्टिंक्टवरच आपण चालतो. आपल्या भोवतालात पाहिलेल्या गोष्टी नकळत आपल्यात उतरतात.

आई आणि आत्याने मला सांगितलेली, आमच्या बाबतीत केलेली एक गोष्ट मात्र मी जाणीवपूर्वक केली आणि त्याबद्दल त्या दोघींना खास आनंद होईल म्हणून ती सांगायचीच आहे मला. लहान मुलं स्वयंपाकघरात आली तर लुडबुड होते म्हणून त्यांना हकलायचं नाही. त्यांनाही जरा जरा मदत करू द्यायची. मग एखाद दिवशी दुप्पट वेळ लागला तरी बेहत्तर! कधीकधी आरियाद्नी आणि यासोनासला एकेक स्टूल देऊन ओट्यापाशी उभं करून आमचा स्वयंपाक चालतो. मोठमोठ्या घमेल्यात भाज्या नि पास्ता ढवळताना त्यांना काय थ्रिल वाटतं! आपल्या हातून काही सांडलं तर ते पुसायला दोघं घाई करतात. आपण स्वयंपाक केला म्हणजे भांडी आई-बाबा घासणार या आनंदात टाळ्या पिटतात...

आमच्या होटेलच्या खोल्या म्हणजे छोटीशी घरंच आहेत. खाली लायब्ररी आहे, फळा-खडू आणि खेळणी आहेत, मुलांना खेळायला बागही आहे. गावभर हुंदडायला सायकली आहेत आणि किनाऱ्यावर पडून राहायला खाटा आणि आरामखुर्च्या आहेत. बाकी समुद्राची गाज काय, स्वतःच्या श्वासापेक्षा जास्त ऐकू येते. इथे राहायला येणारी कुटुंब वर्षानुवर्ष इथेच येतायत. दोन-तीन आठवडे आराम करून, आजुबाजूची गावं बघून मग जातात त्यामुळे तेवढ्या वेळात त्या पाहुण्यांशी ओळखी होतात. त्यांची मुलं आमच्या मुलांचे खास मित्र-मैत्रीण होतात.

काही पालक सतत पोरांना “इकडे नको जाऊ, फार नको धावू” करतात. जरा कपडे मळले की ओरडतात आणि जरा हात-पाय खरकटे होतील या भीतीनेच भरवायला घेतात. मी लहान मुलांबरोबर, तान्ह्या बाळांच्या आयांबरोबर काम केलंय, पण मला स्वतःला मुलं नाहीयेत. त्यामुळे मी उंटावरून हाकलेल्या ९७ शेळ्या आपण सोडून देऊया. उरलेल्या तीन मी बरोबर हाकत्ये असं मी ठरवलंय. पहिली म्हणजे दीड-दोन वर्षाहून मोठ्या मुलांना ‘भरवणे’ प्रकार बघून मला वैताग येतो. भूक समजणं आणि जेवणं हा बेसिक गुण उपजतच असतो प्रत्येक बाळाकडे. त्यासाठी आई-बाबांनी घरभर फिरत बाळाला फुलं लावायची गरज का असावी मला कळत नाही. दुसरी शेळी म्हणजे मुलांना विचारलेल्या प्रश्नाची आई-बाबांनी उत्तरं देणं, आणि तिसरी, कल्पकतेने मुलांशी न खेळणं. दीमित्राकडे यातला एकही प्रकार घडत नाही, पण होटेलवर येणाऱ्या पाहुण्यांमध्ये सगळे नमुने बघायला मिळतात. त्या मानाने इकडे येणारे स्विस, रशियन आणि जर्मन आई-बाप पोरांना चिलखत घालून खेळायला पाठवल्यासारखे निवांत असतात.

एकदा एका लहान मुलीने गावातल्या द्राक्षाच्या मळ्यात जाऊन तिच्या आईसाठी एक छोटीशी वाइनची बाटली आणली. दुसऱ्या दिवशी तिने आईला ती वाइन घ्यायचा आग्रह केला तर आई म्हणाली, “तशी वाइन आवडत नाही मला. मी ती दुसऱ्या कोणालातरी भेट म्हणून दिली”. एवढ्या कौतुकाने आठ वर्षांच्या मुलीने काहीतरी आणलं त्याची जराही किंमत करवली नसेल का त्या आईला? मला ते बघून त्यांच्यासमोरच रडायला आलं. त्या बाईवर मी कायमची फुली मारल्ये (आणि तिने तसं का केलं असेल याबद्दल मला कोणाचा ‘व्ह्यूपॉईंट’ वगैरे नकोय). दुसऱ्या दिवशी त्याच बाईला तोंडभर हसून चहा सर्व्ह करून मी खूपच प्रोफेशनल वागले. छे! वाढत्या वयाचे परिणाम...

पाहुण्यांपैकी एक पाच वर्षांची मुलगी माझ्या कायम लक्षात राहाणार आहे. मातृत्त्व किती म्हणजे किती भरलेलं असावं एखाद्या लहान मुलीत? लपाछुपी खेळताना माझ्यावर तिसऱ्यांदा राज्य आलं तर तिने मला तहान लागली असेल म्हणून पाणी आणून दिलं. कुठल्यातरी बाळाच्या चपलेचा बंद सैल झाला होता तर हिने त्याला कडेवर घेतलं आणि त्याच्या बाबांकडे नेऊन सोडलं. तिची धाकटी बहीण फुलं खात होती तर तिने स्वतःच्या वाटीतले सगळे बेदाणे बहिणीला दिले... ती जायला निघाली तेव्हा होटेल इतकं भकास वाटायला लागलं होतं! महेश्वर तिवारींची कविता वयाच्या पाचव्या वर्षीही फिट् आहे तिच्यासाठी -- एक तुम्हारा होना क्या से क्या कर देता है, बेज़ुबान छत-दीवारोंको घर कर देता है.

‘खूप शिकायला मिळालं’ म्हणायची पद्धत झाल्ये... मला असं पटापट समजत नाही शिकलेलं. छोट्या शिशुतल्या ‘पोहत राहीन प्रवाहात’ या ओळीचा अर्थ अत्ता अत्ता समजायला लागलाय; मग या दोन महिन्यांत मी नक्की काय काय शिकल्ये हे तर मला पुढची कित्येक वर्ष उमगत राहील. तरीही ज्यांनी मेसेज करून हे विचारलंय त्यांना ताबडतोब उपयोगी पडेल असं काही सांगायचंच झालं तर.... हं! बाळाने शी केली आहे अशी जरा जरी शंका आली तर त्याला घसरगुंडीवर खेळू देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> या दोन महिन्यांत मी नक्की काय काय शिकल्ये हे तर मला पुढची कित्येक वर्ष उमगत राहील.
वा! सुरेख!

खूप छान, खरं, मनापासून लिहिता तुम्ही,वाचून शांत आणि आनंदी वाटतं.
असेच खूप छान छान अनुभव घेत रहा आणि त्याबद्दल लिहीत रहा.
आम्ही सर्व वाचत राहू आणि त्याचा आनंद घेत राहू .

अर्निका, सुरेख अनुभवकथन चालू आहे! दरवेळी नवीन पोस्ट/माबो लेख आला की मी तुझे मागचे एक दोन लेख वाचून काढते. आणि गंमत म्हणजे मला त्यात दरवेळी काही तरी नवीन सापडतं! ही एक वेगळीच मजा आहे तुझ्या लिखाणात Happy जीते रहो.. लिहिते रहो!

छान ग्रीस संस्कृतीचे छान वर्णन वाचायला मिळत आहे सहसा एखाद्या विशिष्ट ठिकाणचे वर्णन वाचाव्यास मिळते पण व्यक्ती वैशिष्ट्य येथे छान प्रकारे लिहले आहे

लेखाचं नाव फारच आवडलं.

अवांतरः
ह्या गाण्याची (?) दोनंच कडवी मला माहित आहेत. अजूनही आहेत काय?

कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली ती धावून
सांग रे कृष्णा काय हवं तुला, देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं - १
कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली ती धावून
सांग रे कृष्णा काय हवं तुला, देते मी आणून
आई मला साप दे आणून, त्याची काठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं - २

एक तुम्हारा होना क्या से क्या कर देता है अर्निका,
मायबोलीवर वाचण्यायोग्य लेखन अजून ही चालू आहे ह्या समजूतीला बळकटी देतं.

सशल गाण्याबाबत धन्यवाद.
हे पहा https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A...

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

हे वाढीव कडवं सापडलं

आई आणि आत्याने मला सांगितलेली, आमच्या बाबतीत केलेली एक गोष्ट मात्र मी जाणीवपूर्वक केली आणि त्याबद्दल त्या दोघींना खास आनंद होईल म्हणून ती सांगायचीच आहे >>>
खूप आनंद झाला खरा !! मस्त लिहिते आहेस , मनाजोगतं जगते आहेस याचा ही... जियो!!

गोड मुलगी असशील तू.इतके मेंटली टायरिंग अनुभव सहजगत्या मागून घेतेस.
फोटो पाहून कोणातरी बॉलिवूड नटी ची आठवण येतेय.