मायबोली गणेशोत्सव २०१८ - स्वरचित आरत्या

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:33

वरदविनायक देवा जय जय गणराया
अनाथबंधू यावे भक्ता ताराया

विघ्नविनाशक किर्ती जगती प्रख्यात
पूजिती सर्वारंभी तुजला गणनाथ

मूषक वाहे तुजला गौरीनंदना
सिंदूरचर्चीसी नित्य श्री गजानना

दुर्वांकूर अतिप्रिय मोदक नैवेद्य
ॐकार स्वरूपा तू स्वसंवेद्य

वाहू तनमन धन तुझिया सेवेसी
साष्टांग नमन तुज पायांपाशी
(-पुरंदरे शशांक)

मायबोली गणेशोत्सव २०१८ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमधे प्रार्थना लिहू शकता .

Group content visibility: 
Use group defaults

जय गजानन जय गजानन

घरोघरी झाले आगमन
जय गजानन जय गजानन
लंब उदर, शुंडा वदनी
मूषक शोभे वाहनी
आवडे बहु मोदक
सारणात गूळ-खोबरे एक
वाहा एकवीस दुर्वा
संकटांनो दूर व्हा
गंध पुष्प रक्तवर्ण
सुखे हलवी गजकर्ण
दिसे गोंडस कैक रुपात
वसे मग मन्मनात
करता आरती मंत्रपुष्पांजली
आशीर्वादे भरली अंजुली
विसरुन आपपर भाव
दशदिन चाले उत्सव
पुन्हा ये लवकरी हीच आण
जय गजानन जय गजानन
विजया केळकर_______

ओवाळू आरती मोरया देवा गणराया, मोरया देवा गणराया
वंदन करूनी अनन्यभावे कुरवंडी काया ।।धृ ।।

लौकिक सुख मागता मागता शिणली बहु वाचा, देवा थकली रे वाचा
प्रेमसोहळे भक्तिसुखाचे द्यावे जी आर्ता ।।१||

पूजन करीता सगुणाचे तव भेटवी निजरुपा, देवा दाखवी निजरुपा
देहभाव झडझडुनी जावो पदकमली माथा ।।२।।

फेरे चुकवा लख चौर्‍यांशी देवा गणनाथा, मोरया देवा गणनाथा
शरण येऊनी तुज हाकारी तूचि जगी त्राता ।।३।।

शशांक पुरंदरे.

वाह! दोन्ही सुंदर!

शशांकजी, तुमची आरती मी म्हणनार आहे. सकाळी तुमची आरती, संध्याकाळी नेहमीची समर्थांची.
फेरे चुकवा लख चौर्‍यांशी देवा गणनाथा, >> येथे लख ऐवजी लक्ष म्हणेन. ते मला जरा ओळखीचे आणि म्हणायला सोपे वाटतेय. छानच आहे आरती.

छान आहेत दोन्ही आरत्या.

शशांक, तुमची आरती 'जाहले भजन'च्या चालीत छान म्हणता येते आहे. Happy

छान आहेत दोन्ही आरत्या.
शशांक, तुमची आरती 'जाहले भजन'च्या चालीत छान म्हणता येते आहे.
>>>>> मी येइ ओ विठ्ठ्ला... च्या चालीत म्हणून पाहील. मस्त मीटरमध्ये बसतयं

ओवाळू आरती श्री गणपती,
चैतन्यमूर्ती, मांगल्याधिपती ||धृ||

प्रथमेशा, बुद्धीदाता, वरदा,
विघ्नेशा, प्रारंभी तूज स्मरती ||१|

विद्याधीशा, अधिष्ठाता, सर्वज्ञा,
मोरया, आनंदे तूज नमिती ||२||

चराचरास्थिता, गणराजेंद्रा,
सर्वेषा, कौतुके तूज स्तविती ||३||

वेदज्ञा, विनायका, व्रातपती,
सुमंत्रा, सुमने तूज अर्पिती ||४||

ऐसा गुणपती तू गणपती,
प्रेमे ओवाळीन तूज आरती ||५||

ओवाळू आरती श्री गणपती,
चैतन्यमूर्ती, मांगल्याधिपती ||धृ||
============================
हर्षल (१४/०९/२०१८ - स. ११:१०)

Harshal chaan jamli aahe.
some problem in writing in marathi
from mobile. . . sorry