मायबोली गणेशोत्सव २०१८ - माझी युक्ती (उपक्रम)

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 02:13

आजकालची लहान लहान मुले भलतीच स्मार्ट, आपण त्या वयात होतो तेव्हा आपल्याला जितकं कळत होतं त्याच्या पाच पावलं पुढे आजची पिढी आहे. त्यांना असलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरे देताना आपलयालाच नाकीनऊ येतात. प्रत्येक वेळेस मुलांना एखादा विषय सोप्प्या आणि समजणार्‍या उदाहरणातून शिकवणारे शिक्षक पण आजकाल कमी होत चालले आहेत. अशा वेळेस आपल्यालाच पालक म्हणून ही जबाबदारी उचलावी लागते. मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.
अशाच सोप्प्या पद्धती, युक्त्या एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी हा धागा.
नियम
१. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
२. तुमच्या सर्व युक्त्या इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. या धाग्यावरची युक्त्या आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
४. एका वेळेस एकच युक्ती टाकावी.
५. दोन वेगवेगळ्या विषयांवरील युक्त्या दोन वेगवेगळ्या प्रतिसादात लिहाव्या.
६. युक्ती तुम्हाला सुचलेली आणि प्रतिधाकारमुक्त असावी.

Group content visibility: 
Use group defaults

मुलांसाठी ही एक छोटीसी टिप.
कोणतीही संख्या अकरा पट करायची असेल तर दोन अंकी संख्यांची बेरीज करून ती दोन अंकांमध्ये ठेवायची. उत्तर तयार. उदाहरणार्थ...

१५ x ११ = १(१+५)५ = १६५.

पण हे फक्त अकरा पट करण्यापुरतेच आहे बरं का.
अजुन स्पष्ट होण्यासाठी खाली चित्र दिले आहे.
EC7C7C96-42C0-4145-AD40-47C431BC2768.jpeg

ही युक्ती कन्सेप्ट समजण्यासाठी नाही, पाढे पाठ करून घेण्यासाठी आहे.
मुलगी आणि तिची मैत्रीण यांना एका जिन्यावर उभे केले,
एका डब्यात 12x5 , 17x8 अशा स्वरूपात पाढ्यांच्या चिठ्ठ्या ठेवल्या,
प्रत्येकीने तिच्या टर्न ला एक चठ्ठी काढायची आणि उत्तर द्यायचे, उत्तर बरोबर तर एक पायरी वर, चुकले तर एक पायरी खाली, जी पहिली वरच्या मजल्यावर पोहोचेल ती जिंकली.

हाच खेळ थोड्याफार फरकाने समानार्थी , विरुद्धार्थी शब्द, स्पेलिंगस या साठी खेळता येईल

पूर्वी लिहिलेली युक्ती आहे.

नॉर्मली मुलांशी बोलताना अरेरे शाळा सुरु झाली का!
किंवा अरे वा, आज सुट्टी का!

असे आपण बोलतो.

याउलट मी लहानपणापासूनच आमच्याकडे शाळेत न पाठवणे = शिक्षा अशी कन्सेप्ट तयार केली.

आज नीट वागली नाहीस तर शाळेत पाठवणार नाही, इ.

At least for us it worked.

माझ्या मुलाला (वय:- ५ वर्षे) मी बेरीज वजाबाकी शिकवायला सुरुवात करताना त्याच्याच सर्व गाड्यांचे दुकान मांडले आणि त्याला खरी चिल्लर दिली आहे.
त्याने तिथे येउन त्या गाड्या विकत घ्यायच्या. मग त्याला मी सुट्टे पैसे देउन त्यातुन बेरीज वजाबाकी, कोणता अंक मोठा कोणता लहान हे शिकवतो.
मुलाने त्यात फोन वरुन ऑर्डर देऊन गाड्या घरी डिलिव्हरी देणे, दुकानवाल्या काकांनी फोन करुन कस्टमरला नवीन कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत हे सांगणे, एकाने फोन करुन दुसर्‍यासाठी गिफ्ट पाठवणे आणि आपण त्याच्या दारासमोर गिफ्ट ठेऊन बेल वाजवून निघुन जाणे वगैरे नवीन खेळ शोधून काढले आहेत.

मुलांच्या आवडीनिवडी प्रमाणे गाड्यांच्या जागी दुसर्‍या पण गोष्टी वापरता येतील

मुलाला वस्तूंचे वर्गीकरण शिकवण्यासाठी वापरलेली युक्ती

लहान मुलांना एकमेकाला चिडवायला आवडते. मग आम्ही एकमेकांना चिडवत बसतो. अट एकच कि जो समुह निवडला आहे त्यातल्याच दुसर्‍या गोष्टीने चिडवायचे. म्हणजे मी त्याला जर ए शेपुवाल्या असे म्हणले तर त्याने मला दुसर्‍या पालेभाजीच्याच नावाने चिडवायचे. मी जर त्याला ए डम्बट्रक वाल्या म्हणले तर त्याने मला चिडवताना दुसर्‍या Construction Vehicle नेच चिडवायचे.

मुलांशी खेळता खेळता आपल्या पण स्मरणशक्तीवर जरा ताण पडतो.

सिम्बा, मस्तच कल्पना आहे तुमची.

मी लहानपणापासूनच आमच्याकडे शाळेत न पाठवणे = शिक्षा अशी कन्सेप्ट तयार केली.
आज नीट वागली नाहीस तर शाळेत पाठवणार नाही, इ.>>> हे अगदी आवडलेच. अगदी खरंय.

आ.रा.रा. ,

आम्हीपण घरी मुलाला शाळेत न जाणे हिच शिक्षा आहे असे बिंबवले आहे.
ज्यु.केजी मधे नविन नविन जताना तो शाळेत जायचं नाही म्हणून रडायला लागला होता. मग मी एक दिवस तुला शाळेत नाही जायचं तर नको जाउस पण मग शाळेच्या वेळेपर्यंत अभ्यास करायचा अशी अट घातली. एक दोन वेळा तीन तास अभ्यास केल्यावर त्याला लक्षात आलं कि यात आपले नुकसान आहे. शाळेत फक्त अर्धा एक तास अभ्यास आणि बाकी वेळ खेळ असतो. घरी पुर्ण तीन तास अभ्यास करावा लागतो.
नंतर निमूट शाळेत जाऊ लागला Happy

आज नीट वागली नाहीस तर शाळेत पाठवणार नाही >> +१ हे आम्ही पण करतो, पण हे काम करण्यासाठी मला वाटतं मुलांना शाळा आवडायला पाहिजे. कारण काहीही असो, पण + ve बोलत राहायचं.
एक उदाहरण म्हणून: मुलाच्या शाळेत सुपरबक्स देतात. म्हणजे १/ ५/१० अशी किम्मत लिहिलेले कागद. काही चांगलं केलं की असे सुपरबक्स मिळतात. हे चांगलं म्हणजे काही जगावेगळं असं काही नाही, घरचा अभ्यास वेळेवर दिला की १० सु.ब, टेबलवर वाचयला सांगितलं की वाचलं की आणि काही. दिवस नीट गेला की १ सो ऑन. दर महिन्याला सुपरबक्स स्टोर असतं. त्यात मुल आपले पैसे (कमावलेले सुपरबक्स) खर्च करुन वस्तू/ खेळ खरेदी करतात. ह्या वस्तू पालकांनी डोनेट केलेल्या नीट वापरलेल्या/ साधारण नव्या दिसतील अशा असतात. अगदी साध्या जसं मार्बल, शिट्ट्या, डॉलर स्टोर मधल्या काही वस्तू इ. इ. आणि अर्थात जास्त मोठ्या पण काही असतात.
पण याचं मुलांना प्रचंड म्हणजे प्रचंड अप्रूप असतं. मुलं वर्षभर सु.ब. साठवून शेवटी काही तरी मोठं घ्यायचं म्हणून ठेवतात. माझ्या मुलाने स्वत:ला एक टायमर, भावला फोनच्या आकारात आतमध्ये मार्कर असलेली रंगपेटी आणि घरी आमची डोकी उठवायला अनेकानेक प्रकारच्या शिट्ट्या आणि असंच बरंच काही आणलं आहे. शाळा का आवडते ? विचारलं की पहिलं कारण सुपरबक्स मिळतात हे मिळालं तरी आम्ही आनंदी असतो.
गोडी लागली की पार्ट आणि पार्सल बर्‍याच गोष्टी आम्हाला मिळतात.

मुलांना फिक्शन आणि नॉन फिक्शन पुस्तकं द-र-रो-ज रात्री वाचून दाखवतो. कितीही दमलो असालो तरी शक्यतो चुकवत नाही. लहान असताना त्याला एकच पुस्तक ४-४ /५-५ वेळा वाचुन हवं असलं तर तेच वाचायचो.
वाचनालयातुन पुस्तक निवडताना तुला समजणार नाही, असं शक्यातो कधीही म्हणत नाही. त्याला हवी ती पुस्तकं आणि ती घेतली म्हणून मला हवी ती पुस्तकं अशी दोन्ही घेतो. हल्ली आम्ही हॅरी पॉटर वाचतोय. जाम म्हणजे जाम मजा येतेय. मोठ्याने हॅरी पॉटर कुणी ऐकत असेल तर वाचायला आणखी भारी वाटतं. Happy

पडलेल्या कुठल्याही प्रश्नाचं तू लहान आहेस हे उत्तर अंगवळणी पडल्याने तोंडातून अनेकदा बाहेर पडतचं तरी परत त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. नाही देता आलं तर आपण गूगलला विचारुया किंवा यावर संध्याकाळी बोलू करुन वेळ मागून तयारी करुन मग आम्ही बोलतो. हे बोलणं एकतर्फी नसतं. पण एकदाका 'वॉट इफ' प्रश्न चालू झाले की माझं डोकं उठतं.
पण अर्थात या सगळ्यात जास्त मजा मला येते. योग्य वेळी योग्य प्रश्न आले की जो आनंद होतो त्याला तोड नसते.

अमितव, शाळेची ही आयडिया फार म्हणजे फारच आवडली.

शाळेत न जाणे म्हणजे शिक्षा हे आमच्याघरी पण होते. अजूनही शाळा अति प्रिय आहे. शाळा बदलण्याचे नाव जरी काढले तरी घरात रडारड आणि आरडाओरडा सुरु होतो.

बाकी युक्त्या पण आवडल्या. यातल्या काही युक्त्यांसाठी लेक आता मोठा झालाय. पाढे पाठ करण्याची युक्ती मस्त आहे पण लेक दाद देईल असे वाटत नाही.

अमित, दुसऱ्या पोस्टला मम.
फक्त लायब्ररीतून पुस्तकं आणताना एक नियम केलाय 10 पुस्तकांपैकी किमान 4 तरी नॉन फिक्शन हवीत. यावर बोनस म्हणून दोन कारची मासिकं आणि एखादी कार्टून सीडी घेतली जाते. मला एखादेच पुस्तक घ्यायला मिळते.
आता रात्री वाचून दाखवणं बंद केलेय. त्याचा वाचायचा वेग खूपच जास्त आहे. पुस्तके वाचू नकोस... शाळेचा अभ्यास जरातरी पूर्ण कर असे म्हणायची पाळी येते.

हॅपॉ चे तिसरे-चौथे पारायण चालू आहे. पूर्वी तो मला शंका विचारायचा, आता बहूदा मला त्याला विचारावे लागेल.

अभ्यासाच्या युक्त्या आठवत नाहीत, पण लेक २-३ वर्षांचा असताना जेवण्यासाठी प्रत्येक घासाला कारचा आकार दिला जायचा. मग ती कार कोणती आणि घराच्या कोणाची आहे याची उजळणी होऊन कार पोटात पार्क व्हायची. मध्येच पेट्रोल संपले म्हणून पाणी प्यायलं जायचं.
दूरच्या-जवळच्या सगळ्या नातेवाईकांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या गाड्यांची नावे पाठ झाली होती आम्हाला.

युक्ती क्र. २

जुन्या घरातल्या बैठकीच्या खोलीत एका भिंतीवर मोठा चौकोन आखून त्याला "ब्लॅकबोर्ड पेंट" ने रंगवून घेतलं होतं.

त्यावर लिहून अभ्यास करायची सवय कन्येला लागली होती. लिहून ठेवलेले येता जाता नजरेस पडून पाठ होणेही सोपे होते.

(नव्या घरात तिच्या बेडरूम-अभ्यासाच्या खोलीत भिंतीवर पांढरा ग्लॉसी सन्मायका लावून व्हाईटबोर्ड तयार केला होता.)

याच फळ्याचा वापर घराचे मेसेज हब म्हणूनही होतो.

हे रंगकाम घरचे घरी करता येणारा उद्योग आहे. रंगाची डबी विकत मिळते. २ इंची ब्रश अन २०० मिली रंग आणला की रंगकाम सोपे. ब्लॅकबोर्डचा पेंट मागितला की दुकानात मिळतो.

याला अल्टरनेटिव्ह म्हणजे अ‍ॅमेझॉन सारख्या साईटवर ब्लॅकबोर्ड्ची स्टिकर पेपर्स (व्हाईटबोर्डचीही) मिळतात.

@ आ.रा.रा. : छान युक्ती
आमच्यकडे भीन्तीला लटकवता येणारा फळा आहे, आम्ही तिथे गणित सोडवत असु, लहान्पणी टिचर टिचर खेळत असु

सगळ्यान्च्याच आयडीया मस्त आहेत Happy

आ. रा. रा. यांची फळा युक्ती आमच्या लहानपणी आईने केली होती. मग फळ्याचा आकार कमी होऊन आता त्याची पाटी झाली, भिंतीवर टांगलेली असते आणि बाजारातून आणायच्या सामानाची यादी, निरोप, फोन नंबर असं आणीबाणीचं काहीही लिहायला उपयोगी येते.

एकदा मुलांना शिकवत असतांना ----सात खंडांची नावे काही पाठ होत नव्हती.रागाने मुलाच्या गालावर एक चपराक द्यावी
असा विचार मनात आला
पण... नवी कल्पना मनात आली. एका गालावर बोट टेकवून म्हटले एशिया,दुसऱ्यागालावर बोट टेकवून म्हटले युरोप,कान पकडून - ऑस्ट्रेलिया,
दुसरा कान पकडून आफ्रिका, कपाळावर बोट -नॉर्थ अमेरिका ,हनुवटीवर बोट -साउथ अमेरिका,आणि नाकावर बोट- अंटारटीका.असे
दोन चारदा म्हटले नि काय सात हि नवे पाठ झाली त्यास.मग पुढेही इतर मुलांना हीच युक्ती वापरत असे.

मी मुलांना अद्याक्षरांवरून एखादा त्यातल्या त्यात अर्थपूर्ण , मजेशीर शब्द बनवून तो लक्षात ठेवायला सांगत असे. ते खूप वेळा उपयोगी पडत असे. काही वेळा तो शब्दच मुलं विसरत असत. अर्थात अस विसरणं ही अगदी सहाजिकच होत.

आज एवढे वर्षानी मात्र आपल्या सगळयांच system चा फोलपणा जाणवतो. कल्पना शक्ती विकास, प्रॉब्लेम ओळखून त्याला सोल्यूशन, एखाद्या गोष्टीचे ऍनालिसिस, विषयाची आवड निर्माण होईल असे शिक्षण ह्या सगळयाच गोष्टींचा आपल्या शिक्षण पद्धतीत अभाव आहे असं मला हल्ली वाटत. अर्थात ह्याला आज तरी पर्याय नाही.

खरं तर हा धाग्याचा विषय नाही पण जस्ट वाटलं म्हणून लिहिलं

किलो, हेक्टो, डिका,मीटर, डेसी, सेंटी , मिली मीटर.
हे लक्षात ठेवायला आम्हाला आमच्या पाचवीतल्या सय्यद गुरूजींनी (जीवन शिक्षण विद्या मंदीर - प्राथमिक शाळा) एक युक्ती सांगितली होती.

आम्ही तेंव्हा खेड्यात रहायचो. आमच्या वर्गात बरीच डिंबळे आडनावाची मुले होती. तसेच त्या गावात रेडे यांच्या दुकानात सेव मिसळ मिळायची.
गुरूजी म्हणाले " येवढ लक्षात ठेवा, किती हे डिंबळे, रेडे सेमिसळ "

ते गुरुजी, त्यांनी सांगतानाचा तो वर्ग, त्यांचे हावभाव व ती युक्ती अजूनही माझ्या लक्षात आहे.

मराठी मधे वृत्त ओळखताना गण ओळखावे लागतात. हे गण ओळखण्यासाठी
यमातारजभानसगम हे सूत्र आहे. Happy
आणि
मासाजासतताग येती गण हे शार्दूलविक्रीडीत Happy

मासाजासतताग येति गण हे शार्दूलविक्रीडित

असं लिहिलं की ते त्या वृतातही बसतं.
अशी अन्य वृत्तांची लक्षणेही होती. पुस्तकातच असत.

बॅलन्स शीटमधल्या आयटम्सची क्रमवारी लक्षात ठेवायला एक इंग्रजी वाक्य सांगितलं जायचं. तेही एका क्लासमध्ये.
या पद्धतीला Mnemonic म्हणतात.

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१८ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!