संघर्ष - (भाग २)

Submitted by द्वादशांगुला on 19 June, 2018 - 14:14

याआधीचा भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १

पूर्वभाग -
किर्‍याकाका तर आमच्या जीवावर उठला होता. त्याचा मुद्देमाल न सापडल्याने तो धुमसत होताच. त्याने जागोजागी माणसं पेरून आम्हाला वाळीतच टाकलं होतं. मग घाईतच आमची मतं जाणून न घेता बापाचं ठरलं,

शेकडोंची पोशिंदी मुंबैमाता आपल्याला पदरात सामावून घेईल.

×××××××××××××××××××××××××××××××××××
आता पुढे-
×××××××××××××××××××××××××××××××××××

मुंबैपुरीत तर आम्ही आलो. कसे आलो ते त्या एका देवालाच माहीत. बापाच्या जेलातल्या एका माणसाच्या ओळखीने आम्ही अवैध मालाची वाहतूक करणार्‍या गाडीमधून मुंबई जवळ केली. सगळीकडे मिट्ट काळोख झाल्यावर आम्ही बसलो गाडीत. गाडीही गावच्या पार सीमेजवळून पकडायची होती. जवळ सामान तर काही नव्हतंच. ही गाडीही थेट मुंबईला जाणारी होती. पूर्ण प्रवासभर तसे आम्ही शांत होतो. मी मात्र आनंदलो होतो, वेगळ्याच विचारात होतो, याचं कारण वेगळंच होतं. बाप मला गाडीत चढवता-चढवता म्हणाला होता, " गण्या, पैकं याया लागलं की तुला तिकडं साळंत घालणार बग!"मी पूर्ण प्रवासभर नव्या शाळेचाच विचार करत होतो. मुंबईतली नवी शाळा... नवीन वह्या... नवीन पुस्तकं... नवा गणवेश... नवीन मित्र... नवे समजूतदार शिक्षक... अशी स्वप्नरंजनं करता करता मला डोळा कधी लागला, कळलंच नाही.

मला झोप लागली, आणि स्वप्न पडलं, की मी आमच्या गावच्याच नदीकिनारी माझ्या नेहमीच्या जागेवर बसलो आहे. यावेळी मात्र मी खूश आहे कारण माझ्या अंगावर नवा गणवेश आहे. खांद्याला नवीकोरी वह्यापुस्तकं असलेली झोळी लटकवली आहे. मी झोळीतून पेन्सिल काढतो आणि तिने वाळूत अक्षरं शब्द काढायला लागतो. 'ग'... 'ण'.. 'ण'ला मात्रा 'णे' ... 'श'. ग णे श. माझं नाव लिहून मी आनंदी होतो. परत पेन्सिल सरसावतो. 'श'... 'श'ला काना 'शा'... 'ळ'...'ळ' ला मात्रा 'ळे'.. 'ल'... 'ल'ला काना 'ला' ... हां! शा ळे ला. आता 'ज'.. 'ज'ला काना 'जा'.... 'त'.. 'त' ला काना आणि मात्रा 'तो'. 'गणेश शाळेला जातो'. मनासारखं वाक्य लिहिल्याने मी खूश होतो. मी या वाक्याकडे डोळे भरून पाहत असतो, इतक्यात एक मोठी लाट येते, आणि हे वाक्य पुसलं जाण्याच्या भीतीने मी उभा राहतो. बरोबर लाटेच्या समोर. अक्षरं पाठीशी घालून. जणू माझ्या नि लाटेतला लढाच. ती लाट मला धडकते, चिंब भिजवून टाकते, मला जोराने ढकलते, लाटेच्या आवेगात क्षणभर मला श्वास घेणंही कठीण होतं, जीव गुदमरतो, नाकातोंडात पाणी जातं; पण मी हटत नाही. काही वेळात लाट ओसरते, मी मागे वळून पाहतो, नि काय आश्चर्य, वाळूत 'गणेश शाळेला जातो.' ही अक्षरं लकाकत असतात.

एका खड्ड्यात गाडी आपटली आणि माझी झोपमोड झाली. पण स्वप्नातली अक्षरं वाचवल्याची खुशी माझ्या लहानशा निरागस चेहर्‍यावर होती. मी भावनेच्या भरातच मायला हे स्वप्न सांगितलं. ती माझ्याकडे बघून कौतुकाने हसली. माझ्या केसांत हात फिरवत ती बापाला म्हणाली, " ल्येकरू मोप साळा साळा करतंय नव्हं! तुमास्नी सांगते, एकदीन हा मोठ्ठा सायेब होनार बगा! " असं म्हणून तिने आनंदानं माझ्या कानशिलावरून कडाकडा बोटं मोडली. बापानेही मान डोलावली, नि तो बाहेर बघू लागला. मी पुन्हा शाळेचा विचार करू लागलो. विचार करता-करता कधी मुंबई आली कळलंच नाही. रात्रभर प्रवास करून सकाळी नऊच्या सुमारास आम्ही अनेक स्वप्नं उराशी बाळगून मुंबई जवळ केली. ते म्हणतात ना- जसे तुम्ही मुंबईला जवळ कराल, तशी ती तुम्हाला जवळ करत जाईल. कधी गोंजारून तर कधी धक्के खात तुम्हाला मुंबईच 'मुंबई' शिकवेल. तिच्या रीतीभाती, सवयी तुमच्या अंगवळणी तीच पाडेल. रोटीचा मार्ग शिकवेल. मग तो कसाही असो. पण तुम्हाला उपाशीपोटी, निराश परत कधीही पाठवणार नाही. मुंबईत सामावून घेण्यासाठी अट एकच, तुम्ही बस्स हातपाय हलवले पाहिजेत. मग ती तुम्हाला बुडू मात्र नक्की देणार नाही.

मुंबईचा पसारा पाहून आम्ही पहिल्यांदा गांगरूनच गेलो. काय त्या सुबक दगडी इमारती, झाकपाक कपडे केलेली माणसं, आयुष्यात कधी न पाहिलेल्या मोटारी, स्वच्छ रस्ते, मध्येच आढळून येणारी पराकोटीची गलिच्छता, मोठाली दुकानं, समुद्रकिनारे, आणि माझं सर्वात मोठं आकर्षण- रेलगाडी! पहिल्यांदाच आलो होतो इथे. एकदम वेगळा परिसर, वेगळी माणसं पाहून बुजलोच मी. रेलगाडीचा पहिला प्रवास अर्थात धक्के खात असला, तरी माझ्यासाठी तो एका सुखमय स्वप्नासारखाच होता. पुढे कित्येक दिवस मला मी रेल्वेत बसल्याचं स्वप्न पडत होतं. तर बापाने आम्हाला एका गलिच्छ झोपडपट्टीत नेलं. सगळीकडे उकिरड्यासारखा घाण वास सुटलेला. चिखल, माश्या, सडलेल्या वस्तूंनी ती जागा व्यापली होती. मला पाहुनच ओकारी येत होती. तिथे कोणतरी बापाच्या ओळखीचे राहत होते. त्यांनी एक बंद, मोडलेली झोपडी आम्हाला दिली. त्याबदल्यात बापाने त्यांना थोडे पैसे ठरावीक वेळाने द्यायचे होते. तर त्या झोपडीची आम्ही डागडुजी केली, आतली उंदीर घुशींची बिळं बुजवली, घाण साफ केली, आणि तिथं राहू लागलो. वस्तीतली बहुतेक माणसं चोर्‍या करणारी, बेवडी, भंगार गोळा करणारी होती.

काही दिवस बापाने कुठूनतरी आणलेल्या पैशांवर काढले, पण आता मात्र पोटासाठी काम शोधणं भाग होतं. माझी माय मुळात कष्टकरी. ओळख वाढवून ती भंगार गोळा करणार्‍या बायकांत जायला लागली. तिने तुटपुंजे का होईना, पण घरात नियमित पैसे आणायचा मार्ग शोधला होता. पण बाप! तो मुंबई रुपी सागरात हातपाय हलवायला तयारच नव्हता. अशाने मुंबई तर त्याला गिळणारच ना? कुठे तो माझा पूर्वी ढोरासारखे कष्ट उपसणारा कष्टाळू बाप; अन् कुठे हा 'मुंबैमधली मिळकत इथल्या ट्रेनप्रमाणेच झटकन येते', हा वेडा विचार बाळगून आयते मिळण्याची अपेक्षा करणारा लोभी बाप. दिवसभर झोपड्यात पडून असायचा. म्हणतात ना- रिकामं डोकं सैतानाचं घर! बापही जुगार खेळणार्‍या, चोरीचपाटी करणार्‍या, गुंडगिरी करणार्‍या लोकांच्यात मिसळून गेला. जुगार खेळून फिरते बंगले उभारण्याचे इमले बांधू लागला. मायचे कष्टाचे पैसे जुगारावर उधळू लागला. जुगारात आलेलं अपयश पचवण्यासाठी मदिरेचा आधार घेऊ लागला. स्वतःच्या शरीरावरील ताबा हरवण्याइतपत दारुच्या ग्लासात हरवू लागला. कधी दारू मिळाली नाही, तर तो चक्क पाणी मिसळून स्पिरिट पिऊ लागला. बोलून-चालून हे विषच.

यावेळात यामुळे तीन गोष्टी घडल्या. एक- घरातली मायची मिळकत घरात येऊनही शून्यात जमा झाली आणि पुन्हा लोकांच्या दयेचं, उकिरड्यावरचं शिळंपाकं खाण्याची वेळ आली. दोन, बापाची तब्येत झरझर खाली घसरू लागली. शेताचं नांगर एकट्याने ओढू शकणारा रांगडा गडी पाच किलोचं भंगाराचं पोतंही सरकवताना दमू लागला. बाप हडकुळा झाला होता. आणि तिसरी गोष्ट- मला शाळेत पाठवण्याचा योग कधी आलाच नाही. बघता बघता चार वर्षं सरली होती. मी मुंबईला निर्ढावलो होतो, आणि मुंबई मला. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये ती सुटताना चढायला गंमत वाटायची. मी तसा लहान असल्याने माय मला कामाला कुठे पाठवत नव्हती. मी आपला असाच माझ्यासारख्या समवयस्कांसोबत हुंदडायचो. माझ्या मित्रांनी कधीही शाळेच्या पायरीला पाय लावला नव्हता. भंगारवाल्याच्या मुलाने शाळेला जायचा हट्ट केला की हे अवलक्षण समजायचे. माझ्या मायबापाला एका छोट्याशा गावात राहूनही मला शिकवायची सुजाणता कुठून आली होती, देव जाणो. तर मी माझ्या मित्रांना शाळेच्या गमतीजमती सांगायचो. दुकानाच्या पाट्यांवरून अक्षरं शिकवायचो, अंक शिकवायचो.

कधीकधी मायला भंगाराची पोती वाहून न्यायला मदत करायचो. मी मायला मदत करायचा हट्ट केला, की माय मात्र नेमकंच हलकं जुन्या कापसाचं, रद्दीचं, भुशाचं ओझं माझ्या पाठीवर द्यायची. स्वतः मात्र फुटलेल्या काचा, जुने गंजलेले पत्रे, जड वस्तू अशा गोष्टी वाहायची. कधीकधी तिच्या हातावर फोड यायचे, चांगले लालसर घट्टे पडायचे. कधी हातात, पाठीत फुटलेल्या काचा भरून भळाभळा रक्त वाहायचं. तरीही त्या माऊलीने कधी आराम म्हणून केला नाही. उन्हात, पावसातही ती कामावर जायची. अंगात अशक्तपणा असताना, तापाने फणफणत असतानाही जायची. तिला शेवटी तिच्यासकट तीन लोकांना पोसायचं होतं. पोटं भरायला बापापासून कशीबशी पैसे वाचवून ठेवायची, प्रसंगी त्याचा मारही खायची, पण कधी म्हणून तिने बापाला सुनवलं नाही. कदाचित तिने त्याला सुनवलं असतं, तर एकतर बाप सुधारला तरी असता, नाहीतर त्याने मायला घरातून हाकललं तरी असतं! आणि बापाच्या वागण्यानुसार दुसरीच शक्यता जास्त होती!

तरी या चार वर्षात मुंबईने मला बरंच काही शिकवलं असलं, तरी मी मनातून संतुष्ट नव्हतो. आपण आयुष्यातलं काहीतरी मोठं हरवून बसलेलो आहोत, ही भावना कायम मनात यायची. मी नदीकाठी वाळूने अक्षरं काढत असल्याचं स्वप्नं नेहमीच पडायचं! मात्र यावेळी मला अक्षरं लाटेने पुसली गेलेली दिसायची अन् त्याच क्षणी मी तडबडून जागा व्हायचो! आसपासच्या पांढरपेशा वस्तीतल्या मुलांना गणवेशात, पाठीला दप्तर लावून शाळेला जाताना पाहून मी त्यांचा तिरस्कार करायचो. गावातल्या शाळेचे सारखा छड्यांचा मार देणारे मास्तरही चांगले वाटू लागले होते. ते मारत मारत का होईना, आपल्याला शिकवत तर होते! गावातले माझे वर्गसोबती शाळेत जात असतील, शिकत असतील, पेपर लिहून मार्क मिळवत असतील, या विचाराने मला त्यांचा हेवा वाटायचा. मी काही शाळेत अगदीच पहिल्या नंबराला येणारा नव्हतो, पण अगदीच ढबूही नव्हतो. वह्या,पेनं-पेन्सिली पुरवून पुरवून वापरत, कोणाची जुनी-फाटकी जीर्ण पुस्तकं मागून वापरत वापरत शिकून मी पहिल्या दहात तरी असायचो. पण आता?

पुसल्या होत्या शिक्षणवाटा,
अन् वाटही चुकली होती;
आयुष्य घडविण्याची तर,
माझी संधीही हुकली होती!

पण माझ्यावर या चार वर्षांत संगतीचा परिणाम मात्र झाला होता. सोबतच्या मुलांनी आपल्याला त्यांच्या घोळक्यात घ्यावं, आपल्याला मानावं, या वेड्या ध्येयाने मी त्या मुलांचं अनुकरण करत होतो. रेल्वेच्या गर्दीत कोणाचं पाकीट मार, दुकानातून गोळ्या चोर, अर्वाच्य आणि वयाला न शोभणार्‍या शिव्या घाल, अरेरावीच्या भाषेने सर्वांशी बोल, मारामारी कर, इतरांशी उगाचच पंगे घे, अशा गोष्टींत मी हिरीरीने भाग घेऊ लागलो. चोर्‍या करता करता अंगात सफाईही आली. मनात चोरी करायचा विचारही नसला, तरी डोळ्यांनी कुठली प्राप्य वस्तू पाहिल्यावर हात आपोआप सराईतपणे चालायचे आणि काही वेळात ती वस्तू माझ्याकडे असायची. माझ्या प्रगतीने, तुमच्या भाषेत अधोगतीने अखेर आमच्या टोळीत माझं नावही जोडलं जाऊ लागलं. आमचा टोळीप्रमुख होता, किशन. दादा म्हणायचो त्याला. येथेच जन्मलेला, वाढलेला. खरंतर त्याच्यापेक्षाही एखाददोन वर्षं मोठे भाई होते टोळीत, पण दरारा याचाच. कारण याच्या अंगातली ताकद, आणि शैतानी डोकं! त्याचा मार खालेला कोणीही पाणी मागायचा नाही! चार दिवस बेशुद्ध. दादामध्ये हे गुण त्याच्या बापाकडून आले होते. त्याचा बाप- धोंडूशेटही पक्का बदमाश. कावेबाज. समोरच्याचा बघता बघता काटा काढणारा. लोभीपणा अंगात भिनलेला. चोरी, दरोड्यासाठी चार वेळा तुरुंगाचं पाणी पिऊन आलेला.

अशातच एकदा मी दादासोबत असताना माझा एक दोस्त- राम्या पळत-पळत आला, आणि म्हणाला,
" गण्या, तेरा बाप चलते ट्रेनसे गिरा! भोत लगा है मालूम!"

ऐकून माझं डोकं सुन्न झालं. काय ऐकतोय त्यावर विश्वासच बसेना. मला क्षणभर गरगरल्यासारखं झालं. ओठ, घसा कोरडा पडला! मला अचानक हादरवून टाकणारा धक्का बसला होता! माझा बाप... ट्रेनमधून पडला होता! मला सावरणारा, लहानपणी माझ्यावर प्रेम करणारा, माझ्या सुखासाठी माझ्या शाळेच्या फीचा कसाही बंदोबस्त करणारा माझा जन्मदाता बाप!! क्षणभर लहानपणी माझे लाड करणारा, मला गुदगुल्या करणारा, हसवणारा, खाऊ आणून देणारा बाप डोळ्यासमोर आला. टचकन डोळ्यांत पाणी आलं! बापाची खूपच काळजी वाटू लागली होती. जिवाची घालमेल होत होती. क्षणाक्षणाला ह्रदयाची घरं पडत होती. भलत्या-सलत्या विचारांचं जळमट डोक्यात घर करत होतं. नाही नाही त्या शंका येत होत्या. बापाला कधी पाहतोय, असं झालं होतं. कारण आता जरी कसाही वागत असला, तरी तो माझा बाप होता!

मी जमेल तसा बापाला ज्या दवाखान्यात उपचारासाठी नेलं होतं, तिकडे पोहोचलो. मी पाहिलं, मायही तिकडे होती. तिला कळल्या-कळल्या ती धावतच आली असावी. ती डोळ्याला पदर लावून आसवं गाळत होती. मध्येच काहीतरी असंबद्ध बडबडत होती. बापाला खाटेवर झोपवलं होतं. बेशुद्ध होता तो. अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या. डोक्याला बराच मार बसला होता. हाडही मोडलं होतं. बरंचसं रक्त वाहून गेलं होतं. हाताला, चेहर्‍याला बरीच सूज आली होती. नंतर डाॅक्टरांनी जे सांगितलं, ते तर अजून धक्कादायक होतं. बापाला वाचवायचं असेल, तर बराच पैसा ओतावा लागणार होता. आणि आम्ही तर तेव्हा चार पैशालाही महाग होतो. बापाच्या उपचारासाठी बराच पैसा खर्च केल्याशिवाय तो वाचणार नाही, हे आम्हाला कळून चुकलं होतं. माय तर वेडीपिशी झाली होती. तिच्याकडे, तिच्या अवस्थेकडे पाहवतही नव्हतं. काही कमवत नसला, तरी तिच्यामते तिच्यासाठी तो आधार होता!

आणि मी? मी पूर्णपणे स्तब्ध झालो होतो. काही सुचणं, कोणी काही बोललेलं समजणं, यापलिकडली अवस्था होती माझी! खूपच अनपेक्षित असा जिवघेणा धक्का होता हा माझ्यासाठी! तर्र अवस्थेतही एवढ्यांदा रेल्वेने प्रवास करणारा माझा बाप,असा कसा अपघात होऊ शकतो त्याचा! आता कालपर्यंत बरा होता माझा बाप! काल तर इतक्या दिवसांनंतर, जवळजवळ दोन वर्षांनंतर तो माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत "पोरा! तुला साळंत नाय घालू सकलू! घालनार बघ ! तुला मोटा सायब जालेला बघायची विच्चा हाय माजी! पन पोरा, कदी दारूला हात लावू नको बग! लsय वाईट अस्ते!" असं म्हणालेला तो. मला भरुन आलेलं. मीही त्याच्याकडून त्याने दारु कमी करण्याचा शब्द घेतला होता. आणि आज बापाला पहावं तर असं! मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या अवस्थेत! आज तर त्याने दारुही घेतलेली नव्हती. तरीही त्या राक्षसी गर्दीत उभं राहण्यासाठी नेमकी कडेचीच जागा मिळावी, आणि रेल्वेने वेग घेतला असतानाच तो खाली फेकला जावा! आणि नेमका तेव्हाच, जेव्हा बाप पहिल्यांदा दारुच्या गुत्त्यावर न जाता रस्त्याचं काम चाललेल्या कंत्राटदाराकडे कामासाठी जात होता? काय अजब दैव हे! बापच बोलला होता आदल्या दिवशी, की तो दुसर्‍या दिवशी काम बघणार आहे. बाप रुळावर आला हे पाहून किती आनंदलो होतो मी आणि माय! आणि हे असं जिवघेणं विरजण पडावं आमच्या आनंदावर! बाप, 'माझा' बाप, मरणाच्या दारात उभा असलेला बाप!

एव्हाना राम्यानं वस्तीभर ही बातमी सांगितली होती. थोड्यावेळात सारी वस्ती लोटली बापाला बघायला. सारी वस्ती हळहळ व्यक्त करत होती. गरिबीतल्या मदत करण्याच्या वृत्तीचा तेव्हा साक्षात्कार झाला मला. आम्ही नाही म्हणत असतानाही भोळे बायाबापडे जबरदस्ती कनवटीचे पैसे देऊन जात होते. हे पैसे त्यांच्यासाठी दिवसाची कमाई होती, दिवसभर घाम गाळून मिळालेला मोबदला होता. स्वतःच्या आणि स्वतःवर अवलंबून असलेल्या बालबच्च्यांच्या पोटावर पाय देऊन ते आपल्याजवळचे पैसे देऊन जात होते. कोणीतरी नंतर आमच्यासाठी भाकर्‍याही आणून दिल्या. पण आमची झोळी इतकी फाटकी होती, की या लोकांनी दिलेले, त्यांच्यासाठी त्याक्षणी सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेले हे पैसे बापाच्या उपचारासाठी अजिबात पुरेसे नव्हते. हे पैसे कसे उभारायचे याच विचारात आम्ही होतो. संध्याकाळी उशीरा आमच्या मदतीला धावून येणारी व्यक्ती भेटली. धोंडूशेट होता तो. तोच, दादाचा बाप. तो आला आणि बापाच्या अवस्थेकडे पाहून म्हणाला, " अरे तुम कायकू चिंता करता है! पैसा मैं देगा ना इसकेवास्ते. अपने लोगोको मदत तो करना ही पडता है ना! " त्याचं हे वाक्य वाचून आम्ही थोडे निश्चिंत झालो. पैशांच्या परतफेडीचंही तो नंतर काय ते बघेल, असं म्हणाला होता. आम्ही तर आमच्या डोळ्यांवर त्याच्यावरच्या आम्ही ठेवलेल्या विश्वासाची आणि कृतज्ञतेची पट्टीच बांधली होती. या हतबलतेमुळेच तर या पट्टीच्या अलिकडे असलेला त्याच्या डोळ्यांतील मुळचा क्रूर आणि लोभी भाव आम्हाला दिसलाच नाही!

-------------------------------------------

-जुई नाईक.
द्वादशांगुला

सर्व हक्क सुरक्षित.

Protected by Copyscape

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स सिद्धी! Happy

चांगला स्पीड धरलास रोज एक भाग टाकायचा...>>>> हम्म! Happy

जबरदस्त हांही भाग
------मी या वाक्याकडे डोळे भरून पाहत असतो, इतक्यात एक मोठी लाट येते, आणि हे वाक्य पुसलं जाण्याच्या भीतीने मी उभा राहतो. बरोबर लाटेच्या समोर. अक्षरं पाठीशी घालून. जणू माझ्या नि लाटेतला लढाच. ती लाट मला धडकते, चिंब भिजवून टाकते, मला जोराने ढकलते, लाटेच्या आवेगात क्षणभर मला श्वास घेणंही कठीण होतं, जीव गुदमरतो, नाकातोंडात पाणी जातं; पण मी हटत नाही. काही वेळात लाट ओसरते, मी मागे वळून पाहतो, नि काय आश्चर्य, वाळूत 'गणेश शाळेला जातो.' ही अक्षरं लकाकत असतात.---- खुप आवडला हां भाव

पुभाप्र

मस्तच!
दुसऱ्या भागाची वाट पहायला लावली नाहीत यासाठी धन्यवाद!

छान !!!