ऑक्टोबर....आठवांचा निरंतर दरवळ

Submitted by राजेश्री on 7 May, 2018 - 12:08

ऑक्टोबर....आठवांचा निरंतर दरवळ..

हॉटेल आणि हॉस्पिटल इथे चित्रित होणारा हा चित्रपट.हे दोनच सेट कथेच्या अनुषंगाने पात्रांना करावा लागणारा प्रवास सोडला तर लोकेशन हेच.या सिनेमाचा नायक, तुमच्या माझ्या मध्ये दडलेला डॅन. आणि नायिका म्हणता येणार नाहीच पण उल्लेख तसाच करावी लागेल अशी शिऊली. नाव पण अशी वेगळीच राज,अंजली नावे मागे पडली आता.अलीकडे काही तरी सतत हटके हवं असत.हे हटके होता होता आयुष्याचा मूळ गाभा हरवत जातो.पण हा सिनेमा जितका हटके तितकाच तो भावनेच्या मुळापर्यंत पोहोचवणारा,आपण हा सिनेमा बघताना व्हॉट नेक्स्ट च्या शोधात सदैव राहतो आणि या शोधात आपल्याला व्यस्त ठेवतात आणि हा सिनेमा तिथेच संपतो.
मगाशी म्हणाले तसे हॉटेल हे लोकेशन का तर हॉटेल मॅनेजमेंट च्या इंटर्नशिप साठी एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हे डॅन आणि शिऊली काम करीत आहेत.त्यांच्याबरोबर काम करणारे इतरही कॅण्डीडेट आहेत जे आपल्या करियर बद्दल जास्त दक्ष आहेत.सांगितलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडतयात यामध्ये शिऊली तर प्रचंड सहनशील,विनम्र,हळवी आणि तितकीच निरागस.याउलट डॅन ,ओढून ताणून काम करायचं,सांगितलेलं काम टाळायचं,दुसऱ्याच्या कामात विघ्न आणत रहायच आणि प्रचंड बेफिकीर वृत्ती.त्याच वय अवघ २१ वर्ष हे वय असतंच खोडकर पण या खोडकरपणाला एक चिडचिड, उदासीनता,नैराश्यतेचीही किनार आहे.
शिऊलीचा हळुवारपणा आणि डॅन चा उर्मटपणा दर्शवणारा एक सीन आहे शिऊली प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेली प्राजक्ताची फुले हळुवार ,अलगदपणे गोळा करतेय,त्याचा सुवास तितक्याच अभावितपणे अनुभवतेय आणि एका बाऊल मध्ये काही फुले गोळा करून ती टेबलवर ठेऊन कामावर निघून जाते.काही कारणासाठी तिच्या जागेवर परत येते तर डॅन एका खुर्चीत अंग मुडपून झोपलेला असतो आणि त्याच्या पायाचा धक्का लागून तो बाऊल खाली पडून प्राजक्ताची फुले जमिनीवर विखुरलेली असतात.ती डॅन ला काहीच न बोलता ती फुले तितक्याच हळुवार पणे गोळा करून ठेवते.डॅन एखादं दुसर फुल उचलून तिला देतो. आणि पुन्हा तसाच बेफिकीरपणे झोपी जातो.
शिऊलीचे काही मोजके सीन तर बाकी डॅन चा कामचुकारपणा,आक्रस्ताळेपणा आणि चिडखोरपणा दाखवणारे सीन. ज्यामुळे त्याची त्याच्या सहकार्यांशी भांडणे होतात,बॉसचा कायम ओरडा खावा लागतो त्याला,कामात हलगर्जीपणा ,आलेल्या कस्टमरशी उद्दामपणे वागतो म्हणून डॅन ला पनिशमेन्ट म्हणून लॉंड्री,साफसफाई ची कामे दिली जातात.तरी हा काय सुधारायच नाव घेत नसतोच.
अस सगळं चाललेलं असताना अचानक एक घटना घडते, टेरेस वर पार्टी वेळी कठड्यावर बसताना शिऊलीचा हात सटकतो आणि ती उंचावरून खाली कोसळते. रक्ताच्या थारोळ्यातुन तिला हॉस्पिटल मध्ये पळवले जाते.जगण्याची आशा करण्याजोगा हा अपघात नसतोच.सगळे सहकारी हवालदील होतात.शिऊलीची आई,बहीण,भाऊ यांना प्रचंड धक्का बसतो.तिच्यावर उपचार चालू असतात.ह्रदय चालू असत ती पूर्ण बेशुद्ध असते.तिच्या डोक्याला मार लागलेला असतो.तिला लाईफ सपोर्ट सिस्टीम वर ठेवलेले असते.दिवस ,महिने जात राहतात तिच्या आईला आपल्या मुलीने बर व्हावं अशी तीव्र इच्छा असते.अधेमधे डॉक्टर शिऊलीच्या क्रिटिकल परिस्थितीबद्दल सांगत राहतात,तिच्या ऑफिस मधील सहकारी एक एक करीत शिऊलीला बघायला जात असतात.मग नंतर ते ही आपल्या कामामध्ये,रुटीनमध्ये परततात. डॅन च ही तसच असत.आणि अचानक त्याची सहकारी शिऊली तोल जाऊन पडण्याआधी 'डॅन कहाँ है'हे तीन शब्द बोलल्याच कळत आणि त्याच अवघ जगणं, वागणंच बदलून जात.हे आधी का नाही सांगितलं म्हणून तो आपल्या मित्रांवर चिडतो आणि मग शिऊलीने आपल्याबद्दल का बरं विचारलं असेल ,तिचे आपल्यावर प्रेम असेल का? या विचारांनी ती हवालदिल होतो आणि कायम हॉस्पिटल मध्ये शिऊलीकडे जायला तो धडपड करीत राहतो.इतकी की तो नोकरीकडे, स्वतःकडे देखील दुर्लक्ष करतो आणि शिऊली लवकर बरी व्हावी म्हणूंन तिची काळजी घेत राहतो.तिच्यावर उपचार योग्य होतात ना,तिच्या आईला देखील आपल्या हॉस्पिटलच्या सततच्या अस्तिवाने एक नैतिक दिलासा देत राहतो.एके दिवशी तो तिच्या बेडजवळ तिची आवडती प्राजक्ताची फुले नेऊन ठेवतो.शिऊली त्या फुलांचा वास घेण्यासाठी नाकपुड्यांची हालचाल ही करते.डॅन तिची अचानक लागलेली औषधे आणताना त्याच्या लक्षात येत त्याच्याकडे पैसे नाहीत.तो आपल्या सहकाऱ्यांकडे हात पसरतो.हळूहळू शिऊली उपचाराला प्रतिसाद देते डोळे उघडे पण प्रतिसाद शून्य.तिची स्मरणशक्ती ती कुणाला ओळखते का बघायला डॉक्टर तिच्या आईच नाव घेतात,बहीण,भावाच नाव घेतात पण काही प्रतिसाद नाही.डॅन डॉक्टर ना आपल डॅन हे नाव घ्यायला लावतो.तेंव्हाही काही प्रतिसाद नाहीच.तरी डॅन ती बरी व्हावी म्हणून वाटेल ते करीत राहतो,स्वतःचे फोटो तिच्या नजरेसमोर येतील असे बेडला लावून ठेवतो,कहर म्हणजे तो आपल्या मैत्रिणीकडून काही पैसे घेऊन शिऊलीच्या वाढलेल्या भुवया देखील कोरून घेतो.या त्याच्या धडपडीत त्याला हॉस्पिटलची नर्स,चौकीदार स्वतःच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन काही वेळा मदत करीत राहतात,त्याचे शिऊली वरील प्रेम समजावून घेतात.
काही महिन्यांनी शिऊलीला घरी नेण्यात येत.तिची तब्येत जैसे थे च असते.नजर एका ठिकाणी स्थिर ,व्हीलचेअर आणि बेड हेच तीच विश्व .डॅन हरघडी तिच्या सोबत असतो.एक दिवस शिऊलीची आई त्याला सांगते तू किती दिवस अस तिच्यात गुंतून पडणार तुलाही तुझं आयुष्य आहेच ना तू जा काही काम कर.त्याआधी डॅन च्या आईला आपला मुलगा कसा स्वतःला विसरून शिऊली साठी धडपडतोय हे कळत.ती तरी काय बोलणार. डॅन शिऊलीच्या आईच्या सांगण्यावरून कुलूला निघून जातो. तिथे तो हॉटेल व्यवस्थापक म्हणूंन काम करीत असतो.एक एक क्षण शिऊलीची आठवण,एक एक दिवस शिऊलीची विचारपूस करीत आपलं काम करीत राहतो. आणि एक दिवस शिऊली काही खात पित नाही,चिडतेय ,का ते तिला व्यक्त होता येत नसतंच,बोलताही येत नसत.मग डॅन हे कळल्यावर आपली नवीनच लागलेली नोकरी सोडून पुन्हा शिऊलीसाठी परत येतो.तिला भेटून आता कुठे जाणार नाही सांगतो. तिला फिरायला नेत राहतो,तिची काळजी घेणे.तिला बेडवरून उचलून व्हीलचेअर मध्ये बसवून फिरायला नेणं,तिच्याशी एकतर्फी गप्पा मारत राहण हेच त्याच आयुष्य होत.रात्री झोपायला तेवढं आपल्या घरी आणि दिवसभर शिऊलीच्याच जवळ तो असतो.
डॅन च आयुष्य डॅन कहा है या एका प्रश्नाने तर बदलले असते.पुन्हा त्याच्या आयुष्यातील एक अध्याय त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कस देतो हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेलं उत्तम. ते उत्तर डॅन ला सार आयुष्य जगून घेतल्यासारख 'निर्मोही' बनवत.
गोविंदाच्या वाटेने जाणाऱ्या आणि आतापर्यंत निव्वळ मनोरंजन,आणि गल्लाभरू सिनेमे दिलेल्या वरून धवन चा हा सिनेमा आणि त्याचा अभिनय म्हणजे एक डायनॅमिक चेंज वाटतो.डॅन ची दुसऱ्या भागातील भूमिका वठवताना तो वरुण धवन आहे हे पटतच नाही.नायिका बनिता संधू चा पूर्ण सिनेमाभर प्रभाव पडला तो तिच्या टपोऱ्या डोळ्यांनीच. त्यातले निश्चल भाव पाहीले की खूप हळवं व्हायला होतं.पण मग ती पडताना डॅन कहाँ है...असं का विचारते,तिच डॅन वर प्रेम होतं का? या प्रश्नाचं उत्तर हा सिनेमा देत नाही..डॅन ला ही नंतर नंतर या प्रश्नाचं उत्तर नकोच असतं. हा सिनेमा प्रेमाची गोष्ट सांगत नाही तर.हा सिनेमा प्रेमाच्या अश्या शक्यतेबद्दल बोलतो की त्याच उत्तर कुणी देऊच शकत नाही..शेवटी डॅन शिऊलीच्या अंगणातील प्राजक्ताच झाड बरोबर घेऊन जातो कारण प्राजक्ताच कसं असत ना, आयुष्य अल्पकाळाचच लाभत त्याला पण आठवांचा दरवळ मात्र तन,मन व्यापुनही उरतो.....तो निरंतर असतो म्हणून....

12-44-53-ITre6hHOcAig0DKPdLJsKlZ53AOFfaVtMDSaodq3NkcUUjdlDb63py_nnRkmLLFdNH490T_gEQQlzcrdbf_v28QGA80gVBNP7KUnn_-iXkfB6ZZf6l1zLxvdNSs7XNBEcM-7=w474-h310-nc.jpg12-44-53-ITre6hHOcAig0DKPdLJsKlZ53AOFfaVtMDSaodq3NkcUUjdlDb63py_nnRkmLLFdNH490T_gEQQlzcrdbf_v28QGA80gVBNP7KUnn_-iXkfB6ZZf6l1zLxvdNSs7XNBEcM-7=w474-h310-nc.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही अख्खी स्टोरीच सांगितलीत की उत्साहाच्या भरात! Happy

असो, सिनेमा खूप छान आहे.

काल prime वर पहिला, भयानक बोरिंग... इतका रटाळ चित्रपट या वर्षी पहिला नव्हता.. अति संथ..

ऑक्टोबर इज द बेस्ट फिल्म ऑफ द इयर..राझी नंतर..
मला हा चित्रपट जाम आवडला होता, मी परत बघेन, त्यातले सवांद इतके सहज, साधे आहेत, तिथं येऊन कोणी, उगाच "जिंदगी गम दर्द" वगैरे असे कोण डायलॉग मारत नाही, त्यामुळे चित्रपटातले सगळेजण आपल्यासारखे वाटतात, एवढ्या दुःखद घटनेवर चित्रपट असला तरी, कोणी धाय मोकलून रडत नाही, "भगवान तुम्हे जवाब देना पडेगा" असं काही होतं नाही, थोडक्यात दिग्दर्शकाने मेलोड्रामा पूर्णपणे टाळला आहे. शूजीत सरकारचं कौशल्य आहे की, कितीही दुःखद घटना असली तरी मेलोड्रामा दाखवत नाही, पिकू चित्रपटात सुद्धा कुठे ही मेलोड्रामा होतं नाही.

या चित्रपटात कोणी वाईट किंवा राक्षसी, निगेटिव्ह कॅरॅक्टर नाही, पुष्कळदा हिरो त्याच्याविरोधी व्हिलन हेच कथानक असतं, या कथेत व्हिलनचं नाही. शिऊलीचे मामा, त्यांचं वागणं चुकीचं वाटू शकतं, पण मुळात ती व्यक्ती भावनांच्या आहारी जाऊ नका, प्रॅक्टिकल वागा, एवढचं सांगते.

एवढी भयंकर परिस्थिती आहे, तरीही काही प्रसंग, उदारणार्थ तो आयब्रोचा प्रसंग, एवढ्या भीषण परिस्थिती असली तरी हे प्रसंग बघून आपल्या चेहऱ्यावर हास्य पसरतं.

दिल्लीचे चित्रण इतकं सुंदर केलं आहे, खरी दिल्ली बघायला मिळते, दिल्लीचे मोठे हायवेज, कडाक्याची थंडी, मग ते हीटर, रात्री दिसणारं धुकं, हे दाखवलं आहे, काही फ्रेम्स मनात घर करून जातात.

आपल्या चित्रपटात कसं प्रेम होतं तर, नायक नायिका एकमेकांना बघतात, आकर्षण वाढतं, मग ते एकदम उच्चं लेव्हलचं प्रेम होतं, पण इथे नायकाला नायिकेबद्दल काहीच माहित नाही, नायिका त्या हॉस्पिटल बेडवर कोमात आहे तर काय आकर्षण घडणार? पण तरीही त्यांच्यातली ती जवळीक वाढते, हा चित्रपट, प्रेमाच्या पलीकडचं सांगण्याचा प्रयत्न करतो.

मी तर या चित्रपटाबद्दल दिवसभर बोलू शकतो, पण रात्र फार झाली आहे, आता झोपतो.

बेस्ट फिल्म ऑफ द इयर.. wow.
झोप येत नसेल तर चांगला आहे हा चितपट. माझ्यासाठी worst मूवी ऑफ द इयर आहे हा.

अतिशय तरल आणि सुंदर सिनेमा !
नावही अगदी समर्पक
प्राजक्ताच्या फुलांचे आयुष्य अगदी थोडे असते पण आपल्या उपजत सुगंधाने
ते भारावून टाकतात...अन विरघळून जातात मातीत

जशी डॅन च्या आयुष्यात शिऊली येते आणि तो अंतर्बाह्य बदलतो

आणि प्राजक्ताच एक नाव शिऊली आहे Happy