बोअरिंग गावातला एक हॅपनिंग दिवस!!

Submitted by maitreyee on 24 April, 2018 - 11:39

हल्लीचीच गोष्ट . सकाळी आठ ची वेळ. न्यू जर्सीतले एक शांत सबर्ब. मिडलस्कूल च्या मुलांना शाळेत सोडून ड्रायव्हर रॉबर्ट टली ने डेपो मध्ये बस घेऊन जायच्या आधी नेहमीप्रमाणे बस चेक केली. कोणी काही विसरले का? एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना? सगळ्या सीट्स चेक करता करता एका सीट वर त्याला काहीतरी दिसले. चमकून त्याने ते नीट वाकून पाहिले. ही वस्तू टीनेजर्स कडे सापडणे अगदीच अशक्य होते असे नव्हे पण या शांत गावातल्या, रेप्युटेड स्कूल च्या बस मध्ये नक्कीच अपेक्षित नव्हते. रॉबर्ट ने वेळ न दवडता पोलिसांना आणि त्याच्या सुपरवायजर्स ना कळवण्याचा निर्णय घेतला. पोलिस ५ मिनिटात आलेच. ती वस्तू बघून तेही गंभीर झाले. ताबडतोब ती ताब्यात घेण्यात आली. स्कूल प्रिन्सिपल ना कळवण्यात आले. तसे ती वस्तू कुणी आणली हे समजणे सोपे होते. लगेचच बस चे सिसिटिव्ही फूटेज तपासण्यात आले. सगळे चेहरे रॉबर्ट च्या व्यवस्थित ओळखीचे होते, इतकेच नव्हे तर कोण कुठल्या स्टॉप वर चढते उतरते हेही पाठ होते त्याला! तरीही जो चेहरा ती वस्तू हाताळताना त्या फूटेज मध्ये दिसला तो अजिबात अपेक्षित नव्हता त्याला!!

दुपारचे चार. त्याच गावातले एक सुंदरसे भले मोठे घर. बेल वाजली. स्मिताने दार उघडले. बघते तर दारात एक पोलिस ऑफिसर! बाहेर पोलिसांच्या एक नव्हे दोन गाड्या! त्यातली एक या ऑफिसर ची आणि दुसरी बॅकप होती!
"मॅम, तुमच्या मुलीशी आम्हाला बोलायचं आहे, तिला बोलवा प्लीज!"
दारात कॉप ची गाडी? स्मिता टरकलीच.
"मॅम प्लीज, आय नो राधा इज होम. प्लीज कॉल हर. वी नीड टु टॉक!"
वी नीड टु टॉक!! अमेरिकन भाषेत या वाक्याचा अर्थ " यू आर इन बिग ट्रबल" असा असतो.
राधा म्हणजे स्मिताची आठव्या यत्तेत शिकणारी लाडकी टीनेज लेक. नवरा न्यूयॉर्कात कामाला आणि मुलगा कॉलेज साठी बाहेर पडलेला, स्मिता माँटेसरीत पार्ट टाइम जॉब करते. असं साधारण नॉर्मल घर. आमच्या अगदी जवळच्या ओळखीतले आमच्याच गावातले मराठी कुटुंब. स्मिता माझी मैत्रिण तर राधा माझ्या लेकीची मैत्रिण.
तर अशा कुटुंबाला दुपारी कॉप येऊन मुलीबद्दल विचारतो म्हणजे बर्‍यापैकी दचकवणारी गोष्ट!
स्मिता ने राधाला हाक मारली. राधा अगदी स्मार्ट, हुषार, स्कूल मधे अगदी "पॉप्युलर" मुलगी. तिने अगदी न घाबरता कॉप ला हॅलो केलं.
" हॅलो राधा. तुला काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची अगदी सरळ उत्तरं दे.यू आर नॉट इन ट्रबल - फॉर नाऊ. ओके?"
"ओके"
" तुला इतक्यात कोणी काही पॅकेट्स दिली होती का?"
"पॅकेट्स? नाही, पण कसली पॅकेट्स ?"
"इतक्यात तू आणि कुणी मित्र मैत्रिणींनी मिळून घरी, गराज मधे वगैरे काही सायन्स एक्सपेरिमेन्ट्स वगैरे केले का? "
"व्हॉट? नो!"
"बर मग कोणाबरोबर काही कुकिंग वगैरे केले का?"
"अम्म ? कुकिंग? नो?!! "
"ऑफिसर, व्हॉट इज धिस अबाउट? कॅन यू प्लीज टेल मी?" - स्मिता मध्येच.
तशी कॉप ने सांगितले " मॅम आज सकाळी आम्हाला स्कूल बस ड्रायव्हर ने इन्फॉर्म केले की त्याला बस मध्ये ड्रग्ज सापडले आहेत. बस च्या सीट वर सापडलेल्या पुड्या आणि सिसिटिव्ही फूटेज बघून हे राधाच्या बॅग मधून आले आहे या निष्कर्षाला आम्ही आलो आहोत. वी फाउंड समथिम्ग जे मेथ क्रिस्टल्स असावेत असा संशय आहे ! पुड्या आता लॅब मधे गेलेल्या आहेत पण आय हॅव सम पिक्चर्स फॉर यू"
त्याने फोन वर काही फोटो दाखवले. त्यात राधा स्कूल बस मध्ये बॅग मधून कसल्याश्या पुड्या मैत्रिणीला देताना दिसत होती.
"राधा, नाऊ कॅन यू टेल अस व्हॉट धिस इज अँड हू गेव्ह यू धिस?"
स्मिता अन राधा तरीही कम्प्लीट नॉन प्लस. काय प्रकार आहे हा? दोघी फुल टेन्शन मधे! मग दुसर्‍या एका फोटोत बस च्या सीट वर पडलेल्या त्यातल्या एका पुडीचा क्लोजप दाखवण्यात आला. पुडीत पांढरट क्रिस्टल्स स्प्ष्ट दिसत होते. त्या पुडीचा तो क्लोजप बघून मात्र राधा आणि स्मिता दोघींना एकाच वेळेस एकाच क्षणात या टेन्शन चा फुगा फाट्कन फुटणे, युरेका मोमेन्ट, खो खो हसण्याचा अटॅक असे बरेच काही काही एकदमच झाले!!
स्मिताने आतून तसल्याच "क्रिस्टल्स" ची मोठी पिशवीच आणली अन ऑफिसर समोरच दोन चार तोंडात टाकून पण दाखवले! त्या ऑफिसरला नीट एक्सप्लेन केल्यावर त्यानेही डोक्याला हात लावला !
"यू विल नॉट बिलिव हाउ अलार्म्ड वी वेअर! आम्ही पार शेजारच्या काउंटीतल्या पण एक्सपर्ट्सना बोलावलेय हे नेहमीपेक्षा वेगळे इन्ट्र्रिकेट दिसणारे क्रिस्टल्स पहायला. नाऊ आय अ‍ॅम शुअर दोज गाइज आर गोइंग टु हॅव अ किक आउट ऑफ धिस! " Lol
तर त्या पुड्या होत्या खडीसाखरेच्या !! हो ख डी सा ख रे च्या पुड्यांनी इतके रामायण झाले होते!!
स्मिता आमची भारी सोशल. सतत टी पार्टी म्हणू नका, हळदि कुंकू म्हणू नका, काही ना काही चालू असते तिच्या घरी. आज पण कसलेतरी गुरुवार की शुक्रवारचे कसले तरी हळदीकुम्कू होते तिच्याकडे. त्यासाठी कालच पटेल कडून खडीसाखर, फुटाणे, नारळ, पेढे इ. तयारी स्मिताने केली होती. राधाला खडीसाखर आणि फुटाणे तोडात टाकायला आवडीचे. म्हणुन व्यवस्थित लहान झिप लॉक च्या पिशव्यात खडीसाखर घालून तिने स्कूल मधे नेली आणि मैत्रिणींना पण वाटली! त्यातलीच एक पुडी बस मध्ये पडली होती जी आमच्या छोट्या गावातल्या एरव्ही कसलीच एक्सायटमेन्ट नसलेल्या पोलिस स्टेशनला एक "एक्सायटिंग डे अ‍ॅट वर्क" आणि राधाला दुसर्‍या दिवशी फ्रेन्ड्स ना सांगायला एक आयता कूल किस्सा देऊन गेली होती!!
तसे दर वर्षी होणार्‍या साग्रसंगीत ढोल वगैरे सह होणार्‍या "होली पार्टीज" मधली चित्र विचित्र रंगीत तोंडं , दिवाली फायरवर्क्सवरून होणार्‍या शेजार्‍या पाजार्‍यांच्या कम्प्लेन्ट्स , दर वर्षी पोस्टात ऑगस्ट च्या सुमारास पडणारे स्ट्रेन्ज थ्रेड्स (राख्या) असलेले एन्वलप्स आणि त्यामुळे जॅम होणारी स्कॅनिंग मशीन्स हे सारे इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेच आहे, तसे खडीसाखर पण आता नोंदवली गेली असेल यांच्या रेकॉर्ड मधे Happy

टीप - ही घटना खरीच घडलेली आहे. पात्रांची नावं आणि थोडे तपशील बदलले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा! नॉर्मली काप्स अशा प्रकारचे सब्स्टंस वास घेऊन, जीभेला लावुन टेस्ट करतात. तुमच्या गांवचे जास्त कॉशस आहेत बहुतेक... Proud

भारीए किस्सा....
(पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, हे ही खरंच)

पोलिसांनी त्यांचे काम इमानेइतबारे केले म्हणून त्यांचे अभिनंदन. मायनॉरिटीजना पोलिस उगाच किती त्रास देतात, असे म्हणत तुम्ही गळा काढला नाही, म्हणून तुमचे अभिनंदन.

भन्नाट किस्सा!

यावरुन आमचाही हॅपनिंग दिवस आठवला. नायगारा बघून कॅनडामधून अमेरिकेत परत येत होतो बाय रोड. बॉर्डरवर आईची पर्स चेक करताना नेमकी ऑफीसरला एका पुडीत बांधलेली आवळा सुपारी सापडली. ताबडतोब आम्हाला सगळ्यांना उतरवून वेगळ्या खोलीत नेलं. "साधी आवळा सुपारी आहे, शनीपारला कुठल्याही दुकानात मिळते" हे त्याला पटेना. मग तेच - कोण एक्स्पर्ट येउन अ‍ॅनालिसीस वगैरे केलं. साधारण दोनेक तासांने "ही पुडी तुम्हाला अमेरिकेत नेता येणार नाही" यावर सौदा तुटला. म्हटलं ठिक आहे ठेवा पुडी तुम्हाला, अमेरिकेत घरी चिक्कार आहे आवळा सुपारी Happy
आई-बाबा बेक्कार टेन्शनमधे होते मात्र. भारतात परतल्यावर बुवांसारखंच सगळ्यांना सांगितलं असेल - "आम्ही पार हबकलो होतो पण आमचा बारक्या निवांत बसला होता" Proud

शनिपार बारक्या ... मंदार टोटल फॉर्म मध्ये आहे Rofl

मायनॉरिटी!! उपाशी बोका त्यांच राज्य भारताचं एक्सटेन्शन आहे. Happy

घडते असे अनेकदा. जरी शेवटी हा फॉल्स अलार्म निष्पन्न झाला तरीही तत्परतेने पोलिसांना अलर्ट केल्याबद्दल ड्रायवरचे आभार मानावेत तितके थोडेच. "मला वाटले खडीसाखर असेल म्हणून मी दुर्लक्ष केले" (आणि नंतर कळले ते ड्रग्स होते) असे होण्यापेक्षा हे किती चांगले झाले.

इकडे (भारतात) मात्र उलटा प्रकार घडतो:
१. काही दिवसापूर्वी कुरियर कंपनीत पार्सल मध्ये रेडिओ होता. त्यातून बीप आवाज आला. खरं तर संशय येऊन त्याने पोलिसांना कळवायला हवे. पण त्याने तो रेडिओ कुतुहलाने प्लग इन केला आणि धाड्कन स्फोट झाला.

२. काही महिन्यांपूर्वी मी माझी कार सर्विसिंग साठी द्यायला गेलो होतो. वेटिंग लोंज मध्ये काही लोक होते आणि माझ्या बाजूच्या बाकावर नुसतीच एक सुटकेस ठेवली होती. बराच काळ सुटकेस कोणी नेली नाही म्हणून मी उठून त्यांच्या स्टाफ पैकी एकाला बोलवून आणले. त्याने तिथे लगेच स्वत:च सुटकेस चेक करायला सुरुवत केली ("तेला काय हुतंय?" अशा अविर्भावात). Happy

भारतात परतल्यावर बुवांसारखंच सगळ्यांना सांगितलं असेल - "आम्ही पार हबकलो होतो पण आमचा बारक्या निवांत बसला होता" >>> Lol

भारी कीस्सा आहे Lol

पोलिस लॅब मधून रिझल्ट येईपर्यंत थांबत नाहीत का???

अमेरिकेत घरी चिक्कार आहे आवळा सुपारी >>> आवळा सुपारी सायट्रस आहे म्हणून मला ऑस्ट्रेलियात कस्टम्स करताना टाकून द्यायला लागली होती. ऑस्ट्रेलियात काय न्यायचे आणि काय न्यायचे नाही ह्याचे कडक कायदे आहेत.

Lol भारी किस्सा!!!!

सुमुक्ता, ऑस्ट्रेलियाचे कस्टम क्लियरन्स कठीण आहे पण पूर्वीसारखे नाही. बरेच पदार्थ आणता येतात (पूर्वी मसाला वगैरे आणता येत नसे त्या मानाने)

अरे आवळा सुपारीही ?
खडीसाकर, आवळासुपारी प्रवासात बाळगायची सवय आहे नेमकी , इंडीया ट्रिपहून येताना !

Pages