माझ्या घरात देव्हारा नसेल

Submitted by मुग्धमानसी on 9 September, 2018 - 07:26

माझ्या घरात देव्हारा नसेल

उगवतीच्या धगीने पाठ शेकत माझं घर
एका थंडशार मावळतीच्या वाटेकडे डोळे लाऊन बसेल
आनंदाची सोटमुळं पायाशी अंथरून,
अथांग परिपूर्ण दु:खाच्या अनाकार फांद्यांनी ते अवकाशभर हसेल
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.

मध्यान्हीच्या कवडशांनी माझे कोनाडे सजतील
चंद्राच्या दग्ध धारांनी माझ्या भिंती भिजतील
पाऊस... कधी बाहेर कधी आत
खूपसारे गंध असतील माझ्या घरात
तरी तिथं कुणालाही असं ’अधिष्ठान’ वगैरे नसेल
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.

माझ्या घरात मी असेन. असेनच की...अर्थातच!
बाकी सारे जे जे काही... तो तो सारा तुझाच खच.
छपरातून ओघळणारी भिंतींमधली जुनाट ओल
घरात मी अन् माझ्यात तू... रुजत जातो खोल खोल
इतक्या खोलवर जाता जाता कोण मुक्काम शोधत बसेल?
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.

माझ्या घरात एक छोटा थरथरणारा दिवा आहे
घरभर चंचल भिरभिरणारा ग्रहमालांचा थवा आहे
ब्रम्हांडाला टांगून ठेवते अंधाराच्या खिडक्यांमधून
माझ्या घरात घुमत राहते माझी-तुझी-त्याची धून
त्या तुमच्या देवाघरी, माझंच घर देवघर असेल!
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह!
निव्वळ अप्रतिम! भारीच!

चंद्राच्या दग्ध धारांनी?

माझ्या घरात मी असेन. असेनच की...अर्थातच!
बाकी सारे जे जे काही... तो तो सारा तुझाच खच.
छपरातून ओघळणारी भिंतींमधली जुनाट ओल
घरात मी अन् माझ्यात तू... रुजत जातो खोल खोल
इतक्या खोलवर जाता जाता कोण मुक्काम शोधत बसेल?
माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.>> अप्रतिमच
खुप आवडली कविता

Submitted by mr.pandit on 9 September, 2018 - 17:42>>>+१११

सगळीच कविता छाने! 'माझ्या घरात... देव्हारा मात्र नसेल.' या भोवती काय काय गुंफून शेवटी 'त्या तुमच्या देवाघरी, माझंच घर देवघर असेल!' इथपर्यंत कविता आलीए. भारीच!