संघर्ष - (भाग ६ )

Submitted by द्वादशांगुला on 6 August, 2018 - 03:29

याआधीचे भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १

संघर्ष भाग २

संघर्ष भाग ३

संघर्ष भाग ४
संघर्ष भाग ५
_______________________________

पूर्वभाग-

या माणसाने मला आधार दिला. मला कुठेतरी घेऊन जाऊ लागला. मला म्हणाला," फार लागलेय तुला बाळा! चल आपण मलमपट्टी करुन घेऊ! "

मी मान डोलावली, आणि चालू लागलो. मला वाचवणाऱ्या या माणसात मला देव दिसत होता.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

आता पुढे -

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

मी त्या माणसाचा आधार घेऊन त्याच्यासोबत चालत होतो. त्यांनी मला हाॅटेलमागच्या दगडी इमारतीत नेलं. ही इमारत मला पाहून माहीत होती, तरी मी इमारतीच्या गेटच्या आत पहिल्यांदाच आलो होतो. तळमजल्यावर दवाखाना होता. पहिल्या मजल्यावरच्या कठड्याला रेलून काही माझ्या वयाची, माझ्यापेक्षा लहान-मोठी मुलं उभी होती. हां, पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांत शाळा भरत आसावी! ती मुलं आता माझ्याकडे बघायला लागली होती. त्या मुलांपैकी काहींच्या हातात पुस्तकं होती. 'शाळा', 'पुस्तकं' हे शब्द जसे विचारांभोवती घिरट्या घालायला लागले, तसं मला काही सुचेनासं झालं. त्या मुलांबद्दल कुठेतरी हेवा वाटत होताच. पण यांना हातात सहज पुस्तकं मिळतात, अभ्यासाला वेळ मिळतो, आणि आपल्याला यातलं काहीच मिळू नये! पुस्तक हातात घेणंही आपल्याकरता पाप असावं! फक्त कष्टच का आलेत नशिबी! मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला नसावं का! आपल्याला कधीच कोणीतरी मोठं होता येणार नाही का! या अंधःकाराच्या चिखलात कायम खितपत पडून राहणंच आहे का आपल्या नशीबी! अशा कित्येक विचारांचा मनात कोलाहल दाटला, अन् त्याची अंतिम परिणती झाली माझ्या डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये. 'नशीब, अश्रू ढाळायला तरी कोणाची परवानगी लागत नाही!' मनात आलेला एक उथळ विचार. मी मूक अश्रू ढाळत होतो. कारण मन स्फुंदून रडायला राजी नव्हतं. आजुबाजूची, लोकांची जाणीव होत होती, पण काही केल्या मी चेहर्‍यावर वागवायचो, ते निरागट्ट, कठोर भाव प्रयत्नांनीही येत नव्हते. जणू निरागस, लहान झालो होतो, पुन्हा.

"बाळ, का रडत आहेस? थांब पोहोचलोच दवाखान्यात हं! धीर धर! खूप दुखत आहे का? "

माझ्यासोबतची ती व्यक्ती बोलली. मी विचारांच्या तंद्रीतच होतो, त्यांच्या आवाजाने किंचित दचकलो. मी जास्त दुखत नसल्याचे दाखवायला नकारार्थी मान हलवली. डोळे फक्त शरीराच्या दुखण्याने थोडीच वाहतात!

त्यांनी मला दवाखान्यात नेलं. डाॅक्टरसाहेब आणि या व्यक्तीची ओळख असावी. असंच त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं. मला पाहताच डाॅक्टरसाहेब उद्गारले,

"काय रे बाळा, इतकं कसं लागलं? गुरूजी, हा शाळेतला मुलगा का? केवढं लागलंय त्याला! "

माझ्यासोबतच्या त्या व्यक्तीने पूर्ण घटना कथन केली. माझ्या अंगावर मलमपट्टी सुरु झाली होती. इतक्यात मला अचानक काहीतरी आठवलं, नि मी म्हणालो,

"डाक्टरसायेब, पन माज्याकडं तुमाला द्यायला पैसं नाय!"

मी मान खाली घातली होती. तसे डाॅक्टरच म्हणाले,

अरे बाळ, तुझ्याकडून नकोत मला पैसे! "

मला हायसं वाटू लागलं होतं. मी ओशाळवाणं हसलो. माझ्यावर मलमपट्टी झाली, तसा मी दवाखान्यातून बाहेर आलो. माझ्यासोबतच्या व्यक्तीने मला तिथेच जिन्यावर बसवलं. मला इकडेच थांबायला सांंगून ते जिन्याने वर निघून गेले. काहीच वेळात ते परत आले. येताना त्यांच्या हातात डबा अन् पाण्याची बाटली होती. डबा उघडून तो माझ्यासमोर धरत ते मला म्हणाले,
"बाळा, भूक लागली असेल ना? हे घे खा अन् पाणी पी!"
भुकेचं नाव काढताच मला माझ्या पोटातल्या भुकेची तीव्र जाणीव झाली, तसा मी त्यांच्या डब्यातली पोळीभाजी पटापट खाऊ लागलो. माझं पोट अगदी भरलं होतं. मी तृप्त झालो होतो अगदी. माझं पोट भरलेलं पाहून ते अगदी आईच्या मायेनं हसले, नि म्हणाले,
"बाळ भरलं का पोट? नाव काय तुझे? कुठला तू? घरी कोणकोण असतं? तो हाॅटेलमालक तुला एवढे का मारत होता? "

ही व्यक्ती एव्हाना मला फार जवळची वाटायला लागली होती. मी त्यांना सगळं सांगितलं. माझं मन मोकळं केलं. अगदी आधीपासून. बापाच्या तुरुंगवासापासून अगदी झोपडपट्टी, बापाचं आजारपण, धोंडूशेट, हाॅटेल, बापाचा मृत्यू, माझी दबलेली शिकण्याची इच्छा, सगळं काही! आता परत नभ दाटले होते, डोळ्यांतून आसवं वाहत होती. त्या व्यक्तीचे डोळेही पाणावले होते. क्षणाक्षणाला त्यांच्या चेहऱ्यावर कीव, दुःख, राग, सहानुभूती, चीड या भावनांचा मेळ नजरेत येत होता. माझं बोलून संपलं, तसा त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला. दोन मिनिटं पूर्ण शांततेत गेली. कोणीच काही बोलत नव्हतं. वरवरच्या स्तब्धतेमागे मात्र दोघांच्याही मनात माजलेलं भावनांचं प्रचंड काहूर स्पष्ट जाणवत होतं. नंतर माझ्यासमोर बसलेले ते म्हणाले,

"बाळ, मी विष्णू शिर्के! दादासाहेब शिर्केही म्हणतात मला. ही जी वर शाळा भरते ना, ती मी चालवतो, मोफत. स्वतःचे पैसे घालून या मुलांना शिकवतो. बहुतेक सर्व मुलं गरिबाघरची आहेत. तुझ्यासारख्या लहान मुलांनी शिकावं, त्यांचं भलं व्हावं म्हणून मी शिकवतो. तुझं ऐकून फार वाईट वाटलं बघ! तुला शिकण्याची ओढ आहे, मी आस्था आहे; तुला जर शिकवून मोठा नाही ना करु शकलो, तर मला माझ्या या शिकवण्याच्या व्रताबद्दल कायम रुखरुख लागून राहील बघ! मी शिकवेन तुला बाळ! "

'मी शिकवेन तुला बाळ! ' आजही त्याचे ते शब्द माझ्या जसेच्या तसे माझ्या कानात रुंजी घालतात! असं ठाम आश्वासन देणारं कोणी मला पहिल्यांदाच भेटलं होतं. माझ्या चेहर्‍यावरचा तो भाबडा आनंद अवर्णनीय होता.
स्वर्ग मिळाल्यावरही कोणाला होत नसेल, तेवढा प्रचंड आनंद! मी हरखलो होतो, हबकलो होतो, जे घडतंय त्यावर विश्वासच बसत नव्हता. माझा गोंधळलेला चेहरा पाहून ते दादासाहेब अलवार हसले, त्यांनी मायेने माझी पाठ थोपटली. कित्ती खुश होतो मी! अगदी पिसासारखं हलकं वाटत होतं. पण अचानक मला धोंडूशेटचा चेहरा आठवला. मायची हतबलता आठवली. माझ्या चेहर्‍यावरचं हसू अचानक लोप पावलं. दादासाहेबांनी माझ्या चेहर्‍यावरचा सूक्ष्म बदल टिपला असावा. ते लागलीच मला म्हणाले,
"बाळा काय झालं, काही अडचण आहे का? मोकळेपणानं सांग, आपण उपाय शोधू! "
तसं मी त्यांना धोंडुशेटच्या पैशांबद्दल आणि मायच्या असहायतेबद्दल सांगितलं.
"काहीतरी करु आपण याबाबतही, आता हाॅटेलात जाऊ नकोस, ते मी बघतो. तू घरी जा, आराम कर, तुझ्या आईला हे सांग! उद्या मला येऊन भेट. मी इथेच वर शाळेत असतो. आता मी तुला रेल्वेपर्यंत नेतो, पुढे जाशील ना नीट? मला शाळेत जायचंय अरे, नाहीतर तुला सोडायला आलो असतो. हे घे थोडे पैसे, औषधं आण! " असं म्हणून त्यांनी मी नको नको म्हणत असतानाही माझ्या हातात काही पैसे कोंबले. मला त्यांनी रेल्वेपर्यंत सोडलं, नि पुढे मी आमच्या वस्तीत परतलो.

मला खूप आनंद झाला होता. आपलं कित्येक दिवसांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार, या आशेने मी जणु वाऱ्यावर तरंगत होतो. अंगावरल्या जखमांची जणू जाणीवच नाहीशी झाली होती. दिसत होती ती फक्त शाळा, वह्या-पुस्तकं नि 'गणेश शाळेला जातो' ही वाळूत चमकणारी सुबक कोरीव अक्षरं. तरीही हे सुख निर्भेळ नव्हतं. धोंडूशेटबद्दल मनात भीती वाटत होती. जेव्हा त्याला हे कळेल, तेव्हा तो काय करेल, याचाच विचार राहून राहून मनात येत होता. अनामिक भीतीही दाटली होती मनात. एक मन शिकण्याचा ध्यास पूर्ण होणार, या विचाराने आनंदाने डोलत होतं, तर दुसरं मन धोंडूशेट, घरची परिस्थिती यामुळे हा निर्णय मानायला तयार नव्हतं. पण शिक्षणाचा चमकणारा राजमार्ग नि अंधारातून उजळणाऱ्या भवितव्याची आस नजरेसमोरुन हटत नव्हती, हेही तितकंच खरं होतं. मी द्विधा मनःस्थितीत होतो. घर की शिक्षण, पैसे कमवणं की शिक्षण अशा दोन पारड्यांच्या मध्ये मी अडकलो होतो. विचार करता करता अतिविचाराने म्हणा, वा दिवसभराच्या दगदगीमुळे म्हणा, मला डोळा लागला नि मी झोपून गेलो. जाग आली तेव्हा बाहेर बऱ्यापैकी अंधारुन आलं होतं. आमच्या खोपटात राॅकेलचा दिवा पेटत होता. माय माझ्या डोक्यापाशी बसली होती, अन् माझ्या केसांतून, अंगावरुन मायेने हात फिरवत होती. मी जागा झालो. किलकिल्या डोळ्यांनीच मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरची चिंता काळजी लपत नव्हती. मला जाग आलेली पाहताच तिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला.

"काय रं गण्या, तुला येवढं कसं रं लागलं?"
"कोनी मारलं का?"
"कुटं पडलाबिडला तर न्हाईस?"
"मोप दुकत आसंल नं राजा?"
"आवशद लावलंस काय?"
"डाक्टारपासला गेलतास?"
"किती लागलं रं तुला! का रं जिवाचं खेल करतोस? तूच तर येकला आदार हायेस माजा!"

मायची प्रश्नांची सरबत्ती थांबवून मी तिला आज जे काय झालं, ते सारं सांगितलं. तिच्या चेहर्‍यावरले भाव क्षणाक्षणाला बदलत होते. किंबहुना ती माझी माय असल्यानं
तिचा चेहरा मी जसाच्या तसा वाचू शकत होतो. काळजी, राग, कृतज्ञता, चिंता, दुःख अशा कितीतरी संमिश्र भावना होत्या तिच्या चेहर्‍यावर. माझं सगळं सांगून झालं, तसं मी मायच्या प्रतिक्रियेसाठी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत क्षणात चमक दिसली. काहीतरी निर्धार दिसला. ती काही क्षण शांत होती, अगदी विचारांच्या गर्दीत हरवल्याप्रमाणे. अचानक ती उद्गरली,
"पोरा, तू साळा कराय्ची! मोप सिकायचं! म्या हाय तुज्या सोबत! माज्यामुलं तुजी तेवा साळा बुडली. पर आता असं नाय होऊ देनार मी. काय घाबरु नगं त्या धोंडूला. त्याचं पैकं मी भरंन. दोनपट काम करंन. पन तू लऽय सीक रं पोरा! "

असं म्हणून मायने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. कानशीलावरुन कडाकडा बोटं मोडली. नाही म्हणायला मी थोडासा चकीतच झालो होतो. माय मला 'आता शिकू नको' म्हणेल, ती मला धोंडूशेटच्या पैशांची आठवण करुन देईल. पैसे फिटल्यावर मला शाळेत घालण्याची बिनबुडाची आश्वासनं देईल, असंच मला वाटलं होतं. माय अशी सहजासहजी तयार होईल, मला वाटलंच नव्हतं. मायचा त्या क्षणी खूप गर्व वाटत होता मला. स्वतः एक बुकही कधी हातात न धरलेली माझी अशिक्षित साधीभोळी माय शिक्षणाचं महत्त्व कसं जाणत होती, तीच जाणे! माझ्या शिकण्यासाठी ती रक्ताचं पाणी करत जादाचा भंगार वेचून मला शिकवायला तयार होती. मायच्या जागी दुसरं कोणी असतं, तर मला शिकून दिलंच नसतं. पण माझी माय माझ्यासाठी राबराब राबायलाही तयार होती. एखादी दुसरी स्त्री माय भोगत होती त्या भोगांत अगदी होरपळून गेली असती. सुखी- समाधानी संसाराला एकाएकी नजर लागणं, नवऱ्यावर चोरीचा आळ येणं, त्याला झालेली शिक्षा, स्वतःच्या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलेलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, दरम्यानच्या काळात बालिश वयातल्या पोराचं कुठूनतरी पोट भरणं, स्वतःचा जीवही कसातरी तगवणं, मग स्वतःच्या कुटुंबाची पडझड स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, घरातल्या सर्वांची पोटं फक्त स्वतःच्या बळावर भरणं, राबराब राबणं, नवऱ्याचं अकाली निधन, या सर्व भोगांतही माय खंबीर उभी होती. उलट माझ्या भल्यासाठी आणखी संकटं झेलायला तयार होती. कष्टाचे डोंगर उपसायला तयार होती. खरंच, तिच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर आणखीन दुणावला होता.

माय माझ्या पाठीशी खंबीर उभी होती, तिचा मला आधार होता. आता मला हायसं वाटू लागलं होतं. मायशी गप्पा मारत मारत, स्वप्नं रंगवत रंगवत मी जेवलो, अन् झोपी गेलो. स्वप्नात नवीन वह्या पुस्तकं पेन्सिल, पेनं नाचत होती. आज सकाळी फार प्रसन्न वाटत होतं. माझ्या लक्षात होतंच, की दादांनी आज मला बोलवलंय. मी तयार झालो, त्यातल्या त्यात बरे कपडे घातले, अन् मी निघालो. जाताना माझं लक्ष पायाखालच्या वाटेवर नव्हतंच! मी शाळेत जाणाऱ्या मुलांचं निरीक्षण करत होतो. रस्त्यावरच्या पाट्या वाचत होतो. आज कसं मोकळं, हलकं वाटत होतं. कित्येक वर्षं जळमटं साचलेल्या, धुळभरल्या पेटीवरची धूळ पुसली जावी, तसं काहीसं वाटत होतं. अगदी मोकळं वाटत होतं. मी रेल्वेतून उतरलो. मालकाच्या हाॅटेलासमोरुन अंमळ पटकनच चालत गेलो. मालकाने मला पाहू नये, असं वाटत होतं, नि असंच झालं. त्या दगडी इमारतीच्या गेटमधून आत आलो. जिन्यापाशी थोडा घुटमळलो. वर कसं जावं, काय बोलावं, हे सारं आठवून हळुहळू पायर्‍या चढू लागलो.

मी पहिल्यांदा पायऱ्या चढलो होतो या. आजुबाजूला बघत होतो. जिना संपताच समोर उजवीकडे सलग तीन वर्ग. समोर मोठा व्हरांडा. व्हरांड्यासारख्या भागात सर्व विद्यार्थी शिस्तीत जमा झाले होते रांगेमध्ये. समोर तीन शिक्षक उभे होते. मी जिन्याच्या शेवटच्या पायरीपाशी होतो, इतक्यात सर्व मुलांनी एकत्र राष्ट्रगीत गायला सुरुवात केली. माझ्याही पायांचे घोटे नकळत जोडले गेले, हात सावधान स्थितीत ताठ राहीले. नंतर प्रार्थनेच्या वेळी नकळत माझेही हात जोडले गेले. कानावर पडणारे शब्द जणू माझ्यातल्या मलाच पुन्हा एकदा नवं अस्तित्व देत होते. नवं विश्व बहाल करत होते. प्रार्थना संपली नि तितक्यात दादांचं लक्ष माझ्याकडे गेलं. मला पाहून त्यांनी स्मितहास्य केलं ते माझ्या जवळ आले नि म्हणाले,
"अरे वा! आलास बाळ! ये ये! आजच तुझं नाव शाळेत घालून घेऊ. चल."

ते मला सर्व विद्यार्थ्यांच्या समोर घेऊन गेले. येता येता माझ्या तब्येतीची विचारपूस केली. मी मान खाली घालून उभा होतो. थोडा बुजलेलोच होतो. दादांनी माझा हात पकडला नि संपूर्ण वर्गाला उद्देशून ते म्हणाले, " मुलांनो, हा गणेश कसबे. तुमच्यासाठी शाळेत येणं, हा दिवसाचा रोजचा एक कंटाळवाणा भाग आहे, पण याच्यासाठी ते एक स्वप्न होतं, अपूर्ण. जे आज आकाराला आलंय. याच्या संघर्षाला आज एक नवी किनार प्राप्त झालीय! तर, आजपासून तुम्ही सर्वांनी याला सांभाळून घ्यायचं. अभ्यास शिकवायचा, याला तुमच्यात सामील करून घ्यायचं."

परिपाठ झाला, नि सर्व मुलं वर्गांत पांगली. दादांनी मला त्यांच्या वर्गात नेलं. ते खुर्चीत बसले. टेबलातून रजिस्टर काढलं. माझं पूर्ण नाव, जन्मसाल-महिना, आधी शिकलेली यत्ता, माहिती मला विचारुन लिहून टाकलं. दुसर्‍या दिवशी आदली शाळा सोडायचा दाखला आणायला सांगितला. मला म्हणाले, "बाळ, तू सध्या माझ्या वर्गात बस! मधल्या सुट्टीनंतर तुला कोणता वर्ग द्यावा, ते ठरवू आपण! " मी मान डोलावली. दादांनी माझ्या हातात एक रिकामी वही नि पेन सोपवलं. मी तसाच काहीशा बावरलेल्या अवस्थेत मागे जाऊन बसलो. दादांनी फळ्यावर वरती लिहिलं, 'गणित'. इतक्यात एक मुलगा ओरडला, "गुर्जी, श्री गणेशाय नमः रायलं की आज! " गुरुजींनी वळून पाहिलं, नि ते मिश्किल स्वरात म्हणाले, "अरे हो की! बरे तुमच्या लक्षात हो!" नंतर फळ्यावर श्री गणेशाय नमः लिहितच ते म्हणाले, "पोरांनो, देवावर आस्था ठेवावी. शेवटी पैलतीर तोच तारून नेणार. पण याचा अर्थ असा नाही की पेपरावर देवाचे नाव टाकून चमत्काराची वाट पहाल. देव धीर देतो, खीर नाही! तुम्हालाच देवाचे नाव घेऊन बनवावी लागेल, काय? " यावर हशा पिकला सर्वांचा. मीही यावरच विचार करु लागलो.

शिकवताना दादाचं माझ्याकडे वारंवार लक्ष जात असे. मी लक्ष देऊन ऐकतोय, हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दाटलं होतं. शेवटी मधल्या सुट्टीत माझ्या लक्ष देण्यावरुनच मला दादांच्याच सातवीच्या वर्गात बसवण्यात आलं. अर्थात भरपूर मेहनत करायची तंबी देऊनच. पुढे आणखी काही तास झाले. काही मुलं माझ्याशी बोलायला लागली होती. मला हे सारे त्यांच्यात सामील करुन घेताहेत, याचाच मला कोण आनंद झाला होता. आज शाळेचं वातावरण कितीतरी वर्षांनी अनुभवून माझ्यातला मलाच नवी संजीवनी मिळाली होती. शाळा सुटली. मी आज खूप खुश होतो. माझं शाळेचं स्वप्न साकार झालं होतं आज. शाळा सुटावी, असं मुळी वाटतच नव्हतं. पण मी आता घरी जाणार होतो, मायच्या हातची गरमागरम भाकर खात तिला आज दिवसभर घडलेलं रुचीने सांगणार होतो. तीही कौतुकाने ऐकत माझ्या डोक्यावरुन हात फिरवणार होती. हा विचार करतानाच मला गंमत वाटली. दिवसभरात माझ्याकडे मोठा आत्मविश्वास आला होता. मी खुशीतच जात होतो घरी. मी रेल्वेत चढणार, इतक्यात कोणीतरी माझा हात आवळला. मी कळवळलो, मी मागे वळून पाहणार, इतक्यात डोक्यात झालेला कसलातरी जोराचा प्रहार... सण्ण... मेंदूत पसरलेली सुन्नता... बधीर झालेले कान.. आणि बेशुद्ध पडता पडता अमंगळपणे मेंदूभर पसरलेलं एकच नाव- धोंडूशेट!

क्रमशः...

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

तळटीप- हा भाग टाकायला फारच उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वांची मनःपासून माफी मागते. Happy

-द्वादशांगुला
जुई नाईक .

सर्व हक्क सुरक्षित.

Protected by Copyscape

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो किती उशीर जुईताई. आम्ही विसरायला लागलो होतो ना! Happy
छान लिहिलाय हा पण भाग. शेवट करताना अनपेक्षीत घटना. म्हणजे पुढच्या भागाची वाट पहाने आले.
येवू द्या लवकर!

अहो किती उशीर जुईताई. आम्ही विसरायला लागलो होतो ना! Happy >> Happy उशीरा टाकल्याबद्दल माफी मागते! Happy यापुढे उशीर नाही होणार! Happy

अभिप्रायाबद्दल धन्यवाद! Happy

छान लिहिलाय हा पण भाग. शेवट करताना अनपेक्षीत घटना. म्हणजे पुढच्या भागाची वाट पहाने आले.+१११११११११११११

उमानुजी धन्यवाद! Happy भाग लवकर टाकते! Happy

पंडितजी धन्यवाद! Happy

यावेळी कथेवरची पकड सुटल्यासारखी वाटली थोडी >> हम्म. मध्ये बरेच दिवस गेल्याने माझं काहीतरी राहिलं असावं! Happy पुढच्या भागात नीट गाडी रुळावर येईल अशी अपेक्षा! Happy

Liha ki