वार्‍याची डरकाळी

Submitted by स्वीटर टॉकर on 13 July, 2018 - 07:18

मधे योग दिवस झाला तेव्हां मी कॉलेजमध्ये असतानाची एक मजेदार आठवण पुन्हा हजेरी लावून गेली.

आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता.

आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं.

जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं! तेव्हां आम्हाला माहीत नव्हतं पण नंतर कळलं की त्यांना सिंहासन शिकवत होते. (याची सिंहमुद्रेशी गफलत करू नये. सिंहमुद्रेत आवाज अगदी नगण्यच येतो. सिंहासनात आsss र्ह ! अशी सिंहगर्जना करायची असते!) आमच्या वर्गात हास्याचे फवारे उडले!

थोड्या वेळानी योगसनं आटपून परतलेली मुलं वर्गात शिरल्याबरोबर सरांनी विचारलं, "काय केलंत रे?"

"जाड्या सांग रे!" बाकीच्यांनी जाड्याला पुढे केलं. (तेव्हां शाळा कॉलेजच्या मुलांत अंगानी जाड किंवा चष्मा लावणारा मुलगा क्वचितच दिसायचा. त्यांची खरी नावं कोणीच वापरायचे नाहीत. त्यांची रूढ नावं म्हणजे 'जाड्या'आणि 'बॅटरी'. आश्चर्य म्हणजे त्यांनाही या नावांत काही अनुचित वाटायचं नाही!)

आयुष्यात पहिल्यांदाच आसनं केलेल्यांना आसनांची नावं लक्षात राहणं अवघडच! त्यामुळे सगळ्यात जे शेवटी केलं होतं त्याच आसनाचं नाव त्याला आठवत होतं. ते त्यानी सांगितलं.

"आम्ही पवनमुक्तासन केलं!!" हास्यस्फोट झाला! हसून हसून सबंद वर्ग गडाबडा लोळायला लागला!

आलेल्या मुलांना कळेच ना आम्ही का हसतोय ते! दुसरा एक मुलगा म्हणाला, "तरी ते म्हणंत होते की ज्यांनी नुकताच डबा खाल्ला आहे त्यांनी हे आसन करू नका म्हणून."

झालं!! हसण्याचा दुसरा अटॅक पहिल्यापेक्षा जोरात! श्वास देखील घेता येई ना!

कॉलेजच्या मैत्रिणी आजही जेव्हां भेटतो तेव्हां आठवून खळखळून हसू येतं!

Group content visibility: 
Use group defaults

सर्वजण,
धन्यवाद !
@भन्नाट भास्कर - बरोबर आहे. हल्ली लिखाण जवळजवळ बंदच झालं आहे. सुरू करायचं ठरवलं आहे.

@निलुदा - स्वीट टॉकरला कॉलेजमधून निवृत्त व्हायला दोन वर्षे आहेत. त्यामुळे त्याच्या अंगावर निरनिराळ्या जबाबदार्या टाकून त्याला पिळून काढलं जात आहे (असं माझं मत हो! त्याला पटत नाही.) त्यामुळे सन २०२० साली नोव्हेंबरपासून नक्की लिहीन असा त्याचा निरोप आहे !

आभार

तुमच्या आणि त्यान्च्या पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत

___________________/\________________________