फ्री...? : भाग १७

Submitted by पायस on 12 June, 2018 - 11:51

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66383

१० डिसेंबर १९११

रविवारचा दिवस असल्याने दरबाराचे काम थांबले होते. जॉर्ज आणि मेरी कडेकोट सुरक्षेत चर्चमध्ये मेणबत्त्या लावत होते आणि ख्रिस ऊन खात बसला होता. पंचम जॉर्ज यांना दिल्लीत येऊन तीन दिवस होत आले होते पण फणींद्रकडून काहीच हालचाल नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे दिल्लीकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. सातासमुद्रापलीकडून गोरा राजा आपल्या शहरात आला आहे याचे त्यांना कोण अप्रूप वाटत होते. जिकडे पाहावे तिकडे दिल्ली दरबाराची चर्चा होती. पण गंमत म्हणजे इतक्या दिवसात या राजाचे नखही सामान्य जनतेच्या दृष्टीस पडले नव्हते. स्वतः ख्रिस आणि जोसेफला एकाही मेजवानीत प्रवेश नव्हता. शेवटी ते काही फार मोठे उच्चपदस्थ अधिकारी नव्हते. पण सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांशी संपर्क ठेवणे यात त्यांची प्रचंड प्रमाणात उर्जा वाया जात होती. केवळ सम्राटांच्या सुरक्षेकरिता एकूण दोन हजार सातशे बहात्तर पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. या सगळ्यानंतरही फणींद्र प्रयत्न करणार होता?
"ओके, पुन्हा एकदा थॉट एक्सपरिमेंट करूयात." ख्रिसने प्रस्ताव मांडला. जोसेफ आणि रश्मीने एकमेकांकडे पाहून खांदे उडवले.
"दिल्ली दरबार ७ ते १६ असे दहा दिवस चालणार आहे. म्हणजे फणींद्रकडे दहा दिवस आहेत, होते. त्यातले पहिले दिवस स्पर्धांना दिलेली भेट वगळता पूर्णवेळ जॉर्ज आणि मेरी विविध मेजवान्यांमध्ये गुंतलेले होते. म्हणजे फणींद्रला त्यांच्या जवळ जाण्याची संधी शून्य होती. त्याशिवाय जॉर्ज पूर्णवेळ लोकांच्या गराड्यात असल्यामुळे नेम चुकण्याची शक्यता सुद्धा जास्त. सो, त्याने हे तीन दिवस जॉर्जवर हल्ला केला नाही यात काहीच आश्चर्य नाही."
"मेक्स सेन्स. आज जॉर्ज फक्त चर्चमध्ये जाणार आहेत. तिथेसुद्धा हल्ला करणे कठीण आहे. ते चर्च गेले आठवडाभर सीलबंद होते. अगदी चर्चमधल्या रहिवाशांची सुद्धा रोज झडती घेतली जात होती."
"आता उरले पाच दिवस. त्यात पुन्हा शेवटचे दोन दिवस स्पर्धा आणि मेजवान्यांमध्येच जाणार आहेत. या सगळ्यांमध्ये क्लिअर संधी रात्री होणारी संचलने आणि प्रत्यक्ष दरबारात आहे असं माझं मत आहे."
"मग १२ तारखेला?"
"इतर दिवस सावधगिरी बाळगणार आहोतच. १२ तारखेला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल."
"ते सगळं मान्य केलं पण मलिका आणि कंपूचे काय?" रश्मीने शंका उपस्थित केली.
"जर ते हुशार असतील तर ते शाही लटांबर दिल्ली सोडेपर्यंत थांबतील. त्यांच्या सोबत एक धिप्पाड सिंह आहे त्यामुळे त्यांना लपून छपून हालचाली करणे अजिबात शक्य नाही. त्याखेरीज किल्ल्यात आत्ता जवळजवळ तीन हजार हत्यारबंद शिपाई आहेत. निव्वळ वेडे साहस करण्यात त्यांना रस असेल तर ते किल्ल्यात येतील."
"ओके. १२ तारीख दुपारी बारा वाजता"

~*~*~*~*~*~

१२ डिसेंबर १९११

ख्रिसने अटकळ बांधल्याप्रमाणेच ११ तारखेला कोणतीही लक्षवेधी हालचाल झाली नाही. हार्डिंग्ज यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यांना दिलेल्या अहवालानुसार हार्डिंग्ज यांनी दिल्लीत फणींद्रचा शोध घेण्याकरिता वेगळे शंभर शिपाई कामाला लावले होते. चार दिवस कसून शोध घेतल्यानंतरही फणींद्र सापडला नाही. बारा तारखेचा दिवस उजाडला. ख्रिसचा थॉट एक्सपरिमेंट जर बरोबर असेल तर आज फणींद्रकडून काहीतरी हालचाल होणे अपेक्षित होते. तसेही आज सम्राटांना सिंहासनावर बसायचे होते. जरी त्यांच्या अवतीभोवती रक्षकांचे कडे असणार होते तरी त्यांना घेराव घालून रक्षक उभे राहणार नव्हते. त्यामुळे स्नायपर रायफलचा वापर करणार्‍याला लक्ष्यभेद करणे जड जाऊ नये. खबरदारी म्हणून सम्राटांच्या सिंहासनाला केंद्रबिंदू कल्पून काढलेल्या तीन हजार यार्ड त्रिज्येच्या वर्तुळात एकही उंचवटा, चबुतरा किंवा ज्याला इंग्रज व्हँटेज पॉईंट म्हणतात, तशी कोणतीही जागा नव्हती. मग फणींद्र होता तरी कुठे?

ठीक बारा वाजता सम्राट पंचम जॉर्ज आणि सम्राज्ञी मेरी राज्यारोहण सोहळ्यासाठी उभारलेल्या चौथर्‍यावर उपस्थित होते. तिथे ठेवलेल्या सिंहासनांवर ते स्थानापन्न झाले आणि त्यांच्या अनुमतिने दरबारास सुरुवात झाली. रॉयल कोरोनेशन समारंभातल्या सर्व औपचारिक बाबी पुन्हा पार पाडल्या जात होत्या. त्यांच्या प्रवेशासोबत साम क्रमांक १२२ गायले जात होते. पंचम जॉर्ज यांनी परंपरेनुसार किरमिजी रंगाची वस्त्रे परिधान केली होती. तर मेरी यांनी सुद्धा परंपरेनुसार जांभळ्या रंगाचा झगा परिधान केला होता आणि त्याला वेल्व्हेटी टेक्श्चर होते. बॉम्बेचे आर्चबिशप हर्मन योर्गेन्स हे समारंभाच्या अध्यक्षपदी होते. प्रथम त्यांनी जॉर्ज आणि मेरी यांना राजपदाची शपथ दिली. ती घेतल्यानंतर "कम होली घोस्ट" या सामाचे गायन करून परमेश्वराचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सम्राटांच्या अंगावरचा किरमीजी कोट उतरवला गेला. त्याच्या आत जॉर्ज यांनी धवल रंगाचा मलमली कुडता घातला होता. ते व मेरी सिंहासनावर आसनस्थ झाले. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या डोक्यावर सोनेरी रंगाच्या वस्त्राचे छत होते. मग सम्राटांच्या हातात राजदंड, शक्तीचे प्रतीक असलेली रत्नजडीत तलवार देण्यात आली. पांढर्‍या रंगाची मलमली झूल त्यांच्या खांद्यावर पांघरली गेली. आर्चबिशपनी मग तो खास असा राजमुकुट जॉर्ज यांच्या मस्तकावर ठेवला आणि जॉर्ज हे हिंदुस्थानाचे सम्राट असल्याची ग्वाही दिली गेली.

या कंटाळवाण्या प्रकाराकडे बघून ख्रिस जांभया देत होता. त्याची जोसेफशी नजरानजर झाली. त्याच्या चेहर्‍यावर "हे दळण अजून किती वेळ चालणार आहे" हा लक्षावधी पौंडांचा प्रश्न होता. पण फणींद्रचा कुठेही पत्ता नव्हता. राजमुकुटाचा शपथविधी झाल्यानंतर विविध सरदार, संस्थानिक, राजे-रजवाडे यांनी नजराणे सादर करायला सुरुवात केली. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांनी प्रथम नजराणा सादर केला. सम्राटांनी नजराण्याला राजदंडाने स्पर्श करून आपली स्वीकृती दिली. हार्डिंग्ज यांनी झुकून अभिवादन केले आणि आपली पाठ न दाखवता ते आपल्या जागी जाऊन उभे राहिले. ब्रिटिश पदाधिकार्‍यांनी आपले नजराणे सादर केल्यानंतर संस्थानिकांनी आपले नजराणे सादर करायला सुरुवात केली. इथे त्या संपूर्ण दिवसातली एकमेव रंजक घटना घडली.

एकवीस तोफांच्या सलामीचा मान असलेले बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी आपला नजराणा सादर केला. त्यानंतर त्यांनी सम्राटांकडे पाठ फिरवली आणि ते आपल्या जागी जाऊन स्थानापन्न झाले. काही क्षण सर्व स्तब्ध होते. ख्रिसच्या मनाला क्षणभर शंका चाटून गेली. यामागे सर्वांना गोंधळात पाडून फणींद्रला संधी द्यायचा हेतु तर नाही. पण थोड्याच वेळात हैदराबादचा निजाम आपला नजराणा सादर करायला पुढे आला सर्व पूर्ववत झाले. एकापाठोपाठ एक सर्वांनी सम्राटांप्रती आपला आदर व्यक्त केला. त्यानंतर काही अधिकृत घोषणा करण्यात आल्या ज्यात बंगालची फाळणी रद्द करण्याच्या निर्णयाचा अंतर्भाव होता. अशा रीतिने दरबाराचा दिवस संपला.

ख्रिस आणि जोसेफ पुरते गोंधळले होते. फणींद्रने आजही हल्ला केला नाही म्हणजे त्याने आपली सर्वोत्तम संधी गमावली. याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? त्याने ऐन क्षणी कच खाल्ली? का एवढा कडेकोट बंदोबस्त पाहून त्याने माघार घेतली? इतर काही अपघात घडून फणींद्रच मारला गेला? ख्रिसने डोके हलवले. अपघाताची शक्यता बाजूला ठेवली तर फणींद्र डरपोक नक्कीच नाही. याचा अर्थ त्याच्यामते आज सर्वोत्तम संधी नव्हती. तो नंतर कधीतरी हल्ला करणार आहे. पण नक्की केव्हा?

~*~*~*~*~*~

संध्याकाळची टॅटू परेड आणि रात्रीची मेजवानीही बिनघोर पार पडली. पंचम जॉर्ज यांचे दिल्लीत आगमन होऊन आता सहा दिवस होऊन गेला होते, जवळपास आठवडाच म्हणा ना. पहिल्याच दिवशी ख्रिसला फणींद्र जणू ललकारून गेला होता, शक्य असेल तर थांबव मला. पण त्यानंतर त्याचे नखही कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते.
"काही नाही तो मला टॉर्चर करत आहे." ख्रिसचा वैताग आता बोलका झाला होता.
"ते दिसतंच आहे." रश्मी चहा ओतताना म्हणाली.
"घ्या. चहा सिलोनचा आहे. त्यात कॅमोमाईलची पाने आहेत. टी सेट वेजवुडचा आहे."
"यू नो तू दिवसेंदिवस अ‍ॅलेक्सीसारखी होत चालली आहेस. तुम्ही सगळेच वॅलेट परफेक्शनिस्ट असता का?"
"मी वॅलेट आहे तर?"
"वेल ..."
"असू दे. मूळ मुद्द्यावर परत येऊ. जर फणींद्रच्या डोक्यात काय शिजतंय हे थोडं बाजूला ठेवूयात. कधी कधी विषय बदलला तरी मेंदूला पुरेशी विश्रांती मिळते आणि तो ताजातवाना होतो. त्यानंतर मग पुन्हा जोमाने विचार करता येतो आणि आधी सुटलेले काही मुद्दे दुसर्‍या वेळेस सापडतात, लक्षात येतात."
"मेक्स सेन्स. मग दुसरा विषय कोणता? तुला सर्कसचा विषय काढायचा आहे का?"
"असंच काही नाही. पण चालेल म्हणजे." रश्मी स्वतःसाठी चहा ओतताना म्हणाली.
स्त्रीजातीने आडूनच बोललं पाहिजे का, ख्रिसच्या मनात विचार चमकून गेला.
"त्यांची मला चिंता नाही. ते किल्ल्यात घुसले की पकडले जातीलच."
"पण त्यांच्या रहस्याचे काय?"
"ओह ते काही विशेष नाही."
"म्हणजे ते काय आहे ते तुम्हाला कळलंय? त्या स्वप्नांमध्ये काही क्लू होता तर."
ख्रिसचा चेहरा एकाएकी पडला. तो काही क्षण गप्प राहिला.
"एका अर्थी हो. त्या स्वप्नांमध्ये मी विसरू पाहत असलेल्या काही आठवणी होत्या. तसेच एक बारीकसा धागा होता. तो धागा आधी माझ्याही नजरेतून सुटला होता. पण नंतर मला त्याचा अर्थ लागला."
"पण नक्की कसला धागा?"
"सगळं तर मी तुला सांगत नाही बसणार कारण ते पकडले जाईपर्यंत माझे तर्क तर्कच राहतील. ते पकडले गेले की मी नक्की तुला सांगेन."
"मग एक वेगळा प्रश्न विचारू?"
"विचार."
"त्या स्वप्नांना तुम्ही विसरू का पाहत होतात? त्या स्वप्नांमध्ये असं काय आहे जे तुम्हाला नकोसं झालं होतं?"

*******

ही घटना घडली तेव्हा मी एकोणीस किंवा वीस वर्षांचा असेन. माझं आणि माझ्या वडलांचं कधीच पटलं नाही. मलाही कधी त्यांच्याविषयी फारसं ममत्व वाटलं नाही. त्या घरात सगळे माझं यंग मास्टर या नात्याने ऐकत असले तरी त्यामागे मला कोणतीही सकारात्मक भावना जाणवली नाही. चार्ल्स काल्डवेल नंतर आपल्या बोडख्यावर नाचणारा काल्डवेल हा असणार आहे, सो बेटर बी इन हिज गुड बुक्स. माझ्यासाठी त्या घरात दोनच अशा जागा होत्या जिथे मला हलकं वाटत असे. नकारात्मकतेचा लवलेशही तिथे जाणवत नसे. एक म्हणजे माझ्या वडलांनी जमा केलेल्या पुस्तकांची खोली. सुदैवाने त्यांनी माझ्या वाचनावर कधी बंदी घातली नाही. हां त्यांना माझं वाचनात तासन् तास रमून जाणं आवडत नसे पण त्यांना फारसा फरकही पडत नसे. दुसरी जागा म्हणजे अ‍ॅलेक्सीची खोली. अ‍ॅलेक्सी आमच्या घराण्याच्या बटलरचा मुलगा होता. त्याचं आणि त्याच्या वडिलांचेही फारसे सख्य नव्हते पण त्याला वेगळे कारण होते. अ‍ॅलेक्सीला शहरात जाण्यात रस होता. दुर्दैवाने चार्ल्स काल्डवेल शहरात जाण्याची सुतराम शक्यता नव्हती. आणि अ‍ॅलेक्सीच्या वडलांचा अ‍ॅलेक्सीने बटलरव्यतिरिक्त कोणतीही नोकरी करण्यास सक्त विरोध होता. कदाचित सुरुवातीला अ‍ॅलेक्सीसुद्धा माझ्याकडे हा अंतस्थ हेतु घेऊन आला असेल पण लवकरच आम्ही दोघे खरेखुरे मित्र बनलो.

माझे वडील, चार्ल्स काल्डवेल रागीट स्वभावाचे होते. कदाचित युद्धभूमिवर राहून त्यांना एक प्रकारचे साचेबद्ध जीवन जगायची सवय लागली होती. त्यात त्यांना कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ चालत नसे. ओन्ली फूल्स शन ऑर्गनाईझेशन! तसे बघायला गेले तर अनिश्चितता कोणालाच आवडत नाही. आणि अशी अनिश्चितता, छोटे छोटे बदल हेरण्यात मानवी मन प्रचंड प्रभावीदेखील असते. उदाहरणार्थ जर कोणाचा जन्म अपेक्षित तारखेच्या आधी झाला तर लगेच त्यामागची कारणमीमांसा करण्यात आपण गुंगून जातो. माझ्या वडलांच्या मते मी त्यांचे अनौरस अपत्य होतो. पण ते कधीच ही गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत. जेव्हा अशा व्यक्तींची एखादी समजूत खोटी पडते तेव्हा त्यांना जबरदस्त हादरा बसतो. चार्ल्सचेही तेच झाले होते. मी वयात आल्यानंतरही त्यांचा माझ्यावर हात उगारला जायचाच. काही नोकरांना तर चार्ल्स यांनी मला इस्टेटीतून बेदखल केले असावे याची खात्रीच पटली होती. दैवयोग म्हणा पण त्यांनी कधीच माझे नाव मृत्युपत्रातून काढून टाकले नाही. त्या जोरावरच मी आज काल्डवेल घराण्याचा वारस म्हणून बोलू शकतो, समाजात वावरू शकतो.

त्या दिवशी आमच्या घराला आग अपघाताने लागली नव्हती. ती आग चार्ल्स यांनीच लावली होती. जर चार्ल्सचा घरात कोणावर कणभरही विश्वास असेल तर तो अ‍ॅलेक्सीचे वडील आर्थर यांच्यावर होता. अ‍ॅलेक्सीच्या आईचे वर्षाभरापूर्वी निधन झाले होते. अशात आर्थर यांना जवळच्या गावातल्या कोणी तरूणी आवडली. अ‍ॅलेक्सीची ही सावत्र आई त्याला समवयस्क असणार होती. आर्थर यांनी आपल्या मालकांना बोलाचालींसाठी सोबत चलण्याची विनंती केली. त्यांची अशी धारणा होती की लॉर्ड काल्डवेलच्या आग्रहानंतर त्यांच्या वयाचा अडसर दूर होईल आणि मुलीचे पालक लग्नाला हसत हसत तयार होतील. मला कधी त्या मुलीला जवळून पाहायची संधी मिळाली नाही पण अ‍ॅलेक्सी सांगतो ते खरं असेल तर ती कमालीची सुंदर असली पाहिजे. अशा मुलीला मालक नोकरासाठी का सोडेल? चार्ल्स यांच्या आग्रहाखातर वयातला फरक विसरून लग्नाला होकार तर मिळाला पण वर म्हणून चार्ल्स यांचे नाव पक्के झाले. आर्थर यांच्या सात्विक संतापाचा स्फोट होण्याकरिता तेवढा अपमान पुरेसा होता.

त्यानंतर एके रात्री झोप येत नसल्याने मी अ‍ॅड्व्हेंचर ऑफ द फायनल प्रॉब्लेम वाचत बसलो होतो. माझ्या खोलीचा दरवाजा अलगद उघडला गेला. जर मी जागा नसतो तर मला कळलेही नसते की कोणीतरी माझ्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तो अ‍ॅलेक्सी होता. त्याच्या चेहर्‍यावर काहीसे कठोर भाव होते. मी जागा आहे हे पाहून क्षणभरच त्याच्या चेहर्‍यावरचा मुखवटा हलला आणि तो दु:खी असल्याचे मला जाणवले. त्याने मला कोणताही आवाज न करता त्याच्या सोबत चलण्यास सांगितले. तो मला मुख्य हॉलमध्ये घेऊन गेला. रात्रीची वेळ असल्याने सगळीकडे सामसूम होती. हॉलमध्ये मात्र उजेड होता. घरातील सर्व नोकर मंडळी तिथे जमा झाली होती. मध्यभागी अ‍ॅलेक्सीचे वडील होते. मला येताना पाहून त्यांच्या नजरेत तिरस्कार दिसू शकत होता. त्यांनी अ‍ॅलेक्सीला मला बांधून आणि बेशुद्ध करून आणायला सांगितले होते. थोडा वेळ बोलाचाली झाल्यानंतर ते माझ्याशी थेट बोलू लागले.
"यंग मास्टर, तुमच्या वडलांचे प्रताप तुमच्या कानी पडले असतीलच. तुमची होऊ घातलेली सावत्र आई तुमच्यापेक्षाही वयाने लहान आहे. इथे जमलेल्या सर्वांचेच त्यांच्याविषयी वाईट मत झाले आहे. केवळ त्यांच्या सत्तेच्या ताकदीपुढे सर्व झुकले आहेत, वरकरणी तसे भासवत आहेत. पण आमचा निश्चय पक्का आहे की उद्या त्यांचा खून करून त्यांचे अभद्र हेतू हाणून पाडायचे. या सगळ्यात तुम्ही कोणत्या बाजूने उभे राहणार आहात यंग मास्टर?"
मी अ‍ॅलेक्सीकडे एक कटाक्ष टाकला. मला जिवंत ठेवून पुढचा काल्डवेल बनवण्यात या सगळ्यांचा फायदा होता. जर कोणीच काल्डवेल उरला नाही तर डार्टमूरमधली ही सर्व इस्टेट इतर कोणी लॉर्ड बळकावणार हे निश्चित होते. हे सर्व इतक्या वेगाने घडत होते की हा नवा मालक चांगला असेल की वाईट हे ठरवण्याची संधी हातची गेली होती. त्यात अ‍ॅलेक्सी वगळता बहुतेक सर्व अविचारी दिसत होते. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट बसली होती की आपण ख्रिस लहान असताना त्याच्याबद्दल फार काही स्वामिभक्ती दाखवलेली नाही. त्यामुळे तो आपल्याला वाईटच वागणूक देईल. म्हणून चार्ल्ससोबत ख्रिसचाही काटा काढणेच श्रेयस्कर! वरकरणी जरी आर्थर मला त्यांची बाजू घेण्याचे गाजर दाखवत असले तरी माझ्यासाठी ती आगीतून फुफाट्यात जाण्याचीच गोष्ट असणार होती. पण आत्ताच्या बाका परिस्थितीत मी फार काही करू शकत नव्हतो.
"आर्थर. मला स्वतःला सर चार्ल्सचे वर्तन फारसे पटलेले नाही. त्यांचा खून ही एक अतिरेकी उपाययोजना असली तरी प्रसंगानुरूप दुसरा कुठला पर्याय आपल्या समोर नाही. ठीक आहे. मी तुमच्या बाजूने आहे."
"यू बास्टर्ड!!" माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला एक नोकर धाडदिशी जमिनीवर कोसळला. त्याच्या घशातून काठोकाठ भरलेल्या पेल्यातून वाईन ओघळावी तसा लाल द्राव ओघळत होता. माझ्या वडलांच्या रायफलच्या नळीतून अजूनही धूर येत होता. त्यांचे डोळे आग ओकीत होते. मी पुन्हा अ‍ॅलेक्सीकडे पाहिले. मी त्याचा चेहरा चुकीचा वाचला होता. तो मला पकडायला आला नव्हता. तो मला घरातून बाहेर फेकण्याकरिता आला होता. चार्ल्सनी अ‍ॅलेक्सीला सगळ्यांना बांधायला सांगितले. त्याने मलाही एका खांबाला बांधले पण माझी बंधने तुलनेने सैल होती.त्याच्याकडेही एक रायफल होती.
"या संपूर्ण घराला आग लावण्यात आलेली आहे आर्थर. इथून बाहेर पडण्याचा गुप्त मार्ग फक्त मला आणि अ‍ॅलेक्सीला माहित आहे. कदाचित मी ख्रिसला वाचवलेही असते पण आता नाही. तुला काय वाटलं आर्थर, मला तुमची योजना कळणार नाही? आता आपल्या कर्माची फळे भोगणे एवढेच तुझ्या हातात आहे. पण मी कोणताही धोका पत्करणार नाही."
चार्ल्सने कोणतातरी नोकर निवडला. त्याच्या तोंडात आपली रायफल घातली आणि चाप ओढला. हा क्रम प्रत्येक नोकरासोबत करण्यास सुरुवात झाली. इतक्या वर्षांच्या सेवेची किंमत क्षणार्धात शून्य झाली होती. शेवटी आर्थर आणि मी तेवढे उरलो. आर्थर यांच्याही तोंडात रायफलीचे टोक ठेवले गेले. चार्ल्स चाप ओढणार इतक्यात अ‍ॅलेक्सी त्यांच्या दिशेने झेपावला. बहुधा अखेरच्या क्षणी आपल्या बापाला वाचवण्याचा विचार त्याच्या मनात आला असावा. पण खूप उशीर झाला होता. नेम काहीसा हलला असला तरी गोळी आर्थर यांचा उजवा गाल फाडून कानात रुतून बसली होती. ही फटकन जीव जाण्यापेक्षा भयंकर शिक्षा होती. त्यांच्या गालफडातल्या सर्व हाडांचा चुरा झाला होता. चार्ल्सने बिनदिक्कत अ‍ॅलेक्सीवर बंदूक रोखली.
"तुझ्यात एकतरी गुण येईल असे वाटले होते. शेवटच्या क्षणी तू दाखवून दिलेस की तू बिंगहॅमच आहेस. आता माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नाही अ‍ॅलेक्सी. प्रिपेअर टू मीट दाय क्रिएटर"
आता मी आणखी धीर धरू शकत नव्हतो. मी हे सर्व चालू असताना माझे हात मोकळे केले होते. चार्ल्सच्या बंदूकीला मी लाथ मारून त्यांचा नेम चुकवला. गोळी अ‍ॅलेक्सीच्या पायात घुसली. त्यांनी चिडून लगेच दुसरी गोळी चालवली. सुदैवाने त्यांचा नेम चुकला. कदाचित आगीच्या ज्वाळांचा हा प्रताप असावा कारण आता आम्ही तिघे जिथे होतो तिथपर्यंत आग पोहोचली होती. फक्त राहते घरच नाही तर आजूबाजूचा परिसरही पेटवून देण्यात आला होता आणि ती आग बाहेरच्या वर्तुळाकृती सीमेपासून सुरुवात करून मध्यबिंदूकडे पसरेल अशी काळजी घेण्यात आली होती. मी आधी अ‍ॅलेक्सीला सावरले.
"यंग मास्टर, सगळ्यात वरच्या मजल्याकडे चला. तिथून एक गुप्त दरवाजा आपल्याला ईशान्येच्या मनोर्‍यावाटे भूमिगत गुप्त मार्गाकडे घेऊन जाईल. त्या वाटेच्या मजबूत भिंती आगीला थोपवून धरतील."
"ओके."
"तुम्ही एकटेच जा. मी जखमी असल्याने मी फक्त तुमचा वेग मंदावण्याचे काम करू शकतो."
"शट अप अ‍ॅलेक्सी. तुझ्याकडे आता दोनच पर्याय आहेत, चार्ल्स यांचा नोकर म्हणून मृत्युला सामोरे जाणे किंवा माझा वॅलेट म्हणून जगणे. आणि मी माझ्या वॅलेटला मरू देणार नाही."
आम्ही जिना चढायला सुरुवात केली. चार्ल्स आमच्या मागावर होतेच. त्यांच्या रायफलमधल्या गोळ्या संपल्या होत्या. मी अ‍ॅलेक्सीच्या रायफलमधून एक दोन गोळ्या चालवल्या खर्‍या पण एका हाताने नेम साधणे कठीण होते. आम्ही कसे बसे सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहोचलो. माझ्या हाताला एक हिसडा बसला. चार्ल्सनी अ‍ॅलेक्सीला आपल्या दिशेने ओढले. माझ्या हातात बंदूक होती आणि ते दोघेही एका हाताच्या अंतरावर होते. चार्ल्सच्या हातात एक कुर्‍हाड होती. त्यांच्या कोणा अमेरिकन मित्राने ती त्यांना भेट दिली होती. निश्चितच त्यांचा हेतु ती कुर्‍हाड फेकून मारण्याचा होता. माझी द्विधा मनस्थिती पाहून अ‍ॅलेक्सी माझ्या रायफलच्या नळीला धरून ओढले. त्या अवस्थेत बंदूकीचा चाप माझ्याकडून नकळत ओढला गेला. चार्ल्स अ‍ॅलेक्सीपेक्षा किंचित बुटके होते. अ‍ॅलेक्सीच्या फुफ्फुसांचा अगदी खाली गोळीचा आघात झाला आणि ती त्याच्या पाठीतून बाहेर पडून चार्ल्सच्या डाव्या फुफ्फुसात रुतून बसली. त्यांच्या हातातून कुर्‍हाड गळून पडली आणि अ‍ॅलेक्सीही जमिनीवर कोसळला. अगतिक होऊन मी बंदूकीच्या दस्त्याने त्यांच्या चेहर्‍यावर प्रहार केला आणि ते भेलकांडत जाऊन कठड्याला आदळले आणि झुंबर फोडून सरळ तळमजल्यावर जाऊन झुंबरासकट खाली पडले.

*****

"मग अ‍ॅलेक्सीचे काय झाले?"
"मी आणि अ‍ॅलेक्सी सुदैवाने वेळेत गावातल्या डॉक्टरांकडे पोहोचू शकलो. त्यांना विश्वासात घेऊन मी दुसर्‍या दिवशी सत्य काय ते सांगितले. अ‍ॅलेक्सीच्या जखमा पूर्ण भरून यायला वेळ लागला. या सर्वांची चौकशी करण्यासाठी सर मॅक्सवेल नंतर काल्डवेल मॅनॉरला आले होते. तिथे प्रथम मला लॉर्ड काल्डवेल यांचे वजन वापरून तपास मला हवा त्या पद्धतीने करून घेता आला. मॅक्सवेल यांनाही पूर्ण सत्य माहित नाही. म्हणून मी अ‍ॅलेक्सीचा गुन्हेगार आहे. एकदा सोडून दोनदा मी त्याला वाचवू शकलो नव्हतो. पहिल्या वेळेस तो त्याच्या सुदैवाने आणि अक्कलहुशारीने वाचला तर दुसर्‍या वेळी ....." ख्रिसने एक सुस्कारा सोडला. रश्मीन त्यांच्या खांद्यावर आपला हात हलकेच दाबला.
"मी असे तर म्हणणार नाही मी समजू शकते पण मला आता तुमच्या वागण्यामागची कारणमीमांसा तरी कळते आहे. पण याचा आणि फ्रीचा संबंध मला अजूनही कळला नाही."
"प्रिमॅच्युअर बर्थ ही अनैसर्गिक घटना मानली जाते. सध्याच्या वैद्यकीय सुविधा बघता बाळ आणि आई दोघेही यातून सुखरुप वाचणे हा एक चमत्कारच मानावा लागतो. पण मी आणि माझी आई दोघेही वाचलो. याच कारणाने चार्ल्सनी माझ्या आईवर संशय घेतला. आता विचार करता तिचे नंतरचे आजारपण आजारपणच होते का हा प्रश्न पडतो."
"भयंकर! पण अजूनही ...."
ख्रिस हसला. "एक हिस्सा तुला माहित नाही हे कबूल करेन. ज्याच्या मृत्युपासून हे सगळं सुरु झालं तो बर्थोल्ट एक परफेक्शनिस्ट होता. अ‍ॅलेक्सीने त्याच्याविषयी काढलेल्या माहितीतला हा भाग आम्ही त्यावेळी दुर्लक्षित केला होता की त्याला आपला बो-टाय एक अंश सुद्धा एका बाजूला कललेला खपत नसे. अ‍ॅलेक्सीनेही तो कमी महत्त्वाचा मुद्दा म्हणून माझे लक्ष वेधले नव्हते. पण नंतर मी चौकशी केल्यानंतर कळले की परफेक्शन त्याच्या रक्तात भिनले होते. त्यात तो इथे भाषातज्ज्ञ म्हणून आला होता. त्यामुळे तो अचूक शब्दप्रयोग करणार यात दुमत नाही."
"ओके. पण तेवढ्याने काय कळते?"
"तेवढ्याने हे रहस्य सुटत नाही पण त्याला दुसर्‍या एका क्लूची जोड दिली की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. हे सगळं नॉर्मल नाही आहे एवढं तरी तुला कळतं आहे ना? हीच हे रहस्य सोडवायची गुरुकिल्ली आहे. या खेळात कोणीच नॉर्मल नाही आहे."

~*~*~*~*~*~

१३ डिसेंबर १९११

पहाटेचे तीन वाजले होते. जोसेफला अशा अवेळी उठणे नामंजूर होते. ख्रिस आणि रश्मीच्या तोंडावर त्याने आपला वैताग व्यक्त केला आणि व्हिस्कीचा एक ग्लास भरला. एक पेग रिचवल्यानंतर त्याने ख्रिसचे म्हणणे ऐकायला सुरुवात केली.
"जॉर्जवर हल्ला आज होणार आहे." ख्रिसने सरळ बॉंब टाकला.
"कशावरून ख्रिस? आपण शक्यतांचा विचार ....." ख्रिसने त्याला थांबवले. स्वतःसाठी पण एक पेग भरला आणि तो बोलू लागला.
"टू बी एक्झॅक्ट, सकाळी ठीक सव्वादहा वाजता फणींद्र आपले काम करेल."
"सव्वादहा वाजता तर सम्राट झरोक्यातून दर्शन देणार आहेत."
"परफेक्ट! तेव्हाच फणींद्र सम्राटांची हत्या करण्याचा प्रयत्न करेल. हे आपल्याला आधीच लक्षात यायला हवे होते की फणींद्रसाठी यापेक्षा अधिक चांगली संधी दुसरी असूच शकत नाही. विचार करून बघ. फणींद्रचे हत्यार स्नायपर रायफल आहे. त्याला सम्राटांच्या जवळ जाण्याची गरज नाही. फक्त अचूकतेसाठी त्याला सम्राट एकटे हवेत. त्यांच्या मध्ये कोणी येता कामा नये. जेव्हा ते झरोक्यातून दर्शन देणार असतील तेव्हा ते जनतेला नीट दिसावेत यासाठी त्यांच्या पुढ्यात कोणीही नसेल. आपण जरी झरोका म्हणत असलो तरी ती जवळपास छोटीशी गच्चीच आहे. पुन्हा दर्शन देण्याकरिता त्यांच्या भोवती कोणतेही संरक्षणात्मक आवरण नाही. आता एवढा वेळही नाही की अशी काहीतरी व्यवस्था करता येईल."
"मग आता?"
"आपल्याला किल्ल्याचे बुरुज तपासावे लागतील. कोणत्यातरी बुरुजातून फणींद्र नेम साधणार हे नक्की. त्याहून दुसरी सोयीस्कर जागा नाही. आणि सकाळी त्याला किल्ल्यात प्रवेश करणे सोयीचे जाणार नाही. त्यामुळे तो ऑलरेडी किल्ल्यात आलेला असला पाहिजे."
"पण आपणच म्हणालो होतो ना कि एवढ्या पहार्‍यातून तो किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नाही."
"आत्ताच मी सुरक्षा प्रमुखांना सर्व पहारेकर्‍यांची चौकशी करायला लावली. एका पहारेकर्‍याचा पत्ता लागू शकला नाही. त्याचे छिन्नविछिन्न झालेले शव किल्ल्याच्या तटबंदीपाशी सापडले. त्यापासून थोड्याच अंतरावर वाढलेल्या झाडोर्‍यात एक सिंह हिंडतो आहे."
"व्हॉट?!"
"जर रुद्र इतक्या सहज पहारा फोडून किल्ल्यात प्रवेश करू शकतो तर फणींद्रसाठी ते निश्चित अशक्य नाही. जर बुरुजात लपून राजदर्शनाचा कार्यक्रम चालू असताना तो नेम साधेल ही शक्यता आपण नीट अभ्यासली असती तर कदाचित त्याला किल्ल्यात घुसतानाच आपण पकडू शकलो असतो. पण अजूनही उशीर झालेला नाही."
"ओके. लेट्स गो."

~*~*~*~*~*~

मलिका आणि काली दोघींनी बुरुजातल्या त्या कक्षात प्रवेश केला. त्या कक्षाला तटबंदीचे छत होते आणि छतातून खाली पायर्‍या आल्या होत्या. चारही बाजूने ती खोली बंदिस्त होती. नाही म्हणायला एका भिंतीत छतापासून पायापर्यंत जाणार्‍या फटी होत्या. तिरंदाजांना बाण मारता यावेत म्हणून तशी रचना केली गेली होती. एक छोटे चौरसाकृती गवाक्ष होते, अर्थातच टेहळणीसाठी. तांबडे फुटण्यास अजून साधारण प्रहरभर अवकाश असल्याने खोलीत गुडूप अंधार होता. अशावेळी अचानक उजेड झाल्यानंतर कोणाचेही डोळ्यांपुढे पांढरे धुके साचेल. ख्रिस, जोसेफ आणि रश्मी अशा तिघांनी त्या खोलीत प्रवेश केला होता. जवळच असलेल्या एका खुंटीला रश्मीने हातातला कंदील लटकावला. तीनजण त्यांच्यापुढे डोळे चोळत होते. फणींद्र तिथे आधीपासूनच होता पण त्याला उर्वरित पाचही जणांची उपस्थिती अपेक्षित नव्हती. ख्रिसच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य पसरले.
"जोसेफ आणि रश्मी. अखेर आपल्या रहस्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्व व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत. फायनली आय कॅन हॅव माय होम्स मोमेंट."
"होम्स मोमेंट..? एनीवे, सगळे इथे नाहीत ख्रिस. तो सिंहाचा मालक रुद्र, तो आपल्याला अजूनही सापडला नाही आहे."
जोसेफच्या या प्रश्नावर ख्रिस चालत पुढे गेला. त्याने कालीच्या डोक्यावरचा पदर एका झट्क्यात बाजूला केला आणि तिचे डोळे चोळणारे हात पकडून तिला जमिनीवर ढकलले. स्त्रीवेशात तो रुद्र होता. त्याचे डोळे अजूनही प्रकाशाला सरावलेले नसले तरीसुद्धा त्या डोळ्यांतला विखार कळून येत होता.
"अ‍ॅज शॉकिंग अ‍ॅज इट साऊंड्स, रुद्र आणि काली एकच व्यक्ती आहेत. खरं बघायला गेले तर बर्थोल्टचे मरण्यापूर्वीचे अखेरचे शब्द, आपण ते नीट समजून घेतले नाहीत. त्यामध्ये बर्थोल्टने हे रहस्य तेव्हाच उघड केले होते."
"तुला फ्री म्हणायचे आहे का?"
"हो आणि नाही. फ्री हा एक शब्द नाही. फ्री हा अर्धा शब्द आहे. कारण फ्री म्हणजे .......

.................
.................
.................

(पुढील भागात समाप्त)

अंतिम भाग - https://www.maayboli.com/node/66406

Group content visibility: 
Use group defaults

पायस, पुढचा भाग तयार असेल तर करून टाक पोस्ट. इतक्या उत्कंठावर्धक स्टेजला कथा थांबवल्यावर उद्यापर्यंत वाट पाहणे कठीण आहे. Happy

मस्त
पुढचा भाग लवकर टाका . उत्सुकता ताणली जाततेय

अरे यार... किती उत्कंठा ताणायची ती. Sad

एखाद्या अतिशयच सस्पेंस मालिकेत हाच तो खूनी हे आता दाखवणार म्हणून आपण डोळे ताणताणून टीव्ही कडे एकटक पाहत राहावे नि तो भागच संपावा... तेव्हा जी चीडचीड होते तशी आत्ता फ्री.. च्या पुढच्या डाॅट वाल्या तीन ओळी बघून होतेय.
असो.
पुढील भागाच्या अतिशयच प्रतिक्षेत...

हे सगळं नॉर्मल नाही आहे एवढं तरी तुला कळतं आहे ना<<<<< यावरून तो शब्द 'फ्रीक' असावा का? पण बर्थोल्ट जर्मन, संस्कृतचा अभ्यास करायला आलेला आणि परफेक्शनिस्ट.. तो मरतेवेळी इंग्रजी शब्द का वापरेल?

सर्कशीतल्या लोकांबद्दल विचार करताना त्यांची परफेक्ट योजलेली नावे जाणवली. अगदी सर्कशीचे नावही! कदाचित तसा धागा नसेलही पण उद्यापर्यंत वाट पहायची असल्याने मी ओव्हरथिंकिंग करतेय. Proud

काय राव पायस....
आत उद्या पर्यन्त थांबुन राहणे कठिण काम आहे.. Sad

बहुधा तो शब्द 'फ्रीक' नाही. Happy एक क्लू सापडला. जर तो बरोबर असेल तर अफाट भारी जुळलंय सगळं! अर्थात, अजून काही वेगळाच शब्द असेल अशी शक्यता आहेच. फारच वेगवान, ऑसम झालीय ही कादंबरी!

(काल काम बाजूला ठेवून आजवरचे कथानक क्लूसाठी पुन्हा एकदा चाळून काढले. क्लूलेस खेळण्याची सवय कोडे अर्धवट सोडू देत नाही.) Proud

माझा अंदाज लिहू की नको, असा विचार करत होते. पण लिहून ठेवते. Happy

मी माझ्याच आधीच्या बर्थोल्टविषयीच्या मुद्द्यावरून पुढे विचार केला. शिवाय मलिका आणि रुद्राचे उद्दिष्ट विचारात घेतले. जे उत्तर मिळाले ते ख्रिसच्या आयुष्यातल्या घटनाक्रमालाही थोडेफार फिट बसते.

साधना, तुझं पोस्ट वाचून एकदम क्लूलेस खेळत असल्याचा फील आला. Happy
जर माझा तर्क बरोबर असेल तर तो शब्द इंग्लिश नाही.

मीही जर्मन शब्द शोधतेय, मरताना माणूस स्वभाषेत बोलणार आणि त्याने कालीला पाहिले शेवटी.

ती संशयास्पद बाई (काली) म्हणजेच रुद्र असे सुरुवातीलाच वाटले होते (रुद्रचे वर्णन, त्याची स्वप्ने, शक्तीपूरचा इतिहास, वगैरे). पण रुद्र आणि कालीचे संवाद आलेत १-२ ठिकाणी. ते समजा रुद्र स्वतःच स्वतःशी बोलत असेल असे समजले तरीही जेव्हा ख्रिस आणि रश्मीच्या घराची झडती घेऊन रुद्र आणि काली पळतात तेव्हा ख्रिस आणि रश्मीने त्या दोघांना पाहिले असते (की ती काली नसून मलिका असते??). होपफुली पुढच्या भागात उत्तरे मिळतील.

अरे इथे ऑसम डिस्कशन झालेले दिसते आहे Happy असो मंडळी अंतिम भाग आलेला आहे.

तो मरतेवेळी इंग्रजी शब्द का वापरेल? >> अंतिम भागात उत्तर आलेले आहेच. इथेही मायनर स्पॉयलर अलर्ट देऊन सांगतो. काही शब्द जर्मन आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आहेत. Happy