व्यक्तिचित्रण ---आमचा आधार " पुष्पा " --- मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 22 September, 2018 - 10:45

आमच्या कोकणातल्या घरा वरचा आणखी एक लेख

पुष्पा, गो, ती मोठी कढई दे जरा पटकन घासून.

पुष्पा, तेवढं अळू दे चिरून आणि आठळ्या ही दे सोलून आळवात घालायला

पुष्पा, ह्या ओढणीचा रंग जातोय तेव्हा वेगळी धु.

पुष्पा , निखिलला घे जरा आणि आगरात फिरवून आण.... किती किरकिरतोय बघ.

तुम्ही ओळखलचं असेल ही पुष्पा कोण ते. हो बरोबर आहे … ही आमची कोकणातल्या घरची कामवाली . पु. लं च्या नारायणा सारखी हसतमुखाने सर्व आघाड्यांवर लढत असते दिवसभर.

सकाळी साधारण सातला हजर असते आमच्या घरी पुष्पा. तोवर आम्ही कसाबसा धीर धरलेला असतो . ती आलेली दिसली की भांड्यात पडतो आमचा जीव. पहिल्यांदा हिची सासू यायची कामाला. नन्तर काही दिवस दोघी ही येत असत. पण आता जवळ जवळ तीस एक वर्ष हीच येते आहे. वर्णाने काळी सावळी , बेताची उंची, अंगकाठी अगदीच बारीक, उभा चेहरा आणि दात थोडेसे बाहेर आलेले, तेल लावून घातलेली एक वेणी. केसात रोज फुल पाहिजेच , खरं नसलं तर सॅटिनच किंवा प्लास्टिकच सुद्धा चालत आणि घाई घाईत ते ही कधी विसरलं तर आमच्या आगरात असतंच . साडी ही सिंथेटिक पण स्वछ धुतलेली बहुदा आम्हीच कोणीतरी दिलेली असते अंगावर .

आल्या आल्या कोपभर च्या खाताना जरा टेकते तेवढीच . चहा घेऊन झाला कि भांडी घासायला घेते. आमचं कुटुंब खूप मोठं असल्याने भांडी खूपच असतात पण आता तिला सवय झालीय . अगदी स्वच्छ चकचकीत असतात तिची भांडी . बरं... भांडी तरी सलग कुठे घासता येतात तिला ? मध्ये मध्ये कोणाला अंघोळीचं पाणी काढून दे ...कुणाचा टॉवेल शोधून दे... चुलीमध्ये विस्तव घाल.... अशी कामं चालूच असतात . भांडी झाली की कपडे धुवायला घेते . रंग जाणारे, बाहेरचे, चादरी असं अगदी स्वता:च वर्गीकरण करुन धुते. कपडे वाळत घालताना ही प्रत्येकाचे सेपरेट घालते आणि वाळले कि त्यांच्या त्यांच्या खोलीसमोर बरोबर ठेऊन देते मिक्स व्हायला नकोत म्हणून. तिची देहयष्टी आणि तिच्या समोर असलेला कपड्यांचा ढीग बघून माझे कपडे तिला देऊन तिच्या कामात भर घालायला माझा धीर होत नाही , मी माझे कपडे स्वतःच धुते म्हणून नाराज असते ती माझ्यावर. दुपारी ती घरी नाही जात आमच्याकडेच जेवते आणि थोडा आराम करुन परत लागते कामाला . दुपराची कामं म्हणजे परत भांडी घासणे , जास्तीचे बाहेरचे कपडे धुणे, धान्य निवडणं, परसदारची सफाई, वैगेरे. सणावाराला किंवा आमच्या घरात काही कार्य वैगेरे असलं की तर खूपच उत्साहात असते ती. काम तर इतक करते की आम्हीच सांगतो तिला कधी कधी कि आता पुरे कर म्हणून.

कोकणात घरोघरी गणपतीचा सण अगदी जोरात साजरा होतो. तसा पुष्पाकडे पण असतो . गणपतीचं दर्शन घ्यायला आम्ही आवर्जून तिच्या घरी जातो. लाल चिऱ्याच तिचं घर साधसच पण अगदी स्वच्छ आहे . कोकणात सगळ्यांच्याच अंगणात असतं तस तुळशी वृंदावन आहे. आजूबाजूला एक फणसाच, दोन चार कलमाची , एक शेवगा आहे ज्यापासून तिला थोडं उत्पन्न मिळतं. हौस म्हणून जास्वंदी, तगर, गोकर्ण अशी फुलझाडं लावली आहेत. आम्ही तिच्या कडे गेलो की तिचा उत्साह नुसता ओसंडून वहात असतो. त्या दिवशी गुळाचा कोरा चहा प्यायला दिल्या शिवाय ती आम्हाला सोडतच नाही.

कधी कधी तिला आमची गंमत करायची लहर येते. काही सांगायला गेलं तर म्हणते " माका नका सांगू, माका ठावं न्हाय, पुष्पाला सांगा " मग आम्ही ही बुचकळ्यात पडतो कारण त्याच असं आहे कि तिला सुमी नावाची एक जुळी बहीण आहे. ती ही आमच्या कडेच असते कामाला आणि त्या अगदी सारख्या दिसत असल्याने अशी गमंत करते कधी कधी पुष्पा .

कसं काय ते नाही माहित पण तिला झाडपाल्याच्या औषधांची चांगलीच माहिती आहे. सड्यावरुन जाऊन एखादी मूळी, साल नाहितर पाला आणायचा तिला कंटाळा ही नाहीये आजिबात . त्यामुळे बारिक सारिक आजारांवर आम्ही पहिले दोन दिवस तिचेच औषध घेऊन बघतो.( स्मित) तिच्याकडे म्हणींचा भरपूर स्टॉक आहे आणि बोलताना त्यांचा चपखलपणे उपयोग करणे ह्यात तिचा हात़खंडा आहे. लिहिता वाचता येत नसुन ही मोबाईल मात्र तिला मस्त वापरता येतो. भांडी घासताना हल्ली कधीतरी गाणी ऐकत असते मोबाईलवर. ( स्मित) दुपारी कधी कधी धान्य निवडताना वैगेरे आम्ही सगळ्या एकत्र गोल बसलो की गाणी म्हणायची टुम निघते. कधी न ऐकलेली लोकगीतं तिच्या किनऱ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत. कधी कधी काम करताना विरंगुळा म्हणून नावं ( उखाणे) घ्यायचा खेळ रंगतो. पुष्पाचा एक मोठा कविते सारखा उखाणा पाठ आहे जो मला खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी तिला तोच घ्यायची फर्माईश करते.

माझी आणि तिची मुलं वयाने साधारण सारखीच आहेत. घरी गेले कि " वयनीनु कवा इलासा आणि चेडू झील खय" ? अशी चौकशी ठरलेली . त्यांच्या परीक्षा आहेत म्हणून नाही आलीत ती असं सांगितल की क्षणभर तिच्या डोळ्यात खिन्नता दिसते कारण तिच जरी शिक्षण झाल नसल तरी मुलांच्या शिक्षणासाठी तिने जीवाच रान केलय पण यश नाही आलय तिला. दोन्ही मुलांनी अर्धवटच दिलय सोडुन शिक्षण आणि जातायत आता अशीच कुठे तरी मजुरी करायला याची तिला सतत खंत वाटत असते.

आमच्या घरातल्या मुलांना ती राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधते आणि भाऊबीजेला तिला भाऊबीज ही मिळते. छोटी मुलं तिला पुष्पाआत्तेच म्हणतात आणि कडेवरची छोटी मुलं आईकडून ही तिच्याकडे झेप टाकून जातात . मी घरी जाताना सगळ्या कामवाल्यांसाठी काही ना काही तरी घेतलेलं असतंच पण पुष्पासाठी आणखी काही तरी स्पेशल असतंच जे तिला हळूच दिल जात. माझ्या एका सासुबाईनी त्यांच्या कुड्या त्यांच्या नंतर पुष्पाला देण्यात याव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती कधीतरी सणासुदीलाच ती त्या घालुन येते. त्या कुड्या दोघींमधलं एक आगळं वेगळं नातच अधोरेखित करतात.

आमच्या घराला पुष्पाची एवढी सवय झाली आहे कि ती एक दिवस जरी येणार नसली तरी आमचं सगळं गाडच कोलमडून गेल्या सारखं होतं पुष्पा खंबीर उभी आहे म्हणूनच एवढं मोठं कुटूंब नीटपणे चालवणं आम्हाला शक्य होतंय. प्रत्येक यशस्वी पुरषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते असे म्हणतात पण आमच्या घरातल्या प्रत्येक स्त्री च्या मागे पुष्पा खंबीरपणे उभी आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ति ठरणार नाही .......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली पहिल्या वहिल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

सायो, प्रतिसादा साठी आभार.

छान

पुष्पा कशी असेल हे वाचायला सुरुवात करायच्या आधीच कल्पना केली होती आणि अगदी तशीच आहे ही . कारण कोकणातल्या प्रत्येक नांदत्या घरात अशी पुष्पा असतेच.
तिचं शब्दचित्र छानच उभं केलं आहेस. आवडलं.

छान!
अशी आमच्याकडे गावाला एक राजश्री म्हणून कामाला बाई होती. आम्ही तिला गमतीने अल्लाउद्दीनचा राक्षस म्हणायचो. Lol काहीही काम द्या. चुटकीसरशी खतम्!

छान व्यक्तिचित्र !
काही ह्रुदयस्पर्षी प्रसंगांची किंवा तिचे व्यक्तिमत्व विषद करणार्या प्रसंगांची अजून भर घातली असतीत तर आणखीन मजा आली असती ! काल्पनिकही चालतील !

छान ..
झाडपाल्याच्या औषधीन्च ज्ञान ... कळसूबाई आठवली .
कळसूबाई शिखराला शेजारच्या गावातल्या सूनेचं नाव देउन गावकऱ्यांनी तिचं देउळ बांधलं तिथे कारण ही आदिवासी सून झाडपाल्याचे औषधोपचार करायची .

Pages