सेटलमेन्ट बाबा

Submitted by मोरपिस on 24 September, 2018 - 06:47

(या कथेतील पात्रे व घटना काल्पनिक आहेत.)

मी पोपटराव हिरवे. मी एका छोट्याशा नाटक कंपनीमध्ये मेकअपमन आहे. आजपर्यंत मी अनेक कलाकारांचा मेकअप केला आहे. फक्त माझं नावच पोपटराव हिरवे आहे. पण माझ्या आयुष्यात नावालासुद्धा हिरवळ नाहीये.
मी आजपर्यंत कित्येक हीरोइन्सचा नवरीच्या वेशातील मेकअप केला आहे. पण, माझ्यासाठी अजूनपर्यंत एकही मुलगी नवरीचा मेकअप करून आली नाही. माझ्या आयुष्याची छत्तीस वर्ष पूर्ण झाली तरीही मी अजून लग्नासारखा पवित्र क्षण अनुभवला नाहीये. हिरवा शालू नेसलेली, हिरव्या बांगड्या घातलेली, कपाळावर कुंकू आणि गळ्यात काळे मणीमंगळसूत्र घातलेल्या माझ्या नवरीचचे स्वप्न मी दिवसरात्र पाहत असतो.
लग्न होण्यासाठी देवाला नैवेद्य दाखवले. पूजाअर्चा करून ग्रहशांती केली. उपास-तापास केले. लोक वकिलांच्या घराच्या पायऱ्या झिजवतात, मी पंडितांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या. लहान-मोठ्या सर्व पंडितांना माझी जन्मपत्रिका दाखवली. कॉम्प्युटरवरून डिजिटल जन्मपत्रिकासुद्धा काढून घेतली. ज्योतिषांना हात दाखवून दाखवून मलाही थोडीफार ज्योतिषविद्या यायला लागली आहे. जवळच्या, लांबच्या सगळ्या नातेवाईकांना माझ्यासाठी स्थळे बघायला सांगितली आहेत. प्रत्येक मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवले आहे. पण सगळीकडून नकार, असफलताच मिळत आहे.
काळ्याला गोरी आणि टकल्याला काळेभोर केसांवाली बायको मिळते तर मीच एवढा कमनशिबी का आहे. पण म्हणतात ना कधी ना कधी देव आपली इच्छा जरूर पूर्ण करतो. उशिरा का होईना मला एक आशेचा किरण दिसला. माझा एक मित्र आहे रामू. त्याने मला एका प्रसिद्ध बाबांचा पत्ता दिला. बाबांचं नाव होत 'सेटलमेंट बाबा'. माझ्या मित्रालाही अशीच लग्नाची अडचण होती. त्याने बाबांनी दिलेल्या नियमांचे पालन केले आणि काही दिवसातच त्याचे लग्न ठरले.
मीही त्या बाबांकडे जायचा निर्णय घेतला. पण त्या बाबांचा भक्तांचे प्रश्न सोडवण्याचा मार्ग खूप विचित्र होता. डॉक्टर आपल्याला औषध देऊन आपल्याला बरे करतो, ज्योतिषी पत्रिका बघून आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो. पण हे बाबा काही विचित्र इलाज करतात. जर आपल्याला बाबांकडून आपली समस्या सोडवून घ्यायची असेल तर आपल्याला त्या समस्येचे रूप धारण करून बाबांकडे जावे लागेल. नाही समजलं ना? जर कुणाला डॉक्टर होण्यात अडचणी येत असतील तर तो माणूस डॉक्टरचे कपडे घालून बाबांकडे जाईल, जर कोणाला वकील व्हायचे असेल तर तो काळा कोट घालून जाईल. मला तर माझी नवरी (बायको) हवी होती त्यामुळे मला नव्या नवरीसारखे नटून-थटून बाबांकडे जावे लागणार होते. जर माझं लग्न होणार असेल तर नवरीच काय मी गाढव बनायलासुद्धा तयार होतो. गाढवापेक्षा नवरी बनणं तस सोपं होत माझ्यासाठी.
वय वाढलं तरी लग्न न होणं हे समाजाला कधीच पटत नाही. लोकसुद्धा काय काय अंदाज लावतात, त्याला कोणतातरी गंभीर आजार असेल, मुलगा व्यसनी, जुगारी असेल, त्याचे बाहेर काहीतरी प्रेमप्रकरण सुरु असेल एक ना अनेक विचार! ज्याचं वय वाढत चाललंय त्याला तर याचा पत्तादेखील लागत नाही. पण, एके दिवशी कोणीतरी त्याला 'काका','मामा' म्हणून हाक मारते तेव्हा त्या व्यक्तीला जबरदस्त सरप्राइझच मिळते. एखाद्या रस्त्यावरच्या मवाल्याने 'सुन बे' म्हटले तरी काय वाटत नाही पण काका? मामा? मुळीच नाही. इज्जतीचा पंचनामा तर तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला माणूसही आपल्याला काका म्हणून हाक मारतो. तेव्हा तर असं वाटत कि त्याच्या तोंडावर एक मुक्का मारावा आणि त्याची कॉलर पकडून 'तुला दिसत नाही का? आंधळ्या! तू काका तुझं खानदान काका' असे विचारावे. पण राग आवरून गप्प बसायचो. माझे केस पांढरे व्हायच्या आधी आणि काकापासून 'आजोबा' व्हायच्या आधी मला लग्न करायचे होते. म्हणून मी निघालो 'मिशन लग्न' पार पाडायला 'सेटलमेंट बाबांकडे'!

क्रमशः
(ये तो ट्रेतर है, आगे पिक्चर बाकी है)

Group content visibility: 
Use group defaults

स्टोरी कुठेय Uhoh फक्त एक असे दिसतेय.
मजकुर पोस्ट करताना कृपया पूर्ण लेख आलाय ह्याची खात्री करुन पहा. (Save/प्रतिसाद तपासा)

तीन Happy

माफ करा. मी येथे नवीन असल्याने चुकीने असे झाले. कृपया माफ करा. मी पूर्ण लेख संपादित करून पुन्हा येथे वाचण्यासाठी दिला आहे.

धन्यवाद!
पुढचा भाग आज-उद्यामध्ये लिहेन