तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 20 September, 2018 - 04:43

“हां तर मी मूळचा पुण्याचा. हे तर तुला कळलंयच आता.” सिद्धार्थ बोलता बोलता हळूच तिच्याकडे पाहत म्हणाला.
“हो. कळलं... पुढे..?” निशाने सरळ प्रश्न केल्यावर जरा नाराजीनेच सिद्धार्थने पुढे सांगायला सुरुवात केली.
“हं.. तर माझं शिक्षण पुण्यातच झालं. अगदी इंजिनीरिंग होईपर्यंत मी पुण्यातून कधीच बाहेर कुठे गेलो नव्हतो. इंजिनीरिंग होऊन जॉब लागल्यावर मात्र पहिल्यांदा मित्र मैत्रिणींबरोबर ट्रीपला जायचं ठरलं.
मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यातल्या काही मोजक्या लोकांशीच मी बोलायचो. खूप शांत होतो मी”
“काय सांगतोस? तू शांत होतास?” निशाने मध्येच त्याचं वाक्य तोडत विचारलं.
“हाहाहा... हो मुली! मी पण शांत होतो तेंव्हा” सिद्धार्थने हसत उत्तर दिल.
“आता प्लिज मधेमधे बोलू नको. ऐक. तर मी खूप बोलका नव्हतो तेंव्हा. माझी एक जिवाभावाची मैत्रीण होती त्या ग्रुपमध्ये. तिनेच मला त्या ट्रीपला जाण्यासाठी तयार केलं होतं, नाहीतर मी कुठला जायला?”
“मैत्रीण? जिवाभावाची! कुठाय रे ती सध्या? आणि तिचं नाव?” निशा काही गप्प बसणाऱ्यांच्यातली नव्हती.

“नाम मे क्या रखा है? पुढे ऐक. मग गेलो आम्ही ट्रिपला.
माझ्यासाठी तो अनुभव खूप नवीन होता. खूप भटकलो. आणि मग...एके दिवशी मला दिसली ती. ती... कशी होती काय सांगू तुला. निखळ झऱ्यासारखी. स्वच्छंदी. मुक्त. हसरी. तिचं हसू वेड लावणारं होतं. माझ्याही नकळत मी ओढला जात होतो तिच्याकडे. पण मी मात्र तिच्या खिजगणतीतही नव्हतो. ती माझ्या मैत्रीणीशी बोलायची. पण एकटीच भटकायची. ते १० दिवस मी विसरूच शकत नाही. मी जणू माझं विरुद्ध टोक पाहत होतो.
मी शांत.. ती बोलकी..
मी सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा... ती एकटी असूनही सर्वांची लाडकी...
मी क्वचित हसणारा... आणि तिचं हसू मात्र प्रेमात पडेल असं..
त्या दिवशी मी असाच भटकत होतो. अचानक ती दिसली. कुठेतरी निघाली होती एकटीच! मी तिच्या नकळत तिच्या मागून जायला लागलो. मनात एकीकडे कळत होतं कि हे असं करणं चुकीचं आहे. मी तिला आणि ती मला ओळखतही नाही आणि तरीही मी तिच्या मागे चाललो होतो. बुद्धी सांगत होती हा पाठलाग आहे पण मन? मन सांगत होत...नाही. तुला तिला जाणून घ्यायचंय ना? मग हीच संधी आहे. मी जात राहिलो तिच्या मागून. थोड्या वेळाने ती थांबली. बसली एका ठिकाणी. सूर्योदय होत होता. बघत होती ती निश्चल त्या सूर्याकडे... आणि मी?! मी तिच्याकडे. उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरला होता तिच्या चेहऱ्यावर. मी भान हरपून किती वेळ तसाच उभा राहिलो होतो. अचानक भानावर आलो ते तिच्या खळखळून हसण्याने... खूप सुंदर होतं तिचं हसू. मला जाणवलं, मी प्रेमात पडलोय. तिच्या. तिच्या हसण्याच्या. तिच्या स्वच्छंदी वृत्तीच्या. तिथून निघून आलो. पण दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, तिच्याशी बोलायचं. हॉटेलवरून निघालो. कुठे जाणार होतो पण? मग आठवलं कि मैत्रिणीला माहित आहे तिच्याबद्दल. मैत्रिणीला विचारलं तर ती म्हणाली अरे ती काल संध्याकाळीच परत गेली. मी ठरवलं ठीक आहे. मैत्रिणीकडून तिचा फोन नंबर मिळवला. पण आगंतुक फोन करून बोलणार काय? त्यामुळे तिला फोनच केला नाही.
मग नोकरीला लागलो. अधूनमधून मैत्रिणीला तिच्याबद्दल विचारायचो. एकदा कळलं कि ती परदेशात गेलीय,नोकरीसाठी. त्यानंतर परत काहीच कळलं नाही तिच्याबद्दल. अजूनही धडपडतोय तिला भेटायला.”
“” निशा काहीच बोलली नाही.
“काय ग? सिरीयस? “
“मला वाटलं नव्हतं तू असा असशील” निशा म्हणाली.
“असा? म्हणजे कसा?” सिद्धार्थने विचारलं.
“असा म्हणजे असा... कोणावरतरी इतकं प्रेम करणारा...”
“ओह... म्हणजे तुला असा वाटलं कि मी एक वाया गेलेला मुलगा आहे. जो पैसे भरून engineering करून आता परदेशात नोकरीला हमाली म्हणत मजा मारतोय. Am I right?” सिद्धार्थने तिच्यावर नजर रोखत विचारलं.
“ नाही मला तसं म्हणायचं नव्हतं... काहीतरी खाऊया का? नुसत्या कॉफी ने माझं भागणार नाही” निशाने विषय बदलायचा प्रयत्न केला.
पण सिद्धार्थने आपली नजर तिच्यावरून हटवली नाही.
“निशा, एक विचारू?”
“विचार”
“मगाशी तू इतकी का रागावली होतीस? तुला नक्की राग कशाचा आला होता? मी आपली ओळख नसताना खूप बोलतोय याचा कि मी तुला ओळखायला लागलोय याचा?” सिद्धार्थचा प्रश्न थेट होता. त्याच्या नजरेइतकाच.
निशा उठलीच तिथून.
“मला भूक लागलीये, तुला खायचं असेल काही तर चल” असं म्हणून ती निघालीसुद्धा.
दुसऱ्या एका restaurant मध्ये खायची ऑर्डर देऊन ती उगाच मोबाईलवर काहीतरी बघत बसली. सिद्धार्थनेही खायची ऑर्डर दिली, पण तो निशाच्या टेबलजवळ येऊन न बसता सरळ दुसऱ्या टेबलजवळ जाऊन बसला.
“आता याला काय झालं? राग आला का काय ह्याला?” निशा आपली मनातल्या मनात. पण ती उठून त्याच्या जवळ गेली नाही. जाऊदे! उगाच नाटक! मी तरी का जाऊ? आणि याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला हा कोण लागतो माझा? निशाने शांतपणे आपलं सँडविच संपवायला सुरुवात केली. अधूनमधून तीच लक्ष सिद्धार्थकडे जात होतं. तो कुठलंतरी पुस्तक काढून वाचत बसला होता. निशाला खरंच बोर व्हायला लागलं आता. फ्लाईटला अजूनही बराच वेळ होता. सिद्धार्थशी जाऊन बोलावं का असा विचार ती करत असतानाच
“हाय! सिद्धार्थ?! ओह माय गॉड!” कोणातरी मुलीचा आवाज निशाला ऐकू आला. ती चालत आली आणि सिद्धार्थच्या गळ्यातच पडली.
काये हे? कोण आहे ही? निशा पुन्हा मनातच.
“Hi! गीता right? Hi, how are you?” सिद्धार्थ खुश दिसत होता. ती मुलगी सिद्धार्थबरोबर बोलत बसली.
निशाने मोबाइल काढला आणि उगाचच काहीतरी टाईमपास करत बसली.
पण अधूनमधून तिचं लक्ष सारखं त्या दोघांकडे जात होतं.
ए बाई! जा ना म्हणावं आता. फ्लाईट कधीये हिची? उठायचं नावच घेईन झालीये ही. निशाने विचार केला आणि तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, आपण त्या मुलीबद्दल असा का विचार करतोय? तिने इथून जावं आणि सिद्धार्थने फक्त आपल्याशी बोलावं असं कसं काय वाटतंय मला? त्याची आणि माझी काही तासांचीही ओळख नाहीये, तरीही तो मला ओळखतो असं का वाटतंय? छे! निशाला स्वतःचाच राग आला. तिने परत मोबाईलमध्ये डोकं खुपसलं.
तिची चुळबुळ इकडे सिद्धार्थच्या नजरेतून सुटली नाही. त्या मुलीला बाय करून सिद्धार्थ उठला, निशाच्या टेबलजवळ येऊन बसला.
“आता बघ.” त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.
“काय?” निशा पुरती गोंधळली होती. आपल्याला वाटावं आपण हुशार आहोत आणि अचानक आपली चोरी पकडली जावी तसा चेहरा झाला होता तिचा. पण चेहऱ्यावर शक्य तितका बेफिकीरपणा दाखवत तिने विचारलं.
“काय बघू?”
“मगाशी मी तिकडे बसलो होतो तेंव्हा तुला मान वळवून बघताना त्रास झाला असेल ना, आता मी तुझ्या समोर बसलोय, आता बघ माझ्याकडे” सिद्धार्थ अजूनही हसत होता. त्याच्या गालावरची खळी आणखीनच खोल झाली होती.
आणि खरंच निशा पाहतच राहिली त्याच्याकडे काही सेकंद. आणि तिला जाणवलं, किती मूर्ख आहोत आपण! खरंच त्याच्याकडे बघत बसलोय. तिने झटकन नजर झुकवली, न जाणो त्यातही आपल्याकडे बघून त्याला कळेल की आपल्या मनात काय चाललंय.
“तिचं नाव गीता आहे. माझ्या ऑफिसमध्येच काम करते.”
“मी विचारलंय का काही?” निशाने वैतागूनच विचारलं.
“हो. तू नाही बोललीस तरी तुझ्या डोळ्यांनी विचारलं मगाशी” सिद्धार्थकडे तिच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर होतं.
निशाला कुठून बुद्धी सुचली आणि बोललो असं झालं. पुढे boarding होईपर्यंत ती सिद्धार्थशी काहीच बोलली नाही. Boarding झाल्यावर तिने आईला message केला. तिच्या शेजारची सीट रिकामी होती. Boarding झालं तरी ती रिकामीच राहिली. निशाने उगाच इकडेतिकडे पाहिलं. सिद्धार्थ कुठे बसलाय कोणास ठाऊक. पण बरं आहे. जवळ कुठेतरी असता तर त्याला कळलं असतं कि हि सीट रिकामी आहे, आणि मगाशी झालेल्या बोलण्यानंतर त्याच्यावर आपण रागावलोय कि आपल्याला त्याच्याशी बोलायचं हे निशाला ठरवता येत नव्हतं.
“Is this seat taken?” निशाने वर पाहिलं. आणि तिच्या उत्तराची वाट न बघता सिद्धार्थ तिच्या शेजारी बसलाही.
“काय गं? मगाशी बोललो त्याने रागावलीस कि काय? This is not done निशा. मीच आल्यापासून बोलतोय. माझ्याबद्दलची इतकी महत्वाची गोष्ट मी तुला सांगितली आणि तुझं नाव सोडलं तर तू मला तुझ्याबद्दल काहीच सांगितलेलं नाहीयेस”
निशा हसली, म्हणाली
“माझी लाईफ स्टोरी खूप साधी आहे रे. आई वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे खूप लाडात वाढले. चार वर्षांपूर्वी बाबा गेले, तेंव्हापासून दोघीच आहोत, आई आणि मी. तिला मी आणि मला ती. हि परदेशातली नोकरीही मला करायची नव्हती रे, आईपासून लांब, पण आईच म्हणाली जा. आणि असंही मला तिला कसलाच त्रास होऊन द्यायचा नव्हता... सो... here I am”
“ निशा...”
“हम्म..”
“कधी कोणाच्या प्रेमात पडली नाहीस?”
“शिकत होते तेंव्हा प्रेमासाठी खूप लहान होतो रे आणि आता? आता प्रेमासाठी वेळ नाही” निशाने उत्तर दिलं.
“इन फॅक्ट मी आता दिवाळीसाठी चाललेय घरी पण आईच्या डोक्यात मला लग्नासाठी विचारणे हाच अजेन्डा असणार आहे”
“काय सांगतेस? म्हणजे आता कांदेपोह्यांचा कार्यक्रम आहे कि काय” सिद्धार्थने विचारलं.
“अरे नाही. १-२ महिन्यापूर्वी तर तिने एका मुलाचा बायोडाटा आणि फोटो पाठवला होता मला”
“मग? आवडला नाही का तुला तो मुलगा?”
“नाही रे... मी बघितलंच नाही. कोण हा शहाणा... मला याने कधी पाहिलंही नाही. आणि हा आणि याच्या घरचे मला फक्त फोटो बघून पसंत आहे म्हणतात?! मी आई ला सांगून टाकलं, हा विषय बंद”
“तरीच!!!” सिद्धार्थ पुटपुटला..
“काय?” निशाने न समजून विचारलं.
“काही नाही. मग आता दुसरा मुलगा बघणारेस का?” सिद्धार्थने सफाईने विषय वळवला.
“नाही रे. मला लग्नच नाही करायचं. एकतर मी आईची सगळी जबाबदारी घेणार हे समजून घेणारा कोणी मुलगा असेल असं मला वाटत नाही आणि मला हे असं फोटो, कांदेपोहे, पसंती असं जमणार नाही असंही.”
सिद्धार्थ हसला काहीतरी जिंकल्यासारखा.
फ्लाईट land झाली. Baggage कलेक्ट करून निशा आणि सिद्धार्थ बाहेर निघाले.
“चल... बाय” सिद्धार्थने हात पुढे केला.
“अरे मला नंबर दे कि तुझा... कॉन्टॅक्ट करता येईल” निशाने विचारलं.
“का? लग्नाला बोलवायला?” सिद्धार्थने विचारलं.
“नाही रे. मी लग्न करणार नाही तुला सांगितलं ना” निशा हसली.
“ते बघू. चल बाय” असं म्हणून सिद्धार्थ तिथून निघालासुद्धा.
निशा बघताच राहिली. बघू? म्हणजे? ह्याने नंबर का दिला नाही? आपणच खूप विचार करतोय का? तो काही माझा मित्र नाही त्याने नंबर द्यायला. निशाला कळतंय पण वळत नाही असं वाटत होतं. निघाली ती शेवटी घरी. पण सिद्धार्थ दिसेनासा होईपर्यंत उगाचच मागे वळून तिकडे पाहत राहिली.
ती घरी अली आणि आईला बिलगली. आईचे डोळे झरायचे थांबेनात. आईने केलेला तिच्या आवडीचा मऊ वरणभात आणि घरच्या करकरीत लोणच्याची फोड खाऊन ती तिच्या bedroom मध्ये आली.
त्याने एकदाही मागे वळून बघू नये?! का पण?
त्याने मागे बघावं असं का वाटलं आपल्याला? का त्याचा विचार मनातून जात नाहीये? निशा तिच्या bedroom मध्ये विचार करत बसली होती.
क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ हिम्सकूल,
अपेक्षित शेवट असला तरी कथा कशी खुलवली आहे त्यावर मजा येणार की नाही ते ठरते. त्यामुळे शेवट कसा असावा ते लेखकालाच ठरवू द्यावे.

@अ‍ॅमी,
मग तुम्हाला न वाचण्याचा पर्याय उपलब्ध आहेच की! आणि आता कळले ना ष्टोरी पांचट आहे, मग पुढच्या भागावर येण्याची तसदी नाही घेतली तरी चालणार आहे.

.
.

एकदम भारी ... एकच नंबर

अपेक्षित शेवट असला तरी कथा कशी खुलवली आहे त्यावर मजा येणार की नाही ते ठरते. त्यामुळे शेवट कसा असावा ते लेखकालाच ठरवू द्यावे. >> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११

मग तुम्हाला न वाचण्याचा पर्याय उपलब्ध आहेच की! आणि आता कळले ना ष्टोरी पांचट आहे, मग पुढच्या भागावर येण्याची तसदी नाही घेतली तरी चालणार आहे.>> +११११११११११११११११११११११११११११११११११११