नियतकालिकांतील स्तंभलेखक, सदरे इ.

Submitted by गजानन on 10 August, 2018 - 02:54

पूर्वी लोकसत्ताच्या लोकरंग, चतुरंग, चित्ररंग, हास्यरंग, लोकमुद्रा या पुरवण्या भरगच्च असायच्या. (की त्या वेळी आंतरजालीय साहित्याची भरपूर प्रमाणातील सहज उपलब्धी नसल्याने तसे वाटे कोण जाणे!) बालवाचकांसाठी म्हणून रंजक विभाग असायचा. बिरबलाच्या गोष्टी, घरच्या घरी कमी साहित्यात करून बघता येतील असे विज्ञानिक तत्वांवर आधारीत प्रयोग , बुचकळ्यात टाकणारी दैंनंदिन व्यवहारातील लेखी गणितं. वगैरे. प्रत्येक आठवड्यात कृपा कुलकर्णी यांनी भारतातील इतर भाषांमधून मराठीत भाषांतर केलेली एक नवी गोष्ट असे. प्रत्येक वेळी वेगळ्या भाषेतली भाषांतरीत गोष्ट. या लेखिकेला एवढ्या भाषा कश्या काय येतात म्हणून त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटे. तंबी दुराई यांचा स्तंभ (बेरीज वजाबाकी?) शेवटी वाचायला मी राखून ठेवत असे. श्रीकांत बोजेवारांची चित्रपट परिक्षणं हे सदरही असेच. त्यावेळी ऊठसूठ सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणे शक्य नव्हते. तेंव्हा ही परिक्षणं वाचणे म्हणजेही एक पर्वणी वाटे. रविंद्र पाथरे यांची नाट्यसमीक्षा, आणखी एक सई नावाच्या एक लेखिका (आडनाव आठवत नाही. किंवा नावातही गफलत झाली असण्याची शक्यता आहे.) सिनेमातल्या नटनट्यांच्या मुलाखती लिहायच्या, ती सदरं वाचायला मजा येई. शुभदा चौकर यांचे 'ज.. ज.. जाहिरातीचा' हे स्फूटही मस्त असायचे. याशिवाय वैद्यकीय लेख लिहिणारे डॉ. सुरेश नाडकर्णी, संगीत आणि इतर विषयांवर लिहिणारे अच्युत गोडबोले, सुधीर मोघे इ.

त्यानंतर मंगला गोडबोले यांचे (अशी माणसं तशी माणसं की काहीतरी नावाचे) एक सदर येत होते. वसंत बापटांचे 'विसरू म्हणता विसरेना', ही आणखी काही लक्षात राहिलेली सदरं. यशवंत रांजणकरांची 'ऐश्वर्यकुंड' ही धारावाहीक कादंबरीही बरीच उत्सुकता ताणवणारी होती. मला आठवतेय रविवारी सकाळी नऊ वाजता माझा क्लास असे. तेंव्हा एकदा मी 'ऐश्वर्यंकुंड' च्या पानाची वाचण्यासाठी छोटी घडी करून वहीत लपवून क्लासला गेलो होतो. चतुरंग पुरवणीतल्या शुभदा पटवर्धन, वीणा देव, भा. ल. महाबळ, वगैरे मंडळी वर्षानुवर्षे वैयक्तिक ओळख असल्यासारखे वाटत.

'लोकमुद्रा'तली सदरही खूप आवडायची. त्यातल्या पहिल्या पानावरची आशा भोसले, सुधीर फडके, माधुरी दीक्षित, विजया राज्याध्यक्ष यांची मनोगते आजही आठवतात. आतल्या पानांत गौतम राज्याध्यक्ष यांचे त्यांच्या फोटोग्राफितल्या किश्श्यांचे एक सदर असे. बेबीचे कार्टून (आप्पास्वामी की असे काहीतरी त्यांचे नाव होते.) तर खास असत. माझ्याकडे त्यांच्या कात्रणांची एक वही होती.

सध्या वेळेअभावी एवढेच लिहितो.

तुम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी नियतकालिकांमधील कोणते स्तंभ, सदरं आवडायची / अजून लक्षात राहिली आहेत? सध्याच्या नियतकालिकांमधील कोणते स्तंभ, वैचारिक सदरं आवर्जून वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही? याविषयी वाचायला आवडेल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वसंत बापटांचं सदर आणि ऐश्वर्यकुंड कादंबरी आठवत नाहीत. तेव्हा मी महाराष्ट्रात नसेम कदाचित. तुम्ही लिहिलेले बाकीचे आठवतात.
शं ना नवरेंचं सदर (यातले काही लेखविषय आठवणीत आहेत), अशोक नायगावकरांची पत्रं (तात्या आणि दुसरे कोणीतरी - शाकाहारातल्या कापाकापी जाळपोळीवरची कविता आधी तिथे वाचलेली. तंबीदुराई.
शुभांगी गोखलेंचं सदर आवडलेलं. त्या ईमेलला उत्तरही द्यायच्या म्हणून आणखीनच लक्षात राहिलं.
एक शैलजा शेवडे विनोदी लिहीत, तेही आवडलेलं.
सई तांबेंची सोशल वर्करची डायरी (याचं पुस्तक आलंय)

सध्या पुरवण्यांपेक्षा रोजच्या पेपरातली काही सदरं आवर्जून वाचतो.
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ (विज्ञान), रवि आमले (यांचं सदर गेल्यावर्षी होतं), मंगेश सोमण (अर्थविषयक), जे आले ते रमले (विदेशातून येऊन भारतात राहिलेल्या आणि इथे काही भरीव केलेल्या लोकांबद्दल ) ऑर्वेलच्या निबंधांचे अनुवाद, मिलिंद मुरुगकरांचं शेतीच्या अर्थकारणावरचं.
शनिवारचे नवीन पुस्तकांचे परिचय .

भरत, <<सिनेमातल्या नटनट्यांच्या मुलाखती लिहायच्या >> या सई तांबेच असाव्यात बहुधा.
शं. ना. नवरे, नायगावकरांची पत्रे आठवली. शैलजा शेवडेंचे विनोदी ठोसे मस्त असत.
विद्याधर गोखलेंचे एक सदरही बरेच दिवस चालले होते. पण आता नीटसे आठवत नाही.
विकास सबनीसांची व्यंगचित्रं आणि लेखांमधली चित्रंही खास असत. नंतर फारसे दिसले नाहीत ते लोकसत्तेत.

महाराष्ट्र टाइम्समध्ये अशोक जैन "कानोकानी" नावाचे सदर लिहीत असत. ते भयंकर आवडायचे.
एक जण मुंबईत भरणार्‍या चित्रप्रदर्शनांवर लिहायचे. श्रीखंडात पोहलं तर कसं वाटेल असं ते गच्च लिखाण असे पण वाचायला मजा येई. मुंबईत असलं काहितरी भारी असतं आणि आपण आजवर गॅलरी पाहिलेली नाही असे तेव्हा वाटत असे. (हे चित्रकलेवर लिहिणारे सगळेच असे डेन्स का लिहितात कोण जाणे. प्रभाकर पाध्यांचे पुस्तक तर अजूनच झंगड).

मला टाइम्स मधले मिडल कॉलम वाचायला फार आवडत असे. आपले लेखन त्यात छापून यावे असे एक स्वप्न पण होते काही काळ.
कर्नल प्राउडफूट फार खुसखुशीत लिहित त्या मिडल कॉलम मधे. संपादकीयाचे तीन भाग असायचे. त्यातले पहिले दोन काही समजायचे नाहीत. पण शेवटचा थोडा थोडा समजत असे.

मिड डे मधले बिझी बी चे लेखन पण आवडते होते.

आर के नारायण यांचं लेखन वीकली मधे आणि कमलेश्वर यांनी लिहिलेली मौसम ची मूळ गोष्ट धर्मयुग मधे दर आठवड्याला वाचलेली आठवते

नवाकाळ किंवा नवशक्ती मध्ये प्रमोद नवलकर लिहायचे - भटक्याची भ्रमंती. रात्री वेषांतर करुन, मुंबईचा उजेडात समोर न येणारा चेहेरा, तद्नुषंगाने घडणारे त्यांच्या शैलीत मांडलेले धाडसी किस्से अतिशय उत्सुकतेने, आधाश्या प्रमाणे वाचण्याची आम्हा शाळकरी मुलांना सवय होती...

कृपा कुलकर्णी यांचे शिवाजी मंदिरात जर्मन आणि फ्रेंच भाषांचे वर्ग होते. त्यांचे वडीलही या भाषा शिकवत.

शन्नांच्या सदराचं नाव शन्नाडे होतं. मटामध्ये रविवारी प्रसिद्ध होई.

इंडियन एक्स्प्रेस - इंदर मल्होत्रा - rear view
Express economic history series - शाजी विक्रमन्
People like us , people like them - business standard.
शं.नांची सदरे. लोकसत्तेत वाचलीत. मटासाठीही लिहिली असतील तर कल्पना नाही.
त्यातलं टिकलीएवढी प्रसिद्धी आणि आयुष्यभरात ज्यांच्याशी चुकीचं वागलो, त्यांची यादी करून माफी मागणाऱा माणूस , हॉटेलात किशोरवयीनांनी केलेला वाढदिवस, अमेरिकन माणसासाठी दिवाळीची खरेदी, असे लेख आठवतात.कदाचित कात्रणं असतील अजून सांभाळलेली.
https://www.loksatta.com/lokprabha/shanna-navare-212633/

लोकसत्ता परिक्रमा - 1986 ते 1997 - लता राजे - या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले. " लोकसत्ता मध्ये आठवडयातुन एकदा जागतिक घडामोडींचा आढावा घेण्याच्या उदि्दष्टाने माजी संपादक श्री. माधवराव गडकरी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या परिक्रमा या सदराने अल्पावधीत आढावा हे स्वरूप बदलले आणि मग त्याचा आकृतिबंधही बदलत गेला"असे त्या म्हणतात

यु. म. पठाण यांचे एखादया शब्दाच्या उत्पत्ती वरचे सदर मला फार आवडायचे. धावते जग असेही एक सदर मी वाचत असल्याचे आठवते. विजय तेंडुलकरही एक कुठलंसं सदर लिहीत. आता लेखक आणि सदरांची नांवे विसरायला झालीत. भा. ल. महाबळ यांचे सदरही मला आवडायचे. कमलेश्वर यांचा परिक्रमा हा टीव्हीवरील कार्यक्रम मी आवर्जून पहायचो. वरील लेख आणि प्रतिसादातून जुन्या गोष्टींना पुन्हा उजाळा मिळाला.

आसाराम लोमटेंचे धूळपेर
राजिव सानेंचे गल्लत गफलत गहजब
सदानंद मोरेंचे साधनामधले उंबरठ्याबाहेर
वर भरत यांनी सांगितलेले इंदर् मल्होत्रांचे रियर व्ह्यू
हिंदूत सध्या दर पंधरवड्याला रविवारी येणारे राजीव भार्गव यांचे पब्लिक आय.

अच्चुत गोडबोले दर रविवारी , एका शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक जीवनाचा आढावा घेणारे लेखन करित . त्याच लेखांचे संकलन "किमयागार" नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाषित झाले आहे.
हे लेख कधी वाचले नाहीत पण पुस्तक संग्रही आहे. अधून मधून नियमितपणे वाचले जाते. खूप रोचक माहिती मिळते या सगळ्या आपल्याला एकेका शब्दात माहित असलेल्या शास्त्रद्यांबद्दल . जरूर वाचावे असे पुस्तक.

हे चित्रकलेवर लिहिणारे सगळेच असे डेन्स का लिहितात कोण जाणे.<< दोनतीन कारणे. एक म्हणजे या विषयावर मराठीत संकल्पनात्मक लिखाण फार कमी. त्यामुळे संकल्पनात्मक वर्णन व तत्सम काही असले की ते इंग्रजीचे भाषांतर करून लिहावे लागते. थोडे कृत्रिम होतेच. दुसरे म्हणजे दृश्य कला या विषयामधे मेंदूची काहीही वाढ होणार नाही याची आपल्या शिक्षण व्यवस्थेत पुरेशी काळजी घेतलेली असते. कुत्र्यासारखा कुत्रा आणि झाडासारखे झाड काढणे यापलिकडे शालेय चित्रकला जात नाही. 'बघायला' शिकवणे हे त्या विषयात नसतेच. तो क्या करे.. आपण सगळे असेच राहतो व्हिज्युअली चॅलेंज्ड.

विजय तेंडुलकरही एक कुठलंसं सदर लिहीत. << कोवळी उन्हे

यु. म. पठाण यांचे एखादया शब्दाच्या उत्पत्ती वरचे सदर मला फार आवडायचे. <<< त्यावरून आठवले, अविनाश बिनिवाले देखील निरनिराळ्या भाषांमधील गंमतीजमतींवर लिहीत. त्यातली एक गंमत - तुम्हाला म्हणे इंग्रजी एबीसीडी आली का गुजराती आलीच समजा. ते कसे? तर असे -
एम बीडी पीवाय के? (M B D P Y K)
हां भाय, एम बीडी पीवाय सिवाय जिवाय के? (M B D P Y G Y K)

पाककृतीवर आधारित एका सदरातून मोहसिना मुकादम लिहायच्या. वेगवेगळ्या प्रदेशांतील पाककृतींचे, पदार्थांचे, मसाल्यांचे संदर्भ देऊन रसभरीत वर्णनं करायच्या.

मला मुकुल शर्मा यांचं दर रविवारच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या पुरवणीत येणारं Mindsport हे कोड्यांचं सदर खूप आवडत असे. मी कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत असे. उत्तरं आली तर लिहून पाठवत असे. एक-दोनदा छापूनही आली होती नावासकट. Happy

साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकामधे माधव वझे दरवर्षी एक मोठी मुलाखत घेत. नाट्यचित्रपट सृष्टीतले मोठे नाव असे कुणी दरवर्षी. त्या मुलाखतीसाठी सासच्या दिवाळी अंकाची मी वेड्यासारखी वाट बघायचे.

मला इंडियन एक्स्प्रेसमधलं Peter Vidal चं राह्सिभविष्य वाचायला आवडतं.
आपल्याला समजून असणारं कोणीतरी शेजारी बसून तुमच्याबद्दलच्या आस्थेने , पण अधिकाराचा सूर न लावता काही सांगतंय असं वाटतं.

चतुरंगमध्ये वीणा देव एक सदर लिहायच्या त्यात प्रत्येक आठवड्यात एका स्त्रीबद्दल लिहायच्या. नाव, गाव, किंवा तिच्या वैयक्तिक/घरच्यांबद्दलच्याही अगदी आवश्यक तेवढ्याच तपशिलांचा उल्लेख करत पूर्ण लेखभर 'ती' या सर्वनामाने उल्लेख करून ती व्यक्तिरेखा चितारायच्या. लेखातले रेखाटन धरून जेमतेम अर्ध्या पानाचा तो लेख वाचल्यानंतर बराच वेळ 'ती' मनात रेंगाळत राही. कदाचित त्याचे पुढे पुस्तकही आले असेल. एकदा वडलांनी सांगितले की या वीणा देव म्हणजेच गोनिदांची मुलगी होय, मग तर त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला होता.

राणी दुर्वे यांचं शेजार्यापाजार्यांबद्दल एक छान सदर होतं चतुरंगमधे.
प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ वैजयंती खानविलकर यांचं ' मुग्ध..मधुर' नावाचं मुख्यतः पौगंडावस्थेतील मुला-मुलींबद्दल एक सदर यायचं.
डॉ. संजय ओक यांचंही एक सदर चांगलं होतं.
' झोत' नावाचं बहुतेक प्रकाश बाळ यांचं, एकेका प्रसिद्ध व्यक्तीवर लिखाण असायचं.
चतुरंगमधे कॅम्लिनच्या दांडेकर ( सॉरी नाव लक्षात नाही) बाई मस्त लिहायच्या.
अरुण टिकेकरांचं तारतम्य वाचण्याइतकी मॅच्युरिटी तेव्हा नव्हती, पण सदर यायचं एवढंच आठवतंय.

आमच्याकडे लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ आणि चित्रलेखा अशी तीन साप्ताहिकं यायची.
लोकप्रभेत पूर्वी डॉ नरेंद्र दाभोलकर अंनिसच्या कामाबद्दल लिहायचे. अंनिस असंच सदराचं नाव होतं. त्यात त्यांनी भोंदू बाबांचे वगैरे कसे पर्दाफाश केले त्याचे किस्से असायचे. ते वाचायला मला खूप आवडायचं.
चित्रलेखेत ' लय-प्रलय' नावाची एक अनंत काळ चालू राहिलेली कादंबरी यायची. ती वाचायला मला ऑफिशियली परवानगी नव्हती कारण ती तशी अॅडल्ट कॅटेगरीत होती. पण तरी ती चोरून वाचायचे कधीकधी.

संजय ओक, राणी दुर्वे यांचे सदर आठवते. राणी दुर्वे यांचा एक नदीकाठावर लिहिलेला लेख आठवतो. त्यातल्या कुठल्या धाग्याची मेंदूने नोंद ठेवली आहे माहीत नाही पण अधूनमधून तो लेख आठवत राहतो. स्वाती दांडेकर यांचे लेखही वाचायला आवडत. अरुणा ढेरे यांचे सदर आवडे.

आणि हो - अचानक आठवले. प्रवीण दवणे सरांचे सदर!

छान विषय.

आणि हो - अचानक आठवले. प्रवीण दवणे सरांचे सदर!>>>
देवा!! गजानन आता तुमच काही खरं नाही. दवनिय अंडी येणार आता तुमच्या अंगावर. :ROFL:

कॉलेजमध्ये असताना 'चंदेरी' नावाचे पाक्षिक सुरू झाले होते. पूर्णपणे चित्रपटाला वाहिलेले मराठीतील बहुतेक पहिलेच पाक्षिक असावे. (त्याच्या थोड्या मागे-पुढे जी नावाचे पाक्षिक पण सुरू झाले होते. आधी कोणते आले ते नक्की आठवत नाहीये). गौतम राजाध्यक्ष चंदेरीचे संपादक होते.

चंदेरीतील दोन सदरे प्रचंड आवडायची - दोन्ही जुन्या चित्रपट संगीताबद्दल होती आणि प्रामुख्याने लताभोवती घुटमळणारी. एक सदर शिरीष कणेकर लिहायचे आणि दुसरे राजू भारतन. दोघांच्या लिखाणात जमीन अस्मानाचे अंतर! कणेकरांसाठी लता म्हणजे देव तर राजू भारतनचे तिच्याशी अजीब नाते होते - तिच्या गाण्याचे ते प्रचंड चाहते होते पण तिच्या वैयक्तीक जीवनाबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता.

तोपर्यंत इतकी जुनी गाणी कधी आवडीने ऐकली नव्हती. पण गाण्यातल्या जागा उलगडून दाखवायची त्यांची शैली इतकी भन्नाट होती की त्यांच्या लेखनाचा पंखा कधी बनलो आणि मग त्या दुनीयेत कसा रमलो तेच समजले नाही. त्यात उल्लेखलेली बरिचशी जुनी गाणी ऐकली पण नव्हती मग रात्री ११:३० पर्यंत जागून बेला के फूल ऐकू लागलो. त्यात काही गाणी मिळाली. तो कॅसेट्सचा जमाना होता आणि सुदैवाने माझ्या घराजवळच 'ऑडिओ मास्टर' नावाचे दुकान होते. तो कॅसेट्सवर गाणी रेकॉर्ड करून द्यायचा. मग बाहेर कुठे न मिळणारी गाणी त्याच्याकडून रेकॉर्ड करून घ्यायचो. गाणं आवडलं नाही असं अगदी कमी वेळा झाले असेल. रेकॉर्ड प्लेअर बंद झाल्यावर माझा खजीना पण गेला Sad

अजून एक सदर असायचे होलीवूड मधल्या सिनेमांवर - लेखक आठवत नाही आता. पण खूप सुंदर असायचे ते. सिनेमा पाहताना त्या जीवनशैलीची ओळख असली तरच सिनेमा कळतो आणि ते नाते ते सदर खूप सुंदर उलगडून सांगायचे.

तिसरं आणि अर्थात खूप सुंदर म्हणजे मुखपृष्ठ आणि सेंटरफोल्ड. गौतम राजाध्यक्षच संपादक म्हटल्यावर फोटो अप्रतिमच असायचे.

हो! 'चंदेरी' मी नेहमी घ्यायचो. मला वाटतं ते फिल्मी दुनियेला वाहिलेलं मराठीतील पहिलं पाक्षिक होतं. साल १९८५-८६ असावं. आणि हिंदीमध्ये 'मायानगरी' होतं. साल ९०-९१ दरम्यान निखिल वागळे यांचं 'आपलं महानगर' चालू झालं होतं.

महाराष्ट्र टाइम्समध्ये गोविंद तळवळकर यांचे आयफेल टॉवर नावा चे सदर असायचे त्यात विदेशातल्या महत्वाच्या घडामोडीबद्दल माहीती असायची. फार चांगले सदर होते.

गेल्या काही वर्षातले आवडते स्तंभलेखक (सर्व इन्डियन एक्स्प्रेस कारण एव्हडा एकच पेपर मी वाचतो):
इंदर मल्होत्रा - रेअर व्यु
शेखर गुप्ता - नॅशनल इंटरेस्ट
तवलीन मेहता
प्रताप भानु मेहता
चिदंबरम - अ‍ॅक्रॉस द आयल
ले. जनरल सैद अत्ता हस्नैन
खालेद अहमद (पाकिस्तानी पत्रकार)
आशुतोष वार्श्ने
सी राजा मोहन (सदराचे नाव राजमंडल)
कमोडोर सी उदय भास्कर
क्रिस्तोफ जेफरलॉट

सध्या नेमाने प्रिन्ट वाचतोय. हा गुप्ताजींनी काढलेला ऑनलाइन पेपर आहे, बरखा दत्त बरोबर. अजून तरी गुप्ताजींचे लेख दमदार वाटत आहेत.

काहीही मिळेल ते वाचायचो. त्यामुळे नेमके लक्षात असे काही नाही.
फक्त द्वारकानाथ संझगिरींचे क्रिकेटबद्दलचे लेख आवर्जून वाचायचो कारण क्रिकेट आवडीचे आणि ते खुसखुशीत लिहायचे आणि कणेकरांचे आवर्जून टाळायचो कारण ते तेच तेच लिहायचे.

वर कोणीतरी तंबी दुराई एक फुल्ल दोन हाफ लिहिलेय ते वाचायचो. ते समजायला मी लहान असल्याने काहीतरी भारी वाचल्यासारखे वाटायचे.

तवलीन सिंग हो!
शेखर गुप्तांचा नॅशनल इंटरेस्ट सध्या बिझिनेस स्टँडर्डमध्ये येतो.

Pages