फ्री...? : भाग १६

Submitted by पायस on 11 June, 2018 - 10:51

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66361

"गंगादासजींचे घर कुठे आहे?" रश्मीने एका गावकर्‍याला विचारले.
त्याने तिच्याकडे आणि ख्रिसकडे आळीपाळीने दोन तीनदा बघितले. रश्मीच्या अंगावरचे कपडे भारतीय नव्हते आणि ख्रिसतर त्याच्या दृष्टीने पांढरा गोरा होता. हे लोक गंगादासकडे का आले असावेत?
"तुम्ही गंगादासजींचे कोण?"
"जी आम्ही त्यांचे नात्याने कोणी लागत नाहीत आम्ही ..."
"फ्रेंड्स" ख्रिसने साधारण अंदाज घेऊन उत्तर दिले.
"आं?"
"म्हणजे मित्र. हे अलाहाबादेतले इंग्रज अधिकारी आहेत. त्यांच्या वडिलांची आणि गंगादासजींची मैत्री होती. तर त्यांचा काही संदेश घेऊन आम्ही आलो आहोत. गंगादासजी कुठे राहतात ते कृपया सांगू शकाल?"
"तुम्ही खूप उशीर केलात."
"काय?"
"कोणीतरी गंगादासजींवर काल हल्ला केला. त्यांची जखम खूप खोल आहे. गावातले वैद्य प्रयत्न करत आहेत पण ... "
"असे वाटतंय की त्यांनी जगण्याची आशाच सोडली आहे."
ख्रिस आणि रश्मीने जेव्हा गंगादासच्या पडवीत प्रवेश केला तेव्हा गंगादास खाटेवर उताणा झोपलेला होता. रश्मीने वैद्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी गंगादासला अधिक वेदना होऊ नयेत म्हणून त्याने झोपून राहणेच उचित असे सांगितले. ख्रिसला रश्मीने सगळी परिस्थिती समजावली.
"व्हॉट? मग हे लोक कशाची वाट बघत आहेत? त्याला लवकरात लवकर शहरात हलवले पाहिजे. कदाचित तिथल्या हॉस्पिटलमध्ये तो वाचेलही."
"सर, प्लीज तुम्ही हळू बोलाल का? इथे एक पेशंट आहे."
"कोण आहे?" या आवाजाने गंगादास उठला होता.
गावकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता ख्रिस गंगादासच्या जवळ जाऊन उभा राहिला. "गंगादास, मलिका कुठे आहे?"

*******

गंगादासने गावकर्‍यांना या दोघांना आपल्या सोबत एकांतात बोलू देण्यासाठी पटवले. इतर सर्व बाहेर गेल्यानंतर गंगादासने थोडक्यात काय घडले ते सगळे ख्रिस आणि रश्मीला सांगितले. मलिका, काली, रुद्र आणि संग्राम दिल्लीच्या दिशेने गेले असणार हे आता निश्चित झाले होते. जर तसे असेल तर आता अलाहाबादेत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. ख्रिसने गंगादासला शक्तीपुरविषयी थोडे अधिक विस्ताराने सांगण्याची विनंती केली. रश्मीला यातून काय हशील होणार आहे असा प्रश्न पडला. पण तिला एक अंदाज आला होता, या इतिहासात ख्रिस काहीतरी विशिष्ट गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जणू त्याची कोणती तरी अटकळ त्याला तपासून बघायची आहे.
"शक्तीपुर खूप छोटेसे संस्थान होते. इतके छोटे की १८५७ मध्ये ब्रिटिश आणि बंडखोर दोघांनाही शक्तीपुर कोणाची बाजू घेत आहे याने काहीच फरक पडत नव्हता. संस्थान जरी छोटे असले तरी सुदैवाने अखेरचे दोन तीन शासक चांगले निघाल्याने प्रजा सुखी होती. आता जर शासक कायम बाहेरूनच येणार असेल आणि येणारा जावई व्यवस्थित परीक्षा घेऊन निवडला गेला असेल तर अर्थात तो चांगला निघणारच. शेवटचे शासक राजे आशुतोषही असेच दयाळू राजे होते. त्यांचे पहिले लग्न आधीच्या राजे गंगाधर यांच्या थोरल्या कन्येशी झाले. तिच्यापासून एक कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आशुतोष यांचाही शक्तीपुरविषयक दंतकथेवर विश्वास बसला. त्यांनी आधी विचार केला कि कदाचित राजघराण्यातील स्त्रीशी विवाह केला तरच मुलगी होत असावी. त्यांनी दुसरे लग्न एका साध्या पण प्रतिष्ठित घरातील मुलीशी केले. तिच्यापासूनही त्यांना मुलगीच झाली. ते निराश झाले पण डोक्यातली आपल्याला मुलगा हवा अशी तीव्र इच्छा काही गेली नाही. आता नुसता मुलगा हवा म्हणून मुलगा थोडीच होत असतो? मग त्यांनी भलतेच मार्ग चोखाळायला सुरुवात केली. यातून कधीतरी त्यांचा आमच्या पंथाशी संबंध आला. जरी ठगांच्या निर्मूलन सत्रातून आम्ही मूठभर लोक वाचलो असलो तरी त्याचे परिणामस्वरुप आमच्यात फूटही पडली होती. मी तेव्हा हे सगळे धंदे बंद करून या राज्यात नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होतो. एके दिवशी आशुतोष यांनी तिसरे लग्न केल्याची बातमी कळली. हे तिसरे लग्न म्हणजे मलिकाची खेळी होती. लवकरच त्यांना एक मुलगा झाला असे कळले. काही अंधश्रद्धाळू लोक ती मुलगीच आहे असे म्हणत होते पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही. मलिकाच्या डोक्यात आणखीही काहीतरी होते. राज्यात नंतर विचित्र मृत्यु होऊ लागले. आणखीही काही भलतेच होण्याआधी मी त्या राज्यातून पळ काढला आणि काहीच दिवसानंतर राजवाडा जळून खाक झाल्याची बातमी कळली."
"तुमचा निर्णय योग्य होता. पण जेव्हा तुम्ही अलाहाबादमधून बाहेर पडलात तेव्हा तुमचे ठिकाण सांगण्यासाठी तुम्ही कमी बडबड्या व्यक्तीची निवड करायला हवी होतीत. दिवोदासकडून अगदी सहज आम्हाला हवी ती माहिती मिळून गेली होती."
"आणखी एक गोष्ट सर. मी त्यांना दिलेला नकाशा. त्याचे कोडे मी सोडवले आहे. दोन्ही पद्धती येत असतील तर त्यानंतरही काही सांकेतिक संदेशातूनच ठिकाण सांगितले असणार. पण जर दिल्लीच्या जुन्या नकाशांसोबत तुलना केली तर हे लगेच कळते की कंठा लाल किल्ल्याजवळ कुठेतरी आहे."
"ही तर खूपच महत्त्वाची माहिती सांगितलीत. मला तुम्हाला आणखी एकच प्रश्न विचारायचा आहे. एकंदरीत तुमच्या पंथाच्या लोकांना वनस्पतींविषयी सखोल ज्ञान होते."
"हो. बहुतांश ठग धोत्र्याचा वापर करीतच. पण आमच्या लोकांचे वनस्पतींविषयक ज्ञान अलौकिक होते."
"मग तुम्हाला अशी वनस्पती माहिती आहे का?" ख्रिस गंगादासच्या कानात कुजबूजला.
"हो हो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे .... अरे देवा!!! सर हे ......"
ख्रिसने गंगादासचा हात धरून हलकेच दाबला. त्यानंतर त्याला धन्यवाद म्हणून ते बाहेर पडले.
"याला अलाहाबादेत हलवायला नको?"
"गावकरी म्हणत आहेत ते खरे आहे. याची स्वतःचीच जगायची फारशी इच्छा नाही."

~*~*~*~*~*~

१ डिसेंबर १९११
दिल्ली, ब्रिटिश इंडिया

असे म्हणतात की पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ आजच्या दिल्लीचा हिस्सा आहे. खरे खोटे पांडवच जाणो पण दिल्ली किमान ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून अस्तित्त्वात आहे. तिला राजधानीचे रुपडे प्राप्त करून देण्यात मात्र मुस्लिम शासकांचा मोठा वाटा आहे. अठराव्या शतकापर्यंत दिल्लीचा आब काही औरच होता. ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव करून बहुतांश भारत आपल्या अधिपत्याखाली आणल्यानंतर मात्र कलकत्त्याचे महत्त्व वाढले. दिल्ली अजूनही एक महत्त्वाचे शहर असले आणि पूर्वीचे दोन दरबार दिल्लीत भरवले गेले असले तरी दिल्लीला राजधानीचा दर्जा नव्हता. राजा किंवा राणीही दरबारांना उपस्थित नसल्यामुळे दिल्लीकरांना ते दरबार घरातल्या वृद्धाचे समाधान करण्यासाठी आयोजित केलेले समारंभ वाटले होते. यावेळेस मात्र राजा आणि राणी दोघेही उपस्थित राहणार असल्याने दिल्ली मोठ्या उत्साहाने सजत होती. त्यात बाहेरून "राजा दिसतो तरी कसा?" हा बिनकामाचा प्रश्न घेऊन जनसामान्यांचे लोंढेच्या लोंढे दिल्लीत येत होते. कडक पहारा हवा, काटेकोर बंदोबस्त हवा वगैरे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात हा गोंधळ आवरता आवरत नाही. पूर्वानुभवाने अनेकजण सांगतील की शेवटी सगळं ठीकच होतं पण शहराच्या वेशीवर बसलेल्या पहारेकर्‍यांना ते समजावणार कोण?

ख्रिस आणि रश्मी या गोंधळाचे निरीक्षण करीत पुढे सरकले. त्यांच्यासाठी आणि जोसेफसाठी एक तात्पुरते निवासस्थान तयार करण्यात आले होते. सर मॅक्सवेल सम्राटांसोबत मुंबईहून थेट दिल्लीला येणार होते. त्यांच्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था केली गेली होती. तरीसुद्धा दोन ते तीन दिवसांचा प्रवास होईल असा अंदाज होता. ते तिघे चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र जमले.
"मी इथे बसलेले चालेल?" रश्मीचा प्रश्न ऐकून जोसेफ मनापासून हसला.
"त्या म्हातार्‍याकडे फार लक्ष नाही द्यायचं रश्मी. वैयक्त्तिक विचारशील तर मला या चहावेडाची पण गंमतच वाटते. त्यापेक्षा काम करावं, वाईन प्यावी, सिगारचा आस्वाद घ्यावा आणि झोपून जावं. यासारखी दुसरी दिनचर्या नाही."
ख्रिस खाकरला. अनेक दिवसानंतर त्याला जोसेफचा सोशल एरर दाखवून द्यायची संधी मिळाली.
"असो. ख्रिस तुला या बंदूकीविषयी काय वाटतं? मला तर ही कोणती तरी लांब पल्ल्याची बंदूक वाटते."
"कधी नव्हे ते मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. फणींद्रचा नेम चांगला असावा. त्यामुळे त्याला शार्पशूटर जी बंदूक वापरतात तशी बंदूक दिली गेली असावी."
"आता त्यांना स्नायपर म्हणतात राईट? बोअर युद्धानंतर शार्पशूटर या संज्ञेचा विसर पडत चालला आहे."
"बरोबर. स्नायपर. माझ्या माहितीनुसार ब्रीच लोडिंग रायफल्स वापरात आल्यानंतर शार्पशूटर्सना त्या रायफल्स पुरवण्यात आल्या. या रायफली अचूक होत्या, त्यांचा दारूगोळा धूर निर्माण करून बंदूकधार्‍याचे ठिकाण उघड करत नसल्याने ते लपून वार करू शकत. त्यांचा पल्लाही इतर बंदूकींपेक्षा पुष्कळच लांब असतो."
"मग या स्नायपर रायफलीचे काय? हिची विशेष बनावट लक्षात घेता हिचा पल्ला नक्कीच जास्त असणार."
"अर्थात. स्नायपर रायफल असे जिचे नामकरण करता येऊ शकेल अशी पहिली रायफल सर जोसेफ व्हिटवर्थ याने १८५७ मध्ये बनवली. १८५३ मध्ये सुद्धा एनफिल्ड कंपनीची एक लांब पल्ल्याची रायफल आपण क्रिमिअन युद्धात वापरली होती. एनफिल्ड रायफलीचा पल्ला चौदाशे यार्डांचा होता तर व्हिटवर्थ रायफलीचा पल्ला दोन हजार यार्डांचा होता. या बंदूकीचा पल्ला सहज अडीच हजार यार्डांपर्यंत असू शकतो. कुणी सांगावं जर्मनांनी तीन हजारांचा पल्लाही गाठला असेल."
"म्हणजे ही रायफल तीन हजार यार्डांवरचे लक्ष्य टिपू शकते?"
"सैंद्धांतिकदृष्ट्या हो. प्रत्यक्षात नाही. या बंदूकीने झाडलेली गोळी दोन, अडीच किंवा चल तीन हजार यार्डांपर्यंत जाते हे मान्य करेन. पण हिचा वापर करून एक मैलापेक्षा अधिक अंतरावरचे लक्ष्य टिपणे केवळ अशक्य आहे."
"मग एनफिल्ड रायफलच का नाही वापरायची?"
"दोन कारणे आहेत. एक म्हणजे या नवीन स्नायपर रायफली अधिक अचूक आहेत. तुम्ही जिथे नेम धरला आहे त्याच्यापासून गोळी खूप कमी भरकटेल. दुसरं कारण असे की या रायफलींपेक्षाही एक मोठीच अडचण आधी दूर करावी लागेल."
"ती कोणती?"
"ह्यूमन आय. आपली दृष्टी फारशी अचूक नाही. एक मैल अंतरावरचे लक्ष्य आपल्याला एक छोटासा ठिपकाच दिसेल. तो ठिपका आपण कदाचित टिपू शकू. पण प्रत्यक्ष लक्ष्याला गोळी कुठे लागली आहे हे सांगणे अशक्य आहे. जर त्याला गोळी पायात लागली तर फायदा काय झाला? त्यापुढचे लक्ष्य भेदायला तर रॉबिन हूडच हवा."
"जर तसे असेल तर फणींद्रला ही बंदूक काहीच कामाची नाही. सम्राटांपासून त्याला फारसे अंतर राखता येणार नाही. आणि आपण त्याला सम्राटांच्या इतके जवळ येऊच देणार नाही."
"पण मग त्या दुर्बिणीचे काय?" इतका वेळ गप्प असलेली रश्मी बोलली.
ख्रिसने चहाचा एक मोठा घोट घेतला आणि आपले हात दुमडून त्यावर त्याने हनुवटी टेकवली. काही वेळ शांत राहून त्याने बोलायला सुरुवात केली.
"होम्स म्हणतो की जेव्हा तुम्ही समोर असलेल्या पुराव्यातून अशक्य असलेल्या गोष्टी काढून टाकता तेव्हा शिल्लक राहिलेला घटनाक्रम कितीही कल्पनातीत वाटला तरी सत्य असतो. स्नायपर्सना बंदूकीसहित दुर्बिण लावून नेम धरणे सोयीचे जावे यावर अनेकजण संशोधन करत आहेत. अजून कोणाला फारसे यश आलेले नाही. पण म्हणून ती शक्यता नाकारणे मूर्खपणाचे ठरेल."
"म्हणजे ते रशियन्स, त्यांना अशी बंदूक बनवता येते?"
"आपल्याला हे सत्य मानूनच पुढच्या हालचाली कराव्या लागतील. फणींद्र स्नायपरचा वापर करून कुठेतरी दूर बसून सम्राटांची हत्या करण्याचा प्रयत्न करेल. यात त्याचाही फायदाच आहे कारण या गोंधळात तो अतिशय सहज ती बंदूक घेऊन पळून जाऊ शकतो. पुन्हा एकदा त्याला अलाहाबादेत मिळाला तसा हेडस्टार्ट मिळेल. मस्ट प्रेज देम, त्यांनी सखोल विचार करून ही योजना बनवली आहे."
"पण यावेळेस तो नाही पळू शकणार. आता आपल्याकडे हेडस्टार्ट आहे."

*****

जकातनाक्यावर बसलेल्या अधिकार्‍याने समोरच्या घोडागाडीवाल्याकडे एक नजर टाकली. तसा तो गाडीवान उंचापुरा होता. फार काही त्याच्यात नजरेत भरण्यासारखे नव्हते. मागे घोड्याला जोडलेल्या लाकडी गाडीत बरीच पोती होती.
"काय आहे याच्यात?"
"मालक मिरच्या आहेत. मी मिरच्यांचा व्यापार करतो."
जकात अधिकार्‍याने एक पोते आपल्याकडे मागवले. शेजारी पडलेला दाभण दोन तीन ठिकाणी मारून पाहिला. मिरच्या चांगल्याच तिखट असाव्यात. नाकाला अगदी झिणझिण्या आल्या. त्याचे समाधान झाले.
"एका पोत्याचे १ पाईस. तुझी बारा पोती म्हणजे एक आणा जकातीचा झाला. १ आणा जकात भर आणि हो पुढे."
कामात गुंग असलेल्या अधिकार्‍याने दिल्ली दरबाराच्या काळात थोडी अधिक काळजी घेणे गरजेचे होते. त्या मिरचीच्या व्यापाराचे डोळे त्याने निरखून पाहिले नाहीत, पाहायला हवे होते.

~*~*~*~*~*~

लाल किल्ला सुरुवातीपासून दिल्लीचे मुख्यालय नव्हते. मुघलांची पहिली राजधानी आग्रा होती. अकबराने आग्रा येथे असताना शेरशाह सुरीने बांधलेल्या एका किल्ल्याचा कायापालट करून तिथे लाल दगडांचा एक किल्ला बांधला. पुढे जेव्हा शाहजहानने आपली राजधानी दिल्लीला हलवली तेव्हा त्याने तसाच किल्ला दिल्लीला बांधायचा मानस बोलून दाखवला. त्याच्या आदेशावरून दिल्लीच्या सलीमगडाभोवती नवीन किल्ला बांधण्यात आला. तोच आजचा लाल किल्ला. लाल किल्ल्यालाही गेल्या शतकभरात काहीशी अवकळा आली होती. पण आता त्यालाही आता त्याचे वैभव परत मिळणार होते. शेवटी दिल्ली दरबाराचा काही भाग लाल किल्ल्यात पार पडणार होता. तसेच सम्राटांच्या निवासाची सोय लाल किल्ल्यात केली गेली होती.

मुख्य कार्यक्रम मात्र निरंकारी सरोवराजवळील राज्यारोहण सोहळ्यासाठी खास बांधल्या गेलेल्या विस्तीर्ण पटांगणावर होणार होता. सम्राट पंचम जॉर्ज यांच्यासाठी एक खास मुकुट बनवण्यात आला होता. त्यामध्ये सहा हजारांहून अधिक हिरे जडवले गेले होते. त्याखेरीज कित्येक पाचू, नीलम आणि माणके त्या मुकुटाची शोभा वाढवत होती. जवळ जवळ एक किलो वजनाचा तो मुकुट १२ डिसेंबर रोजी याच ठिकाणी पंचम जॉर्ज यांच्या मस्तकाची शोभा वाढवणार होता. त्याकरिता एक चबूतरा बांधला जात होता. तो भव्य चबूतरा बघून काली आणि मलिका परत फिरल्या.
"नकाशानुसार नक्की कंठा त्या किल्ल्यात आहे?" कालीने मलिकाला विचारले.
"दुर्दैवाने हो."
"मग संग्रामला या लोकांवर हल्ला करायला लावून आपण आत शिरकाव करायचा?"
"तू थोडा सबुरीने विचार करायला कधी शिकणार कोणास ठाऊक. इथे हजारो पहारेकरी आहेत. या देशावर सत्ता गाजवणारा राजा त्या किल्ल्यात राहायला येत आहे. अशावेळी आपण संख्याबळात किती मागे आहोत याची मला कल्पनाही करायची नाही. संग्राम सुद्धा किती जणांना थोपवू शकेल? शंकाच आहे."
"मग आता?"
"आपला सर्वोत्तम पर्याय हाच आहे की आपण हा दरबार होईपर्यंत काहीही करायचे नाही. या लोकांनुसार दरबार १६ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर हे लोक किल्ला सोडून भ्रमंती करायला दिल्लीबाहेर पडतील. असं म्हणतात की तो राजा शिकारीचा मोठा शौकीन आहे. तो शिकारीकरिता नक्की हिसारच्या जंगलात जाईल. एकदा का तो तिकडे गेला की किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था थोडी ढिली पडेल. आणि मग ..."
"तोपर्यंत मी म्हातारी होऊन जाईन. मला हा पर्याय मान्य नाही."
"पण आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही."
"आहे ना. हा राजा किल्ल्यात चोवीस तास नसेल. जेव्हा तो या चबूतर्‍यावर बसायला येईल तेव्हा आपण किल्ल्यात शिरायचं."
"पण आपल्याला किल्ल्यात नक्की तो कंठा कुठे आहे ते माहित नाही. नकाशा फक्त अंदाजे कुठे आहे हे सांगतो आहे. एवढा मोठा धोका पत्करायचा म्हणजे ........."
कालीचे रागीट डोळे पाहून मलिका काय समजायची ते समजली. त्या दोघी झपाझप पावले टाकीत दिसेनाशा झाल्या.

~*~*~*~*~*~

१ डिसेंबर १९११
बॉम्बे, ब्रिटिश इंडिया

जॉर्ज फ्रेडरिक अर्न्स्ट अल्बर्ट याचा जन्म ३ जून १८६५ साली झाला. तेव्हाच्या प्रिन्स ऑफ वेल्स, सातव्या एडवर्डचे हे दुसर्‍या क्रमांकाचे अपत्य. त्याचा मोठा भाऊ ड्यूक ऑफ क्लॅरेन्स, प्रिन्स अल्बर्ट १८९२ मध्ये न्यूमोनियाने वारला. जॉर्जची आजी राणी व्हिक्टोरिया १९०१ मध्ये वारल्या नंतर एडवर्डने पदभार स्वीकारला. पण एडवर्डच्या नशीबी राजेपण फार काळ नव्हते. त्यांचे वयही जास्त होते. १९१० मध्ये एडवर्ड यांचे निधन झाल्यानंतर जॉर्ज सर्वात थोरला वारस असल्याने तख्त त्याच्याकडे स्वतःहून चालत आले. पंचम जॉर्ज या नावाने त्याचा जून १९११ मध्ये राज्याभिषेक करण्यात आला. लॉर्ड हार्डिंग्जने चाणाक्षपणे मार्च मध्येच जॉर्जला भारतात यायला राजी केले होते. त्यानुसार जलमार्गे सुवेझच्या कालव्यातून लाल समुद्र मग अरबी समुद्र असा जवळपास तीन आठवड्यांचा शिणवणारा प्रवास करून अखेर पंचम जॉर्ज यांचे जहाज मुंबईत पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या अपोलो बंदरात अलोट जनसागर उसळला होता. गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती पाहून संतोष व्यक्त करून सम्राट आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासाठी एक शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तिथे अनेक उच्चपदस्थ त्यांची वाटच पाहत होते. त्यात सर हेन्री मॅक्सवेलही होते.

"सर मॅक्सवेल, आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे मुंबई शाखेचे प्रमुख." ..... मॅक्सवेल यांची औपचारिक ओळख करून देण्यात आली. काहीनिमित्त काढून सम्राटांनी मॅक्सवेलशी बोलायला सुरुवात केली
"सर मॅक्सवेल"
"युअर एक्सलेन्सी"
"आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचं तुम्ही प्रामाणिक उत्तर द्याल अशी आमची अपेक्षा आहे."
"निश्चितच युअर एक्सलेन्सी."
"सध्या युरोपात काय धांदल चालली आहे ते तुम्हाला वेगळे सांगायला नको. त्याचे भारतात पडसाद निश्चित उमटले असणार आहेत. मला स्वतःची विशेष काळजी नाही. पण माझ्यासोबत मेरी सुद्धा आहे. मेरी एक पत्नी म्हणून उत्कृष्ट आहे. तिच्या केसालाही धक्का लागलेला मला सहन होणार नाही. तुम्ही सुरक्षा प्रमुख आहात आणि माझ्या माहितीनुसार हेरखात्याशी सुद्धा तुमचा संबंध आहे. तर ....?"
जॉर्जचा प्रश्न सूचक होता. हेन्रींने स्मित केले आणि ते म्हणाले
"युअर एक्सलेन्सी. राज्यपद हे काट्याने वेढलेल्या गुलाबासारखे असते. सगळे काटे काढणे तर शक्य नाही. पण गुलाबाला त्या काट्यांपासून काहीही इजा होणार नाही याची काळजी इतर झाड घेत असते. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आणि हर मॅजेस्टी मेरी यांना या संपूर्ण प्रवासात काहीही होणार नाही. तुमच्या सुरक्षेची काळजी घेणारे तुमचे विश्वासू दिल्लीत आधीच हजर आहेत.
जॉर्जनी मोठ्या समाधानाने हातातल्या शँपेनचा ग्लास हलकेच हेन्रींच्या ग्लासला भिडवला. दिल्ली दरबाराला आता काहीच दिवस बाकी होते.

********

७ डिसेंबर १९११

मुंबई ते दिल्ली हा प्रवास पूर्वी मोठाच खडतर होता. मुंबई ही इंग्रजांच्या ताब्यात तर दिल्ली मुघलांची राजधानी. सुरुवातीला दोघांमध्ये वितुष्ट नसले तरी फारसे सख्यही नव्हते. अकबर आणि जहांगीर या पितापुत्रांनी इंग्रजांना फारसे महत्त्व दिले नाही पण शाहजहानने त्यांना अनेक परवाने देऊन भारतात स्थिरावण्यास मोलाची मदत केली. त्यानंतर मात्र मुघल आणि इंग्रज यांचे संबंध पुष्कळच सुधारले. पण दिल्ली आणि इंग्रजांमधले अंतर काही कमी झाले नाही. उलट जशी वर्षे सरली तसे हे अंतर वाढतच गेले कारण मधले प्रांत मराठ्यांनी काबीज केले. मराठे आणि इंग्रज यांच्यात मात्र फारसे सख्य कधीच निर्माण झाले नाही. त्यातल्या त्यात तुळाजी आंग्र्याचा बंदोबस्त करताना पेशव्यांनी इंग्रजांची घेतलेली मदत इतपतच त्यांच्यातली मैत्री. एकोणीसाव्या शतकात मराठ्यांचा पाडाव केल्यानंतर मात्र इंग्रजांनी गंगेच्या मैदानांतून रेल्वेचे जाळे विणायला सुरुवात केली आणि मुंबई ते दिल्ली अंतर खूपच कमी झाले. तरीसुद्धा ट्रेनचा प्रवास जवळपास तीन दिवसांचा होणार होता. मध्ये मध्ये जॉर्ज आणि मेरी यांना प्रवासाचा शीण भासू नये म्हणून विश्रांतीची सोय करण्यात आली होती.

हेन्रींसाठी हा प्रवास फारसा उत्साहवर्धक नव्हता. जेव्हा काहीच घडत नसेल तेव्हा ती वादळापूर्वीची शांतता असते हे त्यांना अनुभवाने कळले होते. जॉर्ज आणि मेरी यांनी मात्र प्रवासाचा पुरेपुर आनंद लुटला. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी त्यांच्या सरबराईत कोणतीही कसर ठेवली नव्हती. अखेर ते सर्व दिल्लीस पोहोचले. दिल्लीत त्यांच्या स्वागतासाठी खास मोटरगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. रोल्स रॉईस सिल्व्हर घोस्टमधून सम्राटांना लाल किल्ल्यापर्यंत नेण्यात आले. तेव्हा त्यांचा रस्ता पूर्णपणे मोकळा राहिल याची काळजी घेण्यात आली होती. आजूबाजूच्या घरांतून लोक वाकून जॉर्ज दिसतात का बघण्याचा प्रयत्न करत होते. पण एवढ्या गर्दीतून बंदिस्त मोटारीत बसलेला एक माणूस दिसणे केवळ अशक्य होते.

याच गर्दीत ख्रिस आणि जोसेफ सुद्धा होते. अर्थात ते जॉर्ज यांच्या ताफ्यात होते पण आजूबाजूच्या जनसमुदायापासून ते वेगळे पडले नव्हते. ख्रिसला अचानक मागून कोणीतरी आपला कोट धरला आहे याची जाणीव झाली. त्याने वळून पाहिले तर तो फणींद्र होता. त्याचे डोळे आता ख्रिस विसरूच शकत नव्हता.
"थॉट यू मिस्ड मी. सो स्टॉप्ड बाय टू से हाय." एवढेच म्हणून फणींद्र गर्दीत दिसेनासा झाला.
जोसेफने ख्रिसकडे पाहिले. त्याचा चेहरा पाषाणवत कठोर झाला होता. पुढचे नऊ दहा दिवस या माणसासोबत त्यांना मानसिक लढाई करायची होती. या तणावावर मात करून जो आपली योजना व्यवस्थित पार पाडू शकेल तो जिंकणार होता. सम्राट पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी यांचे दिल्लीत आगमन झाले होते. दिल्ली दरबारास अनौपचारिक स्तरावर सुरुवात झाली होती.

~*~*~*~*~*~

दिल्ली दरबार एकूण नऊ दिवस चालणार होता. ७ डिसेंबर १९११ रोजी औपचारिक उद्घाटन होते. सकाळी ठीक १० वाजता शाही परिवार लाल किल्ल्यात प्रवेश करणार होता. अगदी अचूक सांगायचे तर लाल किल्ल्यातल्या सलीमगडमध्ये प्रवेश करणार होता. पुढचे दोन दिवस मुख्यत्वे मेजवान्यांचे होते. या दिवसात विविध संस्थानिकांच्या, राजे रजवाड्यांच्या गाठभेटी होणार होत्या. ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ख्रिस्तवासी राजे एडवर्ड यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न होणार होता. त्याच रात्री ठीक आठ वाजता सम्राटांच्या साठी शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काही खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनपासून जॉर्ज व मेरी पोलो स्पर्धेच्या उपांत्य आणि फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या सामन्यांचा आनंद घेणार होते. नंतर रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पोलो मैदानावर टॉर्चलाईट टॅटूचे आयोजन करण्यात आले होते. डो डन टॅप टू या डच वाक्प्रचारातून उगम पावलेली टॅप टू किंवा टॅटू परेड ही आता एक प्रथा झाली होती. यामध्ये विशिष्ट ठेक्यावर लयबद्ध संचलनाला संगीताची जोड दिली जाते आणि सैनिक या प्रथेतून उगम पावलेला नृत्यप्रकार सादर करतात. साडेनऊ पर्यंत प्रथम नृत्य झाल्यानंतर दहापर्यंत ड्रमर्स वादन करत राहतात तर नर्तक आपापल्या बराकीत परततात. या परेडपूर्वी उत्तम दर्जाची बीअर घेणे हाही प्रथेचाच एक भाग आहे. १० डिसेंबर रविवारचा दिवस होता. जॉर्ज व मेरी सैनिकी कँपमधल्या चर्चला ठीक साडेदहा वाजता भेट देणार होते. ११ डिसेंबर रोजी अकरा वाजता पोलो मैदानावर कलर परेड असणार होती (presentation of colours). ब्रिटिश सेनेच्या विविध तुकड्यांना विशिष्ट रंग नेमून दिलेले असतात. या रंगांचे संचलन करून राजा आणि राणीसमोर प्रदर्शन केले जाते. त्याला प्रेझेंटेशन ऑफ कलर्स म्हणतात. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पोलो स्पर्धेच्या अंतिम सामन्यास त्यांची हजेरी होती.

१२ डिसेंबरला प्रत्यक्ष दरबार भरणार होता. दुपारी बाराला दरबाराची सुरुवात होणार होती. त्या दिवशी जॉर्जचा पुन्हा एकदा राज्याभिषेक केला जाणार होता. या प्रसंगी संपूर्ण हिंदुस्थानातले सर्व संस्थानिक आपापल्या परीने नजराणा, भेटवस्तु देणार होते. त्याबरोबरच बंगालची फाळणी रद्द केल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार होती. त्यानंतर सम्राटांचा थकवा दूर व्हावा म्हणून बेला मैदानावर आणखी एका टॅटू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठपासून संस्थानिकांशी संवाद व्हावा म्हणून खास मेजवानीचे आयोजन केले होते. १३ डिसेंबरला सकाळी ठीक सव्वादहा वाजता लष्करी अधिकारी आणि भारतीय अधिकारी यांच्या गाठभेटी घेतल्या जाणार होत्या. दुपारी साडेतीन वाजता जॉर्ज व मेरी सामान्य जनतेला लाल किल्ल्याच्या झरोक्यातून दर्शन देणार होते. रात्रीचे जेवण ते आप्तेष्टांसोबत आणि शाही परिवारासोबत करणार होते. १४ डिसेंबरला हिंदुस्थानमधल्या शासनाचा अहवाल व्हाईसरॉय हार्डिंग्ज सम्राटांसमोर सादर करणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. दुपारी हॉकी सामन्यांचा आनंद घेतल्यानंतर, रात्रीच्या मेजवानीनंतर, साडेनऊपासून इन्व्हेस्टिचर समारंभ असणार होता. यात सम्राट विविध पदव्या बहाल करणार होते. इथेच नवीन लॉर्ड्स, अधिकारी यांच्या पदोन्नतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार होते.

१५ तारखेला पोलिसांचा अहवाल व त्याचा आढावा घेऊन मग जॉर्ज आणि मेरी मुख्यत्वे विश्रांती घेणार होते. दुपारी सैनिकी संचलन आणि इतर काही स्पर्धांना हजेरी लावून रात्री जेवणानंतर नऊ वाजता त्यांनी मुष्टियुद्ध स्पर्धेचे बक्षीस वितरण करायचे होते. त्यानंतर पुरेशी झोप घेऊन १६ डिसेंबरला सकाळी समारंभपूर्वक त्यांना निरोप देण्यात येणार होता. त्यासाठी हार्डिंग्ज यांनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. दुपारी ठीक १ वाजता सम्राट पंचम जॉर्ज दिल्लीतून बाहेर जाणार्‍या ट्रेनमध्ये बसणार होते. असा दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम दिल्ली दरबारात होता. दिल्ली सजली होती. ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट दिल्लीत पोहोचला होता. शिकारी तयारीत होते, जाळेही टाकलेले होते. आता प्रश्न इतकाच होता की शिकार कोण आणि शिकारी कोण?

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66396

Group content visibility: 
Use group defaults

एक्स्ट्रा फीचर

पंचम जॉर्ज यांची भारतभेट अतिशय तपशीलात जाऊन आयोजित केली गेली होती. या भागाच्या शेवटी दिलेले वेळापत्रक खरे आहे. १९११ मध्ये याच क्रमाने दरबाराचे कामकाज आणि विविध समारंभ आटोपले गेले होते. तेव्हा किल्ल्याचे पहारेकरी कोण होते, सम्राटांसोबत किती जण असणार होते, प्रत्येक संस्थानिकाच्या लवाजम्याच्या नोंदी आणि त्याने दिलेल्या नजराण्याच्या नोंदी हे सर्व आजही उपलब्ध आहे. या कथेसाठी आवश्यक तेवढेच तपशील नमूद करण्यात आले आहेत. जर संपूर्ण दस्तावेज अभ्यासायचे असतील तर खालील दुव्यावर टिचकी मारा. तिथे दरबाराचा अहवाल उपलब्ध आहे.

https://archive.org/details/coronationdurbar030742mbp

पायस खऱ्या गोष्टीत कल्पित गोष्ट तुम्ही अतिशय एकसंधपणे विणली आहे. कल्पित गोष्टीतही वास्तव इतके घट्ट विणले आहे की ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे अशाच घडल्या असणार असेच वाटते.

कुठलाही राजा त्याच्या आधिपत्याखालील भागाला भेट देणार तेव्हा तिथल्या असंतुष्टांच्या हातून अशा काही घटना घडण्याची आणण्याची शक्यता सार्वत्रिक असावी. राजालाही हे माहीत असावेच, वरील एका संवादातून ते दिसते. असे असतानाही मजेत आनंद लुटणे किती कठीण असावे, सत्ताधाऱ्यांना ते रोजचे वाटत असेल.

पुढचे भाग पटापट टाका. काली व मलिका लाल किल्ल्यात काय करणार याची उत्सुकता आहेच पण राजाच्या मुक्कामी त्या हे धाडस करतील हे जाणून जोसेफ व ख्रिस काय करतात याचीही तेवढीच उत्सुकता आहे. त्यात जोसेफला फणीनदरमध्ये रस तर ख्रिसला काली व मलिकामध्ये... बघू काय होतंय!!

एक नंबर
पुढचा भाग कधी ते नाही लिहिले!
गेल्या वेळेप्रमाणे लॉंग ब्रेक घेऊ नकोस रे..