चाँद सिफ़ारिश (ग्रीस ४)

Submitted by Arnika on 9 October, 2018 - 16:55

मायबोलीकर, सध्या मी या गावात असेपर्यंत मला प्लीज माफ करा. खूप इच्छा असूनही फोटो अपलोड होत नाहीयेत. आठवड्याभरात तो प्रश्न सुटेल आणि मग मी फोटो टाकत जाईन.
---------------
पृथ्वी आणि आकाशाला तीन मुलं झाली असं सांगितलंय ग्रीक पुराणात. तिघांनीही आपापल्या करिअरमध्ये अगदी नाव काढलं. त्यातला मोठा मुलगा ‘ईल्योस’ सूर्यरथ चालवतो. मुलगी ‘सेलेनी’ चंद्राची सारथी आहे, आणि डाळिंबी रंगाची बोटं असलेली धाकटी बहीण ‘इयोस’ पहाट व्हावी म्हणून क्षितिजाचे दरवाजे उघडते म्हणे. ईल्योस सर्वज्ञ आहे, तळपता आहे. इयोस सुंदर आहे, दयाळू आहे. आणि चंद्राचा रथ हाकणारी माझी लाडकी सेलेनी तेजस्वी आणि शूर आहे. चंदेरी पंखांची, काळ्याभोर केसांची ही देवी कुठलाही धोका पत्करून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी अभिसारिका आहे. एका प्राचीन नाटककाराने तिला ‘रात्रीचा डोळा’ म्हंटलंय. आणि माझ्यासाठी लाखमोलाचं म्हणजे सिक्याच्या समुद्रावर त्या चंद्रदेवीची विशेष मर्जी असावी...

तसा चंद्र काही नवीन नाही कुणालाच. त्याच्याबद्दल लिहिलं गेलं नाही असं काहीच नसेल. तरीही मला रोज तो दिसावा आणि मी बघत बसावं असं वाटतंच. गेल्या कोजागरीला मी लिहिलंही होतं लहानपणी चंद्रासाठी केलेल्या घोर तपश्चर्येबद्दल : ‘हम दिल दे चुके सनम’ मधली ऐश्वर्या तिच्या त्या जाळीदार, खडे लावलेल्या ओढणीतून चंद्र बघते तशी ताजी फॅशन मलाही करून बघायची होती. मग मी एक जुनी (जांभळीच हं, सेम ऐश्वर्यासारखी) मच्छरदाणी घेतली. फेविकोलने तिला खडीसाखर चिकटवली आणि ती खिडकीत धरून चंद्र बघायला लागले. मच्छरदाणीला मुंग्या आल्या. मग लपून छपून ती पाण्यात बुचकळली आणि पांघरुणाने पुसली... एवढं करून त्या जाळीतून चंद्र धुसर, मळकटच दिसत होता. माझा किती विरस झाला असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

त्या वेडेपणाचं बक्षीस म्हणा, इंग्लंडसारख्या ढगाळ देशात पंधरा वर्ष राहिल्याची नुकसान भरपाई म्हणा किंवा सोन्यासारखं नशीब म्हणा, सिक्याला आल्यापासून पूर्वी न दिसलेल्या सगळ्या चंद्रांचं उट्टं निघतंय. आकाशाकडे बघितलं नाही तरी चंद्र पाण्यावर दिसतो. एकदा गच्चीतून, एकदा खोलीच्या खिडकीतून आणि एकदा छतावर चढलेल्या जाईच्या वेलीतून असा रात्रभर दिसत राहातो. सुरुवातीचे सलग पाच दिवस खिडकीसमोरच्या डोंगराआडून चंद्र उगवताना बघून काय करू आणि काय नको असं झालं होतं. चांदण्यात बसून येत होती-नव्हती ती सगळी गाणी म्हंटली त्याच्यासाठी. माझ्या डोळ्यांना दिसणारा चंद्र मी आजवर कधीच कॅमेराला दाखवू शकले नाहीये, पण सेलेनीने माझ्या आकाशात रोज चंद्र वाढलाय याची आठवण म्हणून यावेळी मुद्दाम फोटो काढले.

रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रोदय कधी होईल याबद्दल माझा अंदाज बरोबर निघाला आणि मला एवढा कॉन्फिडन्स आला, की वाटलं हे असंच होत राहिलं तर तीन महिन्यांनी आपण अर्निका पंचांगच सुरू करू शकू! पुढच्या आठवड्यात रात्री साडे आठ वाजता माझ्यामागे होटेलमधले चार पाहुणे चंद्र बघायला गच्चीत आले आणि पोपटांचा थवा झाला आमचा. पहाटे दीड वाजेस्तोवर चंद्र दिसलाच नाही. त्यामुळे सध्यातरी निर्णयसागरच फॉलो करायला लागेल.

उन्हाळातल्या पौर्णिमांची ग्रीसमध्ये फार वाट बघतात. माणसांची वर्दळ असते, समुद्र शांत असतो, लोकांकडे पैसा खेळता असतो, शाळांना सुट्ट्या असतात आणि सबंध रात्रभर चंद्र फुगलेल्या तांदुळाच्या भाकरीसारखा स्वच्छ दिसत राहातो. रात्री नऊनंतर अख्खं गाव किनाऱ्यावर उतरतं. हिवाळ्यातली मंदी चालू होण्याआधी एकत्र येऊन चार घास खावेत, थोडी वाइन घ्यावी आणि आदल्या तीन-चार महिन्यांत जी चांदी झाली असेल ती साजरी करावी म्हणून लोक किनाऱ्यावर भेटून जेवतात. सिक्यामध्ये यंदा रोशणाई करून, गाणी गायला दोन लाइव्ह बँड घेऊन होड्या पाण्यात उतरल्या होत्या. गाणी ऐकत सबंध गावाची जेवणं पहाटे दोनपर्यंत चालली!

कोरिन्थीया म्हणजे आमचं राज्य. इथल्या ‘आग़ियोन ओरोस’ किल्ल्याचा जीर्णोद्धार नुकताच पूर्ण झाला. जुन्या वास्तू सांभाळण्याची प्रत्येक महापौराची कल्पना वेगळी असते. काहींना त्या शक्य तितक्या पिंजऱ्यात, लोकांच्या नजरेत येणार नाहीत अशा रुपात झाकून टिकवायच्या असतात आणि काहींना तिकडे लोकांची वर्दळ वाढावी आणि त्यानिमित्ताने गाव नावारुपाला यावं असं वाटत असतं. तर सध्या कोरिन्थीयाचे दिवस नावारुपाला येण्याचे आहेत. इथल्या एका नगरसेविकेने किल्ल्याचं उद्घाटन करायला पौर्णिमेला सोहळा ठेवला होता आणि चर्चमधल्या एका भजनी मंडळाला गायला बोलावलं होतं. एरवी फक्त मेंढ्यांचा वावर असलेल्या त्या डोंगरातल्या गावाला एकदम जाग आली! शे-दीडशे टाळकी गोळा झाली; तो ओसाड किल्ला गजबजला.

चौदाव्या शतकातला बिझांतीनी (Byzantine) साम्राज्यातला हा मानाचा किल्ला होता. ‘आर्ग़ोस’ नावाच्या प्रांताशी कोरिन्थीयाला जोडणाऱ्या वाटेवर असल्याने दोन्ही प्रातांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी सोयीचा होता. बरंच काम करूनही तो ओसाड वाटतो, पण डगडुजीच्या निमित्ताने नजरेत तरी आलाय आता. बालेकिल्ल्यावरून खाली पाहिलं तर भजनी मंडळ चांदण्यात स्टेजवर उभं राहिलेलं दिसत होतं. घाईघाईने खाली आलो खरे, पण त्यांच्या गाण्याने वीट आणला. कमालीचे हौशी, आणि दुःखी चेहऱ्याने वावरणारे कलाकार होते सगळे. आपलं देवळातलं एखादं भजनी मंडळ आणून किल्ला दणाणून टाकावासा वाटायला लागला मला...

कार्यक्रम आटोपल्यावर मंडळी एकमेकांचं अभिनंदन करत होती. या कामासाठी पैसे उभारून, ते पूर्ण करून लोकांपर्यंत पोचवणं अत्ताच्या कडकीच्या दिवसांत सोपं नव्हतं. मी पण केलं अभिनंदन सापडेल त्याचं. रापलेला रंग, माझा चुडीदार आणि कुंकवामुळे हे प्रकरण फॉरेनचं आहे हे माझ्याकडे बघून सहज कळत होतं. वाटेत एक माणून जातीने थांबून बोलला. किल्ल्याचं महत्त्व आणि युद्धनीतीत तो कसा मोलाचा होता ते सांगायला लागले काका. या किल्ल्यावरून बाकीचे किल्ले कसे दिसतात आणि हे डोंगराळ बांधकाम कसं खास आहे वगैरे वगैरे... मग मी पण त्यांना राजगडावरून तोरणा कसा दिसतो, आमचा बालेकिल्ला कसा आहे, महाराजांची पहिली राजधानी कशी युद्धनीतीसाठी चोख होती वगैरे सांगितलं. अजून किती सफाईने ग्रीक यायला हवंय ते माझं मला कळलंच, पण टेहळणी, पीलखाना वगैरे शब्द मला ग्रीकमध्ये येत नाहीत म्हणून वाचले काका. नाहीतर त्यादिवशी खलबतखान्यातून सुटका नव्हती त्यांची.

परतीच्या वाटेवर दीमित्राच्या ओळखीच्या दोन बायका भेटल्या. मला म्हणाल्या, “वा! आज कोरिन्थीयाचे मेयर साहेब बऱ्याच गप्पा मारत होते की तुझ्याशी!”
मेयर? बाप रे... बिचाऱ्यांचा इतिहासाचा तास घेतला होता मी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आतापर्यंत वाचलेल्या सर्वांमधे तुमची शैली अगदी भिन्न आहे. पण मला ही आवडतेय. वाट पाहतो तुमच्या लिखाणाची.
खूप वेगळा अनुभव. आपण तिथे प्रत्यक्ष असल्यासारखं वाटतं वाचतांना..

किल्ल्याची माहिती देणारे मेयर हे खूप भावलं. आपल्या गावात कुणी फॉरीनर आलेला आहे याचं अप्रूप फक्त आपल्याकडेच असावं असं वाटायचं. पण ग्रीक लोकंही अपवाद दिसत नाहीत. कदाचित ग्रीस कर्जबाजारी असल्याने हे स्वतः ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नसावेत का ? काही असो. त्यांचं आपल्या गावातल्या किल्ल्याची माहिती देणं खूप आवडलं... ये आदमी मेरे टाईप का लगता है !

मस्तच! भजनी मंडळ Lol
चंद्र रोज बावन्न मिनिटे उशिराने उगवतो Happy
तांदळाच्या भाकरीची उपमा आवडली.

अर्निका पंचांग,
पोपटांचा थवा
चर्चमधलं भजनी मंडळ
कमालीचे हौशी आणि दुःखी चेहरे
मेयर साहेबांचा घेतलेला इतिहासाचा तास

सगळंच आवडलं

सुंदर लिहीले आहे.
संपूर्ण लेखमालाच छान आहे. >>> +१
एका वेगळ्याच जगात फिरौन आल्यासारखे वाटते दर भागात.. Happy

अर्निका, जियो यार!!!!
सगळी मालिका वाचतेय.. फार सुंदर लिहितेस ( हे आता कितीदा सांगू Happy
खूपच वेगळा आणि मस्त अनुभव मिळवत आहेस.

हा ही भाग मस्तच.
पोपटांचा थवा>>>>> Happy
दीमित्रा बाईचं नाव आहे ना? मागच्या भागात वाचलंय.
माझा एक पुरुष कलीग आहे त्याचं नाव दीमित्री आहे Happy

मीना प्रभू यांची प्रवास वर्णने वाचली आहेत पण त्याहीपेक्षा तुमचे लेखन उजवे वाटले आणि तुमच्या लेखनाचे चाहते झालो।

किरणुद्दीन, ही माणसं स्वतःला फार समजत नाहीत आणि कमीही लेखत नाहीत. पण त्यांना बाहेरचं वेगळं जग दिसावं/कळावं असंही फारसं वाटत नाही. आहे हे असं आहे टाइप! हे मी फक्त गावातलं सांगत्ये हं.

देवी साहेब, खूप मोठी काॅम्प्लिमेंट आहे ही! धन्यवाद Happy
वावे, हो ते बावन्न मिनिटांचं गणित अत्ता अत्ता समजायला लागलंय.
सस्मित, बाई दीऽमित्रा असते आणि पुरुष दिमीऽत्री. शुद्धलेखन कठीण आहे यांचं Happy

दिमित्री......फक्त गौरी देशपांडे च्या लेखनातून भेटलेला आजवर! Happy इयन आणि दिमीS त्री....
छान लिहीलंय..पण त्रोटक वाटतं.....

अर्निका पंचांग, चर्च भजनी मंडळ Lol

मेयर? बाप रे... बिचाऱ्यांचा इतिहासाचा तास घेतला होता मी. >>> Lol

मस्तच, लय भारी.