ड्रायव्हिंग: एक अनुभव

Submitted by क्षास on 19 June, 2018 - 23:43

भारतातल्या रस्त्यांवर गाडी चालवणे हे जर काही वर्षांनी साहसी कृत्यांमध्ये समाविष्ट झालं तर मला तरी आश्च़र्य वाटणार नाही. स्मार्ट झालेल्या शहरांमध्ये गाड्या चालवणारी माणसं स्मार्ट व्हायला अजून अवकाश आहे हे ध्यानात ठेवलं तर सगळं प्रकरण सोपं वाटेल असं काहीसं मत होतं माझं. गाडी चालवायला शिकायचंच असं ठरवून मी नजिकच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल झाले. वीस दिवसात मी चारचाकी गाडी चालवू शकेन या विचाराने मी अगदी उत्साहात होते. पहिल्या दिवशी मी ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी पोहोचले. ड्रायव्हिंग स्कूलचं नाव शक्यतितक्या जागांवर छापलेली स्विफ्ट गाडी तिथे उभी होती. मी अगदी आत्मविश्वासाने ड्रायव्हरच्या सीटवर बसले. ट्रेनरने क्लच, ऍक्सलरेटर,गिअर्स इत्यादींची माहिती भोजपुरीमिश्रित हिंदीमध्ये दयायला सुरुवात केली.पहिले दोन-तीन दिवस क्लच ब्रेक कंट्रोल शिकण्यात गेले. दहाच्या स्पीडने गाडी चालवायला सुरवात केली. माझ्या हातात फक्त स्टिअरिंग असायचं. बाजूला बसलेला ट्रेनरच बाकी सगळं कंट्रोल करायचा. अधेमधे स्टिअरिंगही तोच फिरवायचा. आधी गल्लीतल्या गल्लीत गाडी या टोकापासून त्या टोकापर्यंत न्यायची मग पुन्हा मागे आणायची एवढ्यातच ठरलेला अर्धा तास संपे. मग हळूहळू रहदारीच्या रस्त्यावर गाडी नेण्याइतपत माझी प्रगती झाली. जागा मिळेल तिथे पार्क केलेल्या गाड्या आणि फुटपाथ सोडून इतरत्र कुठेही चालणारी माणसं यांमुळे उरलासुरल्या रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे मोठं युद्धच वाटायचं. तीन चार दिवसांनंतर माझा बऱ्यापैकी हात बसला आणि मी वीस तीस च्या स्पीड ने चालवू लागले. फर्स्ट गियर वरून सेकंड गियरवर शिफ्ट झाले. स्टिअरिंग फिरवणं सोपं वाटू लागलं.
सातव्या-आठव्या दिवसानंतर माझ्या आत्मविश्वासाचा टायर कोण जाणे कसा पंक्चर झाला. मी हाफ क्लच, फुल क्लच या संज्ञांची पर्वा न करता ब्रेक (चुकून) मारू लागले. गिअर बदलायला विसरू लागले डावीकडे, उजवीकडे वळताना इंडिकेशन देणं यासारखी साधी गोष्ट पण माझ्या हातून निसटू लागली. एका चुकीतून दुसरी मग तिसरी, असं निगेटिव्हिटीचं वलय पसरू लागलं. माझा गाडी शिकण्याचा उत्साह कधीच ओसरायला लागला. मागून पुढे जाणाऱ्या गाड्यांचे कर्कश्श हॉर्न आता वैतागदायी वाटू लागला. उजव्या बाजूच्या उतावीळ वाहनाला पुढे जायला वाट द्यावी तर माझी गाडी डावीकडच्या कुठल्यातरी वाहनाला खेटता खेटता वाचायची. डावीकडच्याला जागा दयायचं म्हटलं तर उजव्या बाजूलाही तेच. अथक प्रयत्नांनंतर ओव्हरटेक करून पुढे जाणारे गाडीवाले माझ्याकडे असा काही दृष्टीक्षेप टाकून जायचे की हळू गाडी चालवणं हा देशद्रोह आहे की काय असं वाटू लागलं. त्यात भर दुचाकीवाल्यांची! अरुंद जागेतून वाट काढणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे ते नागमोडी वळणं घेत पुढे जातात. त्याशिवाय कोणालाही कुठूनही घुसण्याची, वळण्याची, थांबण्याची, पार्किंगची मुभा आहे हे मला थोडं उशिरा कळलं. थोडक्यात मला गाडी शिकण्यात अनेक अडथळे जाणवत होते.त्यात बाजूला बसलेला ट्रेनर काही मोजक्या बेसिक गोष्टी शिकवून पुढे सगळं इंजिनिअरिंगच्या सिलॅबससारखं सेल्फस्टडीला देऊन मोकळा झाला. माझ्या फक्त सात-आठ दिवसांच्या ट्रेनिंग नंतर मी न चुकता सहज गाडी चालवली पाहिजे अशी त्याची निरर्थक अपेक्षा होती. त्यामुळे पावलापावलावर मला त्याची भोजपुरीमिश्रित हिंदीमधली बोलणी ऐकावी लागत होती. 'काहे नही दिया राईट का इंडिकेटर? काहे नही घटाया गिअर? काहे नही दबाया ब्रेक? हे ऐकून मला ब्रेक दाबायच्या ऐवजी त्याचा गळाच दाबावासा वाटायचा तरीही मी ब्रेकच दाबायचे कारण ब्रेक नाही दाबला तर गाडी समोरचा माणूस वर जायची शक्यता होती.
मला त्या गजबजलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवण्याचा वीट आला होता. मला हे जमणार नाही असं वाटू लागलं. दहा बारा दिवसांनंतर माझा नूर अजूनच मावळला. तरीही मी ड्रायव्हिंग शिकणं चालूच ठेवलं. बरीच माहिती मिळवली. युट्युबवर अनेक व्हिडीओ पाहिले. घरच्यांनीही माझ्या आत्मविश्वासाची गाडी वेळोवेळी पुष केली. हळूहळू मला त्या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात राहू लागल्या आणि मी बर्‍यापैकी अचूक गाडी चालवू लागले.
या तीस दिवसांमध्ये मला अनेक अकथित नियमांची ओळख झाली. जर तुम्ही भारतात कुठेही गाडी चालवत असाल तर हे नियम तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खड्डे हा रस्त्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असे फाल्तू प्रश्न विचारू नयेत. दुसरं म्हणजे जिथे स्पीड ब्रेकर्स आहेत तिथे त्यांची गरज असेलच असं नाही आणि जिथे गरज आहे तिथे स्पीडब्रेकर्स असतीलच असंही नाही. तसंच प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलच्या खांबाला वीज पुरवठा होत असेलच असा विश्वास बाळगू नये. जर एखाद्या सिग्नलच्या खांबाला अखंडित वीजपुरवठा होत असला तरीही वाहतुकीचे नियम पाळणे हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. अतिघाईच्या वेळी सगळे नियम तंतोतंत पाळणे हे बंधनकारक नाही. तसेच जमलं तर दोन्ही बाजूच्या मिररमध्ये आलटून पालटून किंवा वाटेल तेव्हा बघत जावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉर्नचा वापर सढळ हाताने करावा. कुठेही कधीही कसाही हॉर्न वाजवावा कारण ध्वनी प्रदूषण वगैरे शब्द पाचवीच्या पाठ्यपुस्तकातच शोभून दिसतात. हॉर्न वाजवून इच्छित कार्य साधले गेले नाही तर आपल्या 'सुसंस्कृत' भाषेत धडा शिकवावा. रस्त्यात मध्येच गाडी उभी करून दोन मिनिटात बारीकसारीक कामं चटकन उरकून घ्यावीत. शेवटी प्रत्येक चालक हा स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. त्याला स्वतंत्र नियम बनवायचं स्वातंत्र्य आहे. तर मी अशा अनेक गरजेनुसार बनलेल्या किंवा बनवलेल्या नियमांची ओळख झाल्यानंतर गाडी चालवण्यात तरबेज झाले. शेवटी अशक्य असं काहीच नसतं. भारतासारख्या देशात तर काहीच अशक्य नसतं.
चार पाच महिन्यांत मला ड्रायविंग लायसन्स मिळालं. जेव्हा लायसन्स घरी आलं तेव्हा माझ्या घरचे गमतीत म्हणाले ' जरा जपून! परवाना गाडी चालवायचा मिळालाय, रस्त्यावरच्या माणसांच्या जीवाशी खेळण्याचा नाही ! ' मी मान डोलवत स्वतःशीच हसले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहिलय. एकुण तुम्हाला ट्रॅफीकचे नियम कळालेत तर.

मी मात्र वरील अनुभवांना मुकलो. मित्राच्या घरी कार्यक्रम होता कसलासा. त्याच्या वडिलांनी गाडीची (महिंद्रा 4x4) चावी दिली आणि एका मुलीकडे पहात सांगीतलं “हिला सोडून ये रे घरी” आता ईतक्या सुंदर मुलीसमोर ‘मला गाडी चालवता येत नाही’ असं कसं म्हणायचं? मग काय, गाडी काढली. तिला घरी सोडवले (३किमी) आणि परतलो. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेअरिंगवर बसलो होतो. त्यादिवशी कळाले “ड्रायव्हिंग म्हणजे २०% तंत्र आणि ८०% आत्मविश्वास Happy