तू....तूच ती!! S२ भाग १

Submitted by किल्ली on 10 July, 2018 - 04:15

तू....तूच ती!! ही कथा पुढे न्यावी असं वाटलं. त्याचे पुढचे भाग टाकत आहे.
आधीची कथा अवश्य वाचा.
पूर्वरंग: https://www.maayboli.com/node/65412
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने ह्याच कारणामुळे कामावर जाण्यासाठी ही वेळ निवडली होती. नाहीतर हिंजवडीचं ट्रॅफिक म्हणजे महाभयानकच! सकाळी लवकर निघून संध्याकाळी इतर लोकांची ऑफिस सुटण्याची वेळ होण्याच्या आत घरी परतणे हे त्याचं उद्दिष्ट असायचं. असंही वेळेबद्दल त्याला कोण टोकणार होतं म्हणा. पण कंपनीचा मालक ह्या नात्याने शिस्त पाळणं गरजेचं होतं आणि असंही बेशिस्तपणा त्याच्या स्वभावात आणि तत्त्वात नव्हताच.
आज काय काम आटपायची आहेत ह्याची मनात उजळणी करून झाल्यानंतर त्याने आवडती गाणी लावली. 'हाल ए दिल' हे गाणं चालू होताच त्याला तिची तिची आठवण आली. तसंही आठवण यायला तो तिला विसरलाच कुठे होता! पण ह्या गाण्याच्या सुरावटीबरोबर तिला प्रकर्षाने भेटावेसे वाटू लागले. आज का कोण जाणे पण त्याचे मन बैचैन होते. कसलीतरी अनामिक हुरहूर दाटून आली होती. सर्वार्थाने "eligible bachelor" असलेल्या आदित्यने एका मुलीवर मनापासून प्रेम केले होते. ती तेव्हा त्याला भेटली नाही आणि त्याने नंतर दुसऱ्या मुलीचा विचारही केला नाही. स्वतःला कामामध्ये झोकून दिले, यशाची शिखरे गाठली. पण ह्या प्रवासात जिची साथ त्याला हवी होती ती मात्र त्याच्या प्रेमाला काहीही उत्तर न देता अचानकपणे त्याच्या आयुष्यातून आणि संपर्कातून निघून गेली होती. ती कोठे आहे, काय करतीये कोणालाच काहीही माहित नव्हते. आदित्यने तिला शोधलेही, पण ती सापडली नाही. जणू एका वावटळीसारखी आयुष्यात आली आणि तशीच गायब झाली. एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि अचानक जाग यावी तसं आदित्यच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्याचं मन अजूनही ग्वाही देत होतं की, ती परत येईल.
विचाराच्या तंद्रीतच तो ऑफिसला पोचला. आज शुक्रवार असल्यामुळे बरीचशी कामं संपवायची होती. ह्या वेळेत असंही डिस्टर्ब करायला कोणी नसल्यामुळे तो पटापट काम उरकत असे. पण आज त्याचा मूड वेगळाच होता. सैरभैर मनाने कामं उरकता येत नाहीत हेच खरे! थोडा वेळ काम करून नाश्ता करण्यासाठी तो कॅफेटेरिया कडे वळला, तिकडे काही खाण्याची इच्छाच झाली नाही त्याची! तसाच तो ऑफिसच्या ईमारतीच्या बाहेर पडला. तिथे भैयाकडे मिळणाऱ्या पोह्यांच्या खमंग वासाने त्याला तिकडे खेचले आणि तोही मस्त गरमागरम खमंग कांदेपोहे चापु लागला. तिला फार आवडत असत इथले पोहे. त्याला पुन्हा तीच आठवली. आज त्याचं मन तिच्याकडेच धाव घेत होतं. कसाबसा नाश्ता संपवून तो केबिन मध्ये परत आला.
केबिनचा दरवाज्यावर टकटक करून सौम्या आत शिरली. ऑफिसमध्ये जुन्या टीम मधली हीच एक मुलगी राहिली होती. बाकीची मंडळी कुठे ना कुठे तरी पांगली होती. काही जणांना परफॉर्मन्स कमी असल्यामुळे काढलं होतं, काही जण स्वतः कंपनी सोडून गेले होते, काही लोक कंपनीच्या दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर झाले होते. "सौम्याला नक्कीच माहित असणार "ती" कुठेय ते, विचारावं का? पण "ती" गेल्यापासून कंपनीत कोणाबरोबरही कामाव्यतिरिक्त आपण काही बोलत नाही. आज अचानक अशी चौकशी केली तर विचित्र वाटेल. हल्ली मला सगळेच बिचकून असतात. आधीचा खेळकर आणि गप्पिष्ट आदित्य जणू कुठेतरी हरवलाय! ही सौम्या पण आधी किती गप्पा मारायची, आता दबकत दबकत आत शिरतेय. ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं असायचं. पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं आता! खरंच इतका पकाऊ झालोय का मी? लोकांना कंपनीत काम करणं बोअरिंग तर वाटत नसेल ना?" आदित्यचे विचारचक्र फिरत होते.
"आदित्य, मी कोड चेक इन केलंय. जरा review करतोस का?"
सौम्याच्या ह्या प्रश्नासरशी आदित्यचं विचारचक्र थांबलं.
आदित्य: "हो करतो, आज कोणी सिनिअर्स आले नाहीत का? कोड review करण्यासाठी?"
सौम्या: "अरे, तूच म्हणालास ना, ह्या module मध्ये interest आहे मी करतो, म्हणून सांगायला आहे मी, तूला वेळ नसेल तर असू देत. "
आदित्य: "ओह सॉरी, करतो, मेल पाठवलास का तसा?"
सौम्या: "हो, बघून घे, त्यात सगळे डिटेल्स आहेत."
"हे काय होतंय आज मला, सरळ घरी जातो आणि उरलेलं काम तिकडेच करतो." असं ठरवून आदित्यने लॅपटॉप बॅगेत टाकला. इतर लोकांना आवश्यक त्या सूचना देऊन तो घरी निघाला.
त्याने कुठलही गाणं न लावता गाडी रस्त्यावर पळवायला सुरुवात केली. घरी पोचून आराम करावा आणि मग काम, असं काहीसं डोक्यात चालू होतं. दुपारची वेळ असल्यामुळे रहदारी फारशी नव्हती. हायवेवर पोचल्यानंतर तर गाडीने चांगलाच वेग पकडला होता. इतक्यात एका वळणावर एक स्पोर्ट्स बाईक वाला भरधाव वेगाने पुढे गेला. आदित्यलाही चेव चढला. त्याने कारचा वेग अजून वाढवला. बाईकस्वाराने हेल्मेट घातल्यामुळे तो कोण हे दिसू शकत नव्हतं. शिवाय स्पोर्ट्स जॅकेट,शूज असा पेहराव होताच. ह्या अघोषित आणि अनियंत्रित स्पर्धेत पुढच्या एका वळणावर बाईकस्वार आणि आदित्य एकमेकांवर आदळणार असं वाटत असतानाच .............
कर्णकर्कश आवाज झाला ............
(क्रमशः )
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
शेवट अशा ठिकाणी केलाय की आता पुढच्या भागाची वाट पहाणे आले. लवकर टाका.