बाहुली

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

त्या खोलीत फारसा उजेड नव्हताच. बाहेर आभाळ चांगलंच अंधारून आलं होतं. काळसर हिरवट भासणारं उदास वातावरण, गडद हिरव्या रंगांची गाद्यांची आवरणं आणि कांबळी. या सगळ्यांचं त्या खोलीत एक प्रकारचं विचित्र मिश्रण झालं होतं. ती बाहुली एका मखमली आच्छादनाच्या खुर्चीत पडली होती. अन् तिथल्या त्या उदास रंगछटेत ती बेमालूमपणे मिसळून गेली होती. हिरव्या मखमली कपड्यांत अन् टोपीत आपल्या रंगवलेल्या मुखवट्यासह ती अस्ताव्यस्त लांब पसरलेली वाटत होती. पण लहान मुलं जिच्यावर 'भावली' म्हणत झेपावतात, तशी ती नव्हतीच मुळी! एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी दिसायची. दूरध्वनीच्या बाजूला किंवा बैठकीच्या गाद्यांवर लोंबकळत पसरलेली असायची. या अवस्थेत ती तिथं अशी कितीतरी वेळ पडलेली असायची. अस्ताव्यस्त... उतरती कळा लागल्यासारखी ती भासायची. आणि तरीही ती विलक्षण चपळ होती!

हातात कापडांचे काही नमुने आणि रेखाटनं घेऊन घाईत आत - त्या खोलीत शिरत असलेल्या सारिकानं ओझरतं त्या बाहुलीकडं पाहिलं. क्षणभर तिला जरा भांबावल्यासारखं झालं. आपल्याला एवढा विस्मय कशाचा वाटावा, हे तिला उमगलं नाही. पण तो विचार झटकून ती आपल्या कामाकडं वळली.
"... कुठं तडमडला मेला तो मखमली निळा तुकडा? आता होता इथं!"

बाहेर येऊन तिनं वरच्या खोलीत हाक दिली.
"इरा, ए इरा! अगं तिथं तो निळा मखमली तुकडा आहे का? ही रिझबुडबाई आता कोणत्याही क्षणाला इथं हजर होईल!"

परत ती आत आली आणि तिनं खोलीतले दिवे लावले. पुन्हा एकदा तिची नजर त्या बाहुलीकडं गेली...
"अरे देवा, आता कुठे बघू तो नमुना?"

"हां..! इथं पडलाय!" तिच्या हातातून तो मखमली तुकडा जिथं पडला होता, तिथून तिनं तो उचलून घेतला. इतक्यात बाहेरून, मजल्याशी थांबताना होणारा लिफ्टचा नेहमीचा कर्कश्य आवाज झाला आणि दुसर्‍याच क्षणाला रिझबुडबाई आपल्या कुत्र्यासह एखादी सुसाट गाडी स्थानकात घुसावी तशी आत येऊन थडकली.

"बाईऽऽऽ ! असं वाटतंय की आता क्षणात बाहेर आभाळ कोसळेल!"

रिझबुडबाईनं आपले हातमोजे आणि फर अंगावरून काढून बाजूला ठेवलं. इतक्यात श्रीमती शहा सावकाश आत आल्या. हल्ली त्या फारशा या खोलीत यायच्याच नाहीत. कोणी 'खास' गिर्‍हाईक असेल तरच उगवायच्या. आणि रिझबुडबाई अशा खास गिर्‍हाईकांपैकी होती हे वेगळं सांगायला नको! इरा - तिथली मुकादम - झगा घेऊन खाली आली. आणि सारिकानं तो रिझबुडबाईच्या अंगावर चढवला.

"तुम्हाला अगदी शोभून दिसतोय बघा. काय सुरेख रंग आहे नाही?"

शहाबाई मागे बसून निरखीत होत्या. "हो तर! मला वाटतं अगदी सुरेख जमून आलाय!"

रिझबुडबाईनं वळून आरशात बघीतलं, "हं, मला कबूल करायलाच हवं की तुम्ही शिवलेले कपडे माझ्या पाठीवर काहीतरी जादू करतात."

"गेल्या तीन महिन्यांत तुम्ही खूपच बारीक झाल्या आहात!" सारिका म्हणाली.

"ए, नाही हं! नक्कीच नाही! पण मी असं म्हणेन, की मी तशी दिसते. तुमची कपडे कापायची रीतच अशी काही आहे, की मी बारीक नसले तरी तशी दिसते!"

तिनं समाधानानं सुस्कारा सोडला आणि झग्याचा पुढचा भाग ती काळजीपूर्वक नीट करू लागली. थोड्या मागेपुढे हालचाली करून झगा कुठं टाचत तर नाही ना, याची खात्री करू लागली.

"..पण हल्ली मी पुढूनही सुटायला लागलेय! पूर्वीसारख्या झग्याला पुढून चुन्या घालायची आता गरज पडत नाही. आणि तुम्हाला सांगते, पोट हे पाठीपेक्षा वाईट्ट असतं हो! एकवेळ तुम्ही तुमची पाठ लपवू शकता, पण पोट लपत नाही. म्हणजे असं बघा.. की जेव्हा तुम्ही लोकांशी बोलत असता, तेव्हा तुमचं तोंड त्यांच्याकडं असतं आणि त्याचवेळी तुमची पाठ मात्र ते बघू शकत नाहीत. पण पोट कसं लपवणार ना? असो! मी माझ्यापुरतं ठरवून टाकलंय - होता होईल तेवढं पोट कसं नजरेत येणार नाही, याची मी काळजी घेते. मग पाठीचं काहीही होऊ दे!" असं म्हणत मानेजवळचा झगा सारखा करत तिनं मान आणखी जरा वळवून पाहिली. आणि अचानक दचकल्यासारखी म्हणाली, "ओ! अहो, तुमची ती बाहुली! माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आणते ती! ...केव्हापासून आहे ती तुमच्याकडे?"

शहाबाईनं प्रश्नांकीत नजरेनं सारिकाकडं पाहिलं. पण तीही गोंधळलेली आणि काहीशी घाबरलेलीच वाटली.

"अं.. मला नक्की माहीत नाही... काही वेळा मला असं वाटतं, की हल्ली मला काही गोष्टींचं विस्मरणच होत चाललंय बघा. मला काही केल्या त्या आठवतंच नाहीत. सारिका, कधी आणली गं आपण हिला?"

"काय माहीत.." तुटकपणे सारिका म्हणाली.

"असो," रिझबुडबाई म्हणाली. "पण मला तिची भितीच वाटते बाई! गूढ अशी काहीतरी... तिला पाहिल्यावर असं वाटतं की... की ती आपल्या नकळत आपल्याला सतत निरखत असते, आणि कदाचित... तिच्या त्या मखमली बाह्यांमधून हसत देखील असेल! ...तुमच्या जागी मी असते, तर तिला कधीच फेकून दिली असती!" आणि भितीनं रिझबुडबाई काहीशी थरथरलीच. लगेचच पुन्हा ती कपडे शिवण्याच्या तपशिलात शिरली. तिच्या झग्याच्या बाह्या आणखी एखादा इंचभर कमी असाव्यात का? आणि झग्याची लांबी किती असावी? या आणि अशा महत्त्वाच्या मुद्यांवर गहन विचारांची देवघेव झाल्यावर जेव्हा तिचे समाधान झाले, तेव्हा तिने आपले सगळे अलंकार पुन्हा चढवले आणि निघायची तयारी करायला लागली.

जाताना त्या बाहुलीजवळ आल्यावर ती पुन्हा मागे वळली. "मला ती बाहुली अजिबात आवडत नाही! ती जणू इथं स्वामित्त्वच गाजवतेय असं वाटतंय मला."

    • "... आता म्हणजे काय म्हणायचंय हिला नक्की?" शहाबाई आणि इरा तिथून जात असताना सारिका हळूच पुटपुटली. पण शहाबाई किंवा इरा यावर काही बोलायच्या आतच रिझबुडबाई पुन्हा आत आली आणि दरवाजातून आत डोकावून तिचा कुत्रा शोधू लागली. तिचा कुत्रा त्या मखमली खुर्चीतल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या बाहुलीला निर्विकारपणं निरखीत बसला होता.

      "ए बेटा, इकडं.. " रिझबुडबाईनं त्याला चुचकारलं. पण बेट्यानं तिला दाद दिली नाही. "तो कीनई, दिवसेंदिवस असा वांड होत चाललाय म्हणून सांगू.. ये ये इकडं माझ्या लाडक्या.. ये बघूऽ " यावर लाडक्यानं थोडीशी मान वळवली आणि मोठ्या अनिच्छेनं त्या बाहुलीवरची नजर काढून घेतली.

      "त्या बाहुलीच्या ध्यानाची याच्यावर चांगलीच छाप पडलेली दिसतेय! यापूर्वी कधीच त्यानं तिच्याकडं एवढं लक्ष दिलं नव्हतं. अं.. आणि मीही दिल्याचं मला आठवत नाही... किंबहुना मी मागच्या वेळी आले तेव्हा ती इथं होती का हो?"

      इरा आणि शहाबाईंनी एकमेकींकडं पाहिलं. सारिकाच्या चेहर्‍यावर आठी उमटली. शहाबाई म्हणाली, "अहो सांगितलं नं, मला आठवतच नाही हल्ली! सारिका, कधीपासून आहे गं ही आपल्याकडे?"

      "कुठून आणलीत?" रिझबुडबाई आपलेच बोलणे रेटत म्हणाली, "तुम्ही तिला विकत आणली?"

      "नाही हो, नाही!" आपण ही बाहुली विकत आणली या कल्पनेनंच शहाबाई काहीशी चमकली. तत्काळ तो विचार तिनं झटकून टाकला, "नाही, नाही! अं.. पण मला वाटतं मला ती कुणीतरी दिलीय." मानेला विचित्र झटका देत ती म्हणाली, "वैताग नुसता! मस्तक फिरतं अक्षरश:... अगदी आत्ता आत्ता घडलेल्या गोष्टी आठवेनाशा होतात तेव्हा..."

      "चल बेटा, आता मूर्खासारखा वागू नको! नाहीतर मला तुला उचलूनच घ्यावं लागेल." आणि रिझबुडबाईनं कुत्र्याला उचललं. नापसंती दाखवायला ते जरा भुंकलं. आणि तिथून बाहेर पडताना जिथपर्यन्त शक्य होतं तिथपर्यन्त ते त्या खुर्चीतल्या बाहुलीकडं मान पुन्हा पुन्हा वळवून बघत राहिलं.

      *** १ ***
      • "ही बाहुली...! मला बाई भितीच वाटते तिची!" झाडलोट करत करत त्या खोलीपर्यंत पोहचलेली गार्गेकाकू उद्गारली. "मेलं काल कालपर्यन्त माझं खरेतर लक्षही गेलं नव्हतं तिच्याकडं आणि आता अगदी डोक्यातूनच जात नाहीय!"

        "काकू, तुम्हाला ती आवडत नाही?" सारिकानं विचारलं.

        "अगं माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येतात तिचा विचार मनात आल्यावर... काहीतरी वेगळंच. अं... म्हणजे असं... मला काय म्हणायचंय, ते कळतंय ना तुला?"

        "पण यापूर्वी तुम्ही तिच्याबद्दल असं काही बोलल्या नाहीत?"

        "काय सांगतेय, यापूर्वी तिनं माझं कधीच इतकं लक्ष वेधलं नव्हतं. अगदी आज सकाळपर्यन्त..! म्हणजे ती इथं काही दिवसांपासून आहे, हे मला माहीत होतं. पण... " गार्गेकाकू स्वत:शीच गोंधळली. "अं... म्हणजे जसं स्वप्नात घडावं तसं.... " आणि वाक्य अर्धवट सोडत, तिनं आपलं झाडलोट करायचं सामान गोळा केलं आणि तिथून बाजूच्या खोलीत निघून गेली.

          सारिकानं त्या निवांत पसरलेल्या बाहुलीकडं पुन्हा एकदा पाहिलं. ती काहीशी बुचकळ्यात पडली. एवढ्यात शहाबाई तिथं अवतरली अणि सारिका चटकन वळली.

          "बाई, खरंच हा नमुना केव्हापासून आहे तुमच्याकडं?"

          "कोणता? ... ती बाहुली? अगं मुली तुला माहीताय, मला विस्मरण होतंय हल्ली. कालतर... हो, तो तर अगदी कळस झाला! मी तिकडं त्या व्याख्यानाला चालले होते. आणि अर्ध्यात गेल्यावर मला आठवेच ना, की मी कशासाठी निघालेय घरातनं! आठवतीय... आठवतीय... शेवटी मी बाजारातच काहीतरी आणायला निघाले असणार, अशी स्वत:ची समजूत घालून घेतली. आणि तुला खरं वाटायचं नाही, पण बाजारातनं घरी येऊन चहाचा कप हातात घेतला, तेव्हा मला - जळ्ळं त्या व्याख्यानाचं - आठवलं! वय झाल्यावर माणसाला म्हातारचळ लागतं म्हणतात. पण माझ्या बाबतीत हे जरा लवकरच अन् अतीच व्हायला लागलंय. आणि आता हसू येईल, पण माझ्या हातातली पिशवी कुठं ठेवलीय तेच मला आठवेना. अरे देवा, आणि तो चष्मा.... तुला आढळला का तो? आताच तो लावून मी वर्तमानपत्र वाचत होती."

          "तुमचा चष्मा इथं या फळीवर आहे बघा," सारिकानं तो चष्मा शहाबाईच्या हाती दिला. "पण तुमच्याजवळ ही बाहुली कशी आली? कुणी दिली तुम्हाला ती?"

          "नाही गं, ते मला आठवायची आता सुतराम शक्यता नाही. पण मला ती कुणीतरी दिली असावी किंवा खास माझ्यासाठी पाठवली असावी. काहीही असो, पण या खोलीतल्या रंगसंगतीशी कशी शोभून दिसते नाही ती?"

          "हो तर!" सारिका म्हणाली, "अन् गमतीची गोष्ट म्हणजे, मी तिला पहिल्यांदा इथं कधी पाहिली तेच मला आठवत नाही."

          "ए बाई, आता तुझीदेखील माझ्यासारखी अवस्था होतेय असं कृपा करून म्हणू नको!" शहाबाईंनी तिला दमात घेतलं. "तू तर अजून तरुण आहेस मुली."

          "पण खरंच बाई, मला नाही आठवत. म्हणजे मी तिला काल पाहिली आणि मला तिच्यात काहीतरी जाणवलं. म्हणजे... हो त्या गार्गेकाकू म्हणत होत्या तसंच. काहीतरी भयानक.. भयदायक... पण त्यांनी तसं सांगितल्यावर मला वाटलं की मलाही आधी तसंच वाटलं होतं! पण पहिल्यांदा मला तसं केव्हा वाटलं हेच मुळी मला आठवेना. म्हणजे आधी, मी तिला पहिल्यांदाच पाहतेय असं वाटलं, पण दुसर्‍या क्षणी ती इथं खूप आधीपासूनच आहे, पण आपलंच तिच्याकडं एवढं लक्षच गेलं नाही असं वाटलं... "

          "कदाचित एखाद्या दिवशी ती या खिडकीतनं एकदम उडत आत येऊन या झाडूच्या दांडीवर बसली असेल ही ही ही. असो... जाऊ दे. आता ती इथं आहे नं बास," शहाबाई म्हणाली, "अन् तिच्याशिवाय किती ओकीबोकी वाटेल नै ही खोली?"

          "हं.. पण का?"

          "काय का?"

          "...म्हणजे तिच्याशिवाय कल्पनाच का करावी?"

          "ए, जाऊ दे! आपण सगळे या बाहुलीला नको इतकं महत्त्व देतोय!" शहाबाई अधीरपणे पुढे म्हणाली, "असं आहेच काय तिच्यात म्हणते मी? हां, आता ती जरा सडलेल्या कोबीसारखी दिसतेय, पण मला वाटतं मी चष्मा लावलेला नाही म्हणून असेल..."

          तिनं आपला चष्मा नाकावर ठेवला आणि परत एकदा निरखून त्या बाहुलीकडं पाहिलं. "अं.. हो, म्हणजे तू म्हणतेयस तशी जरा ती विचित्र किंवा जराशी उदास वाटतेय खरी, पण म्हणजे बेरकी आणि करारी देखील वाटतीय..!"

          "आणि काल पाहिलंत," सारिका काहीशी हसून म्हणाली, "रिझबुडबाई तर तिच्याकडं 'आता खाऊ का गिळू तिला' अशी बघत होती."

          "हं! अगं ती बाई म्हणजे मनातलं सगळं घडघडा बोलणार्‍यातली आहे.."

          "पण आपल्या बाहुलीची तिच्यावर अशी छाप पडावी हे जरा विक्षिप्तच आहे ना?"

          "अं.. काहीवेळा लोक आपली नापसंती अगदी तिथल्या तिथं व्यक्त करतात."

          "हं, तसंही असेल म्हणा," हसून सारिका म्हणाली, "...किंवा कालपर्यंत ती बाहुली इथं अस्तित्वातच नसेल... कदाचित काल ह्या खिडकीतनं अचानक आत येऊन तिनं इथं बस्तान बसवलं असेल!"

          "अं.. नाही! मला खात्री आहे, काही काळापासून तरी तिचं अस्तित्व इथं आहे," शहाबाई जरा गंभीरपणे म्हणाली,"कदाचित काल केवळ ती प्रगट झाली असेल!"

          "हेच्च म्हणायचंय मला! ती इथं आधीपासूनच आहे! पण कालपूर्वी कधीच मी तिला पाहिल्याचं मला आठवत नाही."

          "बरं मुली, आता हे पुरे. तुझ्या बोलण्यामुळं माझ्या सर्वांगातून भितीनं थरथर सुटायला लागलीय. बस्स! या बाहुलीचा विषय आता डोक्यातून काढूया. त्यानं फार काही साध्य व्हायचं नाही." असं म्हणत शहाबाई खुर्चीतून उठली. सावकाश चालत ती त्या बाहुलीजवळ गेली आणि धीर एकवटून तिनं ती बाहुली हातात घेतली. तिला गदागदा हलवली. तिचे खांदे नीट करून पुन्हा तिला व्यवस्थित बसवली. आणि आपण पुन्हा दुसर्‍या खुर्चीत जाऊन बसली.

          अचानक ती बाहुली हलकेच कोलमडली आणि पुन्हा पूर्वीसारखीच निवांत पसरली.

          "....!"

          "....बघ की! ही निर्जीव बाहुली, पण किती जिवंत वाटतेय नं?"

          *** 2 ***
          • "हिनं माझ्यावर अशी पाळी आणलीय," कपड्यांच्या प्रदर्शन - दालनात शिरता शिरता जरा मोठ्यानं गार्गेकाकू म्हणाली, "की मला पुन्हा त्या खोलीची आवराआवर करायला जायची सोय नाही."

            "हं... कोणी पाळी आणली तुमच्यावर अशी, " कोपर्‍यात हिशेब जुळवत बसलेल्या शहाबाईनं विचारलं, आणि स्वत:शीच बोलल्याप्रमाणं ती पुढे म्हणाली, "ही बाई एक! मी तिला प्रत्येक वर्षी घरात वापरायच्या कपड्यांचे दोन जोड, बाहेर घालायच्या कपड्यांचे तीन जोड आणि एक सूट, हे सगळं एक पै देखील न घेता द्यावं असं तिला वाटतं. काही लोक म्हणजे... खरंच!"

            "अहो, मी त्या बाहुलीचं सांगत होते." तिचं बोलणं तोडत गार्गेकाकू म्हणाली.

            "आता परत बाहुलीचं काय झालं?"

            "होय! ती त्या खोलीतल्या मेजाशी बघा, कशी अगदी माणसासारखी बसलीय. माझी तर बोबडीच वळली."

            "अहो, काय बरळताय तुम्ही?" शहाबाई उठली आणि लांब लांब ढेंगा टाकत त्या दालनातून ती बाहेर आली. बाहेरचा छोटा व्हरांडा ओलांडून समोर त्या खोलीत ती आली. तिथं एका कोपर्‍यात ते मेज होतं. त्याच्याजवळ एक खुर्ची ओढलेली दिसत होती. आणि त्या खुर्चीत आपले लांब पाय खाली सोडून, मेजावर हात टेकून ती बाहुली विसावली होती.

            "कोणीतरी चेष्टा केलेली दिसतेय... हिला कशी ऐटीत बसवलीय नाही? अगदी खर्‍याखुर्‍या माणसासारखी बसलेली वाटतेय."

            तेवढ्यात हातात एक पोषाख घेऊन सारिका जिना उतरून खाली आली.

            "अगं हे बघ सारिका, ही आपली बाहुली माझ्या खासगी मेजापाशी बसून माझी पत्रे लिहायला लागलीय!"

            त्या दोघींनी पुन्हा त्या बाहुलीकडं पाहिलं. "खरेच, " शहाबाई म्हणाली, "अगदी हसायला येतंय. मला नवल वाटतंय, कुणी ठेवलीय तिला अशी? तू तर नाही नं सारिका?"

            "नाही हो, मी नाही ठेवली! वरच्या मुलींपैकी एखादीनं ठेवली असेल तिला तशी."

            "वाह्यातपणा नुसता!" शहाबाईनं ती बाहुली खुर्चीतून उचलली आणि पुन्हा सोफ्यावर फेकून दिली.

            सारिकानं हातालता पोषाख काळजीपूर्वक तिथल्या खुर्चीत ठेवला आणि ती जिना चढून वर कामाच्या खोलीत गेली.

            "तुम्हाला ती शहाबाईंच्या खोलीतली मखमली बाहुली माहीताय ना?"

            इरा आणि तिथल्या तीन मुलींनी माना वर करून सारिका काय सांगतेय तिकडं बघितलं. "हो तर! म्हणजे काय.."

            "आज सकाळी तिला तशी त्या खुर्चीत कुणी बसवली होती? मस्करी करायला?"

            त्या तिघींनीही सारिकाकडं पाहिलं आणि इरा म्हणाली, "म्हणजे त्या मेजाशी? मी नाही बाई!"

            "मी पण नाही," त्यातली एक मुलगी म्हणाली.

            "आणि तू गं मीता?" मीतानंही नकारार्थी मान हलवली.

            "इरा, हा तुझाच खोडसळपणा आहे!"

            "अजिबात नाही!" काहीशा कडक स्वभावाची आणि तोंडात जणू टाचण्यांचा तोबरा भरून बोलत असल्यासारखी वाटणारी इरा म्हणाली. "मला तिथे त्या खोलीत जाऊन बाहुलीला त्या मेजावर बसवून तिच्याशी खेळण्याव्यतिरिक्त इतर अनेक चांगले उद्योग आहेत!"

            "अगं तसं नाही," सारिका म्हणाली. पण आता बोलताना आपला आवाज काहीसा हलतोय याचं तिला आश्चर्य वाटलं. "म्हणजे... मस्करी म्हणून ठीक आहे. पण हा कुणाचा उद्योग हे मला जाणायचं होतं इतकंच!"

            पण त्या तिघींनीही पुन्हा पुन्हा हे आपण केलं नसल्याचं सांगितलं.

            "अगं पण त्यात झालं काय एवढं? कदाचित गार्गेकाकूंनी केलं असेल!" इरा म्हणाली.

            सारिकानं नकारार्थी मान हलवली, "नाही! गार्गेकाकू हे करणार नाहीत. किंबहुना तो प्रकार पाहून त्यांचीच गाळण उडालीय."

            सारिका पुढे म्हणाली, "पण कोणीतरी तिला तिथे बसवलीच असेल ना? पण लोकांना कबूल करायला तोंडं शिवलीयेत काय देव जाणे!"

            "मी तुम्हाला आधीच सांगीतलंय सारिकाबाई," मेरी म्हणाली, "आम्हा तिघींपैकी कुणीच हे कृत्य केलेलं नाही. तरीही तुम्ही आमच्याकडेच संशयानं का बघताय हे कळत नाही."

            "नाही तसं नाही, तुम्हाला दुखवायचं नव्हतं मला, पण मग कुणी बरं केलं असेल ते?"

            "कदाचित ती बाहुली स्वत:च चालत गेली असेल आणि तिथं त्या स्थितीत बसली असेल!" मीता खिदळली.

            पण सारिकाला ते फारसं रुचलेलं दिसलं नाही.

            "हं.. मूर्खपणा निव्वळ! दुसरं काय?" म्हणत दाणदाण पाय आपटत सारिका खाली आली.

            • शहाबाई काहीशा आनंदात दिसत होत्या. काहीतरी गुणगुणत त्यांनी खोलीत सगळीकडे एक नजर टाकली.

              "अगं मी माझा चष्मा पुन्हा विसरलेय." त्या म्हणाल्या, "पण काही बिघडत नाही. तशी आता मला त्याची गरज नाहीय... पण त्यातली मेख अशी आहे, की जेव्हा तुम्ही माझ्याप्रमाणे चष्म्याविणा आंधळ्या होता आणि जोपर्यन्त तुमच्याकडे तो हरवलेला चष्मा हुडकण्यासाठी दुसरा चष्मा नसतो, तोपर्यन्त तुम्हाला तो सापडणे अगदी कठीण होऊन बसते. कारण तुम्ही पाहूच शकत नाही!"

              "मी शोधते," सारिका म्हणाली, "आताच तुम्ही डोळ्यांवर लावलेला मी पाहिला होता."

              "हो, तू वर गेलीस आणि मी दुसर्‍या खोलीत गेले. मला वाटतं मी तिथेच काढून ठेवला असेल. आणि या हिशेबांची एक पीडाच आहे. माझ्या चष्म्यांशिवाय मी काय करू त्यांचं?"

              "मी वर जाते, आणि तुमच्या झोपायच्या खोलीतून तुमचा दुसरा चष्मा आणते."

              "पण आता सध्या माझ्याकडे दुसरा चष्मा नाहीय." शहाबाई म्हणाली.

              "का? काय झाला?"

              "काल मी जेवायला बाहेर गेले तिकडेच तो विसरले. तिकडे मी विचारणा केलीय, आणि त्याशिवाय आणखी दोन दुकानांमध्ये मी गेली होती तिथंही विचारलंय."

              "ओह! म्हणजे आता तुम्हाला तीन - तीन चष्मे ठेवायला लागणार."

              "वा, म्हणजे मी तीन चष्मे ठेवले तर माझं सारं आयुष्य त्यांना हुडकण्यातच जायचं. मला वाटतं त्यापेक्षा एकच बरा. म्हणजे तो सापडेपर्यन्त मला शोधावाच लागेल. आणि तो शोधला की माझं काम झालं!"

              "अच्छा.. आता तुम्ही या दोन खोल्यांशिवाय दुसर्‍या कुठे गेलेल्या नाहीत. आणि इथं नाही म्हणजे तुमचा चष्मा त्या खोलीतच असेल."

              ती परत त्या खोलीत गेली आणि बारकाईनं शोधू लागली. आणि शेवटचा उपाय म्हणून तिनं ती सोफ्यावरची बाहुली बाजूला केली.

              "हा सापडला इथं!" सारिकानं ओरडून सांगितलं.

              "हो? खरंच? कुठं होता?"

              "त्या आपल्या बहुमूल्य बाहुली खाली! कदाचित तुम्ही तिला उचलून त्या सोफ्यावर टाकली त्या आधी तिथे काढून ठेवला असेल."

              "नाही, तिथं मी नक्कीच नव्हता ठेवला."

              "मग त्या बाहुलीनंच तो तुमच्या कडून घेऊन लपवून ठेवला असेल."

              "ओह, खरंच? " शहाबाई त्या बाहुलीकडं विचारपूर्वक बघत म्हणाली. "मी तिच्यामागं चष्मा ठेवला नव्हता. सारिका.. खरंच ती इतकी बुद्धीमान असेल?"

              "मला तिचा थोबडाही बघायला आवडत नाही! तिच्याकडं बघितल्यावर असं वाटतं की आपल्याला ज्ञात नसणार्‍या अशा बर्‍याच गोष्टी तिला ठाऊक आहेत."

              "पण ती अतिशय उदास आणि तरीही गोड दिसते, असं नाही वाटत तुला?"

              "... निदान ती गोड आहे असं तरी म्हणू नका बाई!"

              "हं नाही... किंवा असेलही तू म्हणतेस तसं... बरे, जाऊ दे. आपला उद्योग बघूया. त्या लाडबाई आता इतक्यात येतील. त्यापूर्वी मला या दराच्या याद्या पूर्ण करायला हव्यात."

              *** ३ ***
              • "सारिका! ओ सारिका बाई..."

                "काय गं मेरी?"

                सारिका टेबलावर वाकून हाततलं घट्ट विणीचं रेशमी कापड रेखाटनाप्रमाणं कापण्यात व्यग्र होती.

                "अहो ती बाहुली...! तो तुम्ही सांगितलेला विटकरी रंगाचा पोषाख मी खाली काढत होते, तेव्हा तिथं ती बाहुली पुन्हा पूर्वीसारखीच त्या टेबलाशी खुर्चीत बसलेली मला दिसली! आणि तिला मी किंवा आमच्यापैकी कुणीच तशी ठेवलेली नाही. आम्ही असले काही उद्योग करणार नाही हो!"

                सारिकाची कात्री तिच्याही नकळत त्या सुळसुळीत कापडावरून घसरली.

                "अरे देवा! हे काय झालं माझ्या हातातल्या कापडाचं. ठीकाय, पण अजून मी सावरून घेऊ शकते. हां.. पण त्या बाहुलीचं काय म्हणालीस?"

                "ती त्या मेजाशी पुन्हा बसलीय!"

                सारिका पुन्हा खाली शिवणाच्या खोलीत गेली. बाहुली त्या टेबलाशी अगदी सकाळी बसली होती तशीच पुन्हा बसली होती!

                तिनं तिला खसकन खाली ओढली आणि पुन्हा सोफ्यावर फेकून दिली.

                "ही इथंच आहे तुझी जागा, माझ्या लाडके!" आणि तरातरा ती तिथून निघून दुसर्‍या खोलीत आली.

                "शहाबाई!"

                "अं? काय झालं?"

                "...आपल्याशी कुणीतरी कावा करतंय. ती बाहुली पुन्हा त्या मेजाशी होती. पूर्वीसारखीच."

                "पण हे कोण करत असावं असं तुला वाटतंय?"

                "त्या वरच्या तिघींपैकीच कोणीतरी असावी. पण जरा विचित्र आहे, त्या तिघींनीही अगदी शपथ घेऊन सांगितलं की हा प्रकार त्यांच्यापैकी कोणीच करत नाहीय..."

                "त्यांच्यापैकी कोण असावी तुझ्यामते? मेरी?"

                "नाही मेरी नसावी. कारण हा प्रकार मला सांगत आली तेव्हा ती स्वत:च मनातून हादरल्यासारखी वाटत होती. मला वाटतं हे काम त्या खिदळणार्‍या मीताचंच असलं पाहिजे."

                "कायपण मूर्खपणा चालवलाय!"

                "म्हणजे काय, हा शुद्ध गाढवपणा आहे! पण तुम्ही बघाच, हा प्रकार मी थांबवतेच की नाही."

                "काय करणार आहेस तू?"

                "बघालच.."

                • त्या रात्री जेव्हा ती रात्री उशिरा निघाली, तेव्हा तिनं शिवणाच्या खोलीला बाहेरून टाळा ठोकला.

                  "मी ती खोली बन्द केलीय, आणि चावी माझ्यासोबत घेऊन चाललेय!"

                  "ओ, असं आहे तर!" हसत शहाबाई म्हणाली. "म्हणजे तो प्रकार खुद्द मीच करत असेल, असं तुला वाटायला लागलंय की काय? म्हणजे मी माझी पत्र लिहायला त्या खोलीत जात असेन आणि ती लिहिण्याऐवजी त्या बाहुलीला त्या जागी बसवून तिला लिहायला सांगत असेन. आणि नंतर या सगळ्याबद्दल मी साफ विसरून जात असेल.... असं?"

                  "अं... तीही शक्यता आहे म्हणा.." सारिका म्हणाली, "पण काहीही असो, असली मूर्ख चेष्टा आता कशी घडतेय ते बघतेच!"

                  दुसर्‍या दिवशी सकाळी सगळ्यात आधी तिने कोणती गोष्ट केली, तर अर्थातच शिवण खोलीचा टाळा खोलून ती आत चालती झाली. गार्गेकाकू कधीची हातात झाडू आणि फडके घेऊन खोलीबाहेर नाखुषीनं ताटकळत उभी होती.

                  "आता दिसेलंच आपल्याला!" सारिका उद्गारली.

                  पण ती दोन पावलं चालून जशी आत गेली तशीच मागे सरली. तिला जवळजवळ धाप लागली होती. बाहुली त्या मेजाशी खुर्चीत बसून आपले पाय खाली सोडून पुन्हा बसली होती!

                  गार्गेकाकूनं नि:श्वास टाकला. "हे अजब आहे! दुसरे काही नाही...
                  अगं ए सारिका! अगं तू घाबरली आहेस का? तुला पाणी देऊ का? अरे देवा... वर असेल पाणी. थांब आणते..."

                  "नको! मला काही झालेलं नाही." सारिका त्या बाहुलीपाशी गेली, तिने तिला काळजीपूर्वक उचलली आणि तिला घेऊन ती खोलीबाहेर पडली.

                  "कोणीतरी तुझी पुन्हा थट्टा केलीय." गार्गेकाकू म्हणाली.

                  "पण यावेळी त्या व्यक्तीनं डाव कसा साधला हेच मला कळेना झालंय." सारिका सावकाशपणे म्हणाली. "मी खोलीला बाहेरून टाळा ठोकला होता. कोणीही प्रवेश करणं अशक्य होतं.."

                  "हं... पण हिची दुसरी चावी असेल कुणाकडं तर?" गार्गेकाकूंनी एक तर्क लढवला.

                  "मला नाही वाटत. यापूर्वी हा दरवाजा बंद करायची कधी वेळच आली नव्हती, तिथे दुसर्‍या चावीची तजवीज कुठून असायला? शिवाय हा टाळा अगदी जुन्या धाटणीचा आहे, आणि त्याची हीच एकमेव चावी आहे."

                  "हो पण, दुसर्‍या एखाद्या कुलुपाची - समज या समोरच्या दरवाजाची - चावी याला लागत असेल तर?"

                  "हं..."

                  मग त्यांनी त्या दुकानातल्या चाव्यांच्या जुडग्यातल्या सगळ्या चाव्या त्या टाळ्याला लावून बघितल्या. पण शिवणखोलीच्या कुलुपाला त्यातली एकही लागली नाही.

                  *** ४ ***
                  • "बाई, हे फार विचित्र घडतंय, " दुपारी जेव्हा त्या जेवायला एकत्र आल्या तेव्हा सारिका म्हणाली. पण शाहबाई निवान्त होती. "सारिका, मला वाटतं हा सगळा अतर्क्य प्रकार घडतोय. आपण त्यापेक्षा असू करू या का? एखाद्या परलोकविद्येवर संशोधन करणार्‍या संशोधकांना गाठूया. आणि या खोलीत नक्की काय होतेय त्याचा काही छडा लागतोय का बघूया."

                    "बाई, तुम्ही अजूनही हे सगळं गमतीतच घेताय..." सारिका म्हणाली.

                    "हं, खरंय. मला मजा वाटतेय या सगळ्याची. आता या वयात, मला 'काही घडून येतंय' यातंच मजा वाटतेय! सगळं म्हणजे... अं.. " आणि बोलता बोलता ते तशीच विचारमग्न झाली. "म्हणजे हे सगळं मला आवडतंय असं नाही. पण... तरीही ती बाहुली हल्ली फारच करायला लागलीय, नाही का गं?"

                    त्या दिवशी संध्याकाळी सारिकानं पुन्हा बाहेरून तो दरवाजा कुलुपबन्द केला. "मला अजूनही वाटतंय की, आपल्यापैकीच कुणीतरी मस्करी करत असेल.. का ते माहीत नाही, पण... "

                    "... आणि तुला असं वाटतंय का, की उद्या सकाळी ती पुन्हा टेबलाशी बसलेली असेल?" शहाबाई म्हणाल्या.

                    "हो!"

                    • पण यावेळी त्यांचं अनुमान चुकलं. यावेळी बाहुली टेबलाशी बसलेली नव्हती. तर ती खिडकीत बसून बाहेर रस्त्याकडे बघत बसली होती! आणि यावेळी देखील तिच्या बसण्याच्या स्थितीत कमालीचा जिवंतपणा भासत होता.

                      "भयंकर मूर्खपणा आहे नं?" दुपारी जेव्हा त्या चहासाठी एकत्र आल्या तेव्हा शहाबाई म्हणाल्या. नेहमीप्रमाणं 'त्या खोलीत' चहाला बसण्याऐवजी, त्या दोघी आता शहाबाईच्या खोलीत बसल्या होत्या.

                      ".. अं?"

                      "हो! म्हणजे सगळं तुमच्या हाताबाहेरचं! एक बाहुली काय नि प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी आढळते काय!"

                      • दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. म्हणजे केवळ रात्रीच नाही तर दिवसाही बाहुलीची जागा बदलल्याचं त्यांना आढळायला लागलं. कोणत्याही क्षणी त्या खोलीत गेलं तरी बाहुली पूर्वीच्या जागी नसायचीच! अगदी दोन - दोन मिनिटांच्या अंतराने पाहिलं तरीदेखील! ह्या तिला सोफ्यावर टाकून यायच्या, आणि पुढच्या वेळी ती खुर्चीत दिसायची. नंतर दुसर्‍या खुर्चीत! कधी ती खिडकीत आढळायची, तर कधी पुन्हा त्या टेबलाशी!

                        "तिला वाट्टेल तशी हिंडतीय ती. आणि मला वाटतं सारिका, त्यात तिला आता मजा यायला लागलीय..."

                        त्या दोघीही मखमलीत मढवलेल्या, पाय पसरून बसलेल्या त्या धुडाच्या रंगवलेल्या चेहर्‍याकडे बघतच राहिल्या.

                        "...बघीतलं तर मखमलीचे आणि रेशमी कापडाचे काही तुकडे अन् रंगांचे चार शिन्तोडे!" शहाबाई म्हणाली, "... ... मला वाटतं अं... आपण एकदाचा तिचा निकालच लावून टाकूया!"

                        पण ती हे किती ओढून - ताणून बोलत होती हे स्पष्ट जाणवत होतं.

                        "निकाल? काय म्हणायचंय तुम्हाला?" सारिकाचा आवाज जवळ - जवळ कापत होता.

                        "हां... इथं आता शक्य असतं तर तिला जाळूनच टाकली असती. ...म्हणजे एखाद्या चेटकिणीसारखी! ...किंवा नाहीतर आपण तिला कचर्‍याच्या डब्यात भरूया."

                        "त्यानं काय होणार? कचर्‍यातून तिला कोणीतरी उचलून पुन्हा आपल्याकडे घेऊन येईल..."

                        "नाहीतर आपण तिला कुठेतरी पाठवूया... म्हणजे ते नाही का, नेहमी काही विकायला आहे का, अशी चौकशी करत असतात.. त्यांना देऊन टाकूया. मला वाटते हाच योग्य मार्ग आहे."

                        "काय माहीत..." सारिका म्हणाली, "तसं करायचीही मला धास्ती वाटतेय."

                        "धास्ती?"

                        "होय.. ती पुन्हा इथं येईल!"

                        "म्हणजे तिला इथून दुसरीकडे घालवल्यावर ती पुन्हा इथं.. इथं आपल्याकडं येईल असं वाटतं तुला?"

                        "होय."

                        "म्हणजे.. पाळलेल्या कबुतरासारखी?"

                        "हो, तशीच!"

                        "सारिका.. मला वाटते, यातून आता आपली सुटका नाही. किंवा कदाचित मला म्हातारचळ लागलंय आणि तू त्याची मजा घेतेयस... खरंच असं तर नाही ना गं?" काकुळतीला येऊन शहाबाई म्हणाली.

                        "नाही बाई. मला खरेच भयंकर भिती वाटायला लागलीय. 'ती' आपल्याला न जुमानणारी, अतिशय बलवान आहे, आणि आपल्याला स्वतःच्या अंमलाखाली आणू पाहतेय... ही भीषण भावना माझ्या मनावर भयंकर दडपण आणायला लागलीय."

                        "बलवान? आणि काय हे चिंध्यांचं बोचकं?", कसंतरी अवसान आणून शहाबाई म्हणाली.

                        "होय, ते भयानक अस्ताव्यत बोचकं... कारण.. तुम्ही पाहिलंच आहे - ते अतिशय करारी आहे."

                        "करारी?"

                        "होय. आपली मनमानी करायला... बाई, ही खोली आता तिची झाली आहे!"

                        "अं... हं.. " सभोवती नजर टाकत शहाबाई म्हणाली. "खरंय, ही तिचीच खोली झालीय. किंबहुना ती आधीपासूनच तिची होती असं मला वाटायला लागलंय. मला याआधी वाटायचे की खोलीचे रंग, इथली बैठक, वगैरे सगळं काही.. या खोलीत ती अगदी मिसळून जाते, पण नाही. ही खोलीच तिच्यात मिसळून जाते हेच सत्य आहे!" अधीरपणे ती शिंपीण पुढे म्हणाली, "आणि हे किती विचित्र आहे, एखादी बाहुली येते काय आणि अशाप्रकारे इथं मालकी गाजवतेय... आणि ती गार्गेकाकू तर आता पुन्हा इथं झाडलोट करायला फिरकेल असं मला वाटत नाही."

                        "ती बाहुलीला घाबरलीय असं तुमच्याजवळ म्हणाली?"

                        "नाही! पण या ना त्या कारणानं ती इकडं फिरकायचं देखील टाळतीय.." आणि वैतागल्या सुरात ती पुढे म्हणाली, "आता आपण काय करणार आहोत गं सारिका? माझा धीर खचत चाललाय. मला काही सुचतच नाहीय. गेले काही आठवडे तर मला एकही नवी रचना सुचलेली नाहीय."

                        "आणि बाई, माझं लक्ष तर माझ्या कात्रणांमध्ये अजिबात लागत नाहीय!" सारिका म्हणाली, "मूर्खासारख्या छोट्या छोट्या चुका करत असते मी. कदाचित... अं, तुमची ती परलोकविद्येच्या संशोधकांना बोलावण्याच्या कल्पनेतूनच काही होऊ शकेल असं मला वाटायला लागलंय..."

                        "काय मूर्ख आहोत आपण दोघीही! अगं, मी ते गमतीत म्हटलं होतं गं. मला वाटतंय, निदान आपण अजूनही जरा वाट बघायला हवी..."

                        "अजूनही? कशाची?"

                        "मला ठाऊक नाही...."

                        दुसर्‍या दिवशी जेव्हा सारिका आली, तेव्हा तिला ती खोली टाळाबन्द आढळली.

                        "शहाबाई, तुम्ही ती बंद केलीय का?"

                        "हो, आणि आता नेहमीसाठी ती टाळाबंदच राहील!"

                        "म्हणजे?"

                        "म्हणजे मी त्या खोलीचा नाद सोडून दिलाय. त्या बाहुलीला काय वाट्टेल ते करू दे त्या खोलीत. तशीही आपल्याला दोन खोल्यांची गरज नाही. आपण इथेच जुळवून घेऊ."

                        "पण बाई, ती तुमची खासगी बैठकीची खोली आहे."

                        "खरंय, पण मला आता तशीही तिची गरज लागत नाही. माझी झोपायची खोलीही छान आरामदायी आहे. मी बैठकीसाठीही तिचा उपयोग करू शकतेच की, नाही का?"

                        "म्हणजे तुम्ही त्या शिवणखोलीत पुन्हा कधीही जाणार नाही?"

                        "अगदी तसेच!" शहाबाईनं हलकेच सुस्कारा टाकला.

                        "पण तिच्या साफसफाईचे काय? किती घाण अवस्था होईल तिची?"

                        "होऊ दे. जर त्या जागेवर तिला मालकीच गाजवायची आहे, तर गाजवू दे! आणि तिची झाडलोटही तिला स्वत:लाच करू दे..." शहाबाई म्हणाली, "सारिका, ती आपला तिरस्कार करतेय.. माहीताय?"

                        "म्हणजे..? ती.. ती बाहुली आपला द्वेष करतेय?"

                        "हो! तिच्याकडे नुसतं बघीतल्यावरही तुला हे जाणवलं असेल..."

                        "हो..." विचारमग्न झालेली सारिका म्हणाली. "मला वाटतं मला तसं वाटलं होतं, आपण त्या खोलीतून निघून जावं म्हणून ती सतत आपला तिरस्कार करतेय... "

                        "हो ती अतिशय द्वेष्टी आहे! दुसर्‍याला छळण्यात संतुष्ट राहणारी... असू दे, आता तिचं समाधान झालं असेल!"

                        • त्यानंतर दिवस शांततेत जाऊ लागले. शहाबाईनं तिच्या कर्मचारी वर्गाला, आपल्याकडे पुष्कळ खोल्या आहेत आणि नुसत्या झाडलोटीची उठाठेव नको, म्हणून सध्या ती खोली वापरासाठी बंद केली असल्याचं जाहीर केलं.

                          पण तिच्या कर्मचारी वर्गातली कुजबुज तिच्या कानावर यायची राहिली नाही. "..तुला सांगते, मला नेहमीच वाटत होतं, की ही बाई पागल झालीय. तिला काही म्हणता काही आठवत नाही..! अन् हल्ली जरा घाबरलेलीच वाटायची सदान् कदा... त्या खालच्या खोलीतल्या बाहुलीचीच काहीतरी भानगड असणार! "
                          "बापरे! म्हणजे ती एखाद दिवशी आपला गळा घोटायची नाही किंवा आणखी दुसरे काही करणार नाही कशावरून?"
                          वगैरे..

                          या आणि अशा कुजबुजी होतच राहिल्या आणि त्या ऐकून शहाबाई आपल्या खुर्चीत धुसफुसत राहिली... कदाचित ती खरेच वेड लागायच्या मार्गावर होती. पण तिनं आपल्यापुरता विचार केला होता, 'मी एकटी किंवा सारिका पागल ठरली असती तर ठिकच होतं त्यांच म्हणणं... पण दोघीही? आणि गार्गेकाकू? म्हणजे यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे आणि ते भयानक आहे. ... पण आता याचा शेवट कशात व्हायचा आहे..'

                            • तीन आठवड्यांनंतर सारिका हळूच म्हणाली, "पण बाई, आपल्याला त्या खोलीत जायलाच लागेल ना कधीतरी..."

                              "का?"

                              "अं.. म्हणजे... आता तिथे घाणीचा अगदी नरक झाला असेल! आता वाळवी लागायला सुरुवात होईल... तर मी काय म्हणतेय... म्हणजे.. आपण फक्त तिची एकदा झाडलोट करूया आणि पुन्हा लगेच पूर्वीसारखी बंद करून टाकूया!"

                              "नाही! अजिबात नाही.. त्यापेक्षा मी ती बंदच ठेवीन आणि पुन्हा कधीही तिकडे फिरकणार देखील नाही." शहाबाई ठामपणे म्हणाली.

                              "अहो, अशा काय करताय? खरंच.. तुम्ही तर माझ्यापेक्षाही वेडगळपणा करायला लागलात..."

                              "हो. तसं म्हण.. आहे मी वेडगळ! किंबहुना मी आधीपासूनच आहे वेडगळ, पण सुरुवातीला मला त्याची गम्मत वाटत होती. पण... जाऊ दे. आता मी त्या खोलीत कधीही जाणार नाही."

                              "ठीकाय. पण मला जायचंय," सारिका म्हणाली, "... आणि मी जाणार!"

                              "सारिका, मला माहीताय तुला कशासाठी तिथं जायचंय! केवळ आपलं कुतूहल शमवायला! तिथं त्या बाहुलीनं आतापर्यन्त काय काय केलंय हे बघायची तुला भयंकर उत्सुकता लागलीय. दुसरं काही नाही!"

                              "तसं समजा. आहे मला कुतूहल. मला बघायचंय त्या बाहुलीनं तिथं काय केलंय आतापर्यंत."

                              "हे बघ सारिका, मला अजूनही वाटतंय की तिला एकटी सोडण्यातच आपलं हित आहे. आता आपण त्या खोलीचा नाद सोडलाय आणि त्यात ती समाधानी आहे. आणि तिला तू समाधानीच राहू दे." शहाबाईनं सुस्कारा टाकला, "देवा! कसली अर्थहीन चर्चा रंगवत बसलोय आपण."

                              "हो, मला ठाऊकाय... आपण व्यर्थ चर्चा करत बसलोय. आणि तुम्हाला ती नको असेल तर मला त्या खोलीची चावी देऊन टाका."

                              "...."

                              "मी तिला बाहेर घेऊन येईन अशी तुम्हाला भिती वाटते? पण बाई, तिला या वास्तूतला कोणताही दरवाजा, खिडकी किंवा टाळा तिच्या मर्जीविरुद्ध तिला आत कोंडू शकणार नाही."

                                • सारिकानं दरवाजा उघडला आणि ती आत गेली.

                                  आतलं दृश्य पाहून ती अवाक झाली.
                                  "बापरे! किती भयंकर...! विचित्र!"

                                  "काय विचित्र?" सारिकाच्या पाठीमागून तिच्या खांद्यांवरून खोलीत डोकावणार्‍या शहाबाईनं विचारलं.

                                  "अहो, एवढे दिवस अजिबात इथं न फिरकून देखील इथं कणभर सुद्धा धूळ नाहीय. जणू आताच कुणीतरी साफ करून गेलंय! दिसतेय का? एवढा काळ बंद ठेऊनही..."

                                  "...."

                                  "अन् ही इकडं आहे ती!" तिथूनच बोट दाखवत सारिका म्हणाली.

                                  जीव मुठीत घेऊन शहाबाईनं तिकडं नजर वळवली. ती बाहुली सोफ्यावर होती. पण आता ती तिच्या नेहमीच्या अस्ताव्यस्त अवस्थेत पसरलेली नव्हती. तर ती मागे ठेवलेल्या तक्क्याला टेकून ताठ बसली होती. एखादी बडी मालकीण दिवसाच्या सुरुवातीला इतरांची अभिवादनं स्वीकारायला तयार होऊन बसावी तशी.

                                  "... तर आता तिचं इथं व्यवस्थित चाललंय असं दिसतंय... ?" कुजबुजत शहाबाई म्हणाली, "मला तर वाटतंय की असं आगंतुकपणे आपण इथं आलो, याबद्दल आपण तिची माफी मागायला पाहिजे."

                                  "चला जाऊया इथून.." लगबगीनं मागे सरत सारिका म्हणाली. त्या बाहेर आल्या. सारिकानं दरवाजा बन्द केला अन् पुन्हा त्याला टाळा लावला आणि त्या दोघी एकमेकींत कुजबुजू लागल्या. शहाबाई म्हणाली, "पण आपल्याला एवढी भिती वाटायची काय गरज हेच कळत नाहीय..."

                                  "देवा! अहो, या प्रकारानं कोण घाबरायचं नाही?"

                                  "हं.. असं घडतही... नाही? पण यात खास काही नसावं. एखादी इकडून तिकडे नाचणारी कळसूत्री बाहुली! पण वाटते ही कळसूत्री बाहुली नसेल, पिशाच्च असावं!"

                                  "कुणी सांगावं.."

                                  "पण माझा तसल्यावर खरेतर अजिबात विश्वास नाही. मला वाटते ही बाहुलीच आहे."

                                  "पण बाई तुम्हाला खरेच माहीत नाही का, ही कुठून आलीय हे?"

                                  "नाही गं.. मला जराही कल्पना नाही.." शहाबाई उत्तरली, "पण मी यावर जेवढा अधिक विचार करते, तेवढी मी हिला विकत आणलेली नाही, किंवा मला कुणी दिलेलीही नाही या मतावर मी ठाम होत जाते.. ... माहीत नाही.... ती इथं आली! बस्स..."

                                  "ती इथून कधी निघून जाईल?"

                                  "खरेतर तिनं आता इथून का जावं? तिला जे हवंय ते तिला मिळालंय इथं."

                                    • पण बाहुलीला जे हवं होतं, ते सगळं तिला अजूनही मिळालंच नव्हतं.

                                      दुसर्‍या दिवशी सारिका प्रदर्शन - दालनात गेली. आणि समोरचं दृश्य बघून तिला श्वासही घेता येऊ नये इतकी धाप लागली. तिचा जीव गुदमरायला लागला. "शहाबाई! शहाबाई! अहो खाली या ताबडतोब!"

                                      "काय झाले?" सकाळी उशिरा उठलेली गुडघ्यातल्या संधीवातानं वैतागलेली असलेली शहाबाई लंगडत, धडपडत खाली आली.

                                      "अगं तुला झालंय तरी काय सारिका?"

                                      "तिकडं बघा काय झालंय!"

                                      त्या दोघीही दालनाच्या प्रवेशद्वारातच थिजल्या. समोरच्या सोफ्यावर आपले खांदे आरामात पसरून बसलेली बाहुली होती!

                                      "ती बाहेर आलीय... त्या खोलीतनं ती बाहेर आलीय...!" सारिका कशीबशी म्हणाली, "...तिला हे दालनही हवे आहे!"

                                      शहाबाई दरवाजातच डोकं धरून खाली बसली. "शेवटी तिला हे आख्खं दुकानच हवंय!"

                                      "...कदाचित.."

                                      ... आणि अचानक, शहाबाई ताडकन उठून उभी राहिली.

                                      "... अगं ए नीच, कावेबाज, दुष्ट आणि निर्बुद्ध सटवे! काय हवंय तरी काय तुला इथं?" टिपेच्या स्वरात त्वेषाने ती गरजली. "का पिच्छा धरलायंस असा? काळं कर इथून तुझं! आमच्यासमोर थोबाड नको तुझं!"

                                      त्या दालनात क्षणात शांतता पसरली. त्या बाहुलीनं किंचित हालचाल केल्याचं त्या दोघींनाही अगदी स्पष्ट जाणवलं. जणू तिने आपले पाय आणखी आरामात बसायला जरा पुढे ताणले. तिचा एक हात मागे सोफ्यावर विसावला होता. आणि तिचा अर्धा झाकलेला चेहरा तिच्या खांद्याखालून या दोघींना निरखतोय असं भासत होतं.. अतिशय क्रूर, दुष्ट नजरेनं...

                                      "व्वा! काय सृजनत्व म्हणायचं याला!" शहाबाई पुन्हा गरजली, "मला आता हे आणखी सहन होत नाहीय." तिचा आवाज एखाद्या धारदार पात्याप्रमाणे त्या दालनाची शांतता चिरत गेला. आणि अगदी अचानक, सारिकाला अनपेक्षीतपणे, शहाबाई एकदम दालनात घुसली. तिनं ती बाहुली उचलली. आणि बळ एकवटून तिनं तिला समोरच्या खिडकीतून रस्त्यात लांब भिरकावली.

                                      सारिकानं भितीनं किंकाळी फोडली.
                                      "शहाबाई..... काय केलंत हे? जे करायला नको होतं ते..... असं आपण कधीच करायला नको होतं....!"

                                      "नाही...! मला काहीतरी करायलाच हवं होतं. माझ्या सहनशक्तीच्या पलीकडं गेलं होतं हे..."

                                      सारिका हळुहळू पावलं टाकत दालनात शहाबाईजवळ खिडकीशी आली. आणि हळूच खिडकीतून खाली डोकावू लागली. खाली रस्त्याच्या फरसबंदीवर बाहुली तिच्या तोंडावर निश्चलपणे पडली होती.

                                      "तुम्ही... तिला मारून टाकलंत!"

                                      "बरळू नकोस! मखमल आणि रेशमाच्या त्या चिंध्यांना मी काय मारून टाकणार? ती खरी नाही!"

                                      ".....!"

                                        त्या बाहुलीकडं नजर वळवलेल्या शहाबाईनं अचानक श्वास रोखला अन् ती जवळ जवळ ओरडलीच, "ती छोटी बघ!"

                                        समोर जीर्ण कपड्यातली एक चिमुरडी त्या फरसबंदीवर बाहुलीशेजारी उभी होती. तिने रस्त्यावर पुन्हा एकदा इकडं तिकडं पाहिलं. रस्त्यावर त्या सकाळच्या वेळी विशेष रहदारी नसली तरीही काही वाहनांची वर्दळ होती. त्या मुलीनं समाधानानं आपली नजर पुन्हा बाहुलीवर वळवली. आणि डोळ्याचं पातं लवायच्या आत पटकन तिला उचलून घेतली आणि रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली.

                                        "अगं थांबव... थांबव तिला!" शहाबाई सारिकावर ओरडली.

                                        "थांबव तिला! त्या मुलीनं ती बाहुली नेता कामा नये. ती बाहुली दुष्ट आहे! सैतानी आहे! त्या मुलीला आपण रोखायलाच हवं!"

                                        पण त्या दोघींनी त्या चिमुरडीला थांबवायच्या आधीच डावीकडून तीन भरधाव गाड्या आणि उजवीकडून दोन मोठ्या अवजड मालाच्या गाड्या एकदम आल्या. क्षणात ब्रेक करकचून दाबल्याचे कर्कश्य आवाज आले, आणि काय घडतंय हे कळायच्या आत ती चिमुरडी त्या गाड्यांच्या मध्ये तयार झालेल्या एवढ्याशा जागेत कोंडली गेली!

                                        सारिका, धाडधाड जिन्यावरून खाली पळत सुटली. शहाबाई तिच्या मागोमाग खाली आली. त्या दोघीही ती चिमुरडी तिथून निसटून रस्त्याच्या पलीकडे जाईल, या भितीनं त्या मालवाहू आणि खासगी गाड्यांना चुकवत त्या एवढ्याशा बेटाप्रमाणे भासणार्‍या जागेकडे पोचल्या. "बाळा, ती बाहुली तू का घेतलीस तिथून?" सारिका अधीरपणे तिला म्हणाली, "मला ती परत दे पाहू."

                                        चिमुरडीनं सारिकाकडं पाहिलं. साताठ वर्षे वयाची ती चिमुरडी अतिशय कृश दिसत होती अन् तिचे डोळे किंचित काणे असल्यासारखे भासत होते. तिच्या चेहर्‍यावर कमालीचा बेफिकीरपणा दिसत होता.

                                        "मी ती तुम्हाला का परत देऊ?" ती ताडकन् उत्तरली, "त्या खिडकीतनं.. तुम्ही तिला भिरकावल्याली बघीतलंय... मी स्वत:! तुम्ही तिला बाहेर हाकलून दिली! ... म्हणजे ती तुम्हाला नकोय. आणि आता माझी झालीय ती!"

                                        "हे बघ बाळ, आपण तुला दुसरी, एकदम नवीकोरी बाहुली आणूया." शहाबाई म्हणाली, "हवं तर आता इथूनच आपण बाजारात जाऊ. तू म्हणशील तिथं! आणि तू दाखवशील ती बाहुली मी तुला घेऊन देते. पण बाळा, ही मला परत कर."

                                        "मी नाही जा!" आणि तिनं त्या बाहुलीच्या रक्षणार्थ तिच्याभोवतीची आपली मिठी घट्ट केली.

                                        "हे बघ, तुला ती परत करावीच लागेल." सारिका म्हणाली, "तुझी नाहीय ती. दे इकडं." आणि ती घेण्यासाठी तिनं त्या चिमुरडीपुढं हात पसरले. तेव्हा जोरात पाय आपटत जीवाच्या आकांतानं ती किंचाळली, "नाही! नाही! नाही! ती माझी... एकदम माझ्या एकटीची आहे! मला ती फार आवडते, मी तिच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही तिच्यावर अजिबात प्रेम करत नाही! तुम्हाला नको आहे ती! तुम्ही तिचा द्वेष करता. जर तुम्ही तिचा इतका तिरस्कार करत नसता तर तुम्ही कशाला फेकली असती तिला बाहेर? माझं खूप प्रेम आहे या बाहुलीवर. खूप खूप. आणि तिला हेच हवंय!"

                                        आणि एखादा मासा ज्या सराईतपणे पाण्यात सुळकी मारतो, त्या चपळाईनं त्या वाहनांतून रस्ता ओलांडून ती चिमुरडी त्या बाजूला पोहचलीसुद्धा. त्या वाहनांच्या गर्दीतून पलीकडे जायचे या दोघींना सुधरेपर्यंत तीने धूम ठोकली आणि नजरेआड झालीदेखील.

                                        "निसटली ती," हताशपणे शहाबाई म्हणाली.

                                        "... अन् ती म्हणाली ती बाहुलीवर खूप प्रेम करते, आणि तिला तेच हवंय!'"

                                        ".......कदाचित," शहाबाई म्हणाली, "...तिला जे पाहिजे होतं ते हेच असावं...! तिला प्रेम हवं होतं... प्रेम!"

                                        ...त्या कोंडलेल्या रहदारीच्या मधोमध कितीतरी वेळ एकमेकींकडं भयकंपीत नजरेनं बघत त्या दोघी मूढासारख्या उभ्या होत्या.

                                        (अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या 'द ड्रेसमेकर्स डॉल' या कथेचा स्वैर अनुवाद)

                                        विषय: 
                                        प्रकार: 

                                        अनुवाद चांगला केलायस पण अनुवाद आहे जाणवत राहते वाचताना, शब्द नि वाक्य रचनेमूळे. e.g. अरे देवा, झगा. मला वाटते कि थीम हीच
                                        ठेवून अधिक भारतीय करता आली असती रे. कारण तू पात्रांची नावे बदलून सुरूवात केलीच आहेस.

                                        आवडली कथा.. भय, उत्कंठा जाणवते..
                                        असाम्या म्हणतो तसं, तू थोडी भारतीय करायला हवी होतीस कथेला..

                                        ------------------------------
                                        झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
                                        Proud

                                        छान अनुवाद गजा, प्रत्येक पान वाचताना त्यातली उत्कंठा, भय टिकून राहतं..

                                        छान आहे............................

                                        ***************************************************************************************

                                        सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
                                        अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

                                        असामी, पूनम, मन्जू, मराठी वाचक आणि कागलकर धन्यवाद. असामी, पूनम तुम्ही म्हणताय तसं पूर्ण भारतीय संदर्भ घालून पण चांगली झाली असती. Happy

                                        झाडावर चडता आले तर ना