मैत्री भाग - 4

Submitted by ..सिद्धी.. on 13 April, 2018 - 10:25

आधीचे भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जा.....
भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मागील भागात:-
महंतांनी त्याला तसं आश्वासन दिलं.त्यांच्या चेहेर्यावर समाधानाचं हास्य पसरलं. आता पुन्हा काही विधी करून ते रोहनला पुन्हा त्याच्या जगात पाठवत होते. तितक्यात संजनाला एक सावली महंतांवर शस्त्राने वार करताना दिसली. यापासून अनभिज्ञ असलेले महंत त्या अनपेक्षित वाराने रक्ताच्या थारोळ्यात कोसळले...
इथून पुढे:-

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

संजना घाबरून जोरात ओरडली. तीने पटकन समिधाच्या हातातून हात सोडवून घेतला आणि महंताना वाचवायला धावली.समिधा आणि समीरही तिला पकडायला पळाले. ती रिंगणाबाहेर पाऊल टाकणार तितक्यात तिच्या चेहेर्यावर कोणीतरी पाण्याचे थेंब शिंपडले आणि तीच्यावर केलेलं संमोहन तुटलं. पुन्हा भानावर आल्यावर ती परत रिंगणाच्या आत जाऊ लागली. तेव्हा संजनाला कळलं की तीला रिंगणाबाहेर काढून आपल्यात कायमचं समाविष्ट करून घेण्यासाठी दुष्ट शक्तींनी निर्माण केलेला तो एक आभास होता. महंतांनी वेळीच अभिमंत्रीत जल तिच्यावर शिंपडल्यामुळे तीचा जीव वाचला होता. तीने महंतांचे मनोमन आभार मानले.  तासाभराने महंतांची पूजा संपली. त्यांनी एका विशिष्ट मंत्राचा जप करत सर्वांना रिंगणाबाहेर यायला सांगितलं. क्षणभरासाठी रिंगण चमकलं आणि तिघांनीही एकाच वेळी रिंगणाबाहेर पाऊल टाकलं. सगळ्यानी सामानाची आवराआवर केली. महंतांनी पूजेच्या ठिकाणी कुंकवाने खूण करून ठेवली. सात वाजता सुरू झालेली पूजा संपली तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.पूजा मनासारखी संपन्न झाल्याने महंतांचा चेहेरा प्रसन्न दिसत होता.

महंतांनी सांगितलं; आता आधी आपण सगळेजण समिधाच्या घरी जायला निघूया. तिथेच मुक्काम करून आपण आपली योजना ठरवणार आहोत. जेवण झाल्यावर मी तुमच्या सर्व शंकांच समाधान करणार आहे. त्यामुळे आतातरी लगेच निघूया.गेल्यावर सगळ्यात आधी आपण समिधाच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन या सगळ्या घटनेबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून आपल्याला या मोहीमेत मदत होईल. रोहनने मला काय सांगितलं हे देखिल तुम्हाला मी तिथेच सांगेन. महंतांच बोलणं संपल्यावर सगळेजण पटकन गाडीत बसले. समीरने गाडी वेगाने पळवायला सुरूवात केली. साधारण अर्ध्या तासाने सगळे समिधाच्या घरी पोहोचले. तिला असं अचानक आलेलं बघून सर्वांना आनंद झाला. संजना आणि समीर सगळ्यांना माहित होते हाॅस्टेलवर भेटल्यामुळे. पण बरोबर आलेले महंत सगळ्यांसाठी नवीन होते. समिधाने त्यांची सगळ्यांशी ओळख करून दिली. समिधाच्या आईने सगळे हातपाय धुवून येईपर्यंत पानं मांडली. खूप भूक लागल्यामुळे चौघांनी भराभर जेवण आटपलं. हात धुवून सगळे टेरेसवर थंड हवेच्या सानिध्यात येवून बसले. समिधाने बाबांना सगळ्यांना टेरेसवर बोलावून आणायला सांगितलं. तिला काहीतरी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे असं ती म्हणाली . बाबांना जरा काळजी वाटू लागली. त्यांनी बोलावल्यावर पाचच मिनीटात सगळे टेरेसवर हजर झाले.

समिधाने बोलायला सुरूवात केली. तिने आतापर्यंतच्या सगळ्या घटना सांगितल्या. अर्ध्या तासाने तिचं बोलणं संपल्यावर घरचे सगळे अचंबित होऊन तिच्याकडे बघत होते.आतापर्यंत घडलेल्या गोष्टी त्यांच्या कल्पनेपलीकडच्या असल्याने त्यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी महंतांना पुढाकार घेऊन बोलायला सुरूवात केली.

ते म्हणाले; रोहन हा अतिशय साधा सरळ आणि चांगला मुलगा होता. पण एका फसवणुकीमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे.हे सगळ्यांना माहितच आहे की रोहन शेतीशास्त्रात पदवी घेऊन त्याच्या वडीलोपार्जित जमीनीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन घेत होता. त्यांच्या तीस एकर जमिनीत दरवर्षी भरघोस उत्पादन येत होतं. पण मागची दोन वर्ष पाऊस न पडल्यामुळे उत्पादन कमी आलं होतं. एके दिवशी रोहन सकाळी घरी चहा पीत बसला होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. एक व्यक्ती आतमध्ये आली आणि रोहनशी बोलू लागली. रोहन त्याला ओळखत होता. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्या व्यक्तीने मूळ मुद्द्याला हात घातला. त्याला रोहनच्या आणि आजूबाजूची जमीन विकत घेऊन त्याच्या कारखान्याचा नवा प्लांट उभा करायचा होता. त्यांच्या कारखान्यात उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल मिळण्याचे ठिकाण इथून जवळ होते . त्यामुळे त्याच्या दृष्टीने ती जागा मोक्याची होती. आजूबाजूच्या सर्व शेतकर्यांच्या जमीनी त्याने विकत घेतल्या होत्या. पण रोहनची जमीन मोठी असल्याने तो आज स्वतः त्याला घरी भेटायला आला होता. रोहनने विचार करायला वेळ मागितला. ती व्यक्ती देणार असलेला मोबदला जमीनीच्या मानाने तसा कमीच होता. आणि शेती सोडल्यास त्याच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधनही नव्हतं . त्यामुळे त्याने या प्रस्तावाला नकार दिला. याचा त्या व्यक्तीला राग आला कारण रोहनची जमीन मध्यात असल्याने ती विकत घेणं भागचं होतं. तीथेच कारखान्याचा मुख्य भाग असणार होता. अनेकदा सांगूनही रोहन ऐकत नव्हता म्हणून त्या व्यक्ती आता चिडली. रोहन यशस्वी शेतकरी होता. आता त्या व्यक्तीने त्याला संपूर्ण कंगाल करायचा विडाच उचलला. त्यासाठी त्याने रोहनला नवीन बांधणार्या कारखान्यात पार्टनरशीप देऊ केली. आता रोहननेही आपल्या निर्णयावर पुनर्विचार केला . आणि शेवटी पार्टनरशीप स्वीकारायचं ठरवलं. आपल्या पहिल्या डावात ती व्यक्ती सफल झाली होती. रोहनकडून जमीनविषयक बाबींची पूर्तता करून करून घेतली
दीड वर्षात कारखाना सुरू झाला. त्या व्यक्तीने रोहनशी अगदी घनिष्ट मैत्री केली आणि त्याचा विश्वास संपादन करून घेतला. बघता बघता एक वर्ष सरलं. रोहन आता त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागला. महत्वाच्या निर्णयांमध्ये रोहनलाही समाविष्ट केलं जाऊ लागलं. आता ती व्यक्ती आपला शेवटचा वार करायच्या तयारीत होती. योग्य संधीची वाट बघत होती. एके दिवशी त्याने धोक्याने रोहनच्या काही पेपर्सवर सह्या घेतल्या . त्यावर सह्या करून रोहनने स्वतःची कंपनीतली पार्टनरशीप स्वेच्छेने सोडली होती. हळूहळू त्या व्यक्तीची रोहनप्रती वागणूक बदलू लागली. एके दिवशी काही पेपर्स वाचत असताना ही फसवणूक रोहनच्या लक्षात आली. त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. हा विश्वासघात त्याला अजिबात अपेक्षित नव्हता. रोहन तडक त्या व्यक्तीच्या केबिनमध्ये याचा जाब विचारायला गेला.ती व्यक्ती या विषयावर बोलायला रोहनला घेऊन बाहेर गेली. शेवटी ते गावाबाहेरच्या कड्याजवळ आले. रोहनला त्याचा डाव कळल्यामुळे त्याला जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता आणि हाच त्या व्यक्तीच्या कारस्थानाचा अंतिम टप्पा होता. त्यामुळे बोलता बोलता ती व्यक्ती रोहनला कड्याच्या एका टोकाशी घेऊन आली आणि  एक बेसावध क्षणी रोहनला धक्का देऊन त्याला दरीत ढकलून दिलं . रोहनचा दरीत कोसळून मृत्यू झाला. शेवटी पोलिसात आपली ओळख वापरून त्याने या खूनाला अपघाती मृत्यू म्हणून घोषीत केलं आणि केस बंद करून टाकली.नंतर थोड्या दिवसांनी रोहनच्या घरी जाऊन त्याने त्याच्या आईला आणि बहीणीलाही घराबाहेर हाकलून दिलं. त्या दोघीही आता गावाच्या शेवटी असलेल्या भागात पत्र्याच्या झोपडीत राहत आहेत. जवळच्या घरची धुणी भांडी करून कसंबसं घर चालवत आहेत. या सगळ्यात पैसे नसल्यामुळे त्याच्या बहीणीचं शिक्षण बंद झालं आहे. चांगलं शिकून शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करायचं तिचं स्वप्न होतं ते आता धुळीला मिळालं आहे. या सगळ्यात ज्या व्यक्तीचा हात आहे तिचं नाव आहे राजेश शंकर पाटील.
   
राजेशचं नाव ऐकून समिधाच्या बाबांना धक्काच बसला. आपल्या सख्ख्या बहीणीचा मुलगा असं करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नाही म्हणायला अशा काही गोष्टी त्यांच्या कानावर आलेल्या. पण एखाद्याच्या यशाबद्दल असूया बाळगणारे लोक अशा चर्चा करतात असं म्हणत त्यांनी यावर विश्वास ठेवला नव्हता. पण रोहन जर स्वतः दुसर्या जगातला बंधनं झुगारून आपल्या आप्तांच्या मदतीसाठी तळमळत होता तर नक्कीच यात काहीतरी तथ्य होतं. आता सगळ्यांनी काहीवेळ विचार करून रोहनची मदत करायचा निर्णय घेतला. पण समिधाच्या आजीची जरा घालमेल होत होती. कारण काहीही झालं तरी राजेश तिच्या मुलीच मुलगा होता. आपल्या सख्या नातवाचं यात काही बरं वाईट होऊ नये असं तीचं एक मन सांगत होतं. तर रोहनवर झालेल्या अन्यायामुळे त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं होतं. त्यामुळे त्याची मदत न करणं म्हणजे अन्याय होता जो तिच्या तत्त्वात बसत नव्हता. शेवटी समिधाच्या बाबांनी तिची समजूत काढली. आणि आजीनेही रोहनच्या मदतीसाठी होकार दर्शवला.आता महंतांनी इतका वेळ आपल्या डोक्यात तयार करून ठेवलेली योजना पद्धतशीरपणे सर्वांसमोर मांडली.नंतर त्यांनी रोहनची शेवटची इच्छा सर्वांसमोर व्यक्त केली. यावर बराच वेळ सजळेजण बराच वेळ विचार करत होते. संजना आणि समीरला एक उपाय सापडला. पण सगळ्यांना सांगायला त्यांना जरा अवघडल्यासारखं वाटत होतं. कारण समिधाशी त्यांची कितीही घनिष्ट मैत्री असली तरी त्यांच्या कुटुंबाची ती वैयक्तीक गोष्ट होती. त्यांनी महंतांना आपला उपाय सांगितला.तो ऐकून महंतांच्या चेहेर्यावर स्मितहास्य पसरलं. त्यानी समिधाच्या बाबांची परवानगी घेऊन समीरलाच तो सांगायला लावला. सगळ्यांनाच ती कल्पना आवडली आणि शेवटी या योजनेवर शिक्कामोर्तब झाली. महंतांनी धोका नको म्हणून घरातल्या सर्वांच्या हातात अभिमंत्रीत धागा बांधला. हे सगळं ठरवून पहाटे चार वाजता सगळेजण झोपायला गेले.

क्रमशः

---- आदिसिद्धी 
====================================

तळटीप :- काही तपशील चुकले असल्यास मला तसं सांगा. मी दुरूस्त करेन...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केकता छाप टिव्ही सिरियल फार पहाता का तुम्ही Happy फसवून सही घेणे आणि हिरो ने न वाचता सह्या करणे, चर्चा करायला दरीच्या काठावर जाणे Lol

केकता छाप टिव्ही सिरियल फार पहाता का तुम्ही Happy फसवून सही घेणे आणि हिरो ने न वाचता सह्या करणे, चर्चा करायला दरीच्या काठावर जाणे Lol

नवीन Submitted by maitreyee on 13 April, 2018 - 21:21 >>>>>>मी टीव्ही सिरीयल ; चित्रपट ; रियालीटी शो काहीच बघत नाही...मुळात मी टीव्हीवर कधीकधी बातम्या सोडल्यास इतर काहीच पाहत नाही...मला ते आवडत नाही...

छान !
पण लिहीताना घाईगडबड होतेय !
हा भाग एकदा शांतपणे वाचून बघ, काही टायपोज आहेत..एक वाक्य अर्धवट आहे. जेवण करत असता अचानक दाढेखाली खडा यावा त्याप्रमाणे टायपोज वाचणार्याचा रसभंग करतात. मग लिंक तुटते.
घाईगडबड न करता शांतपणे आणि सावकाश लिहील्यास चुका टाळल्या जातील. लिहून झाल्यानंतर एक दोनदा सगळं लिखाण शांतपणे वाचून काढून मग पोस्ट करावं असं माझं मत आहे.
मला काही लिहीता वैगरे येत नाही पण एक वाचक म्हणून जे वाटतं ते लिहीलंय..विचार कर. Happy

>>>पूजा मनासारखी संपन्न महंतांचा चेहेरा प्रसन्न दिसत होता.<<<

पूजा मनासारखी संपन्न झाल्याने महंतांचा चेहरा प्रसन्न दिसत होता.

ओके आनंद दादा... पाहते मी पुन्हा.... सगळं एकावेळी टाईप नाही केलय त्यामुळे चुका झाल्या असतील...चार वेगवेगळ्या वेळी टाईप केलय..कुठलं वाक्य अर्धवट राहिलय ते सांगतोस का...

हो केलं मी दुरूस्त.. वाचताना सापडलं आत्ताच.... धन्यवाद