संघर्ष - (भाग ४)

Submitted by द्वादशांगुला on 3 July, 2018 - 03:38

याआधीचे भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १

संघर्ष भाग २

संघर्ष भाग ३
_____________________________

पूर्वभाग-

बाप बदलला होता. तो आजकाल 'तुजा बा लवकर बरा होनार बग' असंही म्हणायचा. आम्हाला वाटायचं, की बाप लवकर बरा होणार. त्याच्याकडे आलेली पूर्णपणे बरा होण्याची ईच्छाशक्ती पाहून वाटायचं, बाप लवकर चालायला, उठायला लागेल. पण हा आमचा भ्रम होता. बापाच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं, याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो.

×××××××××××××××××××××××××××××××××××
आता पुढे-
×××××××××××××××××××××××××××××××××××

तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ती सकाळ नेहमीसारखीच होती. मी पाचला उठलो, मायही तेव्हाच उठली. काही वेळाने बापही उठला. आज उठल्यापासूनच माय जरा वैतागलेली वाटत होती. काल माय ज्या ठेकेदाराकडे भंगार जमा करायची, त्याने पैशांत काहीतरी घोळ केला होता. त्यामुळे ते पैसे काही कारण नसताना मायला आज भरून काढावे लागणार होते. त्यासाठी तिला आज रोजपेक्षा जास्त भंगार गोळा करावा लागणार होता. मी तोंड धुवायला बाहेर गेलो, तेव्हा माय आणि बापात कशावरून तरी वाजलं. झोपडीकडे परत येत होतो, तेव्हा या दोघांच्या भांडणाचा आवाज मी ऐकला. हल़्ली या दोघांत नेहमीच अशी भांडणं व्हायची. माय बापाला भरपूर बडबडत रहायची , बापही आधी बोलायचा पण नंतर लगेच शांत व्हायचा . माय बोलायची थांबली, की नंतर तोच माफी मागायचा तिची. मला अशी भांडणं नेहमीची झाली होती. मी थोडावेळ इकडे- तिकडे भटकून नंतर परतलो. मला वाटलं होतं, एवढ्या वेळात दरवेळीप्रमाणे भांडण मिटलं असेल. पण हे दोघे अजूनही भांडत होते. अगदी तावातावाने. आमच्या खोपटाभोवती गर्दी जमा झाली होती. मी त्यांना आवरायचा प्रयत्न करत होतो, पण ते दोघेही जुमानत नव्हते. माझ्या कानावर त्या दोघांचे शब्द पडत होते.

" तू कोन माला सांगनारी! मी माज्या मनाचा राजा हाये! वाटंल ते करंन! "

"ह्ह! जसंकाय लय सोनं घातल्यालं ना तुमी माज्या आंगावर! येक फुटका मनी नै दिलासा कदी! आनी राजा म्हने!"

"तूज्या बानं तुला गल्यात घातल्यापास्नं जिंदगीचं वाटोलं जालं! बरखत नाय साली आयुश्यात!"

"कुटलं पाप केल्यालं, जे तुमी आलसा आयुश्यात! मुंबयला आल्यापास्नं मी एकटीच झिजतंय. येक छदाम तरी आनलासा का?"

"तुज्या बानं जसंकाय धा एकर जमीनच दिल्याली ना मला! तू झिजलीस तर काय जालं? हां? सोताची करवडी पन भरतीस ना!"

"हां! आनी तुमी आदी दारू पेऊन कामधंधा सोडून येकजागी बसले! मला मर मरून दिसभर भंगारासाटी भटकाया लावलं! द्येव सिक्सा करतोच! बसल्येत ना असं पंगू बनून कायमचं! उटता तरी येतंय काय येकट्याला! लंगडा बेवडा कुटचा! तरी म्येलं जादा काम माज्याच माथी आलंया! तूजं सगलं कराया लागतं मलाच! कंबरडं मोडलं माजं! आसं दुसर्‍यावर जगन्यापेक्शा मरत का नाय तु ???? "

मायचं हे शेवटचं वाक्य मला सुन्न करून गेलं. काय बोलली होती ती! बाप कसाही असला तरी तो एकटाच खूप जवळचा होता. ती बोलण्याच्या ओघात हे बोलून गेली, पण बापाच्या अन् माझ्या खूप मनाला लागलं! बाप तर अविश्वासाने, चकीत होऊन तिच्याकडे सुन्नपणे बघत होता. माय- बाप आजवर बरेचदा भांडलेले, पण एवढं टोकाचं विधान तिने कधीच केलं नव्हतं. बाप क्षणार्धात शांत झाला होता. आपण आपल्याच कसल्या कामात गुंग असावं आणि काही पूर्वकल्पना नसताना अचानक कोणीतरी येऊन कानाखाली वाजवावी, असा बापाचा चेहरा झाला होता. झोपडीबाहेर जमलेल्या गर्दीकडे पाहून मला तर लाजच वाटत होती; मग बापाला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं असावं. मायला जेव्हा लक्षात आलं, की ती बोलताना काहीतरी चुकीचं बोलून गेलीये, त्यानंतर ती काहीतरी पुटपुटतच चुलीपाशी जाऊन बसली. आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना अशी भांडणं नवीन नसली, तरी दुसर्‍याची भांडणं ऐकायला रस जरूर असायचा. जमलेल्या लोकांत कुजबुजही सुरू झाली होती.

"काsय भडभडा बोलतंन बाय!"

"हाड नाय यिच्या जिभंला! आमी तर नाय बोलत आसं उलटून! काय शिकवलं की नाय यिच्या आयनं !"

" क्या बोलती ओरत! कितना किटकिट करती हय! हमारा आदमी बी बेवडा हय! मै क्या बोलती कुछ उसको? ये बडी आयी महारानी! "

हे सगळं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. मला हे सगळं नकोसं झालं होतं. मी एकाच जागी स्तब्ध उभा होतो. इतक्यात कोणतरी मोठ्याने बोललं,

" अय! हितं काय पिच्चर लावलाय का फोकट? आं? कामं नाय का? यांचं रोजचंच हाय! ... अय शांतेs भंगाराला नाय जायचं का? चला.. नीगा... चला!"

काहीवेळात गर्दी पांगली. माय भाकर्‍या बनवून काहीच न बोलता भंगाराला निघून गेली. ना बाप तिच्याशी एक शब्द बोलला, ना ती बापाशी काही बोलली. मीही निघालो कामावर जायला. मी झोपडीबाहेर पडणार, इतक्यात बाप बोलला, "पोरा जातूस?" बाप आज बर्‍याच दिवसांनी मी जाताना काही बोलला होता. त्याच्या आवाज थोडा खोल होता. भरून आलेला होता. जणू त्या आवाजात मी थांबावं, यासाठीचं आर्जव होतं. मी मागे वळून पाहिलं. बापाच्या चेहर्‍यावर व्याकुळता होती. हताशपणा होता. एकटेपण होतं. मला न जाण्याची,  त्याच्यासोबत राहण्याची जणू तो मूक विनंती करत होता. त्याचे डोळे ओलसर वाटत होते. मलापण का कोण जाणे, आज जावंसंच वाटत नव्हतं बापाला सोडून. पण मला बापाच्या मनातलं काही कळलंच नाही, अशी स्वतःचीच समजूत घालून मी मान डोलावली नि मी गेलो.  मला जाणं भाग होतं. धोंडूशेट नि त्याचे परत द्यायचे पैसे मला दिसत होते. एकतर मघाच्या गोंधळाने मला थोडा उशीरही झाला होता. मालकाचा रागीट चेहरा सारखा डोळयांसमोर येत होता. शक्य तितके कृत्रिम भाव चेहऱ्यावर आणले, उसनं अवसान आणलं; नि मी निघालो. कारण न सांगता जर मी दांडी मारली, तर मला कामावरून काढून टाकतील आणि आम्ही धोंडूशेटचे पैसे कधीच भरू शकणार नाही; अशी मला धास्ती होती.

मी स्टेशनपर्यंत चालत गेलो आणि नंतर ट्रेनमध्ये पकडली. पूर्ण प्रवासभर आजच्या दिवसाचा आणि बापाचा विचार करत होतो. असं आजच का विचारलं असेल बापानं ! त्याला माझ्या जवळ असण्याची मानसिक गरज असावी का ! मी त्याला आज मोठा आधार वाटत असेन का ! का त्याला त्याचं मन माझ्याकडे मोकळं करायचं असेल ! माय जे बोलली होती ते खूप चुकीचं होतं. बापाने हे फार मनाला लावून घेतलेलं वाटत होतं. आणि त्यात आजकाल बाप फारच हळवा झाला होता. मला बापाबद्दल फार वाईट वाटत होत ; पण मी काहीही करू शकत नव्हतो. एका बाजूला मायचा तिरस्कार वाटत होता, तर दुसऱ्या मनाला मायबद्दल सहानुभूती वाटत होती. ती बिचारी पाठीवर भंगाराचं ओझं घेऊन उन्हातान्हात भटकत होती , तीन पोटं भरण्यासाठी. मी लहान असल्याने मला आधीच फार कमी पैसे मिळत होते, त्यातले बहुतेक तर धोंडूशेटच्या खिशात जात होते . माय वणवण भटकत होती आमच्यासाठी. इतर निर्ढावलेल्या भंगारवाल्या बायकांची शिरजोरी गुमान सहन करत होती. भंगारातल्या काचा तिच्या हाताला , पाठीला लागल्याने खोल जखमा झाल्या होत्या . वजन पेलून तिची कंबर, पाठ फार दुखायला लागली होती . याची पर्वा न करता ती राब राब राबत होती . या सगळयात तिचा कोंडमारा होत होता . स्वतःची दु:खं प्रत्येकासाठीच खूप मोठी असतात . मला शिक्षण सोडावं लागल्याचं आणि हे असं लहान वयातच हॉटेलात काम करावं लागण्याचं दुःख होतं. बापाला आपल्या पंगुत्वाचा न्यूनगंड होता , हालचालीसाठीही दुसऱ्यावर अवलंबून रहावं लागण्याचं दु:ख होतं. आणि मायला रक्ताचं पाणी करूनही पदरात काडीचं सुख न पडण्याचं वैषम्य होतं. या असंतोषी परिस्थितीमुळे मी वयाच्या मानाने जास्तच शांत, सहनशील आणि पोक्त झालो . बापाच्या मनात खच्चून न्यूनगंड भरला आणि वरवर शांत वाटणाऱ्या त्याच्या मनातली खळबळ मला, मायला कधीच उमजली नाही. आणि माझ्या मायला वाटू लागलं, की तिची कोणीच कदर करत नाही, तिची आम्हाला गरज ही फक्त पैशापुरती आहे. अणि ती बापाचा तिरस्कार करू लागली. बाहेरच्या लोकांचा आलेला राग आमच्यावर ;खास करून बापावर काढू लागली.

माझी विचारांची तंद्री लागलेली असतानाच माझं उतरायचं स्टेशन कधी आलं, मला कळलंच नाही. डबा स्टेशनला लागल्यावर मागच्या लोकांनी धक्काबुक्की सुरु केली, तेव्हा मी भानावर आलो. उतरलो नि हॉटेलात पोहोचलो. निघायलाच वेळ झाल्याने मला तब्बल अर्धा तास उशीर झाला होता. मला पाहिलं तसा मालक माझ्यावर आगच पाखडू लागला. मी मान खाली घालून शांत उभा राहिलाे.

" आता कुटं नाय आला तर नखरं सुरू ! सोता ला लय साणा समजतो काय रं साल्या !! येक दिस चामडं सोललं पायजे तुजं तेवा आक्कल ठिकाणी यील. ** तू राजासारका रमत गमत आला तर काय तुजा बा यून कामं करनार हाये काय ! मी सादा म्हनून कामावं ठिवलंय. ते पण धोंडूनी तुला हानलं म्हनून. नायतर भीख मागायची तरी लायकी हाये का *****? आं? ओss गन्या शेट ! तुमच्यासी बोलतोय. काय बोललं की मुंडी खाली काय **** ? असं नोकर ठीवलं तर येकदीन मला इकून खाताल! ऐकतो ना? ***, नालायक कुटचा! त्ये काय नाय आज तू रोजच्यापेक्सा जास्त काम करायचं. आता जा ***** चल ! "

मी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. जास्त राबायचं आहे, हे ऐकून आतापासूनच माझ्या पोटात गोळा येत होता. आज खरंच खूप काम लावलं त्याने. मला एक क्षण फुरसत घेऊ देत नव्हता. मी जरा कुठे एका जागी काही न करता दिसलो, की माझ्यावर डाफरून मला सारखी कामं देत होता. इकडे फडका फिरव, तिकडे काय हवं ते विचार, ग्लासं, पेले धू, ताटं धू, झाडू फिरव, पाणी मार असं बरंच काम ! पाय प्रचंड दुखत होते. अशक्त वाटत होतं. चालताना तोल जाईल असं वाटत होतं. तरीही मी न थांबता राबतच होतो. मालकाची फार भीती वाटत होती. अखेर कशीबशी संध्याकाळ झाली. काळोख वाढला तशी आपसुक गर्दी कमी होत गेली. मग शेवटी सगळी भांडी घासायचं काम आटोपलं , तसं मला घरी जायला सांगितलं. मी घरी जायला निघालो. दिवसभराच्या कामात मी घरी घडलेलं सारं विसरूनच गेलो होतो. आणि आता मला एवढा शीणवटा आला होता, की मी फक्त दिवसभर झालेल्या त्रासाचाच विचार करत होतो. अंग अगदी दुखून आलं होतं. काही वेळात मी आमच्या वस्तीत पोहोचलो. एव्हाना अंधार पडला होता. मला आमचं खोपटं दिसलं, आमच्या खोपटापाशी आसपासच्या लोकांची गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव होता, चिंता होती. यावेळी अशी गर्दी जमलेली पाहून माझ्या काळजात चर्र झालं. मी खोपटाच्या जवळ आलो, तेव्हा गर्दीतल्या कोणीतरी मला पाहिलं. कोणतरी म्हणालं, "हा बगा आला! पोरा, ह्ये बग रेss तुज्या बानं काय करून घेतलं!" हे ऐकून मी जमतील तितकी पटकन पावलं टाकत खोपटापाशी पोहोचलो. आतून रडण्याचा आवाज येत होता. खूप तणावाचं वातावरण होतं. पुढचं दृश्य मला स्तब्ध करणारं होतं.

खोपटाच्या दाराशी एक दिवा ठेवला होता. आतमध्ये फक्त त्या दिव्याचाच मिणमिणता अंधुक प्रकाश होता. आतलं दृश्य काळजाचा ठोका चुकवणारंच होतं! आणि त्या अंधारात ते आणखीनच भीषण, असह्य वाटत होतं! आत बापाला झोपवलं होतं. तो शांत पडला होता. त्याच्या अंगावर पांढरं कापड टाकलेलं होतं. नाकात कापसाचे बोळे घातले होते. त्याचे डोळे बंद असले तरी त्याच्या स्तब्ध चेहऱ्यावर वेदना जाणवून येत होत्या. माय बापाच्या डोक्याजवळ बसली होती. ती धाय मोकलून हंबरडा फोडत होती. बडवून घेत होती. काहीतरी असंबद्ध बडबडत होती. आसपासच्या बाया तिच्या बाजूला बसल्या होत्या. काही डोळ्याला पदर लावत होत्या, मायच्या बाजूला बसलेल्या मायला थोपटत होत्या, तिला शांत करायचा प्रयत्न करत होत्या; पण माय कोणालाच आवरत नव्हती. माझा बाप माझ्यासमोर मृतावस्थेत पडला होता. हे दृश्य पाहून माझ्या अंगातली उरलीसुरली शक्ती संपली. पायातले त्राण गेले. मेंदू पूर्णपणे सुन्न पडला होता. मी जवळ जवळ बापाच्या उशापाशी स्वतःला झोकून दिलं! मला काहीच कळत नव्हतं. सारखं सारखं वाटत होतं, की बाप आता उठेल, मला हाक मारेल, मायेने जवळ घेईल, त्याच्या आयुष्यातले प्रसंग रंगवून सांगेल. काही हासभास नसताना असा कसा अचानक आम्हाला पोरकं करून जाऊ शकतो हा! अशक्य! मनाला हे काही केल्या पटत नव्हतं! मी मानायला तयारच नव्हतो. असं होणं शक्यच नाही, हे राहून राहून वाटत होतं.

नेत्र भरले आसवांनी,
अंधारली हो ही वाट;
येईल का पुन्हा कधी,
जीवनात नवी पहाट!

मेंदू जणू बंद पडला होता. काहीच सुचत नव्हतं. मला मोठा धक्का बसला होता. माझ्या चेहर्‍यावर कोणताच भाव नव्हता. माझ्या डोळ्यांत आसवांचा टिपूसही नव्हता. मला काहीच कळत नव्हतं. मेंदू काही कळण्याच्या पलिकडे गेला होता. तसाच किती वेळ गेला ते काही माझ्या खिजगणतीतही नव्हतं. कानावर शब्द पडत होते. पण माझं कशाकडेच लक्ष नव्हतं. कोणीतरी मला गदागदा हलवू लागलं. काही शब्द माझ्या कानावर पडले, "पोराss सुद्दीत ये! आरं याला कोनीतरी रडवा! मोप मनावर घेतलंय यानी! येड लागायचं अशाने!" पण मी तेव्हा रडलोच नाही. हा माझ्यातला खंबीरपणा बिलकुल नव्हता, हा मला बसलेल्या हादऱ्याचा परिणाम होता.

बापाच्या मृत्यूबद्दल माझ्या कानावर पडलेल्या वृत्ताचा सारांश असा होता-
बापानं विष पिऊन आत्महत्या केली होती. माय साधारण आठच्या सुमारास परतली होती. खोपटाचं दार उघडताच तिला बाप जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याच्या तोंडातून फेस बाहेर आलेला होता. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण त्यांच्यात प्राण नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य वेदना स्पष्ट दिसत होत्या. मरतेवेळी त्याला फार त्रास झाला असावा. बाजूला एक छोटी रिकामी बाटली पडली होती. हे पाहून मायला मोठा धक्का बसला होता. ती हे पचवू शकली नव्हती. तिने हंबरडा फोडला होता. तिच्या आवाजाने आजुबाजूचे सर्वजण धावत आले होते. मला आणायला कोणीतरी राम्याला पाठवलं, पण मी हॉटेलात दिसलो नाही. तो यायच्या काही मिनिटांपूर्वीच मी तिकडून निघालो होतो. माय बडवून घेत होती, धाय मोकलून रडत होती, मध्येच बापाला उठवायचा प्रयत्न करत होती, काहीबाही असंबद्ध बडबडत होती. "मी सकालच्याला बोल्लं म्हनून असं करून घेतलंत न्हवं?.... काय गरज होती दारु प्यायची!! .... आवो कायतरी काम करा! नुसतं दारू ढोसत राव नका! पोटाला चार पैकं तरी कमवा! .... माज्यामुलं जीव देलात तुमी! मीच मारलं तुमाला! .... मी ह्ये पाप गेऊन नाय वो जगू शकत... मीपण येतंय तुमच्याकडं! नाय मला रोकू नका.... नका आयकू रंग्याचं! त्या पोत्यात झोल असनार. तुमाला आडकवील त्यो फुकाट! .... उटलात? त्वांड धुवा, भाकर नं चा देते! .... असं कसं मला येकटीला सोडून गेलात! नाय! तुमी खोटं खोटं नाटक करता नं? समदे फसवता मला नं? ह्ये जित्ते हायत! उटा! बास झाली नाटकं."

ती रात्र जागून काढली. शोककळा पसरली होती. रात्री आजी आजोबा- मायचे आईवडील आले. त्यांना मायचा आक्रोश पाहवत नव्हता. आतापर्यंत मी जवळच्या माणसांचा मृत्यू असह्य असतो, हे फक्त ऐकलं होतं; असंं अनुभवायला मिळेल, वाटलंही नव्हतंं! सकाळी बापाला अग्नी दिला. बापाला अग्नी देताना भडभडून येत होतं. माझ्या लहानपणी मला खेळवणारा, गुदगुल्या करणारा, माझं कौतुक करणारा बाप सारखा नजरेसमोर येत होता. त्याचा आवाज कानात सारखा रुंजी घालत होता. राहून राहुन त्याच्या -माझ्या शेवटच्या भेटीचा त्याचा व्याकुळ चेहरा आठवत होता. ते त्याचे पाणावलेले डोळे आठवत होते. काही वेळात अक्राळविक्राळ ज्वाळांचा नाच सुरू झाला. लाकडांनी चांगलाच पेट घेतला. बापाचं शरीर जळत होतं, पण गेल्या काही वर्षांत त्याचं मन आतून कितीतरी वेळा राख झालं असावं, आयुष्यात आलेल्या अपयशांमुळे. बापाने कंटाळून जीव दिला, यात मायचा दोष नव्हता, दोष होता परिस्थितीचा. बाप आतून पूर्णपणे एकटा झाला होता. तुफानात अडकलेल्या नावेसारखं त्याचं मन भावनांच्या लाटांवर हिंदकळत होतं, ज्यात त्याला मात देणार्‍या भावना सारख्या त्याच्यावर काबू मिळवत होत्या. वादळ शमायच्या आधीच बुडाली त्याची नाव. आणि आता हे वादळ आमच्याकडे त्वेषाने घोंगावत येत होतं!

_____________________________

-जुई नाईक.
द्वादशांगुला

सर्व हक्क सुरक्षित.

Protected by Copyscape

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम जबरदस्त लिखाण।।।
नेत्र भरले आसवांनी,
अंधारली हो ही वाट;
येईल का पुन्हा कधी,
जीवनात नवी पहाट!।।।ह्या ओळी खूप आवडल्या।।।

सिद्धू धन्स! Happy पुढचा भाग लवकर टाकते! Happy

एकदम जबरदस्त लिखाण>>>> धन्यवाद सचिनजी! Happy

ह्या ओळी खूप आवडल्या>>> ओळी आवडल्याचं वाचून आनंद झाला! Happy धन्स!

अप्रतिम लिहिलय !!>>>) धन्स पंडितजी! Happy

वाट पहायला लावलीस पण खरोखर अप्रतिम लिहलं आहेस..>>>> खूप धन्यवाद?! Happy यापुढे जास्त वाट पहायला लावणार नाही. Happy

धन्स किल्लीतै! Happy

खूपच छान लिहिले आहेस. डोल्यामोर(eyes) उभे राहतात प्रसंग.....पू ले शु >>>>धन्यवाद उमानुजी! Happy

ळ कसे लिहायचे ... गूगल इंग्लिश - मराठी की बोर्ड वरून लिहिता येत नाहीय>>>>> इनबिल्ट की बोर्डातला मराठी कीबोर्ड डाऊनलोड करुन पहा. नाहीतर ळ कॉपी करुन क्लिप बोर्डात लॉक करून ठेवा. अन्यथा google handwriting input app. पण सोयीस्कर आहे.

नेत्र भरले आसवांनी,
अंधारली हो ही वाट;
येईल का पुन्हा कधी,
जीवनात नवी पहाट! .... ह्या ओळी खूप आवडल्या.

मी असे लिखाण वाचत नाही किंबहूना वाचता येत नाही मला. पण तुमचा चाहता असल्याने हा लेख नेहमी वरती दिसत होता. शेवटी वाचला. नाही आवडले. एक तर तुम्ही इतके चित्र काढल्यासारखे लिहिले आहे की प्रसंग अगदी अंगावर आल्यासारखे झाले. अर्थात हा माझ्या स्वभावाचा दोष आहे. तुम्ही लिहित रहा खुप. जरा आमच्यासारख्यांसाठी हलकेफुलकेही लिहित जा अधुनमधुन. Happy

शालीजी वाचल्याबद्दल खूप धन्यवाद! Happy

एक तर तुम्ही इतके चित्र काढल्यासारखे लिहिले आहे की प्रसंग अगदी अंगावर आल्यासारखे झाले. >> हो! कथा डोळ्यांंसमोर उभी रहावी हाच कयास आहे! शिक्षणाबद्दल, धडपडीबद्दल हे कथन आहे.

तुम्ही प्रांजळ मत नोंदवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते! Happy

आमच्यासारख्यांसाठी हलकेफुलकेही लिहित जा अधुनमधुन. >> हो! नक्की लिहीन! Happy