आधुनिक वाहतुकीतील नव्या व्याख्या !

Submitted by साद on 13 July, 2018 - 09:01

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील बहुतेक शहरांत वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. बेशिस्त वाहनचालकांनी ‘वाहतूक कशी नसावी’ याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यातून मला वाहतुकीसंबंधी काही शब्दांचा अर्थ नव्याने उमगला आहे. अशा शब्दांच्या व्याख्या तुमच्यासमोर ठेवतो. आपणही त्यात भर घालावी अशी विनंती !

१. सिग्नलचा चौक: वाहनचालकांनी वाहतुकीचे प्राथमिक नियम चढाओढीत मोडण्याचे ठिकाण.

२. पदपथ : मुळात पादचाऱ्यांसाठी असलेली परंतु, विक्रेत्यांनी कायमस्वरूपी बळकावलेली बिनभाड्याची जागा.

३. झेब्रा क्रॉसिंग (प्राचीन शब्द) : कोणतीही उपयुक्तता न राहिलेले, पण रंगार्यांना वारंवार काम उपलब्ध करून देणारे पांढरे पट्टे.

४. रस्तादुभाजक : मोठ्या रस्त्याच्या मधोमध बांधलेला अडथळा, ज्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस ‘दुहेरी वाहतूक’ करण्यास प्रवृत्त केले जाते.

५. पादचारी : रस्त्याच्या कोणत्याही बाजूने चालण्याचा व रस्ता कुठेही ओलांडण्याचा जन्मसिद्ध हक्क असलेली व्यक्ती.
६. मोटारसायकलस्वार: सिग्नलला उजवीकडे वळायचे असूनही पूर्ण डावीकडे थांबून मग मस्तपैकी ‘कट’ मारणारी व्यक्ती.
७. वाहतूक पोलीस: चालकाने नियम मोडल्याबद्दल अधिकृत दंड घेण्याऐवजी गुन्हा ‘सामोपचाराने’ मिटवण्यात तरबेज असलेली व्यक्ती.

८. रिक्षाचालक : भाडे स्वीकारण्याऐवजी भाडे नाकारण्यात वाकबगार असलेला चालक

९. रिक्षा थांबा : रस्त्याच्या हमखास वळणावरच असलेली जागा, ज्यामुळे इतर चालकांना वळताना दृष्टीस अडथळा होतो.

१०. बस थांबा: उनपावसापासून संरक्षण नसणारी, शक्यतो बसायला जागा नसणारी जाहिराती रंगवायची जागा.

११. प्रादेशिक परिवहन कार्यालय : आपल्या ‘आदर्श’ कारभाराने इतरांना शासकीय कामाचा वस्तुपाठ घालून देणारी संस्था.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉर्न : गाडीतील अशी सुविधा जी दर ५०-१०० मीटरवर न वापरल्यास बंद पडते! इतर गाड्यांचे हॉर्न इतरांना आपल्या गाडीपासून लांब होण्यास सांगतात तर रिक्षावाले आपला हॉर्न वापरून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना आपल्या रिक्षाकडे बोलावतात!!!
(चला एका तरी धाग्यावर पहिला प्रतिसाद माझा आला!!!)

२. पदपथ : मुळात पादचाऱ्यांसाठी असलेली परंतु, विक्रेत्यांनी कायमस्वरूपी बळकावलेली बिनभाड्याची जागा. >>
त्यांना विचारुन पहा एकदा, ते देतात भाडं त्याला वेगळं नाव आहे बहुतेक..
६. मोटारसायकलस्वार: सिग्नलला उजवीकडे वळायचे असूनही पूर्ण डावीकडे थांबून मग मस्तपैकी ‘कट’ मारणारी व्यक्ती.>>
हिच व्याख्या पिवळ्या पाटीवाले आणी रिक्शा वाले ह्यांना पण लागु होते

स्पीडब्रेकर : इतर ठिकाणचे रस्त्याचे काम झाल्यावर उरलेला माल वापरून केलेली कलाकृती!

Rear Windshield (मागील काच) : आपल्या कुटुंबातील सर्वांच्या नावाची यादी लिहिण्यासाठी वाहन उत्पादक कंपनीने केलेली सोय!

तुमच्या मोटारसायकलस्वारच्या व्याख्येत आमच्या हैदराबादचे, रिक्षा, कार, बस व ट्रक ड्रायव्हरही सन्मानाने सामावतात.

बस थांबा: भर वाहतुकीत रस्त्याच्या मधोमध जिथे बस थांबते आणि बसच्या डाव्याबाजुनेही दुचाकी स्वार कूच करत असताना, उतरलेल्या प्रवाशाला समोर दिसणारा एक विस्कळीत शेड.