मक्याचा उपमा

Submitted by VB on 5 September, 2018 - 09:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचे दाणे( आम्ही दोन मोठी कणसे घेतली होती)
लसूण ७-८ पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा (लांबट चिरून)
कोथिंबीर
कडीपत्ता
मिरची (आम्हाला जास्त तिखट लागते, सो आम्ही ८ ,घेतल्या होत्या, ज्यांना तिखट झेपत नाही त्यांनी कमी घ्या)
राई - अर्धा छोटा चमचा
जिरे - एक चमचा
सौंफ (बडीशोप) - अर्धा छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
हळद - एक चमच
तूप किंवा तेल आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. भाजताना ते थोडेसे कच्चेच ठेवायचे. भाजलेले दाणे थोडे गार झाले की मिक्सरमध्ये भरड्या सारखे वाटायचे. आता तो भरडा एका भांड्यात काढून घ्यायचा अन त्यातच मिरची , कांदा, लसूण, कोथिंबीर कडीपत्ता, थोडीसी मोहरी, जिरे, सौंफ एकत्र बारीक वाटून घ्यायचे.
हे झाले की गॅसवर कढई ठेवून ती तापवून घ्यायची. खूप जास्त तापवायची नाही अन मुख्य म्हणजे आच मध्यम ठेवायची. तर कढई नीट तापली की त्यात दोन तीन मोठे चमचे तूप किंवा तेल घाला. तेल असेल तर कडक तापू द्यायचे, तूप जास्त गरम केले की जळते, सो जास्त तापवायचे नाही. आता त्यात मिरची अन बाकीच्या साहित्याचे जे वाटण केलेय ते घालून त्याची फोडणी करावी. फोडणीला सोनेरी रंग आला की त्यात मक्याची भरड घालून हलवायचे. लक्षात घ्या, याला सतत हलवावे लागते नाहीतर कढईला चिकटून जळते, अन हो या उपम्यात पाणी नाही घालायचे. छान गोळा बनायला लागला की उपमा तयार झाला.
हा गरमागरम खायला भारी लागतोच पण गार करून खाल्ला तरी छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरुसे आहे
अधिक टिपा: 

शक्यतो हा पदार्थ तुपातच करायचा , छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही विदर्भात मक्याची कणसं भाजुन न घेता बरेचदा तशिच किसुन घेतो, बाकि पुढचं सगळं सेम... कलसा म्हणतो ह्या प्रकाराला आम्ही. स्वीट कॉर्न घेतलेत तर हे प्रकरण थोडं गोड होतं, नॉर्मल कणसं घेतलेत कि आपल्याला हवी तशी चव अ‍ॅड्जस्ट करता येते. Happy

मक्याचे कणीस जाड किसणीने किसले, तर हा प्रकार करायला खूप सोपे जाते. दाणे काढून मग मिक्सरला फिरवायची कटकटही टळते.

प्रसन्न यांनी सांगितल्याप्रमाणे स्वीटकॉर्नपेक्षा साधा गावराणी मका या उपम्यासाठी चांगला.

पूर्वी हा प्रकार बरेचदा व्हायचा. पण मका म्हणजे जवळजवळ संपूर्ण स्टार्च. त्यामुळे आजकाल टाळला जातो.