"घायल" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

Ghayal.jpg

"बलवन्त राय के कुत्ते" हा डायलॉग बहुधा "अरे ओ सांबा" इतका गाजलेला नसला तरीही आजही समप्रमाणात वजन राखून आहे. १९९० च्या आसपास म्हणजे मी शाळेत असताना प्रदर्शित झालेला हा सिनेमा. पण तेव्हा आज सारखे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचे फॅड नव्हते. शिवाय मल्टिप्लेक्सच मूळात अस्तित्वात नसल्याने एक चित्रपट फारतर २ चित्रपटगृहात लागलेला असे. त्यातूनही आमची मजल कयामत से, किंवा मैने प्यार किया सारखे 'प्रेमळ' सिनेमे पाहण्यापर्यंत असल्याने "अ‍ॅक्शनपॅक्ड" हा शब्द आम्ही फक्त वर्तमानपत्राच्या चित्रपटाच्या जाहिरातीतच वाचायचो. मूळात अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा म्हणजे काय हे तेव्हापर्यंत निदान मी तरी पाहिले नव्हते. या सिनेमाशी माझी पहिली ओळख झाली ती कॅसेटच्या माध्यमातून. त्याकाळी नुसत्या 'डायलॉग' च्या कॅसेट्स मिळत. अशीच शेजारी पाजारी मिळाली आणि ती कॅसेट ऐकून मी तेव्हाच 'घायल' सिनेमाची फॅन झाले. त्यामुळे हा चित्रपट मी पाहण्या अगोदर 'ऐकला' म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अजय मेहरा (सनी डिऑल) हा एक उत्तम बॉक्सर दिल्लिहून चांगल्या करियर साठी मुंबईत स्थलांतरीत होतो. जिथे त्याचा थोरला भाऊ अशोक मेहरा (राज बब्बर) आणि वहिनी संध्या (मौशुमी चॅटर्जी) रहात असतात. एक दिवस अचानक राज बब्बर नाहिसा झाल्याने पोलिसात तक्रार द्यायला गेलेल्या अजय ला भावाबद्दल अनेक गोष्टी हळू हळू उलगडू लागतात. असाच शोध घेताना एक दारूडा (अन्नु कपूर) त्याला अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो ती म्हणजे त्याचा भाऊ नाहिसा होण्यामागे बलवन्त राय (अमरिश पुरी) या नामांकित उद्योजकाचा हात आहे. कर्जात बुडालेल्या अशोक मेहरा ला बलवन्त राय पैसे देऊ करून त्याच्या व्यवसायाच्या आडून आपले काळे धंदे करतो. यथावकाश अशोक त्याचे कर्ज फेडूनही बलवन्त त्याच्या (अशोकच्या) व्यवसायाचा गैरफायदा घेत असल्याचे अशोकच्या लक्षात येते आणि तो आपल्याला हे पसंत नसल्याचे सांगतो. बलवन्त राय अशोकला पळवून आणून आपल्या अड्ड्यावर बंदी करून ठेवतो.
दरम्यान भावाला शोधून थकलेला अजय थेट बलवन्त रायच्या घरी त्याच्या पार्टित जाऊन त्याला खुलेआम धमकी देतो. रायच्या लोकांनी त्यावेळी केलेल्या मारहाणीने अजय ची खात्री पटते की आपला भाऊ याच्याच ताब्यात आहे. इकडे पार्टित धुमाकुळ झाल्याने अपमानित झालेला राय रात्री अजय ला फोन करून सेंट्रल पार्क मध्ये भावाला भेटायला ये असा फोन करतो. तिथे अजय च्या हातात पडते ते भावाचे प्रेत. खुनाचा आळ प्रत्यक्ष अजय वर येतो आणि खरा चित्रपट इथून सुरू होतो. कोर्टात, मेहरा कुटुंबाला अत्यंत जवळ असलेले नामवंत वकिल रामशरण गुप्ता (शफी इनामदार) हे रायच्या पावरपुढे दबलेले असल्याने अजय च्या विरूद्ध साक्ष देऊन त्यानेच भावाचा खून केल्याचे सांगतात, इतकेच नव्हे तर संध्या आणि अजय यांचे अनैतिक संबंधही होते असे ही खोटे सांगतात. त्या खोट्या आरोपाच्या धक्क्याने संध्या आत्महत्या करते आणि एक कुटुंब उध्वस्त होते.

५ वर्षाच्या कारावासात अजय ला तुरूंगात अजून ३ आरोपी जे इतर गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत असतात ते मदतीचा हात पुढे करतात. आणि पुढे चित्रपट अजून थरारक होत जातो. संधी साधून तुरूंगातून पळून अजय आणि त्याचे तीन साथीदार एक थ्रीटन्/हाफ्टन सारखे वाहन अपहृत करून आपल्या कामगिरीवर निघतात. बलवन्त राय हा जरी मुख्य काटा असला तरिही अधले मधले अडथळे (शफी इनामदार इन्स्पेक्टर शर्मा इ.) सारखे छोटे काटे ही अजय दूर करून अखेर बलवन्त राय ला संपवतो. हे सर्व कसे घडते हे चित्रपटात पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे असं निदान मला तरी वाटतं. आज हा चित्रपट पाहताना आपल्याला ते तितकेसे जाणवणार नाही पण ९० च्या दशकात नक्कीच हा एक अफलातून प्रयोग होता.

आज दुपारी चॅनल्स सर्फ करताना अचानक हा सिनेमा दिसला आणि मग मी तो सिनेमा पाहण्याची संधी दवडली नाही. चित्रपटात भाव खाल्लाय तो निव्वळ आणि निव्वळ अजय चे काम केलेल्या सनी डिऑल ने. मला जाणवलं की मी आजतागायत त्याचे जे काही सिनेमे पाहिले त्यात त्याला नीट निरखून पाहिलेच नाही. कुटुंब उध्वस्त झाल्याने आतून उद्विग्न झालेला अजय मेहरा त्याने खूपच ताकदिने साकारला आहे. अनावर होणारा राग, कमिशनर ला come on commissioner, this is your job, your job commissioner असे बजावून सांगत कर्तव्याची जाणिव करून देणारा अजय, जुन्या घरात गेल्यावर भाऊ आणि वहिनीच्या आठवणीने भावूक होणारा अजय, आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या चिडीने इरेला पेटलेला अजय. अशी अनेक रूपं आपल्याला त्याच्यात दिसतात.

संवादाचे तर काय कौतुक करावे? खुद्द राय ला "ये गिधड भपकियां किसि और को देना बलवन्त राय, अगर मेरे भाई को कुछ हो गया, तो मै तुम्हारा वो हश्र करूंगा की तुम्हे अपने पैदा होने पे अफसोस होगा. " अशा धमक्या देणं. तिथून पोलिसांच्या मारहाणीत "अगर तुमने मुझे जिंदा छोड दिया तो बहोत पछताओगे इन्स्पेक्टर " असं खुद्द इन्स्पेक्टरला सांगणं. तुरूंगात "झक मारती है पुलिस, उतारकर फेक दो ये वर्दी, और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले में. " असं म्हणत अख्ख्या पोलिस डिपार्टमेंटला इरसाल शिवी देणं....हे आणि यासारखे इतर संवाद प्रेक्षकांचं सुद्धा रक्त तापवून जातात. आणि एव्हरग्रीन संवाद जो डिऑल फॅमिलीत पिढिजात आहे "कुत्ते कमिने मैं तेरा खून पी जाऊंगा" तो पण सिनेमात आहेच.

मला व्यक्तिश: मजबुत यष्टी, पांढरा बनियन आणि मोठ्या डायलचे घड्याळ घातलेले पुरूष हे डोळ्यांना मेजवानी वाटतात. पैकी सनीने या सिनेमात घड्याळ घातलेले नाही आणि बनियन ब्राऊन घातलेला आहे. पण त्याचा आवेश आणि त्वेष आणि एकूण शरिरयष्टी पाहून मी ब्राऊन कलर खपवून घेतला. सिनेमात जरी, तो "घायल" असला तरी त्याला पाहून इकडे मी पुरती "घायाळ" झाले होते. बलवन्त रायच्या पार्टित ४-६ गुंडांना न आवरणारा, कोर्टात वहिनी आणि आपल्यावर झालेला खोटा आरोप ऐकून चिडून आरोपिचा पिंजराच पुरता उध्वस्त करणारा आणि चित्रपटाच्या शेवटी आजूबाजूला हजारोंचा जमाव असून, एका हाताने बलवन्त राय ची मान गच्च आवळून धरलेला सनी आणि मागून त्याला जोर लावून दूर करण्याच्या प्रयत्नात असलेले ५-६ पोलिस... यश कुणालाच येत नाही, पण सिनेमात तो प्रसंग इतका हुबेहुब रंगवलाय की, सनी ने त्याची मान खरंच गच्च आवळली आहे आणि पोलिस पण खरंच संपुर्ण जोर लावून त्याला दूर करतायत तरी हा कुणाला आवरला जात नाही हे पाहून आपण मनात नक्की म्हणतो "अर्रे हिरो असावा तर असा...." Happy

स्टारकास्ट मजबूत असली तरिही खासम खास लक्षात राहतो तो फक्त आणि फक्त अ‍ॅन्ग्री यंग मॅन सनी आणि अमरिश पुरीच. मिनाक्षी शेषाद्री, कुलभुषण खरबंदा, ओमपुरी, शफी इनामदार, आशालता यांचेही रोल जिथल्या तिथे सशक्त आहेत आणि ते वठवलेत ही खूप छान.

सिनेमा बॉलिवूडचा असल्याने तो सर्वांग सुंदरच असेल कशावरून? काही लूप होल्स आपल्याला ठळकपणे जाणवतात पण सिनेमा इतका अ‍ॅक्शनपॅक्ड आहे की आपले त्याकडे सहज दुर्लक्ष होते. जसं की
*तुरूंगातून पळून जाताना अजय आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या अख्ख्या तुकडीवर हल्ला करतात आणि एक साखळी तोडून पळून जातात, रस्त्यात त्यांना एक मोठे वाहन मिळते त्यात योगायोगाने चार लोक असतात आणि हे पण चार. आणखी योगायोग म्हणजे त्या चौघांचे कपडे यांना फिट बसतात.
* डेका च्या अड्ड्याला आग लावल्यावर अड्ड्याच्या समोर बसून सनी बलवन्त राय ला फोन करतो, उघड्या मैदानात वायर्ड फोन ही फॅक्ट पचत नाही पण असो.
* ९० च्या दशकात कुणाचा माग काढणं आजच्या इतकं सोपं नव्हतं कारण त्यावेळी मोबाईल्स नव्हतेच. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत "खंडहर" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती "प्यासी जवानी है" गाणं म्हणत नाचत असते. पोलिस नेमके तिथेच कसे येतात, सनी ला त्यांची चाहूल कशी लागते हे प्रश्न विचारायचे नाहीत. त्यातूनही ते चौघे निघून गेल्यावरही पोलिस तिथे येई पर्यंत ही डिस्कोशांती नाचतच राहते, ते का? हे तर अजिबातच विचारायचं नाही.
* कमिशनरच्या घरात खुलेआम हे चौघे शिरतात पण कुणीच त्यांना पहात नाही.
अर्थात अशी अनेक निरिक्षणं आहेत, काढायचीच ठरवली तर लिस्टच निघेल.

नॉर्मली अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचे संगित हे फारसे लक्षात घेतले जात नाही, तरिही मला वाटते सनीच्या सर्व सिनेमांची गाणी दखल घेण्याइतपत चांगली होती. या सिनेमातली 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" "माहिया तेरी कसम" आणि "प्यासी जवानी है" हे गाणं थोडं बोल्ड असलं तरी ऐकण्याजोगी आहेत.

अजून काय लिहावं? काही सिनेमे आपल्या मनात घर करून राहतात त्यातलाच हा एक राजकुमार संतोषीचा सिनेमा. कथा साधारण असली तरिही राजकुमार संतोषींच्या डायरेक्शन आणि सनीच्या अ‍ॅक्शनने प्रेक्षकांना त्याकाळी ही खिळवून ठेवले होते आणि आजही हा सिनेमा पाहिला तर आपण तो जिथून पहायला लागू तिथपासून ते तो संपेपर्यंत चॅनल ओलांडून जाऊ देत नाही. या सिनेमा नंतर राजकुमार संतोषी, सनी हे एक उत्तम मिश्रण बॉलिवुड ला लाभलं आणि त्यांचे पुढचे सिनेमे (घातक आणि दामिनी ) सुद्धा सुपरहिट ठरले. घायल नंतर सनीची गणती उत्तम डायलॉग डिलिव्हरी करणार्‍या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. "घायल" हा नि:शंकपणे सनीच्या एकूण चित्रपट कारकिर्दितला मैलाचा दगड आहे.
********************************************************************************************

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

राजकुमार संतोषी यांनी या सिनेमासाठी इंग्लंडहून फाईट सीन्स साठी तज्ञ बोलावले होते. अर्जुन मधे राहुल रवैल यांनी पण विदेशी फाईट मास्टर वापरले होते. छत्र्यांचा सीन आणि भर बाजारात गुप्ता वर झालेला हल्ला हे सीन्स यादगार झाले आहेत. शेवट मात्र टिपीकल बॉलीवूड स्टाईल.

छान लिहिलंय.
दोनदा बघितलाय हा, एकदा थेटरात एकदा टीव्हीवर.

लूपहोल्स बरेच असले तरी छान ग्रिप आहे चित्रपटाला.

दोनदा बघितलाय >>> फक्त ?
रामायण, महाभारत, शोले, घायल हे किती वेळा ऐकले , वाचले, पाहीले हे सांगायचे, मोजायचे नसते. फक्त मनोभावे पारायणं करायची असतात.
हभप एक्स
(हळूच भलतीकडे पहाणारा )

येस.घायल. सुंदर पिक्चर होता.सनी देओल अश्या पिक्चर मध्ये काहीही करतो.खूप चिडतो.पण तो नेहमीच पटतो.अर्जुन, घायल, घातक,दामिनी आणि गदर सगळे पिक्चर पठ्ठ्याने डायलॉग आणि आवेशावर चालवले आहेत.

घातक थिएटरात बघितला तेव्हा आवडला होता ,घायल सिनेमाचे नाव ऐकुण आहे,पण बघितला नाहीए अजून . माहीती करुन देण्यासाठी धन्यवाद.

. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत "खंडहर" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती "प्यासी जवानी है" गाणं म्हणत नाचत असते. पोलिस नेमके तिथेच कसे येतात >> हे गाणे मागाहून सिनेमात टाकले आहे असे वाटत राहते. सुरूवातीच्या प्रिंट्समधे गाण्याच्या सुरूवातीला आणि नंतर रीळांचे नंबर्स दिसले होते. नंतर ते गाणे मागाहून टाकल्याचे वाचले देखील होते. एडीटिंग सदोष झाल्याने तो पॅच वर्क वाटतो. डॉन मधे शेवटी अमिताभच्या मागे पोलीस आणि गुंड लागतात. दिग्दर्शक चंद्रा बारोट ने हा सिनेमा मनोजकुमार यांना दाखवला (मनोजकुमार अभिनेता म्हणून कसाही असला तरी दिग्दर्शक म्हणून बाप होता). मनोजकुमारने सांगितले इंटरव्हलनंतर सिनेमात खूप टेण्शन आहे. ते रीलीज करण्यासाठी एखादे धडक फडक गाणे टाक. चंद्रा बारोटने मनोजकुमारचा सल्ला मानला आणि खईके पान बनारस वाला हे गाणे अक्षरशः एका दिवसात पूर्ण करून सिनेमात टाकले.
घायलमधेही सुरूवातीच्या अर्ध्या तासात गाणी संपतात. नंतर ताण वाढत जातो. कदाचित या एकमेव कारणासाठी गाणे टाकले असावे. ते टाकताना पुढचे आणि मागचे प्रसंग जोडून घेता आलेले नाहीत.

भारी Happy

घातक मधले डायलॉगस जास्त भारी आहेत >>>> +१

मस्तच लिहिलंय, सनी देवल लास्टच्या फायटिंगला कसलीच जबराट उडी मारतं आमपुरीवर, ते पण एव्हड्या उंच आकाशपाळण्याच्या टोकावरून. ज्याचा ढाई किलोचा हात लोकांवर पडल्यावर लोक उठते नही तर उठ जाते है, अशी ख्याती असणारा माणूस अख्खा आमपुरीवर पडतो तरी आमपुरीला साधा खरचटत पण नाय, माझा या लास्टच्या फायटिंगमुलं वाईच गोंधल उडाला होता नक्की हिरो कोन

ढाई किलो का हाथ ते तिकडे दामिनी मध्ये.. कुठेही काही जोडाल तर गोंधळ व्हईलच. बिचार्‍या सनीचा काय दोष.

आमपुरीवर ??
आमरसपुरी, मटणपुरी हे दोन भाऊ माहीत होते.

होतंय हो असं कधीकधी हिंदी सिनेमात पण.
त्या अग्निपथ मध्ये पण नाय का, बिचारा धडधाकट ह्रितीक जवळजवळ मरायला टेकला होता तेव्हा कुठे थोडं लक मिळून कांचा छिना ला मारता आलं.

छान लिहिलंय दक्षिणा.
घायल टीव्हीवर पाहिलाय. हा सिनेमा आला तेव्हा मी ४थी त होते. आणि थिएटरला असे पिच्चर बघायला मला कुणी न्यायचं नाही.
अर्जुन, घायल, घातक, दामिनी, झिद्दी, गदर सगळे पिच्चर आवडतात.

वा! छान लिहिलंय.
सनी बेताब, अर्जुन पासून आपला आवडता. अर्जुनमध्ये तर भलताच आवडला होता.
त्या तुलनेत घायलमधला त्याचा वावर जरा इव्हॉल्व्ड वाटला होता. पण ती सनीपेक्षा संतोषीची कमाल होती.
घायल खरा राजकुमार संतोषीचाच !

नंतरचा घातक मला तितकासा आवडला नाही.

दक्षिणा , छान लिहिलंयस ग!
मी ही सनी फॅन . अर्जुन, घायल, घातक, दामिनी, झिद्दी, गदर सगळे पिच्चर आवडतात. नवरा आणि सगळे कझिन्स जाम चिडवतात मला सनी आवडतो म्हणून. Happy
घायल तेव्हा लहान असल्यामुळे थीयेटर मधे पहिला न्हवता त्याची कसर घायल रीटर्न बघुन भरुन काढली. तो ही आवडलाच. Happy

एक चित्रपट आहे: फरीदा जलाल सनीची आई, दिल्लीला सुधारवून मुंबईत येतात, सनीला शपथ दिल्याने तो हातही उगारत नसतो, मग एक दिवस शपथ मागे घेऊन फरीदा जलाल म्हणते - अब इस शहर को भी सुधार देंगे. आणि मग सनीच्या कारवाया, एका फाईटमध्ये माणसं अक्षरशः उडतात असे दाखवलेय. हा चित्रपट कोणता कुणाला आठवतंय का?
घातक?

वहावत जाण्याच्या वयात बघितलेला हा चित्रपट, माझ्या कडे २५ एक लहान मोठे फोटो होते सनी देओल चे. आणि एक मोठे पोस्टर सुद्धा होते पुस्तकान्च्या कपाटात आतुन लावलेले, ह्या विशयी वडिलांना पण आक्शेप नव्ह्ता, पोरगं व्यायाम करतय ह्यातच त्याना आनंद होता Proud

हा हा.
मी पण असले चित्रपट बघितले की व्यायाम सुरू करायचो काही दिवस.

मी घायल नाही घातक फॅन आहे..
लेख वाचायला बसली तर डोक्यात घातकच सुरु होता आणि म्हटल अरे साला स्टोरी कधी बदलली..हेहेहे..
असो.. घायल नाही पाहिला.. घातक मात्र खुपदा पाहिलाय.. आता घायल पाहावा लागेल..

<० च्या दशकात कुणाचा माग काढणं आजच्या इतकं सोपं नव्हतं कारण त्यावेळी मोबाईल्स नव्हतेच. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत "खंडहर" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती "प्यासी जवानी है" गाणं म्हणत नाचत असते. >
खो खो हसतोय...
फारेंडांच्या 'तिरंगा'ची आठवण झाली.
मस्त परिक्षण.

राजकुमार संतोषी ने मीनाक्षी शेषाद्री वर मनापासून प्रेम केले. त्याच्या चित्रपटात ती जेवढी सुंदर दिसलिये तेवढी अन्य कुठल्याही चित्रपटात दिसली नाही. सनी देओल - मीनाक्षी ही एकमेकाना पूरक अशी जोडी असल्यामुळे लक्षात राहिलीये.

सनी आणि राजकुमार संतोषी चे आम्ही फॅन. शक्यतो एकही चित्रपट सोडला नाहीये.

AMi -नक्की बघा, निराश नाही होणार तुम्ही. घातक पासून सुरू करा, नंतर दामिनी बघा, गदर बघितला असेलच.
डायलॉगस साठी बघायचा !!!

Pages