Sty ४ - उद्याचा इतिहास

Submitted by संयोजक on 21 September, 2018 - 00:06

काहीतरी महत्वाची गोष्ट असल्याशिवाय संज्ञा आपल्याला बोलावणार नाही हे मंगळला माहीत होतं.उत्खनन तळापासून थोड्याच अंतरावर असलेल्या वाहनतळावर आपली फ्लाइंग कार उभी करून तो लगेचच संज्ञाच्या तंबूकडे वळाला. इतर छोट्यामोठ्या राहुट्यांच्या मध्यभागी उभारलेला तो शानदार तंबू होता. शुभ्रपांढऱ्या रंगाच्या रेशमी तणावांनी पंधरा फुट उंचीच्या त्या रक्तिमवर्णी शामियान्याला डौलात उभं केलं होतं.

‘किती वेळची वाट बघतेय तुझी’ तंबूच्या आतमध्ये येरझाऱ्या घालणाऱ्या संज्ञाने किरमिझी रंगाचा कोट घातलेल्या मंगळकडे पाहत म्हटलं.
‘मुंबई आग्रा हे अंतर जास्त नाहीये.तासाभरात तर सहज पोहोचायला हवा होतास तू.’
‘सॉरी ! अगं एयर हायवे नंबर ६ वर मोठा अपघात झाला होता.त्यामुळे ट्राफिक खोळंबली होती.’ तो आपल्या पायांतील बूट काढत म्हणाला.
‘बरं ते जाऊ दे. आता कामाचं बोलू. ये माझ्याबरोबर.’संज्ञा लगबगीने तंबूबाहेर गेली, ‘अरे ये ना’
‘जाऊ गं. आधी चहापाणी विचारशील की नाही पाहुण्याला.’ तो आरामखुर्चीवर टेकत बोलला
‘पाहुणा माय फुट.’ संज्ञा जशी गेली तशी परत आली अन मंगळचा हात पकडून त्याला जवळजवळ ओढतच तंबूबाहेर काढलं

‘मग... यावेळी काय सापडलं तुला? एखाद्या राजाची जादुई तलवार की थडगं? जमिनीतून अख्खंच्या अख्खं राज्य तर उकरून नाही काढलंस न?’ मंगळ चेष्टेच्या सुरात म्हणाला.
ते उभे होते ते मैदान चारीबाजुनी घडीव काळ्या पाषाणांनी बंदिस्त केलेलं होतं. दोन ते तीन पुरुष उंचीवर प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्यापायऱ्यांची दगडी रचना, मधोमध राजमंडळातील विशेष लोकांसाठी बनवलेलं खास दालन यावरून ते एक क्रीडा प्रेक्षागृह होतं हे सहज लक्षात यायचं.
‘ते बघ तिकडे काय आहे’ संज्ञा क्रीडांगणाच्या एका कोपऱ्याकडे निर्देश करत म्हणाली. तिथे सात ते आठ फुट उंच अन पाच-सहा फुट रुंदीची धातूची पेटी पडलेली होती. त्यावर असंख्य वायरांच्या गुंतावळी व चित्रविचित्र आकाराची बटणं होती. मंगळने लगेचच त्या दिशेने आपला मोर्चा वळवला.
‘हे तर एक यंत्र दिसतं. साधारणतः पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचं असावं.’
‘तुला खात्री आहे का, हे यंत्र साठेक वर्षांपूर्वीचंच आहे म्हणून ?’
‘हो नक्कीच. या यंत्रात जे उष्णतारोधक पंखे आहेत ते पन्नास वर्षांपूर्वी वापरायचे बंद झाले.त्याआधी दहा वर्षे ते वापरात होते.’
‘असं असेल तर मग मोठी पंचाईत आहे’संज्ञा लाल रंगाच्या मातीवर बसकण मांडत म्हणाली 'तुला आश्चर्य वाटेल पण या यंत्राचं वय ५२१ वर्षे आहे. म्हणजेम्हणजे ५२१ वर्षांपूर्वी ते जमिनीखाली गाडलं गेलं.’
‘काय!!?’ मंगळ आश्चर्याने उसळत म्हणाला. ‘पण त्यावेळी एवढं प्रगत तंत्रज्ञान असणं शक्यच नाही.’
‘बरोबर आहे तुझं.’
‘वेट वेट वेट... ओह्हो... आत्ता लक्षात आलं’
‘काय?’
‘ही एक टाईम मशीन असेल. पन्नास वर्षांपूर्वी ती कुणीतरी बनवली अन भूतकाळात दामटत नेली. काहीतरी कारणाने ती व्यक्ती भूतकाळातून परत येउच शकली नाही. त्यामुळे हे यंत्र तिथेच गाडलं गेलं’
‘अरे वा! माझ्यासोबत राहून हुशार होत चाललास की तू’ संज्ञा मिश्कील हसत म्हणाली, ‘पण एक गोष्ट सांगा महाराज,टाईम मशीनचा शोध तर जेमेतेम पाच वर्षांपूर्वी लागला. मग पन्नास वर्षांपूर्वी ही टाईम मशीन कुठून आली?’
‘कुणीतरी त्या काळीसुद्धा गुप्त संशोधन करत नसेल कशावरून? काही लोक काळाच्या पुढे चालणारे असतात’ मंगळने खांदे उडवत सहजपणे तिचा प्रश्न टोलवला. यंत्राच्या पेटीला टेकून त्याने आपले आपले डोळे मिटले व डोक्यातलं इंटरनेट सुरु केलं. पन्नास वर्षांपूर्वी भौतिकशास्त्र व यंत्रविज्ञानात संशोधन करत असलेले सर्वोत्तम शास्त्रज्ञ शोधले. पंचेचाळीस जणांची यादी होती. त्यातले टाईम मशीनवर संशोधन करणारे तीनच जण होते.
‘संज्ञा, पन्नास वर्षांपूर्वी टाईम मशीनवर संशोधन करणारे तीन शास्त्रज्ञ जगात होते... भारतीय शास्त्रज्ञ तर्पण शिवालिक, जर्मन शास्त्रज्ञ रिचर्ड कोईलो अन अमेरिकन शास्त्रज्ञ पीटर ब्रुक’
‘छान. आता प्रत्येकाचं आत्मचरित्र चाळ बरं.’
मंगळने परत डोळे मिटले. आता तिन्ही शास्त्रज्ञांचा जिवानेतिहास त्याच्यासमोर होता. तिघांच्या मृत्युच्या नोंदी वाचता वाचता तो जवळजवळ ओरडलाच.
‘काय झालं रे?’ संज्ञा’भारतीय शास्त्रज्ञ तर्पण शिवालिक होते न, त्यांचा मृत्यू झालाच नाही!!’
‘म्हणजे? ते अमर होते की काय?’ संज्ञाने कोपरखळी मारली’तसं नाही गं.मला म्हणायचं होतं की ते रहस्यमयरित्या गायब झाले.’
‘काय सांगतोस!!’ संज्ञाचे निळे कॉन्टॅक्ट लेन्स बसवलेले डोळे चकाकले.
‘हो. आणि विशेष म्हणजे त्यांना मुघलकालीन इतिहासात विशेष रस होता.’
‘अरे व्वा! आपलं काम सोपं झालं म्हणायचं. शास्त्रज्ञ भारतातले, यंत्र भारतातलं, त्यांना मुघलकाळाची आवड, यंत्रही त्याच काळात गाडलं गेलं. म्हणजे...’
‘म्हणजे तर्पण शिवालिक भूतकाळात गेले होते. होऊ शकतं. पण तरीही एक प्रश्न उरतोच, त्यांनी या किल्ल्यात टाईम मशीन उतरवून काय जांगळबुत्ता केला?’ मंगळ आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढत म्हणाला. कालपासून तो अंडाकृती फ्रेमचा चष्मा घालून कंटाळला होता. एक छोटीशी कळ दाबून त्याने फ्रेमचा आकार बदलला व चष्मा परत डोळ्यांवर चढवला. संज्ञा मात्र हात बांधून एकटक समोरच्या यंत्राकडे बघत होती.
‘एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे मंगळ, डॉ.शिवालिक यांना भूतकाळात जायचंच होतं तर ते आग्र्यात का आले? शहाजहानच्या कारकिर्दीत या किल्ल्यात विशेष काही घडलं नव्हतं. भूतकाळात जायचंच असतं तर त्यांनी शिवाजी महाराज व इंग्रजांमधलं निर्णायक युद्ध पाहिलं असतं,१७८४ सालचा भारताला स्वातंत्र्य मिळालं तो क्षण नजरेत साठवला असता. एवढं होऊनही जर ते आग्र्यात आलेच असते तर त्यांनी आपलं यंत्र दूरवर कुठेतरी उभं केलं असतं. किल्ल्याच्या मधोमध उतरण्याचं कारण काय?’
‘हुं. तुझं म्हणणं पटतं मला. कॅरीऑन...’ मंगळ दोन्ही पायांभोवती हातांची घडी घालत बोलला. आपली मान संज्ञाच्या दिशेने वळवून तिचं बोलणं तो काळजीपूर्वक ऐकू लागला.
‘मला असं वाटतं की त्यांना इतिहासातील घटनांचं केवळ साक्षीदार व्हायचं नसेल.’
‘मग?’
‘त्यांना इतिहासातील एखादी घटना बदलायची असेल.’ संज्ञाने प्रत्येक शब्द स्पष्ट व काळजीपूर्वक उच्चारला. ‘इ.सं. १६३३ साली आपण बसलो आहोत त्याच्या आसपास अशी एखादी घटना घडली असेल ज्यामुळे इतिहासाचा चेहरामोहराच बदलून जाईल.’
‘ओह माय गॉड. धक्कादायकच आहे हे तर. पण नेमकं काय घडलं असेल?’ त्याने प्रतिसादासाठी संज्ञाकडे पाहिलं. ती डोळे बंद करून भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्व्हरशी जोडली गेली होती. त्यांच्या डेटाबेसमधील नोंदी चाळत होती. जवळपास दहा मिनिटांनी तिने डोळे उघडले
‘२८मे १६३३ साली या किल्ल्यातला एक हत्ती पिसाटला होता. त्यावेळी शहाजहानचा १५ वर्षांचा धाडसी मुलगा हत्तीवर सरळ चालून गेला. त्याने आपल्या दिमाखदार चपळाईने हत्ती जवळजवळ काबूत आणलाच होता, पण कसा कोण जाणे अचानक तो मुलगा हत्तीच्या पायांखाली आला अन चिरडून मेला.’
‘चिरडून मेला!! अरेरे. पण हा तर अपघात होता न?’
'हो. पण ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथे सैनिकांना एक संशयास्पद व्यक्ती आढळली. घातपाताच्या आरोपावरून त्या व्यक्तीला सुळावर चढवण्यात आलं. फारसी व उर्दू बखरकारांनी मृत्यूचा तो प्रसंग काव्यात्मक भाषेत रंगवून सांगितलाय. त्यांच्या मते शहाजहानच्या मुलाला मारायला आलेला माणूस सैतानाचा दूत होता. काळ्या रंगाचा पोशाख घातलेली एक ठेंगणी व्यक्ती आकाशीच्या यानातून उतरली व हत्तीशी झुंजणाऱ्या किशोराचा आत्मा त्याने पळवला वगैरे. कालपर्यंत मीसुद्धा या गोष्टींवर विश्वास ठेवला नसता, पण...’
‘पण काय?’
‘तू डॉक्टर शिवालिकांचा फोटो बघितलाय का? तेसुद्धा कमी उंचीचे गृहस्थ होते. आजच्या
अवकाशयानातील प्रवासी काळ्या रंगाचा चकचकीत स्पेससुटस परिधान करतात. शिवाय तो सैतान अवकाशीच्या यानातून उतरला होता. लागला का लाईट?’
‘हो. केव्हाच. ते डॉक्टरच असावेत.’
‘हो नक्कीच.’ संज्ञा उठून उभी राहत म्हणाली.
‘संज्ञा... शहाजहान बादशहाचा जो मुलगा मारला गेला त्याचं नाव काय होतं?’
‘औरंगजेब’ संज्ञा सहज बोलावं अशी बोलली. या नावाच्या व्यक्तीला तिच्या माहितीप्रमाणे इतिहासात काहीच स्थान नव्हतं.

------------------------------

नियमावली:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
४) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

Group content visibility: 
Use group defaults

मैत्रेयी +१
सगळे एस्टीवाय मस्त लिहिले आहेत. सलग वेळ न मिळाल्याने दोनदा प्रयत्न करून लिहिलेले अर्धेमुर्धे पॅराग्राफ पुर्णत्वाला जाऊ शकले नाहीत.
पायलट एपिसोड लिहिणार्‍यांनी वाईट वाटून घेऊ नये.... तुम्ही मस्तच लिहिले आहे.

बाय द वे ही पायस स्टाईल वाटते आहे. Happy