संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

Submitted by रसप on 21 July, 2018 - 03:37

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे.

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच.
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.)

Dhadak_2018_film.jpg

गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही.

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं.

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/07/movie-review-dhadak.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांच्या मतांचा आदर आहे आणि स्वीकारही. हा लेख लिहिताना, लिहून झाल्यावर, पोस्ट केल्यावर प्रत्येक वेळी ही जाणीव होतीच की ह्यामुळे काही धारदार टीका सहन करायला लागणार आहे. त्यामुळे आलेले प्रतिसाद अपेक्षित आहेत.
रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा रा.पु. मिळाला होता बहुतेक. तिचं काम आणि एकंदरीत तीच लोकांना खूप आवडली होती. असंख्य ट्रक्सच्या मडफ्लॅप्सवर झळकलेली ही एकमेव अभिनेत्री असावी. एरव्ही तिथे मी अनेक रँडम फोटो पाहिले आहेत. फरहापासून सोनाक्षी सिन्हापर्यंत. मात्र तिचं 'सैराट'मधलं काम मला तेव्हाही आवडलं नव्हतंच. किंबहुना, जेव्हा मी सैराट दुसऱ्यांदा पाहिला, तेव्हा तर रिंकू, आकाशची कामं आणि एकंदरीतच कथानकाची मांडणी अतिशयच रटाळ आणि काही मोजक्या जागा वगळल्यास सामान्य वाटली होती.
'धडक' हा काही 'दुनियाभारी' सिनेमा आहे, असं अगदीच नाही. त्या तोडीचा सिनेमा बनवण्याची योग्यता खेतान किंवा जोहरकडे असेल, असं मला तरी वाटत नाही. पण बहुतांश सिनेमा 'सैराट'ची जशीच्या तशी नक्कल आहे, (रिमेकच आहे म्हणा) त्यामुळे होणारी तुलना अपरिहार्य आहे. 'धडक'बद्दल मत बनवताना समोर 'सैराट' ठेवणं म्हणूनच क्रमप्राप्त आहे.
'सैराट'मधून पोहोचवलेला असंतोष 'धडक'मध्ये नाहीच आहे. शेवट जरी वेगळा असला, तरी जान्हवीच्या मर्यादा उघड्या पडतात आणि चित्रणातूनही अधिक प्रभाव साधला गेला जाऊ शकला असता, असंही वाटलं. मात्र ह्या दोन बाबी वगळता, उर्वरित भाग खूप नेटका वाटला. रिंकू-आकाशचं काम मला मेकॅनिकल वाटलं होतं. त्यांच्यापेक्षा कैक पटींनी तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख सरस वाटले होते. इथे मात्र जान्हवी-इशान त्या मानाने खूप सीझन्ड वाटले. त्यांचा वावर सहज वाटला.
To conclude, सैराट आवडला नसला आणि धडक आवडला असला, तरी दोघांमधली ही तुलना दोन गरीबींमधली भाग्यवान तुलना आहे. दोन्हीपैकी कुठलाच सिनेमा मी तरी पुन्हा पाहणार नाहीय !

रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा रा.पु. मिळाला होता बहुतेक. - राष्ट्रीय पुरस्कारांमधे एक 'स्पेशल मेन्शन' नावाची संकल्पना आहे. रिंकू सैराटसाठी स्पेशल मेन्शन होती.

https://www.youtube.com/watch?v=aQdN1D2J_gc

https://www.youtube.com/watch?v=c6lBmH4pTYg

https://www.youtube.com/watch?v=Rt0-gATz38s

हे काही रिव्ह्यूजही ऐकण्यासारखे आहेत. त्रयस्थपणे इतर 'क्रिटीक्स' काय म्हणताहेत तेही पाहता येईल.

विकीपिडीयावरून साभार -

Critical reception
Dhadak received negative critical reviews.[8] It was particularly criticized for being a poor remake of Sairat.[9] Critics also felt that it did not work as a standalone romance.[15] Rajeev Masand of News18 praised the acting performances of Ishaan Khatter and Janhvi Kapoor but found the film to be a sanitized version of the original and questioned the logic behind remaking Sairat, a film about the perils of caste system, if they had no intention of keeping the caste angle in the film. Masand gave the film a rating of 2.5 out of 5.[16] Saibal Chatterjee of NDTV gave the film a rating of 2 out of 5 saying that the film is a soulless version of the original.[17] Rachit Gupta of The Times of India criticized the film for being too glossy but appreciated Ishaan for his acting performance and director Shashank Khaitan for making a socially relevant film. Rachit gave the film a rating of 3.5 out of 5.[18] Rohit Vats of Hindustan Times gave the film a rating of 2.5 out of 5 saying that the central conflict in Dhadak is not as powerful as the one in Sairat and therefore the overall impact is not as strong as the one left by it's predecessor.[19] Shubhra Gupta of The Indian Express gave the film a rating of 1.5 out of 5 and said that Dhadak is not just a bad remake but also a poor quality film in general.[20] Sukanya Verma of Rediff praised Ishaan and Janhvi but found the film to be unrealistic and a bad remake of Sairat. Sukanya gave the film a rating of 2 out of 5.[21] Anna M. M. Vetticad of First Post gave the film a rating of 1.5 out of 5 and criticized the director for removing the caste issue from the screenplay despite remaking a film about inter-caste romance. On the acting front, Anna wasn't impressed with Janhvi and said that her acting performance was "colourless".[22]

टीप - सिनेमाविषयी एकंदरीतच काय मत मिडीयामधे बनत आहे हे दाखवण्यासाठी वरच्या दोन पोस्ट दिल्या आहेत. ह्यात रणजित ह्यांच्या सिनेमा आकलनावर शंका व्यक्त करण्याचा हेतू आहे असा गैरसमज कृपया होऊ नये, ही विनंती

Rajeev Masand of News18 praised the acting performances of Ishaan Khatter and Janhvi Kapoor but found the film to be a sanitized version of the original and questioned the logic behind remaking Sairat, a film about the perils of caste system, if they had no intention of keeping the caste angle in the film.

>>
सहमत !

प्रादेशिक चित्रपटांची नक्कल करून हिंदी चित्रपट बनवण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. आजवर अनेक असे चित्रपट बनले असतील. पण मला आठवतोय तो विद्या बालनचा भुलभुलैया चित्रपट. मूळ मल्याळम चित्रपटाचे तमिळ आणि हिंदीत रिमेक झालेत. हिंदीतला भुलभुलैया अनेकांना खूप आवडला. मला एक मित्र म्हणाला तू तमिळ चंद्रमुखी पाहायला हवास. त्यापुढे हा काहीच नाही. पण नंतर भुलभुलैया हिट झाला. ज्यांनी मूळ मल्याळम/तमिळ चित्रपट पाहिलाय त्यांची मते अशीच होती जशी इथे सैराटशी तुलना करणाऱ्यांची आहेत. देशभर प्रदर्शित होणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांसाठी असा प्रेक्षकवर्ग फार कमी असतो. त्यामुळे धडक हिट झाला अथवा फ्लॉप झाला तर तो त्याच्या मेरीटवर होईल. जे प्रेक्षक फक्त धडक पाहतात त्या प्रेक्षकच हे ठरवतील. दोन्ही चित्रपट पाहून तुलनात्मक परीक्षण करणाऱ्या प्रेक्षकवर्गाचा त्यात फार मोठा वाटा असेल असे वाटत नाही.

रसप यांची ' परीक्षणे ' लोक इथे गांभीर्याने घेतात हेच आश्चर्य आहे. मुळात ते एका दैनिकासाठी 'परीक्षणे ' लिहितात आणि त्याची कॉपी इथे टाकतात. ते एक पगारी ' परीक्षक ' आहेत. अशा परीक्षणावर अनेक ' फोर्सेस' काम करीत असतात. ही त्यांची वैय्यक्तिक मते आहेत. तुम्हाला आवडावी तच असे नाही. दिलपे मत लो यार....

मी धडक पाहिलेला आही, सैराट पाहिला आहे. सैराट मला ओके वाटला. पण तो रटाळ आहे ? Uhoh मला तर कुठेच रटाळ नाही वाटला.
करण जोहर ला उगिच खूप सगलं ग्लॅमरस करायची सवय आहे. त्यामुळे सैराट चा रिमेक त्याने श्रीमन्ती, गाड्या घोडे दाखवून केला असेल तर बोरच Sad
आणि शेवट बदललाय म्हणजे नक्की काय केलंय? Uhoh सांगून टाका.. काहि नुकसान होणार नाही.
जिवंत ठेवलंय की काय दोघांना? Uhoh Proud

आता सगळं जग तुझी विपु बघेल त्याचं काय? Happy

स्पोयलर अलर्टः
दक्षिणाची विपु बघू नका.नायतर धडक ची शप्पत आहे.

उमम्म बदललेला शेवट चांगला वाटतोय मूळ चित्रपटांपेक्षा. आर्चिच्या व्यक्तीरेखेला जास्त सूट होतोय Lol

सैराट चांगला पण व्यावसायिक चित्रपटच होता. मला मध्यंतरनंतरचा भाग जास्त आवडला होता. त्याआधीची सगळी फॅन्टॅसीच...

सैराट रटाळ म्हणता येणार नाही, जास्त लांबीचा म्हणू हवं तर !
लांबी जास्त असून देखिल परिणामकारक होता ! आर्ची परश्याची आणि त्यांची सामाजिक पाश्वभुमी उभा करण्याकरता मंजुळे यांनी सिनेमाच्या पुर्वार्धातील तब्बल दोन तास खाल्ले होते. याकाळात पुर्ण तीन तासांचा सिनेमा बनवणं हा फार मोठा जुगार मंजुळे यांनी खेळला होता, पण सैराट लोकांच्या पसंतीस उतरुन मोठा जॅकपॉट लागला !
सैराट म्हंजे खरं तर उत्तरार्धात एक सुंदर लघुकथा होता, ज्याची फार थोड्या लोकांनी दखल घेतली.
उत्तरार्ध क्लासिकच होता !

मी सैराट दोनदा पाहिला आहे पण फक्त फर्स्ट हाफच बघवतो. ते पळून गेल्यानंतरचा बोअरच होतो. धडक तर माफच. बघायचा प्रश्नच येत नाही.

सैराट च्या पूर्वार्ध आणि ऊत्तरार्धाबद्दल मंजुळे अनुपमा चोप्राशी बोलतांना म्हणाला,
ऊत्तरार्धात रिअ‍ॅलिझमची कडू गोळी प्रेक्षकांना खाऊ घालण्यासाठी पुर्वार्धात फँटसीचा गोड चहा पाजणे जरूरी होते. फँड्री सारखी कडू गोळी खायला प्रेक्षक थिएटरमध्ये येत नाही आणि केवळ फँटसी/ग्लॅमरस असणारा 'कभी खुषी कभी गम' (त्याने सिनेमाचे नाव नाही घेतले) सारखा सिनेमा प्रेक्षकांना कन्फ्यूज करून सोडतो.

बरोबर आहे. सैराट च्या पहिल्या हाफ मधे आर्ची- परश्या दोघेही आपल्या छोट्या जगात त्या कॅनव्हास च्या मानाने उठून दिसतात, सुंदर वाटतात. त्या शेते, पाट, विहिरी, पक्षी वगैरे च्या बॅकड्रॉप वर त्यांची अगदी ड्रीमी लव स्टोरी वाटते. आणि मग हैद्राबाद ला आल्या आल्या शहरातली गोंगाट , गर्दी , धूर च्या पार्श्वभूमीवर तेच दोघे एकदम अतिसामान्य खेडवळ वाटायला लागतात. प्रेक्षकाला पण अचानक जमिनीवर आदळल्यासारखे वाटते. ही दिग्दर्शकाची कमाल आहे.

नाही मै, फक्त हेच कारण अजिबात नाही, निदान माझ्यासाठी तरी. पूर्वार्धात थोडा टाईमपास आहे हलकाफुलका. उत्तरार्धात त्यांचा स्ट्रगल दाखवला आहे तो बोअर झाला. पहिल्या वेळी पाहिला तेव्हा ओके वाटला पण आता नाही बघवत. तसंही पूर्ण स्टोरी कळली की पहिल्याएवढी उत्सुकता राहात नाहीच.

आमीर खानचा दिल चित्रपट आठवतोय का कोणाला?
तो असाच होता.
पहिला हाफ मनोरंजक आणि सेकंडवाला रडका आणि बोअर..

याऊलट डीडीएलजेसारख्या चित्रपटाने विक्रम करायचे महत्वाचे कारण हेच की दोन्ही भाग मनोरंजक होते. पहिल्या भागात प्रेमातल्या टवाळक्या, आणि नंतर कौटुंबिक मजाकमस्ती..

मै +१ ! सैराटच्या यशात त्याच्या गाण्याचाही वाटा आहे, धडक तिथे पण कमी पडलाय

बाहुबली राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही हेच म्हणायचेय.

सर्वोत्कृष्ट चित्रपट बाहुबली - राष्ट्रीय पुरस्कारांवर एक प्रश्नचिन्ह !
https://www.maayboli.com/node/58199

@ धडकची गाणी,
ती सैराटचीच तर आहेत ना..
आपले ऐकून कान किटले म्हणून आपल्याला नावीन्य वाटत नाहीये ईतकेच.
एक टायटल गाणे वेगळे आहे ते सुद्धा चांगले आहे. मी ऐकत असतो बरेचदा

Pages