नियतकालिकांतील स्तंभलेखक, सदरे इ.

Submitted by गजानन on 10 August, 2018 - 02:54

पूर्वी लोकसत्ताच्या लोकरंग, चतुरंग, चित्ररंग, हास्यरंग, लोकमुद्रा या पुरवण्या भरगच्च असायच्या. (की त्या वेळी आंतरजालीय साहित्याची भरपूर प्रमाणातील सहज उपलब्धी नसल्याने तसे वाटे कोण जाणे!) बालवाचकांसाठी म्हणून रंजक विभाग असायचा. बिरबलाच्या गोष्टी, घरच्या घरी कमी साहित्यात करून बघता येतील असे विज्ञानिक तत्वांवर आधारीत प्रयोग , बुचकळ्यात टाकणारी दैंनंदिन व्यवहारातील लेखी गणितं. वगैरे. प्रत्येक आठवड्यात कृपा कुलकर्णी यांनी भारतातील इतर भाषांमधून मराठीत भाषांतर केलेली एक नवी गोष्ट असे. प्रत्येक वेळी वेगळ्या भाषेतली भाषांतरीत गोष्ट. या लेखिकेला एवढ्या भाषा कश्या काय येतात म्हणून त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटे. तंबी दुराई यांचा स्तंभ (बेरीज वजाबाकी?) शेवटी वाचायला मी राखून ठेवत असे. श्रीकांत बोजेवारांची चित्रपट परिक्षणं हे सदरही असेच. त्यावेळी ऊठसूठ सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणे शक्य नव्हते. तेंव्हा ही परिक्षणं वाचणे म्हणजेही एक पर्वणी वाटे. रविंद्र पाथरे यांची नाट्यसमीक्षा, आणखी एक सई नावाच्या एक लेखिका (आडनाव आठवत नाही. किंवा नावातही गफलत झाली असण्याची शक्यता आहे.) सिनेमातल्या नटनट्यांच्या मुलाखती लिहायच्या, ती सदरं वाचायला मजा येई. शुभदा चौकर यांचे 'ज.. ज.. जाहिरातीचा' हे स्फूटही मस्त असायचे. याशिवाय वैद्यकीय लेख लिहिणारे डॉ. सुरेश नाडकर्णी, संगीत आणि इतर विषयांवर लिहिणारे अच्युत गोडबोले, सुधीर मोघे इ.

त्यानंतर मंगला गोडबोले यांचे (अशी माणसं तशी माणसं की काहीतरी नावाचे) एक सदर येत होते. वसंत बापटांचे 'विसरू म्हणता विसरेना', ही आणखी काही लक्षात राहिलेली सदरं. यशवंत रांजणकरांची 'ऐश्वर्यकुंड' ही धारावाहीक कादंबरीही बरीच उत्सुकता ताणवणारी होती. मला आठवतेय रविवारी सकाळी नऊ वाजता माझा क्लास असे. तेंव्हा एकदा मी 'ऐश्वर्यंकुंड' च्या पानाची वाचण्यासाठी छोटी घडी करून वहीत लपवून क्लासला गेलो होतो. चतुरंग पुरवणीतल्या शुभदा पटवर्धन, वीणा देव, भा. ल. महाबळ, वगैरे मंडळी वर्षानुवर्षे वैयक्तिक ओळख असल्यासारखे वाटत.

'लोकमुद्रा'तली सदरही खूप आवडायची. त्यातल्या पहिल्या पानावरची आशा भोसले, सुधीर फडके, माधुरी दीक्षित, विजया राज्याध्यक्ष यांची मनोगते आजही आठवतात. आतल्या पानांत गौतम राज्याध्यक्ष यांचे त्यांच्या फोटोग्राफितल्या किश्श्यांचे एक सदर असे. बेबीचे कार्टून (आप्पास्वामी की असे काहीतरी त्यांचे नाव होते.) तर खास असत. माझ्याकडे त्यांच्या कात्रणांची एक वही होती.

सध्या वेळेअभावी एवढेच लिहितो.

तुम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी नियतकालिकांमधील कोणते स्तंभ, सदरं आवडायची / अजून लक्षात राहिली आहेत? सध्याच्या नियतकालिकांमधील कोणते स्तंभ, वैचारिक सदरं आवर्जून वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही? याविषयी वाचायला आवडेल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेअर व्ह्यु व इंदर मल्होत्रांबद्दलः

इंदर मल्होत्रांचा प्रदीर्घ अनुभव(पहिल्या स्वातंत्र्यदिनाला एक शिकाऊ पत्रकार म्हणून कव्हर करण्यापासून ते २०१६ ला त्यांचे निधन होईपर्यंत), जवळजवळ सर्वच पंतप्रधानांबरोबर आणि पॉलिसीमेकर्सबरोबरचा जवळचा संबंध, ल्युटीयन्स झोनमध्ये असणारा मुक्त प्रवेश आणि तरीही सामान्य जनतेच्या प्रश्नांची, त्यांच्या उत्क्रांत होत गेलेल्या आशा-आकांक्षांची विचक्षण जाण यांमुळे हे सदर अतिशय आवडते आहे. एकेकाळी जेव्हा माझे इंग्रजी अतीसामान्य दर्जाचे होते तेव्हासुद्धा त्यांच्या प्रवाही भाषेमुळे वाचावेसे वाटे. मी या सदरात २००८-०९ पासून आलेले सर्वच लेख वाचले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास खुप सुंदरपणे मांडला आहे. भाषा अतिशय सुंदर आणि अभिनिवेशहीन लिखाण. त्यांच्या सर्व लेखांची पिडीएफ बनवून ठेवली आहे.
https://indianexpress.com/profile/columnist/inder-malhotra/
वरच्या लिंकवर त्यांचे सर्व लिखाण मिळेल.

' हिंदू' मधे जानकी लेनिन एक सदर लिहायच्या. सदराचं नाव होतं ' माय हजबंड अॅंड अदर अॅनिमल्स' Happy त्यांचा नवरा म्हणजे प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ रॉम व्हिटाकर. छान होतं ते सदर. आत्ता पण त्या एक पाक्षिक सदर लिहितात. त्यात विविध ठिकाणी प्राणी-पक्ष्यांच्या जतन- संवर्धनासाठी जे प्रयत्न होतात त्यांची रंजक माहिती असते.

चित्रलेखा च्या एका जुन्या अंकात (25 वर्षे पूर्वी बहुतेक) कालपुरुष नावाची एक सुंदर गोष्ट होती.एका गावात एक सुंदर घड्याळ दुकान येतं आणि गावाचा नूर पालटतो.
आणि नंतर एक दिवस एक घटना घडते आणि सगळं बदलतं.

Pages