एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड

Submitted by मार्गी on 2 June, 2018 - 06:18

४: परतूर- अंबड (६० किमी)

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर

योग सायकल यात्रेचा तिसरा दिवस, १३ मे ची पहाट. रात्री चांगला आराम झाला आणि काल योग साधकांसोबत झालेल्या चर्चेने चांगली ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे प्रवासाचा उत्साह आणखी वाढला आहे. काल जिथे थांबलो, ते परतूर! ह्याला खरं तर परतूड म्हणातात. आणि महाराष्ट्र व भारताच्या इतिहासामध्येही ह्या गावाशी संबंधित एक गोष्ट आहे. १७६१ मध्ये पानिपतमध्ये मराठे व अब्दाली ह्यांच्यात पानिपतचं तिसरं युद्ध झालं. जेव्हा मराठा सेना ह्या युद्धासाठी निघाली, तेव्हा ती परतूडमध्ये होती. परतूडमध्ये सदाशिवरावभाऊ पेशवेंच्या नेतृत्वाखाली मराठी सेनेने निजामाला हरवलं होतं. परतूडमध्येच मराठी सेनेला अब्दाली व नजीबखान रोहीलाच्या सेनेने मराठा सरदार दत्ताजी शिंदेंना पराजित केल्याची‌ बातमी मिळाली होती व म्हणून परतूडवरूनच ही मराठी सेना दिल्लीसाठी निघाली होती.

आज परतूरवरून अंबडला जाणार आहे आणि हा टप्पा सुमारे साठ किलोमीटरचा असेल. परतूरवरून अंबडला जाण्याचे दोन मार्ग आहेत. परतूरच्या परिचितांसोबत बोलून त्यापैकी एक रस्ता ठरवला. ज्यांच्याजवळ काल थांबलो होतो, ते डॉ. आंबेकर सर मला सोडवायला स्टेशनपर्यंत सायकल चालवत आले! काल रात्री पाऊस झाल्यामुळे हवा आल्हाददायक आहे आणि आजही ढग आहेत. वा! आज तिसरा दिवस असल्यामुळे शरीरही लयीत आहे. परतूरनंतर काही वेळ रस्ता चांगला होता, पण नंतर अगदी साधा रस्ता सुरू झाला. एका अर्थाने आता इंडिया संपून भारत सुरू झाला. अगदी छोटी गावं आणि शेतं! जवळ जवळ निर्जन रस्ता! पण सकाळचं प्रसन्न वातावरण व शांतता! ऊन्हाचं‌ तर चिन्हही नाही! सगळीकडे मस्त शेती‌ व नैसर्गिक सौंदर्य! थोड्या अंतरावर डोंगरही आहेत. त्यामुळे साधाच रस्ता असूनही आरामात पुढे जात राहिलो. एक- दोनदा रस्ता विचारून पुढे निघालो. रस्त्यावर अनेक चढ- उतार लागत आहेत. सुमारे दोन तासांनी घनसावंगी ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचलो. इथे थोडा नाश्ता केला- तोच चहा- बिस्कीट. हॉटेलवाल्याने माझ्या सायकलवर लावलेला छोटा बोर्ड बघितला व म्हंटलं की, तुम्ही सेवा करताय, तुमच्याकडून कमी पैसे घेईन! मला हा माणूसही अप्रत्यक्ष प्रकारचा योग साधक किंवा योगार्थी वाटतोय! नंतर त्यांना माझ्या प्रवासाबद्दल माहिती दिली, संस्थेची पत्रकं दिली व पुढे निघालो.

आता हायवे तर सुरू झालाय, पण काही ठिकाणी ह्याचीही स्थिती फार ठीक नाहीय. पण आज ऊनच पडलं नाहीय, त्यामुळे मजेत जाऊ शकतोय. आजवर इतकी सायकल चालवली आहे की आता समोर एखादा नाला किंवा पूल दिसला की लगेच कळतं की, आता इथून चढ सुरू होणार. किंवा जर पाण्याची टाकी किंवा टॉवर दिसलं तर कळतं की, पुढे उतार असणार. रस्त्यावर एका ठिकाणी फाटा लागला- तीर्थपूरी १३ किमी. त्या भागात दहीगव्हाण गावात पहिलेही गेलो आहे. त्या गावामध्ये चांगलं विकास काम सुरू आहे. तसंच बायोगॅस, जल संवर्धन अशा विषयांवरही काम सुरू आहे.

हळु हळु अंबड जवळ येतंय. पण चढ असल्यामुळे व वारा उलट दिशेला वाहत असल्यामुळे वेग कमीच आहे. मध्ये मध्ये रस्त्यावरचे लोक वळून बघतात; कोणी तर थांबून माझ्याशी बोलतात. वेग कमी असला तरी नजारे सुंदर आहेत व त्यामुळे सायकलिंगचा पुरेपूर आनंद घेता येतोय. जेव्हा असे नजारे बघतो, तेव्हा मनामध्ये आपोआप गाणं सुरू होतं- ‘आओ हुजूर तुमको, सितारों में ले चलूँ! दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं!’ गाणं मनातल्या मनात ऐकत पुढे जात राहिलो. सायकलचं कौतुक करावं तितकं कमी. कारण अगदी साध्या किंवा साधारणपेक्षाही कमी दर्जाच्या रस्त्यावर सायकलीने उत्तम सोबत दिली. नंतरही चढ असल्यामुळे थोडा वेळ लागला, पण अपेक्षित अशा वेळेतच अंबडला पोहचलो. मला रिसीव्ह करायला डॉ. जाधव सर सायकलीवरच आले. त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. तिथे आणखी काही योग साधकांनी स्वागत केलं. त्यात अंबडचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग साधकही‌आहेत. त्यात एक फिरोज़ पठान आहेत. त्यांनी त्यांच्या कामाविषयी माहिती दिली, माझ्या प्रवासाविषयी विचारलं आणि आज श्री श्री गुरूजींचा वाढदिवस असल्याने त्यांच्या गावात एक कार्यक्रम आहे, त्यालाही मला बोलावलं.


तिसरा दिवस- परतूर ते अंबड- ६० किमी

आज ऊन अजिबात नसल्यामुळे जास्त थकलोच नाही. आता ह्या रूटीनची सवय झाली आहे. दुपारी थोडा आराम करून संध्याकाळच्या बैठकीसाठी तयार झालो. डॉ. जाधव सरांनी सांगितलं की, अंबडमध्ये जालन्याच्या चैतन्य योग केंद्राची जी शाखा चालते, त्यातले अनेक योग साधक काही कारणामुळे बाहेर गेले आहेत किंवा प्रवासात आहेत. हे दिवसही लग्नाचे दिवस आहेत. त्यामुळे अगदी थोडेच साधक अंबडमध्ये आहेत. संध्याकाळी मीटिंगच्या ऐवजी त्या योग साधकांसोबत व्यक्तिगत प्रकारे भेटणं झालं. अंबड शहरातला डॉ. जाधव सरांचा जन संपर्क बघता आला. योगाशी संबंधित काही‌ साधकांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर सुरू असलेल्या कामाची माहिती मिळाली. त्या दरम्यान डॉ. जाधव सरांनी अंबडमधल्या एकूण योग- कार्याची माहिती दिली. हे खरं तर जालन्याच्या चैतन्य योग केंद्राचाच एक भाग आहे. पण इथे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाला आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी जालन्यामधलेच तज्ज्ञ येतात. इथे टीम आता उभी राहात आहे. संध्याकाळी अंबडच्या मंदीरात गेलो. रात्री ह्या टीममधले एक योग साधक- श्री. मेटकर मोठा प्रवास करून आल्यावरही मला भेटायला आले. त्यांच्या कामाची माहिती मिळाली. हे सर्व बघून असं वाटतंय की, इथे टीम आत्ता उभी राहात आहे. कार्यकर्ते सक्रिय होत आहेत. संध्याकाळचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम रात्री उशीरा सुरू होणार असल्याचं कळालं, त्यामुळे तिथे जाता आलं नाही.

अंबडमध्ये तशी बैठकीसारखी चर्चा झाली नाही तरी काही कार्यकर्त्यांसोबत भेट झाली. तालुका असला तरी अंबड छोटं गाव आहे. अशा ठिकाणी योगासारख्या विषयावर काम करणं सोपं नाही. तरीही इथे नियमित योग- वर्ग होतात. लोक योग करतात. ह्या परिसरात आर्ट ऑफ लिव्हिंगचंही चांगलं काम सुरू आहे. उद्या ह्या प्रवासातला एक मुख्य टप्पा असेल. उद्या रोहीलागडमार्गे औरंगाबादला जाईन.

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

पुढील भाग: अंबड- औरंगाबाद

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा अगदी पेशवाई च्या काळातील उल्लेख सापडला की ही यात्रा ऐतिहासिक संदर्भा सोबत योग न ध्यानरस पूर्ण आहे ,पुढील भागाची प्रतीक्षा