फ्री...? : भाग १८ (अंतिम)

Submitted by पायस on 13 June, 2018 - 10:49

"फ्री..?" चा अंतिम भाग वाचनास उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. मला आशा वाटते की सर्व धागे जुळून आले असावेत. तसे नसेल तर मी दिलगीर आहे. ही कादंबरी इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचा सदैव ऋणी राहीन. वेळोवेळी प्रतिसाद देऊन हुरुप वाढवणार्‍या मायबोलीकर वाचकांचे विशेष आभार!

~*~*~*~*~*~

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66396

"रुद्र आणि काली एकच व्यक्ती आहेत." ख्रिस अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला.
"कारण फ्री म्हणजे .........
................
................

फ्रीक!!"

******

फ्रीक!

असं सांगितलं जातं कि १६४२ मध्ये चार्ल्स राजाच्या दरबारात एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाने हजेरी लावली. अगदी खरं सांगायचं तर ते दोघे होते. लॅझारस आणि जोहान बॅप्टिस्टा कोलोरेडो या दोघा भावांनी जेव्हा दरबारात प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे सर्वजण टकमक बघतच राहिले. लॅझारसने पायघोळ झगा कपडे परिधान केले होते. पाठीवरची झूल जमिनीवर लोळत होती. प्रवेश केला तेव्हा ती झूल त्याने आपल्या सर्वांगावरून शाली सारखी पांघरली होती. त्याने मान तुकवून मुजरा केला पण तो गुडघ्यातून खाली वाकला नाही. त्याचे कारण सर्वांना माहित होते पण त्यांना ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायची होती. त्याने ती झूल बाजूला सारताच जोहान सर्वांच्या दृष्टीस पडला. लॅझारसच्या छातीला जोहानचे धड जोडलेले होते. त्याचे धड अधांतरी लोंबत होते. त्याचे दोन्ही डोळे मिटलेले होते, तोंड उघडे होते आणि त्यातून लाळ गळत होती. हे बीभत्स दृश्य पाहून कोणालाही किळस आली असती पण सतराव्या शतकात लंडन खूप वेगळे शहर होते. त्या काळात अशा नैसर्गिक विकृतींचे प्रदर्शन करणे ही मान्यताप्राप्त गोष्ट होती. अशा व्यक्तींसाठी इंग्रजांनी फ्रीक ही संज्ञा प्रयुक्त केली. असे लोक जे वेगळे आहेत आणि ज्यांच्यात काहीतरी अनैसर्गिक आहे. त्यांचे प्रदर्शन करण्यात काहीच गैर नाही अशी समाजमान्य धारणा होती. लॅझारस एकटाच हिंडत असे. लवकरच कोणातरी व्यावसायिक स्वभावाच्या व्यक्तीने याच्यात लपलेली संधी शोधली. असे फ्रीक्स एकगठ्ठा गोळा करून त्यांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात झाली. फ्रीकशोजचे लोण प्रथम युरोपात आणि नंतर अमेरिकेत पसरले. बर्थोल्टला फ्रीक शब्दामागच्या इतिहासाची कल्पना होती. तरीही भारतात फ्रीक्स बघण्याची अपेक्षा त्याला नव्हती.

~*~*~*~*~*~

जोसेफला बरोबर घेऊन ख्रिस आणि रश्मी यमुनेकडे तोंड असलेल्या भिंतीकडे चालू लागले. ख्रिसच्या हातात किल्ल्याचा नकाशा होता. त्याने त्या नकाशात एका विशिष्ट बुरुजावर खूण केलेली होती. त्या बुरुजाच्या दिशेने झपाझप पावले उचलली जात होती.
"ख्रिस"
"हं?"
"कशावरून हाच बुरुज?"
"हा नकाशा नीट बघ."
"बघितला आहे की. आपण दोघेच अनेकदा हा नकाशा घेऊन बसलो होतो."
"हो पण पूर्वी आपल्या डोक्यात ही शक्यता नव्हती की कोणीतरी बुरुजात लपून नेम साधणार आहे. हा नकाशा नीट बघ. या भिंतीत तो झरोका आहे जिथून उद्या झरोकादर्शन दिले जाईल. आता इथे नेम साधायचा असेल तर खरंतर सर्वोत्कृष्ट जागा नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरची कोणतीतरी उंच इमारत असेल. पण या किल्ल्याच्या वास्तुविशारदाने तिथे एकही उंच इमारत ठेवलेली नाही. तिथे झाडे असली तरी त्यांना अशा रीतिने कातरली आहेत कि तिथे कोणाला लपता येणार नाही. कोणत्याही नेमबाजाला तिथे लपता येणार नाही याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे."
"मग या बुरुजात असे काय खास आहे?"
"किल्ल्याचा आराखडा पुन्हा एकदा बघ. हा हिस्सा पूर्वी सलीमगड नावाने ओळखला जात असे. जेव्हा हा किल्ला बांधला जात होता तेव्हा सलीमगडाभोवती हे बांधकाम केले गेले. सलीमगडातून कधी झरोकादर्शन देण्याची वेळ न आल्याने त्याचे बांधकाम या सर्व बाबी डोक्यात ठेवून केलेले नाही. पण हा किल्ला बांधताना तसे करणे भाग होते. सहसा असे भुईकोट किल्ले चौरसाकृति असतात. त्याभोवती खणलेला खंदक आणि चौरसाची सममिती अशा किल्ल्यांचे बलस्थान असते हे खूप पूर्वी वास्तुविद्याविशारदांच्या लक्षात आले होते. इथे मात्र किल्ला चौरस तर जाऊच देत, आयताकृतिसुद्धा नाही. सलीमगडाच्या बाजूचा हा एक बुरुज एखाद्या शिंगासारखा बाहेर आला आहे. तिथून झरोक्यावर सहज नेम धरता येऊ शकतो."
"ओह्ह. झरोक्यावर नेम धरता येऊ नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण असले तरी या विशिष्ट रचनेमुळे फक्त या बुरुजातून असा कोण साधता येत आहे कि झरोक्यात उभ्या असलेल्या व्यक्तीवर नेम साधता येईल."
"यामुळेच हल्ला लाल किल्ल्यातच होऊ शकतो. म्हणूनही कदाचित फणींद्रने दरबाराच्या इतर कार्यक्रमांकडे सपशेल दुर्लक्ष केले. तो तिथे फिरकलाही नसणार आणि सगळे त्याला शोधून शोधून थकले."
"पण ख्रिस, मलिका, काली आणि रुद्रचे काय? तू त्यांचा शोध घ्यायला कोणालाच पाठवले नाहीस." रश्मीने आपली शंका व्यक्त केली.
"गंगादास काय म्हणाला होता ते नीट आठव. दिल्लीच्या जुन्या नकाशांसोबत तुलना केली तर लगेच कळून येते की नकाशा लाल किल्ल्यातच आहे."
"तर त्याचे काय?"
"१७ व्या शतकात जेव्हा शाहजहानने दिल्लीचा कायापालट केला आणि शाहजहानाबाद वसवले तेव्हा दिल्लीत अनेक आमूलाग्र बदल झाले. जर गंगादास जुन्या दिल्लीच्या नकाशांकडे लक्ष वेधत असेल तर त्याच्या डोक्यात अशी कोणतीतरी खूण असली पाहिजे जिच्यात बदल तर झाले पण ती अजूनही पूर्ववत, पूर्वीच्याच ठिकाणी आहे. पुन्हा ज्या कोणी तो कंठा लपवला होता त्याने निश्चित भविष्याचा विचार करूनच ती जागा निवडली असणार. सलीमगडासारखा किल्ला राजवंशात बदल झाला तरी जतन केला जाईल. असे असल्यावर लाल किल्ल्याच्या त्या हिश्श्यात कंठा लपवणार नाही तर अजून कुठे लपवणार?"
ख्रिसला आपल्या बोलण्याचा पुरावा द्यायची गरज पडली नाही. त्यांना लवकरच पहारेकर्‍यांची अनुपस्थिती जाणवली. शव एकाचेच सापडले असले तरी हळूहळू इथला पहारा शिथिल केला जात असल्याची जाणीव त्यांना होत होती. जेव्हा ते बुरुजाच्या माथ्यावर आले तेव्हा ख्रिसने एक कंदील आपल्या हातात घेतला. सोबत घेतलेल्या शिपायांना तिथेच थांबायची खूण करून जोसेफ आणि रश्मीला बरोबर घेऊन त्याने पायर्‍या उतरल्या. त्याला हवे असलेले तिघेही तिथेच होते.

~*~*~*~*~*~

"फ्रीक? हा काय प्रकार आहे?" फणींद्रची नजर तुलनेने लवकर स्थिरावली. त्याने आपली बंदूक अंदाजे शत्रूच्या दिशेने रोखली आणि तो गवाक्ष असलेल्या भिंतीला पाठ लावून उभा राहिला.
"कोणीही हालचाल करू नका. माझा नेम चुकणार नाही. तू ..." त्याने ख्रिसला इशारा केला.
"फ्रीक वगैरे काय म्हणत आहेस त्याचं मला काही घेणं नाही. पण तू माझी इथून बाहेर पडायची सोय आहे. तुझे लोक वरती आमच्यासाठीच थांबले असतील. त्यांना हे दोघे मी गिफ्ट पॅक करून द्यायला तयार आहे."
"चांडाळा!!" मलिका कडाडली. "काली तुझी होऊ घातलेली सरदार आहे. तू तिच्यासोबत गद्दारी करत आहेस हे लक्षात असू दे."
"काली?" फणींद्र हसला. "या हिजड्याला तू आमचा सरदार बनवायला निघाली आहेस?"
"इफ आय मे इंटरजेक्ट ..." ख्रिसने तोंड उघडले.
"लूक, आम्हाला वाटाघाटी करण्यात काहीच अडचण नाही. जोसेफ, रश्मी?" दोघांनाही ख्रिसचा अंतस्थ हेतू कळला. त्यांनी मान डोलाविली.
"पण हे दोघे जोवर शांत बसणार नाहीत तोवर आपण काही करू शकणार नाही."
"एवढंच ना? फणींद्रने शांतपणे खिशातून एक पिस्तुल काढले आणि प्रत्येकी दोन गोळ्या मलिका आणि कालीच्या पायांवर झाडल्या.
"आता फारशी कटकट करणार नाहीत. ख्रिस, माझ्या मागण्यांचे काय करणार आहेस. मी फार संयमी मनुष्य नाही हे तुला माहित आहेच."
"तिकडे येतोच पण तत्पूर्वी रुद्र .. नाही सॉरी काली. जे काही असो, तो किंवा ती तृतीयपंथी नाही. आजचे विज्ञान हे नीट समजून घेण्याइतके प्रगत नाही पण तुमच्या पंथाला अपेक्षित अर्धनारीश्वर हाच आहे. मी गंगादासला विचारले होते की कोणती अशी वनस्पती आहे का जी गर्भाचे लिंग कोणते असेल यावर प्रभाव पाडू शकते. मलिकाकडे बहुधा ती वनस्पती होती."

******

"सुलक्षणा तुला खात्री आहे की हा काढा प्यायल्याने अर्धनारीश्वर माझ्या पोटी जन्माला येईल." शक्तीपुरची धाकल्या महाराणीची दासी मलिका तिची बहीण असल्याचे आणि ठगांच्या एका कडव्या शाक्तपूजक पंथाची अनुयायी असल्याचे कोणाला माहित नव्हते. हे लग्नसुद्धा मलिकाने घडवून आणले होते. आता जर शक्तीपुरची दंतकथा खरी असेल तर तिच्या पोटी मुलगीच जन्माला यायला हवी. जरी नसली तरी समागम करण्याआधी तिला तशा प्रकारचा काढा देऊन तिचे शरीर त्या पद्धतीने तयार केले गेले होते. आता जर तिच्या गर्भात पुरुषाची लक्षणे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चित जन्माला येणारा किंवा येणारी अर्धनारीश्वरच!
"अर्थात! निव्वळ कोणी भविष्य वर्तवले की अवतार जन्माला येईल म्हणून अवतार जन्माला येत नसतो. तो जन्माला घालावा लागतो. माझ्यावर विश्वास ठेव की हाच एक मार्ग आहे की ज्याने तुझ्यापोटी आपल्या पंथाला अपेक्षित असा अवतार जन्माला येईल."
मलिकाला हे ठाऊक होते की असे प्रयत्न तिच्याआधी सुद्धा केले गेले होते. ते पूर्वापार चालत आलेले ज्ञानच ती पुन्हा वापरत होती. या सर्वात बाळंत आणि गर्भ दोन्ही गमावण्याचा धोका होता पण मलिका तो पत्करायला तयार होती. तसेच अगदी बाळ जन्माला आलेच तरी त्या काढ्याचा प्रभाव पडण्याची शक्यता खूप कमी होती. पण जर तसे नसते तर त्या अवताराच्या अवतारपदाला काय अर्थ राहिला?

यावेळेस मात्र मलिकाचे ग्रह उच्च होते. जन्मलेला मुलगा होता. पण मलिकाने तो किंचित मोठा होईपर्यंत वाट पाहिली. तिच्या अपेक्षेनुसार त्याचे विशिष्ट अवयव सामान्य पुरुषाप्रमाणे नव्हते. तसेच त्याच्या शरीराची ठेवण काहीशी मुलींसारखी होती. काढ्याने आपले काम केले होते. मुलाचे नाव रुद्र ठेवले गेले. पण जर रुद्र अर्धनारीश्वर असेल तर त्याच्यातल्या स्त्रीला बाहेर काढले पाहिजे. लवकरच मलिकाच्या लक्षात आले की रुद्रचे शरीर एक असले तरी त्याच्यात दोन व्यक्तीमत्वे नांदत आहेत. तिने कालीला आपल्या छत्रछायेखाली घेऊन वाढवले. रुद्रची शक्ती आणि कालीचे क्रौर्य अशा दोन गुणांना मलिकाचे सदैव प्रोत्साहन होते. गरज फक्त होती तो कंठा शोधण्याची. तिला जयाचा पत्ता लागला खरा पण जयाने काही ते कागद तिच्या हवाली केले नाहीत. इकडे तिची बहीण फार काळ जगली नाही. शक्तीपुरमधले काम आटोपल्यानंतर अर्थातच त्याची राखरांगोळी केली गेली. रुद्र/काली पुरेसे मोठे झाल्यानंतर मलिकाच्या सुपीक डोक्यात सर्कसची कल्पना आली. तिने भद्रच्या रुपाने एका जुन्या सिंहपंथीयाला आपल्यासोबत घेतले. व्याघ्रपंथाचे रहस्य जाणून घेण्याकरिता नागराजलाही आपल्या जाळ्यात अडकवले. तिथून सुरु झालेला प्रवास अशा रीतिने संपेल हे मात्र मलिकाला कधीच वाटले नव्हते.

*******

"हे अतर्क्य वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. किंबहुना यामुळेच तो फ्रीक आहे. फ्रीक म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जिच्यात काहीतरी असामान्य आहे. काहीतरी अतर्क्य, निसर्गनियमांविरुद्ध आहे. उदाहरणार्थ रुद्र एक इंटरसेक्स म्हणावा लागेल." क्षणभर पॉज घेऊन ख्रिसने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"आता विचार करा बर्थोल्ट भाषा अभ्यासक होता. भलेही नंतर त्याने डेव्हिडची मदत केली असेलही पण मूळात तो एक भाषातज्ज्ञ होता. त्याला आपल्या खून्याची ओळख पटवून द्यायची आहे. मरता मरता तो स्वभाषेत बोलेल हेही सयुक्तिक! पण त्याच्या डोक्यात ही भीति सुद्धा असावी की जर तो आत्ता जर्मनमध्ये बोलला आणि नंतर त्यावरून ब्रिटिश पोलिस जर्मनीपर्यंत त्याचे धागे नेतील. क्लासिक ओव्हरथिंकिंग! जर एखादा असा शब्द वापरता आला जो इंग्रजी आणि जर्मन दोन्ही भाषांमध्ये आहे तर? त्याच्या सुदैवाने फ्रीक एक असा शब्द आहे जो अनेक युरोपीय भाषांमध्ये त्याच अर्थाने वापरला जातो. म्हणजेच फ्रीक हा जर्मन शब्द सुद्धा आहे आणि इंग्रजी शब्द सुद्धा आहे. तसेच खूनी सुद्धा एक फ्रीक आहे."
"तो गोरा ...." आवाज पुरुषी होता. रुद्रला शरीरावर ताबा मिळाला होता.
"काली त्याच्या नजरेत कशी काय भरली कोणास ठाऊक. इतक्या मुक्कामांमध्ये काली कधीच कोणालाच सापडली नाही. याने मात्र तिला बरोबर शोधून काढले. त्यामुळे कालीला त्याला संपवायला जावेच लागले."
"वेल जर तुम्ही तुमचे वनस्पतीविज्ञान पुरुषांना आकर्षित करायला वापरणार असाल तर किमान बर्थोल्ट सारख्या चौकस वृत्तीच्या तरूणापासून तुम्ही सावध राहायला हवे होते."

******

७ मार्च १९११
बॉम्बे, ब्रिटिश इंडिया

बर्थोल्टला जेव्हा एल्साकडून कामाची ढोबळ रुपरेषा कळली तेव्हा तो जाम वैतागला होता. एकतर त्याला डेव्हिडसोबत काम करणे अजिबात पसंत नव्हते. उगाच लूपहोल्स असलेली योजना आखून त्याला धोका पत्करण्यात अजिबात रस नव्हता. त्यात २२ तारखेपर्यंत पंचम जॉर्ज यांच्या भारतभेटीची घोषणा होणारही नव्हती. काहीशा निरिच्छेनेच त्याने फणींद्रची भेट घ्यायला होकार दिला होता. मुद्दाम त्याने असे कॉफीगृह निवडले जिथे भारतीय आणि इंग्रज दोघांना मुक्त प्रवेश होता. मोठे इंग्रज अधिकारी अशा ठिकाणी जाणे कमीपणाचे समजत असल्याने तिथे ते फिरकले नसते. पुन्हा तिथे फारशी वर्दळ नसल्याने त्या दोघांना एकत्र बघितलेले लोक संख्येने कमी! मालकाची स्मरणशक्ती मंद असल्याची खात्री त्याने स्वतः आठवडाभर जाऊन करून घेतली होती. ठरल्या वेळी फणींद्र आला. त्याने वेळ पाळलेली पाहून बर्थोल्टचे मत काहीसे सुधारले.

फणींद्रचे डोळे त्याच्या नजरेत भरले. ती विसंगती बर्थोल्टला लगेच दिसली नसती तरच नवल! पण या विसंगतीत, विकृतीत काहीतरी आकर्षक होते. बर्थोल्टने मनोमन विचार केला असता त्याच्या लक्षात आले की मुळात आपले डोळेच किती विसंगत आहेत. पांढर्‍या डोळ्यांत मध्येच एक काळा ठिपका दिला आहे. त्यापेक्षा संपूर्ण काळ्या डोळ्यात एक प्रकारचे सौंदर्य आहे. सममितीचे सौंदर्य आहे. जर हा योजनेची पूर्ती करणार असेल तर नक्कीच हा माझ्या योजनेचे बारकावे समजून घेईल. फणींद्रलाही लवकरच बर्थोल्टच्या योजनेमागचा सखोल विचार जाणवला. त्यांना मिळालेल्या बातम्या जर खर्‍या असतील तर ही योजना निश्चित पंचम जॉर्जच्या मृत्युस कारणीभूत ठरेल.

संशय येऊ नये म्हणून त्यांनी योजनेवर काम करण्यासाठी शहरात आलेल्या सर्कसमध्ये भेटायचे ठरवले. फणींद्रला तर त्या सर्कसमध्ये काही फारसे विशेष जाणवले नाही. त्याने अर्थातच रुद्र आणि मलिका सिंहपंथीय असल्याचे ताडले पण आता या प्रकाराशी फारसे घेणे देणे नसल्यामुळे त्याने फार ढवळाढवळ केली नाही. बर्थोल्टची गोष्ट वेगळी होती. कोणतीही विसंगती त्याला लगेच जाणवे. उष्मागतिकीचा दुसरा नियम ठाऊक असल्याने तो स्वतःहून जाऊन एंट्रॉपी वाढवत नसे. पण इथे काहीतरी वेगळे घडले. ती स्त्री या सर्व वातावरणात इतकी विसंगत होती की त्याला ते सहनच होईना. त्याने सरळ जाऊन तिचा हात धरला आणि तो सुगंध त्याच्या घ्राणेंद्रियाला जाणवला. काली या अकल्पित प्रकाराने भांबावून गेली होती. तिने हे निस्तरण्याची जबाबदारी रुद्रवर ढकलून दिली. पण रुद्र तरी काय करणार होता? अंगावर साडी असताना तो पदर बाजूला करून स्वतःला उघड तर करू शकणार नव्हता. तसेच इतक्या गर्दीत याचा काटाही काढू शकणार नव्हता. त्यांना आता बर्थोल्टलाही लक्ष्य करून संपवणे भाग होते.

बर्थोल्ट प्रचंड सावध असल्याने त्याने कालीला हव्या असलेल्या ठिकाणी येण्यास साफ नकार दिला. नाईलाजाने कालीने बर्थोल्टच्या निवासस्थानी जाण्याचा धोका पत्करला. अर्थातच बर्थोल्टला काली आणि रुद्र एकच असल्याचे लक्षात आले. किंबहुना ते रहस्य उघड करून बर्थोल्टच्या आयुष्यरेखा पुसण्याचा निर्णय घेऊनच ते दोघे तिथे गेले होते. बर्थोल्टला संपवल्यानंतर खिडकीवाटे ते पसार झाले. कमाल ताशी पन्नास मैल वेगाने धावू शकणारे संग्राम रुपी वाहन असल्यावर त्या भागातून दिसेनासे होणे फारसे अवघड नव्हते. मरण्यापूर्वी बर्थोल्टच्या मनात एकच विचार होता. या फ्रीकचे रहस्य कसे उघड करता येईल?

~*~*~*~*~*~

"पण मग आपण दोघांनी इंदूरात रुद्र आणि कालीला एकत्र पाहिले होते त्याचे काय?" रश्मीने विचारले.
"नाही. आपण रुद्र आणि एका लाल साडीतल्या स्त्रीला पाहिले. ती सिंहावर बसलेली असल्याने अंधारात तिची शरीरयष्टी कळून येणे आणखीनच अवघड होते. पण आता मी खात्रीने म्हणू शकतो की ती मलिका होती."
फणींद्र स्वतःशीच मोठ्याने हसला. "म्हणजे या लोकांच्या मूर्खपणामुळे ही योजना फसली तर. पण मग हे इथे का आले?"
"तो कंठा नको का मलिका?" ख्रिसच्या हातात सर्व पत्ते असलेले पाहून मलिकाचा धीर खचला. रुद्रने लंगडत लंगडत एका विशिष्ट जागची वीट थोडी सैल करण्यास सुरुवात केली. ती वीट मुळातच पक्की बसवलेली नव्हती. तिच्यावर तेच निशाणही होते. ती वीट काढताच तिथे एक छोटी दागिन्याची पेटी बसेल एवढा कोनाडा तयार झाला. पण तो कोनाडा रिकामा होता. हे मात्र कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्व काही क्षण स्तब्ध राहिले. त्यानंतर मात्र फणींद्रच्या भेसूर हास्याने ती जागा व्यापली.
"त्या पंथाचा नाद सोडण्याचा माझा निर्णय योग्यच होता. हे सर्व सांकेतिक भाषा आणि नकाशा आणि गुप्त कागदपत्रे वगैरेंची सोय केली खरी पण जर किल्ल्यात सहज नजरेत भरेल असे निशाण असलेली वीट खूण म्हणून ठेवली असेल तर कधी ना कधी तरी तिथे काहीतरी आहे हे कोणाच्या तरी लक्षात येणारच होते. आता तर इथून चोरलेला तो कंठा कुठे असेल हे अर्धनारीश्वरालाही ठाऊक नसेल."
इतर कोणाला ते लक्षात आले नाही तरी रुद्रला कालीची प्रतिक्रिया जाणवत होती. शरीर नाही पण आत्मा अमर आहे असे सांगितले जाते. इथे एक आत्मा अजूनही जिवंत असल्याने शरीर जिवंत होते पण काली त्या धक्क्यातून सावरेल अशी शक्यता दिसत नव्हती. रुद्रच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्याने लगेच हात चेहर्‍यावरून फिरवला. आता त्याच्या जगण्याला काही अर्थ नव्हता. त्याने लपवलेली चकमक आणि विस्फोटक कांडी हातात पकडली. मीरच्या साठ्यातून काही शस्त्रे लांबवण्यात तो यशस्वी झाला होता. याने ती खोली नष्ट होण्या इतका स्फोट नक्कीच झाला असता. ख्रिसनेही याची अपेक्षा केली नव्हती. त्याने इशार्‍यानेच रश्मी आणि जोसेफला माघार घेण्याच्या तयारीत राहायला सांगितले. पण ती वेळ आली नाही. फणींद्रने चालवलेली गोळी रुद्रच्या हृदयाच्या आरपार झाली होती. त्याच्या हातातून ती कांडी घरंगळली आणि स्फोट झाला. तो स्फोट रुद्रच्या अपेक्षेइतका नसला तरी फणींद्र टेकून उभा असलेल्या भिंतीला फोडण्यासाठी आणि त्या धक्क्याने आपल्या रायफलसकट फणींद्र खाली पडण्यासाठी तो पुरेसा होता.

******

संग्रामला खाली शिपायांनी घेरले होते. जोसेफ मुद्दाम दरबार सुरु झाल्यानंतर सयाजीराजे गायकवाडांच्या सुरक्षाप्रमुखाला भेटून आला होता. राजधानीत उपस्थित असलेल्या लोकांपैकी बर्बर जातीचा सिंह पाहिलेले लोक फक्त गायकवाडांकडेच असू शकत होते. त्याने सुद्धा आढेवेढे न घेता वेळ पडल्यास संग्रामला पकडण्याचे वचन दिले होते. त्यानुसार संग्रामला घेराव घालण्यात आला होता. त्याला हे कळत होते की या सगळ्यांना तो एकत्र आवरू शकत नव्हता. मागे किल्ल्याची तटबंदी आणि उर्वरित सर्व दिशांना मानवी कडे अशा अवस्थेत तो अडकला होता. त्याची पशुबुद्धि या कड्यातली कमकुवत साखळी शोधत होती जेणेकरून शिकार तिथून सुरु करता यावी. पण त्याची गरज पडली नाही. धडाम असा आवाज होऊन एक माणूस किल्ल्याच्या बुरुजातून खाली पडला. याने कडे भंगले असले तरी संग्रामचे लक्ष या नव्या मनुष्याने वेधून घेतले. पुण्यात आपल्या मालकाला त्रास देणारा हाच तो माणूस! संग्रामने गगनभेदी गर्जना केली आणि तो फणींद्रवर झेपावला.

इतक्या उंचावरून पडल्याने फणींद्रची बहुतांशी हाडे मोडली होती. नाकातून रक्ताची धार आली होती. त्या अवस्थेतही त्याला संग्रामचे अस्तित्व जाणवले. अगदी शेवटी सुद्धा "वाघ का सिंह" या प्रश्नापासून सुटका नाही हे पाहून त्याला हसू फुटले. संग्रामने एका झेपेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. संग्रामला पकडायला आलेले सगळे दिङमूढ होऊन पाहत राहिले. फणींद्रचे प्राण क्षणार्धात निघून गेले. संग्रामने विजयोन्मादात आणखी मोठ्याने गर्जना केली. पुन्हा एकवार त्याने आपल्या शिकारीकडे पाहिले तर त्याला तिथे एका वाघाचा चेहरा दिसला. तो वाघ जिवंत होता. संग्राम जर मनुष्य असता तर नक्की त्याने डोळे चोळले असते. त्याच्या अल्पमतीला आपण काय बघत आहोत हे कळत नव्हते. फणींद्रचे शरीर जरी मृत असले तरी त्याच्या स्नायूंना मेंदूने मरण्यापूर्वी दिलेली आज्ञा लक्षात होती. संग्रामला आत्ताशी आपण झेप घेण्याच्या नादात फणींद्रच्या बंदूकीवर शरीर रेलून उभे आहोत हे लक्षात आले. बंदूकीचे नळी संग्रामच्या पोटात खोलवर रुतली होती. फणींद्रच्या तर्जनीच्या स्नायूंनी शेवटची आज्ञा चोख बजावली. संग्रामच्या आतड्यांच्या चिंधड्या उडाल्या.

*******

मलिकाची अवस्था फारच वाईट झाली होती. भलेही फणींद्र जगण्याची शक्यता नगण्य असली तरी रुद्र आणि काली सुद्धा आता या जगात नव्हते. ज्यासाठी तिने हा अट्टाहास केला तो कंठा, त्यांच्या पंथाची गुप्त ठेव कोणी भलताच घेऊन गेला होता. बॉम्बेत तो धोका पत्करायलाच नको होता. फ्री.. त्या एका शब्दामुळे हा चहावेडा इंग्रज आपल्यामागे लागला आणि हे सर्व घडले. घडले काय, सगळंच संपले. आता कसला अवतार आणि कसले ते गतवैभव? का केली मी ही सर्व मेहनत?
"मलिका ...." ख्रिस, रश्मी आणि जोसेफ तिघेही जिवंत होते. त्यांनी वेळीच जिन्याच्या मागे लपून स्फोटाची तीव्रता तेवढ्या प्रमाणात जाणवणार नाही याची खबरदारी घेतली होती. मलिकाला आत्ता कुठे वेदनेची जाणीव झाली. तो स्फोट प्रचंड तीव्रतेचा नसला तरी स्फोटाच्या बरीच जवळ उभी असल्याने तिच्या भाजल्याच्या जखमा अधिक गंभीर होत्या. तिचा एक कान सोलवटून निघाला होता. त्या तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी त्यांच्या जखमा प्राणघातक नव्हत्या.
"सगळं काही संपलंय मलिका! तुला फ्रीक किंवा फ्री या दोन्हीचा अंदाज न येणं साहजिक आहे. तसेच तुझ्या या योजनेत दुर्दैव आड आलं यात तू काही करू शकत नाही. तू इतकं प्रायश्चित्त नक्की करू शकतेस की या हत्याकांडांची सर्व माहिती आम्हाला दे. किमान जी कुटुंबे त्यांच्या मुलांचा तपास करत आहेत आम्हाला त्यांना सत्य सांगता येऊ शकेल. या निमित्ताने तुझ्यावर तुमच्या पूर्वेतिहासाचे जे जोखड होते तेही नाहीसे झाले आहे. यू कॅन बी ट्रूली फ्री मलिका!"
"फ्री?" मलिका असहायपणे म्हणाली. "मी फ्री सुद्धा होऊ शकले नाही सर. जे प्रयोग रुद्रवर केले गेले होते ते माझ्यावरही केले गेले होते. कदाचित आमच्या नशीबातच फ्री चा अर्थ फ्रीक असा लिहिला होता."
"लेट बायगोन्स बी बायगोन्स मलिका." जोसेफ म्हणाला. "तुझा पंचम जॉर्ज यांच्याशी काही संबंध येत नाही. जर तू शरणागती पत्करलीस तर तुझी शिक्षा मृत्युदंडावरून जन्मठेपेवर आणणे काहीच अवघड नाही." जोसेफने ख्रिसला सावध राहण्याची खूण केली. अशी किरकोळ भाषणे मलिकाला बेसावध करू शकत नव्हती.
"जर मला शिक्षा चुकणार नसेलच तर मी किमान एकाला तरी सोबत घेऊन जाईन." मलिकाने इतकावेळ लपवलेली एक लहानशी गुप्ती घेऊन ख्रिसवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. तिची चपळाई पाहून ख्रिसही क्षणभर गांगरला. पण रश्मी सावध होती. तिने वेगाने हालचाली करत भिंतीला पायांनी रेटा देऊन हवेत आडवी होत मलिकावर चाल केली. तिची लाथ मलिकाच्या सोलवटलेल्या कानावर बसली. त्या हादर्‍याने गुप्ती मलिकाच्या गालाला लागली आणि गाल फाटून तिचा चेहरा फारच भयानक दिसू लागला. यानंतरही ती कशीबशी उभी राहिली. एव्हाना जोसेफचे पिस्तुल बाहेर आलेले होते. आता दया दाखवण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही त्याने तिला नि:शस्त्र करण्याकरिता हातावर गोळी झाडली. पण तिला संतुलन राखताना त्रास होत असताना एवढा धक्का सुद्धा पुरेसा होता. ती भेलकांडत जाऊन भिंतीच्या भगदाडावर आदळली. क्षणभर वाटले की ती आता खाली पडणार. दबकत दबकत जोसेफ तिच्या जवळ गेला. त्या स्फोटामुळे भगदाडाच्या कोपर्‍यांना धार आली होती. त्यातले एक धारदार टोक तिच्या पोटाला चिरून गेले होते. तिची गुप्ती केव्हाच गळून पडली होती. मलिका जरी जिवंत असली तरी तिच्यात आता काहीही हालचाल करण्याचे त्राण नव्हते. या वेदना सहन करत तिने काही मिनिटांनी इहलोकाचा निरोप घेतला.

~*~*~*~*~*~

"आज खास सम्राटांकडून अत्युच्च प्रतीचा चहा आलेला आहे, अदागिओ गोल्डन युनान." रश्मीने चहाचे कप भरता भरता सांगितले.
"हा चहा खरंच अस्तित्वात आहे तर. युनान प्रांतातला हा चहा अन्यथा बघायलाही मिळत नाही." ख्रिसने पुस्ती जोडली.
"म्हणजे एवढं सगळं करून फक्त चहाच मिळणार होता तर?" जोसेफने आपली खंत व्यक्त केली.
"हाऊ अबाऊट धिस?" मॅक्सवेल यांनी एक सिगार जोसेफला देऊ केली. संपूर्ण सिगार बावनकशी सोन्याचा वर्ख होता. तर टोकाला अस्सल चांदी लावलेली होती.
"किंग ऑफ डेन्मार्क सिगार?"
"म्हणजे एवढं सगळं करून फक्त एक सिगारच मिळणार होती तर?" ख्रिसच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून जोसेफने शांतपणे झुरके घेण्यास सुरुवात केली. सर्व गोंधळ पहाटे झाल्यामुळे सुदैवाने त्याचा फार गाजावाजा झाला नाही. त्यातल्या त्यात गायकवाडांना थोडीफार कल्पना आली पण त्यांना विश्वासात घेऊन हे प्रकरण दाबण्यात आले. या तिघांच्या जखमांच्या शुश्रुषेकरिता खास शाही वैद्य आणि त्यांच्या ताफ्याची नियुक्ती करण्यात आली. जखमा फार गंभीर नसल्या तरी त्यांनी झरोकादर्शनाचा कार्यक्रम चुकवला. स्वतः पंचम जॉर्ज आणि सम्राज्ञी मेरी त्या तिघांना भेट द्यायला जातीने येऊन गेले होते.
"उद्या परवा विश्रांती घ्या. सोळा तारखेला सकाळी सम्राटांच्या विशेष मेजवानीला तुम्हा दोघांना हजेरी लावायची आहे." हेन्रींनी जाता जाता पुष्टी जोडली.
"दोघांना?"
"आय अ‍ॅम सॉरी रश्मी. सम्राटांकडून तुला आमंत्रण असले तरी तिथे मेड किंवा वॅलेट यांना प्रवेश नसेल. सो ...." हेन्रींनी खांदे झटकले.
रश्मी काहीशी खट्टू झाली खरी पण तिने तसे दाखवले तरी नाही. जोसेफने धूराचे एक मोठे वर्तुळ हवेत काढले. रश्मी दुसर्‍या खोलीत गेल्यानंतर त्याने ख्रिसला हटकले.
"मग काय विचार केला आहेस?"
"कशाचा?"
"रश्मीला त्या विशेष मेजवानीत कसा घेऊन जाणार आहेस?"
कधी नव्हे तो ख्रिसही निरुत्तर होता. त्याला रश्मीला सोबत घेऊन जायची इच्छा तर होती पण ब्रिटिश एटिकेट्समधून पळवाट काढायची कशी? जोसेफ त्याची चलबिचल पाहून मनापासून हसला.
"आता मी सांगतो ते नीट ऐक."

~*~*~*~*~*~

१५ डिसेंबर १९११ ची रात्र

जेवण झाल्यानंतर रश्मीने बिछाना नीट केला. ख्रिसची झोपायची वेळ झाली होती. त्याला आज झोपण्यापूर्वी आणखी एक कप चहा दिला की तिची आजची कामे संपणार होती. उद्या पुन्हा लवकर उठायचे असल्यामुळे तिला लवकरात लवकर हे सर्व आवरून झोप पूर्ण करायची होती. चहा तयार करून आणण्यासाठी ती स्वयंपाकघराकडे जाणार तर ख्रिसच समोरून चहाचे सामान घेऊन आला.
"ख्रिस...... सॉरी सर. हे काय आहे?"
"हे काय आहे ते आपण नंतर बोलू. त्या आधी तुला दोन दिवसांपासून काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं तो आधी विचारावास. नाही त्याही आधी बसून घे." ख्रिसने दोन खुर्च्या ओढल्या. थोडा वेळ गेल्यानंतर रश्मीने अखेर ख्रिसच्या नजरेला नजर भिडवली. त्याच्या चेहर्‍यावर एक मंद स्मित होते. अखेर तिने हिय्या करून प्रश्न विचारलाच.
"मग यानंतर माझी नोकरी ...."
क्षणभर अवाक राहिल्यानंतर ख्रिस हसतच सुटला. "हा तुझा प्रश्न आहे?"
"नाही. म्हणजे हो. म्हणजे आणखी दोन आहेत."
"मग तो आधी विचार. तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी देणारच आहे. पण आधी तुझे उरलेले दोन प्रश्न."
"एक म्हणजे त्या सर्कसचे काय झालं?"
"मला अजून नीटसं कळलं नाही. मला एवढं माहित आहे की उमा सर्कशीतल्या उरलेल्या कलाकारांना घेऊन इतर कोणत्या तरी सर्कसमध्ये सामावून जाण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात काय होईल मला माहित नाही पण सध्या तरी त्यांना दुसर्‍या सर्कसमध्ये काम आहे. ते रस्त्यावर निश्चितच आलेले नाहीत." हे ऐकून रश्मीचा जीव भांड्यात पडला.
"आणि मला अजूनही कळलं नाही कि तुमचे वडील तुम्हाला फ्रीक का म्हणत असत?"
"हम्म. रश्मी, आज वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केली असली तरी प्रिमॅच्युअर बर्थमध्ये बाळ आणि बाळंतीण कोणतेही कॉम्प्लिकेशन्स न होता वाचणे खूप दुर्मिळ आहे. तीस वर्षांपूर्वीच्या डार्टमूरमध्ये तो एक अनैसर्गिक चमत्कार मानला गेला याचे मला आश्चर्य वाटत नाही. त्यात युरोपात फ्रीक्सची जाहीर प्रदर्शने भरवली जातात ज्यांना फ्रीकशो असे संबोधले जाते. काही फ्रीकशोज मध्ये जी बाळे प्रिमॅच्युअर बर्थमधून जगली नाहीत त्यांना फॉर्मेलिनमध्ये प्रिझर्व्ह करून त्यांचे प्रदर्शन केले जाते."
"इयू......." रश्मीच्या चेहर्‍यावर किळस लपत नव्हती.
"वेल यू आस्क्ड फॉर इट. हे बिभत्स आहे याची मला कल्पना आहे. पण जे आहे ते आहे. या पार्श्वभूमिवर माझ्या वडलांनी मला फ्रीक म्हणण्याचे मला आश्चर्य वाटत नाही."
"अं ..... ओके. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली."
ख्रिसने उत्तरादाखल हसून चहाचा कप भरला. तिच्या हातात एक कप दिला. तिने काही क्षण गोंधळून त्याच्याकडे पाहिले. मग एक घोट घेतला
"दार्जिलिंग, इंग्लिश ब्रेकफास्ट आणि सिलोन. मध आणि कॅमोमाईलची पाने."
तिच्या उत्तरावर ख्रिसच्या हास्याची लकेर अधिकच रुंदावली.
"तुझ्या नोकरीविषयी तू विचारत होतीस ना. मी बघितलं आहे की तू मला मध्ये मध्ये सर म्हणण्या ऐवजी ख्रिस म्हणतेस. असं होणार असेल तर तुझी नोकरी मला काढून घ्यावी लागेल."
रश्मीचा चेहरा पडला. पण त्याही अवस्थेत तिचे हात स्थिर होते. हातात चहाचा कप जो होता.
"असं नको करू ख्रिस. उप्स." तिने जीभ चावली.
"पण मला असं करावं लागेल रश्मी."
"पण का? ही एवढी मोठी चूक आहे का?"
"नाही. मी अजिबात रागवलेलो नाही."
"मग?"
"पण मी जर तुला नोकरीवरून काढले नाही तर माझी पार्टनर म्हणून मी तुला उद्याच्या मेजवानीला कसा घेऊन जाणार आहे?"
"काय?" रश्मी क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली.
"मी प्रामाणिकपणे सांगतो मूळ कल्पना जोसेफची आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे की तुला मी लाँग टर्म पार्टनर म्हणून आवडेनच असं नाही. पण एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. काय म्हणतेस?"
रश्मीने सावकाशपणे चहा संपवला. आता ख्रिसच्या मंद स्मिताची जागा उत्सुकतेने आणि डोळ्यांतल्या नकाराच्या भीतिने घेतली. काही क्षण तसेच गेले.
"ख्रिस!"
"रश्मी?"
"हा चहा तू बनवलास?" ख्रिसने मान डोलावली.
"आणि उद्या मी मेजवानीसाठी कोणते कपडे घालणार आहे?"
"आधी माझ्या प्रश्नाचं तर उत्तर दे."
"ख्रिस!!" रश्मीच्या आवाजात आता लाडिक उपरोध होता.
"मी विचारलं उद्या मी कोणता ड्रेस घालणार आहे?"
ख्रिसने तो प्रश्न स्वतः मोठ्याने म्हणून पाहिला. त्याला त्याचा अर्थ समजायला काही वेळ जावा लागला. कळल्यानंतर मात्र दोघांच्या चेहर्‍यावरून हसू ओसंडून वाहत होते.
चोरून त्यांचे संभाषण ऐकत असलेल्या जोसेफने सुद्धा डोळ्यात कचरा गेल्याचा अभिनय केला. सिगार ओढण्यासाठी तो बाहेर पडला तर हेन्री तिथे आधीच सिगार ओढत उभे होते.
"मग? ख्रिस पास?"
जोसेफ उत्तरादाखल हसला. दोघेही एक सुरात म्हणाले,
"दॅट फूलिश फ्रीक!"

(समाप्त)

(कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक! माबोव्यतिरिक्त ही कथा सध्यातरी कोठेही नसेल. जर तसे निदर्शनास आले तर कळवणे ही विनंती!)

Group content visibility: 
Use group defaults

माझा पहिला तर्क बरोबर होता म्हणजे! Happy

एकदम खतरनाक कादंबरी! काल त्या 'फ्री..'वर शोधाशोध करताना पण मजा आली.

मस्त ! जमलीये कथा .
रोज संध्याकाळी (भारतातील ) कथेच्या पुढच्या भागाची वाट पाहण्याचे सार्थक झाले .
पुलेशु

बोले तो एकदम झक्कास..
एखादा मस्त पैकी पिक्चर होऊ शकेल ह्या कादंबरी वर..

Das war absolut fantastische Erfahrung, diese Geschischte zu lesen Payas ! Danke sehr....

- Prasann

अभिनंदन पायस... खुप छान कथा... शेवट पर्यंत उत्सुकता अगदी ताणुन राहिली होती.. खुप मजा आली वाचताना...
पुढ़ील कादंबरीच्या प्रतीक्षेत...

मस्तच जमली आहे कादंबरी. मजा आली वाचताना.

फ्री म्हणजे फ्रीक हे आधीपासूनच वाटत होते पण फ्रीकचा इतिहास माहित नव्हता. जबरदस्त रिसर्च आहे!!! तरीही मला फणींद्रच्या विचित्र असण्यात काहीतरी रहस्य किंवा अंतस्थ हेतू असेल असे वाटले होते. मला पूर्ण कथा कळली नाहीये का???

तरीही मला फणींद्रच्या विचित्र असण्यात काहीतरी रहस्य किंवा अंतस्थ हेतू असेल असे वाटले होते. मला पूर्ण कथा कळली नाहीये का???>>>>
बरथोल्ट सोबत कालीला घेऊन येतो, तिच्यातील रुद्र बरथोल्टला मारतो, ह्या जोडगोळीला तो फ्रीक म्हणतो... रुद्र व काली ही एकाच शरीरात वावरणारी दोन व्यक्तिमत्वे.

सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार Happy श्रद्धा, rmd, वरदा, साधना, विवेक, जाई, Nidhii, हिम्सकूल, प्रसन्न, Mishti, प्राजक्ता, समाधानी, आसा, सुमुक्ता प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

Das war absolut fantastische Erfahrung, diese Geschischte zu lesen Payas ! Danke sehr.... >> Danke schön Prasann!

सुमुक्ता यांच्या प्रतिसादानंतर ही एक्स्ट्रा फीचर अ‍ॅड करावीशी वाटली. हवे तर हिला मेकिंग म्हणा, थिंकिंग आऊट लाऊड म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पण जर ही कथा खूप क्लिष्ट वाटत असेल तर कदाचित यातून काही इनसाईट्स मिळतील असे वाटते.

या सगळ्याची सुरुवात इथून झाली - https://www.youtube.com/watch?v=bE1cV4TgWiw

फ्रीक हा अगदी सर्वसामान्यांच्या (खासकरून इंग्रजी ज्यांची मातृभाषा आहे) वापरातला शब्द आहे. कधी काळी या शब्दाला एक तीव्र नकारात्मक छटा होती. वरच्या व्हिडिओतल्या शो चा काळ १९५० च्या दशकातला आहे. थोडक्यात हे फ्रीकशोज फार जुनी गोष्ट नाही. पण जसे जसे फ्रीक या शब्दाला टॅलेंटशी जोडण्यात आले तसे तसे ही नकारात्मक छटा सामान्यांच्या विस्मरणात गेली. किमान तिची तीव्रता कमी झाली.
फ्रीचा फ्रीडम म्हणूनही अर्थही या कथेसाठी महत्त्वाचा आहे. कारण फ्रीडम म्हणजे तरी काय? केवळ राहत असलेल्या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळणे म्हणजे फ्रीडम नक्कीच नाही. मग फ्रीडम म्हणजे फ्री विल का? जर तसे असेल तर फ्री विलचा अर्थ प्रत्येकाकरिता वेगळा असला पाहिजे नाहीतर प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण ते काय. फ्री विलबद्दल अनेक विविध मतप्रवाह आहेत आणि प्रत्येक मतप्रवाह फॅसिनेटिंग आहे.
तिसरे म्हणजे या कथानकात ठरवून लपवलेले अनेक इस्टर एग्ज आहेत. मागच्या भागात आलेल्या प्रतिसाद अगदी योग्य आहेत. या कथानकाचा काही हिस्सा क्लूलेससारखा आहे.
आणि चौथे म्हणजे एखाद्या चांगल्या गेमप्रमाणे यात एक्स्पान्शन पॅकची सोय आहे. Happy

आणि चौथे म्हणजे एखाद्या चांगल्या गेमप्रमाणे यात एक्स्पान्शन पॅकची सोय आहे. Happy>>>>>

मग वाट पाहायची का आता?

भारीच !!

शेरलॉक चे इस्टर एग्ज अगदी आवडले. सगळा प्रवास कसा झाला असेल ते बघायला किती तरी वेळा गुगल मॅप पाहिला.

बहुतेक १० व्या भागात फ्रीक असेल असे नक्की वाटत होते. त्यानंतर सगळे एकदम वाचून काढले आणि आपला संशय बरोबर होता हे वाचून बरे वाटले Lol एलेमेंट्री, माय डियर वॉटसन Wink

मस्त. मजा आली. मध्ये रोज एकेक भाग यायला लागल्यानंतर भाग ० पासून परत सगळे भाग वाचले. यातला दबावाच्या राजकारणाचा भाग सर्वाधिक रोचक वाटला. म्हणजे इतिहास तसाच आहे, पण त्याचा अंतर्भाव तुम्ही कथेत मस्त केलात.

एक सजेशन- ही कादंबरी सलग पीडीएफ स्वरूपात बांधा, त्यात एक्स्ट्रा फीचर्स अ‍ॅड करा आणि तुम्हीच ती एक ई-बुक म्हणून रीलीज करा. अशाने उचलेगिरी अवघड होईल आणि माबो व्यतिरिक्तही लोकांना ही एकसलग वाचायला मिळेल.

मला ह्या कथेचा पहिला भाग (मी तो ह्या वर्षी पाहिला!) खूप आवडला होता. ख्रिस आणि अ‍ॅलेक्सी मधले संवाद, एक्स्ट्रॉ फीचर म्हणून टाकलेली पुडिंगची रेसिपी....पण अजून कथा पूर्ण झाली नव्हती म्हणून थांबले होते. ती पूर्ण झाल्यावर ३-४ दिवस मिळून वाचली.

अ‍ॅलेक्सीची अर्ली एक्झिट मला अजिबात आवडली नाही. त्याच्याऐवजी आलेली रश्मी तर मुळीच पटली नाही. मस्त पुडिंग्ज आणि केक्सच्या रेसिपीज, किमान उल्लेख, तरी वाचायला मिळतील असं वाटत असताना पोहे वगैरेचा उल्लेख वाचून हिरमोड झाला. Happy

चार्ल्स आणि ऑर्थरची स्टोरी कुछ हजम नही हुई. जुन्या काळच्या हिंदी सिनेमातल्या नोकराच्या बायकोवर नजर ठेवणार्या लंपट जहागिरदाराची आठवण झाली. जोसेफचं कॅरॅक्टर सुरुवातीला जसं होतं त्यापेक्षा शेवटी शेवटी फार वेगळं झालेलं वाटलं. अश्या बदलामागे काही कारण दिलेलं नाही. शेवटी तो डोळ्यात कचरा गेल्याचा उल्लेख वाचून हिंदी चित्रपटाच्या शेवटी डोळे पुसणारा ओम प्रकाश आठवला. गर्भाचं लिंग बदलणारी जडीबुटी वगैरे वाचून 'आमच्या शेतातले आंबे खाऊन मुलगेच होतात' टाईप्स बातम्यांची आठवण झाली. काढा देऊन बाईच्या शरीरात समागमाआधी बदल घडवून आणून गर्भाचं लिंग कसं बदलणार? वाय क्रोमोसोम पुरुषाकडून येतं ना? ह्या क्रोमोसोमचा निदान शोध १९०५ मध्येच लागला होता. तेव्हा ते पुरुषाकडून पासऑन होतं हे माहित होतं का? अर्थात असलं तरी हे मलिका आणि मंडळींना माहित असण्याची शक्यता नव्हतीच. सो जाने दो.

फणिंद्रचं कॅरॅक्टर लार्जर दॅन लाईफ करायच्या नादात थोडं अविश्वसनिय झालंय का? Sad त्याच्या डोळ्यांमागचं मेडिकल कारण दिलंय. पण तो लोकांना आपल्याला हवं ते कसं करायला भाग पाडत होता? संमोहन विद्येचा वापर करून? तो पण व्याघ्रपंथी असतो का? ख्रिस आणि रेश्मा तिच्याकडे असलेली कागदपत्रं न हलवता पार्टीला कसे जाऊ शकतात? मलिकावर रुद्रसारखेच प्रयोग झाले होते म्हणजे तीही स्त्री नव्हतीच का? मग रुद्रला जन्माला घालायचं काय प्रयोजन? त्यासाठी राजवंशच का हवा? त्याला कसली औषधं देत होते? तेव्हाच्या काळात असं सिंहावरून राजरोसपणे फिरता येत होतं?

डेव्हीड आणि त्याच्या पोपटाला पाहून ख्रिस आणि जोसेफ अवाक का होतात? तेव्हा ही कला माहित नव्हती का? डेव्हिड फणिंद्रची वाट पहाताना बंदूक घेऊन फिरायची रिस्क का घेतो? ख्रिस शेवटी मेजवानीला रश्मीला पार्टनर म्हणून न्यायचं ठरवतो पण तेव्हाच्या काळात हे शिष्ट्संमत होतं का? विशेषतः एक लॉर्ड आणि एक नेटिव्ह स्त्री असं कॉम्बिनेशन? ते entropy चं वाक्य तर मला पूर्ण बाऊन्सर गेलं. Sad

ह्या कथेचा सीझन २ आहे का? कारण बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. जया निघताना काय घेऊन गेली? कंठा का आणखी काही? सिंहलिपी आणि व्याघ्रलिपी दोन्हीतून वाचता येणारा लेख काय असतो? तो लेख वाचून काय होणार असतं? वाघ श्रेष्ठ का सिंह ह्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध? कथेतल्या बंगाली आणि जर्मन वाक्यांचं भाषांतर प्रत्येक भागाच्या शेवटी तरी द्यायला हवं होतं. त्याचा अर्थ कळला नाही तर ती वाक्यं कथेत घालून काय उपयोग?

पण अशी दीर्घ कथा लिहिल्याबद्दल पायस तुम्हाला हॅट्स ऑफ! राजकारणाचे संदर्भ आवडले. ह्यामागे तुमचा बराच अभ्यास असणार हे उघड आहे. आजकाल एव्हढी मेहनत कोण घेतं? सध्या बीबीसीवरची "जर्मनी: मेमरीज ऑफ अ नेशन" ही पॉडकास्ट मालिका ऐकत आहे त्यामुळे हे संदर्भ वाचून अधिक माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बॅकड्रॉप असलेली अशीच कथा वाचायला नक्की आवडेल. पुलेशु!

स्वप्ना प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तुम्हाला जाणवलेल्या त्रुटींबद्दल दिलगीर आहे. एका प्रश्नाचे उत्तर मात्र देऊ शकतो.

विशेषतः एक लॉर्ड आणि एक नेटिव्ह स्त्री असं कॉम्बिनेशन? >> हे शिष्टसंमत होते. १८५७ नंतर अशी लग्ने कमी झाली पण ब्रिटिशांच्या बाजूने त्याला रेस या कारणावरून विरोध नव्हता. विल्यम डॅलरिंपल याने स्कॉटिश इतिहास संशोधकाने यावर संशोधन केले आहे. १९व्या शतकापासूनच हे मान्यताप्राप्त होते. विसाव्या शतकात, खासकरून महायुद्धानंतर स्वतंत्रता चळवळीने जोर पकडला आणि अँग्लो-इंडियन्स टॅबू बनले व त्यांना भारतीयांकडूनच अधिक विरोध झाला. बरेचसे अँग्लो-इंडियन्स मग इतर ब्रिटिश वसाहतींमध्ये स्थिरावले आणि भारतीय संस्कृती त्या त्या देशांत घेऊन गेले. वाङ्मयीन उदाहरण द्यायचे झाले तर फ्रेडरिक फोर्साईथच्या कादंबर्‍यांमध्ये येणारा ब्रिटिश एजंट माईक मार्टिन हा सेकंड जनरेशन अँग्लो-इंडियन दाखवला आहे (आजोबा ब्रिटिशकालीन डिप्लोमॅट आणि आजी इंडियन नेटिव्ह स्त्री).

ह्या कथेचा सीझन २ आहे का? >> काही त्रुटी सीझन २ काढता यावा म्हणून मुद्दाम सोडल्या होत्या पण इतक्यात त्याकरिता वेळ होईल असे दिसत नाही.

पायस, धन्यवाद. स्वप्नाला पडलेले प्रश्न मलाही पडले होते, आम्ही त्यावर चर्चाही केली Happy Happy पण सिजन 2 येणार म्हटल्यावर उत्तरे आता मागत नाही, सिजनची वाट पाहते.

फक्त 1 स्पष्टीकरण शक्य असेल तर. अलेक्सि शेवटी नोकर होता, त्याची जागा रश्मीने घेतली. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने हेच नाते होते. मग एक संस्थानिक कुणा इंग्रजाला जेवायला बोलवेल तेव्हा त्याच्या नोकरालाही बोलवेल का? आणि समजा त्या इंग्रजाबरोबर त्याचा नोकर त्याने आणलाच तर त्याला स्वतःसमवेत जेवायला बसवेल की त्याची वेगळी सोय करेल...

पायस, स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! अ‍ॅलेक्सी आणि ख्रिसला घेऊन ह्याआधीच्या काळातली एक कथा लिहाच. हवं तर त्याला सिझन ० म्हणा . Happy

पायस, आज ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. छान, खिळवून ठेवणारी झालीये. एक गोष्ट जी म्हटली तर ऑड आहे, पण म्हटली तर सोयीची आहे, ती म्हणजे ह्यातलं इंग्लिश. हे अर्ली १९०० मधलं ब्रिटीश इंग्लिश नसून, प्रचलित अमेरिकन इंग्लिश आहे. पण तसं असल्यामुळे वाचताना, कुठे अडचण नाही आली आणी एक फ्लो राखता आला. मस्त!